यात्रा केदारखंडाची – भाग ३
जय गंगे भागीरथी – अमृत मधुरा कांतीमती
बडकोटहून गंगोत्री किलोमीटरच्या परिभाषेत फक्त १८० किलोमीटर होते. परंतु वेळेचे एकक मात्र वेगळे होते. आम्ही अगदी भल्या पहाटे तीन वाजता बडकोटहून निघालो. आदल्या दिवशीच्या वेळेच्या चुकलेल्या गणितामुळे उत्तरकाशी ऐवजी बडकोटला मुक्काम करावा लागला होता. काही तासांची विश्रांती घेऊन आमचा जथ्था गंगोत्रीच्या दिशेने निघाला. ब-याच ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यांची डागडुजी होत होती. बडकोटहून उत्तरकाशीकडे जाणा-या रस्त्यावर धारासूजवळ मोठया बोगद्याचे काम वेगाने चालू होते. पावसाची रिमझिम चालू होती. हवेत सुखद गारवा होता. साधारण नऊ वाजता आमची बस एका घरगुती हॉटेलवर नाष्ट्यासाठी थांबली. मिट्ट अंधारात सुरू केलेल्या बस प्रवासात डुलक्या काढून सर्वांनी झोपेची कसर भरून काढण्याचा प्रयत्न केला होता. हॉटेलच्या आवारात खाली उतरताच सकाळच्या थंडगार गढवाली हवेचा स्पर्श झाला. हॉटेलच्या मागील बाजूस हिरवे-निळे पर्वतराज मांड ठोकून खडे ठाकले होते. सप्टेंबर महिना असल्याने हिरव्यागार वनराजीने नटले होते जणू! त्यांच्या अंगाखांद्यावर झुलण्यासाठी पांढुरक्या ढगांची स्पर्धा चाललेली होती. दरीखो-यांमध्ये गढवाली लोकांची सोनपिवळी शेते त्या वनराजीमध्ये खुलून दिसत होती. त्या विस्तीर्ण निसर्गरम्य नजार्याने दिवसाची सुंदर सुरूवात झाली. आम्ही झटपट चहा-नाश्ता उरकून दहा वाजण्याच्या सुमारास उत्तरकाशीला पोहोचलो.
भागीरथी नदीच्या काठावर समुद्र सपाटीपासून साधारण ३८०० फूट उंचीवर उत्तरकाशी हे जिल्ह्याचे ठिकाण वसलेलं आहे. उत्तरेकडील “काशी” समजले जाणा-या उत्तरकाशीचे दुसरे नावं ‘शिवनगरी’ आहे. अनेक मंदिरे, आश्रम असलेले हे छोटेखानी शहर धार्मिकदृष्ट्या तसेच अॅडव्हेंचर पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. उत्तराखंडमधील अनेक प्रसिध्द पदभ्रमण मोहिमांसाठी बेसकॅम्प म्हणून उत्तरकाशी परिचित आहे. उत्तरकाशी येथे माउंटेनरींग प्रशिक्षणासाठी प्रसिध्द असलेली ‘नेहरू माउंटेनरींग इन्स्टीटयूट’ सुध्दा आहे. बसमधूनच उत्तरकाशीचे दर्शन घेत आम्ही सैंज, भटवारी, गंगनानीमार्गे गंगोत्रीचा मार्ग चोखाळला. गंगनानी विशेषतः गरम पाण्याच्या झ-यांसाठी प्रसिध्द आहे. चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचा येथील गरम पाण्याच्या कुंडामध्ये स्नान करून मगच पुढे गंगोत्रीला जाण्याचा प्रघात आहे. गंगनानीनंतर रस्ता अधिकच निसर्गरम्य आणि तितकाच दुर्गम सुध्दा होत जातो.
ट्रेकिंग आणि सफरचंदाच्या बागांसाठी प्रसिद्ध असलेल्या हर्षिल व्हॅलीच्या खोऱ्यातून जाताना डोळ्यांचे पारणे फिटून जाते. हर्षिल खोरं अत्यंत रसाळ आणि चविष्ट सफरचंदाच्या लागवडीसाठी प्रसिध्द आहे. ओक, देवदार आणि पाईन वृक्षांनी हर्षिल व्हॅली समृद्ध आहे. रस्त्याच्या कडेकडेने सफरचंदांच्या बागा बहरलेल्या होत्या. स्थानिक लोकांनी पिकवलेली फळभाज्यांची सेंद्रिय शेती नजरेस पडत होती. एरव्ही डिसेंबर ते मार्च बर्फाच्छादीत असणारे हे एकाकी खोरे उन्हाळी दिवसांमध्ये नवसंजीवनी प्राप्त झाल्यासारखे निसर्ग सौंदर्याने खुलून जाते. खळखळणाऱ्या भागीरथी नदीचा प्रवाह, घनदाट देवदारांचे जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट, लगडलेल्या सफरचंदांच्या बागा अगदी नवचैतन्य देणारे आणि आल्हाददायक वाटत होते!


हर्षिल खो-यामध्ये ‘भूतिया’ समाजाचे लोक वास्तव्यास आहेत. हर्षिल ट्रेकर्सचे नंदनवन म्हणून सुध्दा प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात गंगोत्रीचे मंदिर बर्फाच्छादीत राहात असल्याने गंगोत्री मंदिरातील गंगामातेची मूर्ती हर्षिल गावापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘मुखबा’ गावी हिवाळी वास्तव्यासाठी आणली जाते. हर्षिल गावाच्या नावाबाबत ज्ञात असलेली मिथके अगदी रोचक कथेप्रमाणेच आहेत.
पौराणिक कथांनुसार ‘जालंधर’ नावाचा राक्षस राजा होता. त्याने देव-देवतांना भंडावून दहशत निर्माण केलेली होती. जेव्हा देव आणि जालंधर राक्षसामध्ये युध्द होत असे तेव्हा देवांचा पराभव करून तो अधिकाधिक शक्तिशालीच होत असे. हयामागे खरी पुण्याई होती जालंधरची पत्नी वृंदा हिची! वृंदेच्या पातिव्रत्यामुळे आणि भक्तीने विष्णु तिच्यावर प्रसन्न झाले. विष्णूने वृंदाला वरदान दिले की, जोपर्यंत तिचे पातिव्रत्य ती जपेल तोवर तिच्या पतीला-जालंधराला युद्धामध्ये कोणीही नामोहरम करू शकणार नाही. परिणामी जालंधर उन्मत्त झाला. सर्व देव-देवतांनी विष्णूला आवाहन करून जालंधरच्या त्रासापासून सोडविण्याची विनंती केली. विष्णूने वृंदाचा उपमर्द करण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु त्यात यश आले नाही. सरतेशेवटी विष्णूने जालंधरचे रूप घेऊन वृंदेचे पातिव्रत्य भंग केले आणि परिणामी भगवान शंकराने जालंधर राक्षसाचा वध केला. वृंदाला जेव्हा ही सत्यस्थिती समजली तेव्हा तिने विष्णूला शाप दिला की, माझ्या पतीच्या म्हणजे जालंधरच्या साम्राज्यात तुझे शिळेसारखे तुकडे होऊन विखुरतील म्हणून हया ठिकाणाचे नाव ‘हर्षिल ’ झाले. हया ठिकाणाबद्दल दुसरी कथा अशी सांगितली जाते की, ‘जालंधरी’ आणि ‘भागीरथी’ हया जलदेवता नेहमी परस्परांमध्ये झगडत असत. त्यांच्या भांडणांमुळे परिसरामध्ये दहशत निर्माण झाली आणि तेथील रहिवाश्यांनी विष्णूची प्रार्थना करून हया दोहोंमधील विकोपाला गेलेला वाद मिटविण्याचे आर्जव केले. विष्णूने जालंधरी आणि भागीरथी नद्यांच्या मधोमध त्यांच्या संगमावर स्वत:ला शिळेच्या स्वरुपात प्रस्थापित केले म्हणून हया ठिकाणाला ‘हर्षिल ’ संबोधले जाते. म्हणजे शिळेच्या स्वरुपातील विष्णू! पुराणकथा काहीही असो, हर्षिल निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण नटलेले आहे. हर्षिल मध्ये सैन्याच्या छावण्या देखील आहेत. हर्षिल गावातून जाताना प्रत्येक घराच्या अंगणात, परसदारामध्ये सफरचंदे लगडलेल्या जाळ्या नजरेस पडत होत्या. त्या सफरचंदांच्या झाडाला लगडलेली लालबुंद फळे पाहून खुपच कुतुहल वाटत होते. कोबी, फ्लॉवर सारख्या भाज्यांचे मळे सुध्दा दिसत होते. डोंगरद-यांचा हा नयनरम्य रस्ता अखेरीस गंगोत्री धाम जवळ येऊन थांबतो.
गंगोत्री धाम
मंदिरापासून काही अंतरावर वाहनतळ असल्यामुळे आम्ही बसमधून उतरून मंदिराच्या दिशेने चालू लागलो. अन् अचानक ‘बम बम बोले’ अशी आरोळी ठोकत एक लहानगा “नीलकंठ महादेव” साक्षात समोर उभा ठाकला. नखशिखांत शंभू महादेवाचे सोंग घेऊन एक छोटा मुलगा सर्व भाविकांकडे भिक्षा मागत हिंडत होता.


आल्हाददायक हवा आणि निसर्गरम्य गंगोत्रीच्या परिसराने मनाला भुरळ पाडली. परंतु हिंदू मंदिरे आणि त्यांचा परिसर हयाची एक गजबजलेपणाची ओळख मात्र सुस्पष्ट दिसत होती. जसजसे मंदिर जवळ येऊ लागले तसे प्रसाद, गंगाजल भरून नेण्यासाठी गॅलन इत्यादी वस्तू विक्रीस असलेली दुकाने थाटलेली दिसू लागली. दुतर्फा असलेल्या दुकानांच्या रांगांमधून आम्ही गंगोत्री मंदिराच्या परिसरात प्रवेश केला.
गंगोत्री मंदिराच्या विस्तीर्ण फरसबंदी प्रांगणात उभे राहिल्यानंतर चौफेर नजर टाकताच गंगोत्री मंदिराचे स्थान किती निसर्गरम्य परिसरात आहे हयाची जाणीव झाली. खरं तर दुपारचे तीन वाजले होते. परंतु अवघ्या आकाशात गडद भुरक्या ढगांनी दाटी केली होती. भर दुपारी शहारा येईल अशी हुडहुडी आणणारी थंडी होती. चौफेर नगाधिराजांचे सुळके त्या आच्छादनातून मान उंचावत होते. कायम बर्फाच्छादीत राहिल्यामुळे पर्वतराज बोडके दिसत होते. पण त्यांच्या खालच्या अंगाला फर, स्प्रूस, ओक आणि देवदारांची हिरवीगार वस्त्रे लेवून जणू त्यांचा बोडकेपणा ढगांच्या पडद्यामध्ये लपवित होते.
‘गंगोत्री धाम’ गंगोत्री शिखर समूहामध्ये गढवाल हिमालयात समुद्रसपाटीपासून १०,२०० फूट उंचीवर वसलेलं हिंदूच्या पवित्र तिर्थांपैकीच एक स्थान तर आहेच, परंतु गंगेचे उगम स्थान म्हणून अधिक परिचित आहे. गंगोत्री पर्वत समूहामध्ये प्रामुख्याने चौखंबा, केदारनाथ, थलयसागर, शिवलिंग, मेरू आणि भागीरथी शिखरांचा समावेश आहे. हे नगाधिराज एकत्रितपणे गंगोत्री ग्लेशियरर्स तयार करतात. हया पर्वतांपैकी शिवलिंग पर्वताला भगवान शंकरांचे प्रतिकात्मक स्वरूप मानले जाते. गंगोत्रीधामचा परिसर ‘गंगोत्री राष्ट्रीय उद्यानाचा’ संरक्षित भाग असून वन खात्याच्या अखत्यारीत येतो.
गंगोत्रीधामला गंगा नदीच्या उगमाचे स्थान समजले जात असले तरी गंगोत्री पासून १९ किलोमीटर पुढे ‘गोमुख’ हिमनदीचे स्थान हे गंगा नदीचा उगम आहे. गाईच्या मुखासमान असणा-या उगम स्थानाला गोमुख म्हटले जाते. गोमुख पर्यंत चालत जावे लागते. गोमुख पर्यंतचा रस्ता सुंदर आणि निसर्गरम्य असला तरी गोमुख पर्यंतचा ट्रेक आव्हानात्मक आहे असे सांगितले जाते.

विस्तीर्ण प्रांगणात शुभ्र दगडांनी बांधलेले गंगा मैयाचे मंदिर पाहून आनंद झाला. गंगा नदी ही भारत वर्षासाठी जलमाता! म्हणून तिचा ‘‘गंगामैया’’ असाच उल्लेख केला जातो. या गंगामैयाला गंगोत्री मंदिर समर्पित आहे. गढवाल हिमालयाच्या कुशीत वसलेले हे तीर्थस्थळ त्याच्या खास महतीसाठी प्रसिध्द आहे. हीच ती भूमी जिथे स्वर्गास्थित गंगादेवी भगिरथाने पृथ्वीतलावर नदी रूपाने आणली आणि अवघ्या भारत वर्षाला कृतार्थ करीत गंगा प्रवाही झाली. भगिरथ शिळेजवळ गंगामातेचे धवल रंगाचे मंदिर तिच्या पावित्र्याचे प्रतिकात्मक स्वरूप घेऊन जणू परिसरात मांगल्याच्या अनेक लहरी प्रसारित करीत आहे असे वाटते. मंदिराच्या प्रांगणात भगिरथ राजाने तप करून गंगा मातेला आवाहन केले अश्या प्रकारचा मूर्तीरूप देखावा उभा केलेला आहे. मंदिराच्या गाभा-यामध्ये प्रवेशासाठी किंचित रांग होती. त्या रांगेत उभे राहून सभोवतालचा निसर्ग न्याहाळताना आनंदाच्या शीतल लहरींचा सुखावह स्पर्श होऊ लागला. ह्या तीर्थक्षेत्री येणारा प्रत्येक जण कृतकृत्य झाल्याचे समाधान घेऊन जात असेल! त्या निसर्गरम्य वातावरणात आपल्याला खरोखरच देवभूमीत आल्यासारखे वाटते. मंदिरातील घंटानाद, धूपाचा दरवळ, आणि सभोवतालचा निसर्ग हे सर्व काही आपल्याला अगदी स्वर्गीय वातावरणात घेऊन जातं!
निसर्गरम्य पार्श्वभूमी लाभलेल्या गंगोत्री मंदिरामध्ये गंगा, यमुना, सरस्वती यांची मूर्ती स्वरुपात स्थापना केलेली आहे. गंगा आणि यमुना मातेच्या मूर्ती सुवर्णालंकारीत आहे. भगिरथ आणि महादुर्गा-अन्नपूर्णेची देखील मूर्ती आहेत. मंदिरात गंगामातेचे दर्शन घेऊन मी प्रांगणात आले. मंदीरालगतच मुख्य गंगोत्री स्नानघाट आहे. गंगोत्री मंदिराजवळच भगीरथ शिळा आहे. ज्या ठिकाणी भगीरथाने तपस्या केली होती. गंगोत्रीच्या घाटावर अनेकजण आपल्या आप्तस्वकियांचे श्राध्दकर्म करण्यासाठी येतात. येथील मान्यतेनुसार ज्या दिवशी भगीरथाने गंगा पृथ्वीलोकी आणली तो दिवस ‘गंगा दशहरा’ म्हणून येथे साजरा केला जातो.





सतराव्या शतकापर्यंत सेमवाल पुजारी समाज गंगेच्या प्रवाहाची पूजा अर्चा करीत असत. अठराव्या शतकात गढवाल हिमालयाचे गोरखा सेनापती अमरसिंग थापा हे नेपाळमधून गंगोत्री भेटीसाठी आले तेव्हा स्थानिक पूजा-यांच्या आग्रहाखातर येथे मंदिराची उभारणी झाली. त्यानंतर विसाव्या शतकामध्ये जयपूर नरेश माधो सिंग यांनी मंदिराचा जीर्णोद्वार करून आजमितीस असलेले शुभ्र ग्रेनाइटपासून बनविलेले कात्युरी स्थापत्य शैलीमधील मंदिर आस्तित्वात आले. दरवर्षी अक्षय तृतीयेला गंगोत्री मंदिराचे ‘कपाट’ उघडले जातात आणि दिवाळीपर्यंत भाविकांसाठी मंदिर खुले असते. अन्य सहा महीने गंगोत्रीधाम बर्फाच्छादित राहत असल्याने हर्षिलजवळ ‘मुखबा’ गावी मूर्ती पूजेअर्चेसाठी स्थलांतरित केल्या जातात. मुखबा गावातील स्थानिकांची मान्यता अशी आहे की, त्यांची ग्रामदेवता समेश्वराची बहीण ‘गंगा’ भाऊबिजेच्या दिवशी आपल्या भावाला भेटण्यासाठी माहेरी मुखबा गावी येते आणि हिवाळ्याचे दिवस संपेपर्यंत माहेरचा पाहुणचार घेते. अक्षय तृतीयेला गंगोत्री मंदिराचे कपाट उघडले की मुलीची पाठवणी करतात त्याप्रमाणे रीतसर गंगेची ‘बिदाई’ केली जाते.
मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतानाच आपल्याला आपली पादत्राणे बाहेर काढून ठेवावी लागतात. अनवाणी पायाने थोड्या पाय-या उतरून स्नान घाटाच्या दिशेने एका मोठ्या घंटेचा नाद करून मी नदीजवळ गेले. पायऱ्या उतरल्यावर डाव्या हाताला प्राचीन भगीरथ तपस्थळी आहे. तिथे श्राद्ध-तर्पण केले जाते. घाटावर खूपच भाविकांची गर्दी होती. कर्मनिष्ठ किंवा तर्कशुद्ध विचार करणाऱ्या व्यक्तीवर देखील येथील वातावरण जणू संमोहन करते. आपल्यावरचा धार्मिक संस्कारांचा पगडा हयावेळी प्रबळ होतोच! भगिरथाने महत् प्रयासाने स्वर्ग लोकातून आणलेल्या गंगेला आपल्या घरात गंगा पूजनासाठी नेण्याची प्रथा आहे! मग या प्रथेला बगल कशी देणार बरं! अनवाणी पायाने खळाळून वाहणा-या भागिरथीच्या प्रवाहाच्या वरच्या अंगाकडे एकटीच चालत निघाले. शक्यतो भाविकांची पायरव कमी झालेल्या ठिकाणी नदीच्या पात्रात उतरून भगीरथ प्रयत्नाने स्वर्गलोकीची पृथ्वीवर अवतरलेली ही गंगा एका छोट्या बाटलीमध्ये भरून घरी नेण्यासाठी नदी काठाने दगड-गोट्यांमधून चालत राहीले. मोक्याची जागा पाहून नदीच्या प्रचंड खळाळून वाहत्या प्रवाहाला स्पर्श करण्यासाठी पाय रोवून उभे राहता येईल अशी जागा शोधली. एक क्षण माझ्या पायांना त्या भागीरथीच्या हिमनदीतून वितळून प्रवाही झालेल्या थंडगार पाण्याचा स्पर्श झाला आणि अंत:करणामध्ये आवेग दाटून आला. अवघ्या भारतवर्षाला संपन्न करणा-या जलमातेला नतमस्तक होऊन आदराने नमस्कार केला. सोबत नेलेल्या बाटलीमध्ये गंगाजल भरून घेईपर्यंत आनंदाश्रूंचा ओघळ गालांवरून वाहता झाला. भागीरथीच्या हिम वितळून प्रवाही झालेल्या थंडगार पाण्याने माझ्या पायाच्या संवेदना काही क्षण लुप्त झाल्या होत्या. मी नदी पात्रातून बाहेर येऊन तिथेच काठावर दगडांचा आधार घेऊन क्षणभर शांत चित्ताने बसून राहीले आणि अगदी लहानपणापासून ऐकत असलेल्या पौराणिक कथेचे स्मरण झाले.
कोणे एकेकाळी सागर नामक राजाने पृथ्वीवरील राक्षसांचा नायनाट करून सम्राटपद प्राप्त करण्यासाठी अश्वमेघ यज्ञ केला होता. आपले इंद्रासन बळकावले जाईल ह्या भीतीने इंद्राने भयभीत होवून अश्वमेघाचा अश्व लबाडीने समाधिस्थ असलेल्या कपिल मुनिंच्या आश्रमात नेऊन बांधला. सागर राजाचे साठ हजार पुत्र अश्वाला शोधतच कपिल मुनिंच्या आश्रमात आले आणि अश्वाला तिथे पाहताच आश्रमाची नासधूस केली. समाधी भंग पावलेल्या कपिल मुनींनी सागरपुत्रांना शाप देऊन राख केले. सागर राजा हा इष्वाकू कुळातला! त्याच्या तीन पिढ्यांनी हया पूर्वजांना सद्गती मिळावी म्हणून विष्णूची तपश्चर्या केली. परंतु राजा दिलीपचा पुत्र भगीरथ ह्याने विष्णूची आराधना आणि घोर तप साधना करून आपल्या तीन पिढ्यांना जे शक्य झाले नाही ते करून दाखविले. भगीरथाच्या घोर तपश्चर्येने विष्णू प्रसन्न झाले. भगिरथाने विष्णूकडे वरदान मागितले की, ‘‘देवा आमच्या कुळातील शापित पूर्वजांना सद्गती मिळावी, त्यांची रक्षा वाहून नेण्यासाठी व पूर्वजांचे श्राध्दकर्म करण्यासाठी स्वर्गलोकीची गंगा पृथ्वीतलावर अवतीर्ण करावी. भगवान विष्णूनी ‘तथास्तु’ म्हटले खरे! परंतु भगीरथाला सांगितले,‘‘ भगीरथा गंगेचा प्रपात इतका प्रचंड आहे की, स्वर्गातून गंगा पृथ्वीवर अवतरल्यावर प्रलय होवू शकतो! भगीरथाने त्यावर विष्णूंना उपाय सुचविण्यास सांगीतले. भगवान विष्णू म्हणाले, ‘‘गंगेचा प्रचंड आवेग थोपवून धरण्याचे सामर्थ्य फक्त सृष्टीचा संरक्षक भगवान महादेवांकडेच आहे. तू महादेवाकडे मदतीची याचना कर. असे सांगून विष्णू अंतर्धान पावले. देवाधिदेव महादेव म्हणजे भोळा सांब-आशुतोष! निर्मळ मनाने याचना करणा-यास तत्काळ प्रसन्न होणारे! भगवान शंकराने भगीरथाचा मनोदय ऐकून सत्वर होकार दिला. विष्णूनी त्यांच्या चरणाशी लीन असणा-या गंगेस पृथ्वी लोकात जाण्याचा आदेश दिला. परंतु आपल्या प्रभूच्या वियोगाचे अतीव दुख घेऊन गंगा महाभयंकर प्रलयकारी आवेगाने पृथ्वीच्या दिशेने कोसळू लागली. देवाधिदेव महादेवानी त्या गंगेच्या प्रलयकारी प्रवाहाला आपल्या जटांमध्ये धारण करून बंदिस्त केले. त्यानंतर महादेवांनी आपल्या जटा शिळेवर आपटून खुल्या केल्या आणि गंगेला छोट्या नद्यांच्या स्वरुपात पृथ्वीवर प्रवाही केले! भगीरथ प्रयत्नाने पृथ्वीलोकी गंगा अवतीर्ण झाली त्या पावन तिर्थाचेच नाव गंगोत्रीधाम! आणि भगीरथ प्रयत्नाने अवतीर्ण झालेल्या गंगेला ‘भागीरथी’ म्हणून ओळखली जाते. हिंदू पौराणिक कथा म्हणजे रंजक गोष्टींचा खजिना आहे. पण त्या हिमालयाच्या कुशीत गेल्यावर ह्या सर्व कथा अगदी सत्य वाटू लागतात इतके आपले मन हळवे होऊन जाते! मला भागीरथीच्या प्रचंड संवेगाने वाहणा-या प्रवाहाच्या नादाशिवाय काहीच ऐकू येत नव्हते. भागीरथीचा खळाळणारा प्रवाह पाहून खरंच भासू लागले की, जणू त्या अमृतधारा कांतीमतीच्या लहरी “शंकर शंकर, जय शिव शंकर” निनाद करीत पुढे प्रवाही होत आहे! गोमुख हिमनदीमधून उगम पावणारी गंगा भागीरथीच्या स्वरुपात मला खरोखरच पुण्यपावनी वाटत होती ! त्या भागीरथीचं ते स्वरूप पाहून आपल्याला खरोखरच अनुभूती होतात,
‘‘चिदानंद-शिव सुंदरतेची, पावनतेची तू मूर्ती,
म्हणूनी घेवूनी तुला शिरावर, गात महेश्वर तव महती,
जय गंगे भागिरथी, हर गंगे भागीरथी”
गंगा, यमुना, रामगंगा ह्या गढवाल हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांना समृद्ध करण्यासाठी अलकनंदा, सरस्वती, धेोली, मंदाकिनी, नंदाकिनी, पिंडर, गरुडगंगा, ऋषिगंगा, पातालगंगा, जाडगंगा, असिगंगा, केदारगंगा, लक्ष्मणगंगा अश्या अनेक हिमनद्यांचे योगदान आहे. किंबहुना गंगेला सदैव प्रवाही ठेवण्याचे काम ह्याच सरिता करत असतात. ह्या सर्व प्रवाहांना केदारखंडात गंगा म्हणूनच संबोधले जात असले तरी मुख्य गंगा गोमुख येथे उगम पावून भागीरथीच्या नावाने ओळखली जाते. भगीरथीने आणलेली ही प्रचंड जलधारा शंकराच्या जटांमधून मोकळी होत भागीरथीच्या रुपात गंगोत्रीहून हर्षिल, भटवाडी, उत्तरकाशी, टीहरी मार्गे देवप्रयाग जवळ अलकनंदेला भेटते आणि तिथून पुढे गंगा नाव धारण करते! बद्रीनाथच्या पूर्वेकडून सतोपंथ आणि भगीरथ खडक ह्या हिमाच्छादित पर्वतांमधून प्रसूत होणारी अलकनंदा बद्रीनाथ, जोशीमठ, चमोली, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, श्रीनगर मार्गे देवप्रयाग येथे भागीरथीला मिळते. संगमानंतर ही गंगा ३०० किलोमीटरचा प्रवास करून हरिद्वारला येते, उत्तर प्रदेशातील कन्नेोज येथे रामगंगेला येऊन मिळते. प्रयागराजला गंगा, यमुना, सरस्वतीचे मिलन होऊन गंगासागराच्या मीलनाच्या ओढीने अंदाजे २५२५ किलोमीटर अंतर प्रवास करून गोमुखातून निघालेली गंगा बंगालच्या खाडीमध्ये समर्पित होते.
त्या भागीरथीच्या सानिध्यात काही क्षण व्यतीत केले आणि माझ्या सर्व पूर्वजांचे स्मरण करून त्या जल मातेचे पाणी डोळ्यांना लावून पुन्हा माघारी वळले. वेळेचे बंधन असल्यामुळे त्या परिसराचा जड पावलांनी निरोप घेतला. डोळ्यांमध्ये सूचीपर्णी वृक्षराजी, त्यावर हिमाच्छादित शिखरांचे मुकुट, रूंजी घालणारे वेगवान ढग हयांचा नजारा कैद करून कानामध्ये भागीरथीच्या लहरींचा “जय शिव शंकर” निनाद साठवतच वाहन तळाकडे चालू लागले. आम्हाला पुन्हा उत्तरकाशी येथे मुक्कामी पोहोचण्याचे होते. भुकेमुळे पोटात भरलेली थंडी हुडहुड करीत होती. आम्ही गंगोत्री मंदिरापासून काही अंतरावरच परतीच्या वाटेवर एका धाब्यामध्ये गरमागरम राजमा-चावलचे जेवण घेऊन तृप्त झालो. हर्षिल येथे परतीच्या वाटेवर सफरचंदाची खरेदी केली आणि रात्री उशिरा उत्तरकाशी मुक्कामी पोहोचलो.
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.















यावर आपले मत नोंदवा