हिमाचल प्रदेश म्हटलं की आपल्याला सिमला-मनाली सारखी काही ठराविक पर्यटन स्थळे नजरेसमोर येतात. पण पर्यटकांचा गजबजाट, खोळंबलेली रहदारी आणि गर्दी ह्यामुळे आमच्या सारख्या ट्रेकिंगचा छंद जडलेल्यांचे मन अश्या गजबजलेल्या पर्यटन स्थळांमध्ये रमत नाही! मग शोध सुरू होतो काहीश्या बहुचर्चित नसलेल्या चाकोरी बाहेरच्या निसर्गरम्य ठिकाणांचा!
चारधाम यात्रेनंतर माझ्या हिमालयाचेही दर्शन झालेले नव्हते. त्यामुळे मनाची अवस्था तर अगदी, “झेपावे उत्तरेकडे” अशी झाली होती! मे २०२३ मध्ये लंडन सहली दरम्यान अनपेक्षितपणे उजव्या पायाला झालेल्या लिगामेन्ट दुखापतीमुळे अगदी शस्त्रक्रियेपर्यंत वेळ गेली. त्यामुळे लिगामेन्ट शस्त्रक्रियेनंतर वैद्यकीय सल्ल्याशिवाय एक वर्ष तरी ट्रेकिंग अथवा कोणतीही शारीरिक आव्हान असलेली गोष्ट करण्यास मनाई होती. संपूर्ण वर्ष कोणत्याही नवीन स्थळाला भेट देता आली नाही, आणि हिमालय दर्शन नाही याची मोठी रुखरुख मनाला लागून राहिलेली होती! लिगामेन्ट दुखापतीमुळे ऑगस्ट २०२३ मधील पूर्व नियोजित काश्मीर मधील “तारसार -मारसार” ट्रेक देखील रद्द करावा लागला होता. आजारपणामुळे मागे पडलेली कोर्टाची प्रकरणे आणि सगळाच कामाचा व्याप अगदी ह्या वर्षी मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीपर्यंत आटोक्यात आलेला नव्हता. उन्हाळी सुट्टीचे काहीच नियोजन करता आले नाही. परंतु पुन्हा कोर्टाच्या व्यापात अडकण्याआधी हिमालय दर्शन करण्याची खूप इच्छा होती. पण खूप गर्दी आणि पर्यटकानी गजबजलेल्या ठिकाणी तर अजिबात जायची इच्छा नव्हती. अचानक कोणतेही खास पूर्व नियोजन न करता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अगदी एका नितांत सुंदर, निसर्गरम्य, गजबजाट आणि कोलाहलापासून दूर असलेल्या – तीर्थन व्हॅलीची सहल करायची ठरवली.
मग काय! मी आयत्या वेळी मुंबई-दिल्ली-मुंबई विमान प्रवासाचे तिकीट काढले आणि दिल्लीहून पुढे हिमाचल प्रदेश टुरिझमच्या वॉल्वो बसने प्रवास करून तीर्थन व्हॅली गाठायची ठरवली! मी २७ मे २०२४ रोजी दुपारी होरपळणाऱ्या उन्हात दिल्ली विमानतळावर उतरले. मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी विमानतळाबाहेर टॅक्सीच्या प्रतीक्षेत असताना अंगाची लाहीलाही होत होती! एकंदरीतच ग्लोबल वॉर्मिंगमुळे आणि निसर्गाच्या र्हासामुळे पृथ्वी जणू आग ओकत आहे असा उष्मा होता. मला घरी पोहोचल्यावर थोडे हायसं वाटले. मैत्रिणीने थंडगार कलिंगड समोर आणून ठेवले आणि घरामध्ये आवराआवर करण्यास घेतली. मी यथेच्छ कलिंगडावर ताव मारून थोडी विश्रांती घेतली. मैत्रिणीने आमच्या रात्रीच्या हिमाचल प्रदेश टुरिझमच्या वॉल्वो बसचे बुकिंग करून ठेवले होते. काश्मिरी गेट बस स्थानकामधून रात्री ८ वाजता बसचे प्रस्थान होणार होते. मला खरं तर दिल्ली मेट्रोने प्रवास करण्याची खूप इच्छा होती. परंतु सामान घेऊन पळापळ करण्यापेक्षा आपण टॅक्सी करून थेट बस स्थानकावर जाऊ असा मैत्रिणीने पर्याय सुचविला. अनेक वर्षे ती दिल्ली मध्ये स्थायिक असल्याने, मी निर्णय प्रक्रिया तिच्यावर सोपवून मोकळी झाले. आम्ही साधारण संध्याकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान साऊथ दिल्लीमधून काश्मीरी गेटकडे जाण्यास निघालो आणि आमच्या मजेशीर प्रवासाला सुरुवात झाली.
आठवड्याचा पहिला दिवस–सोमवार! कार्यालयातून घरी जाणाऱ्यांची, कामधंद्यावरून परतणाऱ्यांची गर्दी, असा तोबा ट्रॅफिक आणि त्यातून मार्ग काढत आमचा टॅक्सीवाला आम्हाला घेऊन निघाला होता काश्मिरी गेटकडे! आम्ही अगदी काश्मीरी गेटच्या परीघातच ट्रॅफिकमध्ये अडकलो. साधारण अर्धा तास एकाच जागी! शेवटची १५ मिनिटे उरल्यानंतर आमचा टॅक्सीवाला आम्हाला म्हणाला, “आप लोग यही बीच रास्ते उतर कर चलते हुए जाओ, इधर पास मे ही गेट है, बस स्टँड का” आम्हाला तो पर्याय त्या वेळेला योग्य वाटल्याने घाईगर्दीत टॅक्सीवाल्याचे पैसे देऊन आम्ही दोघी लगबगीने आमचे सामान घेऊन त्या ट्रॅफिक मधील गाड्यांच्या गर्दीतून बस स्टँडच्या दिशेने चालत निघालो. जमेची बाजू अशी होती की, परिवहन मंडळाच्या बसचे ऑनलाइन बूकिंग केल्यावर गाडी नंबर, ड्रायव्हरचा फोन नंबर अश्या सर्व गोष्टी आपल्याला परस्पर मोबाइल संदेशाद्वारा कळवल्या जातात. त्यामुळे आम्हाला बसपर्यंत पोहोचण्यास थोडा उशीरच होईल ही शक्यता गृहीत धरून मैत्रिणीने बस ड्रायव्हर सोबत संपर्क करून त्याला आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे सांगीतले. पण त्यानंतर जो काही उंदीर-मांजराचा खेळ सुरू झाला तो फार मजेशीर होता! आम्ही दोघी बस स्टँडवर सामान घेऊन बस नेमकी कुठे आहे ह्याचा अंदाज घेत होतो. दुतर्फा ट्रॅफिक जॅम! काळोखात मला तर काही कळत नव्हते की नेमके कुठे आहोत! मी फक्त “follow me” चे धोरण अवलंबलेले होते. मैत्रिणीने पुन्हा बस चालकाला फोन लावला, “भैय्या आप कहा हो? बस कौनसे जगह पे खडी है? त्याचे उत्तर, “मॅडमजी, हम तो निकल गये काश्मिरी गेटसे ! आम्ही कपाळावर हात मारला! पण मैत्रिणीने बस चालकाला अजून कोणत्या ठिकाणी “pick up” पॉईंट्स आहेत आणि आता बस कुठच्या ठिकाणी थांबणार हे विचारून फोन ठेवत असताना एक रिक्षावाला “मजनू का टिला” अश्या आरोळी ठोकत आला, आणि आम्हाला विचारले, मॅडम जी बस पकडनी है ना बैठिये मै आपको छोडता हू सही जगह, दौसो रुपये दे देना! मला क्षणभर वाटले की मनातले विचार त्या रात्रीच्या वेळी सुद्धा कपाळावर दिसतात की काय ह्याला! आमच्याकडे त्यावेळी दूसरा पर्यायही नव्हता आणि विचार करायला वेळही! आम्ही सामान घेऊन त्याच्या रिक्षात बसलो! त्या रिक्षावाल्याने आम्हाला ज्या रस्त्याने नेण्याचा प्रयत्न केला तिथे तिथे ट्रॅफिक जॅम! रिक्षा चालक तर रेसिंग कार चालवल्याप्रमाणे पुढच्या गाडीच्या अगदीच सुतभर मागे गाडी लावून करकचून ब्रेक लावत, इकडे तिकडे रिक्षा करत, वाट काढत पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होता. माझी अस्वस्थता वाढत होती, परंतु जे काही घडत होते त्याला सामोरी जायचे एवढेच मी शांत राहून मनात पक्के करीत होते! सरते शेवटी, मजनू का टिला पार केल्यावर कुठे तरी हमरस्त्यावर पूल पार करून आमच्या बसला त्याने गाठले. पण त्या दरम्यान रिक्षा चालक आणि आमचा बस चालक ह्यांचे फोनवरील संभाषण, आमचा त्रागा आणि रिक्षा चालकाने तोडलेले तारे एकंदरीत सर्व काही एखाद्या कॉमेडी सिनेमातील दृश्याप्रमाणे मला भासत होते. जमेची बाब एकच, परिवहन मंडळाच्या बस चालकाने आमच्या सोबत सतत संपर्क ठेवल्यामुळे आम्ही बस गाठू शकलो! सरतेशेवटी आम्ही बस गाठली. आता दुसरे आव्हान होते, आमच्या आरक्षित तिकिटांवर वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेल्या जागा बदलून घेणे! पण सुदैवाने आम्हाला एकत्र बसण्याची सोय पटकन झाली आणि आम्ही दोघी गाडीमध्ये स्थिरावलो. आम्ही एकमेकींकडे पाहून हसून हसून लोटपोट झालो. कारण घरातून निघाल्यापासून बस गाठेपर्यंतचा प्रवास अगदी अविस्मरणीय झालेला होता! खूप उशीर होण्याआधी मैत्रिणीने तीर्थन व्हॅलीमध्ये असलेल्या एका होम स्टेच्या मालकांना फोन करून आम्ही येत असल्याचे कळविले. त्यांनी आमच्यासाठी रहाण्याची सोय उपलब्ध असल्याचे सांगितले. आम्ही निर्धास्त झालो. प्रवासादरम्यान करनालजवळ रात्रीच्या जेवणासाठी बस थांबली आणि त्यानंतर आम्ही दोघी झालेल्या धावपळीमुळे निद्रा देवीच्या पटकन आधीन झालो.

आम्हाला पहाटे जाग आली, ती आमच्या बस कंडक्टरच्या आरोळीने! “मन्डी उतरने वाले तैयार रहियेगा”. पहाटेचे पाच वाजत आलेले होते. आम्ही हिमाचल प्रदेशात पोहोचलो होतो. आम्ही दोघी आता सावध होऊन बसलो. कारण आम्हाला “औट” ह्या ठिकाणी उतरून तीर्थन व्हॅली कडे जायचे होते. आम्ही बसच्या कंडक्टरला आम्हाला औटचा बोगदा पार केल्यावर उतरायचे आहे असे सांगून ठेवले. गाडीच्या मोठ्या काचेच्या तावदानातून हिमाचल प्रदेशाची ओळख पटू लागली! पहाटेची झुंजुमुंजुची वेळ आणि दरी-खोऱ्यामधून आपली अभा फाकत उदयास येणारा सूर्यदेव असं अगदी प्रसन्न निसर्ग चित्र समोर दिसत होते. उजव्या बाजूने बियास नदी तिच्याच नादात प्रवाहित होताना दिसत होती. साधारण पावणे सहाच्या सुमारास आम्ही “औट” येथे पोहोचलो. औट म्हणजे दिल्ली-मनाली महामार्गावर असलेले एक छोटेसे गाव. औटला उतरून तिथून शेअर टॅक्सी अथवा परिवहन मंडळाची बस अथवा खासगी वाहनाने आपण तीर्थन व्हॅली, सैंज व्हॅली, जिभी व्हॅलीला जाऊ शकतो. आम्ही औटला उतरून महामार्ग ओलांडून उजव्या बाजूने खालच्या दिशेला असलेल्या औटच्या बस स्थानकाकडे चालत गेलो. जणू आमचीच वाट पाहत असल्यासारखी “कुल्लू–बंजार-कुल्लू” स्थानिक बस तिथे उभी होती. आम्ही तीर्थन व्हॅली मधील मंगलोर गावातील “अंजली होम स्टे” मध्ये आमच्या रहाण्याची व्यवस्था केलेली होती. आम्ही बस चालकाकडे चौकशी केल्यावर त्याने आम्हाला गाडीमध्ये बसण्यास सांगीतले. तितक्यातच आमच्या “होम स्टे” मालकांचा फोन आला आणि आम्ही त्यांना आम्हाला बस मिळाल्याचे कळविले. आम्ही दोघींनी अगदी बस चालकाच्या बाजूची जागा पटकावली. त्यामुळे आजूबाजूचे निसर्ग दृश्य आणि परिसर पाहता येणे शक्य होते. काही वेळातच बस सुटली. आमची बस पुन्हा औटचा बोगदा पार करून तीर्थन व्हॅलीच्या दिशेने निघाली.
औटपासून साधारण ३० किलोमीटरच्या अंतरावर मंगलोर गाव आहे. आम्ही अंदाजे पाऊण तासामध्ये आमच्या इच्छित ठिकाणी पोहोचलो. आमची बस मंगलोर गावाच्या एका वळणावर एका दुकानासमोर थांबली आणि आमचा बस चालक म्हणाला, मॅडमजी, चलो आ गया आपका ठिकाना! आम्ही बसमधून उतरत असताना लगबगीने एक मुलगा धावत आला आणि आमच्या हातामधील सामान घेऊन आम्हाला दुकानामध्ये घेऊन गेला. आम्ही दिसताच दुकानाचे मालक श्री रामकिशनजी आणि त्यांच्या पत्नीने अगदी हसतमुखाने आमचे स्वागत केले. माझी चौकस नजर सभोवार फिरली. मुख्य रस्त्यावर रामकिशनजींचे दुकान होते, त्यावर त्यांचे स्वतःचे घर! अगदी “नीचे दुकान, उपर मकान” या उक्तीप्रमाणे! आणि त्याच्या मागच्या बाजूस वरच्या टप्प्यावर गेस्ट हाऊससाठी त्यांनी बांधकाम केलेले होते. दुकानामध्ये किराणा सामान आणि एका कोपऱ्यात छोटा चुल्हा होता, जिथे खाद्य पदार्थ बनविले जात होते. आम्हाला तिथेच बाकड्यावर बसवून त्यांनी चहा दिला. प्रवासाचा तपशील आणि ओळख वगैरे उपचार झाल्यावर आम्हाला आमच्या खोलीकडे घेऊन गेले. खरं तर पहाडांमध्ये डोंगर उतारावर ही गावे वसलेली असतात. त्यामुळे गावातील घरे देखील टप्प्यांमध्ये असतात. दुकानाच्या बाजूनेच वरच्या दिशेला जाणारा उंच पायऱ्यांचा जिना होता. त्यावरून पहिल्या टप्प्यात उजव्या बाजूला रामकिशनजींचे घर होते आणि त्याच बाजूने वरच्या टप्प्यामध्ये आमची खोली होती. ह्या दोन टप्प्यांमध्ये किचन गार्डन होते. आणि आमच्या गेस्ट हाऊसच्या बाल्कनीमधून डाव्या बाजूने वरच्या दिशेला गेस्ट साठी डायनिंग रूम सदृश व्यवस्था होती. मला डायनिंग व्यवस्था मनाला खूपच भावली कारण तिथे बसून मोठ्या उघड्या खिडक्यांमधून आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर दिसत होता.
आमची खोली अगदी साधी, पण मूलभूत सोईनी युक्त होती. डबल बेड, स्वच्छ बाथरूम, आणि एक छोटी स्वयंपाक खोलीची जागा! आम्हाला त्याचे जास्त कुतुहल वाटले. कोरोंना संक्रमणाच्या काळात बरेच जणांनी “वर्क फ्रॉम होम”चा पर्याय निवडून “वर्क फ्रॉम माउंटेन्स” नावारूपाला आले! त्या काळात अनेक पहाडी गावांमध्ये ‘होम स्टे’ ची संकल्पना आकार घेऊ लागली. पर्यायाने स्थानिक लोकांनी त्याला आपल्या उत्पन्नाचे साधन बनविले. रामकिशनजींकडून कळले की काही पर्यटक-पाहुणे कुटुंबासह महिनाभर वस्तीस होते. त्या अनुषंगाने त्यांनी स्वयंपाक खोलीची योजना केलेली होती. जे पाहुणे स्वतः काही बनवू इच्छितात त्यांच्यासाठी ते स्टोव्ह, भांडी उपलब्ध करून देतात. आम्ही आमच्या खोलीत स्थिरस्थावर होईपर्यंत आम्हाला आमच्या खोलीतच श्याम भेेय्या नाश्ता घेऊन आले. आणि आम्ही दोघी एकदम खुष झालो कारण आमच्यासाठी पारंपरिक हिमाचली “सिद्दू” बनविलेले होते. गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या करंजी सारख्या आकारात भाज्यांचे सारण भरून वाफवलेला पदार्थ म्हणजे “सिद्दू”! अत्यंत पौष्टिक आणि चवीष्ट! सिद्दू तूप आणि अक्रोड चटणी सोबत फारच अफलातून लागले. होमस्टेमध्ये आपण ज्या ठिकाणी जातो, तेथील जनजीवन, लोककला, खाद्य परंपरा ह्या बाबीची अगदी जवळून तोंडओळख होते! मग लक्षात येते की, निसर्ग भौगोलिक दृष्ट्या जसा वेगवेगळा होत जातो तसतसे खाद्य परंपरा, राहणीमान देखील त्यानुसार स्वीकारले जाते. आम्ही नाश्ता करून, आंघोळ वगैरे आटोपून विश्रांती घेतली. रात्रभराच्या प्रवासाचा शीण होताच! परंतु रामकिशनजींच्या आदरातिथ्याने थकवा पळून गेला. दुपारच्या जेवणाची सोय अंजली होमस्टेच्या डायनिंग रूममध्ये केलेली होती. आम्ही तिथे खऱ्या अर्थाने निवांत झालो. अजूनही काचेची तावदाने न लावलेल्या मोठाल्या खिडक्यांमधून तीर्थन व्हॅली मधील छोटे मंगलोर गाव दिसत होते. दूर अंतरावरून शाळेमध्ये चाललेली मुलांची ‘परेड’ दिसत होती. शाळेच्या पुढे काही अंतरावर खाली तीर्थन खोऱ्यातून वाहणारी “तीर्थन” नदीचे पात्र दिसत होते. होमस्टेच्या मागची बाजू डोंगर-कपारीने जणू संरक्षक भिंती सारखी सांभाळलेली होती. मंद हिमालयीन हवेच्या झुळुका अनुभवत आम्ही दुपारचे जेवण उरकून घेतले आणि रामकिशनजींच्या सल्ल्यानुसार आम्ही विश्रांती घेऊन दुपारनंतर भटकंतीसाठी जायचे ठरविले. आमच्यासाठी त्यांनी त्यांच्याच नातेवाईकाच्या रेंटल कारची देखील व्यवस्था केली. आमच्या तीर्थन व्हॅलीच्या भटकंतीसाठी रामकिशनजींचा भाचा उत्तम त्याची गाडी घेऊन आमच्या होमस्टेवर आला. आम्ही त्याला आमचा “उत्तम भैय्या” करून टाकले! साधारण साडेतीन-चारच्या सुमारास आम्ही जवळपासचा परिसर पाहण्यासाठी निघालो.
तीर्थन व्हॅली – ग्रेट हिमालयीन नॅशनल पार्क आणि छोई धबधबा

कुल्लू जिल्ह्यामधील अद्यापही पर्यटकांची म्हणावी तितकी रेलचेल नसलेली आणि निसर्गरम्य अशी तीर्थन व्हॅली म्हणजे पहाडी लोकजीवनाचा अनुभव घेण्याचे उत्तम स्थळ! डोंगरकुशीत अंतरा-अंतरावर वसलेली गावे, तिथले हिमाचली लोकजीवन, त्यांच्या प्राचीन परंपरा, देवदेवतांची लाकडी कोरीव काम असलेली प्राचीन मंदिरे, त्यांची थक्क करणारी स्थापत्यशैली हे सर्व आपल्याला एक वेगळाच अनुभव देऊन जातात. तीर्थन व्हॅलीमध्ये, सन २०१४ मध्ये यूनेस्को विश्व वारसा म्हणून घोषित केलेले ग्रेट हिमालयन नैशनल पार्कचा बहुतांशी भाग आहे. हंसकूंड पर्वत शिखरावरून उगम पावणाऱ्या झऱ्याला “तीर्थ” असे म्हटले जाते. तीर्थन नदीला वर्षभर महाकाय ग्लेशियरसमुळे पाण्याचा पुरवठा होत राहतो. तीर्थन नदी तिच्या वरच्या भागात खोल “व्ही” आकाराच्या दरीतून वाहते. संपूर्ण तीर्थन व्हॅली नदीच्या प्रवाहप्राप्त परिणाम स्वरूपात वसलेली वाटते. तीर्थन नदीच्या काठाकाठाने मानवी जीवन वसलेले दिसते. नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र अल्पाईन, उप-अल्पाईन, समशीतोष्ण, आणि उप-उष्ण कटिबंधीय सूचिपर्णी आणि पानझडी घनदाट जंगलांनी व्यापलेले आहे. घनदाट जंगलामुळे तीर्थन व्हॅली म्हणजे असंख्य वन्यजीव, विविध पक्षी, सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरे ह्यांचे माहेरघरच आहे. घनदाट जंगलामधून ह्या झऱ्याचा प्रवाह तीर्थन नदीच्या रूपात तीर्थ खोऱ्यापासून अगदी लारजीपर्यंत प्रवास करत सैंज नदीच्या प्रवाहाला मिळतो आणि मग एकत्रितरित्या सैंज आणि तीर्थन नद्या लारजीजवळ बियास नदीमध्ये विलीन होतात.
आमची सवारी छोई धबधब्याकडे निघाली. रस्त्यामध्येच ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कचा वनराजीचा परिसर आहे. पर्यटक ह्या फॉरेस्ट कॉम्प्लेक्समधून पायी चालत वनराजीचा मनमुराद आनंद घेऊ शकतात. रस्त्याच्या एका बाजूला हा फॉरेस्ट कॉम्प्लेक्स आणि दुसऱ्या बाजूला खाली खळखळ नाद करीत वाहणारी “तीर्थ” नदी! आम्ही ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कच्या परिसरामध्ये काही वेळ व्यतीत करून पुढे निघालो.
तीर्थंन नदीमध्ये ब्राऊन आणि रेनबो ट्रॉऊट मिळतात. किंबहुना त्यामुळेच तीर्थन व्हॅली, ‘ट्रॉऊट व्हॅली’ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. तीर्थन व्हॅलीमध्ये नदी किनाऱ्याने असणाऱ्या अनेक गेस्ट हाऊसेसमध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी नदीमधून ट्रॉऊट मासा गळाला लागतो की नाही हे नदी किनाऱ्यावर तासनतास बसून फिशिंगचा अनुभव घेण्याची सोय देखील केली जाते. त्यासाठी परवानगी सुद्धा लागते. नदी किनारी असलेल्या रिसॉर्टजवळ पर्यटक पाहुणे फिशिंगचा आनंद घेताना दिसत होते. छोई धबधब्याकडे जाण्यापूर्वी आमची गाडी नागनी गावाजवळ असलेल्या ट्रॉऊट फिशिंग फार्मकडे वळली, इथे हिमाचल प्रदेश सरकारद्वारे ट्रॉऊट फिश फार्मचा उपक्रम राबवला जातो. इथे रेनबो ट्रॉऊट माशाची पैदास केली जाते. आमच्या रामकिशनजीनी उत्तम भैय्याला बहुदा आदेशच फर्मावला होता, फिशरी मधून ट्रॉऊट मासे घेण्याचा! उत्तम भैय्याने फिशफार्म मधून ट्रॉऊट मासे खरेदी केले आणि आमची गाडी नागनी गावाकडे वळली.
आमच्या होमस्टे पासून नागनी साधारण ११ किलोमीटर अंतरावर होते. गावाजवळ आल्यावर उत्तम भय्याने सांगितले, “मॅडमजी आप होके आइये”, मै यह रास्ते पे आपकी राह देखुंगा. आमच्या लक्षात आले की, इथून आपल्याला पायी चालत जायचे आहे. नागनी गाव मुख्य रस्त्याच्या कडेनेच वसलेले होते. गावात उंच चढणीवर असलेल्या पायऱ्यांवरून आम्ही दोघी चालू लागलो. छोई धबधब्यापर्यन्त साधारण तीन किलोमीटरचा ट्रेक करून जावे लागणार होते. संध्याकाळचा साधारण साडेपाच वाजताचा सुमार, गावातील रहिवासी त्यांच्या दिवसाचे कामकाज संपवून त्यांच्या घरांच्या दिशेने जात असताना, आमच्या सारख्या धबधब्याकडे जाणाऱ्या अनोळखी पर्यटकाना वाटाड्यासारखे मार्गदर्शन करीत होते. आम्ही एका टप्प्यावर येऊन थांबलो आणि तिथे लहान मुलांनी आमच्या भोवती गलका केला, ओ दीदी गाइड चाहिये कया? हम आपको झरने तक लेके चलते है, असे म्हणत आमच्या सोबत गाइड होण्याच्या मोबदल्यासाठी घासाघिस करू लागले. माझ्या दुखऱ्या पायामुळे आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नव्हता परंतु हे छोटे गाईड आम्हाला काय सांभाळणार ह्या कल्पनेनेच आम्ही दोघी हसू लागलो आणि त्यांची मस्करी करत काही पावले पुढे चालून गेलो, तिथे रस्ता विभागला गेल्याने कुठून जावे असा संभ्रम निर्माण झाला. ती मुले आता आमची मस्करी करू लागली! तिथेच जवळपासच्या घरामधील एक मध्यमवयीन महिला ब्रॉंशच्या फुलाचे सरबत विकण्यास घेऊन बसली होती. आम्ही तिथे थांबलो. सरबत घेतले आणि त्या स्थानिक रहिवासी महिलांसोबत संवाद साधला. तिने तिथेच एका माणसाला वाटाड्या म्हणून आमच्या सोबत जाण्यास सांगीतले आणि त्याचा मोबदला ठरवून देखील मोकळी झाली! आम्ही त्या वाटाड्यासोबत किमान ४० ते ४५ मिनिटाची चढाई करून ‘छोई’ धबधब्याजवळ पोहोचलो. स्थानिक देवतेच्या नावावरून ह्या धबधब्याचे नाव पडले असावे असे सांगितले जाते. धबधब्यापूर्वी काही अंतरावर एका झाडाजवळ लाल पताका नजरेस पडतात. आमच्या वाटाड्याने सांगितले की, गावकरी येथेच देवतेची पूजा करतात.
अतिशय गर्द जंगल परिसर आणि वनराजी असलेल्या एका डोंगरमाथ्यावरून छोई धबधब्याचे पाणी एक लयीत कोसळत होते. उन्हाळ्यामुळे कदाचित पाण्याचा आवेग कमी होता. संध्याकाळच्यावेळी स्तब्धपणे निसर्गाच्या सान्निध्यात तल्लीन होऊन बसण्यासारखे ठिकाण होते! परंतु गावातील लोकांनी वाढत्या पर्यटक संख्येमुळे धबधब्याच्या खालच्या बाजूला मॅगी-चहाच्या एक दोन टपऱ्या टाकलेल्या होत्या. लाकडी बाकडे, खुर्च्या टाकून पाण्याच्या प्रवाहाशेजारी बसण्याची सोय केलेली होती. फार वर्दळ नव्हती. त्यामुळे शांततेचा आनंद घेता आला. दिवस मावळायच्या आधी जंगलामधून गावाच्या दिशेने लवकर जाणे आवश्यक होते. आम्ही काढता पाय घेतला आणि पुन्हा गावाजवळ आलो. एका ठिकाणी उंच टेकाडावरून तीर्थन व्हॅली मध्ये वसलेल्या खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसत होते. क्षितिजावर लाल कुसुंबी छटा फाकलेल्या होत्या आणि सूर्यदेव निरोप घेत होता.


आम्ही आमच्या गाडीत येऊन बसलो आणि आमची गाडी होमस्टेच्या दिशेने धाऊ लागली. दुसऱ्या दिवसाचे नियोजन उत्तम भैय्याला सांगून आम्ही आमच्या खोलीत रवाना झालो. आज रात्रीच्या जेवणात चविष्ट ट्रॉऊट मासा होता! जेवताना दूर पहाडांमध्ये वसलेल्या तीर्थन खोऱ्यातील हिमाचली घरांचे लुकलुकणारे दिवे दिसत होते. थंडगार सुखद हवेच्या झुळुका अनुभवत “अन्न हे पूर्ण ब्रम्ह” झाले. आम्ही लवकरच झोपेच्या आधीन झालो.
क्रमश:
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.














यावर आपले मत नोंदवा