सफर अटल टनेल आणि रोहतांग पासची!
सकाळी लवकरच उठून तयार झालो आणि आमच्या होमस्टेचे मालक श्री राम किशनजी स्वतः आमच्या खोलीत आले. त्यांच्या हिमाचली आदरातिथ्याने आम्ही अगदी भारावून गेलो. त्यांनी आम्हा दोघींना पारंपरिक हिमाचली टोपी अगदी सन्मानाने घातली आणि आम्हाला निरोप दिला. हिमाचली टोपी हे पहाडी लोकांचे सांस्कृतिक आभूषण म्हणता येईल! ह्या हिमाचली टोपीचा उल्लेखनीय पैलू म्हणजे त्यामधील विविधता. हिमाचल प्रदेश राज्याचा विस्तार आणि त्यामधील विभिन्नता खरं तर ह्या पहाडी टोपीमध्ये प्रतिबिंबित होत राहते! रंगीबेरंगी लोकरीपासून बनविलेल्या त्या टोपीमध्ये हिमाचल राज्याच्या विविध प्रांतांमध्ये वसलेल्या अनेक सांप्रदायिक समूहांमध्ये असलेली सांस्कृतिक वैभवाची घट्ट वीण दिसून येते. प्रांतानुसार टोपीच्या रंगामध्ये, नक्षी मध्ये होणारा बदल त्या प्रदेशाची संस्कृती अधोरेखित करीत जातो.
आमची गाडी औट टनेल पार करून कुल्लू – मनाली महामार्गावरून धावू लागली. खरं तर तीर्थन व्हॅलीमध्येच सुट्टीचे उरलेले दोन दिवस व्यतीत करावे असे वाटत होते. पण आमच्या एका मैत्रिणीने नव्यानेच मनालीमध्ये ‘शनाग’ गावात होमस्टे सुरू केला होता आणि दुसरे कारण म्हणजे मला अटल टनेलमधून सिसुपर्यन्त भटकंती करण्याची इच्छा होती. आमची गाडी जशी त्या महामार्गावरून धावू लागली तश्या माझ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर तरळू लागल्या. २०१७ मध्ये स्पिती सहलीहून परतताना संध्याकाळी उशिरा मनालीहून बसने दिल्लीला प्रवास केला होता. माझ्या पहिल्याच सारपास ट्रेकच्या बेस कॅम्पला म्हणजेच कसोलला जाण्यासाठी भूंतरला आम्ही उतरून पुढे गेलो होतो. परंतु त्या गोष्टीला आता २४ वर्षांचा कालावधी लोटला होता. दरम्यानच्या काळामध्ये रस्त्याचा प्रचंड विस्तार आणि विकास झालेला होता. जुन्या मनाली मार्गावर बियास नदी सतत उजव्या बाजूला दिसत असे, पण ती जणू कुठे अदृश्य झाली होती. कुल्लूने आता एका प्रचंड महाकाय नगराचे स्वरूप घेतले होते. भूंतरला जाणारा उजव्या बाजूला दिसणारा छोटासा फाटा खूपच विकसित झाला होता. फ्लायओवर आणि चौपदरी रस्ता यामुळे मनालीला जाताना हिमालयाच्या पायथ्याशी आलो आहोत ह्याची जी उत्कंठा असे तीच नाहीशी झाल्यागत वाटले. आम्ही कुल्लूच्या एका धाब्यावर हिमाचली धामची चौकशी केली. आम्ही सकाळी लवकर निघल्याने नाश्ता केलेला नव्हता. त्यामुळे हिमाचली धाम खाण्याची इच्छा होती. परंतु एवढ्या सकाळी धाब्यावर जेवण तयार नव्हते. आमची हिमाचली धाम खाण्याची इच्छा पूर्ण झाली नाही, आम्ही हिरमुसले होऊन पुढे निघालो. जशी गाडी पुढे सोलंग व्हॅलीच्या दिशेने धावू लागली तसा आजूबाजूचा परिसर बदलून गेला. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर हिमाच्छादित पर्वत शिखरे, कोनिफरस वृक्षांची हिरवी जंगले, आनंदे वाहणारे निर्झर मनाचा ठाव घेऊ लागले! आम्ही एका हॉटेलपाशी नाष्ट्यासाठी थांबलो. हॉटेलच्या मागचा बाजूचा नदी काठाचा परिसर अगदी नयनरम्य होता. आम्ही हॉटेलचा दरवाजा उघडून मागच्या बाजूस जाण्याचा प्रयत्न केला पण भयानक हुडहुडी भरविणारा वारा घोंघावत होता. आम्ही निवांत भरपेट नाष्टा केला आणि पुढे निघालो.
आम्ही साधारण साडेअकराच्या सुमारास अटल टनेलच्या साऊथ पोर्टला पोहोचलो. तिथे एखाद्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळाला असते तशी लोकांची गर्दी लोटली होती. टनेलच्या बाहेर एका रांगेत वाहने उभी करून पर्यटक चक्क फोटो शूट, सोशल मिडियासाठी रील्स बनवित होते. खरं तर वाहतुकीचा रस्ता! पण बोगद्याच्या तोंडाशीच असलेली ही गर्दी आणि एकंदरीत तेथील लोकांचा वावर पाहून गंमत वाटली. आम्ही सुद्धा त्यांच्या मधलेच एक होऊन गेलो. फोटो काढले आणि अटल टनेल पार करून बोगद्याच्या नॉर्थ पोर्टला बाहेर पडलो. बोगदा पार करून आल्यावर चंद्रा नदीवर बांधलेला पूल पार करून उजव्या बाजूने जुन्या रोहतांग पासच्या रस्त्याकडे जाता येते, तर डाव्या बाजूने जाणारा रस्ता सिसुकडे जातो. आम्ही हा पूल पार करून चंद्रा नदीच्या पलीकडील रस्त्यावर रस्त्याच्या कडेला काही वेळ थांबलो. एवढया प्रचंड हिमालयीन पर्वतरांगेच्या पोटातून कोरून तयार केलेल्या अटल बोगद्याचे कौतुक करावे तेवढे थोडे!


मनालीपासून ५१ किलोमीटर अंतरावर ‘रोहतांग पास’ ही समुद्र सपाटीपासून १३००० फुट ऊंचीवरील पीरपंजाल पर्वतरांगांमधील उंच पर्वतीय खिंड आहे. हिमालयाचा पश्चिम-वायव्य ते पूर्व-आग्नेय असा विस्तारीत पसारा आहे! वायव्येस काराकोरम आणि हिंद-कुश पर्वतरांगांच्या सीमा आहेत. उत्तरेकडे तिबेटियन पठारामुळे ह्या हिमालयीन पर्वतरांगांची साखळी टेक्टॉनिक व्हॅलीने विभक्त केलेली आहे. लघु हिमालयातील पीरपांजल पर्वत रांगांचा समूह पाक व्याप्त काश्मीर पासून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश असा पसरलेला आहे. ह्या पर्वत शृंखलांमध्ये पाक व्याप्त काश्मीरमधील “हाजी पीर पास”, जम्मू-काश्मीरमधील “पीर पंजाल” आणि “बनिहाल”, तसेच हिमाचल मधील “रोहतांग पास” अश्या उंच पर्वतीय खिंडी आहेत. वर्षाच्या सहा महीने बर्फाखाली जाणाऱ्या ह्या खिंडीला BRO ने अटल टनेलचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे.
हिमाचल प्रदेशातील लेह-मनाली महामार्गावर BRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने बांधलेला हा समुद्रसपाटीपासून १०,००० फुट उंचीवर बांधलेला हा बोगदा म्हणजे एक अभियांत्रिकी चमत्कार आहे! हिमालयाच्या पूर्वेकडील पीरपंजाल श्रेणीमधील रोहतांग खिंडीखाली सुमारे ९ किलोमीटर अंतराचा हा जगातील सर्वात लांब बोगदा आहे. अटल टनेल म्हणजे लाहैाल–स्पितीला सर्व मोसमांमध्ये कुल्लू व्हॅलीशी जोडणारे माध्यम!

आम्ही बोगदा पार करून डाव्या बाजूने लेह-मनाली महामार्गाने पुढे लाहैाल जिल्ह्यातील सिसु गावापर्यंत पोहोचलो. सिसु एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. रस्त्याच्या सुविधेमुळे कधीकाळी दुर्गम समजले जाणाऱ्या सिसुमध्ये पर्यटकांची बेसुमार रेलचेल पहाण्यास मिळाली. तिथे एक नैसर्गिक धबधबा कपारीमध्ये नादगर्जना करीत कोसळत होता. तिथे बोटिंग करण्यासाठी लेक निर्माण केलेला होता. त्यामुळे एक प्रकारे हिल स्टेशनचा आभास होत होता. हिवाळ्यामध्ये धबधबा आणि लेक दोन्ही गोठून जातात. अटल टनेल पार केल्यावर अगदी जवळच असलेल्या ह्या सिसुमध्ये पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी होती. आम्ही तेथील वाहनतळाच्या बाजूने झाडांच्या सावलीत जागा पकडून काही वेळ तेथील निसर्ग न्याहाळत बसलो. आम्ही दोघी २०१७ मध्ये लाहैाल-स्पिती परिक्रमा केली तेव्हा इथे मुक्कामाचा पर्याय न स्वीकारता चंद्रताल सरोवराजवळ कॅम्पिंगचा पर्याय निवडला होता. आम्ही सिसुला एका धाब्यावर क्षुधा-शांती साठी थांबलो. चौफेर उंच उंच असलेल्या पर्वतरांगा, आणि आकाशातील ढगांची धावपळ टिपण्यात आमचा वेळ कसा गेला कळले सुद्धा नाही.

आमची मनालीमधील यजमान आज रात्री उशिरा स्पितीच्या रोड ट्रीप साठी निघणार होती त्यामुळे आम्ही तेथून काढता पाय घेऊन आमच्या मनाली मधील “एहसास” – कॅफे आणि स्टे ह्या ‘शनाग’ मधील होम स्टेवर जाऊन थडकलो. होमस्टेचे लोकेशन पाहून मी पुरती सुखावले! गोंधळ नाही, पर्यटन स्थळी असलेला कोलाहल नाही! मुख्य मनाली पासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर असलेलं आमचं मुक्कामाचे ठिकाण मला खूपच भावले. आमच्या खोलीला असलेल्या बाल्कनीमधून सभोवार नजर फिरवली की हिमाच्छादित पर्वतरांगा, त्यांच्या कुशीत वनराजी! तिथे अगदी चहाची वेळ होईपर्यंत मनसोक्त बसून निवांत झाले. हवेत हलका-फुलका गारवा होता.

संध्याकाळी गप्पांच्या ओघात रोहतांग पास काही दिवसांपूर्वीच रहदारीसाठी खुला झालेला आहे असे कळले. बर्फाच्या दुतर्फा भिंती आणि त्यामधून होणारी वाहतूक हे थोडं आपल्याला समुद्रसपाटीवर राहणाऱ्याना कुतुहलाचं! दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आमचे दिल्लीकडे जाणाऱ्या बसचे बूकिंग झालेले होते. त्यामुळे संध्याकाळपर्यंतचा वेळ आमच्या हाती होता. आम्ही रोहतांग पासला भेट देऊन यायचे ठरविले. बऱ्याच खटाटोपानंतर आमची रेंटल कारची व्यवस्था झाली. पण त्यासाठी आम्हाला मध्यरात्री पावणेतीन वाजता गाडीच्या ड्रायव्हरने तयार रहाण्यास सांगितले. आम्ही अगदी मध्यरात्री पावणे तीन वाजता गाडी आणि ड्रायव्हरची वाट पाहात होमस्टेच्या बाहेर गार हवेत उभ्या राहिलो. आमची झोप उडवून ड्रायव्हर महाशय चक्क एक तास उशिरा आला. एवढ्या थंड हवेतही आमचा पारा चढला! आमच्याशी हुज्जत घालतच त्याने गाडी रोहतांग पासच्या दिशेने हाकली. ज्या पध्दतीने ड्रायव्हर गाडी चालवत होता, ते पाहून आम्ही सुखरूप परत जाऊ ना? अशी शंका येऊ लागली. रोहतांग पासकडे जाण्यासाठी परमीट काढावे लागते. त्याने चक्क आम्हाला परमीट काढून ठेवले आहे ह्याबाबत थाप मारलेली होती. एका ठिकाणी आमची गाडी इतर गाड्यांसोबत बाजूला थांबली. आमचा ड्रायव्हर आम्हाला सांगू लागला की, पुढे जाण्यासाठीचे परमीट घेऊन कोणीतरी येत आहे. इतक्या पहाटे पेंगुळेलेल्या अवस्थेत त्याच्याशी हुज्जत घालण्याची आमची क्षमता संपलेली होती. आता आपणच ठरवले आहे ना, रोहतांगला जायचे! मग काय आलिया भोगासी असावे सादर! काही वेळातच काही कागद घेऊन माणसे आली, त्यांनी पटापट गाडी चालकांकडे परमीट दिले आणि गाड्या रोहतांग पासच्या वळणावळणाच्या खिंडीच्या रस्त्यावर धावू लागल्या. भयानक वाहतूक कोंडी झालेली होती. आम्ही केवळ ५१ किलोमीटर अंतर तब्बल चार तासामध्ये पार करून सकाळी आठ वाजता रोहतांग खिंडीपाशी पोहोचलो.
पीर पंजाल पर्वत शृंखलेमध्ये असलेल्या ह्या खिंडीचे विशेष महत्त्वआहे. हिमाचल प्रदेशाच्या दोन राज्यांना जोडणारा हा दुवा असला तरी सांस्कृतिकदृष्ट्या खऱ्याअर्थी दोन प्रदेशाचे विभाजन करतो. कुल्लू खोरे सनातनी हिंदू धर्म पालन करणारे तर लाहैाल – स्पितीच्या खोऱ्यामध्ये अतिउंचीवर बुद्धिस्ट सांप्रदाय! ह्या खिंडीमुळे कुल्लू खोरे लाहैाल – स्पिती आणि लडाखला जोडले जाते. २०१७ मध्ये स्पितीहून परतताना सप्टेंबर महिन्यात रोहतांग पासचे निसर्गरम्य दर्शन झाले होते. त्यानंतर ह्या सहलीमध्ये खास रोहतांगचीच सफर झाली.


रोहतांग खिंडीत “पहाडोवाली मॅगी” खाण्यात काही और मजा आहे! बरेच पर्यटक बर्फात खेळण्याचा मनमुराद आनंद घेत होते. चक्क रोहतांग खिंडीमध्ये आइस स्कूटर वगैरे सारखे खेळ उपलब्ध होते. आम्ही हुडहुडणाऱ्या थंडीत खारा चहा आणि गरमागरम मॅगीचा आनंद घेऊन आमची सवारी पुन्हा होमस्टेकडे वळवली. साधारण सकाळी अकरा वाजता पुन्हा आम्ही होमस्टेवर पोहोचलो आणि चक्क अंथरुणात काही वेळ गुडूप झालो.
दुपारचे जेवण करून चार वाजता आमच्या परतीच्या प्रवासासाठी निघालो. मनाली शहराच्या बाहेर नदी किनारी हिमाचल टुरिझमच्या बसचे स्थानक होते. आमची बस संध्याकाळी साडे पांच वाजता मनालीहून दिल्लीकडे प्रस्थान करणार होती. आमच्या होमस्टे पासून अगदी ५ ते ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बस स्थानकावर आम्ही वेळेतच पोहोचू ह्या आत्मविश्वासाने निघालो. पण ह्या सहलीची सांगता सुद्धा पकडा-पकडीच्या खेळाने होणार हे बहुधा विधिलिखितच होते!! आम्ही होम स्टेवरुन निघाल्यापासून सतत बस चालकाच्या संपर्कात होतो. बस सुटण्याच्या वेळेपर्यंत आम्ही बस स्थानकापाशी पोचू शकलो नाही. आमची टॅक्सी मनालीच्या ज्या रस्त्यावर होती तिथे इतकी वाहतूक खोळंबलेली होती की वाहने पुढे सरकतच नव्हती! अगदी गयावया करून त्या हिमाचल प्रदेश टुरिझमच्या बस चालकाला फोन करून थांबण्याची विनंती केली. कदाचित बसने जाणारे बरेचसे प्रवासी त्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकले असावे! आमची बस नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ थांबून होती. परंतु दुर्दैवाने आम्ही संध्याकाळचे पावणे सात वाजून गेले तरी बस स्थानकपर्यंत पोहोचू शकलो नाही. मनालीनंतर काही अंतरावर बसचा अजून एक पिक अप पॉइंट होता, त्यानंतर थेट कुल्लू! मग आम्ही पुन्हा बस चालकाशी संपर्क करून बसचा ठावठिकाणा विचारत आमच्याच टॅक्सीने बसचा पाठलाग सुरू केला. साधारण अर्धा तास जीव मुठीत घेऊन पाठशिवणीचा खेळ चालू होता. आमच्या सुदैवाने एका ठिकाणी वाहतूक खोळंबलेली होती तिथे आम्ही हिमाचल प्रदेश टुरिझमच्या बसला शेवटी गाठलेच! प्रथम बस चालकाचे आभार मानले. कारण दिल्लीला वेळेत पोहोचणे गरजेचे होते. मला दुसऱ्या दिवशी दिल्लीहून पुन्हा मुंबई गाठायची होती! एकंदरीतच तीर्थन व्हॅलीची सहल “The Chase – पाठलाग” अशी आमच्या स्मृतींमध्ये कैद झाली!
प्रवास वर्ष: मे २०२४
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा