सन २०२० म्हणजे आपल्या सर्वासाठीच अनेक बऱ्या वाईट आठवणीचा कालखंड ठरला. मार्च २०२० मध्ये कोरोंना संक्रमणामुळे लॉकडाउन झाल्यानंतर सर्वजण अगदी पिंजऱ्यामध्ये अडकल्यासारखे झाले होते. मग आमच्यासारख्या दर सुट्टीला भटकंती करणार्यांची कथा काय वेगळी सांगावी! पण तेही दिवस सरले. हळूहळू आपण अनलॉकच्या प्रक्रियेतून जात असतानाच हिवाळा सुरू झाला. नवीन वर्षाचे नवे उपक्रम, नव्या आकांक्षा आणि मुख्य म्हणजे “आरोग्यं धनसंपदा” अशी खूणगाठ बांधून नव्याने सर्वजण कामकाजाला सरसावले! वर्क फ्रॉम होम करणार्यांनी अगदी “पहाडोंमे” जाऊन निसर्गाच्या सानिध्यात आपले कामकाज चालू ठेवले. अनेक अनुभवांचे किस्से सोशल मिडियावर वाचण्यास मिळाले. आम्ही मात्र प्रत्यक्ष डोंगर-दऱ्यांमध्ये कधी भटकंती करता येईल याच्या प्रतीक्षेत २०२० च्या नाताळाची सुट्टी दवडली.
हिवाळा सुरू झाल्यावर खरं तर गडकोट सर करणाऱ्या मंडळीमध्ये उत्साह संचारतो! यथावकाश ट्रेकिंग करणाऱ्या अनेक संस्थांनी देखील सह्याद्रीमध्ये छोटेमोठे ट्रेक सुरू केले. जानेवारी २०२१ उजाडला आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नेमकी संधी चालून आली, अगदी पनवेलजवळ असलेल्या ‘कलावंतीण दुर्गा’ला भेट देण्याची! खरं तर, मुंबई-पुणे महामार्गावरून जाताना डाव्या हाताला दिसणाऱ्या ह्या पर्वतरांगांची नजरभेट किती वेळा झाली असेल ह्याची मोजदाद नाही. पुण्याला अथवा खालापूर-कर्जतकडे जाताना असंख्यवेळा ह्या इंग्रजी “व्ही” आकार धारण करणाऱ्या डोंगररांगा नजरेला भिडलेल्या! पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या, तर एरवी करड्या रंगाची प्रावरणे धारण करून सदैव ठाम उभ्या असलेल्या ह्या पर्वतरांगा परिचयाच्या होत्या खऱ्या! परंतु हया पर्वतरांगामध्ये ‘दुर्ग’ म्हणण्या इतके सह्याद्री वैभव दडलेले असेल ह्याची अजिबात कल्पना नव्हती.

कलावंतीण दुर्ग म्हणजे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये, रायगड जिल्ह्यामधील पनवेलच्या पूर्वेला मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून माथेरानच्या डोंगररांगामध्ये दिसणारे समुद्रसपाटीपासून अंदाजे २२५० फूट उंचीचे एक छोटे शिखर! पनवेलपासून शेडुंग फाट्यावरून डावीकडे वळून अगदी ठाकूरवाडीपर्यन्त आपल्याला वाहनाने जाता येते. आणि ठाकूरवाडीमधून प्रबळमाचीमार्गे कलावंतीणीच्या सुळक्याकडे जाता येते.
माझी सखी प्रविणाने लॉकडाऊनमुळे आपली सुट्टी वाया गेली आहे, तर एखादा छोटा ट्रेल सह्याद्रीमध्ये करूया असे सुचविले. मी सुद्धा अनेक वर्षे सह्याद्रीची भटकंती केलेली नव्हती. तिला माहीत असलेल्या life incredible ह्या संस्थेने प्रजासत्ताक दिनानिमित्त “कलावंतीण दुर्ग”चा स्पेशल ट्रेक आयोजित केलेला होता. मला ध्वजवंदनानंतर पनवेलहून निघून सहज शेडुंगमार्गे ठाकूरवाडीपर्यन्त स्वतःच्या गाडीने जाणे शक्य होते. मी लगेचच होकार दिला.
प्रविणा २६ जानेवारीच्या दिवशी सकाळी लवकरच माझ्याकडे पनवेलला आली आणि आम्ही दोघी माझ्या गाडीने अगदी अर्ध्या तासामध्ये ठाकूरवाडीपर्यन्त पोहोचलो. ठाकूरवाडीला, प्रबळगडावर आणि कलावंतीणीकडे जाणाऱी पायवाट जिथून सुरू होते तिथे चक्क एक वाहनतळ तयार झाले होते आणि आम्ही तिथे जेव्हा पोहोचलो तेव्हा पार्किंग हाऊसफुल देखील झाले होते! हौसे-गवसे-नवसे आणि फक्त मौज मस्ती करणाऱ्यांची तोबा गर्दी उसळलेली होती.
सकाळचे दहा वाजण्याचा सुमार! लाइफ इनक्रेडीबल संस्थेचा स्वयंसेवक व इतर सहभागी ट्रेकर्स आमच्याच प्रतीक्षेत होते. आम्ही जंगलाच्या दिशेने चढण्यास सुरुवात केली. हवेत बऱ्यापैकी गारवा होता. मला खरोखरीच आश्चर्य वाटले, पनवेलजवळ असूनही मी ह्या ठिकाणापासून अनभिज्ञ होते. आम्ही इतर जणांची ओळख करून घेतली. गप्पा गोष्टी करत रमतगमत जंगलाच्या दिशेने वाटचाल करू लागलो. वाटेमध्ये बऱ्याच आदिवासी-ठाकर बांधवानी तहानलाडू -भूकलाडूची छोटीशी टपरीवजा दुकाने थाटलेली होती. काकडी, संत्री, लिंबू सरबत, चहा-बिस्कीटे इत्यादी गोष्टी विकण्यास ठेवलेल्या दिसत होत्या. जंगलातील झाडांवर लाकडी फळ्या आणि दोराच्या सहाय्याने झोपाळे टांगलेले होते, त्या झोपाळ्यावर झुलायचा मोह टाळता आला नाही.
गाडीच्या वाहनतळापासून अंदाजे तास-दीड तासामध्ये साधारणतः साडेअकरा वाजता प्रबळ माचीवर पोहोचलो. कलावंतीण दुर्ग हा माची प्रबळ आणि कलावंतीणीचा सुळका अशा दोन भागात विभागलेला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गडाच्या तळाचा भाग हा चढणीचा असून पुढे तो भाग पठारासारखा होतो, ज्याला माची प्रबळ म्हटले जाते. माचीकडे जाणाऱ्या मुख्य वाटेवर दगडात कोरलेली गणपतीची अन् हनुमंताची मूर्ती आहे. तिथून पुढील वाट अजूनच अरुंद आणि घसरणीची आहे. जंगलातून चढण चढून आल्यावर पठार सदृश भाग आहे. माची वरून इंग्रजी “व्ही” आकाराची पर्वतरांग सुस्पष्ट दिसते. दोन डोंगररांगा एका घळीमुळे विभागल्या गेल्या आहेत. डाव्या हाताला कलावंतिणीचा सुळका आणि दुसऱ्या बाजूला प्रबळगड! माचीवर ठाकर आणि आदिवासी समाजाची वस्ती आहे. ह्या दुर्गाशी माची प्रबळ गावातील आदिवासी समाजाचे अतिशय जिव्हाळ्याचे नाते आहे. दरवर्षी शिमग्याला आदिवासी बांधवांची येथे नृत्ये करण्याची परंपरा आहे. ह्या आदिवासी समाजाची अशी मान्यता आहे की, कोणी कलावंतीन राणी होती तिच्यासाठी हा दुर्ग बांधला गेला.
माचीवर नीलेश ह्या सद्गृहस्थाकडे चहा-नाष्ट्याची सोय केलेली होती. नीलेशने माचीवर केवळ खाण्यापिण्याचीच नव्हे तर कॅम्पींगची देखील उत्तम व्यवस्था ठेवलेली होती. त्याच्या राहत्या जागेसमोर माचीवर रीतसर छोटे छोटे तंबू थाटले होते. तिथून पनवेलच्या आसपासचा परिसर दृष्टीक्षेपात येत होता. मुक्कामासाठी माचीची जागा उत्तम आहे.

आम्ही नाश्ता -चहा झाल्यावर भरल्या पोटी आमच्या जंगल ट्रेलला सुरुवात केली. आम्हा दोघींची किंबहुना हा एक जंगल ट्रेक असावा हीच धारणा होती. माचीवरून दिसणारा कलावंतिणीचा दुर्ग सहज सोपा असावा अशी प्रत्येकाची भाबडी धारणा होऊ शकते! माचीमार्गे आदिवासी वाडीमधून दोन दिशाना जाणारा दिशा दर्शक डाव्या बाजूला कलावंतिणीच्या सुळक्याकडे जाणारा रस्ता दर्शवितो, तर उजव्या दिशेचा बाण प्रबळगडाकडे जाणारा रस्ता दर्शवितो. आम्ही कलावंतीण सुळक्याकडे जाणारा रस्ता प्रमाण धरून प्रबळगड आणि कलावंतीण सुळक्यामुळे तयार झालेल्या इंग्रजी “व्ही” आकाराच्या घळीपर्यंत येऊन पोहोचलो. त्या घळीपर्यंत अगदी सर्वसाधारण चढण होती. परंतु घळीच्या आसपास वाट अगदी अरुंद आणि घसरणीची होत गेलेली होती. हिवाळ्याचे दिवस असल्याने धिटाईने चढू शकलो. पावसाळ्यात हीच वाट बिकट आणि अगदी निसरडी होत असेल हे नक्की!
दुपारचे दीड वाजले होते. प्रचंड गर्दी होती. त्या घळीजवळ पोहोचल्यावर खरी जाणीव झाली की, आपण कुठे आलो आहोत! समोर खडा उभा कातळ! त्यावर रांगेत मुंगीच्या पावलांनी माणसे सुळक्याच्या दिशेने जात होती. जिथून सुळक्याकडे जाणारा रस्ता दिसत होता, ते खूपच थरारक दिसत होते. कातळांमधून कोणत्याही आधाराशिवाय सुळक्याकडे जाणारी वाट म्हणजे मोकळ्या सोडलेल्या दोरखंडाला धरून कातळावरून भिवविणाऱ्या दरीकडे न बघता पायऱ्यांच्या दिशेने एक-एक पाऊल टाकत जाणे! त्या खिंडीमध्ये एक टपरी होती. आम्ही दोघी बराच वेळ तिथे बसून सुळक्याकडे जाणाऱ्या माणसांकडे पाहत राहिलो. ही माणसे ह्या डोंगरामधून विनाआधाराशिवाय कशी बरं चालत आहेत? जंगल ट्रेकचे स्वप्न एव्हाना भर ऊनामध्ये विरले होते! आणि सह्याद्रीच्या कातळामधील थरार समोर साद घालत होता.

मी मान उंचावून त्या डोंगर रांगांमधून कूर्म गतीने जाणाऱ्या माणसांकडे पाहून विचार करत होते, माझ्या आयुष्यातील कित्येक वर्षे ह्या परिसरामध्ये व्यतीत झाली, ट्रेकिंगचा छंद असल्याच्या गप्पा मारल्या पण आपल्या शहराशेजारी असणाऱ्या ह्या दुर्गाची भेट कशी बरे झाली नाही! त्यामुळे, कितीही भय वाटले तरी त्या ‘व्ही’ आकाराच्या घळीपर्यंत येऊन दुर्ग न पाहता जाणे हे काही ठीक नाही! मनाचा हिय्या केला, आणि दोरखंडाला हात घातला. आमचा पाच-सहा जणांचाच ग्रुप होता, एकमेकांना धीर देत, आधार देत त्या कातळावरून पायऱ्यांच्याजवळ आलो. पहातो तर काय, डोंगराच्या पोटात खडक-कातळामध्ये कोरून, जणू दगड तासून ८० अंशांच्या कोनामध्ये माथ्याला भिडणाऱ्या एक ते दीड फूट उंचीच्या मोठ्या पायऱ्या काढून सुळक्याकडे जाणारा रस्ता तयार केलेला होता. कुठेही आधार अथवा आडोसा घेण्यास जागा नव्हती. अगदी exposed climb! एका वेळी एकच माणूस सहज पार होऊ शकेल इतकीच जागा! मागे वळून पहाण्याची सोय नाही कारण खाली घनदाट जंगलाची खोल दरी! डोंगरात खोदून सरळ उभ्या अंगावर येणाऱ्या पायऱ्या हेच तर खरं कलावंतीण दुर्गाचे वैशिष्ट्य आहे! मला त्या खडकामध्ये खोदलेल्या उभ्या पायऱ्यांकडे पाहून इथून पुढे जावे अथवा नाही असा विचार मनात घोंगावू लागला. पण अगदी शिस्तीने, सर्व अवधान पणाला लावून एक एक पायरी सर करत आम्ही भर उनात त्या थराराचा अनुभव घेतला. साधारण अर्ध्या तासाच्या अवधीमध्ये आम्ही त्या उंचच उंच पायऱ्या चढून बुरुजासारख्या भागाजवळ पोहोचलो. थोडा वेळ तिथे गवताने शाकारलेल्या एका झोपडीसारख्या टपरीत विसावलो. कलावंतिणीचा शेवटचा टप्पा म्हणजे २० ते २५ फुटाचा पिनॅकलसारखा दिसणारा काळ्या कातळाचा रॉक पॅच आहे. तो चढून जाण्यासाठी तिथे दोरखंड लावलेला आहे. रॉक क्लाइमबींग करत तिथे चढावे लागते. प्रत्यक्ष तिथे पोहोचल्यावर लक्षात येते की दुर्ग किंवा किल्ला म्हणता यावा असे काही आस्तित्वात नसले तरी कलावंतिणीच्या सुळक्यावरून परिसरातील इतर दुर्ग आणि परिसरांचे अवलोकन आणि निरीक्षण करण्यासाठी असलेला तो नैसर्गिक बुरूज होता! ह्या कलावंतीणीच्या शिखरावरून आपल्याला सहज टप्प्यात असलेली प्रबळगडाची पसरलेली डोंगररांग, दक्षिणेकडील प्रबळगडाचा माथा, इरशाळगड, माणेकगड, पूर्वेकडे माथेरानचा डोंगर, उत्तरेकडे चंदेरी, उत्तर पश्चिमेकडे पेबचा किल्ला, पश्चिमेकडे शहरवस्ती असा चौफेर मुलुख नजरेच्या टप्प्यात येतो. खऱ्या अर्थी कलावंतीण दुर्ग म्हणजे टेहळणीचा बुरूज!!




कलावंतीणीच्या सुळक्यावरून समोर प्रबळगड दिसत होता. काही ट्रेकर्स, भटके प्रबळगडावर फिरस्ती करताना नजरेस पडत होते. प्रबळगडाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पनवेल आणि कल्याण या प्राचीन बंदरांवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. किल्ल्यातील लेण्यांच्या अभ्यासावरून हा बुद्धकाळातील असल्याचे सांगितले जाते. शिलाहार व यादव घराण्यांनी या किल्ल्यात कोरलेल्या भक्कम मानवनिर्मित लेण्यांमुळे त्याला लष्करी छावणी बनवले व त्याला ‘मुरंजन’ असे नाव दिले. बहामनी साम्राज्याच्या काळात हे बांधले गेले असे मानले जाते.
त्यानंतर प्रबळगड अहमदनगरच्या निजामशाही घराण्याच्या अधिपत्याखाली आला. निजामशाही घराणे नेस्तनाबूत होण्याच्या उंबरठ्यावर असताना शहाजीराजे त्यांच्या मदतीला आले, पण शहाजी राजांचा पराभव करण्यासाठी मुघल सम्राट शाहजहान आणि विजापूरचा आदिलशहा यांनी स्वतंत्रपणे आपले सैन्य पाठवले. शहाजी राजांना हे कळताच त्यांनी आपले सैन्य किल्ले कोंढाणा व मुरुंबदेव येथे हलवले. त्यानंतर त्यांनी जंजिऱ्याच्या सिद्धींकडे मुघल व आदिलशाही सैन्याविरुद्ध मदत मागितली, पण त्यांनी मदत नाकारली, त्यानंतर शहाजी राजांनी पोर्तुगीजांकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. पण तोही अपयशी ठरला. शेवटी शहाजी राजे पत्नी जिजाबाई आणि तरुण मुलगा शिवाजी यांना घेऊन सैन्यासह मुरंजन किल्ल्यावर गेले. पुढे १६३६ मध्ये शिवरायांनी मुरंजन किल्ला सोडला. त्याच वर्षी माहुलीचा तह झाला, ज्यानुसार उत्तर कोकण मुघल साम्राज्याच्या अखत्यारीत गेले आणि त्यांनी मोबदल्यात विजापूरच्या आदिलशहाला या भागावर राज्य करण्याचा अधिकार दिला.
शिवरायांनी जेव्हा जावळी परिसराचा पराभव करून ताबा मिळवला, त्याचवेळी शिवरायांचे शूर सरदार आबाजी महादेव यांनी कल्याण, भिवंडी आणि रायरीचा परिसर जिंकला. आणि त्यावेळी किल्ले मुरंजन शिवरायांच्या स्वराज्यात आले. शिवरायांनी या किल्ल्याचे नाव “मुरंजन” वरून “प्रबळगड” (प्रबळ म्हणजे “बलवान”) असे बदलले. पुढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मुघल साम्राज्याच्या ताब्यात देण्यात आलेल्या तेवीस किल्ल्यांपैकी प्रबळगड हा एक किल्ला होता. मुघल सरदार जयसिंगने किल्ले प्रबळगडाची जबाबदारी केसरसिंग हाडा नावाच्या राजपूताला दिली. इ.स. १६५८ मध्ये शिवरायांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुन्हा एकदा किल्ला ताब्यात घेतला. मुघल सरदार केसरसिंग यांनी पराभव अटळ आहे हे ओळखून आत्महत्या केली. गडावरील राजपूत महिलांनी अपमानापासून वाचण्यासाठी जौहर (आत्मदहन) केले. किल्ल्यात लपून बसलेल्या केसरसिंगाच्या आई आणि मुलाला शिवरायांच्या आज्ञेने अभय मिळाले. तेव्हा किल्ल्याच्या तपासणीत अफाट संपत्ती सापडल्याचे सांगितले जाते. कलावंतीण दुर्गाकडे जाताना दिसणाऱ्या गुहा, आणि सर्वसाधारण दोन्ही डोंगर रांगांची संरचना पाहता प्रबळगडाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीशी कलावंतीण दुर्गाची अत्यंत जवळीक असावी!
आम्ही सुळक्यापर्यन्त जाऊन तिथे काही वेळ रेंगाळलो, परंतु पोटातल्या भुकेने परतीच्या वाटेची आठवण करून दिली. आम्ही पुन्हा त्या खडकातील अरुंद पायऱ्यांचा थरार अनुभवत आमची पावले माचीकडे नीलेशच्या घराकडे वळवली. आम्ही माचीवर पोहोचेपर्यंत संध्याकाळचे चार वाजले होते. त्याने आम्हाला गरमागरम जेवण खाऊ घातले. जेवण केल्यावर आम्ही पुन्हा गडावरुन ठाकुरवाडीकडे पायउतार झालो. गडावरुन उतरताना अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे दर्शन फार मनोरम होते.
आम्ही वाहनतळाजवळ येईपर्यंत सूर्य मावळला होता. सांज दाटून आली होती. तिथेच हंगामी टपरीवजा कॅंटीन मध्ये चहाचा सुगंध दरवळत होता. दुकान मालकिणीने नुकतेच टपरीतील पडवी शेणाने सारवली होती. आम्हाला तिने लाकडी फळ्या जोडून तयार केलेल्या बाकड्यांवर बसायला दिले आणि गरमागरम ब्लॅक टी दिला. चहाने होणारा श्रमपरिहार फक्त चहा पिणारेच जाणो ! चहा पिऊन मी पार्किंगमधून माझी गाडी रस्त्यावर काढली आणि आम्ही थेट पनवेलचा रस्ता पकडला. आमच्या सोबत असलेल्या ट्रेकर्सना पनवेल रेल्वे स्टेशनवर सोडून अनोख्या आनंदात घरी आले. गणराज्य दिनाच्या दिवशी ट्रेकिंगच्या परिभाषेत कठीण श्रेणीत मोडणाऱ्या, माझ्याच प्रांतात असणाऱ्या सह्याद्रीच्या कुशीतील एका आगळ्या-वेगळ्या दुर्गाची आज गाठभेट झाली होती!
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.

















यावर आपले मत नोंदवा