यात्रा केदारखंडाची

यात्रा केदारखंडाची – भाग ४

हिमालये तू केदारे

गंगोत्री दर्शन करून रात्री उशिराने उत्तरकाशीला पोहोचलो. सकाळचे प्रस्थान नियमानुसार भल्या पहाटेच  होणार होते. आम्ही पहाटे लवकर तयार होऊन पुढच्या प्रवासास निघालो. इतकी वर्षे ज्या ठिकाणाबद्दल उत्कंठा होती त्या दिशेने प्रवास सुरू झाला. चारधाम यात्रेचा तिसरा टप्पा–केदारनाथ!

उत्तरकाशीहून आम्ही गुप्तकाशीकडे जाण्यास निघालो. परंतु आमचे दुर्देव आड आले! साधारण दोन-तीन तासाच्या प्रवासानंतर आमचे वाहन अचानक आजारी पडले. बसची दुरूस्ती होणं अत्यावश्यकच होतं! सकाळच्या चहाची वेळ ते दुपारचे लवकरचे जेवण- आधुनिक भाषेतलं brunch टाईम इतका वेळ आम्ही एक छोट्या गावात असलेल्या धाब्यावर बस गाडीची दुरूस्ती-मलमपट्टी होईपर्यंत गप्पाटप्पा करीत बसलो. आमच्या खानसाम्याने लगबगीने स्वयंपाकाचे सामान बाहेर काढून वेळेचा सदुपयोग केला. आमचे दुपारचे जेवण तयार करून आम्हाला खाऊ घातले. त्यानंतर आम्ही दिवसभर प्रवास करून नई टेहरी धरणमार्गे गुप्तकाशी येथे रात्री बारा वाजता मुक्कामी पोहोचलो.

नई टेहरी धरण मार्गे गुप्तकाशीकडे जाताना

आमची राहण्याची सोय गुप्तकाशी फाटा येथे हॉटेल शिवांश  गेस्ट हाऊसवर केलेली होती. दुस-या दिवशी पहाटे लवकर निघून केदारनाथाला जायचे असल्याने मोजकेच एका रात्री पुरते सामान सॅकमध्ये बांधून इतर सामानाची बॅग नीटनेटकी करून ठेवण्याचे निर्देश आमच्या ग्रुप लीडरने दिले होते. परंतु जेवण, निवडक सामानाची बांधाबांध असे सर्व करेपर्यंत मध्यरा‍त्रीचे अडीच वाजून गेले होते. पुन्हा पहाटे पाच वाजता सोनप्रयागला प्रस्थान होणार होते! झोपी जाता जाता केव्हा “बेड टी”ची आरोळी झाली कळले देखील नाही. भल्या पहाटे काळोखातच आम्ही सर्व तयार होऊन सोनप्रयागच्या दिशेने निघालो.  चारधाम यात्रेमुळे चारधामांजवळील अश्या छोटया मोठया गावांमध्ये हॉटेल, होम स्टे, गेस्ट हाऊसचे जणू पीकच आले आहे. परंतु यात्रा आणि पर्यटन यामुळे येथील निसर्गावर सीमेंट कॉंक्रिटच्या जंगलानी अतिक्रमण केलेले दिसत होते. सोमवारचा दिवस आणि केदारनाथची भेट हयाच्या ओढीने प्रवासाचा शीण कुठच्या कुठे पळाला. उपवास असल्याने माझी नाश्त्याला सुट्टी होती. माझे तुलनेने झटपट उरकले. आम्ही गुप्तकाशी फाटा येथून बसने सोनप्रयाग येथे येऊन पोहोचलो.

 बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेले हे हिमालयातील ज्योर्तिलिंग दर्शन खरं तर अवघडचं! बारा ज्योर्तिलिंग आणि पंच केदार असे दुहेरी महत्त्व प्राप्त झालेलं चारधाम यात्रेमधील तिसरे स्थळ म्हणजे केदारनाथ! अलिकडेच केदारनाथ सिनेमामुळे व्हीलॉग आणि इन्स्टाग्राम रिलच्या भाविकांची रेलचेल असलेले हे ठिकाण खूपच गजबजाटाचे झाले आहे.

वर्षानुवर्षे कानावर पडणा-या पौराणिक कथा, स्थळ माहात्म्य हयांची सांगड घालण्याचे काम आपले मन केव्हा करू लागते ते लक्षातही येत नाही. हया चार धामांचा प्रवास हाच एक अनुभव आहे. असे म्हटले जाते की, परमेश्वरी इच्छेशिवाय त्याचं दर्शन अथवा भेट शक्य होत नाही. हया उक्तीची सार्थता उत्तराखंड प्रदेशाच्या दुर्गम आणि विस्तीर्णपणामध्येच दडलेली आहे असू वाटू लागते! आले देवाजीच्या मना…. तरच सुफल संपूर्ण! हा अनुभव थोड्याबहुत प्रमाणात चारधाम यात्रेला आलेल्या प्रत्येकाला निश्चितच आल्याशिवाय राहात नाही.

 आम्ही गुप्तकाशीहून सोनप्रयागला आलो. सोनप्रयाग येथे यात्रेकरूंची नोंदणी केली जाते. सोनप्रयाग पंजीकरण केंद्राजवळ घोडेवाले, डोलीवाले, डंडी-कंडी वाले सर्वजण त्यांची ओळखपत्रे, परमीट घेवून यात्रेकरूंना गराडा घालतात. आमच्यापैकी बहुतांशी लोकांनी घोडे करण्याचे ठरविले. त्यामुळे यात्रा नोंदणी झाली. घोडेवाल्याचे पैसे देखील भरून झाले. आता आपला घोडा हाकणारा माणूस नेमका कोण? ह्याची पंचाईत होऊ नये म्हणून आम्ही घोडेवाल्यांची ओळखपत्रे आमच्या गळ्यात घालून सोनप्रयागच्या छोट्या अरूंद गल्ल्यांमधून गौरीकुंडच्या दिशेने चालू लागलो. आमच्या पाठीवर मोजकेच एका रात्रीच्या मुक्कामापुरते सामान घेऊन आम्ही निघालो. काही अंतर चालून गेल्यावर एका लोखंडी ब्रिजला पार करून आम्ही जीपगाडीने गौरीकुंड येथवर जाण्यासाठी आमचा नंबर कधी ह्याच्या प्रतीक्षेत उभे राहीलो. एकंदरीत सर्वत्र गोंधळ गडबडच होती. गौरीकुंड येथे जाण्यासाठी शेअर्ड जीपटॅक्सी करावी लागते. सोनप्रयागपासून साधारण चार-पाच किलोमीटर अंतरावर गौरीकुंड आहे. डोंगरकपारीच्या रस्त्यावरून आमची जीप धावत होती. एकंदरीत गाडी चालकांना सवारी पोहोचवण्याची धांदल होती. पण सोनप्रयाग ते गौरीकूंड दरम्यान चालणार्‍या ह्या जीप गाड्या सकाळची शुध्द हवा मात्र प्रदूषित करत होत्या! मनुष्य जिथवर जाईल तिथे निसर्गाचा -हास अटळच आहे.

आम्ही गौरीकुंड येथे पोहोचल्यावर आमचे घोडेवाले शोधले आणि आमचा सर्व कंपू केदार घाटीकडे मार्गस्थ झाला. वातावरणात ब-यापैकी गारवा होता. हवा देखील स्वच्छ होती. केदारनाथकडे जाणा-यांची वर्दळ जागोजाग होती. घोडेवाले, पायी जाणारे, पालखी, उंची-कंडी सर्वांसाठी रस्ता एकच!

 गौरीकुंड खरं तर केदारनाथ यात्रेचा पहिला पडाव! गौरीकुंडाचे सुध्दा पौराणिक माहात्म्य आहे. गौरीकुंडाला गरम पाण्याचे झरे आहेत. हया स्थानाबद्दल आख्यायिका अशी की, देवी पार्वतीने आपल्या तपश्चर्येने भगवान शिवाला प्रसन्न केले आणि आपल्या प्रेमाचा स्वीकार करावा अशी विनंती केली. हयाच ठिकाणी शिव-पार्वती सुतास म्हणजे बालगणेशास ख-या अर्थी ‘गजानन’ म्हणजे हत्तीचे शीर लावून ‘गजानन’ नाव प्राप्त झाले. येथील त्रियुगी नारायण मंदिरामध्ये शिव-पार्वतीचा विवाह संपन्न झाल्याचे सांगीतले जाते! त्रियुगी नारायणाचे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. तीन युगे हया मंदिरातील अग्निकुंड सदैव प्रज्वलित असल्याचे सांगीतले जाते.

 गौरीकुंडच्या रस्त्यावर छोटे धाबे आणि गल्ली-बोळ पार करत डोंगरकडेने केदारनाथ घाटीकडे रस्ता जातो. काही अंतर चालून गेल्यावर घोडेवाल्यांचा पडाव आहे. येथे आपल्याला सोनप्रयाग येथे दिलेले घोडेवाल्याचे ओळखपत्र दाखवून घोडयावर स्वार करतात आणि केदारनाथ पहाडांकडे घोडेवाले आपल्याला घेऊन निघतात. आमचा कंपू घोड्यांवर स्वार होऊन एकत्रच निघाला. मला मात्र त्या कोलाहलामुळे फार जीव नकोसा झाला. माणसांना वाहून नेणारे, सामान वाहतूक करणारे असे सर्वांची तिथे गर्दी उसळलेली होती. दुस-या घोड्यावरील असलेले सामान माझ्या गुडघ्याला आपटून लागत होते, त्यामुळे त्रास होवू लागला. आम्ही आपले घोड्यावरून, ‘अरे भैय्या देखो जरा, पैर को लग रहा है’ असे बोलत राहिलो. पण आमच्या घोडेवाल्याने एकदाही लक्ष दिले नाही! घोडेवाले मात्र ‘सवारी’ पोहोचवण्याच्याच नादात होते. मनात केदारनाथला आळवून प्रार्थना केली, बघ बाबा, माझ्या पायाने तुझ्या मंदिरापाशी चालत येण्यासाठी पाय शाबूत राहू दे रे शंभू महादेवा!  मला अमरनाथ यात्रेची आठवण झाली. अमरनाथाला अत्यंत अरूंद रस्त्यातून काळजीपूर्वक आपल्याला घोड्यावरून नेणारे बकरवाल आणि येथे फक्त सवारी खेचत नेणारे घोडयासोबतचे इसम! आपसूक तुलना होत राहिली! काही अंतर पार केल्यावर आम्ही चहासाठी एका टपरीवर थांबलो. आम्ही चहा घेतला, घोडेवाल्यांना देखील चहा-नाश्ता करण्यास सांगीतले आणि पुन्हा आमची ‘सवारी’ पुढे निघाली. केदारनाथ घाटीपर्यंत अनेक ठिकाणी छोटे-मोठे धाबे आहेत. यात्रेकरूंसाठी व्यवस्थित आखलेला रूंद मार्ग आहे. त्यामुळे खरं तर ट्रेक देखील सहज करता येण्यासारखा आहे. फक्त वेळेचे गणित जमणे गरजेचे आहे. हया पायवाटेवर अखंड वर्दळ चालूच असते. त्यामुळे ‘सोलो’ ट्रेक करून जाण्यासही काही हरकत नाही. क्वचित काही ठिकाणी दमविणारा ‘चढ’ आहे. परंतु संथ गतीने, विश्रांतीचे थांबे घेत चढता येऊ शकते. मला मात्र घोडा केल्याचा खूप पश्चाताप होऊ लागला.

आम्ही जसे उंची गाठू लागलो तसे मला का कुणास ठाऊक, घोड्यावर बसून जाताना डोळ्यांवर झांपड येऊ लागली. मी अत्यंत निग्रहाने झोप टाळण्याचा प्रयत्न करू लागले. मला झोप अत्यंत अनावर होऊ लागली. मी माझ्या हातामधील कॅमेरा गळ्यात अडकविला आणि मोबाइल जॅकेटच्या खिशामध्ये  ठेवून दिला.‘सिर सलामत तो पगडी पचास’ हया उक्तीप्रमाणे सतत ‘‘सावधान’’ रहाण्याचा प्रयत्न करीत होते. गौरीकुंडापासून केदारनाथची पायवाट साधारण सोळा किलोमिटरच्या टप्प्याची आहे. जंगलचट्टी, भीमबाली, रामबाडा, लिंचोली आणि केदारनाथ अश्या टप्प्यांमध्ये संपूर्ण ट्रेक रूट विभागला आहे. आमचा घोडेवाला अगदी हट्टालाच पेटल्यासारखा आम्हाला खेचतच नेत होता. हिमालयामध्ये एकदा बारा वाजून गेले की हवा बदलते. मग कशाचाही भरवसा नसतो. आम्ही केदारनाथ घाटी पूर्वी अगदी अंदाजे चार – पाच किलोमीटर अंतर शिल्लक असतानाच अचानक जोरदार गारांचा भडिमार होऊन पाऊस सुरू झाला. घोडेवाल्याला रस्त्याच्या कडेला आसरा घेण्यासाठी थांबवण्यास सांगितले. पण तो जणू ईरेलाच पेटलेला! भयंकर संताप उफाळून आला! प्रचंड गारांचा मारा आणि पावसाने भिजून आम्ही ओले चिंब झालो! चांगलीच हुडहुडी भरली! भर पावसात त्या घोडेवाल्याने आम्हाला केदारनाथच्या अलिकडे घोड्यांसाठी असलेल्या शेवटच्या थांब्यावर नेऊन एकदाचे पोचते केले. आमच्या ग्रुपची हया पावसात ताटातूट झाली. आम्ही केवळ दोघीजणी पुढे आलो. आणि प्रचंड गारठ्यात  नखशिखांत भिजल्यामुळे विचार यंत्रणा सुध्दा गोठून गेल्या गत झाले! परंतु नाईलाज होता. तिथे काही टपरीवजा धाबे होते. अवघं केदारनाथचं खोरं एव्हाना धुक्यानी गुडूप केले होते! आम्ही दोघींनी आमच्या इतर सख्या येईपर्यंत जवळच्या चहाच्या टपरीत आश्रय घेतला. चहा घेतला आणि किंचित उब मिळाली! परंतु पुन्हा आम्हा दोघींवर निद्रा देवीने पूरतं आधिपत्य गाजवण्याचे ठरविले हेाते जणू! आम्ही दोघी डुलक्या घेऊ लागलो. मला आज सगळ्या आठवणी जाग्या झाल्यावर कुतुहल वाटतंय की, मी इतक्या उंचीवरचे ट्रेक केले पण हा अनुभव कधी आला नाही! सोमवारचा उपवास आणि घोड्यावरून येऊन गाठलेली केदारनाथची उंची हयांनी एकत्र मिळून बहुधा निद्रा देवीला सहाय्य केलं तरं! मला आज आठवलं तरी हसू येते, घोड्यावर बसून झोप घेण्याचं अॅडव्हेंचर केलं तर आपण! आम्ही साधारण दुपारी दोन-अडीचच्या सुमारास केदारनाथला पोहोचलो. परंतु तिथून पुढे अजून बरंच अंतर चालत जाऊन केदारनाथ मंदिर परिसराजवळ असलेली आमचे गेस्ट हाऊस शोधण्याचं साहस शिल्लक होतं! पाऊस थांबला. थोडी उघडीप मिळाली आणि आमच्या मैत्रिणीही येऊन पोहोचल्या. आम्ही केदारनाथ मंदिर परिसराकडे चालण्यास सुरूवात केली. ठिकठिकाणी गेस्ट हाऊस, कॅम्पींग, हॉटेल, पर्यटक /यात्री आवास उभे राहीलेले दिसत होते. अजूनही विकास कामे सुरू होती. २०१३ मध्ये आलेल्या महाप्रलयाने खरं तर हया खो-यामधील छोट्या गावांना प्रचंड तडाखा दिलेला होता. यात्रेचा मार्गही बदललेला होता. केदारनाथ व्हॅली मध्ये हेलिकॉप्टरस  घिरट्या घालत होते.

मंदाकिनी नदीच्या तटावर वसलेलं शंभू महादेवाचे हे स्थान म्हणजे एक पर्वतराजीमध्ये वसलेलं शहरच झालं आहे जणू! केदारनाथच्याजवळ पोहोचल्यावर “व्हयू पॉइंट” सोडल्यावर दुरूनच केदारनाथ मंदिराचा कळस दिसू लागतो. तिथून दिसणारे दृश्य फारच विहंगम असते. नगाधिराज हिमालयाची पार्श्वभूमी, आणि दगडी केदारनाथ धाम मंदिर! प्रथमच दृष्टीक्षेपात झालेले मंदिराचे दर्शन मन हळवं करून जाते! त्या भावनांचे शब्दांकन जरा अवघडच!

“शैल सुंदर अति हिमालय, शुभ मंदिर सुन्दरम् ”

” निकट मंदाकिनी सरस्वती, जय केदार नमाम्यहम्’’

तिथूनच आपले हात सहजच जोडले जातात. तिथवर पोहोचेपर्यंत झालेल्या शारीरिक त्रासाची भरपाई होते जणू केवळ तेथील दृश्यानेच! आम्ही आमच्या ‘जलाराम’ गेस्ट हाऊसला पोहोचलो, ओले चिंब झालेले कपडे बदलून मंदिराकडे धाव घेतली. एव्हाना दुपारचे तीन वाजून गेले होते. वातावरणामध्ये ब-यापैकी गारवा होता. पावसाने विराम घेतलेला होता. थोड्या उघडीपीमुळे मंदिर परिसर न्याहाळता आला. सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा होती तरी ब-यापैकी गर्दी होती. भाविकांची रांग दर्शनासाठी दूरवर गेली होती. परंतु रांगेसाठी रीतसर कापडी छत असलेल्या शेड बांधलेल्या होत्या.

केदारनाथ हेलिपॅडकडून साधारण ५०० मीटर अंतरावर सहा फूट उंच चौकोनी चबूत-यावर बांधलेले केदारनाथाचे मंदिर आहे. रूंद पाय-या चढून गेल्यावर आपण मंदिराच्या प्रांगणात पोहोचतो. खरं तर जशी हिंदुस्थानामधील अनेक तीर्थस्थळे गजबजलेली आहेत, थोडे बहूत तेच स्वरूप केदारनाथधामचेही  झाले आहे. पाय-यांच्या दुतर्फा प्रसादाची दुकाने, त्यामागे गेस्ट हाऊसेस, लॅाजेस् हयांचे सीमेंट-कॉंक्रिटचे आक्रमण केदार घाटीत ठळकपणे जाणवत होते.

मंदिर परिसरातून घंटानाद, ध्वनिक्षेपकावर वाजवली जाणारी भक्तिगीते, परिसरामध्ये पेटलेल्या धुनी, त्यांच्याजवळ बसलेल्या वैरागी साधकांच्या हाती वाजणारा डमरूचा आवाज हया सगळ्यामुळे एक वेगळीच वातावरण निर्मिती झालेली होती. आम्ही मंदिरापासून काही अंतरावर सुरू झालेल्या रांगेत उभे राहीलो. केदारनाथाचे एक पुजारी श्री दिपनारायण शुक्ल हयांचा आमच्या कुटुंबाशी परिचय असल्याने मी त्यांना केदारनाथाला येत असल्याचे कळविले होते. रांगेत उभे असतानाच त्यांचा फोन आला. आणि ते सुध्दा मंदिर परिसरातच असल्याचे समजले. मला रांगेत उभे असताना शुक्लाजी भेटले आणि विशेष पूजेसाठी देवस्थान ट्रस्टकडे रीतसर पावती फाडून पैसे भरण्यासाठी सोबत घेऊन गेले. मी शुक्लजींच्या  सोबत अभिषेकासाठी पैसे भरण्यास गेले तेव्हा त्यांनी मला मंदिर परिसराची आणि इथल्या पूजा आणि विधींची माहिती दिली. केदारनाथ मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी  सकाळी सहा वाजता खुले केले जातात. दुपारच्या जेवणाचे दरम्यान तीन ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मंदिर बंद केले जाते. पुन्हा संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले होते. सायंकाळी महादेवाच्या पंच मुखी अलंकृत मूर्तीचे भाविकांना  दर्शन घडते. संध्याकाळी सहा ते सात विशेष आरती केली जाते.

आम्ही केदारघाटीमध्ये पोहोचून गेस्ट हाऊसवर जाऊन ताजेतवाने होऊन पुन्हा मंदिर परिसरामध्ये येईपर्यंत पाच वाजले होते. मला शुक्लजी परस्पर मंदिरामध्ये घेऊन गेले. मी दिपनारायणजींसोबत मंदिराच्या मंडपातून प्रवेश केला. मंदिराच्या प्रवेशद्वारावर मोठा पाषाणाचा नंदी शंभू महादेवाकडे पाहात असल्याप्रमाणे उभा आहे. मंडपाच्या अंतर्गत भागात पांच पांडव, द्रौपदी, पार्वती माता, भगवान श्रीकृष्ण आणि वीरभद्र व इतर देवतांच्या कोरलेल्या मूर्ती आहेत. मंदिराला गर्भ ग्रह आहे आणि तिथे स्वयंभू शिवलिंग आहे. संध्याकाळचे वेळी भाविकांची दर्शनासाठी रांग होती आणि प्राधान्याने प्रथम पावती घेतलेल्या भाविकांच्या हस्ते षोडशोपचारे पूजा अर्चा चालू होती.

२०१३ मध्ये उत्तराखंडामध्ये आलेल्या विध्वंसक पुराने केदारनाथ गावाला जलसमाधि मिळाली होती. मंदिर परिसराचे खूप नुकसान झालेले होते, परंतु दगडी केदारनाथ मंदिराला मात्र त्याची झळ पोहोचली नव्हती ह्याचे खूप कुतूहल वाटले! केदारनाथ मंदिरामध्ये शृंगारमूर्ती पंचमुखी आहे. मनाला भोळ्या सांब-सदाशिवाचे शृंगारीक पंचमुखी धातुच्या मूर्तीचे दर्शन खूप भावले. मी समाधानाने मंदिरा बाहेर आले. मला पहाटे तीन वाजता महाअभिषेकाची वेळ मिळालेली होती. मा‍झ्या सख्या अजूनही रांगेत दर्शनासाठी प्रतिक्षेत होत्या. संध्याकाळची आरती सुरू होण्यास पाऊण एक तासाचा अवधी होता. मला मंदिर आणि परिसरामध्ये निवांत फेरफटका मारण्यासाठी उसंत मिळाली.

सर्व बाजूंनी उंचच उंच हिमाच्छादित पर्वत शिखरांनी वेढलेलं हे दुर्गम ज्योतिर्लिंग मंदिर खूपच भव्य-दिव्य भासत होतं. वास्तु कलेचा उत्कृष्ट आणि अद्भूत नमूना असलेले केदारनाथ मंदिर रेखा-शिखर, कत्युरी स्थापत्य शैलीमधील असून समुद्रसपाटीपासून १३००० फूट उंचीवर करड्या रंगांच्या दगडांनी बांधलेले आहे. धातुनी  हे दगड परस्परांना जोडून ही वास्तु बनविलेली आहे. इतक्या उंचीवर दुर्गम हिमालयात ह्या मंदिराचे असणे हा खरच कुतुहलाचा विषय आहे! या मंदिराचा आणखी एक अनोखा पैलू म्हणजे त्याची उत्तर-दक्षिण दिशा! सर्व साधारणपणे मंदिरे ‘पूर्व-पश्चिम’ दिशेत बांधली जातात. किंबहुना हया मंदिराची स्थापत्य शैली आणि वास्तु रचना हयामुळेच सन २०१३ मध्ये आलेल्या महाभयंकर हिमप्रलयाच्या पुराच्या तडाख्यामध्ये हया मंदिराची वास्तु कोणतीही पडझड न  होता आजही तशीच भव्य-दिव्य भासते! मंदिराच्या गर्भ गृहामध्ये शिवलिंग नसून त्रिकोणाकृती खडकाच्या शिळेच्या स्वरुपात सदाशिव भगवान शंकर ‘केदारनाथ’ म्हणून निवासी आहेत. गर्भ गृहामध्ये जाऊन त्या पंचकेदाराचे दर्शन कधी एकदा पहाटे होईल हयाची उत्कंठा लागून राहिली!

केदारनाथ मंदिराच्या मागील बाजूस ‘अमृत कुंड’ आहे. वदंता अशी की, हयाचे जल प्राशन केल्याने अमरत्व प्राप्त होते! अशी अनेक कुंड मंदिर परिसरामध्ये आहेत. मंदिराच्या मागे नव्यानेच पुर्नजिवीत करण्यात आलेले आदि शं‍कराचार्यांचे समाधी स्थळ आहे. अर्धा किलोमीटरच्या परिघात क्षेत्रपाल-भैरवाचे मंदीर आहे. रेतस कुंड, हंस कुंड अश्या कुंडाजवळ येथील पुरोहीत यात्रेस आलेल्या यजमानांना पितृतर्पण आणि पिंड दान करवितात. केदारनाथच्या प्रमुख महंतांना ‘रावल’ म्हटले जाते. रावल हे दक्षिण भारतीय नम्बोदरी ब्राम्हण असल्याचे सांगतात आणि पंचकेदारांच्या पूजेचा मान त्यांचा असतो असे सांगीतले जाते. हे सर्व उखीमठ, गुप्तकाशी अश्या जवळच्या गावांमध्ये रहिवासी आहेत.

मंदाकिनी तटी स्थित केदारनाथ मंदिर अत्यंत प्राचीन असल्याचे सांगीतले जाते. खरं तर त्याच्या निर्मितीबाबत वदंता आहेत. राहूल सांकृतायनांच्यानुसार बाराव्या किंवा तेराव्या शतकातील हे मंदिर. आदि शं‍कराचार्यांनी हया प्राचीन मंदिराचा जीर्णोद्वार केल्याचे सांगितले जाते. हजार वर्षांपूर्वी स्थापित झालेल्या हया मंदिराच्या निर्मितीची कथा थेट महाभारताच्या पौराणिक कथेशी जोडलेली आहे. कुरूक्षेत्री पांडवांनी कौरवांना मारल्यानंतर आपल्या आप्तस्वकीयांचा आपणच नाश केला हया अपराधी भावनेने, पातकातून मुक्त होण्यासाठी भगवान शिवाकडे याचना केली. परंतु सांब सदाशिव पांडवांवर नाराज होते. त्यांना सहज सुलभ दर्शन देण्याची त्यांची इच्छाच नव्हती. पांडव शिवाची आराधना करून भेट घेण्यासाठी प्रथम काशीला गेले. पण भगवान शिव शंकर तेथून अंतर्धान पावून थेट गुप्तकाशीला गेले. तेथून बैलाच्या रुपात केदार क्षेत्री प्रकट झाले. पांडव देखील भगवान शिवाला शोधतच त्यांच्या मागे हिमालयापर्यंत येवून पोहोचले. पांडव आपला पाठलाग करीत असल्याचे लक्षात आल्यावर भगवान शंकर तेथील इतर बैलामध्ये मिसळले. पांडवांना शिवाने बैलाचे रूप घेतल्याचा संशय आल्याने बलशाली भीमाने विशाल रूपधारण करून दोन डोंगरांवर आपले पाय पसरविले. इतर गाय-बैल पशू त्याच्या पायाखालून निघून गेले. परंतु बैल रूपातील महादेवाला भीमाच्या पायाखालून जाणं कदापि रूचणारं नव्हतं! भीमाने त्या बैलावर चालून जाताच बैल जमिनीमध्ये जाऊ लागला. तेव्हा भीमाने बैलाचा त्रिकोणी कुबडा पकडला. महादेव पांडवांचा त्यांना भेटण्याचा दृढ संकल्प आणि भक्ती पाहून प्रसन्न झाले आणि पांडवांना आपल्या रुपात दर्शन देऊन त्रिकोणाकृती पिंडाच्या स्वरुपात केदार क्षेत्री वास करेन असे वचन दिले आणि केदारनाथाची प्राणप्रतिष्ठा झाली! ही कथा इथेच संपत नाही, तर महादेवाने जमिनीत लुप्त होण्याचा प्रयत्न करताना त्याच्या शरीराचे पाच भाग वेगवेगळ्या पाच ठिकाणी विखुरले. त्या पाच ठिकाणांना ‘पंचकेदार’ म्हणून ओळखले जाते.  महादेवाच्या जटा ज्या ठिकाणी विखुरल्या ते ‘कल्पेश्वर’, भुजा/बाहू जिथे लुप्त झाल्या ते ‘तुंगनाथ’, मुख जिथे विखुरले ते ठिकाण ‘रूद्रनाथ’ आणि नाभी आणि पोटाचा भाग जेथे विखुरला ते म्हणजे ‘मदमहेश्वर’! ही सर्व शिवाची प्राचीन मंदिरे एकाच वास्तु शैलीत केदार खंडामध्ये आहेत. चारधाम यात्रेप्रमाणेच पंचकेदारांच्या यात्रेचे विशेष माहात्म्य आहे.

माझी तंद्री घंटानादाने भंग पावली. केदारनाथाची संध्या आरती सुरू झाली. मंदिराला रोषणाई केलेली होती. बाहेरच्या प्रांगणामध्ये सर्व भाविकांचा जनसमुदाय जमा झाला होता. मी अगदी प्रमुख प्रवेशव्दारापाशी कॅमेरा सरसावून जागा पटकावली. त्या केदारनाथाचे माहात्म्य आणि पौराणिक कथांच्या विचारात अगदी मग्न होऊन वेगळ्याच विश्वामध्ये हरवून गेले. मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांचा कोलाहल असला तरी त्या प्रांगणामध्ये दगडी मंडप आणि गर्भगृह असलेले शिल्पवत मंदिर मला चुंबकिय लहरी प्रसारित करणारं वाटलं! सभोवतालचा परिसर, हिमाच्छादित पर्वत शिखरे जणू केदार नाथावर छत्र-चामरे धरून होती. प्रसन्न, मंगलमय वातावरण, शुद्ध हवा आणि देवतात्मा हिमालयाच्या कुशीत वसलेली केदारनगरी आरतीच्या जयघोषात अवघी शिवमय झाली. सहा ते सात वाजेपर्यंत आरतीचा विधीवत कार्यक्रम चालू होता. आरती संपल्यानंतर प्रसन्न मनाने आम्ही आमच्या नियोजित खानावळीमध्ये रात्रीचे जेवण करण्यास गेलो. माझा सोमवारचा उपवास महादेवाच्या दर्शनाने संपन्न झाला. आम्ही पुन्हा गेस्ट हाऊस कडे गेलो आणि लवकरच झोपलो. आम्हाला भल्या पहाटे केदारनाथास अभिषेक करावयाचा होता. मला गारांच्या पावसात भिजल्यामुळे अंगात ज्वर भरून आला. मी तापाचे औषध घेऊन झोपी गेले खरी! पण त्या त्रिकोणाकृती पिंडीच्या दर्शनासाठी मन उत्कंठित होते.

आम्ही सर्व जणी मध्यरा‍त्रीच दोन वाजता उठून आळी पाळीने तयार झालो. आणि तीन वाजता केदारनाथाच्या मंदिरापाशी जाऊन थांबलो. दीपनारायणजी लगेचच येऊन आम्हाला मंदिरात घेऊन गेले. मंडपातून गर्भ गृहामध्ये प्रवेश करून उजव्या बाजूने आत गेलो.

केदारनाथ -शंभू महादेवाचे त्रिकोणाकृती पिंडामधील स्वरूप पाहून मन भरून आले. डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहू लागले. पुरोहितांच्या सांगण्यांनुसार त्या त्रिकोणाकृती पिंडाला दूध-घृत मर्दनाने पूजा करण्याचे विशेष महात्म्य आहे. आमच्याकडून पुरोहितांनी षोडशोपचाराने पूजा करून घेतली. प्रत्यक्ष पिंडाचे दर्शन घेतले आणि यथासांग अर्चना केली. परिक्रमा केली. भल्या पहाटे साडेतीन चारच्या सुमारास थंडगार हवेत मंदिराच्या प्रांगणात वेगळ्याच अनुभूती घेऊन आम्ही समाधानाने काही वेळ बसलो. पुन्हा गेस्ट हाऊसला जाऊन विश्रांती घेतली. सकाळी उजाडल्यावर परतीच्या प्रवासासाठी तयार होऊन निघालो. पुन्हा आपसूकच मंदिराकडे पाय वळले. स्वच्छ हवा, निरभ्र आकाश आणि कोवळे ऊन हया मुळे वातावरण आल्हाददायक होते. निळ्या आकाशात शुभ्र हिम पर्वतांच्या दंतूर पंक्तीच्या पार्श्वभूमीवर ‘केदारनाथाचे’ दगडी मंदिर शोभून दिसत होते. ‘केदारनाथ’ म्हणजे त्या क्षेत्राचा अधिपति! ख-या अर्थाने प्रभू! हिमालय आणि पौराणिक दंतकथा हयाचे नातेच अतूट आहे. केदारश्रृंगावर विष्णूच्या अवतारापैकी नर-नारायण ऋषिनी तपश्चर्या केली. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांनी केदारनाथाला ज्योर्तिलिंगाचे स्वरुपात निवास करण्याचे वरदान त्यांना दिले. दुर्गम हिमालयामध्ये निरव शांततेत परमात्म्याचा वास असल्याच्या अनुभूति झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा कोणत्याही तार्किक युक्तीवादाची गरज भासत नाही. सत्य शिव आहे, शिव हेच सत्य आहे ही भावना दृढ होत जाते. पौराणिक संदर्भाचा विचार केल्यावर मला नेहमी असे वाटते की, प्रत्येक देव प्रतिकात्मकरित्या आपल्याला एका भूमिकेची जाणीव करून देत असतो. मग ते विष्णू अथवा शिव असोत किंवा युगंधर श्रीकृष्ण असो वा रघुपति राजाराम! आत्मसंयम ही पूर्णार्थाने जीवन समृद्ध करण्याची गुरूकिल्ली आहे. क्षमाशील होऊन दु:ख व वाईट गोष्टींना हातासरशी  वेगळे करून पुढे चालावं हयाचा बोध शिव शंकर देत राहतात. तर दुस-यासाठी नेहमीच चांगलं चिंतावे आणि चांगली कर्म करावी हा मार्ग विष्णू दाखवितात.

आम्ही नव्याने निर्माण केलेल्या आदि शं‍कराचार्यांच्या समाधी स्थळाला भेट दिली. शं‍कराचार्यांची भव्य प्रतिमा येथे उभारण्यात आलेली आहे. मंदिर परिसरामध्ये मन रेंगाळत होतं! त्या परिसरात शांत चित्ताने ध्यानस्थ बसून रहावं असं वाटत होतं! मानवी जीवनाच्या भौतिक सुखाच्या सर्व भावनांचा निचरा होऊन तळाशी जावा आणि आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे याचं भान व्हावं असं वेगळ्याच अध्यात्मिक लहरींचे वातावरण! यात्रेहून आल्यानंतरही  कित्येक महीने उलटून गेले तरी पापण्या बंद केल्यावर शुद्ध भावनेने त्याचा धावा केल्यावर मला मन चक्षुंसमोर मी जणू त्या केदार क्षेत्री असल्याचा पुन्हा पुन्हा भास होत राहतो. त्या केदारश्रृंगावरून येणारी शीतल आल्हाददायक हवा मनाला आशेचा सुखद गारवा देऊन जाते. मंदाकिनीच्या संतत प्रवाहाचा नाद कानामध्ये गुंजू लागतो, आणि ओंकारच्या नादमय वातावरणात घेऊन जातो! अन् मुखातून आपसूक शब्द येतात,

‘‘ पंच धन्य विशाल आलय, जय केदार नमाम्यहम्

नाथ पावन हे विशालम् पुण्यप्रद हर दर्शनम्”

केदारनाथहून पायी आम्ही पुन्हा गौरीकुंडमार्गे, सोनप्रयागला येऊन फाटा येथील आमच्या गेस्ट हाऊसवर येऊन रात्री पोहोचलो. आम्हाला फार रात्र झाल्याने कसे बसे अन्न खाऊन झोपी गेलो. दुस-या दिवशी भल्या पहाटे अलकनंदेच्या तीरी वसलेल्या नर नारायणाचे दर्शन घ्यायचे होते!


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

पृष्ठे: 1 2 3 4 5

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑