अमरनाथ यात्रा एक अनुभव – भाग १
हिमालयातील भटकंती हा अगदी जिव्हाळ्याचा विषय! वडिलांनी साधारणतः २३ वर्षांपुर्वी पहेलगाममार्गे अमरनाथ यात्रा केलेली होती. त्या यात्रेचे त्यांनी केलेले रसभरीत आणि अनुभूतिपूर्ण कथन आजही स्मरणात आहे. त्यांच्या अमरनाथ यात्रेनंतर त्यांना अनेक ठिकाणी अनुभवकथन आणि व्याख्यानांना अनेक आमंत्रणे आली होती. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी “बर्फानी बाबांना” आपणही भेट दयाचीच ही खूणगाठ मनामध्ये बांधलेली होती! पण ही यात्रा अत्यंत कठीण असते असे ऐकिवात होते. परंतु अलिकडे अनेक पर्यटन सेवा देणारे देखील अमरनाथ यात्रेचे आयोजन करतात. पारंपारिकरित्या पायी करण्यात येणाऱ्या यात्रेसाठी आज घोडा, पालखी, हेलिकॉप्टर असेही पर्याय उपलब्ध आहेत.
अनेक वर्षे शिवालयाची यात्रा मनात सुप्त इच्छेच्या स्वरुपात दडून राहिलेली होती. जुलै २०१५ मध्ये अगदी शिवाच्या कृपेनेच अमरनाथ यात्रेचा योग जुळून आला. परमेश्वराला आपली मनोभावे घातलेली साद पोहोचली की तो आपल्या कनवाळू मायेने लेकरांना दर्शनाचा लाभ देतो. अन् अमरनाथ यात्रेचा विचार मनात आल्यापासून ते अमरनाथ यात्रेची पूर्तता होईपर्यंत अनेक योगायोग असे जुळून आले की माझी त्या शिवालयाला भेट देण्याची सुप्त इच्छा जणू त्या भोलेनाथाने ओळखली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही!
अमरनाथ यात्रा म्हणजे सोबतीची आवश्यकता आहे. म्हणून केसरी टूर्सकडे यात्रेचे बुकींग करण्यासाठी गेले. परंतु एका व्यक्तिसाठी अवाजवी सहल दर पाहून परत आले. व लगेच ‘मेक माय ट्रीप’ हया पर्यटन आयोजकांकडे चौकशी केली. त्यांनी दिल्लीहून त्यांचा कंपू निघणार असल्याचे कळविले आणि सहल खर्च सुद्धा सांगीतला. मनाला योग्य वाटले आणि मी बुकींगचे पैसे भरणार तर त्याचे आधी एक दिवस श्री.भान सरांचा फोन आला. भान सर आमचे अत्यंत जवळचे कौटुंबिक स्नेही आणि मुळचे काश्मीरी पंडित! आमच्या फोन वरील संभाषणामधून त्यांनीही अमरनाथ यात्रेस जाण्याचे ठरविले होते हे कळले. मला तर अतिशय आनंद झाला. मला सोबत नाही म्हणून मन खट्टू झाले होते. पण कदाचित त्या सांब सदाशिवानेच जणू माझी आंतरिक ओढ समजली! मी लगेचच १३ जुलै २०१५ रोजीच्या यात्रेकरूंच्या तुकडीचे यात्रा परमिट आणि वैद्यकीय प्रमाण पत्र काढून घेतले. आम्ही “बलताल” मार्गे हेलिकॉप्टरने अमरनाथजीच्या दर्शनाचा बेत आखला. साधारणतः मे महिन्याच्या सुमारास विमानाचे देखील तिकीट आरक्षित करून ठेवले. बर्फानी बाबाकडे पायी चालत जाण्याची मनोकामना होती. त्यामुळे चालण्याचा सराव सुरू केला. उन्हाळी सुट्ट्यांनंतर कोर्टाचे कामकाज सुरू झाले आणि मी पुनः “युवर ऑनर”च्या कचाट्यात सापडले. कधी एकदा जुलै महिना उजाडतोय असे झाले होते!
पर्यटन करताना ह्यापुर्वी अनेक देवस्थानांना भेट दिलेली होती. परंतु यात्रेकरू म्हणून तीर्थस्थळाची यात्रा केली नव्हती. बर्फानी बाबांच्या कृपेने यात्रेचा योग जुळून आला. एकदाचा १० जुलै २०१५ चा दिवस उजाडला. सकाळच्या अकरा वाजताच्या विमानाने आम्ही श्रीनगरकडे कूच केले. साधारणतः दोन अडीच तासांचा प्रवास! हया अवधीमध्ये मनःचक्षुसमोर खूप वर्षांपूर्वी पाहीलेले ‘भारताचे नंदनवन’ तरळू लागले. आज भारताचे हेच ‘नंदनवन’ दहशतीच्या वणव्यात धगधगते पाहून अतीव दु:ख झाले. किंबहुना हयावर्षी अमरनाथ यात्रेला निघाले तेव्हा अनेकांनी मला वेड्यात काढले! तसचं कारणही होतं! ते म्हणजे अमरनाथ यात्रेवरचं अतिरेकी कारवायांच्या दहशतीचे सावट! पण आले भगवंताच्या मना! त्याने बुलावा धाडल्यानंतर भीतीची आवश्यकताच नाही! माझा योग अगदी परमेश्वरी इच्छेनुसार जुळून आला होता. श्रीनगर एअर पोर्टवर ठरल्याप्रमाणे श्री. भान सरांची बहीण भेटली. त्या परस्पर दिल्लीहून श्रीनगर विमानतळावर भेटतील असेच ठरले होते. त्यांची सर्वत्र असलेली दांडगी ओळख व त्यामुळे प्रवासात आमची असलेली बडदास्त ही खूप मोठी जमेची बाजू होती. श्रीनगरला दुपारी दोन वाजता पोहोचलो.
आम्हाला श्रीनगरहून सोनामर्गला नेण्यासाठी इनोव्हा गाडी विमानतळावर आमची वाटच पाहत होती. आमचा चार जणांचा कंपू श्रीनगरहून सोनामर्ग कडे निघाला. फार पूर्वी पाहीलेले श्रीनगर आठविले. आजच्या श्रीनगरची ओळखच वेगळी होती. कायम दहशतीचे सावट! जागोजागी सैनिकांची छावणी! भारताच्या नंदनवनाचा झालेला ऱ्हास सहजच लक्षात येत होता. श्रीनगरच्या छोट्या मोठ्या रस्त्यांवरून जाताना जागोजागी छावण्यांचे अस्तित्व ठळक होते.
साधारणतः संध्याकाळी सातच्या सुमारास सोनामर्ग येथे आमच्या निर्धारित हॉटेल ‘ट्रांक्विल रिट्रीट’ वर पोहोचलो. हॉटेलवर पोहोचताच आनंदास पारावार उरला नाही. आमची खोली आम्ही ताब्यात घेऊन चहाची फर्माईश केली! वेटर तत्काळ चहा घेऊन आला आणि त्याने आमच्या खोलीमध्ये लावलेले पडदे बाजूला सारले, आणि डोळ्याचे पारणे फिटले. मोठ्या मोठ्या फ्रेंच विंडोज् मधून अवतीभोवतीच्या परिसराचा सहजच अंदाज आला. जुलै महिना म्हणजे येथील उन्हाळा! अद्याप अंधारून आले नसल्याने सभोवारचा परिसर स्पष्ट दिसत होता. चहूबाजूने पर्वतराजीने वेढलेल्या हिरव्यागार कुरणांच्या मधोमध श्रीनगर-लेह हया राष्ट्रीय महामार्गावर वसलेलं छोटसं चिमुकलं चित्रवत गाव म्हणजे सोनामर्ग ! आणि ‘Tranquil Retreat’ हे नाव सार्थ करणारे हॉटेल! अनेक वर्षानंतर काश्मीरच्या दुर्गम पण निसर्गरम्य परिसराला भेट देण्याचा आनंदही वेगळा होता. त्यापेक्षाही यात्रेच्या निमित्ताने प्राकृतिक स्वरुपामध्ये अगदी निसर्गाच्या अंगीभूत स्वरुपात परमेश्वराची दृष्टादृष्ट भेट हा एक अनोखा आनंद होता. आणि त्याक्षणी वाचनात आलेलं अगदी मनोमन पटलं की, “निसर्ग हा आपला मित्र आहे. आदरपूर्वक हया देवतेची शांत चित्ताने आराधना केली की अगदी गूढ रीतीने ही निसर्ग देवता आपल्यावर अनुग्रह करते”. सोनामर्ग येथे पोहोचल्यावर मनामध्ये अनंत उर्मी घेऊन दिवसभरच्या थकव्याने कधी निद्रादेवीच्या आधीन झाले हे कळलेही नाही.
क्रमशः
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.





यावर आपले मत नोंदवा