अंदाजे दहा हजार फुट उंचीपेक्षा अधिक उंचीवर आमचा गडसार कॅम्प वसलेला होता. ह्या कॅम्प वर पोहोचण्यासाठी आम्ही १३००० फुटापेक्षा अधिक उंच असणारी गडसर खिंड पार करून आलो होतो. ह्या ट्रेक मधील अधिकतम उंचीवरील खिंड! ह्या उंचीच्या गणितामुळे आपल्या शारीरिक अवस्था आणि मनोवस्थेमध्ये देखील उलथापालथ होते! विरळ होत जाणारी हवा तिची जादू नक्कीच दाखवते! एकंदरीत आमच्या ग्रुपची गतिशीलता ओळखून सकाळी लवकरच पाठवणी करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे आम्ही अगदी लवकर सकाळी उठलो. संपूर्ण गडसर व्हॅली धुक्याने व्यापली होती. गडसर कॅम्पची सकाळ अगदी बालकवींच्या कवितेप्रमाणे झाली! “शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवूनि – हर्ष निर्भरा नटली अवनी” ह्याप्रमाणे सर्वत्र धुक्याने आपले साम्राज्य प्रस्थापित केलेले होते. पाऊस अगदी खोडकरपणा करीत होता.

आमचा नाष्टा वगैरे उरकून आम्हाला पाठवणीपूर्वीच्या सूचनांसाठी रांगेत उभे केले. आमचा कॅम्पलिडर अगदी पोटतिडकीने काळजीपूर्वक पुढचा टप्पा पार करण्यास सूचना देत होता. दुर्देवाने आमच्या आधीच्या तुकडीमधील एका गृहस्थास डोंगरांवरून शेळ्या मेंढ्यांच्या वावरामुळे दगड घरंगळत येऊन आकस्मिक अपघात झाला होता आणि त्याच्या मांडीला इजा झाली होती. नशीबाने जीवावर न बेतता थोडक्यात निभावले होते.
गडसार कॅम्पच्या समोर दिसणाऱ्या खडया पहाडावर चढाई करुन त्याच्या कडेकडेने वाटचाल करायची होती. बर्फावरून पार होत त्या पहाडांवर चढायचे होते. उभा चढ असलेला टप्पा! आणि अस्मानी संकट! आम्ही निळी झबली सावरून सरसावलो! मला आज नेतृत्व करायचे होते! अर्थातच कृर्मगतीने चालणारे प्रथम! सद्दाम मागे राहीला होता, मला आज दुसर्या गाईड सोबत प्रथम चढाई करायची होती. सुरुवातीचा टप्पा जरी अवघड असला तरी पुढे तुमच्यासाठी ‘सरप्राईज’ आहे असं काहीतरी गाजर आमच्या कॅम्पलिडरने दाखविले होते! सकाळी कॅम्पच्या परिसरात धुक्यामुळे आठवलेली बालकवींची “फुलराणी” आज प्रत्यक्ष भेटीलाच येणार आहे याची कल्पनाच नव्हती!



आमची तुकडी कॅम्प लिडरच्या शुभेच्छा घेऊन रवाना झाली. मनाचा हिय्या केला, मोठे-मोठे श्वास घेऊन त्या खड्या पहाडपुरुषाला नमन करून चढू लागले. सुरुवातीच्या टप्प्यात घसरून आलेल्या बर्फावरून चालत जायचे होते. अवघी दहा मिनिटे! आणि त्या चढाईने पुरते दमविले! हृदयाची धडधड इतकी वाढली की, आता उडी मारून बाहेर येतं आहे की काय? असे वाटू लागले.
पण आता डोंगराच्या अंगा-खांदयावर हिरव्या रंगामध्ये पिवळ्या पट्ट्या कोरल्याप्रमाणे पायवाटा खेटून होत्या! अगदी एक पाऊल एका वेळेस! उजव्या बाजूला खोल दरी! मी सर्वांच्या पुढे असल्याने मागे वळून पहिल्यावर आगगाडीच्या डब्यांप्रमाणे एका मागोमाग चालणारी ट्रेकर्सची रांग दिसत होती! बराच वेळ आम्ही तसेच चालत होतो. माझे कान तीक्ष्ण होऊन आणि डोळे दूर्बिण बनून वेध घेत होते, भटक्या शेळ्या मेंढ्यांचे! कुठून एखादा दगड तर भेटीस येत नाही ना? हयाची भीती वाटत होती. आम्ही जसे उंच जाऊ लागलो तसे दरीतून धुके आमचा पाठलाग केल्याप्रमाणे वर चढून येत होते. वरच्या दिशेने जाणाऱ्या आमच्या साथीदारांकडे पहाताच असे वाटे की जणू त्या धुक्यामध्ये सर्व गुडूप होऊन पायवाट शोधावी लागत आहे. त्यातच आदल्या दिवशी झालेल्या पावसामुळे त्या पायवाटांवर चिखल माती ओली होती आणि बूटांना अगदी प्रेमाने अलिंगन देत होती. चढाई करताना सावध आणि सतर्क राहून पाऊल टाकावे लागत होते.


त्या गडद धुक्यातून आम्ही बरीच मोठी खडकाळ चढण पार केली. त्या चढणीनंतर जे दृष्य होते, ते कॅम्प लीडरने सांगितल्याप्रमाणे खरोखरच एक सरप्राइजच होते! एक परिकथेतील प्रदेश! हिरव्यागार् मिडोजवर, निळ्या वातावरणात डोलणारी फुले, सनई वाजविणारा मारुतराणा आणि त्या हिरवळीतून जाणारा रस्ता म्हणजे गुराख्याच्या पोराने मानेवर काठी टाकून डोंगरदऱ्यांमधील पायवाटांवर खुशाल मनसोक्त बागडत रहावे असा! पावलोपावली बालकवींची कविता जिवंत झाली होती! “हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे – त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती”. हिरवळीमधून जाणाऱ्या पायवाटा आणि स्वागतोत्सुक रंगीबेरंगी फुलांचे विखुरलेले गालिचे! उजव्या बाजूला पंजे रोवून उभे असल्यागत खडे पहाड आणि पायथ्याशी वाहणाऱ्या हिमनदया, त्यांच्यापासून निर्माण झालेल्या निर्झरांचे त्या दरी-खोऱ्यांमध्ये चालू असलेले अखंड पखवाज वादन, आणि आम्ही अगदी उंचीवर असूनही कानी पडणारे त्यांचे ध्रुपद-धमार! हिरवळीवर मुक्तपणे विहार करत खुशाल चरणारे पश्मीना मेंढ्यांचे कळप आणि निवांत त्यांच्या मागे असणारे बकरवाल! डोळे अगदी ३६० अंशाच्या कोनामध्ये फिरले तर स्तब्ध आणि थक्क करणारी निसर्ग चित्रे! आकाशामधील सफेद ढगांचे पुंजके हलक्या हाताने बाजूला करून मध्येच अस्मानी रंगाची झलक निसर्ग देवता दाखवित होती! तेव्हा मात्र क्षणभर असे वाटले, इथेच चित्रण केले असावे का? त्या कम्प्युटर मधील ‘विंडोज वॉल पेपर’चे!





आम्ही त्या हिरवळीच्या टेकाडांवर पहुडलो. उतरणीला सुरुवात होण्याआधी एका ठिकाणी दूर वर विशाल महाकाय पर्वतरांगा दिसत होत्या. आणि त्या पर्वतरांगांच्या झरोक्यामधून खालच्या दिशेला व्हॅली! त्या विशाल पर्वतरांगामध्ये एक पर्वतराज ढगांचा मुकुट परिधान करून बसले होते. मुख दर्शन सुध्दा देण्याच्या मनस्थितीत नव्हते बहुधा! ते पर्वतराज म्हणजे ‘नंगा’ पर्वत! म्हणजे दृष्टीक्षेपात आपल्या रूसलेल्या जुळ्या भावंडाची हद्द असावी! पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील गिलगिट -बालटिस्तानच्या हद्दीत ‘नंगा’ पर्वत येतो. अनेक अलंघ्य आणि अत्युच्च पर्वत शिखरांमध्ये नाव राखून असलेले हे नगाधिराज! आम्ही बराच वेळ धुक्याचा अंचल बाजूला होतो आहे का? ह्याची वाट पहात होतो. पण नंगा पर्वत शिखराचे सुस्पष्ट दर्शन काही झाले नाही. हया नजार्याचे जेथून दर्शन होते, तो टप्पा पार केल्यावर उतारावरून पुन्हा सखल खोऱ्यामध्ये वाटचाल करू लागलो. आणि पुन्हा आभाळ भरून आले. पावसाने नतद्रष्टपणा चालविलेलाच होता. हया टप्प्यामध्ये सद्दाम देखील फारच घाई करु लागला. अगदी सर्व दिशांना पर्वतांनी वेढलेलं हे खोरं होतं. आम्ही स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या “सातसार गली” मधून पुढे जात होतो. हे ठिकाण आर्मीच्या दृष्टीकोनातून संवेदनशील! इथे पाकिस्तानी सैन्य वा अतिरेकी कारवायांचे षडयंत्र म्हणून हल्ला झालेला होता. त्यामुळे सद्दाम आम्हाला आमचा वेग कायम राहावा यासाठी प्रोत्साहन देत होता.




सातसार म्हणजे सात तळयांचा प्रदेश! त्यांच्या परिसरातून आमच्या ‘सातसार’ कॅम्पसाईटवर पोहोचायचे होते. मला दुरूनच समोर पाण्याचे तळे दिसू लागले. तिथे आमची मंडळी दुपारचे भोजनाचा डब्बा उघडून खात बसलेली होती. आम्ही तळ्याजवळ पोहोचेपर्यंत पुन्हा धुक्याने सर्व परिसर लुप्त झाला. त्या सरोवराला वळसा घालून दगडगोटयामधून आणि मोठाले खडक आणि वाहणारे पाणी असे दुधारी आव्हान पेलत आम्ही साधारण तीनच्या सुमारास ‘सातसार’ कॅम्पसाईटवर पोहोचलो. आमचा पिच्छा पुरवित तिथेही धुके दाटून आले होते. सभोवतालचा परिसर धुक्याने अदृश्य झाला होता. गोव्याच्या श्री. नार्वेकर कॅम्प लिडरनी आमचे सर्वांचे सहर्ष स्वागत केले. सातसार कॅम्पचा अवघा परिसर चिंब झाल्यासारखा वाटत होता. त्यामुळे अक्षरश: हुडहुडी भरेल अशी थंडी होती! आम्हा मुलींसाठी राखीव ठेवलेल्या तंबूमधील साधन-सामग्री पावसाने भिजून गेली होती. किंबहुना बहुतांशी तंबूमध्ये हीच परिस्थिती होती. श्री. नार्वेकरांनी आम्हाला त्यांच्या तंबूत जागा करून दिली आणि स्वत: त्या ओलाव्यामध्ये रात्र व्यतीत केली. कॅम्प लिडर म्हणून काम करताना किती प्रसंगावधान बाळगावे लागते त्याचे सर्वोत्तम उदाहरण!




हया कॅम्पसाईटवर आम्हाला पोहोचताच सुचना मिळाल्या! आपापले ओळखपत्र हाती घेऊन आम्हा सर्व ट्रेकर्सची ओळख परेड झाली. भारतीय सैन्याचे गस्ती पथक हया भागामध्ये अत्यंत डोळ्यात तेल घालून गस्त घालत असते. केवळ ओळख पत्रच नव्हे, तर आम्हा सर्वांचा ग्रुप फोटो सैन्याच्या कॅमेरात कैद झाला. सातसार सरोवराकाठीच्या वास्तव्याचा दाखलाच मिळाला जणू! इथे येणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्स, पर्यटकांची नोंद होते. ओळखपत्र तपासणी झाल्याशिवाय ह्या परिसरातून जाता येत नाही. तीन-चार फौजीभाई आमची कागदपत्रे तपासणी करण्यास आले होते. त्यांच्या अंगावर असलेला फक्त गणवेश पाहून आम्ही शरमेने खूपच खजील झालो. आम्ही अनेक थर शरीरावर चढवून देखील थंडी वाजत होती. परंतू सैनिकांनी फक्त आणि फक्त गणवेश! आपण निवांत आणि शांत झोप घेऊ शकतो ते केवळ सैनिकांच्या महान त्यागामुळेच! हे काम नव्हे येरागबाळयाचे! आम्ही फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हया दोन दिवशीच ‘हम सब भारतीय है’ असे म्हणून देश भक्ती जागवतो! आम्ही सर्व त्या सैनिकांशी वार्तालाप करण्यास सरसावलो. एखादा जण त्यांच्या प्रांतामधील असेल तर अगदी आप्त स्वकीय असल्यासारखे आपुलकीने चौकशी करीत होते. आम्ही त्यांच्याशी हस्तांदोलन करून पुन्हा तंबू मध्ये जाऊन विसावलो.
थोड्याच वेळात धुके ओसरले आणि सभोवतालचा परिसर दिसू लागला. मोठ्या उंच खडकाळ पर्वतांच्या कुशीत आमचा कॅम्प होता. एका बाजूला चढण उतरून गेल्यावर ‘सातसार’ सरोवर होते. परंतु वेळेअभावी तिथे जाऊ शकलो नाही. आम्ही सातसार कॅम्पवर शेकोटीचा लाभ घेणं पसंत केले. आमच्या ग्रुपच्या सोबत स्वतंत्रपणे ट्रेकला आलेल्या तीन स्थानिक काश्मिरी तरुण मुलांशी ओळख झाली. उच्चशिक्षित काश्मीरी स्थानिकांच्या घरांमधील ही परदेशस्थ मुले होती. कामकाजातून सुट्टीवर आलेली असताना मायभूमीच्या निसर्गात रममाण होण्यासाठी ट्रेकला आलेली होती. परदेशात शिक्षण, नोकरी निमित्ताने स्थायिक झालेली तरीही आपल्या मायभूमीकडे असलेला त्यांचा विशेष ओढा त्यांच्या बोलण्यातून प्रतीत होत होता. त्यांच्याशी गप्पा मारताना स्थानिक काश्मिरी पाककृती, तिथला निसर्ग आणि स्थानिकांचे जनजीवन हयाविषयी माहिती झाली. तीनही मुले अत्यंत आदबशीर आणि संयमाने निखळ आनंद लुटताना दिसत होती. स्थानिकांना शेकोटी करण्यास मज्जाव नसतो. त्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवलेली होती. आम्ही सर्वजण त्या शेकोटी भोवती कोंडाळे करून उभे राहिलो. पावसाने ओलेचिंब झालेले सर्वांचे बूट-मोजे देखील शेकोटीला आले होते! त्या ऊबेने खूप बरे वाटले. गडसर ते सातसार हा टप्पा सुद्धा बऱ्यापैकी थकविणारा होता. आमची युथ हॉस्टेलची दिनचर्या उरकून आम्ही तंबूत रवाना झालो. समुद्र सपाटीपासून बऱ्यापैकी उंचीवर असणार्या आमच्या हंगामी घरामधील वास्तव्याचा सलग तिसरा दिवस! परंतु निसर्गाच्या भव्य-दिव्य वैभवाचे गारुड मनावर घट्ट रूतून बसले. त्यामुळे त्या शारीरक थकव्याची जाणीवच उरली नाही.
क्रमशः
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा