यात्रा केदारखंडाची भाग -१
देवभूमीचे प्रवेशद्वार – ऋषिकेश
आस्था हा मानवी जीवनाचा गाभा आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. नीतिने जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखून देणारा असतो धर्म! मग तो कोणताही असू द्या! आपल्या आचार-विचार आणि विहाराला सुध्दा त्याचा पायबंद असतो. सर्वांत प्राचीन संस्कृती म्हणून नावाजलेली हिंदू संस्कृती म्हणजे जणू निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची शिकवण देणारी! सण, उत्सव, परंपरा हया सर्व काही निसर्गाशी कृतज्ञतेचा भाव जोपासणाऱ्या! तीर्थाटनाचे तर खासच महत्त्व. आणि हे तीर्थाटन देवभूमी- हिमालयातील असेल तर मग आमच्यासारखे हिमालयाचे वेड असलेले सामान्य देखील पावन होऊन जातात. हिमालयामध्ये ‘‘सत्यम- शिवम् आणि सुंदरम्’’ ची अनुभूती झाल्याशिवाय राहत नाही.
महाकवी कालिदासाने हिमालयाला देवतात्मा अशी उपमा दिली आहे. अश्या ह्या देवतात्मा हिमालयाच्या कुशीत वसलेले उत्तराखंड राज्य! युगानुयुगे ऋषि-मुनि, अभ्यासक, साधक, तपस्वी ह्यांच्यासाठी शांती प्रदान करणारं अध्यात्मिक शरणस्थळ. हिमालयाच्या पांच खंडामधील एक केदारखंड! पौराणिक ग्रंथ साहित्यामध्ये उल्लेख असलेलं गंगाद्वार म्हणजेच हरिद्वारपासून श्वेतपर्वत – महाहिमालय म्हणजेच टॉन्स पासून नंदा पर्वताच्या प्रदेशाला केदारखंड म्हणून संबोधलेली ही देवभूमी! उत्तरेला तिबेट, दक्षिणेला उत्तर प्रदेश, पूर्वेकडे नेपाळ आणि पश्चिमेकडे हिमाचल प्रदेश असे बहुआयामी सीमा असलेले हे राज्य भौगोलिकदृष्ट्या कुमाऊ आणि गढवाल अश्या दोन प्रदेशात विभाजीत झालेले आहे. हेच केदारखंड आज उत्तराखंड राज्यामधील गढवाल मंडल म्हणून परिचित आहे.
ह्याच गढवाल भूमीत सुमेरु, सतोपंथ, गौरीपर्वत, गंधमादन, स्वर्गारोहिणी, केदारकंठा, बंदरपुंछ, नीलकंठ, चौखम्बा आदि पर्वतश्रेण्या आणि अनादि काळापासून भारतीय संस्कृतीला वंदनीय-पूजनीय असणारे, अखंड भारतवर्षाला सुजलाम-सुफलाम करत निरंतर वाहणारे गंगा-यमुनेचे जलप्रवाह! अनेकानेक तीर्थस्थळे, मनमोहक निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असणाऱ्या ह्या हिमालयात प्रवेश करताच खरोखर देवभूमीतच आल्याचा आभास होतो.
प्राचीन ग्रंथ आणि पौराणिक कथांमध्ये ब्रह्मावर्त, आयावर्त, इलावृत्त, हिमवंत, केदारखंड, रुद्र हिमालय अश्या उपाध्यांनी वर्णीत विशेष माहात्म्य प्राप्त झालेल्या ह्याच गढवाल हिमालयात होणारी चारधाम यात्रा ही आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याची आणि हृदयाजवळची गोष्ट! आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रेला जाऊन आलेच पाहिजे इतके ह्या यात्रेचे हिंदूच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरं तर प्रामुख्याने बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि रामेश्वरम् हे विष्णुचे आणि शिवाचे चारधाम मानले जातात. परंतु गढवाल हिमालयाच्या कुशीत दुर्गम भागात असलेले ‘यमनोत्री-गंगोत्री-केदारनाथ-बद्रीनाथ’ ही तीर्थस्थळे ‘छोटा चारधाम’ म्हणून ओळखली जात असली तरी तितकीच तिर्थाटनासाठी प्रसिध्द आहेत. हया चारधामांना भेट देण्याचा मनसुबा कधीपासून रचत होते. २०१९ मध्ये केलेल्या “व्हॅली ऑफ फ्लॉवर्स” ट्रेकनंतर बद्रीनाथच्या रस्त्यावरून अगदी ८-१० किलोमीटर अंतरावरूनच रस्ता खचल्यामुळे मागे परतावे लागले होते. त्याची खंत मनात होतीच. कदाचित संपूर्ण चारधाम यात्रेचाच योग होता असं म्हणायचं!
अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू होणारी चारधाम यात्रा दिवाळीपर्यंत म्हणजे कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालते. त्यानंतर हिवाळ्यामध्ये सहा महिन्याच्या कालावधीत हया देवभूमीत हिमालयाच्या कुशीत वसलेली मंदिरे बर्फाच्छादीत होऊन जातात. मग पुनः विधीवत पुढील वर्षाच्या अक्षय तृतीयेला हया मंदिरांचे दरवाजे/‘कपाट’ उघडण्याचा कार्यक्रम संपन्न होतो. अन्य कालावधीमध्ये देवतांच्या प्रतिकात्मक मूर्ती उखीमठ, जोशीमठ येथे आणून त्यांची उर्वरित सहा महिने तिथे पूजा-अर्चा केली जाते. छोटा चारधाममध्ये प्रतिनिधिक स्वरुपात दोन शक्ति देवता म्हणजे यमनोत्री-गंगोत्री, आणि शैव-वैष्णव म्हणजे भगवान शिवाची आणि विष्णूची अनुक्रमे केदारनाथ, बद्रीनाथ अशी प्रतिकात्मक स्थळे आहेत.
चारधाम स्थळांचा दुर्गमपणा आजही लक्षात येण्यासारखा आहे. भारत-चीन युद्धापूर्वी हिमालयाच्या दरी-खोऱ्यातून पायी यात्रा करणं हे सामान्यांना सहज सुलभ नव्हते! म्हणूनच कदाचित तीर्थयात्रेस निघालेला माणूस आपल्याला पुन्हा भेटेल का? असे प्रश्नचिन्ह असे! त्यातच तीर्थयात्रा म्हणजे वानप्रस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यावर करण्याची गोष्ट असा काहीसा संकेत असे. त्यामुळे हया यात्रेचे स्वरूप खूप खडतर असेच होते. कालांतराने परिस्थिती खूपच बदलली. भारतीय सीमेलगत खूप विकास कामांना गती आली. हिमालयाच्या अनेक दुर्गम भागामध्ये वाहनाने जाता येईल इतपत दळणवळणाची सुविधा निर्माण केली गेली आणि सर्वसामान्यांना चारधामला जाणे सुकर झाले. आजमितीला चारधाम यात्रेसाठी वाहने, हेलिकॉप्टर, घोडे-खच्चर, पालखी हया सर्व सोयी सुविधा सहज उपलब्ध आहेत. चारधाम यात्रेचे स्वरूप बऱ्यापैकी पर्यटनाचेच झाले आहे.
अध्यात्मिकतेवरती भाष्य करण्याइतकं आपलं ज्ञान नाही, तरी हिमालयात पदभ्रमण मोहिमांमध्ये सहभागी होऊन विविध ठिकाणी हिमालयाच्या कुशीत अनुभवलेल्या निराकार परमात्म्याच्या आस्तित्वाची चाहूल आपल्याला सुखद आणि एक वेगळाच आनंद देऊन जाते. डोंगर-दऱ्यांमध्ये खुललेला निसर्ग, अमर्याद आकाशाची निळाई आणि गूढ शांतता हया सर्व गोष्टी आपल्यातल्या ‘मी’ पणाचा निचरा करतात! मला हया अनुभूती अनुभवायच्या होत्या. आणि म्हणूनच हया प्रवासाला मी ‘चारधाम यात्रा’ असंच स्वतःच्या मनामध्ये पक्कं बिंबविले!
यूथ हॉस्टेलने चारधाम यात्रेला त्यांच्या कार्यक्रमांमध्ये समाविष्ट केल्याने एकट्याने भटकंती करणार्यांसाठी उत्तम पर्याय उपलब्ध झाला. अगदी निवडक तुकड्यांमध्ये यूथ हॉस्टेलने चारधाम यात्रेचे नियोजन केले होते. मी अगदी ठरवून सप्टेंबर महिना हया प्रवासासाठी निवडला. त्याचे मुख्य कारण म्हणजे उत्तरेकडे हिमालयात ऑगस्ट-सप्टेंबर हया महिन्यांमध्ये पाऊस बऱ्यापैकी ओसरलेला असतो. निसर्ग हिरवाईने नटून आपल्या अंगाखांदयांवर विविध रंगांचे साज-श्रृंगार लेवून आपल्या स्वागतासाठी तयार असतो. आकाशाची निळाई मनाला भुरळ पाडते. हवा सुध्दा आल्हाददायक असते. तुलनेने भुःस्खलनाचे अडसर कमी असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फोटाग्राफीसाठी उत्तम कालावधी असतो. आपल्या प्रवासाच्या आणि निसर्ग चित्रांच्या आठवणी मनमुराद कॅमेऱ्यात कैद करता येतात.
मी २१ सप्टेंबर २०२२ च्या तुकडीमध्ये नोंदणी करून ठेवलेली होती. आणि माझ्यासोबत नेहमी ट्रेकिंग मोहिमांमध्ये असणाऱ्या मैत्रिणीला सांगितले, ती स्वतः आणि तिच्या अजून तीन मैत्रिणी आमच्या सोबत निघाल्या. चार महिने अगोदर नोंदणी, विमानाचे तिकिट वगैरे सर्व प्रवासाची आखणी झाली. मुंबईहून आमचा पाच जणींचा कंपू चारधाम यात्रेसाठी तयार झाला. पण २०२२चा वर्षा ऋतु जरा लांबलेला होता. पावसाने खूपच थैमान घातलेले होते. अगदी सप्टेंबर महिन्यात देखील निरोपाचा पाऊस नव्याने पडणाऱ्या पावसासारखाच वाटत होता. कामकाजाचेही बऱ्यापैकी नियोजन केलेले होते त्यामुळे विवंचना राहिली नाही. सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्यात हया चारधाम यात्रेस खूप गर्दी नसते पण दोन वर्षे कोरोना संक्रमणामुळे सर्व देव सुध्दा ‘टाळेबंदीत’ होते त्यामुळे यात्रेसाठी यंदा ‘कोण गर्दी’ उसळली होती. जुलै-ऑगस्टपर्यंत वीस लाखांच्यावर यात्रेकरूंची नोंद झालेली होती. त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्येही थोडी गर्दी असावी हे गणित मनाशी पक्के केले होते. प्रवासाचे नियोजन, हलका-फुलका व्यायाम, यात्रेसाठीची नोंदणी, युथ हॉस्टेलच्या नियमानुसार वैद्यकीय चाचणी असे सर्व काही सोपस्कार झाले. फक्त चारधाम यात्रेचा प्रवास हा थकविणारा आणि पूर्णतः निसर्गावर अवलंबून असणारा असल्याने मनोमन त्या देवतात्मा हिमालयाला आणि त्या देवभूमीमधील देवतांना आवाहन करून साकडे घातले,‘‘माझी यात्रा सफल होऊ दे’’, आणि २१ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईहून विमानाने डेहराडूनकडे झेपावले.
खरं तर युथ हॉस्टेलने चारधाम सहलीचे रिपोर्टिंग २० सप्टेंबरला दिल्ली येथे नियोजित होते. म्हणजे खरी यात्रा दिल्ली येथून सुरु झालेली होती. तिथून बसने रात्रीचा प्रवास करुन इतर ग्रुपमधील मंडळी ऋषिकेशला २१ तारखेला सकाळीच पोहोचलेली होती. परंतु दहा-बारा दिवसांचा चारधाम यात्रेचा सततचा प्रवास! दिल्लीहून रात्री प्रवास करुन ऋषिकेशपर्यंत जाण्याऐवजी दुसर्या दिवशी थेट डेहराडूनलाच प्रस्थान करून पुढे ऋषिकेशला ग्रुपमधे सहभागी होण्याचे आम्ही पाच जणींनी पसंत केले. त्यामुळे दोन गोष्टी साध्य झाल्या! मला कामाचा अधिक एक दिवस मिळाला आणि विमान प्रवासामुळे वेळ वाचला! आणि रात्रीचा थकविणारा प्रवाससुद्धा टाळता आला.
आम्ही साधारण दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान डेहराडूनच्या जॉलीग्रँट विमानतळावर उतरलो. आमचे सामान मिळण्यासाठी बराचसा वेळ गेला. डेहराडून विमानतळाचे खूपच विकसन आणि सुशोभीकरण झाले होते. विमानतळाबाहेर मोठया खांबांवर ‘ओम मणि पद्मे हम्’ मंत्राक्षरे कोरलेली होती. गढवाल हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी जॉली ग्रँट विमानतळ पर्यटनाच्या दृष्टीने अगदी महत्त्वाची भूमिका निभावतो. २०१९ ते २०२२ दरम्यान विमानतळाचा खूप कायापलट झालेला दिसून येत होता. उत्तराखंड राज्यामध्ये असलेल्या विमानतळाची उपयुक्तता अनेक दृष्टीने महत्त्वाची आहे.

डेहराडून शहरापासून अगदी जवळच असलेले हरिद्वार आणि ऋषिकेश ही निव्वळ पर्यटन स्थळे नाहीत तर गढवाल हिमालयाच्या देवभूमीची प्रवेशद्वारे आहेत. गिरीप्रेमींसाठी अनेक पदभ्रमण मोहिमांची सुरुवात हयाच शहरामधून होते. त्यामुळे हया विमानतळावर सतत वर्दळ असते. आम्ही विमानतळावरुन प्रीपेड टॅक्सीने आमच्या नियोजित युथ हॉस्टेलच्या रिपोर्टींग कॅम्पवर पोहोचलो. आमची सर्वांची “मनोकामना सिध्द श्री हनुमान पीठ” मंदिराच्या धर्मशाळेमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली होती.
ऋषिकेशमधील माया कुंड परिसरामध्ये निर्मला आश्रम हॉस्पिटलजवळ ही धर्मशाळा आहे. विस्तीर्ण परिसरामध्ये मंदिराच्या आवारातील दोन इमारतीमध्ये यात्री निवास आहे. किरकोळ शुल्क आकारून वातानुकूलित/विना-वातानुकूलित दोन/तीन माणसे एकत्र राहू शकतील अश्या अगदी मूलभूत सोयी असलेल्या खोल्या आहेत. पायी चालत जाता येईल इतक्या अंतरावर त्रिवेणी घाट, रामझुला, लक्ष्मणझुला ही ठिकाणे आहेत. परंतु धर्मशाळा किंवा यात्री निवास असल्याने स्वच्छताही यथातथाच आहे. खरं तर नीटनेटके व स्वच्छता असलेली अगदी मूलभूत सोयी असलेले ठिकाण प्रवासाचे वेळी योग्य पर्याय असतो. परंतु हयाबाबत आपली मानसिकताच वेगळी आहे. कदाचित ‘डिजीटल इंडिया’ कडे वाटचाल करताना सुध्दा आपल्याला ‘स्वच्छता अभियान’ राबवावे लागते. असो!
आम्ही पाचजणी सर्वांत शेवटी ऋषिकेशला पोहोचलो. काही जण दिल्लीहून आले तर काही हरिद्वार ऋषिकेशला परस्पर आले. आमच्यासाठी सर्व सहप्रवासी खोळंबले होते, कारण आमचा टूर लीडर सर्व प्रवासाचा आराखडा संध्याकाळी एकत्रितपणे आम्हाला देणार होता. संध्याकाळी चारधाम यात्रेबद्दल संपूर्ण माहिती, प्रवासाचा आराखडा आणि परस्पर परिचय हयासाठी एका मोठया हॉलमध्ये आम्ही सर्व सहयात्री जमा झालो. नंदन जैसवाल हा आमचा ग्रुप लिडर प्रथमच युथ हॉस्टेलतर्फे चारधाम यात्रेच्या तुकडीचे नेतृत्व करीत होता. विशेष म्हणजे चारधाम यात्रेला निघालेल्या आमच्या २८ लोकांच्या चमू मध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, मध्यप्रदेश अश्या देशाच्या विविध प्रांतामधून सर्वजण आले होते. सर्वांत आश्चर्यकारक म्हणजे आमच्यासारखे पन्नाशी ओलांडलेले हौशी, काही निवृत्त झालेले तर होतेच, पण नुकताच नोकरीला लागलेले स्वतंत्र स्वावलंबी मुले-मुली सुध्दा होत्या. त्यामुळे उतरत्या वयातच यात्रा हा भ्रम मोडीत निघाला. आमचा परिचय झाला. पुढील दहा दिवसांचा आखीव कार्यक्रम आणि प्रादेशिक, भौगोलिक आणि नैसर्गिक अडचणी किंवा अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगांची कल्पना दिली गेली. यात्रा पूर्ण करण्यासाठी स्वत:ची काय व कशी काळजी घ्यावी हयाबद्दल नंदनने माहिती दिली. आमच्या पैकी बहुतांशी सहभागी भटकंती करणारे आणि ट्रेकर्स होते त्यामुळे नंदनला फार काही स्पष्टिकरणांची गरज भासली नाही. त्याचे काम सोपे झाले. हा छोटेखानी माहितीचा कार्यक्रम पार पडल्यावर आम्हाला त्रिवेणी घाटावर गंगा आरतीसाठी जाण्याची परवानगी मिळाली.
गंगा नदीच्या तटी वसलेले ऋषिकेश म्हणजे एका अर्थी अनेक मंदिरे आणि आश्रम ह्यांची नगरीच आहे. अलीकडे ऋषिकेश आंतरराष्ट्रीय पातळीवर योग साधना केंद्र आणि आंतरराष्ट्रीय योग महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. प्राचीन काली येथे अनेक ऋषि मुनींनी तप-साधना केली म्हणून ह्या क्षेत्रास ऋषिकेश म्हटले जाते अशी वदंता आहे. तर पौराणिक कथांच्या संदर्भानुसार एका ऋषिने ह्या स्थळी विष्णूची आराधना केली त्यामुळे विष्णूने प्रसन्न होऊन ह्या ठिकाणचे नाव ऋषिकेश म्हणून प्रख्यात होईल असा वर दिला असेही सांगीतले जाते. मनू, पृथू, दक्ष महाराज, मांधाता, भगीरथ, पुरूरवा, नहुष, ययाती, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ह्या पौराणिक पात्रांची ऋषिकेश ही तपोभूमि असल्याचे सांगीतले जाते. गढवाल हिमालयातील चारधाम, पंच केदार, पाच प्रयाग, पंच बदरी, शक्ति पिठे आणि लोकपाल हेमकुंड येथे जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी अथवा पर्यटकांसाठी ऋषिकेश हे खऱ्या अर्थी गढवालचे प्रवेशद्वार आहे. येथील सायंकालीन गंगा आरती विशेष असते. आमच्या धर्मशाळेपासून हाकेच्या अंतरावर गंगा किनाऱ्यावर असलेला हा त्रिवेणी घाट आणि चारधाम यात्रेचे औचित्य! त्रिवेणी घाटावरचे संध्याकाळचे वातावरण काही औरच असते. त्रिवेणी घाटावर अर्जुनाचे सारथ्य करतानाचा कृष्ण-अर्जुनाचा रथ आहे. शिव-पार्वतीच्या प्रतिमा आहेत. अशी वदंता आहे की भगवान श्रीकृष्णाला जराने मारलेला बाण पायाला लागल्यावर ते हया स्थळी आले होते.

त्रिवेणी घाटावर रोज संध्याकाळी गंगा नदीची महाआरती होत असते. आरतीच्यावेळी भाविकांची प्रचंड झुंबड उडालेली असते. गंगा आरतीसाठी खास पूजा करायची असल्यास ठराविक रक्कम भरून तुमच्याकरवी गंगा मातेची साग्रसंगीत पूजा केली जाते. त्रिवेणी घाटावर गंगा आरतीचा जणू एक “कार्यक्रमच” राबविला जातो. असेही आता ह्या सर्व स्थळांना पर्यटन क्षेत्राचे जास्त स्वरूप आलेले आहे. परंतु गंगा आरतीचे दृश्य फारच मनोरम असते. अवघं वातावरण गंगामय होते. गंगेच्या पाण्यात आपली पापे विसर्जित करून मनुष्य प्राणी मोकळा होतो. परंतु हया जलमाता सदैव जीवनदायीनी असतात. हया जल मातांना कृतज्ञतेने फुलांच्या परडीत तेवणारा दिवा अर्पण केल्यावर त्याला पाण्यावर प्रवाही होताना पहाणे हा एक अनुभव असतो. अगदी संधिकाल समयी गंगा मैयाची आरती सुरु होते. मंत्रोच्चार, घंटा नाद हयांनी अवघा आसमंत भक्तीने ओसंडून जातो. वेगळेच अध्यात्मिक वातावरण निर्माण होते. गंगा नदीच्या प्रवाही पाण्यावर रंगीत प्रकाशलहरी रंग पालटताना दिसतात. आम्ही देखील त्रिवेणी घाटावर गंगामैयाचे श्रध्देने पूजन करून आरतीच्या मंत्रघोषात दिप दान केले आणि खऱ्याअर्थी चारधाम यात्रेची सुरुवात केली.
त्रिवेणी घाटावर हिंदू समाज अनेक क्रियाकर्म करण्यासाठी येत असतो. गंगा दशहरा, एकादशी, पौर्णिमा अश्या विशेष दिवशी भाविक इथे गंगा स्नान करुन कृतकृत्य होतात. सर्व पापापासून मुक्ती मिळून मोक्ष मिळवण्याचे माध्यम आहे गंगा मैया! गंगास्नान आवर्जून करताना हा मानव प्राणी एक प्रकारे आपण पाप केले आहे हयाची कबुली तर देतोच आणि मग त्या पापक्षालनासाठी गंगेत डुबकी मारतो! जय गंगा मैया की! जय जय गंगे हर हर गंगे!
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा