जय बर्फानी बाबा की!

अमरनाथ यात्रा एक अनुभव-भाग ४

कथा अमरनाथ यात्रेची!

अमरनाथ गुंफा आणि कबुतरांच्या जोडीबाबत काही आख्यायिका प्रसिध्द आहेत. अमरनाथ यात्रेच्या दरम्यान कबुतरांच्या जोडीचे दर्शन होणे भाविकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत भाग्याचे आणि शुभ मानले जाते. किंबहुना अमरनाथजीच्या कथेशी निगडीत असलेली ही कबुतरे भाविकांना दर्शन देत राहतात. अमरनाथ गुहेबाबत पौराणिक कथा विशेषच आहे. पार्वती मातेने भगवान शंकरांकडे अमर्त्यपणा आणि विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य सांगण्याचा हट्ट केला. तेव्हा भोलेनाथांनी ते रहस्य पार्वती मातेला सांगण्याकरिता जे निर्जन स्थळ निर्धारित केले, ते म्हणजे अमरनाथ पर्वताची गुहा!

अमरनाथ यात्रेचे मूळच हया कथेमध्ये आहे. माता पार्वती भगवान शंकरांना विचारणा करू लागली, परमेश्वरा, तुम्ही केव्हा पासून आणि कशासाठी हया मुंडमाळा तुमच्या गळ्यामध्ये धारण केल्या आहेत?  भगवान शंकर उत्तरले ‘‘जेव्हा जेव्हा तु जन्म  घेतेस, तेव्हा तुझ्या प्रत्येक जन्मी मी मा‍झ्या मुंड मालेमध्ये एक ‘मुंड’ धारण करतो”. हयावर पार्वती माता पुन्हा विचारणा करते, ‘‘परंतु मी जन्माला येऊन माझे शरीर नष्ट होते, आणि पुनश्च जन्म घेते. परंतु तुम्ही मात्र अमर्त्य! असे का?” मलाही अमरत्त्वाचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. भगवान शंकरांनी अनेकवेळा टाळाटाळ करूनही सहचारिणीच्या हट्टामुळे अमरत्त्वाची कथा सांगण्याचे ठरविले. ही कथा पार्वती मातेस सांगण्याकरिता भगवान शंकरांनी कोणताही सजीव अस्तित्वात नसलेल्या जागेच्या शोधात मार्गक्रमण करीत अमरनाथ पर्वताच्या खोऱ्यामध्ये आले. भगवान शिवाने त्यांचे वाहन नंदीला पहलगाम (बैलगांव) येथे निरोप दिला. चंदनवाडी हया ठिकाणी त्यांच्या जटेमधून चंद्रास उतरवून बाजूला काढून ठेवले. शेषनाग पर्वतरांगांमधील “शेषनाग” सरोवराजवळ गळ्यामधील ‘शेष’ बाजूला काढून ठेवले. “महागुणूस” पर्वतरांगांवर बाल गणेशास मागे रहावयास सांगीतले आणि पंचतरणीपाशी पंचमहाभूतांना देखील (म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ) हयांना मागे सोडले कारण हया पंच तत्त्वांपासून चैतन्य स्वरूप जीव अस्तित्वात येतो. भगवान शंकर हया पंच महाभुतांचे सम्राट आहेत. हया भौतिक तत्त्वांचा त्याग करून शिव-पार्वतीने पंचतरणी येथे तांडवनृत्य करून अमरनाथ गुहेमध्ये प्रवेश केला. भगवान शिवानी त्यांच्या हरिणाच्या कातडीचे आसनावर समाधी साधली. पार्वती मातेला अमर तत्त्वाची कथा रहस्य सांगताना कोणत्याही सजीवाने ती ऐकू नये हया कारणास्तव कलाग्नी रूद्रास गुहेच्या चौफेर सर्वत्र अग्नी प्रज्वलित करण्यास सांगून गुहेमध्ये एकांतात माता पार्वतीला अमरत्वाची कथा सांगू लागले. योगायोग असा की, शिव-पार्वतीच्या आसनाखाली कबुतरांची अंडी होती. तद्वत त्या स्वरुपात निर्जीव असली तरी शिव-पार्वतीच्या आसनामुळे संरक्षित राहिली व त्यामधून दोन कबुतरांनी जन्म घेतला. परंतु त्यांनी अमरत्वाची कथा श्रवण केल्याने ती जोडी अमर झाली. अशी आख्यायिका आहे. आजही ती कबुतरे भाविकांना यात्रेच्या दरम्यान दर्शन देतात! ह्या आख्यायिकेप्रमाणे शिवाने ज्याठिकाणी पंचतत्त्वांचा त्याग करीत पंचतरणीपर्यंत आले, ती सर्व स्थळे पहलगाम मार्गे यात्रेस प्रारंभ केल्यानंतर म्हणजे पहलगाम, चंदनवाडी, शेषनाग सरोवर, महागुणूस पर्वत आणि पंचतरणी अशी आजही अमरनाथ यात्रेमधील पवित्र टप्पे मानली जातात. आम्ही बलताल मार्गे यात्रा आरंभ केल्यामुळे हया नितांत सुंदर प्रदेशांना अनुभवता आले नाही. परंतु पहलगाम ते पंचतरणी हा अत्यंत निसर्गरम्य परंतु शारीरिक कस लागणारा ट्रेक रूट आहे हे ऐकिवात होते.

अमरनाथ गुंफा ही किती अनादी आणि प्राचीन काळापासून आहे त्याचा प्रत्यय दुसऱ्या एका कथेतून येतो. त्या कथेनुसार काश्मीर खोरे अनेक वर्षे पाण्याखाली होते. कश्यप ऋषींनी  नद्या, सरोवर, नाले हयांची निर्मिती करून काश्मीर खोरे वसविले. भृगु ऋषी त्यांच्या अध्यात्मिक प्रवासादरम्यान अमरावती नदीचा उगम असलेल्या अमरनाथ गुहेकडे आले. शिव-पार्वतीनंतर प्रथम अमरनाथ गुहेस भेट देणारे भृगू ऋषी  असेही  सांगीतले जाते.

अगदी अलिकडे ७०० वर्षापूर्वी ‘बुटा मलिक’ हया धनगराने अमरनाथ गुहेचा शोध घेतल्याचेही सांगीतले जाते. पर्वतराजींमधून जात असता हया धनगरास एक संत महात्मा भेटले आणि कोळशाने भरलेली पोती हाती दिली. परंतु धनगराने घरी जाऊन पोती उघडून पहाता त्याला त्यामध्ये सुवर्णमुद्रा प्राप्त झाल्या. त्या  संत महात्म्याचे आभार मानण्यासाठी धनगर पुन्हा गेला असता तिथे गुहेत त्यास शिवलिंगाचे दर्शन घडले.

खरं तर ग्रेटर हिमालय, पीर पांजल आणि झंस्कार हया पर्वतरांगांच्या त्रिवेणी संगमात समुद्रसपाटीपासून सुमारे १२,७५६ फूट उंचीवर अमरनाथ पर्वतामध्ये ही गुंफा आहे. मान्सून मधील अत्यंत अस्थिर हवामान आणि विपरीत भूभाग, सातत्याने होणारे हिमःस्खलन अश्या पार्श्वभूमीवर ह्या ठिकाणी आषाढ पौर्णिमेला अमरनाथ यात्रा सुरू होते आणि रक्षाबंधनापर्यन्त प्राकृतिक हिमाने तयार झालेल्या स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्याकरिता इथे अंदाजे ४० ते ४५ दिवसांकरिता यात्रेकरूंची रिघ लागते. चंद्राच्या कलेप्रमाणे  त्या बर्फाच्या शिवलिंगाचा आकार कमी-जास्त होत जातो. श्रावणी पौर्णिमेपर्यंत भोलेनाथ, त्यांच्या नैसर्गिक बर्फाच्या शिवलिंग स्वरुपात पूर्णाकारात अमरनाथ गुहेत प्रकट होतात. ‘बर्फानी बाबाच्या’ स्वरुपात दर्शन देणारे त्रिलोकनाथ भगवान शंकर त्यांच्या ह्या स्वरुपातल्या दर्शनाने विस्मयचकित करतात हे  मात्र नक्की! हया कथा काहीही असोत, परंतु भगवान शंकराच्या नामघोषात त्या पवित्र नैसर्गिक वातावरणात ऑक्सिजनची अगदी कमी मात्रा असूनही विलक्षण चैतन्य शक्तीची प्रचिती येते. हया सर्व आख्यायिका मनात साठवतच आम्ही दोघी गुहेच्या मुखापाशी येऊन पोहोचलो. भाविकांची खुपच झुंबड उडालेली होती. सुरक्षेच्या कारणास्तव टप्या-टप्यांमध्ये यात्रेकरूंच्या जथ्यांना गुहेत प्रवेश दिला जात होतात. आम्ही गुहेमधून पुढे प्रवेश केला अन् शिवाचे ते प्राकृतिक स्वरूप पाहून आनंदाश्रूंचा पूर वाहू लागला. प्रथम वडि‍लांची आठवण झाली आणि ॐ नमः शिवायच्या नामस्मरणामध्ये स्वत:चे अस्तित्वाचे विस्मरण झाले. वेगळीच अनुभूति होती. विलक्षण अनुभव होता. शुभ्र बर्फाचे शिवलिंग गुहेमध्ये तयार झालेले होते आणि मुख्य लिंगाच्या समवेत गणेशाचे व पार्वती मातेचे लहान बर्फाचे लिंग तयार झालेले होते. गुहेमध्ये खूप वेळ थांबण्यास मनाई होती तरीही डोळे भरून मनाचे समाधान होईपावेतो त्या नैसर्गिक आविष्काराचा अनुभव घेतला. हयाची देही हयाची डोळा ‘‘बर्फानी बाबांचे’’ दर्शन झाल्याने आनंद झाला. भान काकींनी दिलेली चांदीची बिल्वपत्रे तिथे अर्पण केली. अन् शक्तीजी आणि मी पुन्हा पायऱ्या उतरून  बर्फाळ खडकांपाशी, जिथे भान सर आमची वाट पहात थांबले होते तेथे आलो. तेव्हा जाणीव झाली की, थंड बर्फाच्या पाण्यामध्ये उघड्या पायांनी चालून पायांच्या संवेदना लुप्त झाल्यात. आम्ही खडकावर बसलो. शक्तीजींनी रितसर पूजा-अर्चना केली. आणि आम्ही जड अंत:करणाने परतीच्या प्रवासाला निघालो.


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

पृष्ठे: 1 2 3 4 5 6

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑