हिमाचलचे निसर्ग वैभव – तीर्थन आणि सेंज व्हॅली!

जलोरी पास-हिमालयीन पर्वत रांगांचा ३६० डिग्री नजारा

आमच्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाच्या कार्यक्रमानुसार, जलोरी पास, सेरलोसार लेक, जिभी व्हॅली आणि मिनी थायलंड असे स्थल दर्शन करण्याचे ठरले होते. जलोरी पासजवळ ‘३६०-डिग्री’ नावानेच एक व्हयू पॉइंट प्रसिद्ध झालेला आहे, जिथून हिमाचल प्रदेशामधील बहुतांश हिमालयाच्या पर्वत रांगांचे मनोहारी दर्शन होते. तिथूनच अंदाजे १०० मीटर अंतरावर पुढे घनदाट जंगलातून जाणारी एक मळलेली पायवाट आपल्याला सेरलोसार लेककडे घेऊन जाते.

आम्ही सकाळी आठ वाजताच आमच्या होमस्टेमधून निघालो. जलोरी पासकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३०५ मार्गे  तीर्थन व्हॅली मधून पुढे बंजार, जिभी, शोजा अश्या निसर्गरम्य गावांमधून एका पर्वतीय खिंडीपाशी येऊन पोहोचलो. जलोरी पास म्हणजे समुद्रसपाटीपासून अंदाजे १०,२३५ फुटावर असलेली हिमाचलच्या कुल्लू जिल्ह्यातील निसर्गरम्य उंच पर्वतीय खिंड! शिमला आणि कुल्लू खोऱ्यांना ही खिंड रामपूर आणि रोहरू ह्या शहरवजा गावांच्या माध्यमातून जोडते. जलोरी पास हिवाळ्यामध्ये बर्फाच्छादित असतो.  जलोरी पास येथे अगदी रस्त्यालगतच माता जलोरीचे मंदिर आहे. मंदिराच्या आसपास पर्यटकांच्या गाड्या उभ्या दिसत होत्या.

आम्ही गाडीतून खाली उतरलो आणि आल्हाददायक हवेचा सुखावह स्पर्श झाला! त्या खिंडीमधून खरोखर अत्यंत विहंगम दृश्य नजरेस पडत होते. हिरवीगार कुरणे, घनदाट अल्पाइन वृक्षांची सदा हरित जंगले आणि उंचदूर त्यांच्या शिरपेचात चमचमणारी हिमाच्छादित पर्वत शिखरे! रस्त्याच्या आजूबाजूला स्थानिक हिमाचली स्त्रिया लोकरीचे मफलर, स्टोल, शाल इत्यादि वस्तु छोट्या टपरीवजा स्टॉलस् मध्ये विक्री साठी घेऊन बसलेल्या होत्या. आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितले की, इथून ३६०-डिग्री व्हयू पॉइंट आणि पुढे सेरलोसार लेकसाठी ५ किलोमीटर ट्रेक करून तुम्हाला जावे लागेल. आम्ही लवकर निघल्यामुळे नाश्ता केलेला नव्हता. थंड हवेने पोटातील भूक अधिक चाळवली. सेरलोसार लेक पर्यंतचा टप्पा गाठण्यासाठी पोटपूजा करणे आवश्यकच होते! आम्ही आमची पाऊलं जवळच पर्यटकांसाठी बनविलेल्या इको-ह्टसकडे वळवली. तिथे रेस्टॉरंटची व्यवस्था होती. आम्ही नाश्ता केला आणि जलोरी मातेचे दर्शन घेऊन निघालो, एका छोट्या ट्रेक मोहिमेवर! माझ्यासाठी लिगामेन्ट शस्त्रक्रियेनंतरची माझी ही पहिलीच शारीरिक परीक्षा होती. कारण जलोरी पास ते सेरलोसार लेक हे अंतर येऊन-जाऊन अंदाजे १० किलोमीटर असल्याचे तेथील लोकांनी सांगीतले. गंमत म्हणजे डांबरी रस्त्यापासून अंदाजे १०० मीटर अंतर चालून जाताच आपण हिरव्यागार कुरणांवरून जंगलामध्ये प्रवेश करतो.

आम्ही आमचा ट्रेक दोन टप्प्यात विभागला! जलोरी पास ते ३६०-व्हयू पॉइंट आणि तिथून पुढचा टप्पा – सेरलोसार लेक! त्यामुळे अंतर, शारीरिक क्षमता आणि ट्रेकचा आनंद ह्याचे गणित अगदी छान जुळले! जलोरी पास येथून ३६०-डिग्री व्हयू पॉइंट पर्यंतचे अंतर अंदाजे दोन किलोमीटर आहे. थोडी चढाई आहे, परंतु निळ्याशार आकाशात गडद, भुरक्या, करड्या ढगांची चाललेली पळापळ पाहात हिरव्यागार कुरणावरून चालत ३०० मीटर उंच चढण पार करून साधारण तासभरातच आम्ही ३६०-डिग्री व्हयू पॉइंट पर्यंत पोहोचलो. तिथून दिसणारा नजारा मोहित करणारा होता.  ह्या ३६०-डिग्री व्हयू पॉइंटवरून नजर जिथवर जाईल, तिथवर पीरपांजल आणि ग्रेटर हिमालयीन पर्वत रांगांच्या बर्फाच्छादित पर्वतांचे  मनोरम दर्शन होत होते. खालच्या दिशेला वनराजीने संपन्न असलेली दरी-खोरी दिसत होती. जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर उघडीप मिळल्यासारखे कुरणाचे पठार होते! हिरवळीवर तुरळक पिवळ्या, गुलाबी रंगांची जंगली फुले वाऱ्यासंगे डोलत होती. आम्ही त्या ठिकाणी विसावलो. अजिबातच जास्त वर्दळ नव्हती. त्यामुळे निवांत त्या हिरवळीवर पहुडण्याचा मोह अगदीच अनावर झाला. मेंढ्यांचे कळप जंगलामध्ये चरताना दिसत होते, त्यांच्या मागे अगदी मानेवर काठी ठेवून मेंढपाळांसारखे फोटोसुद्धा काढले! बराचसा वेळ ३६०-डिग्री व्हयू पॉइंटला रेंगाळल्यावर मात्र आम्ही वेळेचे भान राखून सेरलोसार लेकच्या दिशेन कूच केले.

जलोरी पास ते सेरलोसार हा ट्रेक म्हणून तुलनेने सोपा आणि सहज करता येण्यासारखा आहे. पायवाटेवर जागोजागी थोड्या अंतरावर दिशादर्शक फलकही लावलेले आहेत. आम्ही अगदी मनमुराद दुतर्फा असलेल्या घनदाट देवदारांच्या आणि पाईन वृक्षांच्या जंगलातून दरमजल करीत सेरलोसार तलावाच्या दिशेने चालत राहिलो. काही वेळातच उघडीप मिळाली आणि आम्ही सेरलोसार तलावाजवळ पोहोचल्याची जाणीव झाली. दूर अंतरावर चहा-खाद्यपदार्थ इत्यादींची दुकाने थाटलेली दिसली. ह्या टपरीवजा दुकानानंतर दगडी पायऱ्या उतरून तलावाच्या दिशेने जावे लागते. ह्या टप्प्यात दगड-मातीची वस्तीसाठी असलेली पहाडी लोकांची जुनी घरं दिसत होती. परंतु ह्या घरांमध्ये आता वस्ती नव्हती.

आम्ही त्या दगडी पायऱ्या उतरून लेकच्या कडेकडेने “बुढी नागिण” देवतेच्या मंदिरापाशी पोहोचलो. तिथून संपूर्ण तलावाचा नजारा दृष्टीस पडत होता. सरोवराच्या चौफेर देवदार -पाइन वृक्षांची जणू संरक्षक भिंतच उभी आहे असे भासत होते. त्या हरित वृक्षराजीचं प्रतिबिंब सरोवराच्या पाण्यात दिसत होते. तलावाला लाकडी संरक्षक कुंपण घातलेले आहे. आम्ही मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला, तिथून तलावाचे संपूर्ण दर्शन होत होते. तेथील पुजार्‍याने सांगीतले की, वर्षभर ऋतु बदलानुसार ह्या सरोवराचे पाणी वेगवेगळे आकर्षक रंग धारण करते. हिवाळ्यामध्ये तलाव पांढरा, वसंत ऋतु आणि उन्हाळ्यात अर्धा बर्फाच्छादित आणि अर्धा हिरवा, तर पावसाळ्यात आणि पावसानंतर अगदी पाचू सारखा हिरवागार दिसतो. सेरलोसार लेक परिसर निसर्गरम्य तर आहेच, पण त्याच सोबत त्याला धार्मिक महत्व सुद्धा आहे! स्थानिकांसाठी हे एक तीर्थक्षेत्रच आहे. ह्या सरोवराशी निगडीत आख्यायिका देखील सांगितल्या जातात. सरोवराच्या जवळ असलेल्या मंदिरातील देवता ह्या सरोवरामध्ये वास करत असून तीच ह्या परिसराचे संरक्षण करते अशी मान्यता आहे. त्यामुळे तलावामधील पाण्यात उतरण्यास बंदी आहे. दर शनिवारी येथील स्थानिक ह्या सरोवरची परिक्रमा करून “बुढी नागीण” देवतेची पूजा करतात असे समजले. सरोवरामध्ये असलेल्या एका काळ्या दगडावर लोकानी तूप-तेल अर्पण केलेले दिसत होते. परंतु त्यामुळे सरोवराच्या पाण्यात एक प्रकारचा तवंग तयार झालेला होता. आमच्यासाठी जलोरी पास ते सेरलोसार तलाव आनंददायी आणि निसर्गरम्य असा छोटेखानी ट्रेक झाला होता. त्यामुळे आम्ही खुष होतो.

मंदिर आणि सेरलोसार तलाव भेट घेऊन आम्ही पुन्हा परतीच्या दिशेला आमची पावले वळवली. चहा आणि खाद्य पदार्थांच्या टपरीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन, ब्लॅक टी आणि मोमोवर क्षुधाशांती करून माघारी निघालो. आमचा निर्णय अत्यंत अचूक ठरला, जाताना आम्ही ३६०-डिग्री व्हयू पॉइंटला भेट दिल्याने आता कठीण चढाई नव्हती! निवांतपणे जंगल ट्रेलचा आनंद घ्यायचा होता! आम्ही काही अंतर चालून पुढे गेल्यावर, प्रथम सेरलोसार तलाव करून नंतर ३६०-डिग्री व्हयू पॉइंटकडे जाणाऱ्या पर्यटकांची दमछाक दिसू लागली! आमच्यासाठी मात्र परतीचा ट्रेक घनदाट देवदारांच्या आणि पाईनच्या छायेतून जाणारा आल्हाददायक प्रवास होता. आवडीचा हवाहवासा वाटणारा त्या जंगलांचा दरवळ, मधूनच पक्षांची किलबिल आणि अधेमध्ये उन्हाची तिरिप! जंगलामधील पायवाट मुख्य रस्त्यावर येऊन संपण्याआधी दोन स्थानिक महिला तिथे त्यांच्या लोकरीच्या वस्तूंचा स्टॉल टाकून बसल्या होत्या. आम्ही त्यांच्या स्टॉलवर थांबलो, त्यांच्या विणकामाची झलक पाहिली. अगदी त्यांच्या स्टॉलवरचे स्कार्फ, मफलर घालून फोटो काढले, त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्या दुकानातील सामग्री हाताळल्यानंतर मी एक स्कार्फ विकत घेतला आणि आम्ही पुन्हा जलोरी पासच्या मुख्य रस्त्यावर पोहोचलो. आमचा परतीचा ट्रेक अगदी दीड तासामध्ये पूर्ण झाला. संध्याकाळचे साडेपाच वाजले होते.

साधारणतः दहा-बारा किलोमीटर नंतर परतीच्या रस्त्यावर आम्ही जिभीला पोहोचलो. जिभी खोरे त्याच्या नैसर्गिक सौंदर्य आणि प्रसन्न वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. घनदाट पाईनची जंगले, मनमोहक धबधबे, सदैव स्फटिकासम स्वच्छ पाण्याचे झरे हयांनी हे टुमदार गाव वेढलेले आहे. जिभीमध्ये पारंपरिक लाकडी वास्तूकलेचे प्रदर्शन जागोजागी होते. जिभीच्या रस्त्यावर अनेक उंच झाडावर सफेद रंगाच्या मोहक फुलांचे वेल चढलेले दिसत होते. त्याचा सुगंध दरवळत होता. गर्द वृक्षराजीमध्ये, डोंगरकडांवर अनेक रिसॉर्ट, होमस्टे, लॉग हटस् वसलेले दिसत होते. एखाद्या “हिल स्टेशन”चा अनुभव देणारे ठिकाण-जिभी!

उत्तम भैय्याने आमची गाडी अचानक रस्त्याच्या बाजूला थांबवली आणि म्हणाला, मॅडमजी, लो आ, गया मिनी थायलंड! आम्ही गोंधळून गेलो. त्याने आमच्या चेहऱ्यावरचे प्रश्न चिन्ह बहुधा वाचले असावे! तिथे एक फलक लावलेला होता, “कूल्ही कतांडी/वीरारी आल”, त्याने त्या फलकाकडे अंगुली निर्देश करून रस्त्याच्या खालच्या दिशेला जाणारी अवघड पायवाट दाखवली, आणि सांगितले, आपको यहा से नीचे उतर कर जाना है, आम्ही क्षणभर विचारात पडलो. दिवसभराच्या ट्रेकमूळे थकलो होतो, पण इतक्या जवळ येऊन एखादे ठिकाण पहायचे नाही हे काही मनाला रुचले नाही. मनाचा हिय्या करून आम्ही खाली उतरलो. एकदम “टुरिस्टी” म्हणतात त्याप्रमाणे त्या ठिकाणी पर्यटकांची रेलचेल होती. चहा आणि मॅगीची एक दोन दुकाने होती. त्या दुकानाच्या बाजूने पुढे जाऊन खालच्या दिशेने पायवाट गर्द वृक्षराजी मध्ये खळखळ वाहणार्‍या झऱ्यापाशी जाऊन थांबली. तिथे एक लाकडी ओंडक्याच्या सहाय्याने त्या झऱ्याला पार करून जाण्यासाठी सोय केलेली होती. आम्ही त्या ओंडक्यावरून झऱ्या शेजारी असणाऱ्या दगड-गोट्यावर जागा पकडून काही वेळ ते सुंदर निसर्ग चित्र न्याहाळत बसलो. त्या निर्झराच्या संगीताने दिवसभरचा थकवा पळाला. आता आमच्या पुढे प्रश्न असा होता की, हे मिनी थायलंड प्रकरण काय आहे बरं!! तर, दोन प्रचंड मोठ्या खडकांमधून वाहणारा पाण्याचा प्रवाह थायलंड मधील चित्रासारखा दिसतो म्हणून “मिनी थायलंड”! आणि ज्याला आपण crystal clear water म्हणतो, तसे स्वच्छ पाणी!  आम्ही झऱ्यापाशी काही वेळ बसून पुन्हा त्या अवघड पायवाटेची चढण चढून गाडीपर्यंत पोहोचलो.

तिथून थेट आमची गाडी निघाली आणि अगदी रस्त्यालगत दिसणाऱ्या “जिभी वॉटर फॉल”च्या प्रवेशद्वाराजवळ थांबविली. आम्ही प्रवेश तिकीट घेऊन त्या उद्यान सदृश जिभी वॉटर फॉलच्या परिसरात प्रवेश केला. एव्हाना संध्याकाळ होत आली होती. उद्यानामध्ये धबधब्याकडे जाणाऱ्या दगडी पायवाटेवर लाकडी पूल बांधून पायवाटेचे सुशोभीकरण केलेले होते. सूर्य मावळतीस गेल्याने पक्षी किलबिल करत त्यांच्या घरट्यांकडे परतत होते, काही तर धबधब्याच्या वाहत्या पाण्याच्या ओहोळामध्ये बहुधा स्नान-संध्या करत होते. आम्ही त्या पक्षांची छायाचित्रे टिपण्याचा बराच प्रयत्न केला. पण त्यांच्या अचूक हालचाली टिपणे कठीणच होते! धबधब्याचे पाणी कदाचित उन्हाळा असल्याने बेताचेच होते. आम्ही हळूहळू काढता पाय घेतला.

जिभीच्या धबधब्याकडून आम्ही जिभीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये येऊन थांबलो. खरं तर जिभीची मुख्य बाजार पेठ रहदारीच्या मुख्य रस्त्यावरच होती. हंगामी पर्यटकांमुळे हॉटेल्स, क्लबस् रोषणाईने सजले होते. आमची गाडी ‘मॅरीजेन कॅफे’ समोर थांबली. कॅफे मध्ये ‘लाईव्ह म्युझिक’ सुरू होते! रंगीबेरंगी रोषणाईने कॅफेचा ‘रूफ टॉप’ लखलखत होता. संगीताचे सुर कानावर येत होते. थोडक्यात पर्यटकांची संध्याकाळ ‘सुरमयी’ होत होती. “जिभी”ची छोटीशी बाजारपेठ मला एखाद्या “हिल स्टेशन” सारखी भासली. आम्ही गाडीतून उतरलो, बाजारपेठेमध्ये पाय मोकळे केले आणि एका हॉटेलमध्ये चहासाठी थांबलो. चहा घेऊन पुन्हा आमच्या होम स्टेवर परतलो. तोपर्यंत रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. दिवसाभराचा थकवा आणि स्वादिष्ट भोजन ह्यामुळे आम्ही गप्पा मारताना कधी झोपेच्या आधीन झालो तेही कळले नाही.

क्रमश:


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

पृष्ठे: 1 2 3 4

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑