किल्ले हातगडसह सापुतारा

मे महिन्याची दिवाणी कोर्टाला असलेली उन्हाळी सुट्टी म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असते.  उन्हाळी सुट्टी म्हणजे बहुतांशी वेळा मोठ्या पल्ल्याच्या प्रवासाची आखणी होते किंवा हिमालय भेट! हया वर्षी अधेमधे काही दौरे झाल्यामुळे आणि कामाच्या व्यापामुळे ‘मे’ महिन्याच्या सुट्टीचे मनासारखे व्यवस्थापन झाले नाही. आणि मग अगदी लॉटरी लागल्याप्रमाणे मा‍झ्या क्लब महिंद्र ‘हातगड’ रिसोर्टचे अगदी आयत्यावेळी मिळालेले बूकिंग खरोखरच सुखावून गेले. सोबत आई-वडि‍लांना घेऊन जायचे म्हणजे स्वत:च्या गाडीतून प्रवास करता येईल इतकाच मर्यादित टप्पा हवा! नेमका अंतराचा देखील योग जुळून आला. मुंबई पासून अगदी काही तासांच्या अंतरावर महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमा जिथे मिळतात त्याच ठिकाणी ‘क्लब महिन्द्र-हातगड ’ रिसोर्ट आहे. त्यामुळे काही तासांचा प्रवास त्यांनाही सुसह्य झाला.

रविवारी २९ मे २०२२ रोजी सकाळी आम्ही लवकरच नाशिकच्या दिशेने निघालो. पनवेल-हातगड हा अंदाजे २५६ किलोमीटरचा टप्पा होता. आम्ही ईगतपुरीजवळ येताच नाशिक स्थित माझे ज्येष्ठ स्नेही श्री. आबा गीतेना फोन करुन जेवणासाठी चांगले हॉटेल कोणते हयाची विचारणा केली. रविवार असल्याने जेवणाचा बेत अगदी खासच हवा! ते सद्गृहस्थ स्वत:च गाडी काढून आम्हाला भेटण्यास आले. गंगापूर रोडवरील ‘दिवट्या बुधल्या वाडा’ नावाच्या हॉटेलवर घेऊन आले.

नाशिक मधील गंगापूर रोडवर असलेले दिवट्या बुधल्या वाडा हॉटेल

हॉटेलचे नाव गंमतीशीर असले तरी मांसाहारी जेवणासाठी हॉटेल प्रसिद्ध असल्याचे आबांनी सांगीतले. आमचा प्रवासातही रविवार साजरा झाला! पण आबा त्यांचेकडे घरी काही विशेष कार्यक्रम असल्याने आमच्यासोबत जेवण न करताच निघाले. आम्ही लज्जतदार मटणथाळी आणि साजुक तुपामधील अळणी पुलावाचा मनमुराद आस्वाद घेवून पुढील प्रवासाला निघालो. अगदी वेळेत जेवण झाल्याने आमच्या डॅडींची स्वारी देखील खुष झाली. नाशिकला गेल्यास अथवा नाशिकहून जाण्याचा योग असेल आाणि आमच्यासारखी खवय्याची रसना असेल तर गंगापूररोडवरील  ‘दिवट्या बुधल्या वाडा’ हॉटेलला भेट द्यायला काही हरकत नाही. नाशिक शहरामध्ये गेल्यामुळे आमच्या सलग प्रवासाला थोडा खंड पडला. नाशिकहून आम्ही ओझर-पिंपळगांव मार्गे हातगड गावात साधारणतः दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पोहोचलो.

क्लब महिन्द्राचे रिसॉर्ट अगदी मुख्य नाशिक-सापुतारा महामार्गावरच आहे. नाशिक- सापुतारा महामार्गावर हातगडवाडी नावाचे एक छोटेखानी गाव आहे. क्लब महिन्द्राचे “हातगड रिसोर्ट” ह्या गावामध्येच आहे. अगदी काही हजारांच्या संख्येत लोकसंख्या असलेले, महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर नाशिक जिल्ह्यामधील सुरगणा प्रांतांत असलेले लहान गाव हातगडाच्या पायथ्याशीच वसलेले आहे. किंबहुना मुख्य ररत्यालगत रिसोर्ट आणि त्यामागे पसरलेले छोटेखानी हातगडवाडी गाव! आणि त्यांचा पाठीराखा म्हणजे हातगड  किल्ला!

आम्ही रिसोर्ट परिसरात प्रवेश करताच आमचे नोंदणी, ओळखपत्र वगैरेच्या औपचारिक गोष्टी आटोपून आम्ही आमची खोली ताब्यात घेतली. खोलीचा परिसर आणि आत प्रवेश करताच प्रवासाचा शीण दूर पळाला आणि मन प्रसन्न झाले. त्याही पेक्षा तेथील अनपेक्षित थंड, आल्हाददायक हवेने मी एकदमच सुखावले. मुंबईच्या निथळणाऱ्या घामाच्या धारांपासून तीन दिवस तरी सुटका झाल्याचा आनंद झाला. एैसपैस दिवाण खान्याची खोली, बेडरुम अशी आमच्या खोलीची रचना होती. आरामात चार माणसांना राहता येईल अशी! बोनस म्हणजे जुजबी किचन प्लॅटफॉर्म,  क्रॉकरी आणि मायक्रोवेव्ह ओव्हन! आता तीन दिवसासाठीचे आमचे घर!

दिवसभरच्या प्रवासाने थोडा फार शीण आलेला होताच! आणि ही सुट्टी केवळ विश्रांतीची होती. त्यामुळे जराही घाई गडबड नको असे मनाला बजावून टाकले. थोडावेळ विश्रांती घेतली आणि अमृततुल्य चहाचा घोट घेऊन रिसोर्टची रेकी करण्यासाठी रुमच्या बाहेर पडले. आमच्या खोलीला छान पैकी व्हरांडा होता आणि समोर वरच्या दिशेला रिसोर्टचे गार्डन लॉन, खेळण्यासाठी काही लहान मुलांना अॅडव्हेंचर अॅक्टीव्हीटीज साठी सोय केलेली होती. आमच्या खोलीच्या व्हरांडयासमोरूनच संपूर्ण रिसोर्टला फेरफटका मारता येईल असा ‘वॉक वे’ होता. संध्याकाळची अगदी आल्हाददायक, थंड हवा आणि शिस्तीने निगराणी राखलेला सभोवतालचा बागेचा परिसर पाहून मन प्रफुल्लित झाले. आमच्या खोल्या ज्या इमारतीमध्ये होत्या तिथून रस्ता थेट स्विमिंग पूल कडे जात होता. तिथे एका मोठया भिंतीवर ‘वारली’ चित्रकलेने सुंदर चित्रे काढून सजविलेले होते. अनेक रंगीबेरंगी चिनी गुलाबांची फुले कुंडयांमधून हसत होती. तिथेच सोव्हेनिअरचे दुकान आणि ‘स्पा’ सेंटर पण होते. त्याच्या मागच्या बाजूला स्वीमिंग पूल! तिथून पुन्हा मागे वळून मी माझा मोर्चा लॉनच्या दिशेला वळविला. संध्याकाळच्या वेळी मोकळ्या पायांनी लॉनवर चालण्याचा आनंद अगदी सुखद असतो! संपूर्ण रिसोर्टचा फेरफटका झाल्यावर त्या लॉनवर निवांत बसले. रिसॉर्टच्या प्रत्येक कोपर्‍यातून हातगड किल्ल्याचे दर्शन होत होते. आल्हाददायक हवा, रम्य परिसर हयामुळे खूप छान वाटले.

रिसॉर्टची रेकी करून झाल्यावर, आजूबाजूला काय आहे ह्याचा अंदाज घेण्यासाठी रिसॉर्टच्या बाहेर आले आणि पुढच्या दिशेने काही अंतर चालत गेले. हया गावापासून अगदी सात किलोमीटर अंतरावर गुजरातमधील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण ‘सापुतारा’ आहे. विशेष म्हणजे सापुतारा गुजरात राज्यामध्ये येते, तिथे मद्य विक्रीस बंदी असल्याने तेथील पर्यटक गुजरातची सीमा ओलांडून हातगड  येथील दुकानामध्ये ‘सोमरस’ खरेदी करण्यासाठी येताना दिसत होते.

मोजक्या दिवसांची सुट्टी, अगदी आल्हाददायक हवा आणि निवांतपणा ह्यामुळे स्थल दर्शन अगदी आटोपशीर ठेवले होते! आम्ही दुसर्‍या दिवशी सापुतारा स्थल दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेले सापुतारा हे एक छोटे थंड हवेचे ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून १००० मीटर्सच्या उंचीवर असलेल्या सापुताऱ्याचे हवामान सर्व साधारणपणे संपूर्ण वर्षभर आल्हाददायकच असते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयातही येथील वातावरण अगदीच आल्हाददायक होते. सोमवार असल्याने आम्ही सकाळी सापुतारा येथे प्रथम नागेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी गेलो. सापुतारा तलावाच्या दक्षिण तीरावर हे नागेश्वर महादेवाचे मंदीर आहे. मंदिराचा परिसर अत्यंत शांत आणि सुंदर आहे. मंदिरामध्ये काळ्या ग्रेनाइट दगडाचे शिवलिंग असून मंदिराच्या छताला कोरीव काम केलेले आहे. मंदिरामध्ये महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही तिथे काही क्षण निवांत बसलो. खूपच प्रसन्न वाटले.

सापुतारा शहराचा फेरफटका मारला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे थंड हवेचे ठिकाण असूनही पर्यटकांची म्हणावी इतकी गर्दी नव्हती. पण ही गोष्ट अगदी आमच्या पथ्यावरच पडली. त्यामुळे कुठेही धक्काबुक्की, आरडाओरडा नाही आणि गोंगाट नाही! सापुतारा तलावामध्ये पर्यटकांसाठी बोटींगची सुध्दा सोय केलेली आहे. सापुतारा थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द असल्याने इथे पर्यटनाच्या दृष्टीकोनातून पॅराग्लायडींग, रोपवे यासारख्या गोष्टींनी पर्यटकांच्या आनंदासाठी सांपुतारा सुसज्ज आहे. सापुतारा शहराचा अगदी पर्यटनाच्या दृष्टीकोनातूनच विकास करीत असल्याचे तेथील वाढलेली हॉटेल्स, रिसोर्ट, स्पा/आयुर्वेद पंचकर्म सेंटर हया बाबींतून सुस्पष्ट होत होते. सापुतारा शहर दर्शनानंतर आम्ही हातगडला परतताना ‘अमृत आयुर्वेद’ ह्या गुजरात टुरिझम पुरस्कृत आयुर्वेद उपचार केंद्रास भेट दिली. इथे केरळ आयुर्वेद उपचार पद्धतीनुसार चिकित्सा आणि निदान करून योग्य ते पंचकर्म – उपचार केले जातात. त्यासाठी येथे तज्ञ डॉक्टर्स नियुक्त केलेले आहेत. OPD आणि IPD सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. अमृत आयुर्वेद केंद्रात त्यांचे आयुर्वेदिक मेडिकल स्टोर सुद्धा आहे. ह्या परिसराची जागा अतिशय मोक्याची आणि निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने आयुर्वेदिक उपचार निश्चितच परिणाम दाखवतील ह्याबाबत कोणतीच संदिग्धता नाही! येथील आल्हाददायक हवा मात्र नक्कीच अनुभवण्यासारखी आहे. बऱ्यापैकी वृक्षराजी आणि सह्याद्रीला खेटूनच असलेले हे शहर म्हणूनच छोटेखानी थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.

सापुताऱ्यामध्ये आदिवासी संग्रहालय, आर्ट गॅलरी आहे. तिथे आदिवासींच्या कलाकृती प्रदर्शनी ठेवलेल्या असतात. तसेच विक्रीसाठी देखील उपलब्ध असतात. सांपुतारा फार मोठे शहर नाही. अगदी एका दिवसाच्या भटकंतीमध्ये स्थल दर्शन पूर्ण होते. आम्ही अगदी दुपारपर्यंत रमत-गमत सापुतारा शहराचा बदलता चेहरामोहरा टिपत पुन्हा आमचा मोर्चा क्लब महिंद्र रिसोर्टकडे वळविला. सोमवारचा उपवास असल्याने गुजराती थाळी खाण्याचा संध्याकाळी मोह अनावर झाला आणि आम्ही रात्रीचे जेवणासाठी पुन्हा सापुतारा येथे आलो! आम्ही जेवणासाठी गुजरात राज्यात आणि झोपण्यासाठी पुन्हा रिसोर्टवर महाराष्ट्र राज्यात अशी गंमत-जंमत करीत राहीलो!

सापुताऱ्याबाबत अजून एक विशेष बाब म्हणजे, ह्या जिल्ह्याचेच नाव असलेला “डांग” आदिवासी समाज इथे आहे. हा जिल्हा अगदी महाराष्टाच्या सीमेलगत असल्याने डांगी समाजाची बोली भाषा अगदी मराठी भाषेशी मिळती जुळती आहे. डांग समाजाचे लोकनृत्य प्रसिद्ध आहे. त्यांच्या लोक नृत्यांमध्ये धरणीमातेशी आणि निसर्गाशी असलेल्या नात्याप्रती हा समाज कृतज्ञता व्यक्त करीत असतो.  क्लब महिंद्रा हातगड  रिसॉर्टमध्ये आलेल्या पाहुण्यांसाठी  आठवड्यातून एकदा ह्या लोकनृत्याचे आयोजन केले जाते. एक प्रकारे आपल्या वैविध्यपूर्ण  आणि प्राचीन लोककला आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करून दुर्गम भागातील ह्या मागास समाजाला मदतीचा हात दिल्यासारखेच आहे.

गिरीदुर्ग – हातगड

सुट्टीचा तिसरा दिवस! सकाळी लवकरच उठून साडेसातच्या सुमारास गिरी दुर्ग-हातगड  मोहिमेवर निघालो. गडावर जाण्यासाठी पायऱ्या जिथून सुरु होतात तिथवर वाहन जात असल्याने गाडीने तिथे जाणे पसंत केले. क्लब महिंद्रा रिसॉर्टचे नाव ‘हातगड  क्लब’ ठेवले आहे हयात काही वावगे नाही. रिसॉर्ट गडाच्या अगदीच पायथ्याशी आहे. गडाच्या प्रवेशाजवळ भगवा झेंडा फडकत होता आणि हातगड  किल्ल्याचा फलक लावलेला होता. अत्यंत भग्न झालेल्या अवस्थेत हा गिरीदुर्ग प्राचीन इतिहासाची ओळख घेवून आजही उभा आहे. हया गडावर अत्यंत प्राचीन शिलालेख सापडल्याचं सांगीतले जाते.

महाराष्ट्र हा खरतर गडकिल्ल्यांचाच प्रदेश! नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगणा नावाचे तालुक्याचे गाव आहे. सह्याद्रीच्या पूर्व भागातील “सातमाळ” पर्वतरांगांची सुरुवात ह्याच तालुक्यापासून होते. ह्याच रांगेच्या उपशाखेवर हा छोटासा किल्ला आहे – हातगड ! हातगडवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव. गावातून किल्ल्यावर गेल्यास काही जुने अवशेष पहावयास मिळतात. आम्ही गाडीने थेट गडावर गेलो. जिथे पायऱ्या सुरू होतात तिथे गाडी उभी करून आम्ही गडावर जाणाऱ्या पायऱ्यांची वाट धरली.

काही पायऱ्या चढून गेल्यावर किल्ल्याकडे जाताना कातळातील चार दरवाजे पार करून जावे लागतात. पहिल्या दरवाज्याच्या अलीकडे उजव्या बाजूला कातळात खोदलेले पाण्याचे टाके आहे. इथेच कातळात कोरलेली हनुमानाची शेंदूर लावलेली मूर्ती नजरेस पडते.  ह्या ठिकाणी एक गुहेसारखा भाग देखील आहे. परंतु प्रचंड प्रमाणात पडझड झालेली असल्याने जास्त भग्न अवशेषांच्या स्वरुपातच आहेत. दरवाज्याचे फक्त खांबच शिल्लक आहेत. दरवाज्याचे बाजूला शरभ शिल्प आहे. दरवाज्याच्या आतील बाजूस शिलालेख कोरलेले आहेत. इथून पुढे जाताना कातळातून जणू खोदलेल्या बोगद्यासारखे दरवाजे आहेत.  चवथ्या दरवाज्याला लोखंडी सरकीचा दरवाजा लावलेला आहे. आम्ही सकाळी लवकर गेलो तरी साधारण पावसाळी हवामानासारखे ढग दाटून आले होते आणि प्रचंड वारा घोंघावत होता. त्यामुळे ह्या लोखंडी दरवाजातून वर चढून जाताना वाऱ्याचा अगदी भयभीत करणारा आवाज येत होता. लोखंडी दरवाज्यातून काही पायऱ्या चढून गेल्यावर आपण गडमाथ्यावर पोचतो. गडाचा डोंगरमाथा बऱ्यापैकी विस्तीर्ण आहे. गडाला त्याकाळी मजबूत तटबंदी असावी! बरीच  पडझड झालेली आहे तरि  देखील जुन्या काळी ह्या गिरीदुर्गाची एक वेगळीच शान असेल ह्याबाबत ग्वाही देत हा गड पुरुष तिथे आजही उभा आहे.

गडावर पाहोचल्यावर तेथून दिसणारे दृश्य विहंगम होते. आम्ही लोखंडी सरकीच्या दरवाज्यामधून वर येवून गडाच्या एका बाजूने आमची परिक्रमा सुरु करुन संपूर्ण गडमाथ्याची प्रदक्षिणा केली. हातगड म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असलेला गिरीदुर्ग! गडमाथ्यावरुन विस्तिर्ण टापू नजरेच्या टप्प्यामध्ये येतो. हातगडाच्या एका बाजूला गुजरात राज्यामध्ये असलेले छोटे हिलस्टेशन सापुतारा दृष्टीस पडते. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र-राज्याच्या सीमेवरचे हातगडवाडी गाव पायथ्याशी दिसते. सहयाद्रीच्या पर्वतरांगांमधील साल्हेर, सालोटा, वणी, मार्कंडेय, रावळया-जावळया, धोडप हे किल्ले दिसतात.

गडाला तटबंदी आहे. गडावर बरीच पडझड झालेल्या वास्तू भग्नावस्थेत आहे. साधारणतः धान्याची कोठारे, दारुगोळा, शस्त्रागारे इत्यादीसाठी व्यवस्था असावी. अत्यंत आश्चर्य म्हणजे गडावर पाण्याचे टाके आहेत. आणि कातळात कारेलेला तलाव सुध्दा! परंतु हयाची अनेक कालावधी सफाई झालेली नसावी! खरं तरं हे गडकिल्ले, गिरीदुर्ग आपले प्राचीन वैभव आहे आणि इतिहासाची जिवंत स्मारकं! पुरातत्व खात्याने आणि पर्यटन विभागाने गड संवर्धन, जतन हयाची मोठी कामगिरी हाती घेतली पाहिजे! हया गडावर पाचशे वर्षांपूर्वीचा जुना देवनागरी लिपीतील संस्कृत शिलालेख आढळून आल्याबाबत सांगितले जाते. हया शिलालेखामध्ये बागुलवंशीय राजांच्या पराक्रमाबद्दल कथन केले आहे. हया राजांच्या पदरी असलेल्या ‘रुद्र’ कवीने “राष्ट्रोढवंशम महाकाव्यम्” हया ग्रंथामध्ये हया गडकिल्ल्याच्या विजयाबद्दल, बागुल राजांच्या कारकि‍र्दीबद्दल वर्णन केले आहे. तटबंदीच्या कडेला एका बाजूला एक पीर आहे.

संपूर्ण गडमाथा परिसर टेहळणी करेपर्यंत एक तास कसा गेला ते कळले देखील नाही. आम्ही लगबगीने गडउतार झालो. हातगडवाडीमध्ये मोराच्या ‘टाहो’ चा वेध घेत गेलो. हया पक्ष्यांच्या राज्याला ‘पाळीव’ करुन ठेवला होता! गावामध्ये अन्नाच्या शोधात बिचारा वणवण करत होता! आम्ही त्याचे दर्शन घेवून पुन्हा रिसॉर्टवर परतलो!

सुट्टीचा शेवटचा दिवस! आम्ही सकाळी लवकर नाष्टा करुन हातगड रिसोर्टचा निरोप घेतला आणि ‘सप्तश्रृंगी’ गडाच्या दिशेने मोर्चा वळविला. परतीच्या रस्त्यावरच ‘वणी’ च्या देवीचे दर्शन करुन पनवेलला माघारी जाण्याचे ठरले. हातगड क्लब महिंद्रा सोडून आम्ही सप्तशृंगीच्या दिशेने निघालो. रस्त्यामध्ये काही ठिकाणी अगदी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील हिरवेगार दिसणारे द्राक्षाचे वेल मनाला सुखावून गेले!

द्राक्षाचे वेल

नाशिक जिल्ह्यामधील कळवण तालुक्यात सप्तश्रृंगीचे स्थान आहे. सात शिखरांनी वेढलेले म्हणून सप्तश्रृंगी! महाराष्ट्रामधील साडेतीन शक्ति पीठापैकी ‘अर्धं शक्ति पीठ’ म्हणून वणीच्या देवीची महती आहे. देवीची आठ फूट उंचीची पाषाणात कोरलेली दोन्ही बाजूस नऊ असे एकूण अठरा हातांमध्ये विविध आयुधे धारण केलेली मूर्ती आहे. सप्तश्रृंगी गडावर जाण्यासाठी आता फ्युनिक्यूलर रोपवेची सोय झालेली आहे. गडावर भाविकांची गर्दी लोटली होती. परंतु बऱ्यापैकी गर्दीचे नियोजन केलेले होते. सप्तश्रृंगीच्या दर्शनाने आमच्या सहलीची सांगता झाली. आणि आम्ही तडक पनवेलची वाट धरली! छोटेखानी हातगड मात्र मनात घर करुन राहीला!


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑