सफर ओरिसाची
गोष्ट आहे सन २००० च्या वर्षातली! प्रत्येक सुट्टीला आपल्या देशातला नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक,कलात्मक वारसा आपल्या मनाच्या कुपीत साठवावा, अनेक विध गोष्टींची माहिती करून ज्ञानात भर पडावी आणि ओघाने मनसोक्त स्वच्छंदी, तणाव मुक्त काही दिवस व्यतीत करावे हयाच उद्देशाने नेहमी प्रमाणे कौटुंबिक सहलीची आखणी झालेली होती. हया सुट्टीचा कार्यक्रम काहीसा मोठा होता! मुंबईहून ओरिसा राज्यातील भूवनेश्वर,जगन्नाथपूरी, कोणार्क सूर्य मंदिर पाहून पश्चिम बंगाल मधील कलकत्ता-दार्जिलिंग मार्गे जायचं ठरलं होतं- एकमेव हिंदू राष्ट्राच्या भेटीसाठी – अर्थातच कांचनजंगेच्या कुशीतील-नेपाळ!
दि.०३/०५/२०००:– ३ मे चा दिवस उजाडला तो उत्साहाने भारावलेला! सहलीची आवश्यक तयारी करून आम्ही पनवेलहून निघून बोरीबंदर (सि.एस.टी) स्थानकावर येऊन पोचलो. दुपारी तीन वाजून पाच मिनिटाने मिनार एक्सप्रेस आम्हाला ओरिसा राज्यात घेऊन जाण्यासाठी निघाली. केसरी टूर्सच्या उत्कृष्ट नियोजनामुळे त्यांच्या आयोजित सहलीमधील आम्ही सर्व सहप्रवासी परस्पर परिचय देऊ- घेऊ लागलो. प्रवास, गाडी, हॉटेल, फिरणे हयांच्या नियोजनाचा कोणताच भार डोक्यावर नसल्याने फक्त भटकंतीचा निखळ आनंद केसरी टुर्सच्या सहलीत निश्चितच मिळतो. ‘मिनार एक्सप्रेस’ हैदराबाद-सिकंदराबाद हया जुळ्या शहरांमार्गे जाऊन पुढे ‘कोणार्क एक्सप्रेस’ होते. मुंबई- भुवनेश्वर हा साधारणतः १९३२ किलोमीटर दोन दिवसांचा रेल्वे प्रवास आहे. प्रवासाची पहिली रात्र दक्षिण महाराष्ट्राची सीमा पार करतानाच संपते.
दि.०४/०५/२०००:- दुसऱ्या दिवशी रेल्वेच्या खडखडाटाने जाग आली ती महाराष्ट्राबाहेरच! महाराष्ट्रातून आंध्र प्रदेशातील अनेक शहरे, गावे पार करीत गाडी विशाखापटट्णम-वाल्टीयार मार्गे आगेकूच करीत होती. हया शहरांची नाम फलके दिसताच भारत-भूचा इतिहास डोळयांपुढून सरकत होता. आपापल्या कलेने, संस्कृतीने नटलेली ही शहरे जुन्या ऐतिहासिक वास्तूंना अभिमानाने आजही जपून गतकाळाची थोर लढवय्यांची, तख्तांची आठवण देत होती.
दि.०५/०५/२०००:- दोन रात्रींचा प्रवास संपल्यावर सकाळ झाली ती ओरिसा राज्यात! भारताचा पश्चिम किनारा सोडून अगदी पूर्वेकडे आलो होतो. पूर्वेकडे आल्याने सूर्योदय फार लवकर झालेला वाटला. अगदी पहाटे चारच्या सुमारासच तांबडे फुटलेले होते.
ओरिसा राज्य कोणाचेही साम्राज्य नसताना हया भूमीला ‘कलिंग’ देश म्हणून ओळखले जात असे. ओरिसा राज्याचे प्राचीन नाव ‘उत्कल’ असेही होते, ज्याचा उल्लेख आपल्या राष्ट्रगीतामध्ये देखील आहे. ओरिसा राज्य म्हणजे बहुचर्चित दुष्काळ ग्रस्त, पूरग्रस्त राज्य! अनेक विचार मनात आले! खडखडाट करीत धावणाऱ्या गाडीतून दूरवर पसरलेली उजाड शेते दिसत होती. ओसाड गावे नजरेस पडत होती. मध्येच कुठे तरी ‘ओयासीस’ प्रमाणे हिरवळही होती. नैसर्गिक आपत्तींशी सामना करीत डार्विनच्या सिद्धांताची आठवण करून देत आम्ही येऊन पोहोचलो ओरिसाच्या राजधानीत- भुवनेश्वरला!
सकाळी सव्वा सात वाजता भुवनेश्वरला स्टेशनवर केसरीच्या ग्रुप लिडरने हसतमुखाने स्वागत करून गरमागरम चहा-कॉफी पेश केली. दोन दिवसाचा रेल्वे प्रवासाचा शीण कुठच्या कुठे पळवून लावला! आम्ही सर्व मंडळी लक्झरी बसने जगन्नाथ पूरीकडे निघालो. भुवनेश्वर ते पूरी हे सुमारे साठ किलोमीटर अंतर आहे. रस्त्याच्या दुतर्फा भात-शेती आणि नारळाची, ताडाची झाडे दिसत होती. ही हिरवळ पाहून मन सुखावले. वातावरणात समुद्री हवेचा उष्मा जाणवू लागला. साधारण दिड तासांनी वस्ती आणि शेते हयातून दरमजल करीत आम्ही साडेनऊच्या सुमारास पूरीच्या ‘हॉटेल पॅराडाईज’ वर पोहोचलो. शहरात मुख्य रस्ता अगदी रूंद आणि दूर पर्यंत सरळ जाऊन जगन्नाथाच्या मंदिरापर्यंत पोहोचतो. सप्त पु-यांपैकी प्रसिध्द असलेले तीर्थक्षेत्र ‘जगन्नाथ-पूरी’! साक्षात विष्णूचे भोजनाचे धाम! चारधामांपैकी एक पवित्र धाम !
आपापल्या खोल्या ताब्यात घेतल्या. दोन दिवसांनंतर उन पाण्याने आंघोळ करून प्रवासाचा शीण घालविला. भरपेट नाश्त्यानंतर जेवणाची घंटा वाजेपर्यंत एक छान डुलकी काढली. जेवणानंतर विश्रांती घेऊन आम्ही सर्व जण ताजेतवाने होऊन ‘जगन्नाथ मंदीर व पूरीचा समुद्र किनारा पहाण्यासाठी बाहेर पडलो.
पुरीचे जगन्नाथ मंदीर
बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर स्थित असलेल्या हया पूरी शहराचे माहात्म्य कोण न जाणे? येथील प्रसिध्द रथयात्रा तर सर्व परिचितच आहे! बाराव्या शतकात बांधलेले हे मंदिर सुमारे दहा एकर जागेत विस्तार पावलेले आहे. संपूर्ण मंदिरास दोन आयताकृती भिंतींचे कुंपण आहे. बाह्य भिंतीस ‘मेघनाद प्रचिरा’ व अंतर्गत भिंतीस ‘कुर्मभेद’ म्हटले जाते. हया मंदीरात फक्त हिंदूंनाच प्रवेश आहे. जगन्नाथ मंदिराच्या कळसावर अष्टधातूचे ‘नीलचक्र’ आहे. हया नीलचक्रावरचा झेंडा दर दिवशी बदलला जातो असे सांगितले जाते. तसेच प्रत्येक एकादशीच्या दिवशी हया नीलचक्रा शेजारी दिवा पेटविला जातो. दोनशे चौदा फूट मंदिरावर असलेल्या ११ फूट उंचीच्या चक्राचा हा सन्मान थक्क करणारा आहे. मंदिरामध्ये भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा हयांच्या चंदनी लाकडाच्या मूर्ती आहेत. मंदिराचे स्थापत्य शास्त्र, शिल्प कला हे १२व्या शतकातल्या कलेचे उत्कृष्ट नमुने आहेत. मुख्य मंदिराच्या परिसरात किमान तीस विविध मंदिरे आहेत.
मंदिराच्या दक्षिण बाजूकडे हजारो वर्षे प्राचीन असा, मनाच्या सर्व आकांक्षा पूर्ण करणारा ‘कल्पावत’ (वडाचे झाड) आहे. आम्ही प्रत्येकांनी मनोमन जगन्नाथाची प्रार्थना करून त्या कल्पावताला फेरी मारली. तिथून पुढे सोळा खांबांचा ‘मुक्ती मंडप’ हॉल पाहीला. पुजार्याने हयास ‘ब्रम्हसभा’ असेही म्हटले जाते असे सांगीतले. पश्चिमेकडेच्या दरवाज्याजवळ चित्रशाळा आहे. प्राचीन काळची रेखाटने तिथे पाहावयास मिळतात. उत्तरेकडेच्या दरवाजाजवळ ‘सोना कुआ’ म्हणजे सोनेरी विहीर आहे. स्नान यात्रेच्या वेळी भगवान जगन्नाथाच्या आंघोळीसाठी हयाचा वापर होत अशी माहिती मिळाली. प्रत्येक लिप वर्षामध्ये ‘नव-कलेवर’ हया प्रसंगी मंदिरातील जुन्या मूर्ती, मंदिराच्या पश्चिमेकडे असणा-या ‘कोईला-वैकुंठ’ हया विहिरी सदृश खोल भागात पुरल्या जातात. आणि नवीन प्रतिमांची प्राणप्रतिष्ठा केली जाते. हे सर्व विधी उरकण्यासाठी पुरोहित घरच्या सर्वाधिक वयस्कर गृहस्थाची निवड केली जाते. हात, डोळे हयांवर पट्टी बांधून जुनी मूर्ती काढली जाते. येथील स्थानिक पुजा-यांनी सांगितले की, हे विधी करणाऱ्या व्यक्तीचा महिनाभरात अथवा नजीकच्या काळात मृत्यू होऊन तो मोक्ष पावतो अशी श्रद्धा आहे.
जगन्नाथ मंदिराचे पूर्ण बांधकाम दगडी स्वरुपाचे आहे. अखंड दगडात कोरीव काम करून ही वास्तु आकारास आलेली आहे. खालच्या बाजूला दगडी चीऱ्यांचा वापरही दिसतो. मंदिराचे तीन भाग बाहेरील बाजूस दिसतात. प्रत्येक मंदिराचा कळस तीन गुणांनी नामांकित आहे. जसे सत्व,रज आणि तम्! मंदिराला एकूण चार दरवाजे आहेत. सिंहद्वार- मुख्य दरवाजा जो पूर्वेकडे आहे, दक्षिणेला अश्वव्दार, पश्चिमेला व्याघ्रव्दार आणि उत्तरेस हस्तीव्दार! हया दरवाज्यातून पूर्वी व्यक्ति सापेक्ष वर्गीकरण होत होते असे सांगीतले जाते. हया मंदिराचा मुदपाकखाना जगात सर्वात मोठा आहे. कारणही तसेच आहे! येथील महाप्रसादाचे महत्व फार आहे. महाप्रसादात सात्विक वरण- भाताचा नैवेद्य असतो. भाविक वर्ग आपआपल्या ऐपतीप्रमाणे जगन्नाथाला नैवेद्य अर्पण करतात म्हणूनच हया ठिकाणाला भगवान विष्णूचा भोजनाचा धाम म्हटला जातो.
विशेष उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे हयाच मंदिरात स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी हयांना प्रवेशास मज्जाव केला होता. संपूर्ण मंदिर फिरण्यास निश्चितच दोन तासाचा अवधी सहज लागतो. विश्वाच्या राज्यकर्त्याला, भगवान जगन्नाथाला मनोमन स्मरून एका वेगळ्याच पवित्र अनुभूति घेऊन मंदिरातून बाहेर पडलो आणि आमचे पाय पुरीच्या समुद्र किना-याकडे वळले. परंतु मनात अद्याप विचार घोळत होते जगन्नाथाच्या भव्य रथयात्रेचे! आषाढात पावसाळी दिवसांमध्ये हे मोठाले, रूंद रस्ते भाविकगणांनी कसे फुलून जात असतील? किती मंगलमय वातावरण असेल!
पुरीचा समुद्रकिनारा
येथे प्रथम सूचना मिळाली ती पाण्यात मस्ती न करण्याची! पाण्याला प्रचंड ओढ होती. त्या उसळणा-या लाटा हृदयातही हेलकावू लागल्या. संधिप्रकाशात निवांत वाळूत बसण्याचा आनंद काही और होता! अथांग समुद्र सगळ्यांचा निचरा पोटात घेतो! लाटांचे थंड वारे अंगावर घेत मन हलके होऊन उत्साही झाले. परंतु हया बंगालच्या उपसागराचा रौद्रपणा मात्र खचितच जाणवतो! किंबहुना म्हणूनच हा समुद्रकिनारा शांत,स्वच्छ असावा. पूर्वेकडे सूर्यास्तही लवकर झाल्याने अंधार दाटल्यावर आम्ही सर्व पायी-पायी आमच्या ‘हॉटेल पॅराडाईज’वर परतलो. पदभ्रमणाने जठराग्नि चांगलाच प्रदीप्त झाल्याने मनसोक्त जेवण करून गप्पा-गोष्टी, चेष्टा-मस्करी करण्यात दंग झालो.
कोणार्क सूर्यमंदीर
दि. ०६/०५/२०००:- आज सहलीचा चौथा दिवस! सकाळीच लवकर उठून नाश्ता करून तयार झालो. जगप्रसिध्द कोणार्कचे सूर्यमंदिर पाहाण्यासाठी! पुरी शहरापासून ३३ किलोमीटर उत्तरेकडे कोणार्कचे जगप्रसिध्द सूर्यदेवतेचे प्राचीन, कलात्मक मंदिर आहे. पूर्णतः काळ्या दगडांतून बांधकाम केलेले हे मंदिर तेराव्या शतकाच्या सुरुवातीला बांधले असावे असे सांगीतले जाते. हिंदू-संस्कृतीत प्रेक्षणीय असलेल्या अनेक कलात्मक, वैशिष्ट्यपूर्ण रचनांपैकी हे एक आहे. आता हया मंदिराची बरीच पडझड झाली असली तरी ओरीसन कलेच्या मानाच्या तु-यांपैकी हे एक आहे.
तेराव्या शतकात ओरिसाचा राजा नरसिंह देव हयाने सुमारे १२०० कुशल कारागीरांकडून हे शिल्प-सौंदर्य घडवून आणले. हया मंदिरामागे दंतकथा सांगितली जाते ती अशी – कृष्णाचा पुत्र सांब हयाला महारोगाच्या दुर्धर व्याधीने ग्रासले होते. बारा वर्षे तो हया रोगाने पिडीत होता. त्याच्या रोगाचे निर्मूलन सूर्य देवाच्या कृपेमुळे झाले. तेव्हा त्यांनी सूर्याची उपासना करून सूर्य देवाचे हे मंदिर बांधले असे मानले जाते.
आपल्या कलात्मकतेने थक्क करणारे हे मंदिर एका भव्य रथाच्या स्वरुपात आहे. हया रथाला चोवीस चाके आहेत. हा रथ सात अश्व ओढून नेताना दाखविले आहे. काही जणांच्या म्हणण्यांनुसार ही २४ चाके दिवसातील चोवीस तासांचे प्रतिनिधित्व करतात. सात अश्व आठवडयाच्या सात दिवसांचे प्रमाण दर्शवितात. ओडीसी वास्तुशास्त्र पध्द्तीप्रमाणे मंदिराची रचना ‘नागर’ वास्तूकलेप्रमाणे असते. हयानुसार मंदिराचे प्रमुख भाग पडतात देऊळ, जगमोहन आणि नृत्य मंडप! महत्त्वाचे भाग ‘देऊळ’ ज्यामध्ये पूजनीय देवता स्थापन केल्या जातात. देवळाच्या समोरील पोर्चसारख्या भागाला जगमोहन म्हटले जाते. देऊळावर नेहमी कमळाच्या आकारात कळस असतो. कोणार्क मंदिराची बरीच पडझड झाली आहे. मूळ मंदिराच्या कळसापर्यंत उंची होती २२० फूट! परंतू आता तो कळस उध्वस्त अवस्थेत आहे. बांधकाम शास्त्र तेव्हाही किती प्रगत होते हे हया मंदिराचे पूर्ण निरीक्षण केल्यानंतरच कळते. बांधकामात लोह आणि दगड वापरूनही कलात्मक वास्तु टिकवून ठेवली होती एका प्रभावी चुंबकाच्या सहाय्याने! हा चुंबक होता कमळाप्रमाणे भासणाऱ्या कळसामध्ये! हया मंदिरास ‘ब्लॅक पॅगोडा’ असे ब्रिटिशांनी नाव दिले होते. कारण हया प्रभावी चुंबकामुळे समुद्रातील जहाजे वाळूत येऊन समुद्र किनारी रूतून बसत. परंतू ब्रिटिशांनी तोफेने कळस उडवून दिल्याने ख-या अर्थाने मंदिराची पडझड चालू झाली. आता केवळ हे एक शासकिय इतमामातले ‘ऐतिहासिक -कलात्मक अवशेष’ म्हणून शिल्लक राहीले आहे.
मंदिराच्या विविध दिशांमध्ये तीन सूर्य प्रतिमा आहेत. उगवतीच्या सूर्याचे किरणांपासून मावळतीचे किरण त्यावर पडत राहतात आणि त्यानुसार त्या प्रतिमांवर मुद्रा भाव बदलत जाताना भासतो. मंदिराच्या प्रत्येक शिल्पाचे सौंदर्य काही वेगळेच आहे. हया शिल्पामध्ये मनुष्याच्या विविध जिवनावस्था दाखविल्या आहेत. जसे चार आश्रम अवस्था, काळाच्या प्रहराबरोबर घडणा-या दैनंदिन जिवनमानाच्या घटना सूचकतेने चित्रित केल्या आहेत. मंदिरांच्या नक्षीकामात गायन-वादनात मग्न झालेल्या शिल्पापासून रतिक्रिडेत रममाण शृंगारीक शिल्पांचाही समावेश आहे. मंदिराच्या चाकांवर दिवसाचे कालमापन होते. बोटांच्या छायेवरून प्रहराचा अंदाज येतो. विशेष म्हणजे हया मंदिराची सावली पडत नाही असे म्हणतात. खरोखरच शिल्पकलेचा, स्थापत्यशास्त्राचा हा अजोड नमूना आहे. प्राचीन शिल्प सौंदर्य, कलात्मकता अश्या गोष्टींनीच तर खरी घडली आहे भारतीय संस्कृती, परंपरा आणि हीच तर खरी संपत्ती आहे अमूल्य! मंदिराच्या परिसरातून थोडे वरच्या दिशेला येऊन पाहीले तर पूर्ण सूर्य मंदिराचे विलोभनीय दर्शन होते. प्रत्येक नागर कलेचा भाग सुस्पष्ट होतो. देऊळ त्याच्यासमोर जगमोहन, नृत्य मंडप आणि प्रवेश व्दारावरचे दोन दगडी गज सिंह! डोळ्यांचे पारणे फेडणारी ही कलाकृती आपल्याला नक्कीच स्तंभित करते. सूर्य मंदिर पाहून झाल्यावर मंदिराच्या परिसरात दुपारचे वनभोजन झाले. त्यानंतर आम्ही प्रस्थान केले, कोणार्कपासून तीन किलोमीटर दूर असलेल्या ‘चंद्रभागा बीच’ कडे!
चंद्रभागा बीच
इथे हया बंगालच्या उपसागराला ‘जगन्नाथाचा सासरा’ म्हणून संबोधिले जाते. हयाचे गूढ आहे समुद्र मंथनातील उत्पन्न रत्नांमध्ये! हया मंथनामधून निर्माण झालेली ‘लक्ष्मी’ ही भगवान विष्णू- जगन्नाथाची पत्नी! हा समुद्र किनारा मनाला भय कंपित करतो. लाटांचे रौद्र स्वरूप निश्चितच ओरीसामध्ये थैमान घातलेल्या चक्री वादळाची, पूराची आठवण करून देते. हया समुद्र किनाऱ्यावर जाताना चक्री वादळामुळे बसलेल्या तडाख्यामुळे जागोजागी हया ठिकाणी फुटून वाहून गेलेले रस्ते, उन्मळून वाहत गेलेली झाडे, उध्वस्त मानवी जीवन नजरेस पडत होते.
समुद्र किना-या जवळच वरच्या अंगास एक सखल तळे आहे. हया तळ्यामध्ये पाणी कोठून येते हयाविषयी गूढ आहे. हया तळ्यात स्नान केल्यानेच कृष्ण पुत्र सांब हयाची महारोगाची व्याधी दूर झाली असा येथील लोकांचा समज आहे. प्रत्येक वर्षी माघ पौर्णिमाला इथे ‘माघ सप्तमी मेळा’ भरतो. हया वेळी अनेक लोक इथे स्नानाचा आनंद अनुभवतात आणि दुसर्या दिवशी सूर्योदय पाहूनच परततात, असे केल्याने पाप क्षालन होऊन शारीरिक व्याधी नष्ट होतात असे मानतात. अश्या अनेक प्रकारच्या आख्यायिकांची मनात जुळणी करीत समुद्रकिनारी मनसोक्त फेसाळणाऱ्या लाटांमध्ये उभे राहून नारळाचे पाणी पिण्याचा आनंद लुटला आणि मग प्रसिध्द नंदकानन अभयरण्याकडे आगेकूच केली.
नंदकानन अभयारण्य
हे अभयारण्य खास पांढर्या वाघांसाठी प्रसिध्द आहे. येथे हत्तीवर बसून सर्व अभयारण्य फिरता येते. परंतु काही महिने आधी झालेल्या चक्रीवादळामुळे ही जंगल सफारी बंद होती. तसेच हवामानही लहरी होऊन अचानकच पाऊस सुरू झाला. आम्हा सर्वांची पूर्ण त्रेधा तिरपीट उडाली. काही वेळातच पाऊस ओसरला पण सर्व वातावरण बदलून गेले. अगदी कॅमेरे, व्हीडीओ शूटिंग सर्वच ठप्प झालं! भुवनेश्वर पासून साधारणतः वीस किलोमीटर अंतरावर नंदकानन अरण्य विस्तीर्ण जागेत पसरलेले आहे. गाईडच्या सांगण्यावरून येथील सफारीमध्ये बसून पांढरे वाघ मोकळे फिरताना पाहण्याचा आनंद निश्चितच रोमांचकारी असेल हयात शंका उरली नाही. नंदन कानन अभयारण्यातून आम्ही धवल गिरी येथील विश्वशांती स्तूप पाहण्यास गेलो.
धौली – विश्वशांती स्तूप
भुवनेश्वर शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर धवलगिरी टेकडीवर जपानी पध्द्तीचा ‘व्हाईट पीस पॅगोडा’ आहे. त्याला ‘विश्व शांती स्तूप’ म्हटले जाते. स्तूपाशेजारी धवलेश्वराचे मंदिर सुध्दा आहे. हया टेकडीवरून भुवनेश्वर शहराचे विहंगम दृश्य दिसते. एकाच दृष्टीक्षेपात नजरेत भरतो तो सभोवारचा समृद्ध हिरवागार निसर्ग! भात-शेती, नारळाची झाडे हयांनी सजलेली भूमी ओरिसाची राज्याची खूण नक्कीच पटवून देते.
भुवनेश्वर ही ओरिसाची राजधानी प्राचीन काळी ‘कलिंग’ हया नावाने ओळखली जात असे. मौर्य राजा सम्राट अशोक हयाने ‘कलिंग’ वर केलेल्या चढाईत त्याचे दीड लाख सैनिक मारले गेले. रक्ताचे पाट वाहू लागले. रणभूमीच्या शेजारीच वाहणा-या नदीचे पाणी सुध्दा रक्तासारखे लाल होऊन वाहू लागले. तेव्हा सम्राटाला अतीव दु:ख झाले. त्याने हिंसेचा मार्ग त्यागून भगवान बुध्दाचे अनुयायित्व स्वीकारले. हया कलिंगच्या लढाईची अनेक रेखाचित्रे स्तूपाभोवती रेखाटलेली आहेत. स्तूपाच्या एका बाजूला परीघाभोवतीच सम्राट अशोकाचा निद्रिस्त पुतळा आहे. एकीकडे मोठी बुध्द्प्रतिमा आहे. हया धौली हिलवरून कलींगची रणभूमी दिसते. ऐतिहासिक नोंदीनुसार तिसर्या शतकात मौर्य सम्राट अशोकाने केलेली ही शेवटची लढाई-कलिंगच्या रणभूमीवर! नागर शिल्प कलेची सुमारे ७००० मंदिरे ओरिसाची राजधानी म्हणजे भुवनेश्वर शहरात अनेक ठिकाणी होती. त्यापैकी फक्त काही मंदिरेच आजतागायत शिल्लक आहेत. आमच्या स्थल दर्शनामध्ये लिंगराज आणि मुक्तेश्वर मंदिरांचा समावेश नव्हता. त्यामुळे चांगल्या शिल्प कलेचा एक नमुना पाहाण्याचे राहून गेल्यामुळे मनाला फार रूखरूख लागली. परंतु हे सर्व पाहाण्यासाठी फक्त ओरिसा राज्याच्या सफरीसाठी निघाले पाहिजे! आम्हाला कलकत्ता गाठायचे होते. संध्याकाळी हॉटेलावर येऊन ताजेतवाने झालो. सामानाची बांधाबांध केली. जेवण करून मनोमन जगन्नाथाची प्रार्थना करून पूरी स्टेशनवर पोहचलो. रात्री सव्वा नऊच्या पूरी-हावडा एक्सप्रेसने आम्ही पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करणार होतो. दुर्देवाने काही तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन पहाटे तीन वाजता सुटली. सर्व कार्यक्रमाचे नियोजन विस्कळीत झाले.
प्रवास वर्ष: सन २००० लेखन संदर्भ: सन २०००
क्रमशः
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा