निचनाई कॅम्पवरुन आम्ही सकाळी लवकरच पुढच्या टप्प्यासाठी कूच केले. आदल्या दिवशीचा अनुभव लक्षात घेता सकाळी लवकर मार्गस्थ होणे आवश्यकच होते. त्या निचनाईच्या खडकाळ खोऱ्यातून, नदीपात्रामधून पार होत आम्ही एका डोंगराच्याकडेने चढाई करू लागलो.



“इंच-इंच” जागा लढवू हया उक्ती प्रमाणे धीर एकवटून तीव्र चढणीवर अत्यंत भीतीदायक वाटणाऱ्या डोंगरकडांवरुन वरच्या दिशेने चढाई करु लागलो. एकच व्यक्ती जेमतेम उभी राहू शकेल इतक्याच जागेतून आम्ही डोंगराच्या कड्यावर पोहोचलो. मागे वळून पाहिल्यावर खालच्या दिशेने वर चढून येणारा माणूस अगदी मुंगीच्या आकाराचा दिसत होता आणि खोल दरीमध्ये घोंगावत वाहणारे वितळलेल्या हिमनद्यांचे प्रवाह! पहिलीच चढण खूप आव्हानात्मक होती. अजून आम्ही निचनाई पास जवळ देखील पोहोचलो नव्हतो. निचनाई पासकडे जाणारा सुरवातीचा टप्पा खूपच आव्हानात्मक होता. समुद्रसपाटी पासूनची उंची, विरळ हवा आणि भरुन आलेलं आभाळ हयामुळे अगदी थोड्या अंतरावर देखील धाप लागत होती. परंतू नेटाने तो टप्पा पार पाडला. त्या टप्प्यामध्ये अधेमधे थांबण्यासारखी जागाच नव्हती. जेमतेम पाय रोवून उभे रहायचे! चुकूनही छोटासा दगड घरंगळत गेला तर मागे असलेल्या ट्रेकरचे काम फत्ते अशी परिस्थिती!
अनेक वेळा चढ चढून गेल्यावर सपाट गवताळ प्रदेश आला असे वाटताच पुन्हा दुसऱ्या टेकाडाच्या अंगाखांदयावरुन चढणीचा टप्पा येई! त्यातच सामान आणि मनुष्य प्राणी लादलेले अश्वदळ अधेमधे आमच्या दुडक्या चालीला खोडा घालतच होते! सकाळच्या न्याहारीमध्ये नूडल्स् असल्याने मी केलेले लंघन मला चांगलेच भोवले होते. त्यामुळे इथून पुढे जे काही असेल तेच “अन्न हे पूर्णब्रम्ह” हयावर निस्सीम श्रध्दा ठेवण्याशिवाय तरणोपाय नाही हे कळून चुकले! मला निचनाई खिंडीचा चढ खूपच भारी पडू लागला. माझ्या नवीन सख्यांपैकी डॉक्टर निलूने तिच्यासाठी घोड्याची सवारी केलेली होती. मी खूपच मागे पडल्याने मला खिंडीतून पार गेलेल्या ह्या नव्या मैत्रिणीने तिचा घोडा पाठविला. परंतू ‘‘बचेंगे तो और भी लढेंगे” हे माझे कायमच ब्रीद वाक्य असल्याने मी घोड्यावर जाण्याचे नाकारले. माझ्यासोबत पण माझ्यापेक्षा बरंच अंतर मागे राहिलेले रमजानभाई मात्र घोड्यावरून पुढे गेले. आम्ही असे अनेक चढ-उतारांची मालिका पार करत समुद्रसपाटीपासून १३,५०० फूट उंचीवर असलेल्या निचनाई खिंडीपाशी येऊन पोहोचलो. मग मी आणि माझा सांगाती ‘सद्दामभाई’! कसाबसा निचनाई खिंडीचा चढ पार केला आणि चहाची टपरी दिसली. मी घोषणाच करुन टाकली,‘‘सद्दामभाई मुझे बहोत भूक लगी है, कुछ खाया नही तो चल नही पाऊंगी। सद्दामभाई सुध्दा एव्हाना माझ्या संथ गतीमुळे थकला होता! कोई बात नही, मॅडमजी आरामसे काव्हा पिओ फिर हम निकलेगें। मी हुऽऽश करून टपरीमध्ये अगदी बाहेरचे दृष्य दिसेल अशी जागा पटकावली. धाब्याच्या प्रवेशापाशी असलेल्या दगडावर ठाण मांडून बसले आणि गरमागरम मॅगी आणि काव्हाची ऑर्डर दिली. त्या टपरीतून निघणाऱ्या धुरामुळे आणि तिथे बनणार्या मॅगी आणि ओम्लेटच्या अवघ्या वासानेच मला थंड हवेत उब मिळाल्यासारखे वाटले!


मी त्या चहाच्या टपरीवर पोहोचले तेव्हा ढगांमध्ये लुप्त झालेले ग्लेशिअर्स, पर्वतशिखरे काही सुध्दा दिसत नव्हते. फक्त हिम वितळून वाहणार्या पाण्याची खळखळ कानी येत होती. माझी मॅगी तयार होईपर्यंत त्या ‘घने बादलांनी’ पोबारा केला आणि क्षणार्धात टपरीच्या समोरचा परिसर आणि खिंडी पलीकडचा नजारा दिसू लागला. खूप तीव्र चढण पार करून आले होते हयाची जाणीव झाली. समोरच्या डोंगरावरून त्याच्या पायाशी लोळणी घेत पडलेले ग्लेशिअर्स आणि त्या खालून पाण्याचा प्रवाह आदल्या दिवशी मुक्कामाचा तळ असलेल्या कॅम्पच्या दिशेला वाहता झालेला होता. बस्स! एवढंच! पुन्हा “अगोबाई ढगोबाई” आक्रमण करून आले, आणि पुन्हा सारा आसमंत गडद धुक्याने व्यापून गेला. आणि फक्त माणसांच्या आकृत्या चालताना दिसू लागल्या. एव्हाना माझ्या पोटातल्या कावळ्यांची गरमागरम मॅगीने क्षुधाशांती झाली होती आणि काव्हा पिऊन तरतरी आलेली होती. सद्दामचा तोच परवलीचा शब्द कानी येऊन थडकला, ‘‘चलो चलो मॅडमजी”! प्रत्यक्ष खिंडीमध्ये दोहोबाजूंनी डोंगर आणि बर्फाची आच्छादने! ट्रेकर्सच्या अति वावराने त्या बर्फाचा जो काही चिखल झाला होता, तो अत्यंत धोकादायक होता! त्यामध्ये ट्रेकींग पोल अगदी खात्री होईपर्यंत स्थिर झाल्याशिवाय पाऊल उचलायचे नाही असा नियम घालून अगदी सावकाश त्या चिखल आणि बर्फातून पार झाले.



आता नजरेच्या टप्प्यामध्ये विस्तीर्ण रुंदावत गेलेल्या पूर्ण व्हॅलीचे विहंगम दृष्य आणि नागमोडी वळणे घेत पायउतार होत गेलेल्या पायवाटा आखीव रेषांसारख्या दिसू लागल्या. त्या उतारावरील दगडांच्या प्रदेशात उगवलेल्या हिरव्या गवतांच्या पायवाटांमधून भराभर पावले चालू लागली. उंच आकाशाकडे नजर करताच कायम बर्फाच्छादित राहिल्यामुळे पार बोडक्या दिसणार्या कातीव कडेकपारी, त्यांच्या अंगाखांदयांवर झुलणारे हिम! आणि त्यांच्या पायाशी लडिवाळ नाद करीत प्रवाही झालेले झरे आणि मग त्यांच्या कुशीमध्ये जागोजाग पसरलेले हिरवळीचे गालिचे! आमचा ग्रुप फार पुढे निघून गेलेला होता. त्या पायवाटा अगदी निर्मनुष्य! पण निसर्ग मात्र बोलका झालेला होता. त्या खडकाळ उतारांवरुन कधी छोटे पाण्याचे प्रवाह ओलांडत, तर कधी हिरव्यागार कुरणांवर झालेल्या लाल – पिवळ्या फुलांच्या रंगाच्या उधळणीचा नजारा डोळ्यांमध्ये साठवित हिरव्यागार सपाट कुरणाच्या प्रदेशाजवळ पायवाटेने खाली उतरुन आलो. त्या पिवळ्या जर्द आणि निळसर फुलांच्या ताटव्यांमधून नेमके कुठच्या दिशेला जावे हेच कळत नसे!
आम्हाला त्या दरीखोऱ्यातून वाहणाऱ्या नदीच्या पात्राला ओलांडून नदीच्या दुसऱ्या काठावर जायचे होते. निचनाई खिंडीतून खाली उतरून विष्णुसर तळाकडे जाताना डाव्या हाताला पर्वत कड्यांच्या अंगावरून मोठाले प्रपात वाहताना दिसत होते. वरुणराजाने अचानक बूंदाबुंदी चालू केली. इंद्र देव बहुधा आमच्या स्वागतास हजर असावा! स्वत:चा आणि सॅकचा बचाव करण्यासाठी ‘बरसाती’ नावाचे चिलखत चढविले. अद्यापही मला आमच्या ग्रुपमधील सवंगडी दूरवर सुध्दा नजरेस पडत नव्हते. सद्दामसुध्दा नदीचे पात्र ओलांडताना कदाचित बुचकळयात पडला असावा. त्याला नदीच्या पात्राचा अंदाज घेता आला नाही. एवढ्या मोठ्या नदीपात्राला प्रवाही पाण्यामधील दगड-गोट्यांवर पाय रोवून पार करायचे म्हणजे माझी सत्व परीक्षा! एकतर मला पोहायला येत नाही. नदीच्या पाण्याचे उणे तपमान आणि थरकांप उडविणारा खळखळ पाण्याचा प्रवाह! परंतु सद्दाम धीर देऊ लागला. मॅडमजी हात पकड के चलिए, मी निमूट लहान मुलाप्रमाणे त्याच्या मदतीने नदीच्या पात्रातील मोठ्या दगड गोट्यांवर एकेक पाऊल टाकत पुढे जात होते. माझे पूर्ण अवधान माझ्या हातातील काठीची पकड आणि बूटातील पाय ह्यांच्यावर! एक जरी छोटी चूक झाली तर त्या बर्फाच्या थंडगार पाण्यात हाडे गोठून पुतळाच होण्याची भीती! मनात विचार आला आणि ‘‘कावळा बसायला अन् फांदी तुटायला’’ अशी म्हण का प्रचलित आहे त्याचाच प्रत्यय आला. बुडत्याचा पाय खोलात! माझ्या डाव्या पायाचा अंदाज चुकला अन् बुळबुळीत दगडांवरून पाय घसरून गुडघ्यापर्यंत मी वाहत्या पाण्यामध्ये! मी पुनश्च सावधान! उजव्या पायाला वरच्या दगडावर घेऊन प्रथम स्वत:ला स्थिर करून तोल सावरला. सद्दामने मला आधार दिलेलाच होता, त्यामुळे डावा पाय फक्त गुडघ्यापर्यंत पाण्यात गेला अन्यथा बसकण मारली असती! माझ्या डाव्या पायाच्या बूटांमध्ये पाणी जाऊन बूट, मोजे आणि ट्रॅक पॅन्ट ओले झाले. अद्याप नदीचे पात्र पूर्ण ओलांडलेले नव्हते. दुसर्या एका मोठ्या दगडावर जम बसवून प्रथम दोन्ही बूट काढून हातात घेतले आणि सद्दामभाईचा हात धरुन त्या थंडगार पाण्यातून निर्धाराने चालत राहले. प्रवाहाच्या किनार्यावर आल्यावर फक्त आणि फक्त पायाचे तळवे झिणझिणत होते. काही क्षण संवेदनाच नव्हती. काठावरच्या मऊ हिरव्याशार गवतावर पाय टेकले आणि रगडले! त्या मऊशार हिरवळीचा स्पर्श सुखावह वाटला. सद्दामभाईच्या सांगण्यावरून काही अंतर बूटांशिवाय बिनबोभाट चालले! ट्रेकिंगच्या नियमांना चक्क बगल दिली होती. आम्हा यूथ हॉस्टेलर्सना शिकवण असते, ती कायम पायांना जपण्याची! शक्यतो पायामधून बूट काढायचे नाही. परंतु इथे तर मी ट्रेक रुटवरच अनवाणी चालत होते! हिरवळ संपेपर्यंत अनवाणी चालल्यानंतर फक्त ओले बूट पायात चढविले. पर्यायच नव्हता!
मला काही अंतरावर बालसुब्रमण्यम् त्यांच्या दोन ट्रेकिंग पोलच्या सहाय्याने चालताना नजरेस पडले. निळ्या रंगाच्या बरसाती आजूबाजूला दिसू लागल्या. मी आता ग्रुपमधील सदस्यांना गाठले, असा त्याचा अर्थ होता. हुश्श! पण सद्दाम भाई अद्यापही विष्णुसर कॅम्प दूर आहे अथवा जवळच आहे अशी कोणतीही वाच्यता करीत नव्हता. म्हणजेच चलते रहो! परंतु आता आम्ही सर्व छोट्या कंपूमध्ये एकत्र मौजमस्ती करीत चालत होतो. उजव्या-डाव्या हाताला पर्वतरांगा, त्यांच्या मधोमध विस्तीर्ण पसरलेली हिरवीगार कुरणे म्हणा अथवा गवताळ प्रदेश म्हणा! आणि मधोमध वाहणारी नदी! हया गवताळ प्रदेशात मनमौजी प्रमाणे मुक्तपणे संचार करीत असलेले शेळ्या-मेंढयांचे कळप! अजूनही ‘ग्रेट लेकस्’ नाव असलेल्या ‘तलावांची’ नजरभेट झालेली नव्हती. पण ज्या प्रदेशातून आम्ही चालत होतो तो मात्र खूपच सुंदर होता. आम्ही त्या दरीखोऱ्यांच्या अगदी शेवटच्या टोकाला आलो अन् आम्हाला खालच्या दिशेला युथ हॉस्टेल-विष्णुसर कॅम्पसाइटचे तंबू विसावलेले दिसले. विष्णुसार किंवा विशनसार तलावातून निर्गमित झालेल्या झऱ्यांच्या काठा-काठाने तंबू उभारले होते.



आम्ही साधारणतः दुपारी अडीच-पावणे तीनच्या सुमारास विष्णुसार कॅम्पला पोहोचलो. अगदी चहुबाजूने पर्वतांनी वेढलेल्या विस्तीर्ण मैदानी खोऱ्यामध्ये आज आमचा मुक्काम होता. कॅम्पकडे येणाऱ्या दिशेत उभे राहीले की, डावीकडे विष्णूसर आणि किशनसर सरोवराकडे जाणारा रस्ता आणि समोर गडसर खिंडीकडे जाणारा रस्ता आणि उजव्या हाताला झऱ्याकाठी आमचे तंबू! त्या वाहत्या पाण्याच्या नादमय खळखळाटाने आमचे छान स्वागत झाले.
आम्ही पाठीवरची ओझी मोकळी करून क्षुधाशांती करुन निवांत झालो. दिवस मावळण्यासाठी अवधी असल्याने आमच्या कॅम्पलिडरने विष्णूसार सरोवराला भेट देऊन येण्याची कल्पना सुचवली. आम्ही सर्व त्या दिशेने निघालोही, परंतु पावसाची सर अगदी ‘धावून आल्या’ प्रमाणे अवतरली! विनाकारण कपडे ओले करण्याची अजिबात इच्छा नव्हती. कारण ते लवकर सुकतील हयाचा अजिबात भरवसा नव्हता! थोड्या वेळाने पाऊस ओसरला. आम्ही कॅम्पसाईटच्या परिसराचा आनंद घेऊ लागलो. आणि अचानक मेंढयांचा मोठ्ठाच्या मोठा कळप चरत आमच्या कॅम्पसाईटवर इतस्तः बागडू लागला. आम्ही जणू मेंढपाळ होऊन त्यांना हाकारत त्याच्या मागे धावू लागलो. पावसाने अल्पविराम घेतल्याने आम्ही पुन्हा सरोवराकडे जावे का? हया द्विधा मनस्थितीतच होतो. परंतू दुसर्या दिवशी त्याच मार्गाने ट्रेक रुट गडसर खिंडीकडे जात असल्याचे कॅम्प लिडरने सांगताच आमच्या विचारचक्राला पूर्ण विराम दिला.

कॅम्पसाईट मावळतीच्या किरणांमध्ये अधिकच रम्य भासू लागली. उंच डोंगरावर शुभ्र पुंजके मद मस्त होऊन झुलत होते. मधूनच कुठे तरी आकाशाची निळाई ढगांच्या गवाक्षातून डोकवत होती. त्या विस्तीर्ण खोऱ्यात बेधुंद सत्ता गाजवावी तसा मरूत मुक्त विहारत होता. झऱ्याच्या पाण्याचा प्रवाह मंजुळ गीत गात मुशाफिरीसाठी पार खोऱ्यापल्याड वाहता झाला होता. सर्व दूर हिरवागार विशनसारचा गवताळ प्रदेश अगदी मनाचा ठाव घेत होता. ह्या परिसरामध्ये कदाचित ससाणा पक्ष्यांचा वावर असावा. साधारणतः कावळ्यापेक्षा मोठे, तपकिरी-करड्या रंगाचे हे पक्षी घिरट्या घालताना दिसत होते आणि ओरडत होते. हे पक्षी जातीने शिकारी! गंमत म्हणजे जोडी-जोडीने हे पक्षी दिसत होते. ‘डोमकावळ्यासारखे असूनही ‘काव-काव’ करीत नव्हते. मी अंदाज बांधू लागले. ‘ससाणा’ ही पक्ष्यांची जात खरं तर अगदी तुरळक झालेली! पण त्यांच्या एकूणच आवाज, रंग आणि दिसण्यावरून ते पक्षी ‘ससाणा’ असावा असा कयास काढला. उंच ठिकाणावरून टेहळणी करून सावज दिसलं की पाठलाग करायचा हया पद्धतीने त्यांची भक्ष्य पकडण्याची धावपळ चालली होती. ह्याच सरोवरांमध्ये ट्रॉऊट मासे मुबलक असल्याचे वाचले होते. त्यामुळेच कदाचित ह्या शिकारी पक्षांचा येथे वावर असावा.
आमची सायंकाळ अगदी निवांत होती. बऱ्यापैकी विश्रांती मिळाली. कॅम्पसाईटचा परिसर अगदी मनोरम होता. त्यामुळे मनाला आणि चालून थकलेल्या शरीराला आनंदाची ऊर्जा मिळाली. इतका सुंदर निसर्गरम्य परिसर आणि फेसबुक, इन्स्टासाठी फोटो नाही असे कसे चालेल बरं! मग काय नानाविध प्रकारे फोटो काढून झाले. अंधारून आल्यावर आमच्या राहुटीबाहेर गाण्याची मैफल रंगली. ‘अन्न हे पूर्ण ब्रम्ह’चे इति कर्तव्य पार पाडून सर्व जण आपापल्या तंबूंमध्ये विसावले. उदयाचा दिवस होता थकविणाऱ्या ‘गडसर पास’चा! त्यामुळे पुरेशी झोप आणि आराम आवश्यकच होता.
क्रमशः
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा