रम्य सरोवरांच्या प्रदेशात- भाग ७

सतसार कॅम्पवरुन आमचा पुढचा टप्पा होता ‘गंगाबल’ कॅम्प! आदल्या दिवशी कॅम्प लिडरने अंगुली निर्देश करून पुढच्या कॅम्पच्या दिशेने जायचा रस्ता दाखविलेला होता, तरी सकाळी कॅम्पसाईटवरुन आपल्याला पुढचा रस्ता नेमका कुठे आहे हे काही लक्षात येत नव्हते. कॅम्पच्या लगतच हिमनदीचा प्रवाह होता. तो प्रवाह पार करून समोर उंच खडकाळ पर्वतावर, मोठमोठ्या बोल्डरवरुन चढून आम्हाला जायचे होते इतके मात्र खरे!

कॅम्पवर सकाळची दैनंदिनी उरकून आम्ही सज्ज झालो. आम्ही श्री. नार्वेकरांचा निरोप घेवून सातसार कॅम्पला रामराम ठोकला. गंगाबल पास पार करुन पुन्हा आम्हाला दोन जुळ्या तलावांच्या काठी वास्तव्यास जायचे होते. आजचे अंतर कमी असले तरी चढण आणि ओबडधोबड दगड गोटे आणि खडकाळ प्रदेश हयामुळे वाटचाल जरा बिकट होती. डोंगरावर चढाई करताना डाव्या बाजूला दरी आणि वाहणाऱ्या हिमनदीचे दर्शन होत होते. वृक्षराजी सोडून वैराण पर्वतीय माथ्यावरून चालत असल्यासारखे वाटले. दरी आणि नदी दोन्ही आता नजरे आड झाले होते. नेहमी प्रमाणे मी, रमजानभाई आणि बालसुब्रमण्यम् असे पिछाडीवरच होतो. आम्ही पहिला टप्पा चढण गाठताच बालसुब्रमण्यमच्या दुखऱ्या बुटांनी अखेरचा ‘राम’ म्हटला. त्यांचे नशीब थोर की गुजरातेमधून आलेल्या कंपू पैकी एकाकडे राखीव बूटांचा एक जोड होता आणि तो त्यांच्या पायामध्ये अगदी नेहमीचा असल्यागत बसला! ते निवांत चालू लागले!

खरं तर मी जाणीवपूर्वकच मागे होते. मा‍झ्या कल्पनेपेक्षाही अत्यंत विस्मयकारक आणि रमणीय अश्या संमिश्र अनुभवांचा हा ट्रेक होता. दर दिवशी ट्रेकच्या प्रत्येक टप्प्यात निसर्ग चित्रांचा जणू वैविध्यपूर्ण कॅनव्हासच नजरेसमोर होता.  दर दिवशी आज काय वेगळे पहावयास मिळणार अशी उत्कंठा!  नंदन वनाची हयापेक्षा वेगळी व्याख्या काय असू शकेल, असा मनाला सतत भुरळ पडणारा निसर्ग! त्यामुळे हयाचा अनुभव घेताना पळापळ नकोच!

नजरेच्या टप्प्यात धुक्यात हरवलेला जझ पास

दगड आणि हायकिंग हयामुळे बऱ्यापैकी दमछाक झाल्याने वेग मंदावला. पण आता नागमोडी वळणे घेत टेकाडांवरून चालायचे होते तर कधी वितळलेल्या हिमनद्यांच्या छोटया जलस्त्रोतांना ओलांडायचे! असं करत आम्ही “जझ” पासच्या जवळ येऊन ठेपलो. मान उंचावून तिथे निर्माण झालेल्या बर्फाच्या भिंतीला ओलांडून जायचे कसे? हा विचार करेपर्यंत पुन्हा धुक्याने गारद केले! अगदी वीस-पंचवीस फूटांवरचे सुध्दा काही दिसेनासे झाले. चेहऱ्याला आणि शरीराला होणारा त्या ढगांचा किंवा धुक्याचा स्पर्श सुखावणारा होता! अगदी “जझ” पासच्या खिंडीपर्यंत धुकं दाटलेलं होतं! त्या खिंडीमध्ये पोहोचताना मागे वळून पहिल्यावर आश्चर्यकारक निसर्ग चित्र होतं! एका बाजूला रूक्ष, खडकाळ आणि वैराण वाटणारे पर्वत तर दुसरीकडे हिरवळ दाटलेली! हया रूक्ष पर्वत रांगांमध्ये जणू खोल विवरे असावीत!

धुक्यामधून धापा टाकत आम्ही खिंडीमध्ये येऊन पोहोचलो. सद्दामच्या सांगण्यांनुसार आता खिंडीच्या पलीकडे उतारच होता. आम्ही खिंडीच्या पलीकडे काय निसर्ग दृष्य असावं? हया कुतूहलाने पाहातच होतो की, शुभ्र ढगांनी अवघं आकाश व्यापून टाकले! कापूस पिंजावे तसे हे बेरके ढग दाटी करून होते. आम्ही खिंडीत पोहोचलो तेव्हा नव्याने ओळख झालेली काश्मीरी तरुण मंडळी त्यांच्या गाईडसह तिथे पोहोचली. परंतु ढगांचे अमर्याद साम्राज्य पहाताच आपण काही वेळ खिंडीतच बसून क्षणभर विश्रांती घेवूया असे त्यांनी सुचविले. अगदी तेव्हा पर्यंत त्या खिंडींच्या कड्यावरून काय नजारा अनुभवण्यास मिळेल हयाची कल्पना नव्हती. एकंदरीत आमचा संथ वेग आम्हाला पोहोचण्यास उशीर करेल आणि पाऊस आला तर भिजवून जाईल हया चिंतेत मी मग्न असतानाच खिंडीपलीकडील देखावा ढगांनी मोकळा केला. आम्ही किती उंचीवर होतो त्याची कल्पना आली.

गंगाबल आणि नंदखोल – जुळ्या सरोवरांचे निमिष मात्र दर्शन!

आम्ही जणू ढगांच्या आडून खाली व्हॅलीमधील दृश्ये पाहात आहोत आणि समोर सरळ रेषेत ‘हर मुख’ पर्वत आणि त्याच्या पायाशी गंगाबल आणि नंदखोल ही जुळी सरोवरे, हिरव्या निळ्या रंगांमध्ये चमकत होती. अगदी अचंब्यात टाकणारं, मंत्रमुग्ध करणारं दृष्य होतं! पण निमिष मात्रच! आम्ही फोटो घेईपर्यंत पुन्हा ढगांनी आक्रमण चढविले. आम्ही फोटो आणि क्षुधाशांतीचा अल्पविराम संपवून उतरणीला लागलो. अत्यंत तीव्र उतारावरून, दगडगोटयांच्या वाटेवरून खाली उतरताना फारच कसरत होत होती. आम्ही काही अंतर उतरून गेलो आणि पावसाने गाठलेच! आता मात्र पावसाचा प्रचंड राग वाटू लागला. चालणं जिकीरचं झाले. कसेबसे पुन्हा हिरव्या मेडोजमध्ये झऱ्याच्या प्रवाहा शेजारुन प्रवेश करत हिरव्या गवताळ  कुरणांची मोठी टेकाडे पार करू लागलो. गंगाबल आणि नंदखोल सरोवरांच्या जवळ पोहोचताना चढण थोडी तीव्र होत जाते. अगदी गंगाबल कॅम्पच्या जवळ येईपर्यंत धुक्याने पिच्छा सोडला नाही. कुंद वातावरणात आम्ही एका मोठ्या खडकापाशी  आलो आणि खडकाजवळून समोर हिरव्या-निळ्या रंगाच्या छटा असणारा गंगाबल सरोवर दृष्टीस पडला. पण ढगांनी इतका नाद करायचा ठरवला की, आमच्या एसएलआर कॅमेराच्या लेन्सची सुध्दा फजिती झाली. मनात विचार आला, आपल्या डोळ्यांपेक्षा अजून कुठची मोठी लेन्स् असू शकेल? थेट स्मृतिपटलांवर कोरलं गेलेलं छायाचित्र!

हिरव्यागार कुरणामधून धुक्याचा गडद अंचल ओढून लाजत मुरडत जणू अवनी आमच्या स्वागतास अवतरली होती. सातसार कॅम्पहून निघाल्यापासूनची चढउतारांवर झालेली दमछाक पार नाहीशी झाली. अतिशय विलक्षण सुंदर निसर्गाचा आविष्कार होता! मला त्या धुक्यामुळे अगदी मनाजोगती फोटोग्राफी करता आली नाही, तरी जे प्रत्यक्ष समोर होतं त्याचा अनुभव कायम स्मरणात राहणार होता. आम्ही क्षणभर ‘गंगाबल’ सरोवराचा नजारा पाहून पाऊले आमच्या अगदी हाकेच्या टप्प्यात असणाऱ्या कॅम्पसाईटकडे वळविली. काही अंतर पुढे जाताच दृष्टीस पडले ‘नंदखोल’ सरोवर! ही जुळी सरोवरे अद्भुत निसर्ग सौंदर्याने अगदी हया हिमालयीन पर्वत रांगांच्या कुशीत स्वर्गीय सौंदर्याची अनुभूति देण्यासाठी विराजित होती जणू! त्यांचा पाठीराखा ‘हरमुख पर्वत’ काश्मीरी पंडितांसाठी अत्यंत पवित्र आणि धार्मिक महत्त्व असलेले स्थान! अमरनाथ गुंफेच्या व्यतिरिक्त भगवान शंकराशी निगडीत असलेलं काश्मीर खोऱ्यामधलं अजून एक ‘भक्ती स्थान’- हरमुख! ‘हरमुख’ पर्वताच्या नावाबाबत असे सांगितले जाते की, पर्वताचे शिखर सर्व बाजूंनी समान भासते. प्रत्येक दिशेने सारखे दिसणारे म्हणजे ‘हर मुख’! हरमुख म्हणजे भगवान शिवाचे मुख! काश्मीरी हिंदूंच्या मान्यतेनुसार ‘हरमुख’ पर्वतावर भगवान शंकराचे वसतिस्थान आहे असे मानले जाते. क्वचित हयाचा ‘काश्मीरी कैलास’ म्हणून देखील उल्लेख होतो.

हरमुख पर्वताच्या पार्श्वभूमीवर त्याच्या चरणापाशीच असलेले गंगाबल सरोवर! हयामुळे हया कॅम्पसाईटचं स्थळ विशेष महत्त्चपूर्ण होतं. खरं तर ट्रेक मधला सर्वात शेवटचा टप्पा! हिंदू मान्यतेनुसार गंगाबल हे हरिद्वाराप्रमाणे पवित्र स्थल म्हणून मानले जाते. पूर्वी स्थानिक हिंदू येथे धार्मिक पूजा आणि मृत व्यक्तिच्या अस्थि विसर्जित करण्यास येत असत असे सांगितले जाते. इथे दरवर्षी तीन दिवस पारंपारिक हरमुख – गंगाबल यात्रा असते.

असंख्य मोठ्या ग्लेशिअर्स पासून हिमनद्या वितळून गंगाबल सरोवराला जाऊन मिळतात. गंगाबल सरोवरामधून छोटया झऱ्यांच्या  स्वरुपात जलधारा प्रवाही होऊन नंदखोल सरोवराला जाऊन मिळतात. नंदखोल मधून ‘वंगथ’ झऱ्याच्या स्वरुपात पुढे हया प्रवाही झालेल्या नदया सिंध नदीला जाऊन मिळतात. अश्या हया हरमुख पर्वताच्या पायथ्याशी नंदखोल सरोवराकाठी आमचा शेवटची कॅम्पसाईट होती. आम्ही कॅम्पसाईटवर अगदी चिंब होऊन पोहोचलो होतो. कॅम्पसाईटवर पोहोचताच तेथील कॅम्प लिडरनी अगदी अगत्याने आमचे स्वागत केले. तंबूमध्ये जाऊन निवांत झालो. पावसाने विराम घेतल्यावर तंबू बाहेर आलो. बऱ्यापैकी हवामान स्वच्छ आणि आल्हाददायक झाले होते. आमची संध्याकाळ खासच गेली. चहाचा कप आणि गरमागरम कांदा-भजी! अगदी श्रम परिहार झाल्यासारखे वाटले. तंबूच्या बाहेर येवून नंदखोल आणि गंगाबलच्या सानिध्यात अगदी हरमुख पर्वताच्या पायथ्याशी आल्यावर कुतूहल वाटलं ते हया ट्रेकमध्ये भेट दिलेल्या पर्वतीय सरोवरांचे! हिमनद ओघळून येताना जमिनीच्या पृष्ठभागावर दाब निर्माण होऊन विवरांसारखे खड्डे तयार होतात आणि त्या हिमाचे हे वितळून आलेले पाणी संचय होऊन स्फटिकांसारखी चमचमणारी ही निसर्ग निर्मित‍ सरोवरे म्हणजे सृष्टीच्या निर्मात्याची एक अलौकीक कारागिरी!

नंदखोल सरोवराच्या काठावरच कॅम्पसाईट असल्याने पाण्याच्या वाहत्या निर्झरांचा नाद कानाशी अगदी सलगी करीत होता. वाहत्या प्रवाहाकाठी असलेली कॅम्पसाइट आणि एक निवांत संध्याकाळ! फेरफटका मारत कॅम्पसाइटच्या पुढे नंदखोल सरोवरापाशी गेले. हरमुख पर्वताच्या शिरी ढगांनी अगदी छत्र-चामरे ढाळल्यागत आवरण केले होते. भगवान शंकराचे निवास स्थान म्हणून मान्यता पावलेला पर्वतराज, अगदी भगवान शिवाने समाधिस्थ होऊन बसावं तसा भासत होता. त्याच्या पायथ्याशी शांत नंदखोल आणि गंगाबल अशी जुळी सरोवरे! ह्या सरोवरांमधून प्रवाही झालेले निर्झर त्यांच्याच जोशात दरीखोऱ्यांमध्ये गतीशील झालेले दिसत होते. मनात सहजच आले, हरमुख-भगवान शिवाचे वसतिस्थान असेल तर त्याच्या चरणाशी त्याच्या मस्तकावरून ओघळणाऱ्या हिमाची “गंगा” हया गंगाबल सरोवराची जननी असेल का? विलक्षण अनुभूति देणारा परिसर होता. सायंकाळ दाटून येऊ लागली. हरमुख पर्वताच्या विरुद्ध दिशेला असलेल्या व्हॅली मध्ये सुंदर दृष्य दिसत होते. पर्वत रांगांवर पांघरलेल्या ढगांच्या झुली, मावळतीस दाटलेला निळा-जांभळा रंग व्हॅली मध्ये गडद होत चालला होता. माझी पावले पुन्हा कॅम्पसाइट कडे वळली. सरोवराच्या काठावर अनेक ट्रेकिंग कंपन्यांचे तंबू होते. खाजगी ट्रेकर्स  सुध्दा हया परिसरातच आपले तंबू थाटून राहिलेले होते. जणू हरमुख पर्वताच्या पायथ्याशी टुमदार गांव वसलं होतं! हया खाजगी ट्रेकर्ससोबत असलेल्या बकरवाल गाईड्सनी शेकोट्या पेटविण्याची तयारी सुरू केलेली होती आणि लोक संगीतावर त्यांची पावले थिरकत होती. लोकनृत्य, कला हा एक समाजजीवनाचा आगळा-वेगळा भाग असतो. अगदी विरंगुळ्याचे साधन असले तरी वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने हे गाईड त्यांचा दिवसभराचा शीण त्या नृत्य-गायनाच्या माध्यमातून विसर्जित करीत होते!

‘हरमुख’ आणि ‘गंगाबल’ दोन्ही स्थळांना धार्मिक महत्त्व आहे. काश्मीरी लोकांमध्ये हरमुख पर्वताबाबतची सर्वश्रुत असलेली कथा फार रोचक आहे. एकदा एका संन्यासाने भगवान शिवाच्या  दर्शनाच्या इच्छेने हरमुख पर्वताच्या शिखरावर चढाई करण्याचा सलग बारा वर्षे प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये त्याला यश आले नाही. एकदा त्या संन्यासाने हरमुख पर्वताच्या शिखरावरून एका गुर्जर मेंढपाळाला खाली येताना पाहीले. संन्यासाने त्या गुर्जराला विचारले, ‘‘तू पर्वत शिखरावर काय पाहीलेस बरं? गुर्जर उत्तरला,’’ मी माझी हरवलेली बकरी शोधण्यासाठी गेलो होतो, बकरीला शोधताना मला एक दांपत्य गायीचे दूध काढताना दिसले. नंतर त्या दांपत्याने ते दूध मानवी कंकाळामधून प्यायले. त्या दांपत्याने त्या गुर्जराला दूध पिण्यास देऊ केले, परंतु त्याने ते नाकारले. जेव्हा तो गुर्जर त्या दांपत्याचा निरोप घेऊन निघाला, तेव्हा त्या दांपत्याने त्या गुर्जराच्या कपाळाला ते दूध चोळले. हे कथन ऐकून संन्यास्याने गुर्जराच्या माथ्याचे चुंबन घेतले आणि तत्क्षणीच अंतर्धान पावला, गुर्जर चकित झाला. त्याच्या माध्यमातून भगवान शिवाने संन्यासाला मुक्ती प्रदान केली. पौराणिक कथा हया हिंदू संस्कृतीचा गाभा आहेत म्हटले तर वावगं ठरणार नाही!

मला अमरनाथ यात्रेच्या वेळी हवामान खराब झाल्याने पंचतरणीला केलेल्या मुक्कामाची प्रकर्षाने आठवण झाली आणि आज सुद्धा त्या भगवान शंकराचे वसतिस्थान मानले जाणाऱ्या हरमुख पर्वताच्या पायथ्याशी वास्तव्य करण्यास मिळाले हयाचा आनंद झाला.

क्रमशः


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

One thought on “रम्य सरोवरांच्या प्रदेशात- भाग ७

Add yours

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑