जय बर्फानी बाबा की!

अमरनाथ यात्रा एक अनुभव-भाग ५

अमरनाथ चरणी, पंचतरणीकाठी!

एव्हाना दुपारचे अडीच वाजले होते. आमचे घोडेवाले आमची वाट पाहतच होते. हवामानाचा अंदाज येत नव्हता. हवेत प्रचंड गारठा वाढला. आम्हास लवकरात लवकर पंचतरणीला पोहोचणे आवश्यक होते. हेलीकॉप्टर सेवेच्या परतीच्या प्रवासासाठी आम्हांला वेळेत पोहोचणे बंधनकारक होते. आम्ही पुन्हा ज्या मार्गाने आलो तिथूनच माघारी वाटचाल करू लागलो. परंतु गुहेकडे जाताना सतत हेलिकॉप्टरची ये-जा त्याच्या आवाजामुळे समजून येत होती. परंतु परतीच्या प्रवासात खूप वेळाने हेलीकॉप्टरचा आवाज कानी पडत होता. जसे आम्ही पंचतरणी जवळ जाऊ लागलो तसा आवाज येईनासा झाला. आम्हाला पंचतरणीला पोहोचेपर्यंत संध्याकाळचे पांच वाजले. अन् काय दृष्य! पंचतरणी खोरं पूर्ण धुक्याची दुलई पांघरून गुडूप होवू लागलं! खबर आली, हवामान बिघडले आहे आणि हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आम्ही तिघंही अस्वस्थ झालो. कारण भान काकी एकट्याच सोनामर्गला हॉटेलवर थांबलेल्या होत्या. संपर्काची शून्य संभावना! त्यातच आम्ही पोहोचण्याच्या आधी नीलग्राथ/बलतालकडे जाणारे पंचतरणी इथे पोहोचलेले यात्रेकरू त्यांची हेलीकॉप्टरची तिकिटे हाती घेवुन मोठ्या आशेने हेलिपॅडजवळ रांगेत उभी होती. हयाचा स्पष्ट अर्थ असा होता की, जर त्वरित हेलीकॉप्टर सेवा सुरू झाली नाही तर सोनामर्गला परतीचा प्रवास शक्य होणार नाही आणि पंचतरणी येथे रात्री मुक्काम करणे क्रमप्राप्त होईल!

आम्ही शर्थीचे प्रयत्न केले. साधारण संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास दाटून आलेल्या ढगांनी नभ मोकळे केले. मावळतीच्या उन्हाच्या केवळ झरोक्यांचे नाममात्र दर्शन होताच पुन्हा पंचतरणी व्हॅली धुक्याने भरून गेली. आम्ही तिघेही आशाळभूत नजरेने कानात प्राण आणून हेलिकॉप्टरच्या आवाजाचा वेध घेत राहिलो. संध्याकाळचे सात वाजले होते. आता आम्ही तिघांनीही मनाची तयारी केली, आता भोलेनाथ अमरनाथाच्या चरणाशी रात्र व्यतीत करायची आहे! हेलिपॅडवर घोषणा झाली ‘‘हयापुढे हेलीकॉप्टर सेवा आजच्या दिवसासाठी स्थगित!’’ उदयाच्या दिवसाचे नोंदणी करता आव्हान केले गेले. आम्ही नशीबाने पहिल्या पाच नोंदणी क्रमांकात होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे सहा वाजता दिनकराचे आगमन होताच हेलीकॉप्टर सेवा सुरू होतील असे सांगण्यात आले. आम्हाला हेलिपॅड जवळ नियोजित वेळेच्या अर्धा तास पूर्वी हजर राहण्याच्या सूचना देऊन हेलिपॅड वरिल सर्व गर्दीची पांगापांग करण्यात आली. खिन्न मनाने आम्ही आता रात्र घालविण्यासाठी निवासी तंबूची शोधाशोध करू लागलो.

पंचतरणी येथे यात्रेच्या कालावधी पुरते सरकारी यात्री निवास म्हणजे कापडी तंबू उभारण्यात आलेले असतात. काही तंबूमध्ये लोखंडी खाटा/बाजा देखील असतात. जेणेकरून जमिनीवर अंथरुण पांघरायला न लागता खाटेवर झोपता येते. अंगावर ओढण्यासाठी घोंगडी देखील उपलब्ध करून देतात. सामुदायिक सुलभ शौचालये देखील तात्पुरत्या स्वरुपात यात्रेच्या काळात तयार केलेली असतात. आम्हाला नशीबाने एकाच तंबूमध्ये तीन खाटा किरकोळ रक्कमेमध्ये उपलब्ध झाल्या. ही सर्व जमवाजमव करेपर्यंत सांज अंधारून आली होती. आता मात्र पोटात अन्नाचा कण नसल्याची तीव्र जाणीव होवू लागली होती. माझा आणि शक्तीजींचा  ‘सोमवार’ चा उपवास होता. पंचतरणी  येथे अनेक लंघर आहेत. तिथे स्वादिष्ट आणि गरमागरम भोजन उपलब्ध होते. परंतु हवेतील गारवा हळूहळू इतका वाढत गेला की, आमची तंबूमधून नैसर्गिक विधीसाठी सुध्दा बाहेर येण्याची हिम्मत होत नव्हती. आम्ही सुक्या मेव्याची आणलेली शिदोरी देखील संपली होती. माझ्याकडे मोजकेच बदाम आणि एक घोट लिंबू सरबत शिल्लक होते. सकाळ पासून फक्त एक छोटासा चहाचा कप आणि सुका मेवा हयावरच गुजराण केलेली! आम्ही प्रत्येकाने दोन चार बदाम खाल्ले आणि पाणी पिऊन अंथरुणावर पहुडलो. उशाशी माझी छोटी सॅक घेऊन झोपण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागले. हवेतील गारठा चढता होता. माझी तंबूच्या प्रवेशापाशीच खाट असल्याने मला पडदा बाजूला केल्यावर बाहेरचे दृष्य दिसत होते. अगदी अंधार जाणवल्याने सहजच तंबूचा पडदा अलगद वर उचलला अन् काय! मा‍झ्या डोळ्याचे पारणे फिटले! निरभ्र आकाशामध्ये अनेक तारका पुंज दृश्यमान झाले होते. जणू नभांगणात अनंत कंदीलांचे दिप प्रज्वलित करून चंद्रमा शिव स्तुति गात होता. संध्याकाळी हेलिकॉप्टर न मिळाल्यामुळे, सोनमर्गला परतता न आल्याने आलेली मनाची खिन्नता कुठे पार निघून गेली. अचानक समाधानाने तृप्त झाल्यागत वाटले! मला परमेश्वरी कृपेचा खूप मोठा अचंबा वाटला! इतक्या नियोजनानंतर देखील आम्ही दर्शन झाल्यावर सोनामर्गला परत जाऊ शकलो नव्हतो. अमरनाथवासी भगवान शंकराची जणू इच्छा होती की आजची रात्र आम्ही त्याच्या पायाशी पंचतरणी मुक्कामी व्यतीत करावी! जशी रात्र सरू लागली तसतशी थंडीचा कडाका प्रचंड वाढू लागला. अक्षरशः थंडीमुळे  हुडहुडू लागले. महामृत्यूंजयाच्या जपाने मनोधैर्य बळकट करीत होते.  मध्यरा‍त्रीनंतर कधी डोळा लागला काही कळले नाही.

आम्ही भल्या पहाटे आम्ही ताजेतवाने होऊन उठलो. हिमालयात खूप लवकर सहस्त्ररश्मिचे आगमन होते. हवा अगदी स्वच्छ झालेली होती. पाऊस ओसरला होता. कोवळी उन्हं अंगावर घेत आम्ही हेलिपॅड जवळ रवाना झालो. पंचतरणीचा आसमंत अगदी चैतन्यस्वरूप वाटत होता. हयाच पंचतरणीपाशी महादेवाने पंचमहाभूताना त्यागले, तो परिसर एकाच वेळी आप, तेज, वायु आणि आकाश ह्यांची अनुभूति करून देत होता. निरभ्र आकाशात बर्फाच्छादित शिखरांवर पडलेली कोवळी सूर्यकिरणे विलोभनीय होती. पंचतरणीचे जल स्त्रोत त्या किरणांमुळे चमचमत होते. शीतल वायुलहरी पंचतरणीच्या खोऱ्यामध्ये खुशाल रेंगाळत होत्या. त्या दुर्गम आणि निसर्गाने परिपूर्ण वातावरणात नाईलाजाने का होईना वास्तव्य करावयास मिळाले ह्यासाठी विधात्याचे मनोमन आभार मानले. एव्हाना हेलिकॉप्टरच्या भराऱ्यांचे आवाज कानी येऊ लागले. साधारण सकाळी सव्वा सहा वाजता आमचा नंबर लागला. बर्फानी बाबांना मनोमन प्रार्थना करून त्यांच्या अमरावतीचा निरोप घेतला. आणि आमच्या हेलिकॉप्टरने पुन्हा पंचतरणीच्या खो-यांमधून उंच भरारी घेत अनेक कडया कपारीमधून नीलग्राथकडे कूच केले. नीलग्राथकडून आम्ही लगेच टॅक्सी करून सोनामर्गकडे आमच्या हॉटेलाच्या दिशेने निघालो. आमच्या हॉटेलजवळ पोहोचताच रस्त्यावर महादेव मंदिराला भेट देऊन परत निघालेल्या भानकाकी नजरेस पडल्या. मी आनंदाने जोरात त्यांना साद घातली.  आम्हाला पाहाताच भानकाकीच्या डोळयात आनंदाश्रू तरळले. गाडीतून मी पटकन खाली उतरले आणि आम्ही एकमेकांना मिठी मारली. आमची यात्रा पूर्ण होऊन आम्ही सुखरूप परतलो याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता! आम्ही सर्व हॉटेलवर परतलो. सकाळचे सात वाजले होते. हॉटेलवर पोहोचताच कडक वाफाळलेला चहा पिऊन सोमप्रदोषाची सांगता केली! मनामध्ये एक वेगळीच अनुभूति होती. मी फार आस्तिक आहे असं नाही किंवा अगदी नास्तिक देखील नाही. परंतु मांगल्यावर आणि पावित्र्यावर माझी श्रद्धा आहे. हया जगाच्या नियंत्यावर, त्या अनंतावर माझा दृढ विश्वास आहे. सत्य आणि आपल्या कर्माचे जीवनामध्ये काय महत्व असते हयाची जाणीव आहे. ही जाणीव सतत मनामध्ये जागृत राहावी हयासाठी मला हिमालयामध्ये डोंगर दऱ्यांमध्ये भटकणं आवडतं! कदाचित ट्रेकिंगची आवड म्हणूनच निर्माण झाली असावी! आपल्या मूळ तत्वांच्या स्वरुपात निसर्गामध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न केल्यास परमेश्वरी साक्षात्कारांची प्रचिती येते. मा‍झी अमरनाथ यात्रेला जाण्याची अनिवार इच्छा, भान कुटुंबाची सोबत हयामुळे प्रतिकूल निसर्गाच्या परिस्थितीमध्येही बर्फानी बाबांची यात्रा सुखरूप  पार पडली. अमरनाथ यात्रा ही माझ्यासाठी जणू प्रत्यक्ष शिवानेच कृपा दृष्टी करून त्याच्या भेटीचा मला लाभ घडवून दिल्याची आनंद अनुभूती होती. मला पुन्हा पुन्हा अमरनाथ गुहेत प्रवेश केल्यापासून अमरनाथाचे ‘बर्फानी बाबा’ म्हणजे हिमाच्या स्वरुपात अगदी नैसर्गिकरित्या तयार झालेले शिवलिंग पाहून ज्या उर्मी मनात उठल्या त्याची आठवण होऊन रोमांच उठत होते. मनोमन परमेश्वराचे आभार मानले. मनचक्षुंमध्ये अत्यंत विलोभनीय  प्राकृतीक सौंदर्य आणि चमचमणारी शुभ्र हिमाची शिखरे, शिवाचे सदन साठवून आम्ही सर्वानी श्रीनगर कडे कूच केले.

क्रमशः


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

पृष्ठे: 1 2 3 4 5 6

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑