यात्रा केदारखंडाची – अंतिम भाग
नरनारायणाचे वसतिस्थान – बद्रिनाथ धाम
चारधाम यात्रेपैकी तीन धामांचे आनंदमयी दर्शन करून आम्ही श्री बद्री विशालच्या दर्शनासाठी उत्सुकतेने पहाटेच गुप्तकाशी-फाटा येथून भल्या पहाटे निघालो. आतापर्यंतच्या प्रवासात खरं तर कोणतीच अडचण उद्भवली नव्हती. एकदा चमोली जिल्हा सुरू झाला की, देवभूमीतच आहोत असे वाटू लागते. प्रवासा दरम्यान पंचबदरी, पंचप्रयागांचे दर्शन होते. त्याच सोबत भुसभुशीत हिमालयाचा अनुभवही पावलोपावली येतो. अनेक ठिकाणी दरडी कोसळून रस्त्यावरची वाहतूक ठप्प झालेली असते. रस्तेच्या रस्ते खचून वाहून जातात, दरडी कोसळतात. येथील रस्त्यांची फारच बिकट अवस्था होऊन जाते. आमचा गुप्तकाशी/फाटा ते बद्रिनाथ हा टप्पा सुमारे दोनशे किलोमीटर अंतराचा होता. हया प्रवासाच्या दरम्यान आम्ही उखीमठ, अगस्त्यमुनीमार्गे रूद्रप्रयाग-जिथे अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांचा संगम होतो, त्या पंचप्रयागांपैकी एक असलेल्या शहरामधून पुढे नंदप्रयाग, गोपेष्वर, पीपलकोटी मार्गे जोशीमठाच्या रस्त्यावर पोहोचेपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ झाली.

बद्रीनाथकडे जाणारा रस्ता ओळखीचा वाटू लागला. काही वर्षांपूर्वी ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ ट्रेक साठी आले होते तेव्हा हयाच रस्त्यावरून प्रवास केला होता. आम्ही जोशीमठ पासून साधारण १३ किलोमीटर दूर दुपारच्या जेवणासाठी थांबलो. अगदी रस्त्यालाच असलेल्या हॉटेलचा एक कोपरा पकडून आमच्या खानसाम्याने जेवण तयार केले. पोटपूजा आटोपून आम्ही पुन्हा जोशीमठाच्या दिशेने रवाना झालो.
समुद्र सपाटीपासून सुमारे ६१५० फूट उंचीवर वसलेलं चमोली जिल्ह्यामध्ये असणारं जोशीमठ हिमालयीन पर्वतारोहण मोहिमा, तीर्थयात्रा हया सर्वांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहे. किंबहुना जोशीमठाला पदभ्रमण मोहिमा अथवा तीर्थयात्रा हयासाठीचे ‘बेस कॅम्प’ म्हणून ओळखले जाते. आदि शंकराचार्यांनी स्थापना केलेल्या चार प्रमुख पीठापैकी एक ‘पीठ’ म्हणून जोशीमठाची ओळख आहे. अगदी सातव्या आणि अकराव्या शतकांच्या दरम्यान कात्युरी राजांचे येथे आधिपत्य होते. कुमाउॅं खो-यामधून येथील राज्याचा कारभार चालत असे असा ऐतिहासिक संदर्भ दिला जातो.
जोशीमठ मधील अति प्राचीन नरसिंह मंदिर आणि शंकराचार्य मठ प्रसिध्द आहेत. भगवान विष्णूची नरसिंह अवतारामध्ये येथे पूजा केली जाते. शंकराचार्यानी स्थापना केलेल्या हया मंदिरामध्ये नरसिंह मूर्तीबाबत स्थानिक दंतकथा सांगितली जाते की, नरसिंह मूर्तीचा डावा हात अगदी केसा इतका बारीक आहे. ज्या दिवशी तो हात मोडून पडेल त्या वेळी बद्रिनाथाच्याजवळ असणारे नर-नारायण पर्वत परस्परांमध्ये मिसळून एक होतील. त्या दिवशी बद्रिनारायणाचे सदय स्थितीत असणारे मंदिर नाहीसे होऊन पुन्हा शाळीग्रामच्या स्वरुपात ‘भविष्य बदरी’ हया नव्या ठिकाणी प्रस्थापित होईल. भविष्य बदरी हे जोशीमठ पासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर आहे. हिवाळ्यामध्ये जेव्हा बद्रिनाथाचे मंदिर बर्फाखाली जाते तेव्हा श्री बद्रीनारायणाची मूर्ती नरसिंह मंदिरामध्ये सहा महीने हिवाळी वास्तव्यासाठी आणली जाते व तिथेच त्यांची पूजा अर्चा होते.
जोशीमठ भौगोलिकदृष्टया तितकेच महत्त्वाचे आहे. येथे इंडो-तिबेटीयन सरहद्दीजवळ असणारी भारतीय सैन्याची छावणी आहे. राष्ट्रीय महामार्गावर असणारं जोशीमठ जणू एका पहाडाच्या कुशीत वसलेले आहे. हिमालयाचे प्रवेशद्वार असणार्या जोशीमठला नैसर्गिक सौंदर्यासोबत आल्हाददायक हवामानाचा सुध्दा वरदहस्त लाभलेला आहे! खुद्द नर नारायणाचे वसतिस्थान असल्यावर निसर्गाचे वरदान तर असणारच! जोशीमठ अजून एक गोष्टीसाठी प्रसिध्द आहे, ते म्हणजे आशिया खंडातील उंचीवरचा सर्वात लांब ‘रोपवे’! जोशीमठपासून औली येथे ये-जा करण्यासाठी हया रोपवेचा वापर होतो. पर्यटकांसाठी तर हा रोपवे एक खास आकर्षणच आहे.
जोशीमठच्या छोट्या वळणदार रस्त्यांवरून आम्ही पुढे बद्रिनाथाच्या दिशेने निघालो. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (बीआरओ) सौजन्याने येथील रस्त्यांची देखभाल, डागडुजी होतच राहते! त्यामुळे आपला प्रवास सहज सुलभ होतो. एकंदरीतच हा प्रदेश भुःस्खलन प्रवण असल्याचे जाणवते. आम्ही जोशीमठ नंतर गोविंदघाटाच्या रस्त्यावरून जाताना ‘हेमकुंड’ आणि ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ट्रेक’च्या आठवणी जाग्या झाल्या. लक्ष्मण गंगा आणि अलकनंदा नदीच्या संगमावर गोविंदघाट येथे गुरूद्वारा आहे. हया गुरुद्वाराचे विशेष महत्त्व म्हणजे ‘हेमकुंड साहिब’ यात्रेची आणि ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ हया पदभ्रमण मोहीमेची सुरूवात तेथूनच होते. गुरूद्वारा मध्ये यात्रेकरू असो अथवा ट्रेकर्स प्रत्येक वाटसरूला आश्रय आणि लंघरमध्ये खानपान सेवा मोफत सुरू असते. आम्ही काही वर्षापूर्वी बद्रिनाथकडे जाणारा रस्ता खचल्याने माघारी परतताना हयाच गुरुद्वारामध्ये रात्रीचा आश्रय घेतला होता.
गोविंदघाटनंतर हिमालयाचे वास्तविक स्वरूप लक्षात येऊ लागते. रस्त्याच्या एका बाजूला उंच-उंच जाणा-या डोंगर-कपारी आणि दरीमधून वाहणारी अलकनंदा! इथून पुढे जागोजागी रस्त्याचे काम चालू होते. आम्ही दरीखोर्यांमधील डोंगर कुशीत वसलेली गावे, त्यांची पिवळी-गुलाबी शेते असा नजारा पहात आमची बस आता डोंगरकुशीतून काढलेल्या वळणा वळणांच्या रस्त्याने हळूहळू उंची गाठू लागली. काही अंतर पार केल्यावर काही पहाडांचे सुळके अगदी नजरेच्या समोर दिसू लागले. रस्ता अत्यंत अरूंद आणि धोकादायक होता. टप्प्या टप्प्याने उंची गाठत साधारण सहाच्या सुमारास आमची बस बद्रिनाथ येथे पोहोचली. बद्रिनाथ गावाच्या प्रवेशापाशीच यूथ हॉस्टेलची इमारत आहे. आम्हा सर्वांना स्त्रीया आणि पुरूष अशी विभागणी करून दोन मोठ्या डोरमेटरिज मध्ये आमची राहण्याची सोय करण्यात आली. गाडीमधून बाहेर पडताच बद्रिनाथाच्या हवेमधील बदल प्रकर्षाने जाणवला. दिवसभरच्या प्रवासाने खूपच थकवा आलेला होता. परंतु यात्रेचा शेवटचा टप्पा! बद्रिनाथाचे, त्या नर-नारायणाचे दर्शन घेतल्याशिवाय समाधान मिळणार नव्हते!
आम्ही यूथ हॉस्टेलवर पोहोचताक्षणी तेथील वीज गायब झाली. त्यामुळे आम्ही सर्व लगबगीने आवरून मंदिराच्या दिशेने निघालो. युथ हॉस्टेलपासून पायी साधारण दीड किलोमीटर अंतरावर बद्रिनाथ मंदिर आहे. आम्ही मंदिराजवळ पोहोचेपर्यंत संध्याकाळचे साडेसात वाजलेले होते. गावामधील छोट्या मोठ्या गल्ली बोळांमधून मंदिर परिसरात असलेल्या दुकानांच्या गर्दीतून वाट काढत मंदिराजवळ असलेल्या लोखंडी पुलापाशी पोहोचलो.
अलकनंदेच्या तीरावर वसलेल्या श्री बद्रिनारायणाच्या मंदिराची झगमगणारी रोषणाई नजरेत भरत होते. काळोखात अलकनंदेचा फक्त खळखळाट ऐकू येत होता. लोखंडी पुलाच्या अलीकडून दिसणार्या बद्रिनारायणाच्या मंदिराने हृदयाचा ठाव घेतला. त्याच्या स्तुति गीतामधील चरण किती सार्थ आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेत होते!

‘‘पवन मंद, सुगंध शीतल, हेम मंदिर शोभितम् ।
निकट गंगा बहत निर्मल, श्री बद्रिनाथ विश्वंभरम् ।। ’’
बद्रिनाथाचे मंदिर अलकनंदेच्या उजव्या काठावर आहे. बद्रिनाथ तिर्थाचे नाव सुध्दा एका आख्यायिकेवर आधारित आहे. भगवान विष्णू हया स्थळी तपश्चर्येला बसले असता विष्णु पत्नी लक्ष्मीने एका जंगली बदरी नाव असलेल्या फळ झाडाच्या रुपात भगवान विष्णूचे कडक उन्हापासून संरक्षण करत त्यांना छाया प्रदान करत राहिली. त्यामुळे हया तीर्थास ‘बद्रिनाथ’ असे नाव पडले असे म्हटले जाते.
नदीवरचा पूल पार करून मंदिराच्या दिशेने जात असताना आपली नजर मंदिराच्या सुंदर पिवळ्या, निळ्या, लाल रंगांनी सुशोभित केलेल्या प्रवेशद्वारावर खिळून राहते. हे रंगीत प्रवेशद्वार ‘सिंहद्वार’ म्हणून प्रसिध्द आहे. बद्रिनाथ मंदिर अंदाजे ५० फूट उंच असून त्यावर एक लहान सोन्याचे छत असलेला कपोला आहे. मंदिर सर्व साधारणपणे तीन भागात विभागलेले आहे. गर्भ गृह- जिथे साक्षात बद्रीनारायण आसनस्थ आहेत. जिथे पूजा विधी केले जातात तो दर्शन मंडप आणि यात्रेकरू एकत्र जमतात तो सभा मंडप.
बद्रिनाथ मंदिराच्या प्रवेशापाशी मुख्य मूर्तीसमोर बद्रीनारायणाचे वाहन – गरूड मूर्ती विराजमान आहे. मंदिराच्या भिंती, खांब हयांवर अत्यंत सुरेख कोरीव काम केलेले आहे. मुख्य गर्भ गृहामध्ये काळ्या शाळीग्रामच्या स्वरुपात श्री बद्रीनारायणाची शंख आणि चक्रधारी मूर्ती अर्धं पद्मासनात जणू ध्यानस्थ बसलेली आहे. गाभा-यामध्ये बद्रिनारायणाच्या समवेतच लक्ष्मी देवता, नारदमुनी हयांच्या प्रतिमा सुध्दा आहेत. दुस-या बाजूला कुबेर, नर-नारायण, उध्दव, नव दुर्गा असे सर्व देव देवता उपस्थित आहेत.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर काही काळ यात्रेकरूची रांग रोखून धरलेली होती. त्यामुळे थोडीफार रांग वाढत गेलेली होती. त्यामुळे प्रवेशद्वारापासून गाभा-याच्या मंडपापर्यंत खूप गर्दी झालेली होती. त्या गर्दीतून पार होत प्रत्यक्ष बद्रीनारायणाचे साक्षात दर्शन मनमोही होते. आम्ही ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ म्हणत एक एक पाऊल पुढे टाकत त्या गर्दीमधून साक्षात भगवंतासमोर त्याच्या नजरभेटीस उभे येऊन ठाकलो. सच्च्या मनाने त्याच्या भेटीस गेल्यानंतर नकळतच मिळालेला सात्विक आनंद डोळ्यातून गालावर वाहता झाला. तेथील गर्दीमुळे लवकरच पाय काढता घ्यावा लागला. आम्ही परिक्रमा करून बाहेर सभामंडपात सर्व जणी स्थिरावलो. माझ्या मैत्रिणीने तर चक्क मला मिठीच मारली आणि तिला रडू कोसळले! आम्हा दोघींची २०१९ मध्ये अपूर्ण राहीलेली त्याच्या दर्शनाची इच्छा आज पूर्ण झालेली होती. आम्हाला झालेला आनंद अगदी अवर्णनीय होता! आमची चारधाम यात्रा निर्विघ्नपणे पार पडली होती. आम्ही सर्व जणांनी एकत्र बसून बद्रीनारायणाची प्रार्थना केली आणि मंदिराच्या आवारात अगदी समाधानपूर्वक विसावलो. मंदिर परिसरामध्ये आसमंतात घुमणारा जय बद्रीविशालचा जयकारा ऐकून मन एकदम प्रसन्न झाले. आम्ही सर्वानी पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे बद्रीनारायणाचे शांतपणे दर्शन घेण्याचे ठरविले. मला चारधाम पूर्ण झाल्याचे एक वेगळेच आंतरिक समाधान वाटत होते. खरं तर युगपुरुष भगवान श्रीकृष्ण माझं आवडतं चरित्र! त्याचा धावा मनापासून कधीही कोणीही करावा अन् मदतीला कोणत्याही रुपात तो धावून येईल असा श्री कृष्ण सखा! अश्या त्या नर-नारायणाचे दर्शन घडले होते.
अधरं मधुरं वदनंम् मधुरम् , नयनं मधुरम् हसितंम् मधुरम् ।
हृदयं मधुरम् गमनं मधुरम्, मधुराधिपते अखिलंम् मधुरंम् ।।
आम्ही खरे तर दिवसभराच्या प्रवासाने थकलो होतो. परंतु बद्रीनारायणाच्या दर्शनाने प्रवासाचा शीण दूर पळून गेला. आम्ही यथावकाश मंदिराबाहेर आलो. बद्रिनाथ मंदिर परिसरात मोठी बाजारपेठच उभी राहीलेली आहे. प्रसादाच्या वस्तू, भेटवस्तू इत्यादींची दुकाने येथे येणा-या यात्रेकरूनी ओसंडून गेलेली असतात. आम्ही त्या बाजारपेठेला वळसा घालून पुन्हा पायी आमच्या निवास स्थानी पोहोचलो. वातावरणात प्रचंड गारठा वाढलेला होता. त्यात भर म्हणजे सायंकाळी लुप्त झालेली वीज अद्याप आलेली नव्हती. यूथ हॉस्टेल मधील स्वच्छतागृहामधील हिटर चालू नसल्याने नळातून बर्फासारखे थंडगार पाणी येत होते! त्यामुळे कसे बसे स्वच्छ होऊन किर्र काळोखात चाचपडतच जेवण-खाण करून आम्ही पुन्हा प्रात:समयी बद्रीनारायणाचे दर्शन घेण्यासाठी अंथरुणावर निद्रिस्त झालो!
दुसर्या दिवशी अगदी पहाटे लवकरच उठून आम्ही पाच वाजता मंदिरात गेलो. पहाटे मंदिरात फारशी गर्दी नव्हती. परंतु ज्यांच्या पूजा अर्चा होत्या, ती मंडळी मंदिरातील मंडपामध्ये त्यासाठी उपस्थित होती. आम्हाला परतीच्या प्रवासापूर्वी पुनश्च बद्रीनारायणाचे मुख दर्शन घ्यायचे होते. झुंजुमुंजु होताना हिमालयातील वातावरण, त्यावेळची स्तब्धता आणि शांतता एका वेगळ्याच अध्यात्मिक वातावरणात घेऊन जाते. पहाटेच्या वेळी गढवाल हिमालयीन पर्वतरांगांची पार्श्वभूमी लाभलेले नर-नारायण पर्वतांच्या मध्यभागी आणि पूर्वेकडून नीलकंठ पर्वताची पार्श्वभूमी असलेले समुद्र सपाटीपासून १०,१७० फूट उंचीवर अलकनंदेच्या काठावर वसलेलं हे छोटेखानी गाव – बद्रिनाथ अगदी एखाद्या पौराणिक कथेमधील देवभूमी वाटत होते! दिवसाचे दूत मोकळ्या आकाशात पर्वतरांगांवर ढगांच्या झुली मधूनच त्यांची चाहुल देऊ लागले. त्यांच्या पार्श्वभूमीवर रंगीबेरंगी बद्रिनाथाचे प्रवेशद्वार अद्भूत भासत होते. अलकनंदा खळाळून वाहत होती. जवळच गरम पाण्याचे झरे देखील होते. जसे दिवस उजाडू लागला, तसे आजूबाजूचा नजारा सुस्पष्ट होत होता. आदल्या दिवशी रात्रीच्या काळोखात परिसराचा अंदाजच आला नाही. अगदी नैसर्गिक वरदहस्त असलेल्या बद्रीकाश्रमात हया नर-नारायणाचे वास्तव्य आहे. ८ व्या किंवा ९ व्या शतकामध्ये आदि शंकराचार्यांनी अलकनंदेच्या प्रवाहात सापडलेल्या शाळीग्रामची स्थापना करून बद्रिनाथाचे मंदिर स्थापन केल्याचे सांगीतले जाते. हिमवादळे, भूकंप वा अन्य नैसर्गिक आपत्तींनी हया मंदिराला तडाखे दिलेले होते. परंतु गढवाली राजांनी पुन्हा मंदिर प्रस्थापित केले. एखाद्या बुद्धिस्ट विहाराशी साधर्म्य असणारी अशी मंदिराची स्थापत्य शैली आहे.

प्रात:दर्शन 

मंदिरलगतच अलकनंदेच्या प्रवाहाशेजारी गरम पाण्याची कुंडे
खरं तर मिथक कथेनुसार भगवान शिव-पार्वतीचा हया मंदिराचे ठिकाणी वास्तव्य होते. एका सकाळी अलकनंदेच्या प्रवाहात शुचिर्भूत होऊन परतताना शिव-पार्वतीला एका दगडावर तान्हे मुल रडताना दिसले. पार्वतीने त्या रडणा-या मुलाला घरी नेण्याचा हट्ट केला. परंतु शंकराने नकार दिला. परंतु दुस-या दिवशी सुध्दा पार्वतीने रडत असलेल्या मुलाला पाहून तिच्यातील ममत्वाने तिला त्या मुलास घरामध्ये उचलून नेण्यास भाग पाडले. आणि पार्वती भगवान शिवासोबत अलकनंदेच्या तीरावर निघून गेली. तिथून परत आल्यावर त्यांना घराचा दरवाजा बंद आढळला. काही केल्या घराचा दरवाजा उघडेना! भगवान शिवाने पार्वतीस प्रश्न केला की, त्या लहान मुलास तिने घरामध्ये आणले का? पार्वतीने होय, म्हणताच शिवाने उलगडा केला की, ते तान्हे मुल दुसरं तिसरं कोणी नसून भगवान विष्णू आहेत. विष्णू प्रकट झाले आणि म्हणाले, मला हे स्थळ आवडलं आहे. तपश्चर्येसाठी मला हे स्थळ अगदी उचित आहे, त्यामुळे हे घर आता माझे! शिव-पार्वती विष्णूसाठी त्यांच्याच घरातून निघून अन्य स्थळी गेले! भगवान शिव-पार्वतीने त्यांचे वास्तव्यासाठी शोध घेत केदारनाथ येथे आले आणि स्थायिक झाले! भगवान विष्णूने पटकविलेली त्यांची जागा आज बद्रीकाश्रम म्हणजे बद्रिनाथ! आम्ही मनोभावे बद्रीनारायणाचे भल्या पहाटे दर्शन घेऊन मंदिर परिसरातून बाहेर पडलो.
बद्रिनाथाचे मंदिर आणि महाभारताचे संदर्भ अगदी घनिष्ट आहेत. हया बद्रिनाथ गावातून पुढे सतोपंथ पर्वतरांग आहे. स्वर्गारोहीणीचे दुसरे नाव सतोपंथ असे सांगीतले जाते. पांडवांनी स्वर्गात जायचा मार्ग तेथूनच चोखाळला. पांच पांडव द्रौपदीसह स्वर्गात जाताना रस्त्यामध्ये गतप्राण झाले. केवळ युधिष्ठिर त्याच्या लाडक्या कुत्र्यासोबत सतोपंथावरून स्वर्गात गेल्याचे मानले जाते.
बद्रिनाथाच्या पुढे चार किलोमीटर अंतरावर हिंदुस्थानातील शेवटचे गाव ‘‘माणा’’ आहे. तिबेट सीमेच्या अगदी लगत असल्याने इथे सैन्याची छावणी, गस्ती पथके कार्यरत आहेत. अगदी पर्वत रांगांच्या कुशीत वसलेल्या ह्या छोट्याश्या माणा गावामध्ये बहुतांशी तिबेटीयन रिफ्यूजी येथे वास्तव्य करून आहेत. त्यांची स्थानिक हस्तकला, परंपरागत पध्द्तीने बनविलेल्या लोकरीच्या वस्तू अन्य नैसर्गिक उत्पादनांचे छोटे स्टॉल गावामधून जाताना दिसत होते. आम्ही दिवस सुरू होण्याआधी आल्याने दुकाने बंद होती. गावातील घरांच्या, इमारतींच्या भिंती छान चित्रांनी रंगवून सजविलेल्या होत्या. हया माणा गावामधूनच पुढे व्यास गुंफा आणि गणेश गुंफा आहे. व्यास गुंफा पहाडांमध्येच असून पोथीचे कागद/अथवा ग्रंथ एकावर एक रचल्यानंतर जसे दिसतील, त्या सदृश पहाडांचा आकार झालेला आहे. त्यास व्यास पोथी सुध्दा म्हटले जाते. त्याच ठिकाणी व्यासमुनींनी महाकाव्य महाभारताची रचना करून श्री गणेशाकरवी लेखन करून घेतल्याची मान्यता आहे. गणेशाने महाभारत कथेचे लेखन करण्यासाठी व्यासांना एक अट घातली होती ती म्हणजे, व्यासांनी अथक न थांबता महाभारताची कथा निवेदन करावी! व्यासांनी गणेशाची ही अट मान्य केली आणि जगविख्यात महाकाव्य महाभारत कथा लिखित स्वरुपात अवघ्या विश्वासमोर आले. मानवी जीवनाची मुल्ये शिकविणाऱ्या भगवद्गीतेचा संदर्भ हया महाकाव्याशी जोडला आहे. धन्य ते महाकाव्य रचनाकार आणि सर्व सुखकर्ता-दुखहर्ता, बुध्दी देवता, शिव-पार्वती पुत्र -गणेश!
माणा गांव
हया गावामध्ये पुढे भीमपूल आणि अदृश्य स्वरुपात वाहणारी सरस्वती नदी आहे. अन्य मान्यतांनुसार हया गावातून पुढे सतोपंथ/स्वर्गारोहीणी शिखरांवरून स्वर्गामध्ये जाणारा पूल असून पाच पांडव आणि द्रौपदी तेथूनच स्वर्गात गेले होते. परंतु त्यापैकी फक्त युधिष्ठिर हा धर्म पालक आणि सत्य वचनी असल्याने केवळ तोच एक सदेह स्वर्गात पोहचू शकला आणि इतर चार पांडव आणि द्रौपदी अत्यंत प्रतिकूल थंड हवामानामध्ये मृत पावले.
भारतीय पुराणकथा हया अत्यंत रोचक आणि आपल्या मनावर, विचारांवर गारूड करणा-या आहेत. त्यामधील मिथक किंवा वास्तव काय हयाची उकल करण्यापेक्षा हया सर्व गोष्टींनी दिलेला संदेश खूप मोठा आहे. महाभारतासारख्या महाकाव्याने अंहकार, भ्रष्ट विचार आणि असत्य, अनीतिचा केवळ पराजयच नव्हे तर विनाशच होतो हयाचा दाखला दिलेला आहे. जीवनात चांगले आचरण, नीतिने केलेले कर्म, सदाचार हयांची वैभव संपदा किती मोठी आहे हयाची शिकवण युग पुरुष भगवान श्रीकृष्णाने दिलेली आहे.
आत्मसंयमन ही पूर्णार्थाने जीवन समृद्ध करण्याची गुरूकिल्ली आहे. क्षमाशील होऊन दु:ख व वाईट गोष्टींना सहज वेगळे करून पुढे चालावं, सत्य हेच शिव आहे हयाचा बोध भगवान शंकर देत राहतात. तर दुस-यासाठी नेहमीच चांगलेच चिंतावे आणि चांगली कर्म करत राहावी हा मार्ग विष्णू दाखवितात.
चारधाम यात्रेला गेल्यावर हया पौराणिक कथा, देवतात्मा नगाधिराज हिमालय, त्याच्या दुर्गमपणा मध्ये असणारी एक अद्भूत शक्ती, जी आपल्याला सतत जाणीव करून देते की, जगण्यासाठी किती मर्यादित मूलभूत गोष्टींची गरज आहे! त्या देवभूमीमधील निसर्ग समृद्ध वातावरण, तेथील नीरव शांतता, निसर्गाचा निर्मळपणा आपल्या आचार-विचारांची थोडीफार का होईना आत्मिक शुध्दी करत राहतो! हिमालयाचे चेटूक उतरवणे फार कठीण! एकदा हिमालयात जाऊन आलेल्याला तो पुन्हा पुन्हा आपल्याकडे बोलावत राहतो. आणि मग लक्षात येऊ लागतं की ह्या हिमालयाच्या भूमीला तपोभूमी का म्हटले जाते!
आम्हाला माणा गावामधून लवकरच काढता पाय घ्यावा लागला. आम्ही आमच्या युथ हॉस्टेलवर परस्पर जीपने जाऊन थडकलो. सर्व यात्रा पूर्ण झाल्याच्या आनंदात फेर धरून यूथ हॉस्टेलच्या प्रांगणात नाचू लागलो. आता सर्वाचा निरोप घेण्याची वेळ होती. नाश्ता वगैरे उरकून आम्ही सामानाची बांधाबांध केली सर्वांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या आणि आम्हा सर्वांना घेऊन आमची बस पुन्हा माघारी ऋषिकेशकडे निघाली.
अखंड प्रवासात मला ‘शंकर-शंकर’ निनादणाऱ्या भागीरथीच्या लहरींचा निनाद, केदारघाटीमधील भगवान शिवाचे भव्य दिव्य मंदिर परिसर आणि वैभव संपन्न बदरी नारायणाचे मंदिर हयांनी संमोहीत केल्यासारखे भासत होते. चारधाम यात्रेची सांगता ऋषिकेशला झाली. मी मनोमन त्या विधात्याचे आभार मानले, कोणतीही अडचण, आपत्ती शिवाय आमची चारधाम यात्रा सुफल संपूर्ण झाली.
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.







यावर आपले मत नोंदवा