अमरनाथ यात्रा एक अनुभव-भाग ६
सांगता अमरनाथ यात्रेची




श्री खिरभवानी मंदिर
श्रीनगरला जाताना रस्त्यामध्ये काश्मिरी पंडितांसाठी प्रथम पूजनिय असणाऱ्या ‘क्षीरभवानी’ मातेच्या मंदिराला भेट दिली. श्रीनगरच्या पुर्वेस साधारणतः १४ मैलांवर गंदेरबल जिल्ह्यामधील ‘तूळ मूळ’ गावामध्ये श्री खीर/क्षीर भवानी मातेचे मंदीर आहे. हया स्थळाची महति म्हणजे सप्तकोनी कुंडामध्ये नैसर्गिक पाण्याचा झरा देवीच्या मंदिराच्या पश्चिमेकडून पुर्वेकडे म्हणजे शिरापासून पायाकडे अश्या स्वरुपात झरत आहे आणि हया पवित्र कुंडाचे पाणी लाल, गुलाबी, नारिंगी, हिरवे, निळे, सफेद अश्या विविधरंगी छटांमध्ये दिसते असे सांगीतले जाते. हया कुंडाचे पाणी ‘काळ्या’ रंगाचे होणे काश्मिरी लोकांसाठी अशुभ मानले जाते. इथे देवी मातेला पारंपरिक रित्या वसंत ऋतु मध्ये खिरीचा नेवेद्य अर्पण केला जातो. म्हणून ह्या शारदा देवीचे ‘खीर भवानी’ नाव प्रचलित आहे. मंदिराचा परिसर नितांत सुंदर आहे आणि प्राचीन चिनार वृक्षांच्या सावलीत मंदिर परिसरामध्ये निवांत चिंतन करत बसावे इतके प्रसन्न वातावरण आहे. आम्ही मनोभावे पूजा अर्चा करून तिथेच काश्मिरी माणसाच्या धाब्यावर काश्मिरी ‘दमआलू’ खाल्ले. फारच रूचकर होते. आणि श्रीनगरकडे रवाना झालो.
नगिन सरोवराकाठी!
श्रीनगरला ‘दार-ए-सलाम’ नावाच्या हॉटेलमध्ये आमची एका रात्रीच्या मुक्कामाची सोय होती. नगीन सरोवराच्या काठी असलेल्या हया हॉटेलमधील आमचा एक दिवस खूपच छान व विश्रांतीचा होता. आम्ही पोहोचताच हॉटेलमधील खोलीमध्ये निवांत झालो पण परिसराचे सौंदर्य इतके विलोभनीय होते की खोलीच्या प्रत्येक खिडकीमधून नगीन सरोवराचे दृश्य, सरोवराच्या पलीकडच्या काठावर ऐटीत उभ्या असलेल्या हाऊसबोट आणि स्थानिक काश्मिरी लोकांची सरोवरामधून होणारी वर्दळ!



हॉटेलला खूप सुंदर निगराणी राखलेली हिरवळ होती. चिनार वृक्षाच्या छायेत छान बसण्याची ऐसपैस सोय होती. किनाऱ्या-किनाऱ्याने असंख्य गुलाब व विविध रंगी फुले फुलली होती. आणि हया रम्य वातावरणात अनेक पक्षी गुंजारव करीत होते. येथील खानपान देखील अगदी शाही आणि काश्मिरी स्वादाचा प्रभाव असलेले होते. प्रवासाची सांगता थोडी खरेदी, भेट देण्यासाठी केशर आणि सोव्हिनिअर्स असं सर्व साठवून घरी अमरनाथाच्या आशीर्वादाची शिदोरी घेऊन जाण्यासाठी सज्ज झाले. श्रीनगरला केलेल्या मुक्कामामुळे थोडी विश्रांती मिळाली आणि ‘नगिन’ सरोवराच्या काठावर व्यतीत केलेली सायंकाळ अत्यंत रमणीय ठरली. मावळतीच्या उन्हामध्ये ‘दार-ए-सलाम’च्या हिरवळीवर डोलणारी रंगीबेरंगी फुले, नगिन सरोवराच्या पाण्यामध्ये सूर्य किरणांचा रौप्य तरणा आणि क्षितिजावर लगबगीने बदलणाऱ्या रंगछटा खरोखरच मन मोहून टाकतात. निश्चितच कश्मीर म्हणजे पृथ्वीवरचे नंदनवन!
विश्वाचा अनभिषिक्त सम्राट भगवान शंकराचे अमरनाथ गुंफेमधील “बर्फानी बाबा”चे स्वरूप मात्र मनात घर करून राहीले. कायम तर्कशुद्ध विचारसरणीचा पुरस्कार करणारी मी, ह्या यात्रेच्या निमित्ताने आलेल्या अनुभवामुळे अवाक झाले! एक मात्र नक्कीच खरं की, विज्ञानाच्या परिभाषांमध्ये निसर्गाच्या चलनवलनाचा अभ्यास करता येत असला तरी ते चलनवलन तसं का आहे? आणि ह्या सर्वांची चक्रे कोणाच्या हाती आहेत? ह्याचा विचार करताना मती कुंठित होते! आणि म्हणूनच अश्या ठिकाणी “दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती” अशी मानसिक अवस्था होते!
अमरनाथाच्या यात्रेला जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात परमशक्तीच्या अनुभूति देखील अनुभवल्या आणि निर्सगाची अपरूपेही ! तरीही मनात इच्छा दाटून राहीली, आयुष्यात पुन्हा जर का अमरनाथ यात्रेचा योग आलाच तर पहलगाम मार्गे शेषनाग -महागुणूस पर्वतमार्गे अतीव सुंदर निसर्गाच्या सानिध्यातूनच जायचं! एकवार पुन्हा त्याचे दर्शन घडू दे ही मनीषा बाळगून परतीच्या प्रवासाची सुरूवात झाली!
जय भोलेनाथजी की!
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा