अमरनाथ यात्रा एक अनुभव-भाग ३
१३ जुलै २०१५ – भेट बर्फानी बाबाची!

रात्रभर पडणाऱ्या पावसाने मन साशंक झाले होते. परंतु पहाटे लवकरच जाग आली. खिडकीच्या तावदानामधून डोंगरमाथ्यावरचे आभाळ स्वच्छ आणि निरभ्र दिसले. वरूण राजाने कृपाच केली होती. जणू शिवाची आज्ञा! मनोमन सांब सदाशिवाला शतश: अभिवादन केले. अगदी खास योग जुळून आला होता. सोमवार तोही सोमप्रदोष! आणि शिवाच्या मूळ प्राकृतिक स्वरुपातील दर्शनाचा लाभ! मन अगदी उल्हसित झाले होते. अनेक जणांकडून तसेच प्रत्यक्ष वडीलांचा अमरनाथ यात्रेचा अनेक वर्षांपूर्वीचा अनुभव ऐकलेला होता. त्यामुळे उत्कंठा शिगेला पोहोचलेली होती.
सकाळी साडे सहाच्या सुमारास आम्ही ‘नीलग्रार’ हेलिपॅडवर पोहोचलो. आमची हेलिकॉप्टरची तिकीटे आरक्षित होती. स्थानिक ओळखीचा किती उपयोग होतो हयाचा पुरेपूर अनुभव घेतला. आदल्याच दिवशी झालेल्या ढगफुटीमुळे यात्रा बंद झाली खरी, पण त्यामुळे अमरनाथ गुहेपाशी, पंचतरणीजवळ असे टप्प्या टप्प्यामध्ये यात्रेकरू अडकून राहीलेले होते. १२ जुलैला नीलग्रारहून पंचतरणीकडे जाणारे यात्रेकरू हेलिकॉप्टर सेवा बंद झाल्यामुळे पुढे जाऊ शकले नव्हते. त्यामुळे प्रथम ‘मागील बाकी पुढे चालू’ हयानुसार त्या यात्रेकरूंना हेलिकॉप्टर सेवेत प्राधान्य देण्यात आले. हेलीपॅडवर पोहोचल्यापासून एकूणच तेथील वातावरणामुळे माझे मन आपसूकच अगदी “यात्रामय” झाले. हेलीपॅडवर तुंबलेली गर्दी पाहून आजच्या दिवसात आपला नंबर लागेल का? अशी शंका मनात डोकावू लागली. हे भोलेनाथ शंकरा, आता निर्विघ्न तुझ्या चरणापाशी पोहोचू दे. असा मनोमन धावा करू लागलो. अखेरीस पोलीस खात्यामधील स्थानिक परिचयामुळे साडे अकरा वाजता सकाळी आम्ही हेलिपॅडवर रांगेत आलो. आमचे हेलिकॉप्टर दोन्ही बाजूला असलेल्या पर्वत रांगांच्या मधील दऱ्यांमधून पंचतरणीच्या दिशेने उंच झेपावले. हेलिकॉप्टर मधून दिसणारे दृश्य अगदी मनोरम होते. सुमारे सात ते आठ मिनिटामध्येच आम्ही पंचतरणीच्या हेलिपॅडवर पोचलो. आम्ही पंचतरणीला हेलिकॉप्टरने हेलिपॅडजवळ उतरताना सभोवतालचा परिसर दृश्यमान झाला आणि एक वेगळया अनुभूतिचा स्पर्श अंर्तमनाला झाला. हया बर्फानी बाबानी मुक्काम करण्यासाठी किती नयनरम्य परिसर शोधला बरं! पंच गलेशियर्समधून वितळलेल्या हिमनद्यानी तयार होणारी म्हणून ‘‘पंचतरणी नदी’’ आणि तिच्या पात्रापासून किनारी काही अंतरावर स्थित ‘पंचतरणी हेलिपैड’! परंतु ७-८ मिनिटांमध्ये हेलिकॉप्टर मधून शिवालयाचा पहाडी खोऱ्यांच्या विहंगम दृश्याने डोळ्याचे पारणे फेडले. त्याचवेळी डोंगरांच्या कडीकपारीमधून तयार केलेल्या रस्त्यांवर ‘बालताल’ मार्गे पायी व घोड्यांवर जाणाऱ्या यात्रेकरूंचे दूर दूरवर थवे दिसून येत होते. त्या पहाडी खोऱ्यामध्ये अखंड शिवाचा नादघोष दुमदुमत होता. मन त्या परमात्म्याच्या नैसर्गिक बर्फाच्या शिव लिंगस्वरूप दर्शनासाठी अत्यंत अधीर आणि उत्कंठित झाले होते.

पंचतरणीहून पुढे अमरनाथ गुंफेपर्यंत खरं तर सहा किलोमीटर चढण पायी जाण्याचा मानस होता. परंतु आदल्या दिवशी झोडपून काढणार्या पावसाने पूर्ण रस्ता दलदलीचा व अत्यंत धोकादायक केलेला होता. आत्यंतिक इच्छा होती पायी प्रवास करून बर्फानी बाबाच्या गुहेपर्यंत जाण्याची! परंतु पावसाने खोळंबलेली यात्रेची यंत्रणा आणि सातत्याने लहरीपणा करणारे हिमालयाचे हवामान हयामुळे सर्वानी घोड्यावरूनच जायचे असा निर्णय आम्ही तिघांनी एकमुखी घेतला. माझ्या सोबतीला दोन्ही अतिज्येष्ठ नागरिक! परंतु काश्मीरच्याच मातीतली बीजे! त्यामुळे आत्मविश्वास दुणावला. घोड्याने जाण्याचे ठरविताच आमच्या आसपास तेथील पिट्टू, खच्चरवाल्यांनी एकच गलका केला. भान सरांनी सराईतपणे स्थानिक भाषेत संवाद साधत आम्हा तिघांसाठी “सवारी” निश्चित केली. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे अत्यंत अरूंद असलेली डोंगरकपारींमधील वाटा सुध्दा पावसाने अत्यंत दलदलीच्या आणि धोकादायक करून टाकल्या होत्या. घोड्यावरून जाण्याचा निर्णय अत्यंत योग्यच ठरला. आम्ही घोडे निश्चित करून त्यावर मार्गस्थ झालो. पंचतरणीला अनेक लंघर, रहाण्यासाठी तंबू वगैरेची सोय उपलब्ध होती. सखल भागातून उजव्या दिशेला वरच्या अंगाला असलेल्या डोंगररांगातून भोलेनाथाच्या जयजयकाराचे पडसाद सतत येवू लागले. पहिल्या टप्प्याची उंची गाठताना नजरेस पडतो, संपूर्ण हिमाच्छादित पर्वतांनी वेढलेला ११,५०० फूटांवर स्थित पंचतरणीच्या खोऱ्याचा परिसर! अतिशय अरूंद वाटेवरून आमचे घोडे चालू लागले. विशेष बाब म्हणजे अमरनाथ यात्रा संपूर्णता स्थानिक बकरवाल आणि गुर्जरांच्या सहकार्यानेच यशस्वी होते. आमचे घोडेवाले काळजीपूर्वक आम्हाला डोंगर कपारींमधून नेत होते. काना-कोपर्यांमध्ये सैन्याचे संरक्षक दल डोळ्यात तेल घालून यात्रेवर अत्यंत सूक्ष्म निरीक्षणात कडक पहारा देत होते. अखंड रस्त्यामध्ये फक्त एकच नामघोष – “ॐ नमः शिवाय”, “बर्फानी बाबा की जय”! आणि जवान दिसले की आपसूकच “वंदे मातरम्” ! रिपरिपणारा पाऊस आणि अरूंद रस्त्यावरून होणारी पथिकांची, घोड्यांची, पालख्यांची एकत्रित वर्दळ! त्यात घोडेवाल्यांच्या मनाला भिवविणाऱ्या यात्रेच्या थरारक कथा! जसे उंच उंच जाऊ लागले तसे धुक्याचे मेघांनी भरलेले ढग गळाभेट घेण्यासाठी रूंजी घालु लागले. वेग मंदावत होता. परंतु एका डोंगर रांगेला वळसा घालून दुसऱ्या खेटूनच असलेल्या डोंगर रांगेत प्रवेश केल्यावर पावसाचा वेग क्षीण झाला. परंतु हवेत प्रचंड गारठा जाणवू लागला. मध्यभागी दरी आणि दोन्ही बाजूंच्या डोंगर रांगांतून यात्रेकरूंचे थवेच्या थवे दिसत होते. समोरच्या डोंगर रांगांतून बलतालमार्गे पायी येणा-या यात्रेकरूंची रांग दिसत होती. मध्यभागी दरीमध्ये घसरून आलेले महाकाय हिमनग! काही अंतर गेल्यानंतर दोन्ही डोंगरा रांगा एकत्र येत सखल भूभाग सदृश जागा तयार होऊन मोठाले ग्लेशियर, त्याच्या बाजूने खेटून पिवळ्या, निळ्या, लाल छताच्या असंख्य टपऱ्या दिसू लागल्या आणि हया डोंगर रांगांचा सखल भाग जिथे मिळता जुळता होत होता त्या लगतच्या डोंगरामध्ये ‘अमरनाथजी’ बर्फानी बाबांची गुहा दिसू लागली. अचानकच प्रचंड उत्साह उसळून आला. जय भोलेनाथाचे नामस्मरण अत्यंत उत्कंठेने शीघ्रतेने होऊ लागले. हवेत प्रचंड गारठा होता. पावसाची अधून मधून रिपरिप चालूच होती. अंगाखांद्यावर धुक्याचे लोट घेत घोड्यावरून आमची सवारी जिथे यात्रेच्या कालावधीकरिता लंघर आणि प्रसादाच्या टपऱ्या सुरू होतात त्या ठिकाणी येवून पोहोचली. एक वेगळीच अद्भुत भावना होती. थोड्याच अंतरावर वरच्या दिशेला अमरनाथ पर्वतांमध्ये, पहाडांमध्ये बर्फानी बाबांची गुहा दिसत होती. आश्चर्य हया गोष्टीचेच वाटत होते की, डोंगरांमध्ये वाहून आलेले ग्लेशिअर्सचे पृष्ठभागांवर डोंगराला खेटून हया सर्व खाद्य पदार्थ, भंडारा इत्यादींच्या टपऱ्या थाटलेल्या होत्या. संपूर्ण परिसर मिलीटरीच्या संरक्षण कवचामध्ये! जम्मू काश्मीर पोलीस यंत्रणा त्यांचे हाताशी! आणि सतत लाऊड स्पीकर वरुन घुमणाऱ्या त्यांच्या सूचना!
अमरनाथ यात्रेवर दहशतवादी अतिरेकी हल्ल्याचे नेहमीच सावट असल्याने प्रचंड कडेकोट सुरक्षेत गुंफेच्या पायथ्याशी सुरू होणा-या पायऱ्यांच्या जागेपासून डिटेक्टर्स लावलेले होते. प्रत्यक्ष सुरक्षा तपासणी कसून सुरू होती. मोबाइल फोन, कॅमेरा अश्या कोणत्याही वस्तु गुंफेपर्यंत नेण्याची परवानगी नव्हती. यात्रेकरूंची प्रचंड गर्दी उसळलेली दिसून येत होती. प्रत्येक यात्रेकरू त्या बर्फानी बाबा-भोलेनाथच्या दर्शनासाठी आत्यंतिक अधीर झालेला दिसत होता. हवेत प्रचंड गारठा, साठलेल्या बर्फावर झालेल्या चिखलामुळे काही ठिकाणी दलदल अथवा निसरडे झालेले होते. सावकाश पावले टाकत आमचे घोडे थांबले, ‘‘साहब यहांसे आगे आपको पैदल जाना पडेगा’’ असे म्हणत आमच्या घोडेवाल्यांनी आम्हां तिघांना पायउतार केले. घोड्यावरून खाली उतरताच पाय लटपटू लागले. सभोवार बर्फाचे आच्छादन होते. अगदी काही पावलांवर गुंफेकडे जाणा-या पाय-या आणि सुरक्षा रेलिंग दिसत होते. आम्ही चालण्यास सुरूवात केली मात्र आणि भान सरांचे पाय लटपटू लागले. काही वर्षापूर्वी झालेल्या अपघातामध्ये त्यांच्या पायाना दुखापत झाल्यामुळे शस्त्रक्रिया झालेली होती. अत्यंत थंडीमुळे त्यांना चालणे अशक्य झाले. परंतु त्यांनी मला आणि शक्तिजींना पुढे जाण्यास सुचविले. मला तो क्षण खुपच हृदय हेलावणारा होता. ज्या व्यक्ति माझ्यासाठी अमरनाथ यात्रेच्या सुखकर प्रवासासाठी माध्यम ठरल्या त्या भान काकी वैदकीय कारणास्तव सोनामर्गला हॉटेलवरच थांबून राहिल्या आणि गुहेच्या पायथ्यापर्यंत आल्यानंतर भानसर त्यांच्या आरोग्याच्या कारणास्तव पुढे येऊ शकत नव्हते. मला अश्रू अनावर झाले. भान सर माझी समजूत काढू लागले. भान सर अगदी ऐंशीच्या दशकापूर्वी पासूनच अमरनाथ यात्रा करीत होते. स्वत: काश्मीरी पंडीत असल्याने त्यांनी अनेक वेळा अमरनाथ यात्रा केलेली होती. परंतु अमरनाथ गुहेपाशी येऊन दर्शन घेता येऊ नये ही खंत वाटण्यासारखी बाब होती! भान काकींनी अमरनाथाला अर्पण करण्यासाठी दिलेली चांदीची बिल्वपत्रे माझ्या हाती सोपवून भान सर एका खडकावर बसून राहीले. मी शक्तीजींना हाताला धरून अगदी काळजीपूर्वक पाय-यांकडे कूच केले. सुरवातीसच आरोग्य केंद्राची राहुटी होती. तिथे शक्तीजीनी स्वतःचे रक्तदाब, ऑक्सीजन सॅच्युरेशन आणि पल्स रेट तपासणी करून घेतली. मग आम्ही दोघींनीही भोलेनाथचा नामघोष करित पायऱ्यांवरून पुढे सरकणाऱ्या भाविकांच्या त्या प्रचंड गर्दीत स्वतःला झोकून दिले आणि गुंफेच्या दिशेने चढू लागलो. मी शक्तीजीना सूचनाच दिली होती, काहीही झाले तरी माझा हात सोडायचा नाही. अन्यथा चुकामूक आणि गर्दीमध्ये काही विपरीत घडण्याची संभावना होती. आम्ही जसे त्या गुहेच्या मुखापाशी आलो तशी मी मात्र वेगळ्याच अनुभूतिचा लाभ घेत होते. आम्ही काही पाय-या चढून गुहेच्या कडीकपारींमध्ये आलो. अमरनाथ गुंफेच्या बर्फाचे वितळून येणारे पाणी अंगाखांदयावर पडू लागले. इतक्या प्रचंड थंडीत सुध्दा तो अनुभव रोमहर्षक होता. आम्ही काही पाय-या चढून अगदी गुहेच्या अंतर्भागात प्रवेश करताना कपारींमध्ये पंखांची फडफड करीत कबुतरांची जोडी येऊन बसली अन् एकदम हर्ष जल्लोष झाला. “जय भोलेनाथकी”, “जय बर्फानी बाबाकी”..
क्रमशः
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा