उत्तराखंड राज्य निसर्ग सौंदर्याने पुरेपूर नटलेले आहे. उत्तराखंड राज्याचा बहुतांशी भाग पर्वतीय क्षेत्र आणि जंगलांनी व्यापलेला आहे. ह्याच उत्तराखंड राज्यामध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात नैसर्गिक सौंदर्याने नटलेले एक हिल स्टेशन आहे- हर्षिल!
सप्टेंबर २०२२ मध्ये चारधाम यात्रेच्या वेळी गंगोत्रीकडे जाताना हर्षिलचा परिसर धावत्या गाडीतूनच पाहीला होता. स्थानिक लोकांच्या परसदारामध्ये लालबूंद फळांनी लगडलेल्या सफरचंदाच्या बागा मनात घर करून राहिल्या होत्या. पण तेव्हा हर्षिल खोऱ्याची भटकंती हुकली होती.
ऑक्टोबर २०२४ मध्ये गौमुख-तपोवन ट्रेक निमित्ताने गंगोत्रीला दोन दिवसाचा मुक्काम होता. माझ्या सोबत ट्रेकला जाणारे माझे मित्र-मैत्रिणी यमनोत्री धामला भेट देऊन गंगोत्री मुक्कामी येणार होते. गौमुख-तपोवन समुद्र सपाटीपासून अति उंचीवर असल्याने मी ट्रेकपूर्वी तेथील हवामानाशी एकरूप होणे सुलभ व्हावे म्हणून ट्रेक पूर्वीचा एक दिवस अधिक राखून प्रवासाचा बेत आखलेला होता. त्यामुळे मी २८ सप्टेंबरला रात्री गंगोत्री मुक्कामी पोहोचले. दुसऱ्या दिवशी गंगोत्रीच्या आसपासची हर्षिल, मुखबा, बगोरी आणि कल्पकेदार अश्या ठिकाणांची भटकंती करण्याची संधी मिळाली.
२८ सप्टेंबरचा पूर्ण दिवस डेहराडून ते गंगोत्री प्रवासात खर्ची पडला. दूसरा दिवस हर्षिल खोऱ्याच्या भेटीसाठी राखीव होता. साधारण सकाळी साडे दहाच्या सुमारास मी खाजगी गाडीने गंगोत्रीहून हर्षिल भेटीसाठी निघाले. गाडी चालक अगदी पोरसवदा होता. माझ्या हातामधील कॅमेरा आणि सेल्फी-स्टिकवर शूटिंगसाठी माऊंट केलेल्या मोबाइलकडे पाहून त्याचा सुद्धा उत्साह द्विगुणीत झाला असावा!! आणि त्याने माझ्यासाठी गाडी चालक आणि गाईड ह्या दोन्ही भूमिका बजावण्यास सुरुवात केली. कुठे फोटो आणि शूटिंगसाठी योग्य जागा आहे, आणि अगदी मी कुठून फोटो काढावे इथवर सूचना देत त्याने आमची गाडी हर्षिलच्या दिशेने हाकली!
आदल्या दिवशी उत्तरकाशीहून गंगोत्रीकडे जाताना अंधारून आल्याने सभोवतालचे सृष्टी सौंदर्य अनुभवता आले नव्हते. गंगोत्रीहून हर्षिलच्या दिशेने जाताना अगदी परिकथेमधील वाटेवरून प्रवास करीत आहोत असे वाटले! देवदार वृक्षांनी आच्छादित वळणा-वळणाच्या पहाडी रस्त्यावरून हर्षिलपर्यंतचा प्रवासच आपल्याला भुरळ पाडतो! एखाद्या ठिकाणापर्यंत घेऊन जाणारा प्रवासच सुंदर असेल तर ते ठिकाण त्यापेक्षा निश्चितच सुंदर असणार नाही का!
निसर्गाचा जणू वरदहस्त लाभलेले नयनरम्य हर्षिल खोरे! उत्तरकाशी – गंगोत्री ह्या मुख्य रस्त्यावरच हर्षिल गाव आहे. उत्तराखंड राज्यामध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री धाम पासून साधारण २६ किलोमीटर अंतरावर हे गढवाल हिमालयातील शांत आणि सुंदर गाव भागीरथीच्या किनारी वसलेले आहे. बर्फाच्छादित पर्वत, पाईन वृक्षांची जंगले, सफरचंदांच्या बागा, प्राचीन मंदिरे, पारंपारिक लाकडी घरे हयांनी नटलेले हर्षिल, उत्तराखंड मधील “मिनी स्वित्झर्लंड” म्हणूनही ओळखले जाते. समुद्र सपाटीपासून ९००० फुट उंचीवर वसलेले हर्षिल ट्रेकर्ससाठी तर नंदनवन आहे! हर्षिल खोऱ्याशी निगडीत अनेक लोककथा सांगितल्या जातात. मग त्या गोष्टी हर्षिलच्या विल्सन सफरचंदांच्या असोत किंवा अगदी प्राचीन पौराणिक मिथक कथा! अथवा अगदी ग्रेट शो मॅन राज कपूरच्या गाजलेल्या “राम तेरी गंगा मैली” ह्या चित्रपटाच्या! मी अगदी उत्साहाने कॅमेरा सरसावून बसले, आणि हर्षिल कडे जाणारा निसर्गरम्य रस्ता पाहून हरखून गेले!
व्यू पॉइंट –
आम्ही लंका पूल पार करून ‘जंगला’ ब्रिजपाशी आल्यावर ड्रायव्हरने पुलावर गाडी थांबवली. तेथून व्हॅलीचा खूप छान नजारा दिसत होता. अतिशय आल्हाददायक हवा होती आणि नयनरम्य निसर्ग सौंदर्य! दोन्ही बाजूला पर्वतावर गर्द वनराजी आणि खोऱ्यातून अखंड वाहता असणारा भागीरथी नदीचा प्रवाह!

जंगला ब्रिज कडून आम्ही पुढे निघालो आणि पुन्हा आमची गाडी थोड्या अंतरावर थांबली. मुख्य रस्त्यावरच अगदी एका वळणावर “व्यू पॉइंट” होता. संरक्षक कठडा उभारून येथे फोटोग्राफीसाठी एक थांबा केलेला आहे. तिथून हर्षिल खोऱ्याचे आणि परिसराचे विहंगम दृश्य नजरेस पडत होते. माझ्या ड्रायव्हरने सांगीतले, ह्या ठिकाणाला “हर्षिल व्हॅली व्हयू पॉइंट” म्हणून ओळखले जाते. मी परिसराचा आणि फोटोग्राफीचा आनंद घेऊन पुन्हा गाडीत बसले. टप्प्या टप्प्यात मला ड्रायव्हर वेगवेगळी माहिती देऊ लागला.
मंदाकिनी वॉटर फॉल
काही अंतर पुढे गेल्यावर रस्त्यावरच डाव्या बाजूला त्याने गाडी थांबवली आणि म्हणाला, मॅडमजी, यहासे थोडा पैदल चलके जाइयेगा, आगे “मंदाकिनी वॉटर फॉल” है! माझा प्रश्नांकित चेहरा पाहून त्याने माहिती पुरविण्यास सुरुवात केली! साधारण सन १९८५ मध्ये ग्रेट शो मॅन ऑफ इंडियन सिनेमा – म्हणजेच राजकपूरने “राम तेरी गंगा मैली” सिनेमा प्रदर्शित केलेला होता. ह्या सिनेमामध्ये प्रथमच पदार्पण करणारी आणि रातोरात सुपरस्टार झालेली अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी! हा सिनेमा अनेक कारणांसाठी बॉक्स ऑफिसवर तुफान लोकप्रिय झाला! पण त्या मधील सर्वात लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे चित्तहर्षक निसर्ग दृश्ये! ह्या सिनेमाचे बहुतांशी चित्रीकरण हर्षिल खोऱ्यामध्ये झालेले होते. माझा गाडी चालक एक-एक करून मला ज्या ठिकाणी चित्रीकरण झाले होते त्याबद्दलची माहिती देत होता.

मी गाडीतून उतरून चालत डाव्या बाजूला असलेल्या पायवाटेवरून धबधब्याच्या दिशेने निघाले. अर्थात इतक्या वर्षानंतर त्या ठिकाणांमध्ये आमूलाग्र बदल झालेला असणे अगदीच अपेक्षित होते. पण अगदी महामार्गालगतच अंदाजे दहा ते पंधरा मिनिटे काही अंतर पायी चालत गेल्यावर आपण एका धबधब्याच्या वाहत्या झऱ्यापाशी येऊन पोहोचतो. अगदी जंगल सदृश वाटावे अश्या देवदार आणि पाईन वृक्षांच्या मधोमध एक पाण्याचा प्रचंड मोठा प्रपात ‘धबाबा लोटती धारा’ ह्या उक्तीप्रमाणे वाहात होता.

राम तेरी गंगा मैली ह्या चित्रपटामधील एका गाण्याचे चित्रीकरण इथे झाल्याचे सांगीतले जाते. हर्षिलमधील भागीरथीच्या खोऱ्यात असलेला हा धबधबा पूर्वी हर्षिल धबधबा म्हणून ओळखला जात असे. “राम तेरी गंगा मैली” हा चित्रपट ब्लॉक बस्टर ठरल्यानंतर ह्या धबधब्याचे नामकरण “मंदाकिनी वॉटर फॉल्स” झाले! आता हर्षिल खोऱ्यामधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून हा धबधबा प्रसिद्ध आहे!
धबधब्याच्या पायथ्याशी झऱ्याजवळ दगडावर बसण्यायोग्य जागा पकडून काही वेळ शांत त्या खळाळणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर घेत बसून राहिले! पक्ष्यांची किलबिल आणि जंगल गान हयांनी माझी सकाळ अगदी आनंदमयी झाली.
प्राचीन कल्पकेदार मंदिर , धराली

धबधब्याकडून काही वेळातच माझी पावले पुन्हा गाडीच्या दिशेने वळवली. हर्षिल गावाच्या साधारण ६ किलोमीटर अंतरावर गंगोत्री-उत्तरकाशी मार्गावर माझी गाडी ‘धराली’ गावाच्या बाजारपेठेजवळ येऊन थांबली. भागीरथी नदीच्या किनारी वसलेल्या हर्षिल खोऱ्यामधे धराली हे एक शांत गाव वसलेले आहे. ह्या धराली गावात शंकराला समर्पित असलेले प्राचीन कल्प केदार मंदिर आहे.

मुख्य रस्त्यालगत मंदिराच्या प्रवेशद्वाराची कमान आहे, तिथून काही अंतर पुढे गेल्यावर एका चौकोनी आखाड्यात पायऱ्या उतरून खाली गेल्यावर समोर कल्पकेदार मंदिराचा कळसाचा भाग दिसतो. मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यास उजव्या बाजूला उंच डोंगरामध्ये मुखबा गाव दिसते. धरालीचा संपूर्ण मोहक परिसर, डोंगराळ सफरचंदाच्या बागा आणि राजमाच्या लागवडीने व्यापलेला आहे. सभोवताल निसर्गरम्य हर्षिल खोऱ्याची ओळख पटवून देणार्या हिम पर्वतांच्या राशी आणि गर्द देवदार-पाईन वृक्षराजी!

केदारनाथ मंदिराच्या धर्तीवर ह्या मंदिराची रचना आहे. ह्या मंदिराबाबतचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराचा फक्त कळस आपल्या दृष्टीस पडतो! असे सांगितले जाते की, पूर्वी भागीरथी अथवा गंगा नदीच्या पातळीपासून काही उंचीवर हे मंदिर स्थित होते. परंतु एका हिमनदीच्या विस्थापनामुळे हे मंदिर पाण्याखाली गेले. मंदिराच्या शेजारी असलेल्या पार्वती आणि गणेशाच्या मूर्ती देखील पाण्याखाली जाऊन नष्ट पावल्या.
आख्यायिकेनुसार महाभारत कथेतील युद्धानंतर पश्चाताप दग्ध होऊन पांडव शिवाची आराधना करू लागले आणि शंकराकडे क्षमेची आलोचना करू लागले. हे मंदिर पांडवांनी बांधल्याचे सांगीतले जाते. भगवान शंकर पांडवांवर नाराज होते. भगवान शंकराने पांडवाना दर्शन तर दिले नाहीच पण पांडवानी बांधलेल्या ह्या मंदिराला मात्र कायम अर्धे भूमिगत राहण्याचा शाप दिला आहे.
साधारण सन १९८० च्या दरम्यान मंदिराच्या कळसापर्यंतच्या भागाचे उत्खनन करण्यात आले, तरीही ६ ते ९ फुट मंदिराचा भाग अद्यापही भूमिगत आहे. मंदिराच्या कळसावर दर्शनी भागावर काळभैरवाचा मुखवटा आहे, ज्याला शंकराचा सच्चा भक्त आणि सेवक समजले जाते. मंदिराचे प्रवेशद्वार पाण्याने भरलेले आहे. मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन होत नाही. इथे अशी मान्यता आहे की प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये गंगा माता मंदिरापाशी येते आणि मंदिरातील पंचमुखी शिवलिंगाला तिच्या पाण्याचा अभिषेक करते! अर्थातच मंदिर नदीतटावर असल्याने, नदीचे पाणी पावसाळ्याचे दिवसांमध्ये दुथडी भरून वाहताना मंदिरापाशी येत असण्याची निश्चितच शक्यता आहे. आख्यायिका काहीही असोत, मंदिर परिसर अत्यंत सुंदर आहे!

धरालीच्या बाजारात अजूनही सफरचंदे विकण्यासाठी स्थानिक व्यापारी बसलेले होते! हर्षिल खोरे तेथील चविष्ट आणि रसाळ सफरचंदासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. ह्या सफरचंद लागवडीची सुद्धा एक रंजक गोष्ट सांगितली जाते. विल्सन नावाचा एक ब्रिटिश अधिकारी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतात आला. ब्रिटिश सैन्यात काम करणाऱ्या ह्या अधिकाऱ्यावर हिमालयाच्या नैसर्गिक सौंदर्याने गारुड केले आणि तो हर्षिल मध्ये स्थायिक झाला. तिथे त्याने सफरचंदाची बागायती लागवड सुरू केली, मुखबा गावातील स्थानिक महिलेशी विवाह करून हर्षिलचाच रहिवासी झाला. आज सफरचंदे हे हर्षिल खोऱ्याचे नगदी पीक आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही! बाजारात “विल्सन”नावाने सफरचंदे विकली जातात!
हर्षिल गावातून मुखबा गावाकडे – मुखबा
कल्प केदाराचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा हर्षिलच्या दिशेने आमचा मोर्चा वळविला. मुख्य रस्त्यावरून पुढे गेल्यावर गाडीने उजव्या हाताला वळण घेतले आणि आमची गाडी निसर्गरम्य हर्षिल गावाच्या दिशेने धावू लागली. चौफेर डोंगर रांगानी वेढलेले, देवदार आणि पाईन वृक्षांनी सजलेले आणि लाल बूंद फळांनी लगडलेल्या सफरचंदाच्या जाळयांचे वैभव मिरवणारे हर्षिल गाव अगदी एका छोट्या पहाडी हिल स्टेशन सारखे वाटत होते. इंडो-तिबेट कॅंटॉन्मेंट असलेल्या हर्षिल गावात प्रवेश करताच गावाच्या मुख्य रस्त्यावर होम स्टे, पर्यटकांची रेलचेल आणि घरदाराच्या भिंतीवर चितारलेली विविध चित्रे आपले लक्ष वेधून घेतात. हर्षिल गावातून उजव्या बाजूला डोंगरातून वरच्या दिशेने तीन किलोमीटर दूर असलेल्या मुखबा गावाकडे रस्ता जातो. माझी गाडी वळणदार रस्त्यावरून मुखबा गावी येऊन पोहोचली.

मुखबा किंवा मुखीमठ म्हणजे गंगामातेचे माहेर! हिवाळ्यामध्ये गंगोत्री मंदिर बर्फाच्छादित होते तेव्हा दिवाळीनंतर सहा महिन्यांसाठी हर्षिलजवळ असलेल्या ह्या ‘मुखबा’ गावी गंगामातेची मूर्ती पूजा-अर्चेसाठी स्थलांतरित केली जाते. मुखबा गावातील स्थानिकांची अशी मान्यता आहे की, त्यांची ग्रामदेवता समेश्वराची बहीण ‘गंगा’ भाऊबिजेच्या दिवशी आपल्या भावाला भेटण्यासाठी माहेरी ‘मुखबा’ गावी येते आणि हिवाळ्याचे दिवस सरेपर्यंत माहेराचा पाहुणचार घेते. अक्षय तृतीयेला गंगोत्री मंदिराचे कपाट उघडले की मग मुलीची पाठवणी करतात, त्याप्रमाणे रीतसर गंगेची ‘बिदाई’ केली जाते. गंगोत्री मंदिराच्या प्रमाणे हुबेहूब दिसणारे मुखबा गावामधील गंगामातेचे हिवाळी वसतिस्थान आहे.

मंदिराच्या आजूबाजूला पहाडी लोकांची सुंदर लाकडी घरे आहेत. मुखीमठ मंदिराच्या प्रांगणामधून सभोवतालचा विहंगम निसर्ग मन मोहून टाकतो. मी दर्शन घेऊन आजूबाजूच्या परिसराचा फेरफटका मारला. मंदिराच्या प्रांगणामध्ये हिमालयीन वाऱ्याच्या झुळुका भर दुपारी देखील अंगावर शहारा आणत होत्या.
मंदिराच्या प्रांगणामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत नव्याने रुजू होणाऱ्या नवोदित प्रक्षिणार्थी उमेदवारांचा चमू तेथील शालेय विद्यार्थ्यांशी हितगुज करताना दिसला. कुतुहलाने त्यांचा संवाद ऐकत असताना त्या चमू सोबत सहजच वार्तालाप करण्याचा योग आला. त्यांच्या प्रशिक्षणांतर्गत उत्तराखंड मधील दुर्गम भागामध्ये जाऊन काही विशिष्ट बाबींचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आलेली होती. त्यामधील नवोदित उमेदवारांची अदब आणि सौजन्य पाहून खूप बरे वाटले. त्यांचे हे सौजन्य जनसेवेत रुजू झाल्यावर देखील असेच टिकून रहावे!
बगोरी गाव
मंदिर परिसरातून काढता पाय घेत आम्ही मुखबा गावाकडून पुन्हा खालच्या दिशेला, हर्षिल गावालगतच असलेल्या ‘बगोरी’ गावापाशी आलो. इंडो-तिबेट सीमेवर नयनरम्य हर्षिल खोऱ्यामध्ये जालंधरी आणि भागीरथी नद्यांच्या काठावर बगोरी गाव वसलेले आहे. हर्षिलकडून बगोरीकडे जाताना नदीच्या प्रवाहावर असलेले पूल, देवदार वृक्षांची छाया सगळं कसं अगदी निसर्गरम्य! गावापर्यंत वाहने जात असली तरीही तुलनेने गाव अद्यापही पर्यटकांच्या झुंडींपासून अबाधित राहिलेले आहे.

गावाच्या प्रवेशद्वाराजवळच गावाची माहिती देणारा लाकडी महिरप असलेला फलक आहे. प्रवेशद्वार ओलांडताच ग्रामस्थांचे आस्था स्थान असलेले पौराणिक “लाल देवता” मंदिर आहे. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ गाडी उभी करून गावाचा पायी फेरफटका करावा लागतो. गावातील पायवाटेच्या दुतर्फा गावातील लोकांची घरे वसलेली आहेत.

नैसर्गिकरित्या उपलब्ध असणार्या देवदार वृक्षाचे लाकूड, दगड यांचा वापर करून उत्तराखंडमधील “कोटिबनल” अथवा हिमाचली “काठकुनी” ह्या पारंपरिक बांधकाम तंत्राने घरे बांधलेली आहेत. गाव अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. घरांच्या भिंतीवर रंगीबेरंगी आकर्षक चित्रे काढलेली आहेत. गावातून फेरफटका मारत असताना घरांची नितांत सुंदर मांडणी आपले लक्ष वेधून घेते. मंदिरे आणि बौद्ध मठाचे अस्तित्व गावात प्रचलित असणारी हिंदू-बौद्ध धर्माची सांगड सुस्पष्ट करीत होती.

बगोरी गावामध्ये राहणारे लोक स्वत:ची ओळख जढ-भोतिया अशी सांगतात. भोतीया एक अर्धभटकी जमात आहे. ह्या गावात राहणाऱ्या जढ-भोतीया लोकांची मूळ वसाहत भागीरथी नदीच्या जान्हवी किंवा जढगंगा उपनदीवर ३८१९ मीटरपेक्षा जास्त उंचीवर नेलांग आणि जादुंग खोऱ्यात होती. जढगंगा नदीच्या सान्निध्यातिल त्यांच्या रहिवासामुळे त्यांना जढ-भोतीया म्हणून ओळखले जाऊ लागले. हिमालयाच्या पर्वतरांगांमधील ट्रान्स-हिमालयीन पट्ट्यात इंडो-तिबेट आणि इंडो-नेपाळ सीमेलगत राहणाऱ्या भोतिया जमातीची लोकवस्ती बगोरी गावात आहे.
भोतिया समाज प्रामुख्याने लोकरीच्या प्रक्रियेशी निगडित अनेक व्यवसायांमध्ये गुंतलेले व्यापारी आणि पशुपालक होते. त्यांचा व्यवसाय आणि हिमालयातील बदलते प्रतिकूल हवामान ह्या कारणास्तव ही जमात हंगामानुसार स्थलांतरण करीत असे. उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये म्हणजे साधारण एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान हे लोक नेलांग-जादुंग खोऱ्यात राहून तिबेटी व्यापाऱ्यांशी व्यापार करीत असत. प्राचीन काळी हर्षिल खोऱ्याच्या सीमावर्ती भागात असणार्या जादूंग आणि नेलोंग ह्या गावांपर्यंत जनावरांच्या पाठीवर सामान लादून ऐतिहासिक गरतांग गली मार्गे दळणवळण होत असे. ऑक्टोबर ते एप्रिल ह्या अत्यंत थंडीच्या महिन्यांमध्ये, हा समुदाय सीमा ओलांडून तिबेटी बाजारपेठेतून मिळणाऱ्या लोकर, बोरॅक्स आणि मीठ यांसारख्या वस्तूंची भारतीय मैदानी भागातील बाजारपेठेत साखर, धान्य आणि लोकरी उत्पादनांसाठी देवाणघेवाण करीत असत. बगोरी हा इंडो-तिबेटियन व्यापार मार्गाचा एक भाग होता. नेलांग आणि जादुंगच्या उंच डोंगरदऱ्यांमध्ये पोहोचण्यापूर्वी हे लोक बगोरी गावात त्यांचा शेवटचा मुक्कामी तळ ठोकत असत. मात्र १९६२ मध्ये झालेल्या इंडो-चीन युद्धाच्यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने ह्या जमातीला बगोरी गावामध्ये स्थलांतरित केले गेले.
बगोरी गावातील हा समुदाय सहा महीने ह्या गावात तर ऑक्टोबर ते एप्रिल या अत्यंत कडाक्याच्या थंडीच्या दिवसांमध्ये, डुंडा गावात स्थलांतरित होतो. बगोरी गावाच्या स्थानिक कारागिरांनी बनविलेले लोकरीच्या वस्तु प्रसिद्ध आहेत. तसेच सफरचंद आणि राजमा ह्याची इथे शेती केली जाते. नयनरम्य लँडस्केप, निसर्ग आणि परंपरा ह्यांच्याशी मेळ साधणारी स्थानिक लोकांची जीवन शैली आपल्या मनात सहज घर करून राहते. गावातून फेरफटका मारताना काही स्त्रिया दुपारचे वेळी एकीकडे हाताने लोकरीची वस्त्रे विणीत त्यांच्या सुख-दु:खाच्या गप्पा गोष्टी करताना दिसत होत्या. गावकऱ्यांची वाळवणे त्यांच्या परसदारात दिसत होती. कुठे राजमा आणि कणसे उन्हाला टाकलेली होती तर कुठे लोकर!
हर्षिल पोस्ट ऑफिस
पायी केलेल्या रपेटीमुळे एव्हाना पोटात भुकेने कावळे ओरडू लागले होते. माझ्या गाडीवानाने आमची गाडी पुन्हा हर्षिल गावाकडे वळवली आणि हर्षिलच्या मुख्य रस्त्यावरच असलेल्या “हरशिला रेस्टॉरंट” समोर उभी केली. मला मनसोक्त गरमागरम सूप आणि मोमोजची मेजवानी मिळाली. माझी रसना तृप्त झाली! त्यानंतर हर्षिल गावामधील “राम तेरी गंगा मैली” ह्या चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेले पोस्ट ऑफिस पहाण्यासाठी गेले. हर्षिल गावात असलेल्या पर्यटक निवासाच्या दिशेने गावातील छोट्या रस्त्यावरून चालत मी पोस्ट ऑफिस पाशी येऊन पोहोचलो. पोस्ट ऑफिसच्या बाहेर मोठे फिकट झालेले राम तेरी गंगा मैली चित्रपटाचे पोस्टर लावलेले दिसले! सर्व दूर सफरचंदांच्या बागा, चौफेर पर्वतरांगा यांनी वेढलेले हर्षिल गाव खूपच निसर्गरम्य होते.

हर्षिल दर्शन संपवून मी पुन्हा गंगोत्रीच्या दिशेने निघाले. दुपारचे तीन वाजून गेलेले होते. आमची इतर मित्र-मंडळी सुद्धा गंगोत्रीला पोहोचल्याचा फोन आला. मी लगबगीने गंगोत्रीच्या दिशेने निघाले. गंगोत्रीच्या तपोवन कॉटेजमध्ये आमचा कंपू माझी वाटच पहात होता. मित्र-मंडळी भेटल्यावर चहा आणि गप्पा रंगल्या. संध्याकाळी आम्ही सर्व गंगा आरतीसाठी गंगोत्री मंदिर परिसराला भेट दिली. गंगा आरतीने आजच्या दिवसाची सांगता झाली. आम्ही सर्व जण पुन्हा हॉटेल मुक्कामी येऊन आमच्या गौमुख-तपोवन ट्रेकच्या पूर्व तयारीच्या चर्चेमध्ये मशगुल झालो.
प्रवास वर्ष: सप्टेंबर २०२४
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.











यावर आपले मत नोंदवा