सैंज व्हॅली आणि मखमली कुरणांचे नयनरम्य शांगड
आज आमच्या सहलीचा तिसरा दिवस! आजची उत्सुकता काही वेगळीच होती. आमच्या राम किशनजींनी आम्हाला सैंज खोऱ्याचे आणि शांगडचे केलेले वर्णन ऐकून आम्ही ते सृष्टी सौंदर्य पहाण्यासाठी आतुर झालो. माझ्या मैत्रीणीला तिच्या परिचयाच्या एका व्यक्तीने अजून एका अनोख्या स्थळाबद्दल सांगितले होते. कोविड-लॉक डाऊन काळात त्या व्यक्तीने ह्या परिसराची पूर्ण भटकंती केलेली होती. त्यांनी एक स्थळ अगदी “मस्ट डू” म्हणतात ना तसं आहे असे सांगितले! Don’t miss it! आम्ही त्या ठिकाणी जायचेच असे ठरवले. सकाळी आम्ही लवकर तयार होऊन निघालो, आता आमच्या उत्तम भैय्याचे मन वळविण्याचे काम करायचे होते कारण आजचा नियोजित कार्यक्रम होता सैंज व्हॅलीचा! आमच्या कार्यक्रमामध्ये एका नवीन स्थळाची वाढ झाली. “घटोत्कच” मंदिर! थोडी वाट वाकडी करून वेगळ्या दिशेला जायचे होते! उत्तम भैय्या कुरकुर करू लागला! आम्ही त्याला कसेबसे राजी केले. आमचा मोर्चा प्रथम निघाला “घटोत्कच” मंदिराकडे!
आमच्या होमस्टे पासून साधारण पाऊण तासाच्या अंतरावर अगदी रस्त्यालगत आमच्या उत्तम भैय्याने गाडी थांबवली, आणि रस्त्याच्या कडेने एका खोल दरीमध्ये जाणाऱ्या पायवाटेकडे बोट दाखवून आम्हाला म्हणाला, आपको वहा नीचे जाना है, उस पहाडीमे मंदिर है, माझे पाय लटपटू लागले!! संपूर्ण दरी उतरून दोन डोंगरांना वळसा घालून खाली असलेल्या मंदिरात जायचे होते! सकाळचे नऊ वाजले होते. पुढचा कार्यक्रम विस्कळीत न होता हे दिव्य पार पाडायचे होते. पण “Don’t miss it” ची उत्कंठा सुद्धा होती. मग काय आम्ही दोघींनी त्या पायवाटेवर कूच केले. पायवाटेवर मंदिरापर्यंत बऱ्यापैकी रस्त्याला लोखंडी रेलींग लावलेले होते त्यामुळे मला पायावर अधिक भार न देता उतरणे सोपे झाले. एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगर रांगेत जाताना एके ठिकाणी पायवाटेवर वरच्या दिशेने भू:स्खलन होऊन पायवाट पूर्णतः नष्ट झाली होती. त्या ठिकाणी मात्र आम्ही दोघींनी थोडे धाडस करून टप्पा पार केला खरा! उतरून गेल्यावर दोन दगडांवर टाकलेल्या लाकडी फळकूटावरून पाण्याचा वाहता प्रवाह पार केला आणि तिथल्या एका मोठ्या दगडापाशी क्षणभर थांबलो. तिथून मान वर करून पाहीले तर आम्ही ज्या पुसून गेलेल्या पायवाटेचा भाग पार केला तो पाहताच हृदय धडधडू लागले. जरा अंदाज चुकला तर खाली कोसळून कपाळमोक्षच! आम्ही आता दुसर्या डोंगराच्या कपारीमध्ये असलेल्या दगडी पायऱ्या चढून गेलो आणि समोर “देवता छांजणू जी के मंदिर” असा फलक नजरेस पडला. आम्हाला डोंगर उतरून मंदिरापर्यंत पोहोचण्यास साधारण पाऊण तास लागला असावा!




“देवता छांजणू जी के मंदिर” तथा घटोत्कच मंदिर
अगदी एकांतात डोंगर कपारीमध्ये लाकडी पारंपरिक हिमाचली स्थापत्यकलेमध्ये साकारलेले देवतेचे मंदिर होते. मंदिराला पाथळ दगडांचे छत होते. पायरी चढून गेल्यावर मंदिरात छोटा गाभारा होता. लाल-पिवळे वस्त्र ल्यालेली दगडी उभी मूर्ती अंतर्भागात होती. गाभाऱ्याबाहेर लोखंडी शस्त्रे देवतेला अर्पण केलेली होती. मंदिराचा परिसर खूप निसर्ग रम्य होता. मंदिराच्या प्रांगणात उभे राहिल्यावर खळाळून वाहणार्या पाण्याच्या प्रवाहाचा नाद स्पष्ट ऐकू येत होता. एवढ्या एकांतात तिथे एकच सेवेकरी व्यक्ती मंदिराची देखभाल, साफसफाई करीत असताना दिसली. त्यांनी ही देवता जागृत असून देवतेला तुपाचा दिवा दाखवण्याची प्रथा असल्याचे सांगीतले, त्यांनी मंदिरामध्ये असलेला धूप आणि तुपाचा दिवा लावण्याचा आग्रह केला. आम्ही त्यांच्या विनंतीचा मान ठेवत धूप-दिवा लावला आणि त्या मंदिर परिसरामध्ये थोडावेळ बसलो. ध्यान-धारणा, चिंतन-मनन करण्यासाठी अतिशय उत्तम निसर्गरम्य जागा होती. जे काही शारीरिक कष्ट झाले ते सार्थकी लागले असे वाटावे असे वातावरण होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या मंदिराबाबत जास्त वाच्यता नसावी कारण फक्त आम्ही दोघी जणी! अगदी येताना-जाताना सुद्धा कोणीही वाटसरू सुद्धा नव्हता. अगदी आडवळणाला असलेले स्थळ होते. आम्ही उतरताना वेगात उतरलो, परंतु आता तेवढेच अंतर चढून जायचे होते. आम्ही ती अंगावर येणारी चढाई पार करून साधारण अकरा वाजताच्या सुमारास आमच्या गाडीपाशी हमरस्त्यावर पोहोचलो. उत्तम भैय्या आम्हाला इतक्या लवकर परत आलेले पाहून विस्मयचकीत झाला.
आता पोटात भरपूर कावळे ओरडत होते. आम्ही नाश्ता केलेला नव्हता. आता आमची गाडी लारजीच्या रस्त्यावर धावू लागली. लारजीला आम्ही नाश्ता करण्यासाठी गाडी थांबवली. औट बोगदयाकडून येणारा रस्ता डाव्या बाजूला सैंज व्हॅलीकडे जातो तर उजवीकडे जाणारा रस्ता तीर्थन व्हॅलीकडे! आम्ही अगदी भरपेट नाश्ता करून निघालो. तीर्थन व्हॅलीपासून साधारण ५० किलोमीटर अंतरावर सैंज व्हॅली-शांगड आहे. सैंज व्हॅलीकडे जाणारा रस्ताच इतका निसर्गरम्य होता की प्रत्यक्ष सैंज खोरे, शांगड किती सुंदर असावे ह्याची मनोमन कल्पना करू लागलो! आम्ही साधारण दुपारचे दीड वाजण्याच्या सुमारास एका लाकडी प्रवेशद्वाराच्या कमानी पाशी थांबलो. ग्रेट हिमालयीन नॅशनल पार्कच्या परिघात असलेले श्री शंगचूल महादेव मेडोज- शांगड कुरणांचे ते प्रवेशद्वार होते. प्रवेशद्वारापाशी उतरलो, परंतु नेमका अंदाज येईना!

आम्ही त्या प्रवेशद्वारामधून चढून जाऊ लागलो. चालत जाण्यासाठी फरसबंदी रस्ता तयार केला होता. त्यावर चालत राहिलो आणि काही क्षणातच आम्हाला विस्तीर्ण पसरलेले शांगडचे भव्य हिरवेगार कुरण दिसू लागले. अहाहा! काय नजारा होता! फरसबंदी रस्त्यावरून एका उंच हिरव्यागार मखमालीच्या टेकडीवर आलो. मनाला सुखावणारा हिमालयीन हवेचा सुखद स्पर्श रोमांच उठवून गेला. दूर समोर विस्तीर्ण कुरण पसरलेले, त्याच्या पार्श्वभागी कोनिफरस वृक्षांची संरक्षक भिंत! त्यामागे एका मागोमाग डोंगर रांगा! हिरवट, निळसर आणि करड्या होत जाणाऱ्या! आणि त्यांच्या मागे दंतूर पंक्तिसारख्या डोकावणाऱ्या हिमाच्छादित पर्वतरांगा! पण उन्हाळ्याचे दिवस असल्याने या पर्वत रांगांवरचे ओघळून येणारे हिम श्वेत रंगाने रेखाटल्याप्रमाणे भासत होते. निळ्या आकाशात पांढऱ्या, भुरक्या, करड्या तर कधी गडद निळ्या ढगांचा चालणारा लपंडावाचा खेळ आणि त्यांच्या त्या पर्वतरांगांवर झुलणाऱ्या सावल्या! सारं काही अगदी अद्भुत आणि परिकथेतील गोष्टी सारखं!

फरसबंदी पायवाट उजव्या बाजूने दूर एका पहाडी गावामध्ये जात होती. पायवाटेच्या दुतर्फा गवताळ शेतजमीन आणि हिरवीगार वनराजी होती. त्या परिसरामध्ये सफेद रंगांची गुलाब फुले झाडाझुडपात उमललेली होती. त्याचा सुगंधी दरवळ अत्यंत मोहक होता. जणू त्या पायवाटेवर सफेद रंगांच्या फुलांच्या सुगंधाने आपसूकच आम्हाला गावाच्या दिशेने खेचून नेले! तिथे एक उंच मनोऱ्यासदृश लाकडी वास्तु मध्ये अत्यंत कोरीव काम केलेले महादेवाचे मंदिर होते. आम्ही त्या छोट्याश्या गावामध्ये फेरफटका मारून पुन्हा त्याच फरसबंदी वाटेवरून माघारी निघालो. परंतु गावाच्या बाहेर येताच आम्ही आमचा मोर्चा समोर दिसणाऱ्या मखमली कुरणांकडे वळवला.


त्या हिरव्यागार मखमाली उतारावरून चालताना खूप छान वाटत होते. गावकऱ्यांचे पशुधन अगदी मनमुराद त्या कुरणांवर चरत होते! आम्ही त्या कुरणाचे चढ-उतार पार करीत “श्री शंगचूल” महादेवाच्या मंदिरापाशी आलो. अत्यंत प्राचीन मंदिर होते. लाकडामध्ये कोरीव काम केलेली ही मंदिरे पहिली की आपल्या स्थापत्य कलेचे वैभव लक्षात येते! ह्या मंदिरांच्या कला वैभवाबरोबरच अनेक रंजक दंतकथा देखिल आपल्या मनात घर करून राहतात. शंगचूल महादेवाच्या मंदिराचा संदर्भ थेट महाभारताशी जोडलेला आहे. पांडव अज्ञातवासात असताना कौरव त्यांचा पाठलाग करत होते तेव्हा पांडवांनी ह्या महादेवाच्या मंदिरात आश्रय घेतला. स्वतः भगवान शंकरांनी त्यांचे रक्षण केले आणि मग पांडवांनी हे मंदिर स्थापित केले. शांगडच्या कुरणावर एका बाजूला असलेल्या ह्या महादेव मंदिरावर देवदार वृक्ष जणू छत्रचामरे धरून अदबीने रांगेत उभी आहेत. ह्या मंदिरात स्थानिक पूजा अर्चा करतात. इथे काही वार्षिक उत्सव देखील होतात.

आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि काही क्षणातच हिमालयाच्या कधीही अंदाज न येण्याजोग्या मोसमाने आम्हाला अनाहूतपणे गाठलेच! अचानक आभाळ भरून आले आणि जोराचे वारे वाहू लागले. आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यातच आडोसा धरून काही वेळ थांबलो. मघापासून पळपळीचा खेळ करणारे ढग आता आजूबाजूच्या पर्वतरांगांवर आदळून आम्हाला भिवविण्याचा खेळ खेळू लागले! पावसाच्या तडाख्यात सापडणार असा आडाखा बांधून आम्ही मंदिरातून निघालो आणि झपाझप पाऊले टाकून त्या शांगड मेडोजच्या परिसरातून आमच्या गाडीकडे जाण्यासाठी लगबगीने निघालो, पण प्रचंड सोसाट्याचा वारा आणि पावसाने आम्हाला गाठलेच! कसेबसे जीव मुठीत घेऊन पळत पळत त्या कुरणांवरुन रस्तयालगतच असलेल्या एका छोटेखानी धाब्याचा आश्रय घेतला. कुरणांवरून पळताना उजव्या बाजूला देवदारांची रंग आणि डावीकडे मोकळे कुरण त्यामुळे आम्हाला डाव्या बाजूने येणाऱ्या पावसाने चांगलेच झोडपून काढले! ओलेत्या कपड्यांनी आणि पोटातल्या भुकेने खूप थंडी वाजू लागली. गरमागरम मॅगी आणि ‘ब्लॅक टी विथ लेमन’ ही रेसिपी अगदी तेव्हा हवीहवीशी आणि उबदार वाटू लागते! मग काय, तिथे पाऊस कमी होईपर्यंत पोटपूजा झाली आणि तोपर्यंत मेघराज मनसोक्त बरसल्याने त्याने सुद्धा विश्राम घेतला.
आम्ही लगेचच सैंज व्हॅलीमधील जंगलाच्या दिशेने असलेल्या बार्शंगढ धबधब्याकडे जाण्यासाठी आमची गाडी वळवली. शांघडपासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर अगदी जंगलामध्ये दगडमातीच्या रस्त्यावर आमची गाडी चालत होती. आजूबाजूचा निसर्ग अतिशय सुंदर होता. त्या रस्त्यावरून डाव्या बाजूला आम्हाला खालच्या दिशेला शांघडची कुरणे आणि शंगचूल महादेवाचे मंदिर दिसू लागले. नुकत्याच बरसून गेलेल्या पावसामुळे अवघे वातावरण “चिंब भिजलेले” झाले होते. निसर्गाचा हिरवा रंग अगदी खुलून आला होता! घनदाट जंगलांनी वेढलेला परिसर, डोंगरउतारांवर वसलेली चिमुकली दुर्गम पहाडी गावे, त्यांच्या लगतच डवरलेली पायऱ्या पायऱ्यांची शेते! रस्त्यालगत हंगामी बहरलेली गुलाबी फुले! जणू नंदनवनाचा मार्ग! एका वळणावर “शांघड कोठी” नावाचे पारंपरिक काठ-कुनी वास्तुशास्त्र पद्धतीने बनविलेल्या होम स्टेचा फलक दिसला. प्रथम दर्शनीच त्या कोठीने मन आकर्षित करून घेतले! गाडीतून उतरून त्याचा फोटो काढण्याचा मोह अनावर झाला. त्या फलकावर अजून एक विशेष आकर्षण होते- हिमाचली धाम ! त्या होम स्टे मध्ये जेवणासाठी “हिमाचली धाम” मिळेल असा फलक होता. पण वेळ संध्याकाळची होती!





त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आजूबाजूचा मनमोहक निसर्ग आणि पारंपरिक मंदिरे, घरे त्या परिसराचे वैभव समृद्ध करत राहतात. हिमाचल किंवा अगदी उत्तरेकडील हिमालयाच्या पायथ्याशी असणारी ही गावे त्यांच्या ह्या पारंपरिक स्थापत्य शास्त्रावर आधारित बांधलेल्या घरांमुळे खास आकर्षक वाटतात. पण त्यामागे किती शास्त्र दडलेले आहे! ज्यामध्ये भुंकप, तेथील प्रादेशिक भौगोलिक रचना, वातावरण, हवामान, नैसर्गिकरीत्या उपलब्ध असणारे साहित्य आणि सांस्कृतिक पकड ह्या सर्वांचा मेळ घालून ह्या काठ-कुनी वास्तु-शास्त्राचा अवलंब मंदिरे, घरे ह्यांच्या बांधणीत झालेला दिसतो. शांघड गावातील मंदिर असो अथवा शंघचूल महादेवाचे मेडोजमध्ये असलेले मंदिर किंवा पारंपरिक हिमाचली कोठी! ह्या सर्वांची वास्तूकला काठ-कुनी शैलीमध्ये होती. संस्कृतमधील काष्ठ ह्या शब्दावरून ‘काठ’ आणि कोपरा किंवा कोनाडा ह्या शब्दावरून ‘कुनी’ म्हणून काठ-कुनी वास्तूकला! लाकूड आणि दगड एका विशिष्ट पद्धतीने रचून नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारे साहित्य जसे की, लाकूड, चुनखडी, आणि दगडमाती ह्यापासून बनलेल्या ह्या वास्तु बर्फ वर्षाव, ऊन-वारा, पाऊस ह्या सर्व प्राकृतिक परीक्षेसाठी सज्ज झालेल्या असतात. वास्तूची रचनाही अशी असते की, सर्वात वरच्या भागात माणसांनी रहायचे, मध्यभागी साठवणीसाठी कोठार सदृश व्यवस्था आणि खालच्या भागात पशुधनाच्या निवाऱ्याची सोय! ह्या वास्तु रचनेत सूर्यप्रकाश आणि वायुवीजन हयाकरिता दिशा आणि प्रदेशातील भौगोलिक परिस्थिती देखील विचारात घेतली जाते. उन्हाळी हवामानात खेळती रहाणारी हवा, थंडीमध्ये उबदार रहाण्याची क्षमता आणि हिमवर्षाव आणि पाऊस निथळून जाण्यासाठी पाथळ दगडांचे छत ह्या सर्व बाबींचा विचार केलेला दिसतो. घराची पाठ डोंगराकडे टेकलेली आणि पुढचा भाग दरीकडे! टिकाऊ आणि निसर्गाचा समतोल राखत बऱ्यापैकी शाश्वत, ज्याला आपण sustainable and resource-efficient म्हणू शकतो अशी ह्या वास्तूंची बांधणी केलेली असते. ह्यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची अशी की, ही गावे वसताना उत्सव आणि मेळाव्यांसाठी पुरेश्या सार्वजनिक मोकळ्या जागा सोडलेल्या दिसतात, जेणे करून येथील समाजजीवनातील आपुलकीची, बांधीलकीची वीण दृढ होत घट्ट राहील.
आम्ही त्या सैंझ खोऱ्यामध्ये जणू हरवून गेलो. तितक्यातच आमची गाडी जंगलामध्ये एका बाजूला थांबली. त्याबरोबर पहाडी पोषाखातील तिथे चहा, खाद्य पदार्थ विकणाऱ्या स्थानिक महिलांनी आमच्याभोवती कोंडाळे केले. ह्या ठिकाणापासून जंगलातून थोडी चढाई करून धबधब्याकडे जाणारा रस्ता होता. मी सपशेल माघार घेतली. माझ्या दुखऱ्या पायासाठी आज पुरेशी वाटचाल झालेली होती! त्यापेक्षा तिथे निवार्यासाठी केलेल्या छताखाली बसून जंगल गान कानात साठवणे अधिक आनंदमयी होते. संध्याकाळ होत आलेली होती, रिमझिमणाऱ्या पावसाचा जंगलामधील वनराजीमध्ये उमटणारा नाद, परतणाऱ्या पक्षांचा गुंजारव हे सर्व गरमागरम चहाच्या झुरक्या घेत अनुभवणे हाही एक निवांत आनंद आहे! माझी मैत्रीण धबधब्याचा शोध घेऊन येईपर्यंत मी छताखाली बाकड्यावर ठाण मांडले. तेथील स्थानिक महिलांशी बातचीत केली. आम्हाला एक रानभाजी खाण्याची इच्छा झाली होती, हिमाचल मध्ये जंगलात मिळणारी लिंगडी! त्या स्थानिक महिलांशी सलगी करून आम्ही लिंगडीची भाजी खरेदी केली. आजचा दिवस खूपच वेगवेगळ्या गोष्टींमुळे संस्मरणीय झाला. सेंज म्हणजे हिमाचलचे एक अद्भुत आणि अद्यापही दडून राहिलेले वैभव आहे. खरं तर इथे मनन – चिंतन, लेखन करणाऱ्या व्यक्तीची प्रतिभा आपसूकच खुलेल असे निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण वातावरण आहे, पण त्याबरोबरच येथील स्थानिकांचे आदरातिथ्य आणि अगत्यशिलता विशेष वाखणण्यासारखी आहे. सैंज व्हॅलीमध्ये व्यावसायिक पर्यटनाची अद्याप खूप रेलचेल नसल्याने अनेकांना ही स्थळे अजूनही अपरिचित आहे. इथे हळूहळू स्थानिक लोकांनी आपल्या घरांमध्ये होमस्टे सारख्या संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. इथे खूप काही लक्झरी उपलब्ध नसली तरी अप्रतिम निसर्ग आणि दुर्गमतेमध्ये असणारे रांगडे सौंदर्य, त्याचे वेगळेपण अनुभवण्यासारखे आहे.

सेंज व्हॅलीच्या त्या पहाडी गवाक्षातून विविध रंगांची उधळण क्षितिजावर करत, घरी परतणाऱ्या सूर्यदेवास पहाणे हा एक अनुभवच होता. त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण! मावळतीच्या सूर्याचा क्षितिजावरचा रंगीबेरंगी खेळ पाहातच आम्ही पुन्हा तीर्थन व्हॅली मधील आमच्या मंगलोर येथील होमस्टेकडे जाण्यास निघालो.
आमच्या परतीच्या प्रवासात सेंजमध्ये मागील वर्षी आलेल्या पुराच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेला प्रदेश पाहून मन विषण्ण झाले. एका ठिकाणी रस्त्याचा भाग आणि नदीचे पात्र एकत्रच झाले होते. आमची गाडी त्या ओबडधोबड दगडगोट्यांमधून उत्तम भैय्या पार करताना पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, विस्थापित मानवी जीवन ह्याच्या खाणाखुणा सुस्पष्ट दिसत होत्या! निसर्गाचा कोप होईल इतकी त्याची छेडछाड नकोच!



जंगलामधील पावसाने मन आणि तन दोन्ही चिंब झाले होते! अश्या वेळी संध्याकाळच्या चहासोबत मुंबईकरांना आणि दिल्लीवाल्यांना भजी-पकोडा नाही आठवला तर विरळाच! आम्ही आमचा होमस्टे येईपर्यंत प्रत्येक बाजारपेठेमधील दुकानात पकोडा-पकोडा करत फिरलो. सरतेशेवटी एका छोट्या चहावाल्याच्या दुकानामध्ये आम्हाला गरमागरम कांदा भजी आणि चहा मिळाला. आमची संध्याकाळ सफल झाली.

आजचा आमचा तीर्थन व्हॅली मधील शेवटचा दिवस होता. उद्या आम्ही मनालीकडे प्रयाण करणार होतो. आम्ही विकत घेतलेली लिंगडीची भाजी आमच्या होमस्टेच्या मालकीणबाईकडे सुपूर्द करून निवांत झालो. तिनेही अगदी निगुतीने लिंगडीची चविष्ट भाजी करून खायला घातली. आम्ही आवराआवर करून झोपी गेलो. कारण दुसऱ्या दिवशी सफर होती अटल टनेल आणि रोहतांग पासची!
क्रमश:
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा