हर की धूनचे खोरे (व्हॅली) भौगोलिकदृष्ट्या उत्तरांचल जिल्ह्यामध्ये येते. हिमालयाच्या कुमाऊं गढवाल व शिवालिक पर्वतराजीत वसलेलं उत्तरांचल हे सुंदर राज्य आहे. उत्तरांचलमधील विविधतेने नटलेल्या प्राकृतिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या हिमालयीन सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी हर की धूनचा ट्रेक करण्यास निश्चितच हरकत नाही. यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडीयाने नव्यानेच ‘हर की दून’ चा ट्रेक रूट सन २००२ मध्ये जाहीर केलेला होता. अतिशय अभ्यासक आणि संशोधक पध्दतीने हा ट्रेक रूट नियोजित करण्यात आलेला होता. हर की धून ट्रेक रुट अगदी नितांत सुंदर आहे. ह्या ट्रेक मध्ये निसर्ग सौंदर्याची लयलूटही आहे, तसेच साहसी चढ उतारही आहेत अन् बर्फाळ प्रदेशात रमण्याचीही संधी आहे. इतकेच नव्हे तर निसर्गाशी एकरूप होऊन इथेच परमेश्वराचे अस्तित्व असावे ही जाणीवही देऊन जाते. अन् अध्यात्मिक ओढ लावणारी शुभ्र धवल हिमाची आकाशाला गवसणी घालणारी शिखरेही आहेत. अन् तेव्हा आठवण होते पॉल ब्रंटनच्या भारताच्या अध्यात्मिक रहस्याच्या शोधाची!
हर की धून व्हॅली हिमाचल प्रदेशाच्या सीमेशी असणार्या पश्चिम गढवाल हिमालयीन रांगांमध्ये वसलेली आहेत. फतेह पर्वताच्या पायथ्याशी असलेली ही व्हॅली पाईन, देवदार, आणि इतर सूचीपर्णी वृक्षराजीनी नटलेली आहे. ट्रेक रूट ज्या घनदाट देवदार-पाईनच्या जंगलामधून हर की धून व्हॅलीपर्यंत जातो ते सर्व उत्तरकाशी मधील गोविंद नॅशनल पार्क अरण्याचाच भाग आहे. ट्रेक रूट वर मंत्रमुग्ध करणारे अनेक प्रपात खळखळणारा रौद्र टॉन्स नदीचा प्रवाह, उंचावरची हिरवीगार कुरणे आणि हिमाच्छादित शिखरे हयांचे श्वास रोखून ठेवणारे नितांत सुंदर दर्शन घडविते.
शिवालीक पर्वत राजीत समुद्रसपाटीपासून ६००० फूट उंचीवर असलेल्या ‘पहाडों की रानी-मसूरी’ला असलेल्या यूथ हॉस्टेलला ह्या ट्रेकसाठी आपल्याला प्रथम रिपोर्ट करावे लागते. मसुरीहून युथ हॉस्टेलच्याच सौजन्याने ट्रेकच्या बेसकॅम्प – सांक्री पर्यत नेले जाते. मसुरीहून यमनोत्री कडे जाणाऱ्या रस्त्यावर पुरोला गावापाशी रस्त्याला फाटा फुटतो. एक रस्ता उजवीकडून यमनोत्रीकडे जातो आणि डावीकडून नेटवार मार्गे बेस कॅम्प सांक्रीला आपण पोहचतो. हया मार्गावर पुरोला हया गावापासून जनसंपर्क नाही. अतिशय अवघड वळणा-वळणाचे रस्ते प्रवास कंटाळवाणा करतात. परंतू सांक्री जवळ येवू लागताच निसर्गाची हिरवाई, मध्येच डोकावणारे हिमाच्छादित पर्वत हयामुळे प्रवासाचा शीण लगेचच नाहीसा होतो. सांक्रीचा बेस कॅम्प ५८०० फूट उंचीवर आहे. कॅम्प साईट अतिशय सुंदर आहे. बेस कॅम्पच्या पायऱ्या-पायऱ्यांच्या रचनेमुळे ती जागा मनात घर करून राहते. कॅम्पच्या लगतच मागील बाजूस सांक्री-गावकरी लोकांची शेती डौलाने उभी होती अन् त्याच्या मागे क्षितिजाशी जवळीक करणारे हिमाच्छादित पर्वत अन् देवदार-पाईनचे स्पर्धा करीत वाढणारे वृक्ष! अन् अवघा प्रदेश सुपीक करणारी सुपीन नदी! सारं काही नयनरम्य आहे.

बेस कॅम्प सांक्री ते हर की धून हा ट्रेक ८ ते ९ टप्प्यांमध्ये विभागला आहे. पहिला कॅम्प जुदा तलाव खरोखरच निसर्गरम्य आहे. एका तळ्याच्या काठावर उंच जागेत युथ हॉस्टेलचे तंबू ठोकलेले आहेत. सभोवार घनदाट वृक्षराजींनी सजलेले पहाड अन् गुलाबी थंडी ! रात्रीच्या वेळी आकाशात जमणारी तारकांची मैफल तर अद्भूतच! अमर्याद निसर्ग सौंदर्याची लयलूट, घनदाट पाईन, फर आणि इतर सूचिपर्णि वृक्षांची जंगले, त्यांचा तो आसमंतात दरवळलेला विशिष्ट गंध, पक्ष्यांचे कुंजन आणि जर मंद आवाजात धुंद करणारी पावा वाजविणारा मुरारी गाईड तुमच्या सोबत असेल तर नंदनवनाचे सुख हयापेक्षा काय वेगळे असावे!
जुदा तलाव ते केदार कंठ हा दुसरा टप्पा पार करताना जंगली स्ट्रॉबेरीची चिमुकली फुले, पिवळ्या फुलांचे पसरलेले ताटवे चालणे अशक्यप्राय करतात. त्या गोड गोजिरवाण्या फुलांना पायदळी तुडवावे ही कल्पनाच नको वाटते. चढ चढून एका मागोमाग एक असे डोंगरदऱ्या, उंचावरची हिरवीगार पिवळ्या आणि जांभळ्या रंगांनी सजलेली कुरणे पार करताच यूथ हॉस्टेलची प्रती स्वित्झर्लंड वाटणारी “केदार कंठ” कॅम्प-साईट येते. येथून चहूकडे, नजर जिथवर पोहोचेल तिथवर हिमाच्छादित शिखरे एकमेकाशी स्पर्धा करीत असलेली दृष्टीस पडतात. सायंकाळी सूर्यास्ताचे वेळी येथे होणारी रंगांची उधळण खासच अनुभवण्याजोगी!

केदार कंठ कडून ढुंढाकडे जाताना शारीरिक स्वास्थ्याचा कस लागतो. हवा विरळ होत जाते. चढ अधिक अवघड होतो. ढग तुमच्या भोवती फेर धरून नाचू लागतात. अन् निसर्ग राजाने ठरविले तर मोठ्या मोठ्या स्वच्छ टपोऱ्या गारा तुमच्या स्वागतालाही हजर असतात. त्यातच वाटेवर जणू तुमचे मनोधैर्य उंचावून टिकवून ठेवण्यासाठी त्या पहाडांमध्ये उंचावर दगडी गजाननाचे अन् शिवाचे प्रांगण तुमची वाट पाहत असते. एवढ्या उंचीवर ही दगडी अतिशय साधी मंदिरे पाहून कुतुहल वाटते. अश्या हया निर्जन स्थळी प्रकृतीने आपणहूनच रचून आपल्या मनाप्रमाणे ही गिरीमंदीरे अधिक निसर्ग शोभायुक्त अन् सुविशाल सजविली आहेत. आपण ख-या अर्थाने नतमस्तक होतो.
ढूंढाहून पूढे खरा साहसी प्रकार आहे. तलहौटी कॅम्पकडे जाण्यासाठी चढ उताराची परिसीमा होते. त्यातच ७० अंशाच्या कोनात असणाऱ्या बर्फाळ उतारांना समांतर चालायचे, उजवीकडे खडे बर्फाळ पर्वत अन् डावीकडे थेट दरी ! ती पुढे पुढे जाताना सतत खुणावत राहते, बोलवित राहते! ढूंढा, तलहौटी अगदी निसर्गाने नटलेली, अन् अगदी देवभूमीवत वाटणारी स्थळे आहेत. तलहौटीहून थोडे खाली उतरून लेखाथाचला येताना पिवळी जर्द कुरणे उतारांवर पसरलेली दिसतात. त्या जंगलात कुरणावर मुक्तपणे चरणा-या गाई, मेंढ्यांचे कळप, अदृष्यपणे वाहणा-या निर्झरांचे संगीत आणि विविध पक्ष्यांचे मनाला भुरळ पाडणारे आवाज! ज्याला कोणत्याही वाईट गोष्टींचा स्पर्श झालेला नाही असा अतिशय नैसर्गिक, पावित्र्याची, मांगल्याची जाण करून देणारा अवर्णनीय निसर्ग जागोजाग उभा ठाकला आहे.
लेखाथाच हून सीमा गावाकडे येताना मनुष्य वस्तीशी संपर्क येतो. सोबत मुजोरपणे अगदी थडाडून वाहणा-या टौंस नदीचा दुथडी मारून वाहणारा प्रवाह कानात कायम गुंजत राहतो. लेखाथाच ते सीमा प्रवासात ‘डाटमेर’ आणि ‘गंगाहाट’ ही गावे लागतात. अन् माहीत नसलेल्या गंमतीशीर गोष्टी कळतात. या व्हॅलीतील स्थानिक लोक महाभारतामधील कौरवांची पूजा करतात. डाटमेंर गावात दुर्याधनाचे मंदीर आहे. अजूनही त्या प्रदेशामध्ये पांडवांची कौटुंबिक व्यवस्था म्हणजे एक पत्नी अनेक जणांत हा रिवाज पाळतात. कौरव वंशाची राजा म्हणून पूजा केली जाते. शेळ्या मेंढ्यांच्या संख्येवर ठरणारी स्थानिक लोकांची समृद्धी, हिरवीगार गव्हाची शेते, निरागसपणे अव्याहतपणे कामात व्यस्त असणारे अन् निसर्गाच्या सानिध्यात कष्टाचे का असेना पण शांततामय जीवन जगणारे निर्व्याज स्थानिक आबालवृद्ध नजरेतून सूटत नाहीत. ख-या अर्थाने आधुनिकतेचा कोणताही स्पर्शही नसलेली ही गावे आणि तिथले जीवन अधिक आनंददायी आणि सुखसमाधानी वाटते!
सीमा गावाकडून सोबत खळखळून वाहणारा टॉन्स नदीचा प्रवाह वाटाडयासारखा प्रमाण धरून निघालो की ओसला गाव लागते. इथे चक्क गढवाल निगमचे गेस्ट हाउस आहे. समोरच मोठा कॉंक्रीटचा झुलता पूल टॉन्स नदीवर बांधलेला आहे, तो पार करून उभा चढ चढून नदीच्या दुसर्या अंगाकडील पर्वत रांगेवरून ट्रेक रूट पुढे जातो. कधी उतार कधी चढ, कधी हिरवीगार शेते असा हा मार्ग काहीश्या ठिकाणी अगदी अवघड होतो. उंचावर नेऊन वा-याचे गाणेही ऐकवितो. समोर दिमाखदार, तेजोमय हिमाच्छादित कालानाग, बंदरपूछ आणि स्वर्ग रोहिणी हया शिखरांचे नितांत सुंदर मन तृप्त करणारे दर्शन घडवित राहतो. हया गढवालच्या पर्वतरांगांमध्ये अनेक खनिजेही दडलेली आहेत. अनेक वृक्षांच्या जाती हयांनी घनदाट डेरेदार जंगल मनाला भुरळ पाडीत राहते. जागोजाग दरीतून खाली घसरून आलेला हिम कुठे कुठे हिमनदीच्या स्वरूपाने, तर कुठे धबधब्याच्या स्वरुपात ओसंडून वाहता झालेला दिसतो. प्रत्येक वळणावर मनात घर करून राहतील अशी अद्भूत निसर्ग चित्रे दिसतात. हर की धून व्हॅलीमधे कॅम्प साईटवर पोहोचताच आनंदास पारावर उरत नाही. चहूबाजूने उभे ठाकलेले हे हिमाच्छादित पर्वत म्हणजे देवदूतच! हर की दून व्हॅलीमधे पोहोचताच अपरंपार व अगम्य अश्या शुभ्र हिमराशी आपल्या धवल स्मिताने अनंताचा महिमा व्यक्त करीत असल्याचा अनुभव होतो. अनंत भावमय हया चिरंतन हिमराशी अनंताच्या ध्यानात समाधिस्थ झालेली भासते.
शिव-पार्वतीच्या वास्तव्याने, पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी ! हर की धून म्हणजे गिरी-राजशृंगी महादेवाचे व प्रकृती पार्वती-सतीचे मिलन! इथे आल्यावर असे वाटते की, हिमालयाचा विराट देह धारण करून पार्वती परमेश्वर दर्शनेच्छुंना विस्मय, भय अश्या दृष्यांची भेट घडवून संमिश्र आनंदाच्या उर्मीनी परिपूर्ण करीत आहेत. हिमालय जितका मनोरम तितकाच भयावह! हया परस्परविरोधी भावांचा एकत्र समावेश शिव-गौरीच्या हिमालयरूपी विराट देहातच प्रकट झालेला दिसून येतो.
स्थानिक व पौराणिक माहिती आधारे असे कळून येते की, हर की धून व्हॅली ही शिव-गौरीच्या मीलनाची जागा! हर की धून हया व्हॅलीत शिव-पार्वतीने प्रणयाराधन केले असे सांगीतले जाते. म्हणूनच हया अद्भूत ठिकाणाला ‘हर’ म्हणजे ‘शिव’ आणि ‘दून’ म्हणजे ‘व्हॅली’ – ख-या अर्थाने देवभूमी म्हणून ओळखली जाते. आणखी एका गोष्टीने हया ठिकाणाची महती वाढते. समोरच उभी असणारी गगनचुंबी, अत्युच्च अलंघ्य, अगाध हिममय स्वर्गरोहिणी शिखरगंगा! पांडवांचा स्वर्गरोहणाचा मार्ग! सर्व काही अद्भूतच वाटू लागते! हया उदात्त वातावरणात व प्रसन्न मनस्थितीत खुद्द परमेश्वराचा आभास होतो.





जौंधर ग्लेशियरच्या दक्षिण-पूर्वेकडे झुल्यासारखी असणारी हर की धून व्हॅली घनदाट पाईन, देवदार आणि सूचिपर्णी वृक्षांनी समृध्द आहे. निळ्या, जांभळ्या, पिवळ्या फुलांची जागोजाग उधळण आहे. सूर्यास्ताचे वेळी मावळतीच्या किरणांनी न्हाउन निघालेली ही हिमशिखरे सोनेरी मुकुटमण्यासारखी चमकत राहतात. हया विलंबित अश्या सुर्यबिंबाच्या किरणांमुळे हिमगिरी खरोखर हिमगिरी दिसते अन् बर्फाच्छादित हिमालयाचे हे हेमोज्जवल रूप विस्मित करते. हर की धून व्हॅलीतून परतताना मन हरवून जाते. शिवाच्या त्या धून मध्येच! शिवाची किमयाच अद्भूत ट्रेक रूट वर जागोजाग दिसणारे शुभ्र तेजस्वी हिमाच्छादित पर्वत, निलामय आकाश, शिवाच्या तांडवाचीही यथार्थ कल्पना देत खळाळून वाहणारे हिमनद्यांचे प्रवाह, चैतन्याचे मूर्त स्वरुपात साकारलेली वनश्री! खरोखरच हर-की-धून मनात रूंजी घालीत राहाते ! हिमालयाची ओढ ही निरंतर आहे. एकदा हिमालयात जाऊन आलेल्याला पुन्हा पुन्हा माघारी साद घालणारी ती हिमाच्छादित शिखरे, डोळ्यांचे पारणे फेडणारा निसर्ग, त्या द-या खोरी सारं काही साद देती हिमशिखरे हयाची प्रचिती देऊन जातात.
हर की दून-पदभ्रमण वर्ष २००३
हर की दून पदभ्रमण मोहिमेचे संपूर्ण अनुभव कथन वाचण्यासाठी हिमालयातील अनवट वाटा पुस्तकाची प्रत आजच खरेदी करा.

हिमालयातील अनवट वाटा आता उपलब्ध – नोशनप्रेस, अमेझोन कींडल, अमेझोन, फ्लिपकार्ट
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा