पुष्पावती भेट

नाव जयाचे असती चमोली, निवांत वसले गढवाल हिमालयी
पावन भूमी ही बद्रिनाथाची, महती असे थोर गोविंदधामाची ||

अलकनंदा अन् लक्ष्मण गंगा, उभय पर्वतजा होत समर्पित
चहूबाजुंनी दिग्गज पर्वत, गोविंदगुरुसी नमन करित ||

पथिकांची येथ सदैव वर्दळ, हेमकुंट पदयात्रेचे आरंभ स्थळ
वृक्षराजीची वाट जरी बिकट, सौंदर्य निसर्गाचे असे उत्कट|| 

कडेकपारी झेलून घेती, असंख्य अल्लड हिमसंहति
वारिप्रवाह दुडदुडत येती, पुष्पावती भ्युदंरगंगेसवे इथे विहरती||

 वनराणीचे मधुर कुंजन, किलबिलती खग ही सुंदर
गोरजवेळी सोनपिवळे घांगरिया, दूर प्रवाही झंकारे नाद मधुर पुरिया||

निळे निलामय आकाश प्रसन्न, शुभ्र भुरके जलद येती दाटून
ऊन लाजरे सांगे श्रावणमास, पाठशिवणीचा खेळ दिसे खास||

 हिरवे गोंदण पाचूचे वस्त्र ल्याली, बहुरंगी पुष्पांनी वसुंधरा ही नटली
इवली इवली धीटशी अनेक चिमुकली, मखमालीच्या माळरानी विखुरली||

 शुभ्र धुक्याचा ओढून अंचल, आनंद कणांची पखरण गिरिकंदरांवर
जणू परिकथेतील अद्भुत परिसर, विश्ववारसा पुष्पावतीचे हे खोरे सुंदर||

Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑