अमरनाथ यात्रा एक अनुभव-भाग २
सोनामर्गच्या कुशीत



समुद्र सपाटीपासून अगदी ३००० मिटर्सच्या उंचीवर काही तासांमध्ये पोहोचल्याने विरळ हवेमुळे त्रास होण्याची संभावना असते. परंतु आदल्या दिवशी संध्याकाळी सोनामर्गला पोहोचल्यामुळे पुरेशी विश्रांती मिळाली आणि सोनामर्गच्या उंचीला देखील आपलेसे करून घेतले. आज दूसरा दिवस अगदी निसर्गाच्या सानिध्यात उजाडला. स्वच्छ सूर्यप्रकाशात चमचमणारी हिमशिखरे अन् पाचूच्या रंगाने नखशिखांत नटलेली पर्वतराजी! हिरव्यागार कुरणावर मनमुराद चरत बागडणारी शेळ्या आणि खेचरं, अस्मानाला गवसणी घालण्यासाठी उंचच उंच जाणारी देवदार सूचीपर्णी वृक्षराजी असं विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवत सकाळ झाली. फक्कड चहाचा स्वाद घेऊन भटकंतीसाठी हॉटेल बाहेर पडल्यावर निसर्ग सौंदर्याची खरी ओळख झाली.
आजचा दिवस हवामानाशी मिळतेजुळते घेण्यासाठी राखीव ठेवला होता. परंतु विरळ हवामानाची यात्रेच्या दृष्टीने थोडी नजरभेट व्हावी म्हणून सोनामर्ग-लेह मार्गावरील द्रासपर्यंत भटकंतीचा कार्यक्रम आखला.
आम्ही भरपेट नाश्ता करून बलताल, जोझिला पास मार्गे काश्मीर खोऱ्यामधील शेवटचे गाव ‘सरबल’ पार करून द्रासच्या दिशेने कूच केले. सोनामर्ग गावातील मुख्य बाजारपेठ सोडताच लेहकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर बहुचर्चीत असा ‘झोझीला पास’चा टप्पा सुरू झाला. प्रथम अमरनाथ यात्रेसाठी प्रसिध्द असलेले गंदेरबल जिल्हयामधील ‘बालतल’ हे सैनिकी छावण्यांचे गांव दृष्यमान झाले. आमची गाडी अतिशय वळणा वळणांच्या रस्त्यांवरून जात होती. एका ठिकाणी बलताल बेसकॅम्पचे विहंगम दृश्य नजरेस पडले. दोन पहाडांच्या दरीखोऱ्यांमध्ये छोटया छोटया रंगीबेरंगी राहुट्यांनी गर्दी केलेली दिसत होती. सैनिकांच्या असंख्य तुकड्या तैनात असून अत्यंत डोळ्यात तेल घालून अतीव सुरक्षेमध्ये यात्रेकरूंची रहाण्याची सोय केलेली होती. काही अंतरावरून नील ग्रार कडून पंचतरणी कडे जाणारी आणि यात्रेहून पुन्हा बलतालकडे परतणारी हेलिकॉप्टर दरीखो-यामध्ये घिरट्या घालीत होती. मनात अनंत उर्मी उठल्या, परमेश्वराच्या, त्या शिवाच्या प्राकृतिक दर्शनाची आत्यंतिक ओढ निर्माण झाली. हया विचारातच आम्ही अत्यंत बिकट असा जोझिला पास पार करून द्रास कडे पुढे सरकू लागले. सोनामर्गपासून २६ किलोमीटरवर असलेला ‘झोझीला पास’ हा श्रीनगर-लेह राजमार्गावरील पहिली आणि अत्यंत कठीण अशी खिंड आहे. लडाख विभागाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखली जाणारी ही खिंड म्हणजेच हा श्रीनगर-लेह राजमार्ग हिवाळ्यामध्ये पूर्ण बर्फाखाली असल्याने बंद असतो. साधारणतः उन्हाळी ऋतुमध्ये बर्फ वितळण्यास सुरू होताना म्हणजे एप्रिल-मे पासून काही महीने हिवाळा सुरू असेपर्यंत हा रस्ता वाहतुकीस खुला असतो. किंबहुना उन्हाळी हवामानात देखील काही ठिकाणी हा रस्ता बर्फाने आच्छादलेला असतो. त्यामुळे रस्त्याची एकूण परिस्थिती अवघडच असते. ह्या प्रवासात मनाला भुरळ पाडणारा निसर्ग, बकरवाल लोकांचे दुर्दम्य जीवन आणि कबिले, भारतीय सैन्याची गस्त हया गोष्टी नजरेआड होत नव्हत्या. हिमाच्छादित गगनचुंबी शिखरे, मानवाच्या कःश्चपणाची सदैव जाणीव करून देत होती.
जोझिला पास पार करून गेल्यावर ‘द्रास’ हे ठिकाण लागते. सैबेरियानंतर सर्वात थंड हवामानात जगातील लोकवस्ती असणारे असणारे द्रास हे दुसऱ्या क्रमांकाचे गाव आहे. द्रास सुमुद्रसपाटी पासून ३३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. द्रासपर्यंत जाताना सोबत असते ती, पूर्वाश्रमीची “शिगार नदी” जिला “द्रास नदी” म्हणून ओळखले जाते. पर्यायी त्या पूर्ण भागाला द्रासचे खोरे म्हणतात. इथे ‘डार्ड’ नावाचे लडाखी स्थलांतरित लोक वस्तीला आहेत.
द्रासच्या नैसर्गिक आणि भौगोलिक परिचयापेक्षाही अधिक राजकीय ओळख सर्व परिचित आहे. सन १९९९ उद्भवलेल्या भारत-पाकिस्तानमधील ‘कारगिल’ युध्द भूमीची द्रास ही खरी ओळख आहे. द्रासला हया रणभूमीवर आज ‘कारगिल वॉर मेमोरियल’ भारताचा तिरंगा आकाशात मानाने उंचच उंच फडकावित, शहीद जवानांना देवभूमीत अमरत्व बहाल करीत अभिमानाने उभे आहे. द्रास मेमोरियल येथे पोहोचताच ‘विजय ऑपरेशन’ ही अक्षरे कोरलेला टायगर हिलचा भाग दिसताच उर भरून येतो. त्याच क्षणाला जाणीव होते की, केवढ्या प्रतिकूल हवामान आणि नैसर्गिक परिस्थितीमध्ये भारतीय सैन्याने देशाच्या आम नागरिकांना भय मुक्त जीवन जगण्यासाठी स्वत:ला हया ठिकाणी चिर निद्रेत झोकून दिले आहे. देशाचा अभिमान सुरक्षित ठेवण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. शहीद जवानांना श्रध्दांजली वाहून तिथल्या वातावरणाचा जड अंत:करणानीच निरोप घेतला अन् परतीच्या वाटेला लागलो. परतीच्या प्रवासात ‘झीरो’ पॉइंटला ‘कावा’ पिण्यासाठी थांबलो अन् पावसाने गाठले. आम्हाला आमच्या प्रवासाचा वेग वाढवावा लागला. रस्ता अत्यंत खराब होण्याआधी “जोझिला” पुन्हा ओलांडून जाणे गरजेचे होते. आम्ही सूर्य मावळतीला जायच्या आधीच खिंड पार केली, पण झोडपलेल्या पावसाने जोझिलाच्या भुसभुशीत रस्त्याची पुरती दैना केली. रस्त्यामध्ये खिंडीत ट्रॅफिक जामचा काही वेळ सामना करावा लागला. सोनामर्गला पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. पण आमचे खऱ्या अर्थाने “अॅ क्लमटायजेशन” झाले.





पावसाळी सोनामर्ग
यात्रेला निघण्यापूर्वीचा दिवस पावसाळी उजाडला. सकाळी निद्रा देवीचा अंमल जातो न् जातो तोच लक्षात आले की, पहाटे पासून पावसाची संततधार चालू आहे. खोलीच्या मोठ्या काचांच्या तावदानातून पाहीले तर सूर्य कुठे तरी रूसून बसल्यागत ढगाळ वातावरण! वरूण राजाने सततचा चालविलेला अभिषेक! आणि पुंजक्या पुंजक्याने पहाडांशी, दरी-खोऱ्यात लगट करीत असलेले पांढुरके करड्या ढगांचे थवे! दिवसभर हा खेळ पहाण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता! खराब हवामानामुळे हया दिवशी बालताल मार्गे हेलिकॉप्टरची यात्रा देखील बंद ठेवण्यात आलेली असल्याचे कळले. आम्ही काश्मीरला पोहोचलो तेव्हा दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढगफूटीमूळे पहेलगाम मार्गाकडील यात्रा पूर्णतः बंद करण्यात आलेली होती.
दुसऱ्या दिवशी आमच्या यात्रेचा नियोजित दिवस होता. मन साशंक झाले. शिवाची मनोमन आराधना करीत राहीलो. अत्यंत सकारात्मक विचार ठेवून पावसाळी रविवार हॉटेल मध्येच निवांत विश्रांती घेत व्यतीत केला. मोठ्या काचांच्या तावदानामधून समोर दिसणारे “ताजीवास” ग्लेशियर पर्वत, त्यावर झुलणारे ढग, ओलेचिंब देवदार वृक्ष आणि हिरवी कुरणे हे न्याहाळत आणि वाफाळलेल्या चहाचे कप रिते करण्यापलीकडे पर्यायच नव्हता. संध्याकाळी पावसाची रिपरिप कमी झाल्यावर पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो. एका छोट्या टेकडीवर चढून शारीरिक हालचालींना उदयाच्या दिवसासाठी तयार होण्याचा संकेत दिला. लवकरच जेवण उरकून निद्रा देवीच्या आधीन झालो.
क्रमशः
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा