सोनार बांगला – कोलकाता
दि. ०७/०५/२०००:- आधीच उशीरा सुटलेल्या ट्रेनमुळे आजचा पूर्ण दिवसही प्रवासातच गेला. संध्याकाळी पाच वाजता गाडी हावडा स्टेशनवर पोचली. सुमारे वीस तास गाडी उशिराने पोहोचली! हाही एक दक्षिण-पूर्व रेल्वेचा अनुभव! कलकत्ता हे आमच्या मार्गावरचे किंवा स्टॉप ओवरचे ठिकाण असल्यामुळे थोड्या कालावधीत जे काही पाहता येईल अश्या ठिकाणांचाच स्थल दर्शनात समावेश होता.
‘हावडा ब्रिज’ जवळच असलेल्या हॉटेलामध्ये आमची एक दिवसीय मुक्कामाची सोय होती. शानदार हॉटेलच्या पाहुणचाराने पूर्ण थकवा नाहीसा झाला. आम्ही सर्व फ्रेश होऊन कालीघाट मंदिर व मेट्रो रेल्वेने फिरण्यास बाहेर पडलो. कलकत्ता शहर आणि सांस्कृतिक, ऐतिहासिक घटना हयांचा मेळ मनात घोळू लागला. हया शहराने भारत देशाला एक महान व्यक्तिमत्व दिले- रविंद्रनाथ टागोर – एक थोर साहित्यिक, कवी, चित्रकार! ब्रिटीश कालावधीत ‘ईस्ट इंडिया कंपनीचे’ मुख्य कार्यालय इथेच होते. बकालतेसाठी प्रसिध्द असलेले हे हावडा शहर! अधिकाधिक लोकसंख्या – आणि बेकारी हे हावडा शहराचे दृश्य! कलकत्ता म्हणजे हया शहराचा आधुनिकतेने नटलेला भाग! सोळा वर्षांपूर्वी मॅट्रीकच्या परीक्षेला असताना एकदा कलकत्ता- नेपाळ पाहीले होते. कलकत्त्यामध्ये आमूलाग्र बदल झाला होता. स्थल दर्शनास निघाल्यावर प्रथम ‘हावडा ब्रिज’ ज्याचे सरकारने ‘रविंद सेतू’ असे नामकरण केले आहे, त्यावरून कलकत्त्याच्या शहरी भागाकडे गेलो. जगातला हा सर्वात मोठा दोन तीरावर आधारीत असलेला पूल आहे. हयावरून एकावेळी आठ रांगांमध्ये वाहने ये-जा करू शकतात. हयावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन हयास पर्यायी असा दुसरा हुगळी नदीवर ‘विदयासागर सेतू’ बांधला गेला. हा स्टीलच्या १५० केबलवर आधार देऊन तयार केलेला ब्रिज आहे. प्रगत शास्त्राच्या सहाय्याने महानगराचे आधुनिकीकरण कलकत्त्यात अनेक ठिकाणी अनुभवले.
काली घाट मंदीर
येथे महाकाली मातेचे मंदिर आहे. रविवार असल्याने खूप गर्दी होती. घाईत, धक्का-बुक्कीत दर्शन घ्यावे लागले. पण देवी मातेची मूर्ती थोडी उग्र जाणवली. इथे रविवारी देवी मातेला बळी दिले जातात. हया मंदिराबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते. प्रजापती दक्ष म्हणजे शिव पत्नी- सतीचा पिता हयाने यज्ञामध्ये आमंत्रित न करून शिवाचा अपमान केला. आपल्या पतीचा अपमान सहन न होऊन सतीने स्वत:स अग्निस समर्पित केले. पत्नी विरहाच्या दु:खाने तिथे आलेल्या शिवाने सतीचे जळते शरीर पाहून तांडव नृत्य करण्यास सुरूवात केली. विश्वाचा नाश होईल असे वाटून सर्व देवांनी भगवान विष्णूकडे धाव घेतली. शिवाचे तांडव थांबवण्यास विष्णूने सतीच्या देहाचे अनेक भाग केले. त्यामधील सतीच्या कलेवराचा पायाचा भाग कलकत्त्याच्या दक्षिण भागातील काली घाट या परिसरात पडला होता असे मानले जाते. म्हणून हया शहरास ‘कालीकत’ असे पूर्वी नाव होते.
कलकत्त्याच्या बकालपणाचे प्रतिक म्हणजे- पाकिटमार! जागोजागी सावधानतेचे फलक होते, “Beware of Pick pocketers”! अतिशय लोकसंख्या असलेले बकाल महानगर हे याचे यथोचित वर्णन आहे. हावडा म्हणजे जुने कलकत्ता की जे खूप बकाल आहे. बेशिस्त ट्रॅफिक, सायकल रिक्षा, ट्राम हयांनी गजबजलेले हे शहर!
‘मेडन’ आणि ‘चौरंगी’ ही आधुनिक कलकत्ता शहराचे प्रतिक! मेट्रो रेल हे येथील खास आकर्षण! कलकत्ता शहराचा छान आणि नीटनेटका परिसर म्हणजे मेडन ! सर्वसाधारण मध्यम व उच्च मध्यम वर्गीय लोकांची हालचाल इथे जाणवते. परदेशात असल्याचा आनंद देणारी मेट्रो रेल – भुयारी रेल्वे भारतात फक्त कलकत्त्यामधेच आहे. प्लॅटफॉर्म तिकीट पंचींग आणि मगच मिळणारा प्रवेश निश्चितच एक शिस्त निर्माण करणारा आहे. हा आधुनिकतेचा, सुसज्ज यंत्रणेचा गौरव आहे. ही मेट्रो रेल ताशी ८० किलोमीटर वेगाने धावते. तसेच सर्व कंपार्टमेंट एकमेकांना आतून जोडल्याने आपण एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत सहज ये-जा करू शकतो. ऑटोमॅटिक उघडणारे व बंद होणारे दरवाजे, प्रत्येक स्टेशन जवळ येताच होणारी उद्घोषणा, गाडीचे कोरे, आकर्षक रूप पाहून निश्चितच परदेशात आहोत का? हा भास होतो. प्रत्येक स्टेशनावर प्लॅटफॉर्मवर ये-जा करण्यासाठी असलेले सरकते जिने होते. आम्ही ‘टोल गंज’ ते ‘एस्प्लनेड’ हा मेट्रो रेलचा प्रवास करून आमच्या हावरा येथील घरी ‘हॉटेल मनीष’ वर परतलो.
पण मनात थोडासा हेवा वाटत होता हया शहराचा ! वस्तुत: मुंबई शहरासारख्या आर्थिक राजधानी असणा-या अत्याधुनिक शहरात ही सोय गरजेची आहे. अश्या प्रकारची संगणकीकृत रेल्वे तिकीट सेवा आणि चपळ रेल्वे सेवा असेल तर जनजीवन कितीतरी सुखावह होईल! मुख्य म्हणजे विना तिकिट प्रवास करणार्यांवर निश्चितच चाप बसेल.
बेलूर मठ
दि. ०८/०५/२०००:- आज सकाळीच लवकर नाश्ता उरकून आम्ही बेलुर मठाकडे कूच केले. हुगळी नदीवर बांधलेल्या विदयासागर सेतू, विवेकानंद सेतू ब्रिजवरून आम्ही भ्रमण करीत शहर पहात बेलुर मठाला पोचलो. हुगळी नदीच्या पूर्वेला विवेकानंदांचे गुरू – श्री रामकृष्ण परमहंस मिशनचा हा मठ आहे. बेलुर मठ हे स्वामी विवेकानंदांचे स्वप्न होते. हे वास्तुशिल्प सर्व धर्म समभाव साकारणारे आहेत. त्याकडे विविध कोनांतून पहिल्यावर कधी चर्च, कधी मशीद तर कधी मंदिराचा भास होतो. हिंदूचे धर्म चिन्ह ‘ओम्’, मुस्लिमांच्या चांद-तारा आणि ख्रिश्चनांचा क्रूस ही तीनही चित्रे तेथे कोरलेली आहेत. गंगा – भागीरथीच्या तीरावर असलेल्या हया बेलुर मठात स्वामी विवेकानंदांच्या ध्यान-धारणेच्या खोलीत त्यांच्या रक्षा जतन करण्यात आल्या आहेत. हयाच परिसरात एक प्रशस्त ध्यान मंदिर आहे. तिथे रामकृष्णांचा पुतळा असून मेडीटेशनसाठी भला कोरीव मंडप आहे. पूर्ण मंडपावर सुंदर नक्षीकाम असून विश्वाचे व जीवनाचे रूप जोडण्याचा प्रयत्न केला आहे. हया धीरगंभीर वातावरणात काही क्षण शांत ध्यान मग्न होऊन आपल्या आत्म्याशी संवाद साधण्यास निश्चितच मदत होते. विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या हया दूताचा शिष्य-‘योध्दा संन्यासी’- स्वामी विवेकानंद म्हणजे एक परिपूर्ण अष्टपैलू व्यक्तिमत्व! या हॉलच्या मागील बाजूस एका दुमजली इमारती मध्ये स्वामी विवेकानंदांची खोली, त्यांनी वापरलेल्या वस्तू, वाद्ये, पुस्तके, पलंग इत्यादी चिजवस्तू जतन केल्या आहेत. दुर्देवाने फोटोग्राफी निषिद्ध असल्यामुळे हया स्मृती शिल्प रचना, विशाल परिसर आणि त्याचे उदात्त स्वरूप कॅमेरामध्ये बंदिस्त करता आल्या नाहीत. पण खरोखरच हा अनुभव घेण्यायोग्य ही वास्तु आहे.
दक्षिणेश्वर मंदिर
सकाळचे ऊन चढत असतानाच पायाला चटके खात, आम्ही विवेकानंद ब्रिज ओलांडल्यावर बेलुर मठाच्या समोरच्या बाजूस असणार्या हया दक्षिणेश्वर मंदिरात फिरू लागलो. हया मंदिराच्या परिसरात बारा ज्योर्तिलिंगांची शिवपिंड असलेली मंदिरे आहेत. त्यांच्या समोर मुख्य मंदिर आहे कालीका मातेचे! हया दक्षिणेश्वर कालीमाईने परमहंस रामकृष्णांना इथेच साक्षात्कार घडविला होता. एकंदरीत काली मातेचे खूपच भक्त हया मंदिरात गर्दी करून होते.
नेताजी भवन
दक्षिणेश्वर मंदिरातून हॉटेलवर परतत असताना वाटेत नेताजी सुभाष चंद्र बोस हयांचे त्यांच्या वडीलांनी बांधलेले घर पाहीले. संपूर्ण घराचा भाग “नेताजी भवन” संग्रहालयामध्ये बदलला असून नेताजींची दुर्मिळ छायाचित्रे, त्यांनी हाताळलेल्या वस्तू इथे प्रदर्शनात ठेवलेल्या आहेत. विशेष गोष्ट म्हणजे इथे आपल्याला एका ठिकाणी थांबून माहितीपटाव्दारे नेताजींचा आवाजही ऐकण्यास मिळतो. नेताजींचे शिक्षण, कौटुंबिक जीवन, आजाद हिंद सेनेची स्थापना व सर्व राजकीय चळवळींची इथे माहिती प्रदर्शित केलेली आहे. नेताजी भूमिगत होताना घराच्या ज्या भागातून गुप्त झाले त्या दिशेने पावलांचे ठसे दाखविले आहेत. ज्या गाडीतून नेताजींनी पलायन केले ती कार देखील संग्रहालयामध्ये आहे.
नेताजी भवन येथून हॉटेलवर परतताना शहराच्या मध्यभागी मेडन हया भागात प्रसिध्द ‘व्हिक्टोरीया मेमोरियल’ आहे. व्हिक्टोरीया राणीच्या स्मृती प्रीत्यर्थ बांधलेला हा राजमहाल संगमरवरी असून आकर्षक आणि कलात्मक आहे. इमारतीच्या मध्यभागी मोठा घुमट आणि चौफेर छोटे उंच घुमट आहेत. हयाच्या मागील बाजूस सुरेख हिरवळ, दोन छोटी तळी आणि पाचव्या किंग जॉर्जचा पुतळा आहे. दुर्देव म्हणजे सोमवार असल्याने स्मारक बंद होते. त्यामुळे आत जतन केलेल्या पेंटीग्ज् ,स्कल्पचर्स हयांचा आनंद घेता आला नाही. हॉटेलवर परतल्यावर आई-डॅडींच्या लग्नाचा वाढदिवस सर्व केसरी परिवाराने अगदी थाटात साजरा केला. उत्सवमूर्तींचा छान आदर सत्कार केला. घरापासून दूर असूनही घराचे उबदार प्रेमळ वातावरण जोपासण्यात केसरीचा हातखंडा आहे. आम्हाला सर्वांना गहिवरून आले. नाती कशी दृढ होतात हयाचा हा छानसा अनुभव!
विज्ञानयुगाचा शानदार आविष्कार – सायन्स् सिटी
दुपारच्या विश्रांतीनंतर लगेचच ‘पॅक अप’ करून सामान ग्रुप लिडरच्या ताब्यात देऊन आम्ही कलकत्त्याचे प्रसिध्द सायन्स सिटी पहाण्यास निघालो. विज्ञानाच्या युगाचा एक शानदार आविष्कार म्हणजे – सायन्स् सिटी! इथे शास्त्राच्या अनेक सिद्धांतांवर आधारभूत गंमतीदार खेळ, सोप्या भाषेत खेळीमेळीने विज्ञान शिकण्यासाठी सायन्स् सिटी सारखे ठिकाण नाही. इथे डायनासोर पासून अनेक प्राणी-पक्षी हयांचा कृत्रिम अनुभव! त्यांच्या अवशेष, अस्तित्वाची माहिती मिळते! आणि गंमत म्हणजे इथे आपल्याला अनुभवता येते स्पेस – शटल् (यान)मध्ये बसण्याचे अनोखे थ्रिल आणि चक्क कृत्रिम भूकंपाचे धक्के सुध्दा ! सर्वात विशेष म्हणजे सायन्स सिटीत प्रवेश सुध्दा ‘रोप-वे’ने करायचा!
सायन्स सिटीहून परस्पर आम्ही पोहोचलो, ‘सियालदाह’ रेल्वे स्थानकावर! संध्याकाळी सव्वा सहाची ‘न्यू जैलपैगुरी’कडे जाणारी रेल्वे होती. जेवणाची पॅकेटस् घेऊन, रसगुल्ले, संदेश हयांची चव जिभेवर रेंगाळवित, ‘सोनार बांगलाचे’ साहीत्य, संगीत, कला आणि तत्त्वज्ञान हयाचे जागोजागी लॅन्डमार्क असणारे रूप साठवत आता गाडी निघाली होती, बंगालच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या हिल स्टेशन- दार्जिलिंग कडे!
क्रमशः
प्रवास वर्ष: सन २००० लेखन संदर्भ: सन २०००
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा