अनवट वाटा …. प्रवास आनंदाचा!
नमस्कार,
अनवट वाटेवर आपले सहर्ष स्वागत!
‘अनवट वाटा’ प्रामुख्याने मी केलेल्या भटकंतीचा लेखा जोखा असला तरी त्यामध्ये साहित्य, काव्य, विचारमंथन अश्या निरनिराळ्या अनवट वाटांवरची माझी मुशाफिरी देखील आहे.
ह्या अनवट वाटेवर तुमची कधी भेट घडेल डोंगर माथ्यावरून नजरभेट झालेल्या सूर्योदयाशी, तर कधी समुद्र काठावरच्या सूर्यास्ताशी. कधी हिरव्या जंगल वाटा तर कधी शुभ्र चमचमती हिमशिखरे! अनेक निसर्गाचे अविष्कार भेटतील, कधी चित्रातून तर कधी शब्दातून!
आयुष्य खरं तर एका अनवट वाटेवरचा प्रवासच आहे! जीवनाच्या अनवट वाटेवर असंख्य नागमोडी वळणे आहेत, कधी दगड-धोंडे, काट्या-कुट्याची वाट आहे. कधी यश आणि संघर्षाचे चढ-उतार आहेत, तर जीवनाच्या विविध टप्प्यातील वेगवेगळ्या ऋतूंचे सोहळेही आहेत!
ह्या अनवट वाटांवरून आपला प्रवास चालूच राहतो वर्तमानाकडून भविष्याकडे! भविष्याकडे टाकलेले प्रत्येक पुढचं पाऊल आपला भूतकाळ बनून राहतं! त्या आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलताना एक वेगळाच आनंद मिळतो!
हा प्रवासच आपल्याला अनुभवसिद्ध बनवितो, आयुष्याशी दोन हात करण्यासाठी!
हा प्रवासच आपल्याला स्वयंसिद्ध बनवितो, संघर्षाचे आव्हान पेलण्यासाठी!
हा प्रवासच आपल्याला सर्जनशील बनवितो, नवोन्मेषाचा आनंद घेण्यासाठी!
आयुष्यातही अशाच अनवट वाटा चोखाळल्या, आणि खरोखरच त्या अनवट वाटेवरच्या प्रवासाने जगण्याला एक जिद्द दिली आणि अनुभवसिद्ध बनविले!
लेखन हा त्या लेखकाच्या मनाचा आरसा असतो असं म्हणतात! अन् लेखणी त्या लेखकाच्या मनाची स्पंदने शब्द बद्ध करण्यात माध्यम बनते. मनाच्या सांदीकोपऱ्यात दडून बसलेली व्यक्ति चित्रे, स्थल, काळ, वेळ, घटना, भावभावना, अनुभव, हे सारं काही त्या स्पंदनामधून प्रतित होत राहते. त्याचे शब्दांकन करताना, आपलाच आपल्याशी संवाद सुरू होतो. अन् लेखणी आपली सखी होऊन जाते.
ह्या अनवट वाटेवर माझी प्रवास वर्णने, पदभ्रमण मोहिमा, भटकंती, कविता आणि इतर बरेच काही तुम्हाला वाचता येईल.
तुमचा माझ्या अनवट वाटेवरचा वाचन प्रवास आनंददायी होवो!
लीना पाटील
