‘तुकाई टुरिझम’ हया पुण्याच्या पर्यटन संस्थेची जाहिरात वाचनात आली, आणि त्या जाहिरातीमधील एका वाक्याने मनावर चांगलंच गारूड केलं - जन्माला आल्यानंतर काही ठिकाणं पाहणं अपरिहार्य असतं! जाहिरात होती, हेमलकसा, ताडोबा आणि आनंदवनाच्या अभ्यास सहलीची! महाराष्ट्र, छत्तिसगड व आंध्रप्रदेश हयांच्या सीमेलगत खेटून आहे भामरागडचे दंडकारण्य! गडचिरोली जिल्ह्यात इंद्रावती, गोदावरी, वैनगंगा आणि प्राणहिता हया नद्यांनी वेढलेल्या परिसराच्या प्रदेशात आहे हेमलकसाचा ‘लोक बिरादरी’ प्रकल्प! पर्लकोटा, पामुलगौतमी आणि इंद्रावती नदयांच्या तीरावर श्वापदांप्रमाणे जगणाऱ्या जीवांना ‘माणूस’ म्हणून जगवण्याचे कार्य बाबा आमटेंनी ह्या भामरागडच्या हेमलकसाला सुरु केले. त्यांनी लावलेल्या समाजसेवेच्या रोपाचे रूपांतर आता मोठया वट वृक्षात झाले आहे. त्या वृक्षाच्या छायेत अनेक उपेक्षितांना सावली मिळत आहे.