गौमुख-तपोवनाकडे जाताना अगदी रूक्ष, खडकाळ वाटणारा हा प्रदेश, परतीच्या प्रवासात मात्र गंगा अवतरणाच्या पौराणिक कथेचा रंगमंच भासू लागला. विधात्याने निसर्गाचे नेपथ्य इतके बेमालूम निर्माण केलेले होते की, गंगा अवतरणाच्या कथेचा प्रत्येक प्रसंग खरा वाटावा! शिवलिंग पर्वत स्वरूप महादेव आणि तिथून उत्पन्न होणारी आकाशगंगा! गौमुखातून उगम पावणारी भागीरथी! त्या गूढ शांततेचा आणि हिमाच्छादित पर्वत शिखरांनी वेढलेला सामान्यतः रुक्ष वाटणारा प्रदेशही सुंदर वाटू लागतो. पौराणिक दंतकथेने मनावर गारुड करून संमोहित केल्यासारखी भावना होऊ लागली! ट्रेकचा बहुतांशी टप्पा हा अगदी रांगड्या वाटणाऱ्या निसर्गाशी थेट भेट घडवून आणणारा आहे. प्राचीन पौराणिक कथेशी संदर्भ जोडणाऱ्या हिमशिखरांनी सजलेल्या चौफेर वेढलेल्या पर्वत रांगा गूढ रहस्य दडविल्यागत आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या असतात आणि अवघा गौमुख तपोवनाचा मार्ग आपल्याला प्राचीन दंतकथा आणि जादुई सौंदर्याचा ट्रेक भासू लागतो!