गढवाल हिमालयाला देवभूमीची उपमा दिलेली आहे. हिंदू पौराणिक कथांशी निगडीत अनेक ठिकाणे ह्या गढवाल हिमालयात आहेत. त्यापैकी चारधाम यात्रेमधील एक–गंगोत्री धाम! अखंड भारत वर्षाची जलमाता “गंगा” मैय्याचे इथे मंदिर आहे. गंगोत्रीच्या पुढे गंगोत्री ग्लेशियरजवळ गौमुख येथे गंगेचे उगम स्थान आहे. गंगोत्रीहून पुढे “गौमुख दर्शन” हाही तीर्थयात्रेचा एक भाग मानला जातो! सप्टेंबर २०२२ मध्ये चारधाम यात्रेच्या निमित्ताने गंगोत्री धामला भेट दिलेली होती. त्यावेळी केवळ मंदिर आणि घाट परिसराचे दर्शन घेऊन आम्ही गंगोत्रीचा निरोप घेतला होता. पण तेव्हा तेथील परिसराने मनाचा ठाव घेतला होता. गंगोत्रीला मुक्काम करण्याची इच्छा मनातच राहून गेली होती!
माझा ट्रेकिंगच्या माध्यमातून परिचय झालेला मित्र, विलास पेंडसे ह्याने वयाच्या साठाव्या वर्षी केलेल्या “काश्मीर ते कन्याकुमारी” सायकल भ्रमंतीवर पुस्तक लिहायला घेतले होते, त्या निमित्ताने आमची फोनवर सतत चर्चा चालत असे. त्यादरम्यान विलासने त्याचा गौमुख – तपोवन ट्रेकचा बेत मला सांगीतला! विलास त्याच्या काही मित्रांसमवेत गौमुख – तपोवन ट्रेकला निघाला होता. अगदी ध्यानी मनी नसताना अचानक गौमुख – तपोवन ट्रेकची संधी चालून आली. जून २०२३ मध्ये झालेल्या उजव्या पायाच्या लिगामेन्ट सर्जरीमुळे कठीण वर्गातील ट्रेक इतक्यात करता येईल का ह्याबाबत मन साशंक होते. पण काही गोष्टींचा योग असतो! चारधाम यात्रेच्या वेळी गंगोत्री घाटावर पाहिलेल्या खळखळत्या भागीरथीच्या प्रवाहाचे “शंकर शंकर, जय शिव शंकर” निनाद नकळत माझ्या मनात उमटू लागले. भागीरथीच्या उगम स्थळाला भेट देण्याची प्रबळ इच्छा झाली आणि माझा ट्रेकला जाण्याचा बेत सुद्धा पक्का झाला!
विलास आणि त्याचे मित्र ट्रेकपूर्वी यमनोत्री धामला जाऊन नंतर गंगोत्रीला येणार होते. माझी चारधाम यात्रा दोन वर्षापूर्वीच झाल्याने मी थेट गंगोत्री गाठण्याचे ठरविले. गौमुख-तपोवन समुद्र सपाटीपासून अति उंचीवर असल्याने ट्रेक पूर्वी तेथील हवामानाशी एकरूप होणे आवश्यक असते. त्यानुसार मी ट्रेक पूर्वीचा एक दिवस अधिक राखून प्रवासाचा बेत आखला. साधारण जुलै महिन्यामध्ये आमचे प्रवासाचे नियोजन, ट्रेकची फी आणि आराखडा सर्व काही मार्गी लागले होते. आता फक्त ट्रेकसाठी सराव आणि व्यायाम कसोशीने करायचे होते! आमच्या पाच जणांच्या खासगी ग्रुप ट्रेकचे नियोजन डेहराडून स्थित ‘ट्रेकवेदा’ नामक एका ट्रॅवल कंपनी मार्फत बूकिंग केले होते. विलास आणि त्याचे मित्रमंडळी २५ सप्टेंबरला मुंबईहून निघून पुढे यमनोत्रीला गेले. मी २८ सप्टेंबरला मुंबईहून विमानाने डेहराडूनला पोहोचले आणि तिथून पुढे थेट टॅक्सीने गंगोत्री गाठणार होते. ट्रेकवेदा कंपनीने माझी गंगोत्रीपर्यंत जाण्याची सोय करणार असल्याचे कबूल केलेले होते. परंतु २८ सप्टेंबरला डेहराडून विमानतळावर उतरल्यापासून गंगोत्रीला पोहोचेपर्यंत मला आणि त्यानंतर ट्रेक पूर्ण होईपर्यंत आम्हा सर्वाना जो काही अनुभव आला, तो धडा शिकवणारा ठरला! भटकंती करताना पूर्ण आणि खात्रीलायक नियोजन करूनच प्रवासाला निघणे हा माझा कित्येक वर्षांचा शिरस्ता! पण ह्या सहलीचा अनुभव एकदम लक्षात राहील असाच होता!
गंगोत्रीला त्याच दिवशी पोहोचण्याचे ठरवल्याने मी मुंबईहून मध्यरात्रीच्या विमानाने डेहराडून गाठले. सकाळचे पावणे आठ वाजले होते, पण सामान घेऊन विमानतळाबाहेर आल्यावर माझ्यासाठी गाडीची कोणतीही सोय केलेली नसल्याचे लक्षात आले. मी ट्रेकवेदा कंपनीच्या प्रतिनिधीशी फोनवर हुज्जत घालून, त्याला जाब विचारून कसे बसे टॅक्सीची सोय करण्यास भाग पाडले. दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर ट्रेकवेदाच्या प्रतिनिधीने गंगोत्रीला जाण्यासाठी मला विमानतळावर गाडीची सोय करण्यात आल्याबाबत कळविले. विमानतळावर टॅक्सी आलेली पाहून मी सुटकेचा निश्वास सोडला! माझा गंगोत्रीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. मुंबई ते डेहराडून हा प्रवास दोन टप्प्यात केल्याने रात्रीची झोप झालेली नव्हती, त्यातच सकाळी विमानतळावर आलेला अनुभव ह्यामुळे गाडीत डुलकी घेण्यासारखी परिस्थिती राहिली नव्हती.


माझी गाडी डेहराडून शहर सोडून पुढे मसूरीच्या दिशेने जाऊ लागली, तसतसा हवेतला सुखद बदल जाणवू लागला. सप्टेंबर महिना संपत आल्याने शरद ऋतूची हलकी चाहूल नजरेस पडत होती. वळणदार पर्वतरांगांमधून जाणारा रस्ता धुक्याची दुलई पांघरून होता. हिरवाईने नटलेल्या वनराजीमुळे थकलेल्या डोळ्यांचा शीण पार पळून गेला. साधारण एक तासाने ड्रायव्हरने गाडी एका धाब्याजवळ थांबवली. मला सुद्धा खूप भूक लागलेली होती. बारा वाजण्याचा सुमार! मी ब्रंच करायचे ठरविले. खूप लांबचा पल्ला गाठायचा होता. डेहराडून ते गंगोत्री हे साधारण २३५ किलोमीटर अंतर पार करण्यास ८/९ तासाचा अवधी सहज लागतो! रस्त्याच्या कडेने अगदी दरीच्या बाजूलाच धाबा होता. सभोवतालचा परिसर अगदी निसर्गरम्य होता. हिरवाईने सजलेल्या डोंगररांगांच्या अंगाखांद्यांवर धुक्याची झूल शोभून दिसत होती. त्या पहाडी हवेचा शरीराला झालेला स्पर्श अगदी सुखावह आणि तजेला आणणारा ठरला. रात्रभर झालेल्या जाग्रणामुळे आलेली डोळ्यावरची झांपड उडाली. मनसोक्त नाश्ता करून पुढच्या प्रवासाला निघाले.
काही अंतर पुढे गेल्यावर माझ्या गाडीच्या ड्रायव्हरने सांगीतले की, ट्रेकवेदा कंपनीने त्याच्या गाडीचे गंगोत्रीपर्यंतचे गाडी भाडे त्यांना पोच केलेले नाही. त्यामुळे त्याचा मालक सतत फोनवर त्याला बेजार करीत होता. त्याने ड्रायव्हरला ताकीद दिली की, गाडीभाडे आले नाही तर त्याने गाडी गंगोत्री पर्यंत घेऊन जाऊ नये! माझी झोप पुरती उडाली! मी ट्रेकवेदा कंपनीच्या प्रतिनिधी सोबत खलबतं आणि पाठपुरावा करीत चिन्यलीसौर पर्यंतचा टप्पा कधी गाठला तेही समजले नाही. माझ्यासमोर नवीन संकट उभे होते! सामान घेऊन आता पुढच्या प्रवासाची नव्याने तजवीज करावी लागणार होती. माझ्या ड्रायव्हरला किमान मला उत्तरकाशी पर्यंत घेऊन जा, अशी विनवणी केल्यावर त्याने माझ्यावर तेवढी मेहेरबानी केली. उत्तरकाशीच्या टॅक्सी स्टँडवर पोहोचताच मी त्याला तगादा लावला की, ‘मला दुसरी टॅक्सी करून दे’, असे सांगितल्यावर त्याने मला दुसरी टॅक्सी करून दिली.
मला आता साधारण “ट्रेकवेदा” कंपनीचे नियोजन लक्षात आले होते. उत्तरकाशीला पोहोचेपर्यंत संध्याकाळचे पाच वाजले होते. दुसर्या टॅक्सीमध्ये बसल्यावर मात्र मी सावध झाले. प्रथम मी आमची गंगोत्रीला ज्या हॉटेल मध्ये रहाण्याची सोय केल्याचे ट्रेकवेदाने सांगीतले होते, तिथे फोन करून चौकशी केली. मला दूसरा धक्का मिळाला! आमच्यासाठी कोणतेही बूकिंग केलेले नव्हते असे हॉटेल मालकाशी संपर्क केल्यावर कळले. मी ट्रेकवेदाच्या प्रतिनिधीला फोन लावला आणि माझ्या वकिली पेशाच्या भाषेत त्याला समज दिली. साधारण तास-दीड तास फोनवर पाठपुरावा केल्यावर त्याने दुसर्या हॉटेलचा संपर्क क्रमांक पाठवला. त्या हॉटेल मालकाशी फोनवरून संपर्क करून रात्रीच्या मुक्कामाची सोय निश्चित करून घेतली.
आतापर्यंतचे माझे फोनवरचे संभाषण आणि वार्तालाप माझ्या टॅक्सी ड्रायव्हरने ऐकून ताडले असावे की, ट्रॅवल एजेंटने आम्हाला फसविले आहे! त्याने मला विचारणा केल्यावर त्याला इत्यंभूत हकीकत सांगितली. त्याने मला धीर दिला, “मॅडम आप चिंता मत करो, गंगोत्री में हॉटेल की व्यवस्था हो जायेगी”. मुक्कामाची सोय झाल्याने मला हायसं वाटले! त्याला काय वाटले कोण जाणे, त्याने अचानक गंगा अवतरणाचे भजन चालू केले. संध्याकाळ उलटून गेलेली होती, त्या भजनाने माझ्या अस्थिर झालेल्या मनाला गंगा अवतरणाच्या कथेमध्ये गुंतवून ठेवले. कथेचा अगदी शेवटचा चरण आला, “गंगा मैय्या शंकराच्या जटेतून भूतलावर प्रवाही झाली” असे कानावर पडत असतानाच माझी गाडी गंगोत्रीमधील माझ्या ‘हॉटेल तपोवन कॉटेज’ समोर उभी ठाकली. मी त्या कथा सागरामध्ये इतकी बुडून गेले की, गंगोत्री कधी आले तेही कळले नाही! दिवसभरचा झालेला मनस्ताप सुद्धा विसरले! घरातून निघाल्यापासून सुमारे चोवीस तासांचा प्रवास करून साधारण रात्री पावणे नऊच्या सुमारास मी गंगोत्रीच्या हॉटेलवर पोहोचले. प्रथम मी घरी आणि विलासला सुखरूप पोहोचल्याचे कळविले आणि माझ्या खोलीत जाऊन निवांत झाले. गंगोत्रीला अगदी गुलाबी थंडी होती. दुलईमध्ये गुडूप होऊन झोपी गेले. दुसर्या दिवशी माझ्यासाठी वातावरणाशी समरूप होण्यासाठी ठेवलेला राखीव दिवस होता. सकाळी हॉटेलच्या मॅनेजरला सांगून गंगोत्रीच्या आसपासची ठिकाणे पहाण्यासाठी गाडीची व्यवस्था करून घेतली आणि हर्षिल, मुखबा, बगोरी, कल्पकेदार ह्या स्थळांना भेट देऊन आले.
संध्याकाळी चहाच्या वेळेपर्यंत विलास आणि मंडळी सुद्धा आली. विलासचे मित्र श्री. जगदीश नाईक, त्यांची पत्नी अनिता गोखले, श्री. अमोल भागवत हे सर्व नुकताच निवृत्त झालेले होते. त्यांच्याशी परिचय करून घेतला आणि आम्ही सर्व अगदी सहजपणे रुळलो. त्यांनी त्यांचे यमुनोत्री इतिवृत्त सांगीतले आणि माझी हकीकत ऐकून आश्चर्य चकित झाले! संध्याकाळच्या चहानंतर आम्ही सर्व गंगोत्री मंदिराच्या दिशेने चालत निघालो. गंगोत्री मंदिर परिसरातून सूर्यास्ताचे दृश्य फार छान दिसत होते. सुदर्शन पर्वत शिखरावर आपल्या रंगछटेचे प्रदर्शन करीत सूर्य देव माघारी परतत होते.

गंगोत्री मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर मला दोन वर्षापूर्वीची चारधाम यात्रेमध्ये झालेली गंगोत्री धामाची धावती भेट आठवली. त्यावेळी भर दुपारी कुंद ढगाळ हवामान आणि बोचरी थंडी होती. ह्यावेळी कदाचित मी आदल्या दिवशी गंगोत्री मुक्कामाला आल्याने हवेमध्ये सहज रुळले! पण तुलनेने हवामान छान होते. निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे दिवसभर उबदार वातावरण होते. मनसोक्त भागीरथीच्या घाटावर काही वेळ मी आणि अनिताने व्यतीत केल्यावर आम्ही सर्व गंगाआरतीचा सोहळा पहाण्यासाठी एका ठिकाणी एकत्र बसलो. गंगोत्रीला संध्याकाळी घाटावर आणि मंदिरात अशी दोन ठिकाणी गंगेची आरती केली जाते. आरतीसाठी भागीरथीच्या घाटावर आणि मंदिराजवळ सर्व भाविकांनी गर्दी केलेली होती. गंगा आरतीचा कार्यक्रम अगदी साग्रसंगीत पार पडला. गंगारतीनंतर येथे सर्व भाविकांना गरम चहा आणि प्रसाद दिला जातो.

गौमुख – तपोवन ट्रेकसाठी पहिला टप्पा म्हणजे गंगोत्री! गंगोत्री म्हणजे गढवाल हिमालयात समुद्र सपाटीपासून १०,२०० फूट उंचीवर वसलेले हिंदूच्या पवित्र तिर्थांपैकी एक स्थान! परंतु त्याची खरी ओळख म्हणजे गंगा नदीचे उगम स्थान! ट्रेकची सुरुवात गंगामैयाच्या दर्शनाने करून तिच्या उगमाकडे जाण्याची प्रथा आहे. आमच्या नियोजित कार्यक्रमानुसार दुसर्या दिवशी गौमुख- तपोवन ट्रेकचा पहिला दिवस होता. आम्ही आता ट्रेकवेदा सोबत वार्तालापाची सर्व जबाबदारी विलासवर सोपविली. विलासला मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजता ‘भोजबासा’ ह्या आमच्या ट्रेक मधील पहिल्या पडावाकडे प्रयाण करायचे आहे असे सूचित करण्यात आले. आम्ही त्यानुसार सर्व बॅकपॅक आणि इतर सामानाची बांधाबांध करून लवकरच झोपी गेलो.
सकाळी लवकर उत्साहाने उठून आम्ही आमच्या गाइड आणि पोर्टरची प्रतीक्षा करू लागलो. तासामागून तास गेले परंतु आमचे गाइड अथवा पोर्टर आले नाही. विलास आणि त्याचा फोन, दोन्ही अगदी युद्ध पातळीवर कार्यरत होते! सकाळचे दहा वाजून गेले तरी आम्ही गंगोत्रीच्या हॉटेलवर पोर्टर आणि गाइडची वाटच पहात होतो!आम्हाला पुरते कळून चुकले की, ट्रेक वेदा कंपनीने आम्हाला पूर्णपणे फसविलेले आहे!! आम्ही त्वरित निर्णय घेतला, ज्या गौमुख -तपोवन दर्शनासाठी इथवर आलो, ते केल्याशिवाय माघारी परतायचे नाही! परंतु इतक्या उशिरा पुढच्या टप्प्याकडे निघणे योग्य ठरणार नव्हते. आम्ही निराश न होता चौकशी सुरू केली, आणि स्थानिक हॉटेल मालक ह्यांच्या मदतीने गाइड/पोर्टर ह्या गोष्टींचे नियोजन केले. दुसर्या दिवशी ट्रेकच्या पहिल्या पडावाकडे जायचे ठरविले. त्यामुळे आमच्याकडे आजचा संपूर्ण दिवस होता! आम्ही “गंगोत्री दर्शन” आणि निलोंग व्हॅली परिसरात असलेल्या “गरतंग गली”ला भेट देण्याचे ठरविले. गरतंग गलीच्या भेटीमुळे आमचा एक प्रकारे सराव ट्रेक झाला.
गंगोत्रीहून भोजबासाकडे
गौमुख-तपोवनाचा ट्रेक मुख्यत: दोन टप्प्यात विभागलेला आहे. बेस कॅम्प म्हणून गंगोत्री आणि त्यानंतर गंगोत्रीपासून साधारण सतरा किलोमीटर अंतरावर असलेले मुक्कामाची सोय असलेले भोजबासा! पर्यटक, यात्रेकरू किंवा ट्रेकर्स भोजबासा येथे मुक्काम करून गौमुख भेट करून पुन्हा मुक्कामाला भोजबासाला येतात. पण ज्यांना तपोवनाकडे जायचे आहे, त्यांच्यासाठी भोजबासाहून थेट तपोवनाला जाऊन मग परतताना गौमुख दर्शन करून पुन्हा भोजबासाला मुक्कामी येणे सोयीस्कर ठरते. गौमुख-तपोवन ट्रेक रूट गंगोत्री नॅशनल पार्कच्या अखत्यारीमध्ये येतो, त्यामुळे ह्या ट्रेकसाठी वन विभागाची पूर्व परवानगी घ्यावी लागते. दर दिवशी ह्या ट्रेक रूटवर फक्त १५० माणसांसाठी परवानगी देण्यात येते. वास्तविक गौमुख-तपोवन ‘ट्रेक’ म्हणून भटकंती करणार्यांच्या ‘विश लिस्ट’मध्ये येण्याआधी गंगा उगमाची पदयात्रा ‘तीर्थयात्रा’ म्हणून प्रचलित होती. गंगोत्रीहून पायी गंगेच्या उगमापर्यंत जाणाऱ्या यात्रेकरू, साधू-संन्यासी ह्यांचा ह्या मार्गावर पायरव होता. काही वर्षांपूर्वी गंगोत्री ते गौमुख मार्गावर खच्चर किंवा घोड्यावरून जाता येत असे, परंतु भोजबासानंतर ह्या पायवाटेवर सतत भू:स्खलन होत असल्याने जीवितमात्राला धोका उद्भवू लागल्याने आता ह्या मार्गावरून केवळ पायी वाटचाल करावी लागते.
आमचा खऱ्या अर्थी ट्रेकचा पहिला दिवस उजाडला! आम्ही सकाळी लवकर तयार होऊन हॉटेलखालीच असणार्या चहाच्या टपरीवर आमच्या पोर्टर आणि गाइडची वाट पहात उभे राहिलो. काही वेळातच दोन अगदी तरुण मुले आली. त्यापैकी एक आमचा पोर्टर आणि दूसरा मनोज गाइड होता. साधारण सकाळी साडे सहा वाजता आमच्या हॉटेल नजीकच असलेल्या एका गल्लीतून मनोजने आमच्या पाच जणांच्या चमूला डोंगराच्या दिशेने गेलेल्या पायऱ्यांवरून त्याच्या मागोमाग येण्यास सांगीतले. मंदिराच्या डाव्या बाजूने गौमुखाकडे जाणारी पायवाट होती. सुरुवातीचे काही अंतर पायऱ्या चढून जावे लागते, आणि ती चढाई अगदी दमछाक करणारी होती. परंतु सकाळच्या थंड हवेत गंगोत्रीधामच्या वरच्या अंगाने, जंगलातून अगदी उत्साहाने आमचा कंपू चढाई करून भोजबासाच्या दिशेने पायवाटेवर वाटचाल करू लागला. थोड्याश्या चढाईनंतर गौमुखकडे जाणारी पायवाट सुस्पष्ट दिसू लागली. दोहों बाजूनी पर्वतरांगानी वेढलेल्या खोल दरीमध्ये खळखळाट करीत प्रचंड वेगाने गंगोत्रीच्या दिशेने वाहणारा भागीरथीचा प्रवाह आणि डाव्या बाजूला गगनाला गवसणी घालणारे उंच पर्वत आणि डोंगरकडयांच्या अगदी पोटात कोरून काढल्याप्रमाणे गौमुखकडे जाणारी अरुंद पायवाट!
आम्ही जंगलातून पाईन वृक्षांच्या छायेतून पुढे आलो. थोडी उघडीप मिळाली आणि गंगोत्री मंदिरातील घंटेचा दुरून येणारा नाद कानात गुंजला. गंगोत्री मंदिरामध्ये सकाळच्या पूजा-अर्चेला सुरुवात झाली असावी! मागे वळून पाहताच सुंदर दृश्य नजरेस पडले! चौफेर पर्वत रांगांनी वेढलेल्या गंगोत्रीमधील मनुष्य वस्तीसाठी बांधलेल्या घरांची लाल-हिरवी छप्परे, मधोमध सफेद रंगाचे गंगा मैयाचे मंदिर, सदैव बर्फाने आच्छादीत असल्याने बोडक्या पर्वत शिखरांच्या कुशीत खेटून आकाशाकडे उंच पहाण्याची स्पर्धा करीत असलेले फर, स्प्रूस, देवदार वृक्ष! स्वच्छ निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर त्याच उघड्या- बोडक्या पर्वत शिखरांवर सूर्य किरणांचा अलगद वर्षाव होताच, ती शिखरे सुवर्णभस्मासारखी चमकू लागली! खूपच मंत्रमुग्ध करणारा नजारा होता. समोरच्या पर्वत शिखरांवर आपली अभा फेकत सूर्यदेवाने दर्शन दिले. भोजबासाकडे जाणाऱ्या वाटेवरचा पहिला टप्पा खूपच निसर्गरम्य आहे. साधारण २ ते ३ किलोमीटर अंतर चालून गेल्यावर आम्ही गंगोत्री राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. तिथे आमचे ट्रेक परमीट आणि ओळखपत्र इत्यादी तपशील घेतले गेले. ह्या ठिकाणी कॅमेरा वगैरे वस्तूंसाठी असलेले शुल्क अदा करावे लागते. प्रवेशद्वाराजवळ सर्व सूचना आणि माहिती तपशीलवार फलकांवर सूचित केलेली आहे. आता खऱ्या अर्थाने आम्ही ट्रेक रूटवर प्रवेश केला होता! ह्या गंगोत्री-गौमुख मार्गावर पॉलिथिन नेणे वर्जित आहे. अगर आपल्याकडे काही पॉलिथिन बॅग्स् किंवा तत्सम गोष्टी असतील तर त्या पुन्हा आपल्याला परत आणणे क्रमप्राप्त आहे. हा उपक्रम अगदीच योग्य वाटला. ट्रेक असो अथवा तीर्थयात्रा, हिमालयात पर्यटनामुळे होणाऱ्या कचऱ्याचे विघटन करणे जिकिरीचे होत आहे आणि पर्यावरणास देखील घातक ठरत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेथील अधिकारी सर्वाना कळकळीने सूचना देत होते की कोणालाही अति उंचावर गेल्याने विरळ हवेमुळे त्रास होऊ लागला तर त्या ठिकाणाहून पुन्हा परतीचा प्रवास सुरू करावा! कारण पुढे सर्व प्रदेश अगदीच दुर्गम आणि कोणतीही वैद्यकीय सेवा मिळणार नाही असाच होता!
वनविभागाच्या चेक पोस्टनंतर आम्ही अगदी कडेकपारीतून अरूंद रस्त्यावर, कधी मळलेली पायवाट तर कधी खडबडीत दगड-धोंड्यांच्या रस्त्यावरून मार्गक्रमण करीत होतो. समोरच्या दिशेला अनेक पर्वतरांगा दिसत होत्या. उजव्या बाजूला खोल दरीत भागीरथी वचनबद्ध असल्याप्रमाणे प्रचंड वेगाने वाहत होती. पर्वतरांगांमधून घरंगळत आलेले दगड-गोटे, प्रवाहामध्ये निष्ठापूर्वक निश्चल बसलेल्या प्रचंड शिळा, वळणा-वळणावर कधी विस्तीर्ण तर कधी मार्ग बदलून वाहणारं भागीरथी नदीचे पात्र, त्याच्या किनार्याने वाढत गेलेली वृक्षराजी अन् निळ्या आकाशात मध्येच कधीतरी वेगवेगळ्या आकारात तरंगणारे शुभ्र ढगांचे पुंजके असा टप्प्या-टप्प्यात बदलणारा लँडस्केप पाहात आम्ही देवगाड पर्यंत येऊन पोहोचलो.
देवगाडला पोहोचेपर्यंत सकाळचे साडेनऊ वाजले होते, परंतु प्रखर सूर्य प्रकाशाने भर दुपार झाल्यासारखे वाटू लागले. देवगाडजवळ रस्ता पूर्ण वाहून गेलेला होता. मळलेली पायवाट सोडून खालच्या दिशेला उतरून दगडमातीच्या वाटेवरून छोट्या लाकडी पुलांवरून खळखळ वाहणारे झरे पार करीत पुन्हा वरच्या दिशेला चढून गेलो. तिथे हिरव्या रंगाचा वन विभागाचा विश्रांतीचा थांबा होता. आम्ही काही क्षण तिथे विसावून पुन्हा डोंगरकपारीतून चालू लागलो. बऱ्याच वेळा वाहून गेलेल्या मार्गावर लाकडी ओंडक्यांनी बनवलेला पूल पार करून जावे लागे. क्वचितच झाडांचा आडोसा मिळत होता. सावली मिळाली की, आम्ही क्षणभर विश्रांती घेत असू! सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनुष्य वस्ती नसतानाही टप्प्या टप्प्यांवर वन विभागाच्या सौजन्याने फलक लावलेले आढळून येत होते. त्या फलकांवर स्थळाचे नाव, समुद्र सपाटी पासूनची उंची, अक्षांश-रेखांश, आणि त्या स्थळापासून पुढे येणार्या स्थळाचे अंतर असा इत्यंभूत तपशील नमूद केलेला होता. देवगाडनंतर भांगलूबासाचा फलक दृष्टीस पडला.
आमची पावले चालतच होती! काही अंतर पुढे चालल्यावर समोर भागीरथी सिस्टर्सपैकी एक शिखर दिसू लागले. ह्याचा अर्थ असा होता की, आम्ही चिडबासाच्या जवळपास पोहोचलो होतो! जसे चिडबासा जवळ येऊ लागले, तसतसे दगडमातीचे वाळूकामय सुळके दिसू लागले. ह्या ठिकाणी पूर्वी वापरात असलेली डोंगरातील पायवाट पूर्णपणे भू:स्खलनामुळे वाहून गेलेली होती. त्यामुळे एक मोठा टप्पा लाकडी पुलाने जोडला होता. लाकडी पूल पार करून मोठाल्या दगड-गोट्यावर चढाई करून आम्ही चिडबासाला येऊन पोहोचलो. दुपारचे दीड वाजले होते! चिडबासाला असलेल्या पाईन वृक्षांच्या छायेतून चालताना खूपच आनंद वाटत होता. समुद्र सपाटी पासून ११,६८० फूट उंचीवर असणारे चिडबासा–अर्थातच चीड वृक्षांचे म्हणजे पाईन वृक्षांचे जंगल! चीड, देवदार वृक्षांच्या मुबलकतेमुळे ह्या ठिकाणाला चिडबासा म्हणून ओळखले जाते. गंगोत्री-गौमुख ट्रेक मधील चिडबासा हा महत्वाचा टप्पा! चिडबासा कॅम्पिंग साठी अगदी योग्य जागा आहे. चीड वृक्षांनी वेढलेले हे ठिकाण अगदी परिकथेमधील जंगलाप्रमाणे भासले. ह्या ट्रेकचा खरा आनंद घेण्यासाठी चिडबासा येथे मुक्काम हवाच! परंतु तिथे कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने थेट भोजबासा येथे जावे लागते. काही ट्रेक नियोजन करणाऱ्या खासगी कंपन्या त्यांचे सर्व साधन-सामुग्रीसह चिडबासा येथे तंबू टाकून पहिला पडाव चिडबासाला करतात. चिडबासाजवळ आल्यावर विश्रांतीसाठी उभारलेले शेड, कॅम्पिंग केल्याचे अवशेष मात्र नजरेतून सुटत नव्हते. क्षणभर वाटले, आपला पहिला पडाव चिडबासाला असता तर किती बरे झाले असते! आम्ही चिडबासाला वन विभागाच्या कॉटेजपाशी थांबलो. तिथे गाइडने आमची चहा आणि नाष्ट्याची सोय केली होती. आमच्या जवळचे तहानलाडू-भूकलाडू काढून आम्ही सर्व तिथे विसावलो. पण पुढचा टप्पा लवकर गाठणे आवश्यक होते. गंगोत्री-चिडबासा हा टप्पा साधारण नऊ किलोमीटर अंतराचा आहे. चिडबासाहून पुढे पाच किलोमीटर भोजबासा आहे. अर्थातच आम्ही निम्म्यापेक्षा जास्त अंतर चालून पुढे आलो होतो. परंतु दुपार होऊन गेल्यामुळे मनात धाकधूक होती, हवामान बिघडले तर पुढचा रॉक फॉल झोन पार करणे जिकिरीचे होऊन जाईल! हिमालयात हवामान खात्याचा अंदाज कधीही बिघडू शकतो! पण आम्ही खूपच नशीबवान ठरलो, गौमुख-तपोवन ट्रेक पूर्ण करून गंगोत्रीला परत येईपर्यंत आल्हाददायक हवा आणि स्वच्छ सूर्य प्रकाश हयांनी आमची साथ सोडली नाही. पाईन वृक्षांच्या छायेतून पाय काढता घेताना मन खट्टू झाले खरे, पण आमचे ध्येय गौमुख -तपोवन होते!
चिडबासानंतर हरित वृक्षराजी तुरळक होत जाते. आपण अक्षरश: हिमनद्यांबरोबर वाहून आलेल्या माती, दगडधोंडयांच्या प्रदेशात प्रवेश करतो. चिडबासाचा चेक पोस्ट सोडताच अगदी खडबडीत आणि रूक्ष रस्ता सुरू होतो! एकीकडे खाली खोल दरीत वाहणार्या भागीरथीचा कानावर येणारा आवाज आणि डाव्या बाजूला भुसभुशीत दगडमातीचे डोंगरांचे सुळके आणि अंतरा-अंतरावर दगडमाती वाहून गेल्यामुळे नष्ट झालेली भिवविणारी पायवाट! चिडबासाच्या पुढे तीन किलोमीटर अंतरावर ‘गिला पहाड’ म्हणून ओळखले जाणारे धोक्याचे क्षेत्र येते. हा शेवटचा टप्पा “रॉक फॉल” क्षेत्र असल्याने जीव मुठीत घेऊन, सतत डाव्या बाजूला मान वाकडी करून सावधतेने मार्गक्रमण करीत होतो. विशेष म्हणजे जिथे रस्ता वाहून गेलेला आहे किंवा कधीही कोणत्याही क्षणी उंचीवरून दगडगोटे घरंगळत येण्याची शक्यता आहे त्याच टप्प्यात नेमकी धाप लागणारी चढण-उतरण असे! संध्याकाळचे वेळी हिमालयीन ‘भरल’ सारखी जनावरे परतीच्या मार्गावर असतात. त्यामुळे त्यांच्या पायाने एखादया जरी दगडाचा चेंडू झाला तरी कपाळमोक्षच! अंदाजे ८ ते ९ डोंगर वळणं ह्या “रॉक फॉल” क्षेत्राने व्यापली होती. त्यामुळे शेवटचे दोन किलोमीटरचे अंतर अगदी जीव मुठीत धरून पार केले. आमच्या सोबत असलेला गाइड आणि इतर ग्रुप सोबत असलेले गाइड सर्वांना, “चलो जल्दी चलो, ध्यान रखो,” अश्या सतत सूचना देत होते. “रॉक फॉल” क्षेत्राच्या सुरुवातीस आणि शेवटी वन विभागाचे सतर्क करणारे फलक आहेत. “रॉक फॉल” क्षेत्र पार केल्यावर अक्षरशः दगडगोटयांवर कसरत करीत वाट शोधावी लागते. गौमुख-तपोवनाचा ट्रेक आव्हानात्मक आहे असे का म्हणतात ह्याचा नेमका प्रत्यय ह्या टप्प्यात येतो. शेवटचा टप्पा अगदीच नकोसा वाटू लागतो! एका डोंगराला वळसा घालून दगड गोट्यांना पार केल्यावर एका vantage point शेडपाशी येऊन पोहोचतो आणि तेथून एका दृष्टीक्षेपात चौफेर पर्वत रांगांनी वेढलेले भोजबासा नजरेस पडते. समोर “भागीरथी सिस्टर्स” ज्याला ‘भागीरथी मासिफ’ असे ही म्हटले जाते, ती पर्वत शिखरे दिसू लागतात. आणि आपला दिवसभरचा शीण आणि शेवटच्या टप्प्यात सतत मनात घोंगावणारे भय सुद्धा कुठच्या कुठे पळून जाते!

आम्ही संध्याकाळी पाच वाजता भोजबासा येथील “श्री रामबाबा योगाश्रम” ह्या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. भोज वृक्षांमुळे ह्या ठिकाणाला भोजबासा असे नाव पडलेले आहे. सद्य स्थितीत भोज वृक्ष खूप नसले तरी त्यांचे अस्तित्व जागोजागी दिसत होते. प्राचीन काळी ह्या भोज वृक्षांच्या झाडाच्या सालीचा कागदाप्रमाणे उपयोग करून त्यावर लेखन केले जात असे. भोजबासा समुद्रसपाटीपासून १२४५० फूट उंचीवर असल्याने येथे वृक्षराजी नगण्य होत जाते. उंच प्रदेशामध्ये विरळ हवेमुळे कदाचित एखाद्याला शारीरिक अस्वस्थता सुद्धा वाटू शकते. आम्ही दोन दिवस गंगोत्रीला राहिल्याने उंच प्रदेशातील हवामानाशी एकरूप होणे सुलभ झाले. गौमुख -तपोवन ट्रेक साठी देश-विदेशातून ट्रेकर्स येतात. आमच्या कॅम्प साइटवर परदेशी पाहुण्यांचा एक चमू होता.
भोजबासा म्हणजे चौफेर पर्वतरांगांनी वेढलेली भागीरथीच्या किनाऱ्यालगतच असलेली कॅम्पींगसाठीची सुयोग्य जागा! भोजबासा हा मुक्कामासाठीचा शेवटचा टप्पा आहे. सर्वसाधारणपणे इथे मुक्काम करून यात्री गौमुख पर्यंत जाऊन येतात किंवा ट्रेकर्स गौमुख-तपोवन हा एकत्रित टप्पा पार करून पुन्हा भोजबासा मुक्कामी येतात. गौमुख यात्रेचा महत्त्वाचा टप्पा म्हणून गढवाल निगमच्या पक्क्या बांधकाम असलेल्या कॉटेजेस् सुद्धा भोजबासाला आहेत. भोजबासाला हवामान खात्याची वेधशाळा सुद्धा आहे!
संध्याकाळी आमच्या पडावावर पोहोचल्यावर आम्हाला पाच जणांसाठी एक तंबू दिला गेला. चहा-पानाची सोय झाली. आम्ही आमच्या खांद्यावरून आमच्या बॅकपॅक उतरवून निवांत झालो. राम बाबा आश्रम सर्व मूलभूत सोईनी सुसज्ज होता. अगदी आमच्या आश्रमामध्ये तंबूमध्ये लोखंडी कॉट आणि त्यावर बिछाने, रजई पांघरूण सर्व काही सोई सुविधा होत्या. थोडक्यात भोजबासाचे पूर्णपणे व्यापारीकरण झालेले आहे! ह्या तंबूंना मजबुती देण्यासाठी कमरेइतक्या उंची पर्यंत दगडी भिंती उभारलेल्या आहेत. एक स्वयंपाक घराची संपूर्ण दगडी झोपडी तयार केलेली आहे. भोजबासामध्ये अनेक ट्रेक आयोजित करणाऱ्या कंपन्यांचे नदीच्या काठाने लाल-पिवळे रंगाचे तंबू वसलेले दिसतात.
आम्ही चहा घेऊन कॅम्प परिसरात टेहळणी करू लागलो. संपूर्ण परिसर पर्वत रांगांनी वेढलेला होता. सायंकाळी सूर्य देव परतण्याच्या बेतात होता, समोर भागीरथी शिखरांवर जणू सुवर्णाचा मुलामा द्यावा त्याप्रमाणे एका मागोमाग एक तिन्ही शिखरे चमकू लागली. मंत्रमुग्ध करणारा नजारा होता. प्रत्येक क्षणाला त्या रंगाच्या उधळणीचे फोटो काढण्याची धडपड सुरू होती, पण शेवटी ‘ह्याची देही ह्याची डोळा’ ही अनुभूति महत्त्वाची आणि ती मनामध्ये चिरंतन सुद्धा राहते. कॅमेरा आणि मोबाईल दोन्ही जॅकेटच्या खिशात कोंबून एकटक निसर्गाची अप्रतिम कलाकुसर पाहात राहिले! सूर्यास्त झाल्याने वातावरणामधील गारठा जाणवू लागला आणि अंधारून आल्याने तंबूच्या दिशेने धाव घेतली. तितक्यातच आम्हाला जेवणासाठी बोलविले. छोट्या ग्रुपमधे कॅम्पमधील सर्व पाहुण्यांना विभागून त्या छोट्याश्या दगडी झोपडीवजा स्वयंपाक घरात बोलविले जात होते. आम्ही जेवण करून तंबूत शिरलो. गप्पा-गोष्टी करीत कधी झोपेच्या अधीन झालो कळले सुद्धा नाही!
प्राचीन दंतकथा आणि अध्यात्मिक तपोभूमी – तपोवन!
आमचा दूसरा टप्पा होता तपोवन! प्रथम तपोवनाला जाऊन परतीच्या वाटेवर गौमुख दर्शन असा काहीसा आमचा आखलेला बेत होता. तपोवनामध्ये मुक्काम करायचा असेल तर त्याची वेगळी पूर्व परवानगी तर लागतेच परंतु तिथे रहाण्याची व्यवस्था देखील करावी लागते. आमच्या मनोज गाइडने तपोवनात आमची मौनी बाबांच्या आश्रमामध्ये सोय केल्याचे सांगितले. सकाळी लवकर उठून तपोवनाकडे प्रस्थान करण्याचे आम्ही ठरविले. आमच्या कंपूमधील अमोल भागवत ह्यांनी काही कारणास्तव पुन्हा गंगोत्रीला माघारी जाण्याचा निर्णय घेतला. भोजबासाहून माघारी गंगोत्रीकडे जाणाऱ्या एका ग्रुपसोबत त्यांची पाठवणी करून आमचा गाइड-मनोज निश्चिंत झाला.
मनोजने आम्हाला सांगीतले की, गौमुख ग्लेशियरकडे जाणारा, पूर्वापार यात्रेकरू ये-जा करीत असलेला रस्ता काही वर्षांपूर्वी पूर्ण वाहून गेल्याने भागीरथीच्या पात्राला एका छोट्या ट्रॉलीमधून पार करून पलीकडच्या तीरावर जावे लागते. तिथून गौमुख -तपोवनच्या दिशेने ट्रेकरूट पुढे जातो. खरी मेख तिथेच होती! भागीरथीच्या पात्राला पार करण्यासाठी भल्या पहाटे तीन-चार वाजताच इतर ट्रेक कंपनीचे गाइड रांग लावून उभे होते! आम्ही आपले सकाळी मनोजने सूचना दिल्याप्रमाणे साडेसात वाजताच्या दरम्यान तयार होऊन ट्रॉली पॉइंट जवळ जाऊन उभे राहिलो. तिथे एकच हलकल्लोळ माजलेला होता. अनेक जण पैलतीरावर जाण्यासाठी आपसामध्ये चढाओढ करत होते. प्रत्येक ट्रेक कंपनीचे गाइड आणि पोर्टर एकमेकांसोबत प्रथम कोणाचा ग्रुप जाणार ह्यावरून वाद घालत होते आणि ट्रॉली आली की त्यावर चढण्यासाठी गर्दी आणि स्पर्धा होत होती. सर्वच सावळा गोंधळ होता! आम्ही चौघे जण तिथे शांत उभे राहून ह्या सर्व घटनांचे निरीक्षण करीत, आमचा नंबर केव्हा येणार?? ह्याच्या प्रतीक्षेत होतो. इतर ट्रेक कंपनीचा कंपू मोठा असल्याने त्यांना प्राधान्य मिळत होते. आमच्या मनोज गाइडने मात्र हाताची घडी घालून केवळ तिथे जेव्हा संधी मिळेल तेव्हा पार करू असे धोरण अवलंबले होते जणू! आमचा धीर सुटू लागला. दुपारचे साडे अकरा वाजून गेले. तरी आम्ही “आप कतार मे हो”!! मग मात्र आम्ही मनोजच्या मागे तगादा लावला. साधारण दुपारी १२.३० वाजता आम्ही त्या ट्रॉलीच्या सहाय्याने नदीचे पात्र पार करून दुसऱ्या तीरावर गेलो. भोजबासाला भागीरथी नदीचे पात्र पार करण्यासाठी हाताने दोर ओढून बास्केट सारख्या ट्रॉलीमधून नदी पार करणे म्हणजे अत्यंत धोकादायक, असुरक्षित आणि केविलवाणा प्रकार!
वस्तुत: गौमुख पर्यंत अनेक भाविक गंगा उगमाचे दर्शन करण्यासाठी पदयात्रेस येतात. अनेक ट्रेक कंपन्या ‘गौमुख -तपोवन’ हा पदभ्रमण मोहिमेचा उपक्रम ट्रेकर्स साठी येथे राबववितात. हिमालयीन ट्रेकमध्ये अति बिकट टप्पे दुपार होण्याआधी पार करणे अपेक्षित असते. उन्हामुळे ग्लेशियर अथवा हिमनद्या वितळून पाण्याचा प्रवाह वाढणे, ग्लेशियर वरून चालणे धोकादायक होणे, कधीही बदलणारे हवामान आणि पाऊस, हिमवर्षाव अश्या प्रकारचे धोके उत्पन्न होऊ शकतात. पण ह्या भागीरथीचे पात्र पार करताना ट्रेकर्स, यात्रेकरू ह्यांच्या सुरक्षिततेचा कुठेही सांगोपांग विचार स्थानिक प्रशासनाने केलेला दिसून येत नव्हता. एका छोट्या ट्रॉलीला पैल तिरावरून खेचून नदी पार व्हावे लागत होते. एका वेळी ट्रॉली मध्ये सहा माणसे, सामान, तर कधी ट्रॉली खाली लटकून पोर्टर किंवा कॅम्पिंगचे सामान ह्यांची वाहतूक होत होती. जरा ताळमेळ बिघडला तर कोणताही अपघात होण्याची संभावना होती. परंतु प्रशासनाची उदासीनता आणि पर्यटकांचा कोलाहल ह्यामुळे भागीरथीचे पात्र पार करताना अत्यंत वाईट अनुभव आला होता.
आम्ही साधारण १२.३० वाजता टळटळीत उन्हामधून तपोवनाकडे कूच केले. ठराविक अंतरापर्यंत तपोवन आणि गौमुखकडे जाणारा रस्ता एकाच पायवाटेवरून जातो. पण हा रस्ता अत्यंत खडबडीत, दगड-धोंड्यांचा होता, मधूनच बोल्डर हॉपिंग करावे लागत होते. आम्ही एका चढणीवर चालत असता आम्हाला हिमालयीन ब्ल्यू शीप म्हणजे “भरल” कुटुंब नजरेस पडले. चार-पाच ‘भरल’ त्या गवताळ भागामध्ये निवांत चरत होते. आम्ही फोटो काढण्याचा असफल प्रयत्न केला खरा! पण सुस्पष्ट फोटो काढता आले नाही. भागीरथीचे पात्र पार करून पैलतीरावर गेल्यावर पायवाटेने थोडी चढण पार करून पुन्हा आम्ही सपाट प्रदेशात बराच वेळ अंदाजे दोन किलोमीटर सुस्पष्ट असलेल्या पायवाटेवरच चालत होतो. समोर भागीरथी सिस्टर्स पूर्णत्वात आमच्या नजरेसमोर उभ्या ठाकलेल्या होत्या. हिमालयाचे एक वेगळे स्वरूप दृष्टीस पडत होते. अति उंचावर असल्याने कुठेही वृक्षराजीचा लवलेश नव्हता. मात्र दगड गोट्यांच्या कानाकोपऱ्यातून किरमिजी तपकिरी रंगाची बुटकी झुडुपे मात्र गर्दीने वाढलेली दिसत होती. ह्या टप्प्यात आमच्या सोबत असलेले अनिता आणि जगदीश खूपच मागे पडू लागले. अनिताला उन्हामुळे आणि हवेतील बदलामुळे चढणीवर फार त्रास होऊ लागला. आमच्या गाइड मनोजने पैलतीरावर पोहोचण्यासाठी काहीही धावपळ न केल्याने आम्हाला तपोवनाच्या दिशेने ट्रेक सुरू करण्यास फार उशीर झाला. त्यामुळे तपोवनाच्या धोकादायक चढाईचा टप्पा अंधारून येण्याआधी पूर्ण करणे गरजेचे होते. आम्ही साधारण तीन वाजता जिथे गौमुख ग्लेशियरजवळ जाणारा आणि तपोवनाकडे जाणारा मार्ग वेगळा होतो त्या टप्प्यापर्यंत पोहोचल्यावर मनोजने अनिता आणि जगदीशला तिथून पुन्हा भोजबासाला माघारी पाठवले. आता फक्त मी आणि विलासच तपोवनाच्या दिशेने चालू लागलो. माझे मन थोडे निराश झाले. मला आता एकंदरीत गौमुख ग्लेशियरचा रुक्ष, खडकाळ प्रदेश आणि तपोवनाला जाणारा खडा चढ पाहून गौमुख -तपोवन ट्रेकला “मध्यम ते अवघड” वर्गातील ट्रेक म्हणून का गणले जाते ह्याची पुरेपूर जाणीव झाली. माझे मन थोडे साशंक झाले. एका मोठ्या रॉक फेसला सामोरी जाऊन संपूर्ण निसरड्या दगडमातीचा आणि खडकाळ भागातून उभा चढ पार करायचा होता. खरे तर हा टप्पा दुपारच्या जेवणापूर्वी म्हणजे दुपारी १२ ते १ वाजण्यापूर्वी पार करण्याचा दंडक आहे. कारण दुपार नंतर ग्लेशियर वितळून वाढणारा पाण्याचा प्रवाह आणि कधीही होणारे रॉक फॉल! दोहोंपैकी काहीही कधीही घातक ठरू शकते. मनात आपोआप शिवआराधना चालू झाली!
आम्ही गौमुखच्या दिशेने जाणाऱ्या पायवाटेला बगल देऊन उजव्या बाजूने चालत राहिलो. विलास एव्हाना बऱ्या पैकी पुढे निघून गेलेला होता. त्या अवघड वाटेवर क्वचितच एखादा पोर्टर पाठीवर अवजड सामान बांधून त्या खडकाळ चढणीवरून सराईतपणे आम्हाला मागे टाकून पुढे निघून जाई. बहुतेक आम्हीच तिघे तपोवनाकडे जाणारे शेवटचे वाटसरू होतो. सतत ढासळत राहणार्या दगड मातीने व्यापलेल्या ग्लेशियरवर चढाई करून, मोठमोठ्या बोल्डरवरून अतिशय सावधपणे तपोवनाच्या दिशेने आम्ही चढाई करू लागलो. आता विलास आणि आमच्यामध्ये हाकेचे अंतर होते. मनोज गाइड विलासला हातवारे करून रस्त्याचे मार्गदर्शन करीत असे तर कधी माझ्या हाताला धरून मला अगदी काळजीपूर्वक चढणीवरून नेत असे. एक मोठा टप्पा पार केल्यावर, सुरक्षित जागा पाहून आम्ही एका दगडावर क्षणभर विसावलो. तिथून समोर खालच्या दिशेला गौमुख ग्लेशियर दिसत होते. संपूर्ण गंगोत्री शिखर समूहाचे दर्शन घडत होते. समोर भागीरथी सिस्टर्स पायथ्यापासून ते शिखरापर्यंत दृश्यमान होत होते. अधून-मधून करडे-भुरके ढगांचे पुंजके ह्या पर्वत शिखरांवर, त्यांच्या अंगाखांद्यावर लगट करताना दिसत होते. हिमालयात जशी सांजवेळ जवळ येत जाते तसे निसर्गाचे अद्भुत आविष्कार पहाण्यास मिळतात. संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. आता घाई करणे गरजेचे होते.

गौमुख ग्लेशियर पलीकडचा ट्रेक अत्यंत अवघड आहे. ग्लेशियर ओलांडून तपोवनाकडे जाताना आपल्यासोबत स्थानिक गाइड हवाच! कारण सतत कोसळणाऱ्या दरडी, आणि रॉक फॉलमुळे जराशी चूक ही अपघाताला आव्हान देणारी किंवा जीवघेणी सुद्धा ठरू शकते. आपले अवधान जागृत ठेवून आणि नजर तीक्ष्ण ठेवून शरीराचा तोल सावरत, घसरण असलेल्या खडकाळ वाटेवर पाय घट्ट रोवून, एकेक पाऊल पुढे टाकत अंगावर येणारा चढ पार करीत राहिले. शेवटची चढाई तर अतिशय खडतर आहे. तपोवनातून निघालेली आकाशगंगा, गौमुखच्या दिशेने आपल्या मार्गावर असलेल्या मोठ्या दगड-गोट्यांवरून अल्लडपणे उड्या मारत खाली प्रवाही होत असताना दिसते. एका टप्प्यावर तिच्या वाहत्या प्रवाहाला पार करण्यासाठी खडकांचा आधार आणि आडोसा घेत वरच्या दिशेने चढाई करावी लागते. तपोवनाचा चढ साधारण दोन किलोमीटरचा असला तरीही सुमारे १५०० फुटांची चढण असल्याने अत्यंत दमछाक करणारी आहे. त्यातच सभोवताली कधीही घरंगळणारे दगड, तुटलेले ग्लेशियर अगदी हवेच्या कंपनाने सुद्धा सतत उडत राहणारी धूळ-माती आणि छोटे दगड ह्या चढाईला अधिकच आव्हानात्मक करतात. सूर्य मावळतीला जात असताना आम्ही शेवटची चढण पार करून एका मोठ्या शिळेजवळ येऊन थांबलो. विलास सुद्धा आमच्या पुढे येऊन तिथे थांबला होता. तिन्ही सांजेची वेळ होऊन गेली होती. समोर दिमाखात उभ्या असलेल्या भव्य २१७५० फूट पर्वतीय ऊंची असलेल्या शिवलिंग पर्वताचे दर्शन झाले आणि मधोमध विस्तीर्ण पसरलेले गवताळ कुरण-तपोवन! आम्ही तपोवनामध्ये पोहोचलो होतो! विलासने आणि मी अत्यंत आनंदाने एकमेकांना शुभेच्छा दिल्या. अंधुक प्रकाशात मनोजने आम्हाला वेळ न दवडता आमच्या मौनी बाबांच्या दगडी कुटीकडे घेऊन गेला. तिथे पोहोचेपर्यंत काळोखाचे साम्राज्य पसरलेले होते. मी त्या कुटीच्या बाहेरच बसकण मारली. माझ्या समोर साक्षात महादेवाचे धीरगंभीर आणि ध्यानस्थ स्वरूप त्या चमचमणाऱ्या शिवलिंग पर्वताच्या रुपात मला दिसू लागले! कॅमेरा अथवा मोबाईलमध्ये फोटो काढण्याचे देखील भान राहिले नाही! निरभ्र आकाशात चमकणाऱ्या शिवलिंग पर्वत शिखरांना मी माझ्या मनःचक्षूंमध्ये कैद करण्याचा प्रयत्न करत होते. मी शिवलिंग पर्वताकडे एकटक पहात होते, परिसरातील गूढ शांतता त्या परमात्म्याच्या असण्याची अनुभूति देत होती! मला तपोवनात आल्यावर जणू शिवालयात आश्रयाला आल्यासारखे वाटले.
वातावरणामध्ये गारठा वाढला. मी त्या दगडी आश्रमाच्या कुटीमध्ये प्रवेश केला. तिथे आमच्या सारखे अन्य काही जण देखील आलेले होते. तेथील मौनी बाबानी आमची किरकोळ शुल्कामध्ये रहाण्याची आणि जेवणाची व्यवस्था केलेली होती. मौनी बाबानी आमची विचारपूस करून आम्हाला गरमागरम जेवण खाऊ घातले आणि लगतच असलेल्या दगडी विश्राम कुटीमध्ये पाठवणी केली. आता मात्र हवेतील बदल प्रकर्षाने जाणवला. पाऊलं जड झाली. हालचाली मंद झाल्या! आम्ही समुद्र सपाटीपासून १४,६४० फुट उंचीवर आलो होतो. विरळ हवेचा परिणाम जाणवू लागला. मनोजने आम्हाला सूचना दिल्या, दुसर्या दिवशी परतीचा प्रवास थोडा उशिराने सुरू केलेला चालणार होता! मौनी बाबांच्या आश्रमामध्ये गाद्या-पांघरूण, रजई अश्या सर्व सोई-सुविधा होत्या. त्यामुळे थंडीचा प्रभाव जाणवला नाही. परंतु मनामध्ये विचार आला, ज्या ठिकाणी विजनवासात एकांत मिळावा, आध्यात्मिक विकास व्हावा म्हणून तप साधना करण्याची ही तपोभूमी! पण इथेही मानव प्राण्याने अतिक्रमण करून सुखासीनतेची साधने पोहोचविली! ट्रेकचा शेवटचा टप्पा गाठला ह्या समाधानाने आम्ही झोपी गेलो.
दुसर्या दिवशी सकाळी उशिरा जाग आली. मला हिमालयात सूर्योदय आणि सूर्यास्त फारच आकर्षित करतात. पण कदाचित भोजबासा ते तपोवनाचा टप्पा खूपच दमछाक करणारा झाल्यामुळे सूर्योदयाचा नजारा अनुभवण्याची संधी हुकली. मन नाराज झाले पण सकाळच्या स्वच्छ, निरभ्र वातावरणात तपोवन आणि चहूबाजूने असलेल्या नगाधीराजांशी थेट नजरभेट करण्याची संधी मिळाली. सामानाची बांधाबांध करून आजूबाजूच्या परिसरात फेरफटका मारला. तपोवन हा संस्कृत शब्द आहे. तप म्हणजे ध्यान किंवा तपस्या आणि वन म्हणजे जिथे आध्यात्मिक प्रबोधनासाठी महान ऋषी, तपस्वी ह्यांनी तप किंवा ध्यान साधना करण्यासाठी निवडलेले एकांत स्थान! खऱ्या अर्थाने solitude किंवा hermitage !!

पश्चिम गढवाल हिमालयाच्या गंगोत्री ग्लेशियर समूहातील पर्वत शिखरांपैकी एक – शिवलिंग पर्वत! पिरॅमिड सदृश स्वरुपाच्या शिखरामुळे शिवलिंग पर्वत अगदी सुंदर दिसतो. शिवलिंग पर्वत, भागीरथी शिखर समूह आणि मेरू ह्या उत्तुंग पर्वत शिखरांनी वेढलेला तपोवनाचा परिसर म्हणजे आध्यात्मिक योग साधनेसाठीचे पुराण काळाशी संदर्भ जोडणारे ठिकाण! चहुबाजूंनी अनेक पर्वत शिखरांनी वेढलेला हा परिसर म्हणजे ट्रेकर्ससाठी एक पर्वणीच आहे. युरोपियन ट्रेकर्स शिवलिंग पर्वताची त्याच्या पिरॅमिड सारख्या स्वरुपामुळे इटली आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवरील आल्प्स् पर्वतामधील “मॅटरहॉर्न” पर्वत शिखराशी तुलना करतात. तपोवनाच्या पुढे वासुकी ताल, नंदनवन, कालींदी खाल ट्रेक केले जातात.
आश्रमाच्या वरच्या बाजूला थोडी चढाई करून गेल्यावर शिवलिंग पर्वतासमोरच त्रिशूल आणि शंकराची पिंडी नजरेस पडते. शिवलिंग पर्वताच्या ग्लेशियर मधून प्रवाही होणारी आकाशगंगा तपोवनाच्या कुरणामधून वाहती झालेली दिसते. अवघ्या तपोवनाच्या आसमंतामध्ये शिवलिंग पर्वताची भव्यता आणि वैभव जाणवत राहते. पौराणिक कथांनुसार अनेक तपस्वी, साधू हयानी त्यांच्या तप-साधनेसाठी आणि आध्यात्मिक अनुभूतिसाठी ह्या तपोवनामध्ये वास केल्याचे सांगीतले जाते.
गौमुख -गंगा मैयाचे उगम स्थान
आम्ही सकाळी दहा वाजेपर्यंत तपोवनामध्ये सभोवारची उत्तुंग पर्वत शिखरे न्याहाळण्यात आणि मौनी बाबांशी हितगुज करण्यात वेळ व्यतीत केला. सकाळच्या ऊनामध्ये चमचमणारी पर्वत शिखरे पाहातच आमचा नाश्ता झाला आणि साडे दहाच्या सुमारास तपोवनामधून गौमुखच्या दिशेने उतरण्यास सुरुवात केली. आश्रमापासून ते तपोवनाचे जणू प्रवेशद्वार असलेल्या शिळेपर्यंत आकाश गंगेच्या काठाने चालत असताना मी किती वेळा मागे वळून त्या शिवलिंग पर्वताकडे पहिले असेल याची मोजदाद नाही. त्या शिवलिंग पर्वताने आणि तपोवनामधील वातावरणाने जणू मी भारावून गेले होते. शिवलिंग पर्वताच्या छायेत असलेल्या तपोवनामध्ये जणू चुंबकीय आकर्षण असावे आणि आपण जागीच खिळून गेलो आहोत अशी भावना होऊ लागली! खरं तर तपोवनामध्ये अजून एक दिवस व्यतीत करण्यास आवडले असते! परंतु ट्रेकवेदाच्या कृपेने आमचे दिवसांचे गणित कोलमडलेले होते. शिवलिंग पर्वताला अखेरचा दंडवत करून मी त्या भयावह वाटणाऱ्या उतरणीवरून हळूहळू चालू लागले. विलास जलद गतीने तो उभा चढ उतरून पुढे कधी निघून गेला हे सुद्धा समजले नाही. आज कोणतीही घाई-गडबड नव्हती. त्यामुळे मी माझ्या पायाला जपत सावधानतेने मनोज गाइडच्या मदतीने खाली उतरत होते. तपोवनाकडे जाताना जितकी चढाई बिकट वाटली होती, त्याच्या दुप्पटीने तो चढ उतरताना भीतीदायक वाटत होता. चुकूनही पाय घसरला तर थेट गौमुखातच जाऊन विसावा मिळेल अशी परिस्थिती होती! संपूर्ण भागीरथी शिखरे आणि त्यांच्या पायथ्याशी विस्तीर्ण पसरलेले गंगोत्री हिमनदीचे क्षेत्र तपोवनातून खाली पायउतार होताना दृष्टीक्षेपात येत होते. कोसळलेल्या दरडी, हिमनदीचे भग्न तुटून विखुरलेले महाकाय अवशेष काही क्षण भयावह वाटले! त्यामुळे तपोवनातून गौमुखकडे उतरून जाताना हृदयातील धडधड वाढलेली होती! केवळ दगड-गोटे आणि खडकाळ प्रदेश! कोणत्याही क्षणी हिमनद्यांचे असंख्य निखळलेले, तुटलेले भाग घरंगळत येऊन आपल्याला त्यांच्या ढिगाऱ्याखाली गुडूप करू शकतील असाच प्रदेश होता! साधारण दीड तासाच्या संयमी पायपिटीनंतर तपोवनाकडून गौमुखाच्या तोंडापाशी येऊन पोहोचलो.
दुपारचे पाऊण वाजले होते. भर उन्हात गौमुखाच्या तोंडापाशी येऊन तेथील रेतीसदृश किनार्यावर विसावले. अजिबात पायरव नव्हता. मोजकेच पाच-सहा जण नदीच्या उगमाजवळ गंगेच्या पाण्यात पापक्षालन करताना दिसत होते. मी त्या रेतीवर उभे राहून चौफेर दृष्टी टाकली. मी ज्या वाटेवरून उतरून आले, त्या ठिकाणी नजर जाताच एकदम धडकी भरली आणि स्वत:ला शाबासकी द्यावी वाटली!! कश्या प्रकारचे दिव्य पार करून, तपोवन आणि गौमुख असे दोन्ही टप्पे पार करून साक्षात स्वर्गलोकीची गंगा भगिरथ प्रयत्नाने पृथ्वी लोकात ज्या ठिकाणी अवतरली तिथे मी उभी होते! हीच ती भूमी जिथे स्वर्गास्थित गंगादेवी भगिरथाने पृथ्वीतलावर नदी रूपाने आणली आणि अवघ्या भारत वर्षाला कृतार्थ करीत गंगा प्रवाही झाली.
गंगोत्रीधामला गंगा नदीच्या उगमाचे स्थान समजले जात असले तरी गंगोत्री पासून १९ किलोमीटर पुढे समुद्र सपाटीपासून १३,२०० फुट उंचीवर ‘गौमुख’ हिमनदीचे स्थान हे गंगा नदीचा उगम स्थळ मानले जाते. गौमुख हे गंगोत्री ग्लेशियरचे शेवटचे टोक मानले जाते. असे सांगीतले जाते की, प्राचीन काळी एक गुराख्याचे पोर त्याची हरवलेली बकरी शोधत ह्या हिमनदी पर्यंत आले. तिथे ही हिमनदी गाईच्या मुखासमान भासली म्हणून ह्या उगम स्थानाला ‘गौमुख’ म्हटले जाते.
मला क्षणभर आश्चर्य वाटले! गंगोत्री पासून भोजबासाला येईपर्यंत प्रचंड मोठा खळाळणारा भागीरथी नदीचा प्रवाह आपली साथसोबत करीत असतो! पण ह्या गौमुखासारख्या दिसणार्या ग्लेशियर मधून एवढा प्रचंड पाण्याचा स्त्रोत कुठून आणि कसा येत असावा ह्याची उकल होत नव्हती! एका महाकाय विशाल हिमनदीच्या मुखातून गंगा जणू विष्णूच्या आज्ञेला शिरसावंद्य मानून भागीरथीच्या स्वरूपात शांतपणे गौमुखातून प्रसव पावत होती! उगमाच्याजवळ ग्लेशियरमधून बाहेर येणार्या भागीरथीच्या प्रवाहाचे जल डोळ्यांना लावले आणि सर्वांचे पाप क्षालन करणारी झालेल्या गंगा मातेला वंदन केले! तपोवनात व्यतीत केलेले ते क्षण, शिवलिंग पर्वताचा भव्य दिव्य नजारा, तेथून प्रवाही होऊन गौमुखाला मिळणारी आकाशगंगा आणि गौमुख हिमनदी मधून उगम पावणारी भागीरथी ह्याचे दृश्य कायमचे स्मृतीपटलावर कोरले गेले. ह्या सर्व गोष्टीनी संमोहन केल्याप्रमाणे भारावून गेले. मला तपोवनामधील शिवलिंग पर्वताकडून येणारी आकाशगंगा, भागीरथी शिखरे आणि गौमुख हे जणू गंगा अवतरणाचा प्रत्यक्ष अनुभव दिल्याप्रमाणे भासू लागले. पृथ्वीतलावर गंगा अवतरणाची कथा जणू दृश्य स्वरुपात मला दिसते आहे असेच वाटू लागले!
आपल्या पूर्वजांना कपिल मुनींच्या शापातून मुक्ती मिळावी म्हणून राजा दिलीपचा पुत्र भगीरथ ह्याने विष्णूची आराधना आणि घोर तपश्चर्या केली. भगीरथाच्या आराधनेने विष्णूनी प्रसन्न होऊन स्वर्गलोकीची गंगा पृथ्वीतलावर अवतीर्ण करण्यासाठी ‘तथास्तु’ म्हटले! स्वर्गातून गंगा पृथ्वीवर अवतरल्यावर गंगेच्या प्रचंड प्रपाताने प्रलय होवू नये म्हणून विष्णूच्या सूचनेवरून भगिरथाने महादेवाकडे मदतीची याचना केली. भगवान शंकराने भगीरथाला स्वर्गातून येणाऱ्या गंगेला प्रथम आपल्या मस्तकी धारण करेन असे सांगून आश्वस्त केले. विष्णूनी त्यांच्या चरणाशी लीन असणा-या गंगेस पृथ्वी लोकात जाण्याचा आदेश दिल्यानंतर आपल्या प्रभूच्या वियोगाचे अतीव दुख घेऊन गंगा महाभयंकर प्रलयकारी वेगाने पृथ्वीच्या दिशेने कोसळू लागल्यावर देवाधिदेव महादेवानी त्या गंगेच्या प्रवाहाला आपल्या जटांमध्ये धारण करून बंदिस्त केले. त्यानंतर महादेवांनी आपल्या जटा शिळेवर आपटून खुल्या केल्या आणि गंगेला छोट्या नद्यांच्या स्वरुपात पृथ्वीवर प्रवाही केले! भगीरथ प्रयत्नाने अवतीर्ण झालेल्या गंगेला ‘भागीरथी’ म्हणून ओळखली जाते अश्या गौमुखासमोर मी उभी होते! भागीरथी पर्वत शिखरांच्या समुदायाच्या पायथ्याशी असणारे आणि प्रचंड विस्तार असणारे महाकाय गौमुख ग्लेशियर आणि त्यामधून बाहेर येणारा नदीचा प्रवाह! अद्भुत आणि अनाकलनीय कोडे होते! उगमाजवळ भागीरथीच्या नावाने प्रसव पावलेली ही जलमाता देवप्रयागजवळ अलकनंदेच्या प्रवाहात एकरूप होऊन अवघ्या भारतभर “गंगा” म्हणून ओळखली जाते.
आता मात्र गंगाउगमाचा निरोप घेण्याची वेळ आलेली होती. संध्याकाळ होण्याआधी ट्रॉली पार करून भोजबासा कॅम्पवर पोहोचणे आवश्यक होते. गौमुख-तपोवनाकडे जाताना अगदी रूक्ष, खडकाळ वाटणारा हा प्रदेश, परतीच्या प्रवासात मात्र गंगा अवतरणाच्या पौराणिक कथेचा रंगमंच भासू लागला. विधात्याने निसर्गाचे नेपथ्य इतके बेमालूम निर्माण केलेले होते की, गंगा अवतरणाच्या कथेचा प्रत्येक प्रसंग खरा वाटावा! भव्य शिवलिंग पर्वत स्वरूप महादेव आणि तिथून उत्पन्न होणारी आकाशगंगा जणू त्या शिवाचे चरण धुतल्यासारखी शांतपणे तपोवनातून वाहते आहे! गौमुखातून उगम पावणारी भागीरथी! त्या गूढ शांततेचा आणि हिमाच्छादित पर्वत शिखरांनी वेढलेला सामान्यतः रुक्ष वाटणारा प्रदेशही सुंदर वाटू लागतो. पौराणिक दंतकथेने मनावर गारुड करून संमोहित केल्यासारखी भावना होऊ लागली! गौमुख-तपोवनाच्या परीघात दृश्यमान होणारी बहुतांशी ६००० मीटर्स पेक्षा अधिक उंची असणारी आणि अगदी पायथ्यापासून त्यांच्या शिखर माथ्यापर्यंत दृष्टीस पडणारी भागीरथी सिस्टर्स, शिवलिंग, मेरू ही पर्वत शिखरे आपल्याला मंत्रमुग्ध करतात. ट्रेकचा बहुतांशी टप्पा हा अगदी रांगड्या वाटणाऱ्या निसर्गाशी थेट भेट घडवून आणणारा आहे. प्राचीन पौराणिक कथेशी संदर्भ जोडणाऱ्या हिमशिखरांनी सजलेल्या चौफेर वेढलेल्या पर्वत रांगा गूढ रहस्य दडविल्यागत आपल्यासमोर उभ्या ठाकतात! आणि अवघा गौमुख तपोवनाचा मार्ग आपल्याला प्राचीन दंतकथा आणि जादुई सौंदर्याचा ट्रेक भासू लागतो!
विलासने तपोवनातून थेट भोजबासाकडे जाणे पसंत केल्याने, मी एकटीच गाइड सोबत गौमुख पर्यंत गेले, आणि तिथून पुन्हा भोजबासाकडे माघारी निघाले. पुन्हा पुन्हा मागे वळून त्या भव्य शिखरांची नजरभेट करत राहिले. साधारण दुपारी साडेतीन-पावणेचारच्या सुमारास मी भोजबासाच्या ट्रॉली पॉइंटजवळ पोहोचले. तिथे भागीरथीचे पात्र पार करून पुन्हा भोजबासा पडावाकडे जाण्यासाठी रांग लागलेलीच होती! कंटाळवाण्या तासभराच्या प्रतीक्षेनंतर मी आमच्या भोजबासाच्या आश्रमाजवळ पोहोचले.

विलास दुपारी दोन वाजताच भोजबासा मुक्कामी पोहोचला होता. अनिता आणि जगदीश तिथे आमची वाट पहात होते. आमचा कंपू पुन्हा एकत्र आल्याने आनंद झाला. लिगामेन्ट सर्जरीनंतर गौमुख-तपोवन सारखा ट्रेक पूर्ण केल्याचा एक वेगळाच आनंद होत होता. माझा आत्मविश्वास दुणावला. आता भोजबासाहून गंगोत्रीकडे परतण्याची ओढ मनात घेऊन गरमागरम जेवणानंतर झोपी गेलो.
दुसर्या दिवशी सकाळी लवकरच भोजबासाहून गंगोत्रीच्या दिशेने कूच केले. आता आमची गती वाढली होती. “गिला पहाड”चा टप्पा आम्ही वेगाने पार केला. लँड स्लाइडच्या भयाने आम्ही झपझप पावले टाकत तेथून पुढे निघालो आणि पुन्हा एकवार त्याच पायवाटेवरची निसर्ग दृश्ये नजरेमध्ये कैद करीत दुपारी साधारण दोन-अडीचच्या सुमारास आम्ही गंगोत्रीला पोहोचलो. ‘ट्रेकवेदा’ कंपनीने ट्रेक संपल्यावर आमची पुन्हा गंगोत्री येथे रहाण्याची कोणतीही सोय केलेली नव्हती! ट्रेकवेदा कंपनीने चार महीने आगाऊ पैसे घेऊनही आम्हाला हातोहात फसविलेले होते. विलासने पुढे येऊन आमच्या सर्वांसाठी एका रात्रीसाठी राहण्याची सोय केली होती. शुचिर्भूत होऊन क्षुधाशान्ती केली आणि थोड्याश्या विश्रांतीनंतर पुन्हा संध्याकाळी गंगोत्री मंदिराकडे जाऊन गंगा आरतीने खऱ्या अर्थी ट्रेकची सांगता केली.
हिमालय म्हणजे नक्कीच काही तरी जादू आहे! ती एकदा हिमालय भेट झालेल्याला पुन्हा पुन्हा आकर्षित करत राहते. हे आकर्षण केवळ गगनचुंबी हिमाच्छादित पर्वत शिखरे अथवा दुर्गम, खोल दरी-खोऱ्यांचे नसून निसर्गाचे जणू आपल्यासोबत गहन, दृढ नाते असल्याप्रमाणे वारंवार आपल्याला खुणावत रहाते! गौमुख तपोवनाचा ट्रेक म्हणजे अद्भुत पर्वत शिखरांची नजरभेट घडविणारी, मनावर गारुड करणारी साहसी तरीही आध्यात्मिक अनुभूति देणारी, आणि थरारक उंचीच्या अनुभवासोबत संमिश्र स्वरूपाचे मनोरम निसर्ग सौंदर्याचा अनुभव देणारी पदभ्रमण यात्रा आहे! गौमुख-तपोवनाच्या पायवाटेवरचा प्रत्येक खडक, दगड-गोटे, वाऱ्याची कंपने, बर्फाच्छादित पर्वत शिखरांचे दर्शन आपल्याला प्राचीन दंतकथा आणि आध्यात्मिक अनुभूति देतात.
दुसर्या दिवशी सकाळी लवकरच गंगोत्रीहून डेहराडूनकडे प्रयाण केले. उत्तरकाशी मार्गे डेहराडूनला जाताना आवर्जून काशी विश्वनाथाचे उत्तरकाशीला दर्शन घेतले आणि पुढे निघालो. डेहराडूनमध्ये आमचे मित्र अमोल भागवत आमची दोन दिवसांपासून प्रतीक्षा करीत होते. त्यांच्या सौजन्याने फॉरेस्ट रिसर्च इंस्टिटयूटच्या सायंटिस्ट हॉस्टेलमध्ये राहण्याचा योग आला. प्रचंड मोठा कॅम्पस् असलेली ही संस्था प्रेक्षणीय आहे. मी दुसर्या दिवशी सकाळी लवकरच डेहराडून विमानतळ गाठले आणि मुंबईकडे प्रयाण केले. मुंबईला पोहोचेपर्यंत माझ्या डोळ्यासमोर भागीरथी शिखरे आणि शिवलिंग पर्वताची छबी तरळत होती.
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.




























यावर आपले मत नोंदवा