यात्रा केदारखंडाची

यात्रा केदारखंडाची – भाग २

सूर्यपुत्री यमुना भेट

ऋषिकेशहून पहाटे साडेचार वाजता आमचे बडकोट येथे नियोजित प्रस्थान होते. परंतु आमचे सर्व प्रवाश्यांचे सामान आणि आमच्यासोबत चीजवस्तूंसह फिरणारा मुदपाकखाना हयांच्यामध्ये गाडीत सामावण्यासाठी चढाओढ सुरू झाली. सामानाचा बंदोबस्त करण्यात साधारणतः एक तास दवडल्यानंतर आमची गाडी ऋषिकेशहून बडकोटच्या दिशेने निघाली. मसूरीमार्गे केम्टी फॉल्सला वळसा घेऊन आमची बस रिमझिमणाऱ्या पावसातून पुढे चालत होती. ‘केम्टी फॉल्स’ जवळ आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो. पावसामुळे वातावरण कुंद  झाले होते. पर्यटकांची फारशी रेलचेल नव्हती. नाश्ता करण्यासाठी ज्या धाब्यावर थांबलो होतो त्याला लगतच रेलिंग लावलेले होते आणि तिथून दिसणारा नजारा अत्यंत विलोभनीय होता. एक विस्तीर्ण लॅन्डस्केप! दोहोबाजूंनी पर्वतराजी, त्यामध्ये नागमोडी वळणे घेत कोरलेला रस्ता, डोंगरमाथ्यावर ढगांच्या शुभ्र झुली! मन वेडं होऊन क्षणार्धात त्या धुक्याची चादर लपेटून त्या दरीखोर्‍यांमध्ये विहार करू लागलं!

केंप्टी फॉल्स जवळ

एवढ्यातच धाब्यावरील मालकीणबाईने  हाकाटी दिली, ‘ओ दिदी, गरम गरम परांठा खालो! तिचे अगत्य मनाला भावले! आम्ही सर्वांनी त्या धाब्यावर भूक लागल्याने हुल्लड केलेली होती. आम्ही तिच्या धाब्यावर येताच तिची एकटीची खूपच धांदल उडालेली होती. आम्ही थेट तिच्या स्वयंपाकघरात प्रवेश करून तिला बटाटे सोलून दे, कांदा चिरून दे अशी किरकोळ मदत केली. त्यामुळे ती देखील अगदी आपुलकीने खाऊ घालत होती. तिचे पराठे तयार होईपर्यंत रेलिंगजवळ उभे राहून माझे निसर्गावलोकन चालू होते.  मला शोधतच ती रेलिंग पर्यंत आली. “जिन्होने आलू छिलके दिये वो कहा है? म्हणत आवाज देत माझ्याजवळ आली! पावसाळी हवेत भूक सुध्दा खूप लागली होती. मनसोक्त गरम पराठ्यांवर ताव मारला आणि अमृततुल्य चहा पिऊन पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला. नवगांवनंतर आम्ही पुरोलामार्गे यमनोत्री बायपास रस्त्याने बडकोटच्या दिशेने वळलो. साधारण दुपारी तीन वाजता आम्ही बडकोटला पोहोचलो. हॉटेल विवेक पॅलेस लॉजमध्ये आमच्या यूथ हॉस्टेलच्या ग्रुपची रहाण्याची व्यवस्था होती.

यमनोत्रीच्या मुख्य रस्त्यावर असणारे पण तसं थोडं अपरिचित राहीलेलं समुद्रसपाटीपासून साधारण ४००० फूट उंचीवर वसलेलं गढवाल हिमालयामधील उत्तरकाशी जिल्ह्यातले छोटे शहरच जणू! पण आमचे हॉटेल मुख्य शहराच्या बाहेर यमनोत्रीच्या रस्त्यालगतच असल्याने निसर्गाच्या सान्निध्यात आल्याचा आनंद झाला. यमुना नदीच्या काठाने वसलेली ही ठिकाणे अगदी निसर्गरम्य आहेत. बडकोट अपरिचित असले तरी ट्रेकींगसाठी बेस कॅम्प म्हणून नावारुपाला आले आहे. यमनोत्रीकडे जाणाऱ्या पर्यटक आणि यात्रेकरूंसाठी ‘बडकोट’ मुक्कामाचे ठिकाण म्हणून आता परिचित होऊ लागले आहे. बडकोट गावाचे छोट्या शहरात रुपांतर करणारी अनेक गेस्ट हाऊसेस, हॉटेल्स नजरेस पडत होते.

आम्ही सामान ताब्यात घेऊन आम्हाला दिलेल्या खोल्यांमध्ये गेलो. पण हवेतला सुखद बदल आणि भोवतालचा परिसर खुणावू लागला. आम्ही थोडी विश्रांती घेतली आणि संध्याकाळी चहा पकोडयानंतर फेरफटका मारण्यास बाहेर निघालो. हॉटेलच्याच मागील बाजूस असलेल्या डोंगर उतारावर पाईन वृक्षांची गर्दी दिसत होती. आणि मागे खालच्या बाजूला दरीत ‘यमुना’ खळाळून वाहत होती. हवेत सुखद गारवा होता. आम्ही पाय मोकळे करण्याचे निमित्त करून ‘छतांग’ गावापर्यंत चालत गेलो. तिथून दिसणारे निसर्ग दृष्य अत्यंत विहंगम होते. आम्ही छतांगच्या दिशेने चालू लागताच काही अंतरावरून बंदरपूंछ आणि इतर हिमालयीन पर्वत शिखरांच्या रांगा हिमाचे मुकुट परिधान करून चमचमताना दिसू लागल्या. हया हिम पर्वतांची पार्श्वभूमी आणि पुढे हिरवट पिवळ्या डोंगर रांगा, पाईन देवदाराची वृक्षराजी, तेथील स्थानिक गढवाली लोकांची शेती, सफरचंदाच्या बागा, अनोखी विलक्षण शांतता आणि गावकऱ्यांचे निसर्ग समृध्द जीवन! गढवाली लोकांची गुलाबी गालांची चिमुरडी मनसोक्त बागडणारी पोरं! मन अगदी त्या डोंगरदऱ्यांमध्ये हरवून गेले! अन् हिमगिरीच्या केवळ मुखदर्शनानेच सुखाचा गारवा मन उल्हसित करून गेला. आम्ही छतांग गावाचा फेरफटका मारला. एका घराच्या उघड्या माडीवर स्थानिक महिला धान्य निवडत बसलेली होती. आम्ही तिच्याकडे मोर्चा वळविला. तिथपर्यंत पोहोचताना परसदारांमध्ये उगवलेला भाजीपाला, फळे नजरेतून सुटत नव्हते! आपल्या भाषेत सेंद्रिय किचन गार्डन!! घरट्यांकडे परतणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट, आणि माघारी प्रवासाला निघालेला सुर्यदेव पाहून आम्ही सुध्दा प्रसन्न मनाने आमची पावले पुन्हा आमच्या हॉटेलवर परत जाण्यासाठी वळवली. हॉटेलवर आल्यावर गरमागरम भोजनाचा आस्वाद घेऊन लवकरच निद्राधीन झालो. दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थाने चारधाम यात्रेमधील पहिले धाम- यमनोत्रीचे दर्शन होणार होते!

यमनोत्री दर्शन

आमचे चारधाम यात्रेचे वेळापत्रक अगदीच काटेकोर होते. खरंतर दुर्गम हिमालयामधील बेभरवशाची रस्त्यांची दुरावस्था आणि त्यानुसार प्रवासाचा आराखडा! संपूर्ण चारधाम यात्रेमध्ये दिवस उगवण्यापूर्वी आम्ही प्रवासाला निघत असु आणि पुन्हा दिवस मावळल्यावर काळोखात आमचे हॉटेलमध्ये आगमन होत असे! आजचा दिवस देखील पहाटे साडेतीन वाजता सुरू झाला. खरं तर अंदाजे ४६ किलोमीटर अंतरावर यमनोत्री धामचा बेस कॅम्प- जानकी चट्टी! जानकी चट्टीपासून सहा किलोमीटर चढाई पायी  करुन यमनोत्री मंदीराला भेट देता येते. त्यामुळे आम्ही चहा घेऊन जानकीचट्टीकडे रवाना झालो. यमनोत्रीकडे जाणारा रस्ता तसा अवघडच! अत्यंत नागमोडी वळणदार आणि अरुंद रस्ता. गढवाली चालकांची सराईतपणे हया रस्त्यावर रहदारी चालू असते. आम्ही सकाळी साडे सात वाजता जानकी चट्टी येथे पोहोचलो. पावसाची रिपरिप चालूच होती! आमच्या युथ हॉस्टेलच्या खानसाम्याने सरावल्याप्रमाणे गाडीच्या डीक्कीमधून स्वयंपाकाचे सामान, शेगडी काढली आणि लगबगीने आमच्या सर्वांसाठी कांदे-पोह्यांचा नाष्टा बनविला. परंतु नाष्टा व इतर विधी होईपर्यंत आमच्या ग्रुपला यमनोत्रीचा ट्रेक सुरु करण्यासाठी नऊ वाजले. खरं तर युथ हॉस्टेलचे हया प्रवासाचे नियोजन यथातथाच होते! नाष्टा करण्यामध्ये दोन तास खर्ची पडले आणि त्याचा परिणाम संध्याकाळी भोगावा लागला. आमच्या ग्रुपमधील काही जणांनी घोड्यावर जाणे पसंत केले तर शारीरिक व्याधी असलेल्यांनी पालखीमधून! यमनोत्री धाम हे पर्यटक आणि यात्रेकरुंच्यामुळे व्यापारीकरणाच्या गर्तेत बुडालेले आहे. यमनोत्रीला जानकीचट्टीपासून सहा किलोमीटरचा टप्पा पायी चालत जावे लागते. आणि डोंगरांमधील हा रस्ता बऱ्यापैकी उभा चढच आहे. यात्रेकरुंच्या सोयीसाठी पालकी, डंडी- कंडी, पिठ्ठू, घोडे सर्व काही उपलब्ध आहे. फक्त पायी जाणाऱ्यांची हया सर्वांमुळे खूपच पंचाईत होते. दोन वर्षे कोरोंनाच्या कात्रीमध्ये सापडलेल्या अवघ्या भक्तगणांचा चारधाम यात्रेला हयावर्षी पूर लोटला होता. आमचा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस यात्रेच्या शेवटच्या पर्वामध्ये जाण्याचा निर्णय योग्य ठरला. तुलनेने गर्दी कमी झालेली होती.

यमनोत्री मंदीराकडे जाणारा रस्ता अगदी निसर्ग रम्य असला तरी डोंगराच्या कडे-कपारीतून जाणारा अरुंद आणि आव्हानात्मक आहे. संपूर्ण रस्त्यावर सुरक्षेसाठी रेलिंग लावलेले आहेत. परंतु एकाच अरुंद रस्त्यावरून घोडे, डोली, पालखी, डंडी-कंडी पायी जाणारे अशी सर्वांची वर्दळ चालू होती. आम्ही यमनोत्री मंदिरापर्यंत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. पावसाची रिपरिप चालूच होती. प्रत्येकाचा वेग ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कमी-जास्त झाल्याने आम्ही विखुरलो. मी माझा कॅमेरा आणि सभोवतालचा निसर्ग न्याहळत मार्गक्रमण करताना तुलनेने जरा मागे पडले. परंतु यमनोत्री मंदीराच्या पायवाटेवर वर्दळ असल्याने एकाकी वाटत नाही. घोडेवाल्यांनी मात्र जीव नकोसा करून टाकला होता. यमनोत्रीकडे कूच करताना दर्शन करून येणारे यात्री चालण्यासाठी प्रोत्साहित करत होते, त्यांच्याशी  बोलताना समजले की, आदल्या दिवशीपर्यंत हिमवृष्टी आणि भुस्खलनामुळे यमनोत्रीचा रस्ता यात्रेकरूंसाठी बंद केलेला होता. आणि आजच यात्रा पुन्हा सुरू झालेली होती. त्या विधात्याचे आभार मानतच यमनोत्री मंदिरापर्यंतची मजल पार केली.

दुपारचे दीड वाजलेले होते. यमुनेच्या अल्लड खळाळणा-या प्रवाहावरून लोखंडी ब्रीज पार करताच डोंगर कपारीमध्ये पिवळया रंगाचा कळस असलेले मॉं यमुनाचे मंदीर दृष्टीस पडले. अंदाजे पाच किलोमीटर पायी चालत मंदिराजवळ पोहोचेपर्यंत बऱ्यापैकी दमछाक झालेली होती. यमनोत्री मंदीराचा पिवळया रंगाचा कळसाचा भाग अगदी सुस्पष्ट दिसत होता. बंदरपूछ पर्वतरांगांची पार्श्वभूमी लाभलेले यमनोत्री मंदीर कालींदी पर्वताच्या पायथ्याशी अगदी डोंगरामध्ये खेटून आहे. टेहरी गढवालच्या राजाने स्थापन केलेले हे यमुना मातेचे मंदीर चारधाम यात्रेचा पहिला टप्पा! नैसर्गिक कारणांमुळे अनेकवेळा क्षती पावलेल्या मंदीराच्या जयपूरची महाराणी, त्यानंतर अनेक राजा महाराजांच्या हस्ते पुर्नजीवित करून आजची मंदिराची वास्तु उभी आहे. मंदिर प्रामुख्याने दोन भागात विभागलेले आहे. गर्भगृहामध्ये काळयाशार संगमरवरी पाषाणातून यमुना मातेची मूर्ती घडवलेली आहे आणि बाजूला शुभ्र संगमरवरी गंगा मातेची सुध्दा मूर्ती आहे. मंदिराच्या अंतर्गत भागामध्ये यमुना मातेची चांदीची प्रतिमा आहे. मंदिराच्या लगतच प्रशस्त मंडपाची जागा आहे. मंदिर यमुनेच्या प्रवाहाच्या डाव्या काठावर वसलेले आहे. खरं तर यमुना नदीचा उगम कालींदी पर्वतावर असलेल्या चंपासार ग्लेशियरमधून होतो. यमुनेच्या प्रवाहा शेजारीच ‘सूर्य कुंड किंवा तप्त कुंड’ आणि ‘गौरी कुंड’ अशी गरम पाण्याची कुंडे आहेत. चारधाम यात्रेला येणारे भाविक सुर्यकुंडामध्ये ‘प्रसाद’ शिजवतात आणि यमुना मातेला अर्पण करतात. गौरी कुंडामध्ये स्नान करून पाप क्षालन करणार्‍यांची गर्दी लोटलेली होती. यमुना मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराला धर्मशाळा, गेस्ट हाउस सारख्या बांधकामानी वेढून टाकलेले होते.

पौराणिक कथांनुसार देवी यमुना अर्थातच यमुना नदी ही सूर्यपुत्री! कालींदी पर्वतातून उगम पावणारी! कालींदी हे सूर्य देवाचे दुसरे नाव! प्रचंड तेजोमय सूर्यदेव आणि संध्या हयांची सुपूत्री! परंतु आपल्या तेजाने तळपणाऱ्या पती देवाशी डोळे कधीच न भिडवू शकलेल्या संध्याने तिच्या मुलीला सुर्यदेवाच्या शापाचे धनी बनविले. संध्येच्या मिचमिचणा-या डोळ्यांमुळे त्यांना झालेली पुत्री यमुना जन्मतःच चंचल झाली! म्हणूनच यमुनेच्या प्रवाहाला अल्लड म्हटले जाते. सूर्यदेवाची पुत्री “यमुना” आणि पुत्र “यम” म्हणजे मृत्यूची देवता” ह्यांच्यामुळे यमनोत्री भेटीचे हिंदू पौराणिक कथांमध्ये विशेष माहात्म्य आहे. त्यामुळे चारधाम यात्रेची सुरूवात यमाची लाडकी बहीण यमुना हिच्या दर्शनाने करतात. तिथे गरम पाण्याच्या कुंडात स्नान करून नैवेद्य अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतोच पण मृत्यूचे भय सुध्दा राहात नाही अशी वदंता आहे.

मी यमुनामतेचे दर्शन घेऊन तिथला परिसर अगदी निवांत न्याहाळला! मला उगमाच्या दिशेने वाहत येणारी यमुना खरोखरीच उच्छृंखल भासू लागली! तिच्या खळाळून वाहणार्‍या प्रवाहाचा नाद कानांमध्ये गुंजत होता.  उत्तराखंड, हरयाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश हया राज्यांना भेटून ही जलमाता प्रयागराजला त्रिवेणी संगमावर गंगेला जाऊन मिळते. कितीतरी प्रदेशांना आणि खोऱ्याना सुपीक करत मानवी जीवनाला समृद्ध करीत जाते आणि त्यासाठी गंगा अथवा यमुना काय! खरंच पूजनीय जल माता! आपण खरं तर हया जलमातांचा -हास न करता ह्यांचा निर्मळपणा जपणं हीच खरी त्यांची पूजा होईल! अतिशय निसर्गरम्य ठिकाणी यमुनेच्या मूळ स्वरुपात झालेल्या दर्शनाने आंतरिक समाधान वाटले. सभोवतालचा निसर्ग अत्यंत रमणीय होता. शांत चित्ताने निसर्गाच्या सानिध्यात रममाण होण्यासाठी उत्तम स्थळ! पण ह्या दुर्गम ठिकाणांपर्यंत सहज पोहचता येत असल्याने सर्वत्र कोलाहल कानावर येत रहातो. मूलभूत परिसर स्वच्छता राखण्याचेही जनता भान ठेवत नाही. अन् ह्यामुळे अश्या स्थळांचे पावित्र्य आणि शुचिता हरवून जातं.

प्रतिकात्मक डुबकी म्हणून गरम कुंडाचे पाणी डोळ्यांना लावून आम्ही पुन्हा परतीच्या वाटेवर निघालो. आम्हांला पुन्हा जानकीचट्टीला खाली उतरून पोहोचताना एव्हाना दुपारचे साडेतीन वाजून गेलेले  होते. आमच्यासाठी जेवण तयारच होते. जानकी चट्टीहून परतताना आम्हाला संध्याकाळ होऊन गेली. पावसाची रिपरिप थांबलेली होती. तरी सुध्दा रस्ता अवघडच होता. आम्हाला बडकोटला पुन्हा पोहोचताना दिवस मावळून गेला आणि गडद अंधाराचे साम्राज्य पसरले. नियोजित कार्यक्रमानुसार यमनोत्री दर्शनानंतर आम्हाला खरं तर उत्तरकाशी येथे रात्रीच्या मुक्कामास जायचे होते. परंतु रात्रीचा प्रवास शक्य नव्हता. अवघड आणि धोकादायक रस्त्यांवरून रात्री आठनंतर प्रवासाची परवानगी नव्हती. नाइलाजास्तव आम्हाला पुन्हा बडकोट येथे काही तासांच्या विश्रांतीसाठी मुक्काम करावा लागला.


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

पृष्ठे: 1 2 3 4 5

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑