उत्तराखंड राज्य निसर्ग सौंदर्याने पुरेपूर नटलेले आहे. उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात नैसर्गिक सौंदर्याने नटलेले एक हिल स्टेशन आहे- हर्षिल! बर्फाच्छादित पर्वत, पाईन वृक्षांची जंगले, सफरचंदांच्या बागा, प्राचीन मंदिरे, पारंपारिक लाकडी घरे हयांनी नटलेले हर्षिल, उत्तराखंड मधील “मिनी स्वित्झर्लंड” म्हणूनही ओळखले जाते.
गरतांग गली
उत्तरकाशी जिल्ह्यातील नेलोंग व्हॅलीतील उंच डोंगर-कपारीमध्ये असलेला हा ऐतिहासिक लाकडी पूल, “गरतांग गली” म्हणून प्रसिद्ध आहे. निखळ डोंगर खडकांमध्ये कोरून बनवलेला हा पूल म्हणजे अभियांत्रिकी आणि सांस्कृतिक वारसाचा एक उल्लेखनीय नमूना आहे. जणू डोंगराच्या पोटात पोखरून तरंगता पूल बनवलेला आहे! हा छोटासा ट्रेक जितका थरारक आहे तितकाच निसर्गरम्य!