गरतांग गली

गौमुख तपोवन ट्रेकच्या निमित्ताने गंगोत्रीला दोन दिवस मुक्काम होता. चारधाम यात्रेच्या वेळी गंगोत्री परिसर, हर्षिल खोरे आणि गरतांग गली सारखी काही विशेष ठिकाणे पहाता आलेली नव्हती. त्यामुळे ट्रेकपूर्वी अथवा ट्रेकनंतर गरतांग गलीला भेट देण्याबाबत आम्हा सर्व मित्रमंडळींचे एकमत झालेले होते!

आमच्या ट्रेकच्या नियोजित कार्यक्रमानुसार ३० सप्टेंबर २०२४ रोजी आम्ही आमच्या ट्रेकच्या पहिल्या पडावाकडे निघणार होतो. त्यानुसार आम्ही सकाळी सहा वाजता लवकर उत्साहाने उठून, सर्व बॅकपॅक आणि इतर सामानाची बांधाबांध करून ट्रेक साठी सज्ज झालो होतो. आमच्या गाइड आणि पोर्टरची प्रतीक्षा करण्यात तासामागून तास गेले! सकाळचे दहा वाजून गेले तरी आम्ही गंगोत्रीच्या हॉटेलवर पोर्टर आणि गाइडची वाटच पहात होतो!आम्ही ज्या कंपनी मार्फत प्रवासाचे आणि ट्रेकचे नियोजन केलेले होते त्या कंपनीने आमची कोणतीही सोय योग्य प्रकारे केली नाही. त्यामुळे नियोजित दिवशी ट्रेकला निघता आले नाही. परंतु दिवस वाया घालविण्यापेक्षा आम्ही “गंगोत्री दर्शन” आणि नेलोंग व्हॅली परिसरात असलेल्या “गरतांग  गली”ला भेट देण्याचे ठरविले.

गंगोत्री दर्शन

नियोजित दिवशी ट्रेक रूटवर कूच करणे शक्य होत नाही असे लक्षात येताच आम्ही गंगोत्री मधील काही ठिकाणे पहाण्यासाठी निघालो. गंगोत्रीमध्ये फेरफटका मारला. सूर्य कुंड, तपोवन हिरण्यगर्भ आर्ट गॅलरी  अश्या जवळपासच्या ठिकाणांना भेट दिली.

सूर्यकुंड

हॉटेल तपोवन कॉटेजकडून गंगोत्री मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या बाजूला सूर्यकुंडाकडे जाणारी पायवाट होती. आम्ही आमची पावले त्या दिशेने वळवली. एक लोखंडी पूल पार करून आपण सूर्यकुंड परिसरामध्ये पोहोचतो. गंगोत्री मंदिराच्या ५०० मीटर अंतराच्या परिसरामध्ये सूर्य कुंड आहे. इथे भागीरथी नदीचा प्रचंड वेगात वाहणार्‍या प्रवाहाचे रूपांतर मोठाल्या खडकांवरून कोसळणार्‍या प्रपातामध्ये होते. आपल्याला काही क्षण स्तब्ध करणारे दृश्य नजरेस पडते. आदल्या दिवशी सायंकाळी ज्या सुदर्शन पर्वत शिखरावर मावळतीच्या सूर्याची शृंगारीक अभा फाकली होती, तेच शिखर जणू आता शुभ्र हिमाचे आवरण ओढून विरक्त वैराग्यासारखे निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर निश्चल उभे ठाकलेले पाईन वृक्षांच्या गवाक्षातून दिसत होते.

सूर्य कुंडाच्या बाजूनेच जाणारा रस्ता थेट आपल्याला घेऊन जातो, तपोवन हिरण्यगर्भ आर्ट गॅलरीकडे! तपोवन हिरण्यगर्भ आर्ट गॅलरी म्हणजे हिमालयाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या निसर्ग प्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच! मूळचे आंध्र प्रदेशातले असणारे स्वामी सुंदरानंद हयांनी ह्या आर्ट गॅलरीची स्थापना केलेली आहे. स्वामी सुंदरानंद हयांना ट्रेकिंग आणि पर्वतारोहणाचा छंद होता. त्यांनी हिमालयाची विविध ठिकाणची बदलती रुपे हजारो फोटोंच्या माध्यमातून आपल्या कॅमेरामध्ये कैद केलेली आहेत. गंगोत्री क्षेत्रातील खोऱ्याचे आणि त्याच्या दरी-खोऱ्यामध्ये वसलेल्या स्थानिक जाती-जमातींची माहिती, लोक कला-संस्कृती दर्शविणारे अनेक फोटो ह्या आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शित केलेले आहेत. गंगोत्री पर्वतरांगा आणि गौमुख क्षेत्रात घडत असलेले भौगोलिक बदल अनेक फोटोंच्या माध्यमातून ह्या आर्ट गॅलेरीमध्ये आपल्याला पहावयास मिळतात. सन २०१९ मध्ये ह्या आर्ट गॅलरीचे लोकार्पण झाले. तपोवन आर्ट गॅलरी म्हणजे मागील सात दशकांपेक्षा जास्त कालावधीमध्ये हिमालयीन पर्वत रांगांमध्ये, गंगेच्या  उगम स्थानामध्ये झालेल्या नैसर्गिक परिवर्तनाचे चित्र स्वरुपातील माहितीचे दालन आहे. स्वामी सुंदरानंद यांनी सन २००२ मध्ये “Through The Lens of Sadhu” असे पुस्तक तत्कालीन पंतप्रधान श्री. अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशित केलेले आहे. हिमालय प्रेमींनी अवश्य भेट द्यावी अशी ही तपोवन हिरण्यगर्भ आर्ट गॅलरी आहे.

तपोवन हिरण्यगर्भ आर्ट गॅलरी

आम्ही साधारण अकरा वाजेपर्यंत गंगोत्री परिसरात भटकंती केली आणि नंतर नेलोंग व्हॅलीमध्ये असलेल्या ‘गरतांग  गली’ला भेट देण्याचे ठरविले. खासगी गाडीने गंगोत्रीहून निघून हर्षिलच्या दिशेने असलेल्या लंका पुलाला म्हणजेच भैरोघाटी सेतुला पार करून भैरवघाटीजवळ असलेल्या गरतांग गलीच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलो. लंका पूल पार करताच गरतांग गलीचे प्रवेशद्वार आहे. खरं तर हे फॉरेस्ट चेक पोस्ट आहे. इथे आपली ओळख पत्रे तपासून नोंदणी केली जाते. किरकोळ प्रवेश फी घेतली जाते.

गरतांग गलीच्या ट्रेक रूट वरून दिसणारा लंका पूल

उत्तरकाशी जिल्ह्यातील नेलोंग व्हॅलीतील उंच डोंगर-कपारीमध्ये असलेला हा ऐतिहासिक लाकडी पूल, “गरतांग  गली” म्हणून प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात भारत आणि तिबेट दरम्यानचा हा महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता. प्राचीन काळी हर्षिल खोऱ्याच्या सीमावर्ती भागात असणार्‍या जादूंग आणि नेलोंग ह्या गावांपर्यंत जनावरांच्या पाठीवर सामान लादून दळणवळण होत असे.  सुमारे १५० वर्षांपूर्वी दगड-छिन्नी कौशल्यामध्ये पारंगत असणार्‍या पेशावरच्या पठाणांनी बांधलेल्या ह्या लाकडी पायऱ्या असलेल्या पुलामुळे दुर्गम पर्वतीय भागामध्ये व्यापारी देवाणघेवाण सुरू झाली. फार पूर्वी ह्या मार्गाने उत्तरकाशीमधे लागणार्‍या बाजारपेठेमध्ये तिबेटी व्यापारी तेल, गूळ, मीठ, साखर अश्या आवश्यक वस्तूंचा लोकरीच्या वस्तू देवाणघेवाण करून व्यापार करीत असत. स्थानिक लोक सुद्धा ह्या मार्गाने तिबेटशी व्यापार करीत असत. सीमेवर गस्त नजर ठेवण्यासाठी लष्कराद्वारे सुद्धा ह्या मार्गाचा वापर केला गेल्याचे सांगण्यात येते.

भारत – चीन मधील १९६२ च्या युद्धानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग बंद करण्यात आला.  जादूंग आणि नेलोंग ह्या सीमेवरील गावामधील रहिवाश्यांनाही हर्षिल आणि बगोरी येथे स्थलांतरित करण्यात आले. निखळ डोंगर खडकांमध्ये कोरून बनवलेला हा पूल म्हणजे अभियांत्रिकी आणि सांस्कृतिक वारसाचा एक उल्लेखनीय नमूना आहे. भारत-तिबेट ह्यांच्या भूतकाळातील व्यापारासंबंधीची गरतांग गली ही एक ऐतिहासिक ओळख आहे.

प्रवेशद्वारापासून साधारण दोन किलोमीटरचे अंतर ट्रेक करून आपण गरतांग गलीच्या लाकडी पुलापर्यंत येऊन पोहोचतो. गरतांग गली पर्यंत जाणारी पायवाट अगदी अरूंद पण निसर्गरम्य आहे. गरतांग गली पर्यंत जाऊन येण्यासाठी साधारण २ ते ३ तासांचा अवधी सहज लागतो. सुरवातीचे काही अंतर अगदी अरुंद, ओबडधोबड पायवाटेवरून डोंगराच्या कुशीतून चालत जावे लागते. गरतांगच्या लाकडी पूलापाशी पोहोचेपर्यन्त आपल्याला सतत समोरच्या डोंगरामध्ये कोरून तयार केलेला नेलोंग व्हॅली कडे जाणारा रस्ता दिसत राहतो.ज्यांना उंचीचे भय वाटते त्यांच्यासाठी कदाचित हे आव्हानात्मक होऊ शकते.  पण हा छोटासा ट्रेक जितका थरारक आहे तितकाच निसर्गरम्य! उजव्या बाजूच्या खोल दरीत वाहणार्‍या जढगंगेच्या प्रवाहाचा प्रतिध्व‍नी आपल्या कानात सतत गुंजत राहतो. 

गरतांग गली -लाकडी पूल

साधारण १३६ मीटर लांब आणि १.८ मीटर रुंदीच्या या लाकडी पुलापर्यंत येण्यासाठी कोनिफरस वृक्षांच्या जंगलातून चढाई करून यावे लागते. भारत-चीन युद्धानंतर हा पूल जीर्ण होऊन कोसळला होता.  गरतांग गलीच्या लाकडी पुलाचे नूतनीकरण करून अलीकडेच सन २०२१ मध्ये अंदाजे ५९ वर्षानंतर हा लाकडी पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे.

अर्थातच गरतांग गलीच्या भेटीसाठी काही निर्बंध पाळावे लागतात. गरतांग गलीच्या ट्रेक रूटवर रहदारी करताना परस्परांमध्ये एक मीटरचे अंतर राखून चालणे बंधनकारक आहे. गरतांग गलीच्या लाकडी पुलावरून एका वेळी फक्त १० व्यक्ती चालू शकतात. लाकडी पुलावर नाचणे, उडी मारणे आणि पुलाच्या कठडयावरून खाली डोकावण्यास देखील मनाई आहे.

खोल दरीत वाहणाऱ्या जढगंगेचा प्रवाह

गरतांग गलीच्या लाकडी पुलावरून समोरच्या उंच डोंगर रांगांमध्ये नेलोंग व्हॅलीकडे जाणारा रस्ता दिसत होता. ह्या रस्त्यावरून नेलोंग व्हॅलीमध्ये जाण्यासाठी पूर्व परवानगी लागते. ह्या लाकडी पूलावरून नेलोंग व्हॅलीचे अगदी रोमांचकारी दृश्य दिसते. लाकडी पुलावरून चालताना हृदयातील धडधड थोडीशी वाढते! आम्ही पायऱ्या उतरून लाकडी पुलाच्या शेवटापर्यंत पोहोचलो. दुतर्फा खडे पहाड आणि खाली खोल दरीत वाहणारी जढगंगा! त्या कडे-कपारीतून अगदी बेलगाम वाहणारे वारे आमच्या डोक्यावरची टोपी सुद्धा टिकून देत नव्हते. उंच कड्यामध्ये लोखंडी सळ्या गाडून त्यावर लाकडी पायऱ्या तयार करून हा पुलाचा रस्ता तयार केलेला आहे. जणू डोंगराच्या पोटात पोखरून तरंगता पूल बनवलेला आहे!

गरतांग गलीच्या शेवटच्या टप्प्यात!

आम्ही काही वेळ तिथे थांबून परतीच्या प्रवासाला निघालो. परतीचा टप्पा अगदी वेगाने पार केला. गरतांग  गलीच्या भेटीमुळे आमचा एक प्रकारे सराव ट्रेक झाला. आम्ही संध्याकाळी पुन्हा गंगोत्रीला आमच्या हॉटेलवर येऊन विश्रांती घेतली आणि दुसर्‍या दिवशीच्या आमच्या गौमुख ट्रेकसाठी सज्ज झालो.

प्रवास वर्ष: सप्टेंबर २०२४


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑