अरण्यस्पर्श

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खोळंबलेले कोर्ट कामकाज नियमित सुरू झाले होते. ह्यावर्षीच्या एप्रिल महिन्यात ऊन अगदी मी म्हणत होते. मुंबईत देखील जीवाची लाही लाही करणारा उन्हाळा होता. त्याच दरम्यान ‘तुकाई टुरिझम’ हया पुण्याच्या संस्थेची जाहिरात वाचनात आली, आणि त्या जाहिरातीमधील एका वाक्याने मनावर चांगलंच गारूड केलं! ते वाक्य होते – जन्माला आल्यानंतर काही ठिकाणं पाहणं अपरिहार्य असतं! आणि ती अपरिहार्य ठिकाणं म्हणजे- आनंदवन, हेमलकसा अन् जोडीला ताडोबा! तुकाई टुरिझमने हया सहलीचा ‘एक आगळी-वेगळी अभ्यास सहल’ असा उल्लेख केलेला होता. त्यामुळे अधिकच कुतुहल निर्माण झाले! चौकशीसाठी फोन केला, समोरुन तुकाई पर्यटनचे श्री. सुरज देशमुख हयांचा प्रतिसाद, नमस्कार मॅडम! काय मदत करू शकतो? जाहिरातीबद्दल चौकशी करताच संपूर्ण माहिती दिली आणि सहलीचे माहिती पत्रक व्हाटस्अपवर पाठविले. ६ एप्रिल ते १० एप्रिल २०२२ अशी सहलीची तारीख! माझ्यासमोर खरा पेच होता तो मा‍झ्या कोर्ट कामकाजाचा, अगदी आयत्या वेळी ठरवलेला बेत! सोबत होते नुकताच ग्रेट लेकस् ट्रेकमध्ये परिचय झालेले श्री. आबा गिते आणि माझी एक वकिल मैत्रीण-जयश्री अकोलकर! एप्रिलच्या भर उन्हात नागपूर- चंद्रपूरचा दौरा म्हणजे माझ्या हया सहलीच्या बेतावर प्रचंड टीकास्त्र आदळली! पण आम्ही रणांगणात हार न मानणारे! माझी मैत्रीण माझ्यासोबत भटकंती करायला मिळणार हया एकमेव उद्देशाने सहलीला येण्यास तयार झालेली!

६ एप्रिलला आम्ही मुंबईहून संध्याकाळी सात वाजता विदर्भ एक्सप्रेसने वर्ध्याकडे निघालो. नाशिकहून आबा गीते सुध्दा त्याच ट्रेनमध्ये आम्हांला भेटले. त्यांच्या सोबत त्यांचे स्नेही श्री.पगार होते. मी बऱ्याच वर्षांनंतर ट्रेनचा प्रवास करीत होते, परंतु टू टीयर अेसी कोच आणि मैत्रिण हयामुळे रात्रभराचा प्रवास सुसह्य झाला. आम्ही सकाळी साडेसात वाजता वर्धा स्टेशनाला पोहोचलो. तिथे तुकाई टुरिझमची आमच्यासाठी नियोजित मिनी बस-टेम्पो ट्रॅव्हलर उभीच होती. आमच्या गाडीचा चालक हाच आमचा वाटाडया होता-कवडू देहारे! अखंड प्रवासात आम्ही ‘जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृती’ त्याने लीलया झेलल्या!

वर्धा स्टेशनपासूनच आमची पर्यटनास सुरुवात झाली! वर्धा स्टेशनकडून आमची गाडी थेट ‘सेवाग्राम’ आश्रमाकडे निघाली. गांधीजींचे जगाला प्रभावित करणारे नेतृत्व, विचारधारा आणि तत्वज्ञानाची बैठक कोणालाही प्रभावित करेल अशीच आहे. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि त्या दरम्यानचे गांधीजींचे सेवाग्राममधील वास्तव्य! त्यामुळे सेवाग्राम आश्रमाची भेट ही माझ्या दृष्टिकोनातून खासच होती.

वर्धा शहरापासून साधारणतः सहा किलोमीटर अंतरावर सेवाग्राम आश्रमाचा परिसर निसर्गाच्या सानिध्यात वसलेला आहे. मानवतावादाचा सतत पाठपुरावा करणाऱ्या ह्या महात्म्याचे हयाच सेवाग्राममध्ये काही कालावधीसाठी वास्तव्य होते. भारत मातेच्या स्वातंत्र्य चळवळींशी निगडीत अनेक ऐतिहासिक चर्चा सत्रे, बैठका, विचार मंथन आणि निर्णय हयाचे सेवाग्राम आश्रम साक्षीदार आहे. आणि त्याच सेवाग्राम आश्रमात आम्ही येऊन पोहोचलो.

गांधी सेवाग्राम आश्रम – वर्धा

गांधी सेवाग्राम आश्रम समिती हया संस्थेमार्फत चालवण्यात येणार्‍या आश्रमासमोरच्या उपाहार गृहाजवळ आमची टेम्पो ट्रॅव्हलर बस थांबली. सकाळचा अगदी सात्विक नाष्टा करून आम्ही सेवाग्राम आश्रम परिसरामध्ये गेलो. सेवाग्राम आश्रमाच्या परिसरात अतिशय शांतता होती. आश्रमाचा परिसर अगदी स्वच्छ आणि नीटनेटका होता. आश्रमाच्या मुख्य दरवाज्यातून प्रवेश करताच उजव्या हाताला खादीभांडार आणि पुस्तकांचे दुकान आहे. इथून पुढे संपूर्ण आश्रमाचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. मधोमध प्रांगणात असलेले विस्तीर्ण प्रार्थनास्थळ आणि त्याच्या आजूबाजूला दगडमातीची झोपडी वजा कुटीरं! आदि-निवास, बापु-कुटी, बा-कुटी, अंतिम निवास स्थान, परचुरे कुटी अशी अनेक कुटीरे  आहेत.

संपूर्ण भारत देशामध्ये ब्रिटिशांविरुध्द “भारत छोडो” आंदोलनांना जोम चढलेला होता. गांधींजीची दांडी यात्रा, मीठ सत्याग्रह असे अनेक प्रयोग त्या चळवळींचाच एक भाग होते. गांधीजींना सन १९३२ मध्ये झालेली अटक, येरवड्याचा कारावास, त्यानंतर सुटकेनंतर १२,५०० मैलांपेक्षा जास्त भारत भ्रमण आणि मानवतावादाची चळवळ हया इतिहासातील कधीही विस्मरणात न जाणाऱ्या गोष्टी आहेत. स्वातंत्र्य चळवळीच्या कालावधीमध्ये भारताच्या मध्यभागी मुख्य कार्यालय असावे आणि  ग्रामोद्योगांचा विकास आणि विस्तार व्हावा हया विचारांनी प्रेरित होऊन गांधीजींनी गावखेडयामध्ये येऊन साधे राहाणीमान पसंत केले. त्याच दरम्यान गांधीजींच्या विचाराने प्रेरित आणि प्रभावित झालेले  धडाडीचे उद्योजक श्री. जमनालाल बजाज हयांनी गांधीजींची ग्रामोद्योगांची संकल्पना उचलून धरली. जमनालाल बजाज हयांनी त्यांची वर्धा शहराजवळील मगनवाडी येथील जागा गांधीजींना दिली व त्यानंतर सेवाग्रामचा परिसर उभा केला गेला. अगदी लाकूड, दगडमातीची शेण लिंपून तयार केली गेलेली झोपडी वजा कौलारू कुटीरं म्हणजे त्या काळातील प्रसंगांचे, घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. जमनालाल बजाजांनी बापूंना दिलेल्या त्यांच्या सुंदर बागेचे आणि जमिनीचे रूपांतर सेवाग्राम आश्रमामध्ये केले गेले. सेवाग्रामच्या परिसरामध्ये आजही फार वर्षांपूर्वीचे मोठाले वृक्ष उभे आहेत.

आपण परिसरामध्ये प्रवेश करताच ‘‘आदि निवास’’ ही कुटी आणि त्याच्या समोरच्या पटांगणामधील गांधीजीनी १९३६ मध्ये लावलेल्या पिंपळाच्या झाडाखाली असलेली प्रार्थना स्थळाची जागा लक्ष वेधून घेते. ह्या प्रार्थना स्थळावर तेव्हा आणि आजही सर्वधर्मीय प्रार्थना होत असतात. हया कुटीचे नामकरण “आदि निवास” ठेवण्यामागे एक घटना आहे. एप्रिल १९३६ मध्ये गांधीजी वर्ध्याहून सेवाग्रामला चालत आले, तेव्हा येथील पेरुच्या बागेत एका पेरुच्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसले. आणि त्याच जागी पहिले कुटीर उभारले गेले-आदि निवास! आदि निवासाचे रचना-बांधकाम कसे असावे हयाबाबत गांधीजींनी काही सक्त सूचना दिल्या होत्या. त्या म्हणजे ह्या आश्रमाच्या उभारणीसाठी स्थानिक कारागीर, मूलभूत स्वरुपाचे बांधकाम आणि ह्या बांधकामासाठी मंजूर खर्च फक्त रक्कम रुपये ५००/- मात्र! १६ जून १९३६ पासून गांधीजी आदि निवासाचे रहिवासी झाले. हया आदि निवासामध्ये मोठा व्हरांडा आणि त्याच्या लगत स्नानगृह, स्वयंपाक घर आणि कुटीच्या मध्य भागात प्रशस्त मोठी खोली अशी रचना असलेले “आदि निवास” हे बापूंचे सेवाग्राम मधील पहिले वसतिस्थान होते. हया आदि निवास कुटीमध्ये बसूनच बापु त्यांचे लेखन, वाचन, चिंतन, सुत-कताई करीत असत. आदिनिवासामध्ये कस्तुरबा, बापू आणि त्यांचे इतर आश्रमार्थी देखील एकत्र रहात असत. हयाच आदि निवासामध्ये ‘चलेजाव – भारत छोडो’ चळवळीची पहिली बैठक सन १९४२ मध्ये झाल्याचे सांगीतले जाते.

सेवाग्राम आश्रमामध्ये जशी गणसंख्या वाढू लागली, तशी  बापु कुटी, बा-कुटी अश्या इतर कुटि‍रांची,  घरांची योजना आणि बांधणी केली गेली. सेवाग्राममध्ये आश्रमात जशी गर्दी वाढू लागली, तसे बापुनी ‘बापु कुटी’ मध्ये स्थलांतर केले. बापु कुटीच्या प्रवेशापाशीच सात सामाजिक अपकृत्यांची जाणीव करून देणारा फलक निदर्शनास पडतो, तो म्हणजे-

Politics without principle, Wealth without work, Commerce without Morality

Education without character, Pleasure without conscience, Science without Humanity

Worship without sacrifice

खरंच किती तथ्य आहे हया तत्त्वज्ञानामध्ये! पण आजच्या समाजाला हया तत्त्वांची काडीमात्र किंमत नाही. बापु कुटीचे खरं तर स्थळ माहात्म्यही विशेषच आहे! ही कुटी म्हणजे गांधीजींचे कमिटी रुम, दिवाणखाना, जेवणाची खोली, विश्रांतीची खोली, सर्व काही एकाच ठिकाणी! हया कुटीमध्ये बापूंच्या समवेत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या बैठका-चर्चा देखील झालेल्या असल्याबाबत नोंदी आहेत. हया कुटीमध्ये बापूंचे सर्व वैयक्तिक चीज-वस्तू, सामान जतन करून संग्रही ठेवलेल्या आहेत. ‘चलेजाव’ चळवळीची कल्पना देखील हयाच बापू कुटीमध्ये असताना गांधीजींनी मांडली व रूजू घातली. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ हयाचे किती काटेकोर पालन महात्मा गांधीजींच्या जीवनाचे भाग होते हे इथे भेट दिल्यावर प्रत्यक्ष जाणवते. महात्मा गांधीच्या जीवनकालामध्ये ज्या स्वरुपात हया कुटी होत्या, अगदी तशाच स्वरुपात त्या सदय स्थितीमध्येही राखून ठेवल्या आहेत, त्याचे जतन केले आहे. कस्तुरबांना सर्व पुरुष मंडळी समवेत आदि निवासामध्ये बापूंसोबत राहावे लागे. हया गोष्टीची जाणीव झाल्याने श्री. जमनालाल बजाज हयांनी बापूंच्या परवानगीने कस्तुरबांसाठी ‘बा-कुटी’ची योजना केली. कस्तुरबांच्या ‘बा-कुटी’ मध्ये सुध्दा त्यांच्या वस्तू संग्रही जतन केलेल्या आहेत.

महात्मा गांधी आणि कस्तुरबा ऑगस्ट १९४२ मध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या बैठकीला मुंबईत आले, कस्तुरबांनी ‘भारत छोडो’ अभियानात सहभाग घेतला आणि त्यांना बापुंसह अटक करून पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये ठेवण्यात आले. तिथेच फेब्रुवारी १९४४ मध्ये दीर्घ आजाराने कस्तुरबांचे निधन झाले.

‘बा’ कुटीच्या लगतच ‘द लास्ट रेसिडेन्स्’ किंवा ‘अंतिम निवास’ नावाची कुटी आहे. खरं तर जमनालाल बजाज हयांनी ही कुटी स्वत:साठी बांधली होती. फार कमी कालावधीसाठी श्री बजाज तिथे राहिले. त्यानंतर आश्रमार्थी ही कुटी उपयोगात आणू लागले. महात्मा गांधीचा खोकल्याचा आजार बळावल्यानंतर ते हया कुटीमध्ये राहू लागले. हया कुटी मधून सन १९४६ च्या दरम्यान गांधीजी दिल्लीला रवाना झाले आणि तिथून नौखाली येथे गेले. त्यानंतर बापू हया कुटीमध्ये परतलेच नाहीत! नथुराम गोडसे नावाच्या माथेफिरूने ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या केली. हया परिसरात परचुरे शास्त्री हयांची देखील कुटी आहे. परचुरे हे संस्कृत भाषेतील तज्ञ होते. दुर्देवाने त्यांना कुष्ठरोगाने ग्रासले. गांधीनी त्यांची सेवा-शुश्रुषा केली व त्यानंतर परचुरे शास्त्रींनी तेथील लहान मुले व प्रशिक्षणार्थींना संस्कृत विद्येचे शिक्षण दिले. हा परिसर फिरताना अगदी काही क्षणातच भारतमातेच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास नजरेसमोर तरळुन जातो. ज्या महात्म्याने अवघ्या विश्वाला मानवतेचे, सत्याग्रहाचे धडे दिले, स्वत: आयुष्यभर सत्याचे प्रयोग केले आणि एक महान नेतृत्व असलेले व्यक्तिमत्व ज्या वास्तुमध्ये  वास्तव्य करून होते, त्या वास्तुला भेट देताना गहिवरून आले. एक बॅरीस्टर माणूस अवघ्या सुखवस्तू रहाणीमानाचा त्याग करून अगदी साध्या रहाणीमानाचा आयुष्यभर पुरस्कार करतो आणि स्वत:चे आयुष्य म्हणजेच एक सत्याचा प्रयोग म्हणून जगतो!  खूपच वेगळ्या भावना मनात दाटून आल्या. सेवाग्राम आश्रमातून आमचा दौरा नागेपल्ली येथे जाणार होता. आमच्या ड्रायव्हरने जोरदार शिट्टी फुंकली. मी अगदी घाईतच तेथील खादी भांडारामध्ये खादी कपड्याची खरेदी केली आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो.

हेमलकसा – लोक बिरादरी प्रकल्प भेट

आम्ही वर्ध्याहून चंद्रपूर-बल्लारपूरमार्गे नागेपल्लीच्या दिशेने निघालो. काही व्यापार-उदीमाचे प्रकल्प नजरेस पडले. गडचिरोली जिल्ह्यामधील जंगलामधून आम्ही दिवसभर प्रवास करून सायंकाळी नागेपल्ली येथे मुक्कामास पोहोचलो. नागेपल्ली गाव म्हणजे चहुबाजूंनी जंगलानेच व्यापलेले! रस्ताभर मोहाच्या झाडांचे व त्यांच्या पिवळ्या फुलांचे आच्छादन! मोहाच्या फुलांचा सुगंध अखंड प्रवासात खरंच मोहात टाकत होता. ‘नागेपल्ली’ म्हणजे बाबा आमटेंनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीद्वारे संचलित १९७३ साली स्थापन झालेल्या लोक बिरादरी प्रकल्पाचे त्यावेळचे मुख्यालय! नागेपल्लीला हया प्रकल्पामध्येच आमच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलेली होती. श्री. जगन मचकले हयांनी आमचे हसत मुखाने स्वागत केले. जगनजी म्हणजे बाबा आमटे  यांनी ह्या प्रकल्पाची मुहुर्तमेढ उभारली तेव्हा पासूनचे स्वयंसेवक आणि विश्वस्त! प्रकल्पाच्या डॉरमेटरिजमध्ये आमची रहाण्याची व्यवस्था केलेली होती. सूर्य अस्ताला जाण्यास आला होता, तरी वातावरणामध्ये प्रचंड त्रासदायक उष्मा होता.

आम्ही प्रवासाचा शीण आणि उन्हाचा कडाका हयामुळे खूप थकून गेलो होतो. पण जगनजींनी केलेल्या स्वागतामुळे उत्साहाने अंघोळ वगैरे उरकून चहासाठी प्रकल्पाच्या प्रांगणात असलेल्या कडूनिंबाच्या झाडाखाली पारावर जमलो. चहा सोबत जगनजीनी त्यांच्या अनुभवांची शिदोरीच जणू कथेच्या स्वरुपात आमच्या समोर मोकळी केली. आम्ही त्यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या श्रीगणेशा पासूनची गोष्ट ऐकण्यात अगदी इतके तल्लीन झालो की रात्री जेवणाची वेळ झाली हे देखील कळले नाही. सहजपणे शहरामध्ये जाऊन आपल्या वैयक्तिक जीवनाचा उत्कर्ष साधता येण्यासारखी परिस्थिती असतानाही बाबा आमटेंच्या विचारांनी आणि कार्याने केवळ भारावून प्रेरित झालेल्या ह्या माणसांनी त्यांचे संपूर्ण आयुष्यच वेचून हया प्रकल्पाच्या कार्याला स्वतःला वाहून घेतलेले आहे. सहली दरम्यान आम्हाला भेट दिल्या गेलेल्या डॉ. प्रकाश आमटे हयांच्या ‘प्रकाश वाटा’ हया पुस्तकामध्ये श्री. जगनजींचा आवर्जून उल्लेख आलेला आहे. खरंतर ‘अरण्य स्पर्श’ लेखनाची सुरुवात करण्यापूर्वी मनात खूणगांठ बांधली होती की, ‘प्रकाश वाटा’ वाचल्याशिवाय लेखणीला हात लावायचा नाही! ‘प्रकाश वाटा’ आणि ‘आनंदवन प्रयोगवन’ वाचल्यानंतर पिढीजात वारसा म्हणजे काय ते जाणवते! मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे हयांनी समाज सेवेचे व्रत घेऊन त्यात स्वत:ला झोकून दिले. वकिली पेशा असलेला धनिक घराण्यातला हा माणूस कुष्ठरोगी आणि अतिमागास आदिवासी समाजाच्या समग्र विकासाचे आणि सशक्तीकरणाचे कार्य हाती घेतो काय आणि लोक बिरादरी प्रकल्पासारखे शिवधनुष्य लीलया पेलून नेतो! सन १९७३ मध्ये स्व. बाबा आमटे हयांनी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात हेमलकसा गावी ‘माडीया’ आणि ‘गोंड’ हया अत्यंत मागास आदिवासी समाजाच्या विकासाठी लोक बिरादरी प्रकल्पाची सुरुवात केली. आणि त्यांची दुसरी- तिसरी पिढी सुध्दा हया प्रकल्पाला व्रताप्रमाणे वाहून घेते, ही फार मोठी वाखाणण्यासारखी गोष्ट आहे.

जगनजींच्या कथनाप्रमाणे अगदी निरक्षर, श्वापदाप्रमाणे अर्धनग्न रहाणारी अतिमागास आदिवासी जमात, भाषेचा अडसर, कपड्यातल्या माणसांना पाहून दूरवर जंगलात पळून जाणारे हे लोक! प्रतिकूल भौगोलिक स्थान, नक्षलवादाचे भय, कोणत्याही पायाभूत सोई सुविधांचा अभाव! जगनजींनी सांगितलेल्या अश्या अनेक गोष्टींमुळे कसा असावा हा प्रकल्प? हयाबद्दल खूप कुतुहल होते. त्यातच काही वर्षांपूर्वी प्रदर्शित  झालेल्या ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो’ हया चित्रपटाच्या समीक्षण लेखांवरूनच  हेमलकसाविषयी अत्यंत कुतुहल निर्माण झालेले होते. आम्ही दुसर्‍या दिवशी नागेपल्लीहून सकाळी लवकरच हेमलकसाकडे प्रयाण केले. घनदाट जंगलामधून जाणारा रस्ता, क्वचित प्रसंगीच असलेली रहदारी आणि जिल्हा-गडचिरोली! मन साशंक होऊन विचार करू लागले, काय धारिष्ट्य आहे हया आमटे कुटुंबाचे आणि त्यांच्या सहकार्यांचेही! काही नावे ‘विख्यात’ हया प्रकारामध्ये मोडतात. नक्षलवादी कारवायांसाठी बदनाम असणारा हा जिल्हा! आणि इथे समाज सेवेचे व्रत घेऊन थाटलेला हा प्रकल्प! विचारांनी थक्क होतच आम्ही ‘हेमलकसा’ गाठलं!

महाराष्ट्र, छत्तिसगड व आंध्रप्रदेश हयांच्या सीमेलगत खेटून आहे भामरागडचे दंडकारण्य! चंद्रपूरपासून साधारणतः २०० किलोमीटर अंतरावर गडचिरोली जिल्ह्यात इंद्रावती, गोदावरी, वैनगंगा आणि प्राणहिता हया नद्यांनी वेढलेल्या परिसराच्या प्रदेशात आहे हेमलकसाचा ‘लोक बिरादरी’ प्रकल्प! पर्लकोटा, पामुलगौतमी आणि इंद्रावती नदयांच्या तीरावर श्वापदांप्रमाणे जगणाऱ्या जीवांना ‘माणूस’ म्हणून जगवण्याचे कार्य बाबा आमटेंनी सुरु केले आणि नंतर त्याची सर्व धुरा आपला मुलगा डॉ. प्रकाश बाबा आमटे व त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे हयांचेवर सोपवली. प्रकल्पाच्या सुरुवातीला २० वर्षे हेमलकसा येथे जाण्या-येण्यासाठी रस्तादेखील नव्हता. संपर्काचे कुठलेही साधन उपलब्ध नव्हते. वीज नव्हती अश्या परिस्थितीमध्ये डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी हया दांपत्याने गवताने शाकारलेल्या बांबूच्या झोपडीत संसार आणि दवाखाना उभारला!

अशिक्षित, गरिब-अर्धनग्न असे वर्षानुवर्षे जंगलांमध्ये अगदी श्वापदांप्रमाणे जगणाऱ्या माडीया, गोंड, हिलमाडीया, वतनकार व हलबी यांसारख्या अनेक जातींचे वसतिस्थान असलेला हा हेमलकसाचा प्रदेश! अत्यंत रौद्र असे निसर्गाचे स्वरूप- म्हणजे उन्हाळ्यात ४८ अंशापर्यंत भाजून काढणारे तपमान तर हिवाळ्यात अति थंडावा! पावसाळ्यात पुराच्या विळख्यात सापडून इतर जगापासून तुटून पडणारा प्रदेश! अश्या विलक्षण प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमटे दांपत्य, त्यांचे सहकारी विलास व रेणूका मनोहर, गोपाळ व प्रभा फडणीस, जगन व मुक्ता मचकले, दादा पांचाळ, बबन पांचाळ, मनोहर व संध्या येम्पलवार यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी विविध आघाड्यांवर कामे करून लोक बिरादरी प्रकल्पाचे कार्य अविरत सुरू ठेवले आहे. बाबा आमटेंनी लावलेल्या समाजसेवेच्या रोपाचे रूपांतर आता मोठया  वटवृक्षात झाले आहे. त्या वृक्षाच्या छायेत अनेक उपेक्षितांना सावली मिळत आहे.

हेमलकसाच्या लोक बिरादरी प्रकल्पाचे बोध वाक्यच फार सूचक आहे – “काम निर्माण करते, दान उद्ध्वस्त करते”. भामरागडच्या दुर्गम भागात लाज झाकण्या इतकीच वस्त्रे आणि रंगीत मणी परिधान करणाऱ्या, निरक्षरतेने आणि शोषणाने ग्रासलेल्या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू झालेल्या प्रकल्पांतर्गत आज तिथे शाळा, कॉलेज, बालवाडी, आश्रमशाळा, मुला-मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृहे स्थापन झालेले असून हया आदिवासी बांधवांची अनेक मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेली आहेत. या शाळांमधून जवळपास ३०० मुले शिक्षक, ५० पोलीस, काही वन रक्षक, काही वकिल, इंजिनिअर अश्या वेगवेगळ्या क्षेत्रांत चमकत आहेत. ज्या दवाखान्याची सुरुवात झोपडीत झाली, त्याचे रुपांतरण आता सुसज्ज इस्पितळामध्ये झालेले आहे. हया दवाखान्यामध्ये सोनोग्राफी, एक्स रे, पॅथॉलॉजी लॅब, डिलीवरी रुम, ऑपरेशन थिएटर अश्या आधुनिक सोयी आदिवासींकरिता विनामूल्य उपलब्ध आहेत. हेमलकसाचे मुख्य आकर्षण म्हणजे आमटेज् अॅनिमल पार्क- वन्य प्राण्यांचे अनाथालय आणि हया अनाथ वन्य प्राण्यांचे मायबाप- डॉ. प्रकाश आमटे! आमटेंच्या नातवंडांनी पाळीव प्राणी- वाघ म्हणून सांगावं इतके हे कुटुंब हया वन्य जीवांसोबत मैत्री करून आहेत. हेमलकसाच्या प्रकल्पावर प्रत्यक्ष डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी ताई आमटे हयांची भेट घडली आणि त्यांनी स्वत: जातीने आम्हाला प्राण्यांचे अनाथालय दाखविले. इतके महान कार्य करणारी अत्यंत साधी माणसं! डॉ. प्रकाश आमटे हे जेव्हा आम्हाला वन्य प्राण्यांच्या अनाथालयाची सैर घडवून आणत होते तेव्हा त्यांच्या व तेथील वन्यजीवांमधील प्रेमबंध पाहून आम्ही सर्वच आश्चर्य चकित झालो. आम्ही त्याचे प्रत्यक्षदर्शी उदाहरण सुध्दा पाहीले. डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांचा नातू ह्यांच्या चाहुलीने देखील तेथील वन्य जीवांना आनंद होतो आणि ते त्यांच्या जवळ धाव घेतात हे पाहून फारच कौतुक वाटले.

आज हेमलकसाच्या प्रकल्पामध्ये असलेल्या सोयी सुविधा पाहील्या तरी अद्यापही मागास असलेल्या हया प्रदेशात खूप काही करायचे आहे हया हेतूने ही माणसे सदैव कार्यरत आहेत आणि त्यांच्या हया सामाजिक योगदानाचे फलित म्हणजे अनेक राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरचे सन्मान हया ध्येयेवेडया डॉक्टर दांपत्याला दिले गेलेत. हेमलकसाच्या प्रकल्पामध्ये एक मोठी खोली त्यांचे गौरव व सन्मान पदके यांनी सजलेली आहे. लोक बिरादरी प्रकल्प म्हणजे खरोखर माडीया, गोंड आदिवासींसाठी अरण्यातील प्रकाशवाटाच आहेत. त्यांचे आशास्थान आहे. आम्ही हेमलकसा येथील स्थानिक साधन सामग्रीचा वापर करून बनविण्यात येणार्‍या वस्तूंच्या विक्री केंद्राला भेट देऊन हेमलकसाचा निरोप घेतला. आणि पुन्हा नागेपल्ली येथे आलो. दुपारच्या जेवणानंतर आम्ही ताडोबाकडे निघालो. संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी तेथे पोहोचलो.

टायगर कॅपिटल – ताडोबा

चंद्रपूर जिल्हा तेथे असलेल्या अंधारी व्याघ्र प्रकल्पाकरिता ओळखला जातो. महाराष्ट्रातील सर्वांत जुना व मोठा व्याघ्र प्रकल्प म्हणजे ताडोबा! जंगल व्यवस्थापनाच्या दृष्टीने ‘कोअर’ आणि ‘बफर’ झोन असे वन विभागाने जंगलाचे भाग केलेले असतात. वाघांचे वास्तव्य दोन्ही झोन मध्ये असले तरी ‘कोअर’ झोनमध्ये व्याघ्र भेट होण्याची संभावना अधिक असते. ताडोबामध्ये कोअर झोनमध्ये ६ आणि बफर झोनमधील १६ प्रवेशद्वारातून ताडोबा व्याघ्र प्रकल्प अथवा ताडोबा नॅशनल पार्कला भेट देता येते. आमची रहाण्याची व्यवस्था ‘टायगर रिसॉर्ट -मोहारली’मध्ये होती परंतु ‘मामला’ गेटकडून आमची जंगल सफारीची व्यवस्था करण्यात आलेली होती.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून आम्ही जंगल सफारीसाठी सकाळी ६.३० वाजताच ‘मामला गेट’वर पोहोचलो. आमच्या कंपूसाठी दोन ओपन जिप्सी तयारच होत्या. जंगलाच्या प्रवेशद्वारावरील सर्व सोपस्कार पार पाडून आम्ही जिप्सीमध्ये स्वार झालो. सकाळच्या वातावरणात जंगलाचा मंद दरवळ घेत रपेट करण्याचा आनंद सुध्दा वेगळाच होता. मी जिम कॉर्बेट, दांडेली, बंदीपूर, शिवपुरी, गीर अश्या अनेक जंगल सफारी केलेल्या आहेत. पण जंगलाच्या राजाचे दर्शन हा एक अलभ्य लाभ असतो. येथील आदिवासी समाजामध्ये ‘ताडोबा’ हे त्यांच्या देवाचे नाव आहे. हा प्रकल्प जिथे आहे तिथे अंधारी नदी वाहते. म्हणून हया प्रकल्पाला ‘ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान’ म्हणून संबोधले जाते. साधारण ६२६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हे राष्ट्रीय उद्यान विस्तारलेले आहे. ऑक्टोबर ते जून हया कालावधीत पर्यटकांसाठी हा व्याघ्र प्रकल्प भेटीसाठी खुला असतो. ताडोबा व्याघ्र प्रकल्प असला तरी घनदाट जंगलामुळे इतर वन्यजीव सुध्दा आढळतात. जंगलामध्ये साग, हिरडा, तेंदू, अर्जून, महुआ अश्या वृक्षाची रेलचेल आहे.

ताडोबाचे जंगल वैभव

आम्ही अगदी जिप्सीमध्ये सरसावून डोळ्यांचे भिंग करून बसलो होतो. पण बहुधा स्वारी खूष नव्हती आमच्यावर! चार तास जंगल पालथं घातलं तेव्हा महाराजांनी पाठमोरे दर्शन दिले! पण काय रूबाब! वाघोबा महाराज त्यांची शतपावली करीत निघून जाईपर्यंत आम्ही त्यांना पाठमोरे पाहत राहिलो! तिथून आमची जिप्सी जसे आमच्या चालकाला कळवले जाई तसे जंगलाच्या रस्त्यावरून सर्व व्याघ्र कुटुंबांच्या दर्शनासाठी फिरत राहिली! आम्ही एक पाणवठ्याच्या जवळ बराच वेळ थांबलो. खरंतरं गाडीमधून खाली उतरण्यास परवानगी नसते. पण आम्ही तिथे थांबलो. तिथे झाडावर मचाण बांधलेले होते. ह्या ठिकाणांवरून खूप पक्षी दिसले. पलीकडच्या तीरावर हरिणांचे कुटुंबच बागडत होते. मा‍झ्या कॅमेराने विलक्षण दृष्य टिपले, दोन पक्षी एका सर्पाची शिकार करण्यास टपून बसले होते! आम्ही जंगल सफारीमध्ये छान रमलो! जंगल भेटीनंतर पुन्हा रिसोर्टवर येवून आनंदवनाकडे निघण्याची लगबग चालू झाली. दुपारचे जेवण उरकून आम्ही आनंदवनाकडे निघालो. संध्याकाळी आनंदवनात पोहोचलो.

आनंदवन – प्रयोगवन!

‘आनंदवन’ म्हणजे स्वर्गीय बाबा आमटे हयांनी समाजसेवेचे जे व्रत हाती घेतले त्याचे मूर्त स्वरुप! खरं तर बाबा आमटे हयांनी कुष्टरोगांने पिडीत लोकांच्या पुनर्वसनासाठी चंद्रपूर जवळील वरोरा गावात महारोगी सेवा समितीची स्थापना केली. त्यानंतर सरकारने समितीला पन्नास एकर जमीन दिली, त्यावर आनंदवन वसविले आहे. परंतु आनंदवन म्हणजे केवळ कुष्टरोगी निर्मूलन केंद्र नसून समाजातील अवघ्या उपेक्षित, अंध-अपंग, कर्णबधिर आणि परिस्थिीतीने पिचलेल्या घटकांचे हक्काचे माहेरघर! समाजाने नाकारलेल्या सामान्य माणसांच्या हाताने आज आनंदवनामध्ये शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार अश्या विविध क्षेत्रात नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम आंनदवनामध्ये उभं राहिलेलं दिसत आहे.

आम्हांला आनंदवनामधील एका तरुण स्वयंसेविकेने संपूर्ण प्रकल्पाची माहिती देत संपूर्ण परिसर भेट घडवून आणली. आंनदवनामध्ये प्रवेश करताच आनंद निकेतन कॉलेज दिसते, दुसऱ्या बाजूला कृषी कॉलेज आहे. पुढे गेल्यावर कुष्ठरुग्णांचे हॉस्पिटल, जनरल हॉस्पिटल, वृध्द कुष्ठ रुग्णांसाठी “स्नेहसावली संकुल”, आनंदवन ग्रामपंचायतीचे कार्यालय, डेअरी असे पुढे जात महारोगी सेवा समितीचे कार्यालय, कार्यकर्त्यांचे निवास स्थान, अतिथी निवास, वर्कशॉप असा प्रचंड मोठा व्याप ह्या आनंदवनात नजरेस पडतो. आनंदवनामधील वर्कशॉप्समध्ये हातमागावरील वस्तू, सतरंज्या, उत्तम प्रतीचे कापडाचे उत्पादन करणाऱ्या पॉवरलूमस, हॅन्डमेड, क्राफ्टेड वस्तू विक्रीस आणि प्रदर्शनी ठेवल्या आहेत. त्यामध्ये हॅन्डमेड पेपरपासून किंवा टाकाऊ वस्तूंपासून बनविलेले शुभेच्छा कार्ड, पाकिटे, भिंतीवरील चित्रे अश्या बऱ्याच वस्तुंचा समावेश आहे. हया सुंदर कलाकृती बनविणारे हे हात मात्र समाजाने नाकारलेल्या पिडीतांचे आहेत! स्वत:च्या वाटेला आलेले शारीरिक आणि मानसिक दु:ख विसरून जगाला आनंद देण्याचे काम अर्थाअर्थी आंनदवनात चालू आहे.

आनंदवनाचा फेरफटका करताना एक विशेष बाब कळली आणि त्याचे खूप कौतुकही वाटले. आंनदवन आणि सोमनाथ येथे हे बांधव अनेक एकरांवर शेती करतात. वर्षातून तीन वेळा इथे हरतर्‍हेची पिके घेतली जातात. भात, गहू, ज्वारी, बाजरी, हळद, कांदा, उस, भाज्या, फळं सगळं काही! थोडक्यात आंनदवन, सोमनाथ व हेमलकसा हया प्रकल्पांना बाहेरून धान्य- किराणा आणावे लागत नाही. त्यांची शिधा तेच निर्माण करतात. हे प्रकल्प म्हणजे जणू स्वयंपूर्ण खेड्यात वसवविलेल्या वसाहती आहेत! आनंदवनामध्ये रोज लागणारा स्वयंपाकाचा गॅस (इंधन) हे देखील इथेच बायोगॅस प्लांटमध्ये तयार होतो. आनंदवन म्हणजे खरोखरच प्रयोगवन आहे! बाबा आमटेंनी पाहिलेलं एक स्वप्न मूर्त स्वरुपात आणून ते फुलविण्याचे, बहरविण्याचे, जोपासण्याचे काम हया आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ प्रकल्पामध्ये त्यांची पिढी करत आहे! अपार कष्ट आणि नाविन्यपूर्ण प्रयोग यांच्या बळावर बाबा आमटे यांचे मानवमुक्तीचे स्वप्न साकारणाऱ्या ध्येयवेड्या लोकांची ही नगरी आहे! आम्हांला आनंदवनाचा परिसर फिरून झाल्यानंतर अंध आणि विकलांग कलाकारांच्या ऑर्केस्ट्रा आणि संगीत कलागुणांनी अगदी मंत्र मुग्ध केले. आमची संध्याकाळ संगीतमय झाली.

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरच आम्ही आनंदवनाचा निरोप घेण्याआधी बाबा आमटे, साधनाताई आणि त्यांची नात शीतल जिथे चिरनिद्रा घेत पहुडलेत त्या स्मारकाला भेट दिली. तिथेच बाबा आमटेंची ‘भारत जोडो’ अभियानामध्ये वापरलेली बस शेडमध्ये आठवणीखातर उभी दिसते. पाठीच्या दुखण्यामुळे बाबा आमटे बऱ्याचवेळी झोपून प्रवास करीत असत. त्यासाठी हया बसचा वापर केला जात असे.

दुर्गम आणि प्रतिकूल परिस्थितीमधील अगदी घनदाट जंगलाचा परिसर! कोणत्याही आधुनिक साधनांची कुमक उपलब्ध नाही अश्या परिस्थितीत सुरू झालेले हे प्रकल्प! आज वाहनांनी सहज सुलभरित्या ह्या स्थळांना भेट देता येत असली, तरी ह्या प्रकल्पांची मुहुर्तमेढ रोवली गेली तेव्हा खरोखरीच निबिड अरण्याचा भाग असलेले हे प्रकल्प आज आदिवासींच्या स्मित हास्याने सजले आहेत! आजही हेमलकसाचा परिसर जंगलानी व्यापलेला आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर ह्या जिल्ह्यांमधील हे प्रकल्प म्हणजे समाजातील उपेक्षितांचे खरोखरच आनंदवन आहेत. हेमलकसा, आनंदवन आणि सोबत ताडोबा म्हणजे खऱ्या अर्थी अरण्यस्पर्श सहल झाली.

शून्य मैलावर असलेली संत्रा नगरी – नागपूर!

आम्ही नाष्टा उरकून आनंदवनाचा निरोप घेतला आणि महाराष्ट्राच्या विदर्भ विभागात उपराजधानी असलेल्या नागपूरकडे प्रयाण केले. महाराष्ट्र राज्यात तिसरे मोठे शहर म्हणून मानांकन मिळविणारे नागपूर भौगोलिकरित्या देशाच्या मध्यभागी येते. भारताचा शून्य मैलाचा दगड ह्याच शहरात आहे. अगदी दहाव्या शतकाच्या इतिहासाशी संबंध सांगणार्‍या ह्या शहरावर अनेक सत्तांतरे झाली. इ. स. १८१७ मध्ये सीताबर्डीच्या लढाई मध्ये मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी नागपूरचा ताबा घेतला.  इ. स. १८६१ मध्ये नागपूर सेंट्रल प्रोविन्सेस आणि बेरारची राजधानी झाली. इ.स. १८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेल्वे मार्ग विकसित केला आणि नागपूर शहरातून पहिली आगगाडी निघाली. नाग नदीच्या किनार्‍यावर वसवलेले म्हणून ‘नागपूर’ नाव धारण करणारे हे शहर ‘संत्रा नगरी’ म्हणूनही प्रसिध्द आहे. नागपूरची हल्दिराम स्वीटसची ‘संत्रा बर्फी’ अगदी जगप्रसिध्द झालेली आहे.

हल्दीराम स्वीटस – नागपुर रेल्वे स्टेशन

नागपूरामध्ये प्रवेश करताक्षणी नागपूरचा झालेला कायापालट नजरेस पडतो. उड्डाण पूल, त्याला समांतर धावणाऱ्या मेट्रो नजरेतून सुटत नाहीत. आम्ही आमच्या ग्रुपमधील बडोदयाहून आलेल्या काही सदस्यांना सोडण्यासाठी नागपूर रेल्वे स्टेशनामध्ये गाडी वळवली. स्वातंत्र्य पूर्व काळात अंदाजे ९५ वर्षापेक्षा जुने असलेले, ब्रिटिश राजवटीच्या कालावधीत सुरू झालेले हे नागपूर रेल्वे स्थानक! मध्यवर्ती ठिकाण असल्याने देशाच्या उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्वेकडे जाणाऱ्या बहुतांशी रेल्वे गाड्या येथून ये-जा करतात.

नागपूर स्टेशनाकडून आम्ही ‘दीक्षाभूमी’कडे गेलो. दीक्षाभूमी म्हणजे सन १९५६ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायींसह बौद्ध धर्माची दिक्षा घेतली ते ठिकाण! जागतिक इतिहासामधील सर्वांत मोठे सामूहिक धर्मांतर! दीक्षाभूमीवर १२० फूट उंचीचा भव्य स्तूप उभारलेला आहे. हयाला धम्मचक्र स्तूप देखील म्हटले जाते. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या बावीस प्रतिज्ञांचा स्तंभ सुध्दा उभारला आहे. बोधीवृक्ष सुध्दा लावलेला आहे. स्तूपामधील आतील भागामध्ये बुध्द मूर्ती आणि आंबेडकरांचा अस्थीकलश ठेवलेला आहे. अवघ्या विश्वाला त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारे धार्मिक आणि ऐतिहासिक स्मारक म्हणून दीक्षाभूमीचा उल्लेख केला जातो. दीक्षाभूमी येथे दरवर्षी १४ ऑक्टोबर हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून उत्साहाने साजरा केला जातो. दीक्षाभूमी येथील शिल्पांमध्ये घटनाकार बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान डॉ. राजेंद्र प्रसादांना सुर्पूद करतानाचा देखावा आहे. तसेच प्रवेश द्वाराकडील मोठ्या फलकावर भारतीय संविधानाची प्रस्तावना (preamble) लक्ष वेधून घेते.

दीक्षाभूमी – नागपूर

दीक्षाभूमीच्या स्थल दर्शनाने आमची सहल संपन्न झाली. हल्दीराम स्वीटसच्या मोठया दुकानामध्ये ड्रायव्हरने मिठाई खरेदीसाठी गाडी थांबवली. आम्ही सर्वांनी ‘संत्राबर्फी’ ची अगदी मनमुराद खरेदी केली आणि परस्परांचा निरोप घेतला. मी आणि माझी मैत्रीण अकोलकर नागपूर विमानतळावर गेलो. आणि आम्हाला मुंबई-परतीचे वेध लागले. विमान मुंबईला पोहोचेपर्यन्त मनात त्या अरण्यातील प्रकाशवाटा रुंजी घालत होत्या आणि सामान्य असून कर्तुत्वाने असामान्य झालेल्या माणसांच्या ध्येयवेड्या कथांनी समाजासाठी काहीतरी करत राहण्याची उर्मी दिली!


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑