आज ट्रेकचा पाचवा दिवस! पुरेशी विश्रांती मिळाल्यामुळे सकाळी आपसूकच लवकर जाग आली. त्यामुळे कॅम्पसाइटवर चहलपहल होण्याआधी निवांतपणे परिसराचा फेरफटका मारता आला. पहाटवाऱ्याचा आनंद घेता आला. आमच्या राहुट्यांच्या मागच्या बाजूने जाऊन झऱ्याच्या काठाने चालत येताना त्या थंडगार वाऱ्याच्या झुळुकांमुळे हलकेच डोळ्यांमधून पाणी ओघळू लागले. त्या प्रवाहा शेजारी दगडावर बसून त्या नीरव शांततेत निसर्गाचे गान श्रवण करण्याची अनुभूती वेगळीच होती. विष्णुसार सरोवरामधून वाहणारा प्रवाह अखंड नादमय खळखळ करीत मनामध्ये उत्साहाचे तुषार उडवीत होता, त्या स्वच्छ पाण्यामधून अगदी आरपार दगडगोटे दिसत होते. आमच्या कॅम्प साइटच्या किचनच्या तंबूमधून स्वयंपाकाची लगबग चालू झालेली होती. मी अगदी स्तब्ध होऊन त्या वातावरणाचा आनंद घेण्यात मग्न असतानाच राहुट्यांच्या मधोमध असलेल्या दगडी काऊंटरवर चहाची किटली आली. चाऽऽय! चाऽऽय! जोरदार आरोळीने कॅम्पसाईटचा अवघा परिसर जागा झाला. रोजची दिनचर्या चालू झाली. चहा, नाष्टा मग सॅकची बांधाबांध आणि पॅकलंचची शिट्टी! विष्णुसार कॅम्पसाईटचा निरोप घेण्याची घटीका आली. सर्व सूचना मिळाल्या. सद्दाम भाईने सक्त पण प्रेमळ सूचना दिली, ‘‘मॅडमजी आप थोडा आगे चलेंगे, गडसर पास की चढाई बहुत खडी चढाई है, मी उत्तरले, ‘‘हां सद्दाम भाई, अब तो सिर्फ आगे ही जाना है. परतीचा प्रश्नच नव्हता.
आम्ही सर्वजण कॅम्पलिडरचा निरोप घेऊन निघालो आणि पाण्याचा प्रवाह जिथून वाहता झाला होता त्या दिशेने चालू लागलो. काही मिनिटांमध्येच आम्ही दगडगोटे पार करून ‘ विष्णूसार’ सरोवरा पाशी पोहोचलो. किती उत्कंठा होती हया ग्रेट लेक्सच्या ट्रेकची्! त्या उत्कंठेपेक्षाही कितीतरी पटीने अधिक सुंदर निसर्ग चित्र होते! आज खऱ्या अर्थी ट्रेक मधील सरोवरांची नजरभेट होणार होती. त्यामधील ‘विष्णूसार सरोवर’ हे पहिले आणि त्याच्या लगतच थोड्या उंचीवर असलेले ‘कृष्णसार’ सरोवर! खरं तर आमच्या कॅम्पसाईट पासून अगदी काही मिनिटांच्याच अंतरावर असलेले ‘विष्णूसार सरोवर’ अतिशय सुंदर होतं! आम्हाला आदल्या दिवशी पावसाने गाठले नसते तर ह्या तळ्याकाठी किती छान संध्याकाळ व्यतीत करता आली असती बरं! असा विचार पटकन मनात आला.


विष्णुसार ज्याचा अपभ्रंश विशनसार असाही केला जातो. खूप उंचीवर असलेल्या पर्वतांमध्ये असलेले हे अल्पाईन सरोवर, समुद्रसपाटीपासून साधारणतः १२,१७० फूट उंचीवर आहे. विष्णु पर्वताच्या पायथ्याशी साधारणतः एक किलोमीटर लांब आणि अर्धा किलोमीटर पेक्षा थोडे जास्त रुंद असणारे विष्णुसार सरोवर त्याच्या जवळून अनुभवताना अगदी अद्भुत वाटले! काश्मिरी मान्यतेनुसार विष्णू पर्वताच्या पायथ्याशी असलेले सरोवर म्हणून ह्याचे नाव विष्णुसार! सरोवराच्या काठाशी उभे राहताच तेथील अगम्य आणि स्तब्ध नीरव शांततेचा परिचय झाला. पर्वत शिखरांवर झुलीसारखे पांढऱ्या करड्या ढगांचे पुंजके, पर्वतांच्या अंगा-खांदयावरुन ओघळणारे ग्लेशिअर्स, त्यापासून उगम पावलेले झरे आणि त्या स्तब्ध सरोवरामध्ये हया सर्वांचे प्रतिबिंब! आरसपानी सौंदर्य कशाला म्हणतात, ते कदाचित हेच असावे! सरोवराच्या काठाने दाटलेली हिरवळ आणि त्या हिरवळीवर गोजिरी-साजरी पिवळी, निळी जंगली रानफुले हेच इथलं वैशिष्ट्य! त्या सरोवराच्या चमचमत्या पाण्यातील रंगछटांची कोणालाही सहजच भूल पडावी! कोणत्या रंगांचे सरोवर म्हणावे हे! हिरव्या आणि निळया रंगांच्या असंख्य छटा! तर कधी पर्वतांवर झुलणार्या ढगांच्या पुंजक्यांचे प्रतिबिंब त्या रंगामध्ये अजूनच जादुई अविष्कार दाखवत होते! तेथून पाय निघत नव्हता. आणि सद्दाम मात्र एकच घोषा लावून होता, ‘‘मॅडम चलो, चलो! बारिश आयेगी तो गडसर पास मुष्कील होगा. पण विष्णुसार काही डोळ्यापुढून जाण्यास तयार नाही. विष्णुसार तलावाच्या बाजूनेच पुढे चालत राहीलो.

साधारणतः अर्धा किलोमीटरच्या टप्प्यातच विष्णुसार सरोवरापेक्षा ५०० फूट अधिक उंचीवर असलेले कृष्णसार सरोवर दृष्टीस पडले. गूढ निळ्या कृष्णसार सरोवराच्या काठाकाठाने आमचा ट्रेक रुट गडसर खिंडीकडे जात होता. मला आता समोरचा खडा पहाड दिसत होता. आणि त्या पहाडामधून अगदी शिस्तीने रांगेत ट्रेकर्स वरच्या दिशेने चढताना दिसत होते. मला क्षणभर माझ्या मैत्रिणीने गडसर पासची उभी चढण खूप थकविणारी आहे असे सांगितलेले आठविले. क्षणभर किंतु-परंतुने खिंडीत गाठलेच! पण मनोनिग्रह ठाम होता, ही खिंड तर पार करणारच!
‘विष्णूसार’ आणि ‘कृष्णसार’ ही दोन्ही जुळी सरोवरे! हिवाळ्यामध्ये गोठून जाणारे हे काश्मीरी भाषेमधील ‘सार’ म्हणजेच ‘सरोवर’, एक अद्भुत असं विस्मय चकित करणारे आश्चर्यच आहे. ग्लेशिअर्समधून निर्माण होणारी स्फटिकासम स्वच्छ चमचमणारे पाणी असणारी ही सरोवरं पाहून आतापर्यंत झालेले शारीरिक कष्ट आपण पार विसरुन जातो. कृष्णसार सरोवरातील पाणी आणि ग्लेशिअर्स हयामधून विष्णूसार सरोवराला पाण्याचा पुरवठा होता. झऱ्याच्या स्वरुपात कृष्णसार सरोवरातून हे पुढे विष्णुसार सरोवरात जाणारे पाणी ‘नीलम’ नदीचा उगमाचे स्त्रोत बनते आणि ही नीलम नदी उत्तरेकडे बडोबपर्यंत आणि पश्चिमेकडे गुरेझ खोऱ्यामध्ये भारत-पाक सीमा रेषांच्या लगत प्रवाही होते. हया जुळ्या सरोवरांमध्ये ब्राऊन ट्राऊट माश्यांची प्रजात मुबलक आहे. काही हौशी स्थानिक काश्मीरी लोक खास परवानगी घेऊन ह्या सरोवरांच्या काठी ट्राउट फिशिंग करण्यासाठी गळ लावून बसतात. हया ट्रेकचे मुख्य आकर्षण म्हणजे ही अल्पाईन सरोवरे- दिवसाच्या वेळेनुसार सूर्यप्रकाश, अस्मानी रंग आणि त्यामध्ये ढगांचे पुंजके हयानुसार बदलणाऱ्या त्यांच्या रंगछटा! सरोवरांच्या परिसरातील हिरवीगार कुरणे उन्हाळ्यामध्ये शेळ्या मेंढ्यांचे आनंदवन बनते! शारीरिक कुवतीनुसार मध्यम ते अवघड श्रेणीमध्ये गणला जाणारा काश्मीर ग्रेट लेकचा ट्रेक म्हणजे खरोखर स्वर्गीय नंदनवनातली सफर आहे. उन्हाळ्याच्या मोसमामध्ये हया काश्मीर ग्रेट लेकच्या ट्रेकसाठी देश-विदेशातून ट्रेकर्स येतात.
आम्ही कृष्णसार सरोवराच्या बाजू-बाजूने टप्याटप्यामध्ये गडसर खिंडीकडे चढू लागलो. एका विशिष्ट टप्प्यामध्ये कुरण संपून समोर गडसर खिंडीचा पहाड उभा ठाकला. क्षणभर तिथे थांबलो कारण आता गडसर खिंड पार करेपर्यंत उभी चढण होती. अगदी मान उंचावून गडसर खिंडीच्या वरच्या टप्प्याकडे पहावे लागत होते. मन साशंक झाले. त्या डोंगरामधून गेलेल्या पायवाटेवरून वरच्या दिशेने अत्यंत मंद गतीने पुढे पुढे सरकणाऱ्या माणशी आकृत्या दिसत होत्या. ट्रेकला जाण्यापूर्वी नेहमीच्या सवयी प्रमाणे गुगलबाबाच्या महितीजालामध्ये उपलब्ध असलेली ट्रेकची माहिती, अनेक ब्लॉग्स, विडीओ पाहिलेले होते. त्यामुळे गडसर खिंडीतून विष्णुसार आणि कृष्णसार ह्या जुळ्या सरोवरांचे एकत्रित होणाऱ्या दर्शनाबद्दल अत्यंत उत्कंठा होती. अन् मी आता त्याच वाटेवर होते! मनाचा हिय्या केला. स्वतःला तंबी दिली, ‘थकायचे नाही, पायांनो चालत रहायचे! क्षणभर थांबून दीर्घ श्वास भात्यामध्ये भरायचा आणि चालत रहायचे हया वचनावर कायम राहून ‘बेबी स्टेप-बेबी स्टेप’ करत गडसर खिंडीत पोहोचलो. झिगझॅग पाऊलवाट असणारा गडसर खिंडीचा मार्ग शेवटच्या टप्प्यात इतका बिकट होतो की, आपल्याला वाटतं संपलं सर्व! पाय हट्टी होतात. अगदी काही मोजकीच पावले चालले की धाप लागत होती. पण डाव्या बाजूला नजर फिरविली की, आपल्याच स्वर्गीय वैभवात अस्मानी रंगात दिमाखात चमचमणाऱ्या विष्णुसार आणि कृष्णसार ह्या जुळ्या सरोवरांचे दृश्य आपला श्रमपरिहार करते. गडसर पासच्या शेवटच्या टप्प्याचा तीव्र चढ अतिशय अवघड होता. नागमोडी वळणे घेत मळलेली पायवाट जेव्हा खिंडीत येऊन पोहोचते तेव्हा सृष्टीच्या निर्मात्याची फक्त आणि फक्त कलाकुसर दिसते.

गडसर खिंडीमध्ये पोहोचताच निसर्ग चित्रांचे जणू एक भव्य दालनच आपल्या पुढे उघडले आहे असे वाटू लागते. दोन्ही जुळ्या सरोवरांचे एकत्रित दर्शन भव्य दिव्य वाटते. इतक्या उंचीवर दुर्गम पर्वतरांगांमध्ये दडलेले हे निसर्ग वैभव आणि त्याच्या भव्यतेचा आविष्कार वेगळ्याच अनुभूति देऊन जातो. दीड-दोन तासाची अत्यंत कठीण वाटचाल करून एका स्वर्गीय सुखाची भेट आपल्या नजरेस होते. फिरोजी म्हणावं का अस्मानी म्हणावं हेही सुचत नाही! त्या क्षणाला फक्त त्या नजार्याचे होणारे प्रत्यक्ष दर्शन हाच एक अनुभव आहे. त्याला कॅमेरामध्ये काय चित्रबध्द करणार आपण?
गडसर खिंडीमधून विष्णू पर्वताच्या पायथ्याशी असणारी ही गूढ सरोवरे आणि त्यांचे स्फटीकांप्रमाणे रंगछटा फाकणारे पाणी! त्या पलीकडे विस्तीर्ण खोरं, त्यात हिरवीगार कुरणं आणि पार पलीकडे निचनाई पास उतरल्यावर असणारे डोंगर उतार! अधेमध्ये डोंगरकुशीत विसावा घेत असलेले बर्फाळ ग्लेशियर्स! हया जुळ्या सरोवरांच्या विहंगम दृश्याने मन मोहित करून टाकले. गडसर खिंडीच्या मध्यभागी विष्णू पर्वताच्या दिशेने तोंड करुन उभे राहिल्यावर ‘पाहू किती हया दोन चक्षुंनी’ अशी अवस्था होऊन जाते. डाव्या बाजूला ‘विष्णूसार’ आणि ‘कृष्णसार’ हया जुळया सरोवरांचे भव्य दिव्य दृष्य! त्यांच्या पाण्यामध्ये उमटलेली प्रतिबिंबे आणि रंग छटा! आकाशाला गवसणी घालणारी पर्वत शिखरे जणू ढगांच्या पटलामधून त्या स्फटिकासम पाणी असलेल्या सरोवरांमध्ये आपली छबी न्याहाळत आहे असेच वाटत होते. बर्फाने वेढलेली गडसर खिंड आणि उजवीकडे नजर फिरवताच पुढच्या दिशेने गडसर कॅम्पच्या दिशेने पाय-उतार होत मार्गस्थ झालेल्या दूर पर्यंत रेखाटलेल्या पाऊलवाटा!

गडसर खिंडींच्या पल्याड बर्फ साचून रस्ता अदृश्य झाला होता. डाव्या बाजूला खडया पहाडांच्या अजस्त्र भिंती जणू! आणि उजव्या बाजूला हिरवीगार पसरलेली हिरवळ! अन् हयांच्या मधोमध नीलमण्यासारखे चमकणारे पाणी असणारे तलाव! त्यावर स्वैर पहुडलेले हिमनग आणि डोंगर रांगा आणि मिडोज् ह्यांच्यामधून उलगडत जाणारी विस्तीर्ण दरी-खोरी! दूर वर फिरोजी, नीलमणी रंगाचे ठिपके आता ‘ग्रेट लेकस्’च्या सान्निध्यात आल्याची जाणीव करून देत होते. गडसर खिंडीच्या तोंडाशीच साचलेल्या बर्फाने उतरण असणाऱ्या पायवाटेवर पाऊल टिकत नव्हते. भुसभुशीत रवाळ मातीवर पाय घसरत होता. अगदी छोटासा अवघड टप्पा पार करून आम्ही त्या सुंदर हिरवाईने समृध्द असलेल्या फुलांच्या मिडोजमधून जाणाऱ्या पायवाटेवर चालू लागलो. मला तर जणु खरोखरच क्षणभर स्वर्गामधील नंदनवनामध्ये अवतरल्यासारखं भासू लागलं! असीम निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असाच प्रदेश होता. हिम वितळून तयार झालेली ही स्फटिकासम भासणारी तळी आणि त्याच्या सभोवार हिरवीगार कुरणे आणि त्यावर सजलेली रंगीत जंगली फुले! तन-मन हरपून गेले अगदी! आज जणू कुठच्या तरी परिकथेतील प्रदेशात आल्याप्रमाणे वाटत होते. निसर्गाचे चित्तवेधक आविष्कार अगदी गुंगच करुन टाकत होते. बराचसा वेळ गडसर खिंडीशी सलगीने असलेल्या डोंगर रांगांतील पायवाटांवरुन आता उतरणीवर चालू लागलो. मध्येच पावसाने ‘‘येऊ का? असे भय दाखविल्यासारखा शिंतोडे उडवून गेला. सॅक मधून बरसाती काढून घालेपर्यंत ‘वाकुल्या’ दाखवित ‘छू मंतर’ सुध्दा झाला. पण त्या धांदलीमध्ये बरसातीमध्ये फार अवघडल्यासारखे होऊ लागले. कसेबसे उतरणीचा रस्ता पार करून पुन्हा काहीसा सपाट खोऱ्याचा भाग आला. रस्त्यामध्ये मेंढयांचे कळप जणू झुंडीने चालले होते. गंमतीचा भाग म्हणजे संपूर्ण कळपच्या कळप साठलेल्या बर्फावर एकत्र जमून उभा होता. त्यांच्या मागे बकरवाल हाकाटी करत होते. मध्येच एखादा जथ्था आमच्या पाऊलवाटेवर “रास्ता रोको” आंदोलन करत निवांत बसलेला असे.


आम्ही अगदी मुग्ध आणि लुब्ध होऊन पायवाटांवरून पुढे चालतच होतो, त्या काश्मीरच्या उंच उंच दरीखोऱ्यात! आणि अचानक अद्भुत नजारा उभा ठाकला! गडसर लेक! समुद्र सपाटीपासून १२,५०० फूट उंचीवरचे हे अल्पाईन सरोवर म्हणजे एका जादुई प्रदेशाची सैर! आमच्या पायवाटेच्या डाव्या बाजूला एका पहाडाच्या पायथ्याशी निळ्या रंगामध्ये हे तळं अगदी उठावदार दिसत होतं! जितकं हया सरोवराचं दुर्गम स्थळी असणं तितकंच अद्भुत! सभोवताल अल्पाईन मिडोजनी वेढलंलं! आणि अल्पाईन फुलांनी बहरलेलं! हया सरोवरापाशी येताच नजर खिळून राहिली. उगाच असे वाटू लागले की, जणू काही एखादी चुंबकीय शक्ती असावी त्या सरोवरापाशी! विलक्षण सुंदर देखावा होता. सरोवराला ज्या पहाडांनी कवेत घेतलेले होते त्या पहाडांनी शुभ्र ढगांचे साज त्यांच्या शिरपेचामध्ये खोवून त्याचे प्रतिबिंब गडसर तलावातील पाण्याच्या रंगामध्ये मिसळून निळाई आणि हिरवाईच्या संगमाचे अनेकविध चमत्कार दाखवित होते.

काश्मीरी भाषेमध्ये गडसर म्हणजे ‘माश्यांचे सरोवर’ हया अल्पाईन तळ्यांमध्ये ट्राऊट माश्यांच्या प्रजातींची पैदास मुबलक होते. हया गडसर तळ्याच्या अद्भुततेविषयी एक खास आख्यायिका गाईडकडून समजली. मेंढपाळ, बकरवाल उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सरोवराकाठी आपले पशुधन चरावयास घेवून येतात. पण ते अगदी सरोवराच्या काठा-काठानेच! मान्यता अशी आहे की, हया सरोवरामध्ये ‘तलाव राक्षसाचा’ वास आहे. आणि हा राक्षस आक्टोपससारख्या त्याच्या तंतुनी काठावर असलेल्या प्राण्यांना खेचून सरोवरामध्ये घेऊन जातो! त्यामुळे सरोवराच्या काठावर शेळया-मेंढया चरताना दिसत नाहीत. गोष्ट गमतीशीर होती. पण मनात त्या तलाव राक्षसाला धन्यवाद दिले. त्याच्या भीतीने का होईना, परिसराचा र्हास झालेला नव्हता. हया सरोवरामधून पाण्याचा झरा प्रवाही होऊन नदीचे उगम स्त्रोत होतो. हया झऱ्याच्या प्रवाही पाण्यात मासे पकडतात, सरोवरात नाही! उत्तर पश्चिम दिशेने सरितेच्या स्वरुपात प्रवाही झालेली गडसर सरोवराची हिम संहिता पुढे ‘तुलैल’ येथे नीलम नदीच्या प्रवाहाला जाऊन मिळते. सरोवर-राक्षसामुळे कदाचित हयास ‘यमसार’ नावाने म्हणजेच यमाचे सरोवर म्हणूनही ओळखले जाते. उन्हाळ्यांच्या दिवसातही हया तळ्यांमध्ये तरंगणारे हिमनग पाहून लक्षात येते की ही अल्पाईन सरोवरे नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यापर्यंत गोठलेली असावीत!
गडसर सरोवराने मनाला भुरळ पाडली. पाऊलं पुढे पडत होती परंतु मागे वळून त्या सरोवराचे अलौकिक सौंदर्य पापण्यांमध्ये बंद करण्याचा प्रयत्न करीत होते. अगदीच स्वर्गीय अनुभव! त्या तळ्यामधून बाहेर वाहता झालेला प्रवाह दऱ्या-खोऱ्यामध्ये दिशा घेत झऱ्यांच्या रूपात कलकल नाद करीत वाहत होते. आता उतारावरूनच चालायचे होते. मी तुलनेने खूप मागे राहीले होते. माझ्या सोबत रमजान भाई होते. त्यांनी तेवढयात एक छानसं दिवा स्वप्नच पाहील जणू! अश्या हया सुंदर निसर्गरम्य ठिकाणी गरजे पुरती रहाण्या-खाण्याची सोय झाली तर! मी आणि माझी बासुरी! रोज संध्याकाळी मी इथे बांसुरी वाजवित बसेन! मला रमजानभाईंच्या कल्पनाविलासाला खरोखरच दाद द्यावी वाटली. कारण अवघा परिसरच निसर्गरम्य आणि मंत्रमुग्ध करणारा होता. आम्ही हे निसर्ग संगीत आणि त्याचे अलौकिक दृष्य स्वरुपातील वैभव पाहात पुढच्या ‘गडसर कॅम्प’ वर पोहोचलो. ह्या टप्प्यात अधून मधून मरमोथ म्हणजे मोठाल्या खारुताईचे दर्शन होत होते. आमची पायरव जाणवली की धूम ठोकत असत. आम्ही आमच्या गतीने पुढच्या कॅम्पवर पोहोचलो. अर्थातच मॅरॅथॉन ट्रेकर्सच्या दृष्टीने उशिरा पोहोचलो! मला फार गंमत वाटत असे, निसर्गाच्या सान्निध्यातून जात असताना निसर्ग सौंदर्याचे रसपान करण्याचे सोडून पुढच्या कॅम्पवर पोहोचण्यात पहिला नंबर लावण्याची लोकांना किती घाई असते! मी तर मनाशी ठाम निश्चय केला होता की, हया अद्भुत स्वर्गीय रम्य आसमंतामध्ये आकंठ बुडून जायचे! आपल्या गतीने पुढे चालत रहायचे, अगदी ‘एकला चालो रे’ हया संज्ञेत!





गडसर कॅम्प वर चहाच्या वेळेपर्यंत पोहोचलो. माझ्या ओल्या बूटांनी चांगलीच करामत केलेली होती. माझे पाय पार थकून गेले. मी कॅम्पवर पोहोचताच प्रथम पायांची काळजीपूर्वक स्वच्छता करून निवांत झाले. थोड्या फार प्रमाणात सर्वांच्या कृती आणि वर्तनातून समुद्र सपाटीपासून उंचीवर आल्याचे दृश्य परिणाम प्रतित होत होते! एका व्हॅली मध्ये गडसर कॅम्प वसवलेला होता. आजूबाजूला नदीच्या पात्रामध्ये दगडगोटे विखुरलेले होते. इथे काही अंतरावर शेफर्ड हटस् दिसत होत्या. कॅम्पलिडरने दिलेल्या सूचनेवरून लक्षात आले की, हया कॅम्पवर रात्री कडाक्याची थंडी पडते, आम्ही अगदी हवा बंद डब्यामध्ये वस्तू बंद करून ठेवाव्या त्याप्रमाणे स्वेटर, जॅकेट, कानटोपी मफ्लर अश्या सर्व गरम कपड्यांमध्ये स्वत:ला अगदी जेरबंद करून टाकलं! काय त्या थंडीची बिशाद! ओल्या झालेल्या बुटांमध्ये केलेला आजचा ट्रेक अंतराच्या आणि उंचीच्या परिमाणानुसार शारीरिक दृष्ट्या कष्टाचा असला तरी, निसर्ग सौंदर्याने ओतप्रेत भरलेला होता. ट्रेकचा अवघड टप्पा पार केल्याच्या आनंदाच्या समाधानात मी स्लीपींग बॅगमध्ये गुडूप झोपून गेले.
क्रमशः
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा