कवितेतला पाऊस

कवितेतला पाऊस
आला ग अंगणी
दारी गुलमोहराचा बहर
करी वळीवाची बोलवणी ||

कवितेतला पाऊस 
आला ग अंगणी 
घन गरजत गरजत
सये माहेराला आषाढ पागोळी ||

कवितेतला पाऊस 
आला ग अंगणी 
रानफुलांचा मंद गंध
अन पाखरांची पाऊस गाणी ||

कवितेतला पाऊस 
आला माझ्या अंगणी 
रिमझिम रिमझिम 
ऋतुस्नात झाली ही अवनी ||

कवितेतला पाऊस 
आला ग अंगणी 
बीज अंकुरत पोटी 
गर्भार धरित्री माय मोठी ||

कवितेतला पाऊस 
आला ग अंगणी 
सौभाग्यचुडा ल्याली नवी नवती 
हिरवे गोंदण लवलवति पाती ||

कवितेतला पाऊस 
आला ग अंगणी 
रंगारंगाने ओटभरण 
सयासूनांना ग बोलावणं||

कवितेतला पाऊस 
आला ग अंगणी 
ऊन केशराचे सोनपिवळे 
आणिक सोबत श्रावणसरी ||

कवितेतला पाऊस 
आला ग अंगणी 
वारुळाची पंचीम 
झिम्मा फुगडी अन दंग गाणी ||

कवितेतला पाऊस 
कधी धुंद कधी बेबंद 
धावे वेडे मन जसे 
तोडूनिया पाशबंध ||
  

Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑