व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक करून आल्यानंतर तेथील निसर्ग सौंदर्याने मनावर गारुड केले जणू! त्या अनुभवांना शब्द बद्ध करण्याचा हा एक प्रयत्न.
रम्य सरोवरांच्या प्रदेशात
पृथ्वी तलावर कुठे स्वर्गातील नयनरम्य असे नंदनवन असेल तर ते कश्मीर मध्येच वसलेले आहे! आणि हे नंदनवन जर अगदी खरोखर अनुभवायचे असेल तर कश्मिरच्या निसर्गरम्य दरी-खोऱ्यामध्ये भटकंती करायलाच हवी! हयाची प्रचीती कश्मीर खोऱ्यामध्ये विस्तीर्ण पसरलेल्या आणि अमर्याद निसर्ग सौंदर्याची उधळण झालेल्या हिमालयाच्या पर्वतरांगांमधून जाणारा “कश्मिर ग्रेट लेक”चा ट्रेक केल्यावर नक्कीच येते. असीम निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त लाभलेल्या दरीखोऱ्या, रम्य अल्पाइन सरोवरे, त्यांच्या स्फटिकासम असणाऱ्या पाण्यामध्ये उमटलेल्या अनेक रंगछटा आणि सुविशाल हिमालय पर्वतांची छबी! सर्व काही मंत्रमुग्ध करणारं !
जय बर्फानी बाबा की!
पंचतरणीचा आसमंत अगदी चैतन्यस्वरूप वाटत होता. हयाच पंचतरणीपाशी महादेवाने पंचमहाभूताना त्यागले, तो परिसर एकाच वेळी आप, तेज, वायु आणि आकाश ह्यांची अनुभूति करून देत होता. निरभ्र आकाशात बर्फाच्छादित शिखरांवर पडलेली कोवळी सूर्यकिरणे विलोभनीय होती. पंचतरणीचे जल स्त्रोत त्या किरणांमुळे चमचमत होते. शीतल वायुलहरी पंचतरणीच्या खोऱ्यामध्ये खुशाल रेंगाळत होत्या.