रम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग २

आज पदभ्रमण मोहिमेचा दूसरा दिवस. कालच्या धावपळीच्या दिवसामुळे लवकर जाग आली नाही. सकाळी सहा वाजता व्यायामासाठी जावे लागणार म्हणून खरं तर मोबाईलमध्ये गजर लावलेला होता. पण झोपेत त्याचा गळा दाबून त्याला कधी निपचित केले हे कळले सुध्दा नाही! आमची खोली तशी  लहानशीच होती. त्यात आम्हा पाचजणींना कोंबले होते! सोशल डिस्टंन्सींगचा पुरता फज्जा उडाला होता! आम्ही सर्व आरटीपीसीर चाचणी-निगेटीव्ह असल्याचे अहवाल घेऊन आलो होतो ना! असो! एव्हाना आमचे कोरोंना भय पळून गेलेले होते. आम्ही सर्व जणी धडपडत उठलो! खरं तर मी आमच्या खोलीच्या खिडकीतून सिंध नाल्यावरून वाहत येणाऱ्या पहाटवाऱ्याने सुखावले होते! आणि स्लिपींग बॅगमध्ये गुडूप  झोपून राहावे असे वाटत होते. पण पुन्हा आमच्या दरवाज्यावर ‘शौर्य’ची आरोळी ऐकू आली,’’ मॅडम चलो, गुलजार सर ने सब बॅच को आप लोंगो की वजह से रुकाया हैं। आम्हाला शरमेने नको झाले! तोंडावर पाण्याचा हबका मारून, बूट पायात चढवून बाहेर धूम ठोकली! सकाळची सुखद हवा अंगावर शहारे आणत होती! ताजीवास ग्लेशियरस् शिखरावर ढगांनी छत्र-चामरे धरली होती. हॉटेल बाहेर आल्यावर सोनामर्गच्या निसर्गाने भूल घातली. तितक्यात गुलजारजींचा आवाज कानी आढळला, “आप लोग, लेटकमरर्स, चलो दौड लगाओ! मला असा संताप झाला, कशाला आले मी ट्रेकींगला! रागाच्या जोशातच मी जॉगिंग करायला सुरुवात केली, गंमत म्हणजे त्या आल्हाददायक हवेचा स्पर्श होताच रागाचा पारा वितळून गेला! मी व्यायामाचा आनंद घेऊ लागले. आमच्या कंपूला समोरच्या टेकाडावर नेऊन हलके व्यायाम प्रकार आणि स्ट्रेचिंग करून घेतले गेले. त्यानंतर आम्ही पुन्हा हॉटेलवर परतलो. आणि यूथ हॉस्टेलच्या तक्त्यामध्ये नमूद कार्यक्रमाची दैनंदिनी चालू झाली! नाश्त्यानंतर आम्हाला अॅक्लमटायझेशनसाठी ताजिवास ग्लेशिअर्सला नेण्यात आले. खूप छान फेरफटका होता! तिथेच सर्वांची ओळख परेड सुध्दा झाली आणि लक्षात आले नाशिकहून आलेल्या ग्रुपमध्ये सत्तर वर्षांचे ‘आबा’ सदगृहस्थ, हा ट्रेक करण्यासाठी आले होते! माझे मनोबल तेव्हा खऱ्या अर्थाने वाढले! मा‍झ्या एका मैत्रिणीने काही वर्षांपूर्वी हा ट्रेक केलेला होता. तिच्या अनुभवाचे “बोल” तिने सांगीतले होते की, काही ठिकाणी उभा खूप थकविणारा चढ आहे वगैरे वगैरे! पण हया सद्गृहस्थांना पाहून माझा विश्वास दुणावला!

आम्ही परस्परांचे परिचय करून घेतले, ट्रेकिंगच्या अनुभवांची देवाणघेवाण झाली. आमचा ‘केजीएल-६ ’ ग्रुप आता पुढील काही दिवसांसाठी दुर्गम दरी-खोऱ्यांमध्ये वसलेली सरोवरे पहाण्यासाठी तयार झाला! तजिवास ग्लेशिअर्सकडे जाणारा रस्ता फारच निसर्ग रम्य आहे! सर्वदूर पसरलेली पाचूच्या रंगाची कुरणे, देवदार वृक्षांची जंगले आणि चंदेरी हिमाने नटलेली पर्वत शिखरे! ‘ताजिवास’ हे सोनामर्ग मधील पर्यटकांचे खास आकर्षण आहे. अनेक पर्यटक घोड्यावर स्वार होऊन ग्लेशिअर्सच्या दिशेने जाताना दिसत होते. त्यावर हे पर्यटक मौजमजा लुटत होते. आम्ही वरच्या बाजूला जंगलांच्या दिशेने वृक्षांच्या छायेत काही क्षण पहुडलो! मग पुन्हा ग्लेशिअर्स वितळून वाहणार्‍या एका मोठ्या झऱ्यापाशी विसावलो आणि पुन्हा माघारी परतू लागलो. आमच्या गाईडने माहिती पुरवली, ‘‘ ये जगह बहोत फेमस हुई है मॅडमजी, “बजरंगी भाईजान” के वजह से! आमच्या सहजच लक्षात आले की,  चित्रपटाचा काही भाग हया ठिकाणी चित्रित केलेला होता. खूप निसर्गरम्य परिसर होता!

ताजीवासच्या सान्निध्यात

संध्याकाळी आमच्या ग्रुपला ट्रेक संदर्भात माहिती व सूचना गुलजारजींनी दिल्या. त्यानुसार अधिकचे सामान, चीज-वस्तू सॅकमधून वेगळ्या करून आम्ही आमचे सामान जमा केले. हया वेळी मला विनाकारण न थकता निसर्ग सौंदर्याचा पुरेपूर आनंद लुटायचा होता, म्हणून सॅकसाठी आम्ही घोडेवाला करण्याचे ठरविले आणि माझा निर्णय शहाणपणाचा ठरला!

क्रमश:


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑