सोनामर्गच्या गुलाबी थंडीमध्ये लवकरच जाग आली. यूथ हॉस्टेलच्या काटेकोर नियमावलीच्या दैनंदिनीनुसार आमच्या कंपूचे खऱ्या अर्थाने ट्रेकसाठी आज बेस कॅम्पवरुन प्रयाण होणार होते! आम्ही सर्व तयारीनिशी सुसज्ज होऊन हॉटेलच्या आवारामध्ये जमा झालो. आम्हाला गुलजारजींनी अखेरच्या काही सूचना दिल्या आणि यूथ हॉस्टेलच्या तालबद्ध टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही निघालो, आमच्या ‘काश्मीर ग्रेट लेक्सच्या’ मोहिमेवर! आमच्या कंपूमध्ये नाशिकहून आलेल्या मंडळींपैकी सत्तर वर्षीय ‘आबांना’ मात्र ट्रेकला जाण्याची ऐन वेळेस परवानगी नाकारल्याने आबा हिरमुसले. त्यांचे प्रकृती स्वास्थ्य आणि वयोमानानुसार अतिउंचावर विरळ हवेमुळे काही त्रास उद्भवू शकतो हया कारणास्तव त्यांना मनाई करण्यात आली. आम्हाला खूप वाईट वाटले. बेसकॅम्प वरच्या दोन दिवसामध्ये त्यांच्या सह्याद्री मधील भटकंतीचा लेखाजोखा त्यांनी ऐकविला होता! ह्या वयातला त्यांचा उत्साह वाखणण्याजोगा होता.

आम्ही श्रीनगर-लेहच्या महामार्गावरून विरुध्द दिशेला चालू लागलो! ‘वेलकम टू सोनामर्ग’ हया फलकापाशी येवून लोखंडी ब्रिज ओलांडून उजवीकडे ‘एनएचआयडीएल’ फलकाजवळ रस्त्याच्या पलीकडे असणार्या डोंगररांगामध्ये जाणाऱ्या पायवाटेवरून चालू लागलो. तिथून खऱ्या अर्थाने ट्रेकची सुरुवात झाली. त्या पायवाटेवरून डाव्या बाजूला जंगलांच्या दिशेने जाताना उजवीकडे दिसणारे दृष्य मात्र विहंगम होते. सिंधनाल्याच्या काठाने वसलेली वस्ती, स्थानिकांची घरे आणि त्याला हिरव्यागार देवदार पाईन वृक्षांची पार्श्वभूमी आणि त्याही पलीकडे हिमशिखरे! डोंगर उतारांवर असलेल्या बटाटयांच्या शेतामध्ये काश्मिरी स्त्रीया राबताना दिसत होत्या. काही अंतर पुढे चालून गेल्यावर दिसू लागली हिरवीगार कुरणे आणि त्यांच्यामध्ये रेखाटलेल्या पिवळया पायवाटा!



आम्ही हिरव्यागार हरित तृणांच्या मखमालीने नटून थटून आमच्या स्वागतास सज्ज असलेल्या नागमोडी वळणे असलेल्या डोंगर उतारांवरुन पुढे चालू लागलो. जसजसे पुढे जात होत होतो तसतसे उंचीचे माप वाढत होते. मागे वळून पाहता विस्तीर्ण खोऱ्यात सोनामर्ग गाव आणि ताजिवास ग्लेशियर दिसत होते. त्याच्या पलीकडे दूर एकमेकांत पाय गुंतवून उभे असलेले ‘बलतल’ जवळचे पहाड दिसत होते. आणि त्याही पलीकडे ‘बर्फानी बाबा’ अमरनाथ पहाडाच्या गुंफेत हया वर्षी यात्रेकरूंच्या कोलाहलाविना ध्यानस्थ बसले असावेत! आम्हाला एक क्षणभर विश्रांतीचा थांबा मिळाला. टेबलटॉप! बराचसा चढ चढून आम्ही एका सपाटीवर असणार्या जागी आलो. त्याचेच नाव टेबलटॉप! इथे गणवेषधारी – बंदुकधारी सैनिक गस्त घालत होते. अतिउत्साहाने भराभर चढ चढल्यामुळे फुफ्फुसाचा भाता दमला होता! हाऽऽहू करत तिथे पोहोचलो! आमच्या नजरेसमोर अवघे सोनामर्ग, ताजिवास ग्लेशियरर्स आणि सिंध नाल्याचा प्रवाह एक दृष्टीक्षेपात उभे ठाकले होते. आम्हाला ओळखपत्रे दाखवायला सांगून आमची ओळख परेड झाली. माझ्या एकूणच ट्रेकींगच्या अनुभवापैकी ‘ग्रेट लेक्स्’चा ट्रेक असा एकमेव होता, जिथे यूथ हॉस्टेलच्या बेस कॅम्पवर आमच्या ग्रुपमधील सर्व सदस्यांची नोंदणी पत्रे आणि ओळखपत्रे हयांच्या प्रतींचे संच हया ट्रेक रुटवर असणाऱ्या भारतीय सैन्याच्या गस्ती पथकांच्या हाती आमच्या मोहिमेच्या आधीच पोहोच झालेले होते! मोहिमेच्या पहिल्याच दिवशी हया ट्रेकच्या ‘खासच’ असण्याची खूण पटली. आम्हाला दिलेल्या विश्रांतीचा मर्यादीत वेळ संपताच आमचे गाईड, ‘चलो-चलो’ म्हणून हाकाट्या देऊ लागले. आम्ही पुन्हा ‘‘चालते’’ झालो! आता एका खोलगट बशीसारख्या कुरणावरून चालत आमची पायवाट थेट जंगलाच्या दिशेने गेलेली दिसू लागली.

आम्ही आता मॅपल आणि पाईन वृक्षांच्या गर्द जंगलांमधून चालू लागलो कधी छायेतून तर कधी मध्येच असणार्या हिरवळीच्या उघडीपीमधून हया जंगलवाटेवर मार्गस्थ झाल्यावर मनाला भुरळ पाडणारा तो जंगलांचा दरवळ आसमंतात घुमू लागला. एके ठिकाणी डोंगर उतारांवर एका मागोमाग एक अश्या मेंढपाळांच्या दगड-मातीच्या सुंदर झोपड्या दिसू लागल्या. शेफर्ड हटस्! आम्ही पायवाटेने जात असता आमच्या सोबत स्थानिक बकरवाल आणि त्यांचे कुटुंबातील माणसे ये-जा करताना दिसत होती. स्त्रिया देखील अगदी निर्भीडपणे त्या जंगलांमधील डोंगर उतारांना लीलया पार करून जात होत्या. आमच्याकडे पाहून हसत म्हणत असत, हम तो बस ये अभी पहुचेंगे। लेकीन आपको थोडासा देर लगेगा! पण ट्रेकची नुकतीच सुरुवात होती आणि पहिला दिवस! त्यामुळे आम्ही फार काही गांभीर्याने घेतले नाही. मोठाल्या वृक्षांच्या बुंध्यावर लडिवाळपणे विसावत, फोटोसेशन करत निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आम्ही चालत राहीलो. हया मॅपल आणि देवदारांच्या जंगलांमधून आम्ही पुन्हा चढ चढून एका उघडया कुरणाच्या प्रदेशात अवतरलो. आजूबाजूला पर्वत रांगा दिसू लागल्या. आमचा गाईड सद्दाम मात्र आमची पाठराखण करीत आमच्या गतीने चालत होता. दुपारचे दोन वाजले होते. दूरवर एक छोटा धाबा त्याच्या छतावरील पिवळ्या-निळ्या प्लॅस्टिक शीटच्या आवरणामुळे नजरेस पडला. सद्दामने आम्हाला बोट उंचावून म्हणाला, ‘‘वो देखो टेबल टॉप, स्टॉल है वहा रुकेंगे! आम्ही आनंदलो. टी-स्टॉलवर पोहोचताच आम्ही पाठीवरची सॅक उतरवून अक्षरश: लुडकलो! धाब्यावर काव्हा पिऊन तरतरी आली. खरं तर दुपारचा दोनचा सुमार, जेवणाची वेळ! पण सद्दामने फर्मान सोडले, लंच पॉइंट आगे है! आम्ही पुन्हा आमचे दप्तर पाठीवर मारून सज्ज झालो.
आता त्या धाब्याच्या मागील बाजूने पायवाट जंगलामध्ये गुडूप झालेली होती. धाब्याच्या आसपास इतक्या निर्जन ठिकाणी काही मोजकीच म्हणजे पाच किंवा सहापेक्षा अधिक गणती जाणार नाही इतकीच हया बकरवाल लोकांची घरे व त्यांच्या पशुधनांचे गोठे होते. आम्ही त्यांच्या बाजूबाजूने जंगलाच्या दिशेने पुन्हा चढून जाऊ लागलो. घनदाट भोजवृक्षांचे वन होते जणू! वृक्ष इतके दाटीने होते की, काही ठिकाणी सूर्य किरणे देखील पोहोचत नव्हती, तर मध्येच कधीतरी सूर्यप्रकाशाचा झरोका! त्यामुळे त्या जंगलाचा शीतल गंध शरिराला आणि मनाला स्पर्शून जात होता. आम्ही काही भोज वृक्षांच्या बुंध्यावरून निघालेले पापुद्रे जमा करू लागलो. प्राचीन काळी भुजपत्रांचा वापर लेखनासाठी होत असे. ह्याच भुजपत्रांवर वेद-पुराणांचे लेखन झाल्याचे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, त्यामुळे खूप कुतुहल वाटले. पूर्वी लेखनासाठी कागदाप्रमाणे हयाचा वापर होत असे. हया सिल्वर बर्च वृक्षानी वेढलेल्या मिडोज मधून जाताना दूरवर कुठेतरी खालच्या बाजूला पाण्याच्या प्रवाहाची खळखळ कानावर येत होती. आम्ही जसे जंगल पार करु लागलो, तसा पाण्याचा प्रवाह जवळ येत आहे असे जाणवत होते. आम्ही त्या सिल्वर बर्च वृक्षांच्या शीतल छायेतून आता एकदम खडकाळ दगड-गोट्यांच्या प्रदेशांत आलो! गर्द वृक्षराजी संपली होती. उजव्या हाताला खाली खोलवर प्रचंड खळखळाट करीत प्रवाही झालेली हिमनदी स्पष्टपणे दृश्यमान झाली. सिल्वर बर्च वृक्षांचे जंगल संपून आम्ही आता ‘निचनाई’ खोऱ्यामध्ये प्रवेश केला होता असे म्हणण्यास हरकत नाही. सिल्वर बर्च जंगलांची सावलीसुध्दा लुप्त झाली. पोटामध्ये भुकेचे कावळे प्रचंड ‘काव काव’ करीत होते. माझा सद्दामला सारखा एकच प्रश्न!! लंच पॉइंट कहां है सद्दामभाई? आणि त्याचे उत्तर- मॅडमजी बस, आयेगा अभी। चलते रहीये थोडासा और। मला ‘चलते रहो थोडासा और’’ हयामधील ‘थोडा’’चे एकक शेवटच्या दिवसापर्यंत समजले नाही.
ज्या हिमनदीच्या प्रवाहाला आम्ही समांतर चालत होतो, तो आवाज अधिक सुस्पष्ट होऊ लागला आणि अगदी आमच्या सोबत पण विरुद्ध दिशेला प्रवाही होताना दिसत होता. दूरवर पाण्याच्या अगदी जवळ आम्हाला माणसांची हालचाल दिसली. सद्दाम म्हणाला, ‘‘ वो देखो मॅडमजी, वहां जाना है। पण तिथे जाण्यासाठी मोठया-मोठया दगडांमधून पार होत जायचे होते. डोंगररांगांच्या अंगाखांदयांवरुन घसरणाऱ्या ग्लेशिअर्ससह वाहून आलेल्या हया प्रचंड मोठ्या शिळा! मला रामसेतू बांधणाऱ्या हनुमान देवांच्या अखंड परिवारास आवाहन करावेसे वाटले. जय देवा हनुमाना, हया दगड गोट्यांमधून पार कर बाबा! अगदी वानरासारखे हया दगडांवरून त्या दगडावर पाय रोवत आम्ही चालत होतो. एव्हाना आमचा कंपू लंच पाईंटजवळ पोहोचून वामकुक्षी करीत होता. अन् मी, बालसुब्रमण्यम, प्रविणा आणि रमजानभाई असे मागे राहिलो होतो. बालसुब्रमण्यमच्या दुखऱ्या बुटांमुळे वेग साहजिकच मंदावला होता. आम्ही अखेरीस ‘लंच पॉइंट’ जवळ पाहोचलो. दुपारचे चार वाजले होते! एरव्ही मला ही वेळ झाली की चहाची तलफ येऊ लागते. परंतु हा ‘लंच पॉइंट’ होता. त्यामुळे ‘लंच’ करणे क्रमप्राप्त झाले. मी दगडांनीच रचलेला बांध पार करून नदी पात्रातील मोठाल्या दगडांवर सरसावून बसले आणि हाताची ओंजळ करून, थंडगार पाणी ओंजळभरुन प्यायले मात्र! लंच पॉइंटच्या प्रतिक्षेत झालेले शारीरिक कष्ट निमाले! इतर सर्व जण बहुधा त्यांची वामकुक्षी जास्तच झाल्याने सॅक पाठीवर मारून पुढे चालू लागले! आम्हाला थोडं खजिल झाल्यासारखं वाटलं! पण आताशा थोडी फार हया ट्रेकच्या स्वरुपाची हलकीशी कल्पना आली आणि मनोमन स्वत:ला दोन नियम घालून दिले, ‘‘ पहिला म्हणजे चलते रहो! आणि दूसरा एकला चालो रे! अगदी ट्रेक पूर्ण होईपर्यंत!


निमुटपणे त्या वाहत्या नदी काठी बसून लंच बॉक्समध्ये असलेला, अगदी थंडगार होऊन निपचित पडलेला पराठा आणि लोणचे पोटात ढकलले आणि पुढच्या टप्प्यासाठीच्या क्षमतेची शिदोरी बळकट केली. लगेचच सद्दामने आमची ‘वाऱ्यावरची वरात’ सुरू केली. अजूनही आम्ही दगड गोट्यांमधूनच चालत होतो. मध्येच खोलगट व्हॅलीसारखा टेकाडे आणि पर्वत रांगांनी वेढलेला भूभाग येई; तर कधी ओघळून आलेले ग्लेशियरस् तर कधी नको वाटणारे खडकाळ दगड गोटे! मला प्रश्न पडू लागला की, हया ट्रेकला ‘ग्रेट लेकस्’ का नाव दिले? आतापर्यंत ‘लेकस्’ नावाच्या वस्तूचे अस्तित्व जवळपास कुठे असण्याची सुतराम शक्यता दिसत नव्हती! उभे खडे पहाड, त्यांच्या अंगाखांदयांवर घसरत येऊन कुठे तरी स्थिर झालेले ओघळलेले हिम आणि विस्तीर्ण नदीच्या पात्रात पसरलेली कुरणे किंवा ग्रासलॅंड आणि दगड गोटे! मी मलाच दिलेला मंत्र घोकू लागले ‘‘चलते रहो’’! ठरवूनच टाकलं, “नाही थांबायचे, फक्त चालायचे मज”. ‘चलते रहो’ची युक्ती नामी ठरली अगदी ट्रेकच्या शेवटापर्यंत!
आम्ही संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास युथ हॉस्टेलच्या निचनाई कॅम्पसाईटवर पोहोचलो. आमच्या कंपूमधील मी, प्रविणा, प्रसाद, बालसुब्रमण्यम आणि आमच्याही नंतर अर्ध्या तासाने उशीरा पोहोचणारे रमजानभाई असे सर्वात शेवटचे पाहुणे होतो. पहिलाच दिवस अत्यंत श्रमाचा झाला. आम्ही अंदाजे १३ किलोमीटर अंतर पायी चालून आलो होतो. कॅम्पवर पोहोचताच गोव्याचे श्री. रानडे कॅम्पलिडर हयांनी हसतमुखाने स्वागत केले. गरमागरम चहाची व्यवस्था केली. आमच्या ग्रुपमध्ये आम्ही फक्त पाचजणी स्त्रिया होतो. त्यामुळे दहा जणांच्या तंबूत आम्ही पाचजणी एैसपैस पसरलो! दिवसभर बूटांमध्ये आंबलेले आणि शिणवलेले पाय मोकळे केले. घोड्यांवर पुढे पाठविलेली आमची सामानाची सॅक ताब्यात घेतली आणि सुखावलो!
चौफेर पर्वत रांगांनी वेढलेल्या निचनाई खोऱ्यामध्ये थोड्या उंचीवर आमचे युथ हॉस्टेलचे तंबू विसावलेले होते. काही अंतरावर इंडिया हाईक्स्, ट्रेक द हिमालया सारख्या अन्य ट्रेक कंपन्यांचे तंबू ठाण मांडून होते. निचनाई कॅम्पसाईट म्हणजे समुद्रसपाटीपासून साधारणतः १२,००० फूट उंचीवर असलेला हया ट्रेकमधील पहिला पडाव! आमच्या कॅम्पच्या चहूबाजूनी मोठाले खडकाळ पर्वत मान उंचावून उभे होते. त्यावरून काही ठिकाणी हिरवळीचे आच्छादन तर काही ठिकाणी शुभ्र हिमाच्या राशी झालेल्या होत्या. चहूबाजूनी वेढलेल्या डोंगररांगांच्यामध्ये विस्तीर्ण पसरलेल्या दरीखोर्यामधील खडकाळ तर कधी गवताळ, तर कधी वितळलेल्या हिमाच्या असंख्य प्रवाहानी समृद्ध परंतु शारीरिक क्षमतेचा कस लागणारे चढ-उताराचे खडबडीत निचनाई खोरे!


हिमालयात संध्याकाळचे वेळी त्या स्तब्ध पर्वत रांगांसारखेच वातावरण देखील धीर गंभीर होत जाते. अन् आपले हृदय अनेक अनामिक उर्मींनी उचंबळून येऊ लागते! एक विलक्षण गूढ स्तब्धता सांजवेळी दाटून येते. हा माझ्या प्रत्येक हिमालय भेटीचा अनुभवच आहे! उशीरा पोहोचल्याने कॅम्पसाईटचा परिसर न्याहाळण्यासाठी वेळच उरला नाही. जेमतेम चहा आणि नैसर्गिक विधी उरकेपर्यंत सांज गडद भरुन आली. हवामानामध्ये प्रकर्षाने बदल जाणवू लागला. वातावरणामध्ये प्रचंड गारठा वाढला. आम्ही कसेबसे हुडहुडत जेवण करून तंबूत रवाना झालो. उदयाचा दिवस ‘निचनाई पास’चा! डोळ्यांमध्ये ‘विष्णूसार’ कॅम्पसाईटची स्वप्ने पाहात झोपी गेलो.
क्रमशः
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा