एक अविस्मरणीय अनुभव- ओरिसा, पश्चिम बंगाल आणि नेपाळ सहल

क्वीन्स ऑफ हिल्स – दार्जिलिंग

दि. ०९/०५/२०००:- सकाळीच नऊ वाजता ‘न्यू जैलपैगुरी’ स्टेशनवर पोहोचलो. तिथे आम्हाला दार्जिलिंगपर्यंत नेण्यासाठी मिनी- लक्झरी बसेस तयारच होत्या. सिलीगुडीपर्यंत हवेत उष्मा जाणवत होता. सिलीगुडीहून पुढे निघाल्यावर मात्र सोबत होती, मंद थंडगार हवेच्या रेशीम स्पर्शाची, चिमुरड्या टॉय ट्रेनच्या रूळांची अन् गर्द हिरवी वनराजी, जागोजाग बहरलेले चहाचे हिरवेगार मळे! सारं काही मनमोहक! घाट वळणांचे रस्ते, नागमोडी वळणे आणि हिरव्या गार वृक्षराजीत लपंडाव करणारी चिमुकली रेल्वे! मध्येच पावसाने गाठले. वाहनांचा वेग मंदावला. एके ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलो. एका वेळी एकच वाहन जाईल इतके अरूंद रस्ते! येथील ड्रायव्हर लोकांची खरी कमाल!

दुपारी दोनच्या सुमारास थंडगार हवेच्या नैसर्गिक सौंदर्याने ओतप्रोत नटलेल्या हया ‘क्वीन्स् ऑफ हिल्स स्टेशन’ला म्हणजे दार्जिलिंगमधे पोहोचलो. कंचनजंगा पर्वतांच्या छायेत समुद्रसपाटीपासून ७००० फूट उंचीवर वसलेले हे दार्जिलिंग! सभोवतालची हिमाच्छादित शिखरे, फर, पाईन वृक्षांची घनदाट जंगले, नानाविध प्रकारची रंगीबेरंगी फुले जणू पृथ्वी वरील नंदनवन!

दार्जिलिंगच्या नावाबाबत अनेक आख्यायिका आहेत. काही जण म्हणतात की, बौद्ध भिक्षुकांच्या धर्मशाळेवरून हे नाव पडले. दार्जिलिंग म्हणजे दोर्जे हयांचे ठिकाण, लामांचा प्रदेश! तर काही जणांच्या मतानुसार दार्जिलिंग हया नावाचा उगम तिबेटीयन आहे. तिबेटींच्या समजुतीप्रमाणे इंद्राचे शस्त्र हया जागी ठेवले होते. म्हणून दार्जिलिंग- दोर्जे लिंगचे अपभ्रश्ट रूप! पण संस्कृत वाङमयानुसार कैलास राणा-शिवशंभोच्या कृपा छत्राखाली असलेले हिमालयीन पर्वतांचे साम्राज्य- म्हणजे दार्जिलिंग!

दार्जिलिंगला दुपारी पोहोचल्यावर हॉटेल ‘हयूमा’ मध्ये आपापल्या रूम ताब्यात घेऊन आंघोळ वगैरे आटोपून घेतली. गरमागरम जेवण घेऊन विश्रांती घेतल्याने खूपच ताजेतवाने वाटले. संध्याकाळी दार्जिलिंगच्या बाजारपेठेत फेरफटका मारायचा कार्यक्रम ठरला. दार्जिलिंग मॉल रोड संध्याकाळच्या वेळी फारच गजबजलेला असतो. खूप पर्यटक खरेदीसाठी गर्दी करतात. तिबेटी लोकांनी बाजारपेठेत ठिकठिकाणी आपले स्टॉल लावलेले आहेत. थोडीफार घासाघिस करून कपड्यांपासून ते विविध वस्तू इथे हौशी लोकांसाठी उपलब्ध होतात. आम्ही उबदार स्वेटर्सची खरेदी करून मार्केट फिरत असतानाच जोरदार पावसाने गाठले. अनपेक्षितपणे बदलत राहणारे हवामान हीच हिमालयाची ओळख! बाजारपेठेतून फिरतानाच सामान्य जनजीवनाची तोंडओळख देखील होते. इथे नेपाळी, लेपचा, भूतिया, नेवार, मगर इत्यादी विविध जमातींचे लोक राहतात. पर्यटन व्यवसायावरच हे जनजीवन प्रामुख्याने अवलंबून असलेले जाणवते. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे लोक फार कष्टाळू आणि स्वभावाने प्रेमळ आणि मृदु असतात. विशेष म्हणजे सांस्कृतिक कलांमध्ये विशेष रस असलेले! संगीत आणि नृत्य त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक! पावसाने चांगलाच जोर धरल्याने नाइलाजास्तव हॉटेलवर परतलो.

टायगर हिल                      

दि. १०/०५/२०००:– दार्जिलिंग शहरापासून ११ किलोमीटर अंतरावर समुद्र सपाटीपासून सुमारे २५९० मीटर उंचीवर एक सुंदर स्थळ आहे. सकाळी पहाटे साडेतीन वाजता उठून, गरम कपड्यांच्या पूर्ण बंदोबस्तात आम्ही टायगर हिल कडे निघालो, सूर्योदय पाहाण्यासाठी! हवेतला स्वच्छ आणि शुद्धपणा लगेचच जाणवत होता. येथील सूर्योदय हा अगदी श्वास रोखून धरणारा असतो असे ऐकले होते. एका बाजूने क्षितिजावर येणारा रविराज विरुद्ध बाजूस सर्व दूर पसरलेल्या हिमाच्छादित पर्वत श्रेणींवर आपल्या सहस्त्र रश्मीच्या किरणांचा वर्षाव करीत आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतो. निसर्गाच्या हया मनमोहक आविष्काराने मन अगदी अचंबित होते. पापण्या मिटण्याचा अवकाश! बर्फाच्छादित गिरी शिखरे झरझर शेंदरी, कुसुंबी, रूपेरी असे विविध रंग बदलत कोवळ्या ऊनात प्रकाशमान होतात. अतिशय अवर्णनीय असे हे दृश्य असते! हया टायगर हिलवरून आपल्याला जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट सुध्दा दिसते. कंचनजंगा पर्वतश्रेणींमधील काबरू, जानू पर्वत शिखरांवर पडणारी सूर्य किरणे जणू सुवर्णाचा अभिषेक करत असल्याचा भास होतो.

पण गंमत म्हणजे इथेही नशीबाची साथ हवी! निसर्ग राजा कधी हूल देईल सांगू शकत नाही. आता छान विलोभनीय सुर्यकिरणांचे रंगाचे खेळ पहावयास मिळतील असे वाटत असतानाच ढग भरून येतात आणि ‘दिनकर’ त्या ढगांआडून क्षितिजावर विराजमान कधी होतो हे कळतही नाही! आपण पहात राहतो हिमाच्छादित शिखरांच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या सर्व दूर पसरलेल्या पर्वतरांगा! रवि किरणांचे ते विलोभनीय दृश्य पाहून आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. हॉटेलवर परतताना दोन पर्यटन स्थळांना भेट द्यायची होती!

घुम मोनेस्ट्री

टायगर हिलवरून परतताना घुम मोनेस्ट्री जवळ थांबलो. दार्जिलिंग पासून १५ किलोमीटर दूर ७९०० फूट उंचीवर घुम गाव आहे. या दरी-खोऱ्याला ‘बालसन’ असेही म्हटले जाते. येथील बौद्ध मोनेस्ट्री पाहण्याजोगी आहे. येथे १५ फूट उंचीचा बुद्धाचा बैठा पुतळा आहे. हया मोनेस्ट्रीमध्ये तिबेटीयन मुलांना लहानपणापासून धार्मिक आचार-विचारांचे प्रशिक्षण दिले जाते. हया मोनेस्ट्रीमध्ये पाम वृक्षाच्या पानांवर तिबेटीयन भाषेत लिहिलेले दुर्मिळ साहीत्य जतन केलेले आहे. तेथील वातावरणाचे पावित्र्य आणि एक गूढ शांततेचा मनोमन आनंद घेऊन आम्ही खाली उतरून बत्तासिया लूपकडे निघालो.

बत्तासिया लूप

घूमनंतर लगेचच खाली उतरल्यावर साधारणतः दार्जिलिंग पासून ५ किलोमीटर अंतरावर आहे- ‘बत्तासिया लूप’  – An engineering Marvel and Feat! इथे कळत नकळत रेल्वे वर्तुळाकार फिरून टेकडीला वळसा घेते. पूर्वी दार्जिलिंग स्टेशनवर रेल्वेचे इंजिन फिरून येण्यास जागा नव्हती, तेव्हा हया टेकडीला वळसा घालून इंजिन फिरून जात असे. साधारणतः या टेकडीवरून १००० फूट खाली रेल्वे उतरून येते. हया घाटातून दिसणारे निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. आजूबाजूला झरे, धबधबे आणि विविध रंगी फुले सकाळच्या वातावरणात आपल्या चित्तवृत्ती खचितच मोहून टाकतात. आता बत्तासिया लूपला ‘शहीद स्मारक’ (वॅार मेमोरियल) बनविले आहे. वॉर मेमोरियल – बत्तासिया लूपच्या टेकडीवरून दिसणारे निसर्ग सौंदर्य नक्कीच कॅमेऱ्यात टिपण्याजोगे आहे. येथे फोटोग्राफीचा आनंद लुटला. येथील वैशिष्ट्य म्हणजे येथील स्थानिक, तिबेटीयन लोक आपल्या कलाकुसरीच्या वस्तू जसे बॅग्ज्, पर्स वगैरे वाजवी दरात विकत असताना आढळतात. येथील फुलांच्या शहरात रेल्वे ट्रॅकवरून भटकंती करताना नक्कीच ‘आराधना’ मधील ‘मेरे सपनों की रानी’ आठवते! आराधना सिनेमाचे  चित्रीकरण हया ठिकाणी झाले होते. बत्तासिया लुप पाहील्यावर आम्ही आमच्या हॉटेलावर नाश्ता-आंघोळीसाठी परतलो. सकाळच्या स्वच्छ निर्मळ वातावरणाचा नैसर्गिक आनंद अनुभवताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, ती म्हणजे पर्यटकांची ये-जा करण्यासाठी असलेली जीप-वाहने त्यांचा धूर ओकून हया पहाट वाऱ्याचा सुगंध आणि स्वच्छ हवा प्रदूषित करून भ्रमनिरास करतात.

हिमालयीन माउंटेनिअरींग संस्था

सकाळच्या शुद्ध हवेचा ताजेपणा मनात घेऊनच सर्व विधी उरकले. अंघोळ नाश्ता करून माऊंटेनिअरिंग संस्था पाहाण्यास गेलो. दार्जिलिंग रहिवासी- तेनसिंग नोर्गे हयाने एडमंड हिलेरी हयाच्या बरोबर एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केल्यानंतर १९५४ मध्ये हया संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या प्रवेश व्दारावर गिर्यारोहण करणा-या गिर्यारोहकांच्या प्रतिमा दगडांमध्ये कोरलेल्या आहेत आणि सार्थ घोष वाक्य लिहिलेले आहे- ‘May you climb every Peak to Peak’! हे दोन यशस्वी गिर्यारोहक आणि नेहरू हया संस्थेचे संस्थापक सदस्य होते. जवाहर पर्वतावर असलेल्या हया प्रशिक्षण संस्थेत बेसिक कोर्स, गिर्यारोहणाचे धडे देणारी शिबिरे अश्या प्रकारचे उपक्रम राबविले जातात. सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्रे दिली जातात.

इथे एक सुंदर संग्रहालय सुध्दा आहे. तिथे तेनसिंग मोहिमांचे फोटो, त्यांनी वापरलेले साहीत्य, झेंडे, मिळालेली पारितोषके संग्रही ठेवलेले आहेत. विविध प्रकारची उपकरणे, दोर- गाठींचे प्रकार, बर्फातील बूट, अंकर वगैरे संग्रही आहेत. त्याबरोबरच गिर्यारोहण करीत असताना कोणत्या प्रकारचे हलके फुलके खाद्यपदार्थ न्यावे हयाची देखील माहिती निदर्शनास येते. हे संग्रहालय पाहात असताना गिर्यारोहण म्हणजे काय? आणि तो खरंच किती थरारक व चित्तवेधक अनुभव असू शकतो हयाची चांगलीच कल्पना येते!

पद्मजा नायडू झूओलॉजीकल पार्क

गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेच्या बाजूसच लागून आहे हे छान प्राणिसंग्रहालय! जिथे निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला अनेक प्राणी नैसर्गिक रित्या स्व‍च्छंदी विहार करताना आढळतात. अनेक प्रकारचे दुर्मिळ प्राणी येथे पाहावयास मिळतात. विशेष करून हिमालयातच आढळणारा लाल पांडा हे येथील प्रमुख आकर्षण! स्नो लेपर्ड, सैबेरीयन वाघ हया दुर्मिळ जाती पहावयास मिळाल्या. इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट आढळली, ती म्हणजे इथे विविध जातींमध्ये संकरण करून प्रजननावर अभ्यास केला जातेा.

चहाचा मळा – एक अनोखा आनंद

प्राणिसंग्रहालयातून आम्ही ‘टी इस्टेट’ पाहाण्यास गेलो. दार्जिलिंग आणि चहाचे मळे हे एक पारंपारिक जुळलेले समीकरण! हया चहाच्या विस्तीर्ण पसरलेल्या मळयांचा सुगंध आजूबाजूच्या आसमंतातही दरवळत राहतो. चहाच्या मळयांत पारंपारिक पद्धतीचे पोशाख घालून चहाच्या टोपल्या पाठीवर घेऊन चहाची पाने खुडताना अनेक मजेशीर फोटो काढले. चहाच्या मळयांत काम करणा-या माणसाने चहाच्या प्रतवारीची दिलेली माहिती थक्क करणारी होती. चहाच्या झाडाला तीन पाने वरच्या बाजूस असतात. तीन पानांपैकी मधले सर्वोत्कृष्ट प्रतिचे! तर दुसरे व तिसरे बाजूचे दुसर्‍या दर्जाचे! मधली ए-१ पाने प्रक्रिया होऊन निर्यात केली जातात व अत्यंत महाग असतात. आणि चहा पिकवणा-या भारतीय जनतेच्या वाटेला येतो तो दुय्यम प्रतिचा चाय! त्या चहाच्या मळयांत दार्जिलिंग चहाची (प्रक्रिया न केलेला-ताजा) चव घेतली. आपल्यापर्यंत अगदी प्रोसेसिंग करून येणारा अगदी ‘कडक चहा’ आणि इथल्या चहाची चव अर्थातच भिन्न! जणू चहाचे मळे दार्जिलिंगची साक्ष पट‍वून देण्यासाठी डोंगर उतारावर पाय-यांच्या रचनेने उभे राहीलेले दिसतात. आपली नजर जिथवर पोहोचेल, तिथवर हे विस्तीर्ण पसरलेले हिरवेगार चहाचे मळे वेगळाच आनंद देऊन जातात.

तिथून आम्ही परतीच्या वाटेवर ‘तेनसिंग रॉक’ ला भेट दिली. हया ठिकाणी गिर्यारोहण संस्थांच्या शिबिरार्थीना बेसिक कोर्स मधील रॉक क्लाईंबिंगचे प्रशिक्षण दिले जाते. ज्याला म्हणतात ‘रॅपलिंग’! आमच्या सहलीतील अनेक धाडसी आणि हौशी आबालवृद्ध पर्यटकांनी रॅपलिंगचा अनुभव घेऊन सिद्ध केले की जीवनाचा आनंद अनुभवण्यासाठी वय मर्यादेचे बंधन असूच शकत नाही. एवढी भटकंती केल्यावर थंड हवेत कडाडून भूक लागलेली होती. सरळ हॉटेलवर जाऊन क्षुधाशांती केली. थोडा वेळ विश्रांती घेऊन संध्याकाळी आव्हा आर्ट गॅलरी आणि रॉक गार्डन पाहाण्यास निघालो. आम्हा मंडळींचे पाच-पाच जणांचे ग्रुप करून प्रत्येक ग्रुपला एक अश्या स्थानिक जीप गाडी करून आम्ही आमच्या सहल चालकांसह स्थल दर्शनासाठी निघालो.

आव्हा आर्ट गॅलरी

घुम ते दार्जिलिंगच्या दरम्यान आव्हादेवी हयांची रेशीम भरतकाम, सुंदर तैल चित्रे हया संग्रहालयामध्ये पहावयास मिळाली. अतिशय छोटे खानी अश्या बंगलीवजा घराला आर्ट गॅलरीचे स्वरूप देण्यात आले आहे. मॅडम आव्हा हयांच्या चित्रकलेचे नमुने थक्क करणारे आहेत. केवळ एम्ब्रॉइडरीच्या माध्यमातून चेहऱ्यावरील सूक्ष्मतम भाव साकारलेले पाहून विस्मयाने डोळे थक्क होतात. भरतकामासोबत ऑइल पेंटिंगस् सुद्धा आहेत. परंतु इथे एका गोष्टीचे खचितच दु:ख झाले. इथे व्हीडीओ चित्रीकरण करण्यास परवानगी नसल्यामुळे आठवणींच्या स्वरुपात कला संपन्नता घरी आणण्यास मिळाली नाही. आव्हा देवीच्या काही खास अश्या कलाकृतींच्या चित्रांचे पोस्टकार्ड बनवून विकण्यास ठेवलेली होती. मी सुद्धा काही पोस्टकार्ड विकत घेतली. त्यामुळे ही आर्ट गॅलरी कायम लक्षात राहिली. पोस्टकार्डांमध्ये ‘तिबेटीयन शेफर्ड’, लास्ट क्रीचर, ओल्ड मॅन, वाईज मॅन ऑफ द इस्ट (रविंद्रनाथ) ही थ्रेड पेंटीग्ज् खूपच छान आहेत.

रॉक गार्डन

आव्हा आर्ट गॅलरी पाहून आम्ही अत्यंत नागमोडी वळणे आणि चढ असलेल्या रस्त्यांवरून रॉक गार्डनकडे निघालो. संपूर्ण रस्ता निसर्गरम्य पण अतिशय अवघड घाट वळणांचा आणि चढ उतारांचा होता. जीपगाडी  चढणीवरून जाताना अगदी घट्ट धरून बसावे लागत होते. रॉक गार्डन हे नव्यानेच निर्माण केलेले स्थानिक लोकांसाठी वीकएंडचे पर्यटन स्थळ आहे. छोट्या डोंगराचे बगीचामध्ये रूपांतर केले आहे. दगडांना विविध आकार देऊन, रंगीबेरंगी  फुलांचे ताटवे तयार केले आहेत. आणि हयाला प्राकृतिक सौंदर्याची जोड म्हणून की काय, एक खळाळणारा निर्झर! सुंदर धबधब्याचे तुषार अंगावर घेत, छोट्या सजलेल्या लाकडी पुलांवरून वर चढत, टप्प्या-टप्प्यांची चढण चढून गेलो. खूप फोटोग्राफी केली आणि खरोखरच मनाला हवाहवासा वाटणारा गारवा आणि निखळ निसर्गाचा आनंद लुटून हॉटेल मुक्कामी परतलो. रात्री खेळ, गप्पा, जेवण करून शांत झोपी गेलो. उदया विश्रांतीचा दिवस होता!

दि. ११/०५/२०००:- आज विश्रांतीसाठी मोकळा वेळ होती. परंतु त्या शुद्ध हवेत चित्तवृत्ति इतक्या समाधानी होत्या की, लवकरच पाच वाजता जाग आली. खिडकीबाहेर उजेड दिसला. अंथरुणातून उठून कॅमेरा हातात घेऊन थेट हॉटेलची गच्ची गाठली. आणि इतका आनंद झाला, सभोवतालचे दृश्य पाहून! वर्णनच करू शकत नाही. हा आनंद प्रत्यक्ष डोळ्यांनीच लुटावा! टायगर हिलवरून मनाजोगता सूर्योदय पहावयास मिळाला नाही, तर थेट भल्या पहाटे आपल्या उंच हॉटेलची गच्ची गाठावी आणि खरंच कवितेसारखे दार्जिलिंग आपल्या दृष्टीपथास पडते.

बर्फाच्छादित पर्वत शिखरे, कोनीफरस् वृक्षांची वनं, पक्ष्यांचा किलबिलाट, फुला-पानांनी लगडलेलं वृक्ष वैभव, छोटे छोटे बाजार, सुंदर घरं, जंगल आणि बाग-बगीच्यांनी नटलेले हे शहर! कंचनजंगा पर्वत शृंखलांच्या कुशीत वसलेले दार्जिलिंग सहजच ‘हिल स्टेशनची राणी’ हा किताब पटकावून जातं. समुद्र्रसपाटीपासून  ७००० फूट उंचीवर सूचिपर्णी वृक्षांच्या घनदाट जंगलांनी सजलेले व रौप्य तराणा गाणाऱ्या पर्वत शिखरांनी वेढलेलं दार्जिलिंग मला त्या गच्चीवरून जणू एका अर्थाने जगाच्या माथ्यावरच वसलेले आहे का? असा आभास झाला. हॉटेलच्या गच्चीतून सुंदर दर्शन झाले ते धीरधाम मंदिराचे! नेपाळच्या पशुपतिनाथ मंदिराच्या धर्तीवर आधारित हया मंदिराची रचना आहे. दार्जिलिंग स्टेशन जवळच हे हिंदूचे उठावदार मंदिर आपली नजर सहजच आकर्षित करून घेते. जवळच दार्जिलिंगची टॉय ट्रेन स्टेशनमध्ये दिमाखात उभी होती. जशी दिनकराची चाहुल लागत होती, तसे चटकन शुभ्र पर्वतांचे रंग विस्मयकारकरित्या बदलत होते. हळूहळू सहस्त्ररश्मिच्या कोवळ्या किरणांनी त्या गूढ नीरव शांततेचा भेद होत होता. मनाला नाद लावणारी पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. मा‍झ्या डोळ्याचे जणू पारणे फिटले. कॅमेरावरचा हात सुटत नव्हता. एकेक दृश्य व्हीडीओ टेपमध्ये मी बंदिस्त करण्याचा प्रयत्न करीत होते. तो अनुभव खरंच आल्हाददायक आणि अविस्मरणीय होता. हॉटेलच्या गच्चीतच अनेकविध रंगांची, जातींची  फुले लागवड केली होती. हया प्रदेशात सुमारे ४००० विविध जातींच्या फुलांची लागवड केली जाते. खरोखरच दार्जिलिंग हे निसर्ग वेड्या माणसांसाठी स्वर्गच आहे. हया निसर्गाचा रंगतदार गंमतीचा अनुभव घेताना एक तास कसा गेला समजलेच नाही. चहाची आठवण झाल्याने खोलीवर परतले.

आज मोकळा दिवस होता. आम्हा सर्वांचा कॅलिंगपोंग व गंगटोक पाहून येण्याचा विचार होता. परंतु आज पूर्ण दार्जिलिंग बंद होते. काही राजकीय निर्णयाचा निषेध म्हणून पूर्णतः बंद पाळण्यात आला होता. ट्रान्सपोर्टपासून माल रोड वरील शॉपिंग मॉल देखील बंद! हया सर्वव्यापी बंदने आमची निराशा केली. परंतु आम्ही उत्साही मंडळी स्वस्थ बसलो नाही. अंघोळ, नाश्ता आटोपून निघालो दार्जिलिंगची पायी भटकंती करण्यास! मॉल रोड चढून गेल्यावर ‘महांकाल’ मंदिर दिसले. तिथे टेकडी सदृश भागात घनदाट वृक्षराजीमध्ये शंकर, हनुमान, गणपती व काली माता इत्यादि देवतांची मंदिरे पाहीली. जनजीवन पूर्णतः ठप्प होते. दार्जिलिंग नगरपालिकेची वास्तु पाहून ब्रिटिशांचे अवशेष कोणत्या ना कोणत्या रूपाने शिल्लक असलेले जाणवले. दार्जिलिंग महानगरपालिकेची वास्तु साक्षात् ब्रिटीश साम्राज्याचे अवशेष स्वरुपात उभी होती. एकूणच काय, पायी भटकंती करताना एखाद्या ठिकाणची विशिष्ट जीवन पद्धती, संस्कृती, राहणीमान,  निसर्ग वैभव हयाचा परिचय अगदी जवळून होतो. ह्या पायी भटकंतीने मनाच्या सांदीकोपर्‍यात  हे छोटेखानी रम्य शहर विराजमान झाले!

सूर्य माथ्यावर येईपर्यंत पायी भटकंती करून जठराग्नि प्रदीप्त झाल्याचे लक्षात येताच आमच्या हॉटेल हयूमाकडे परतलो. थेट डायनिंग हॉलकडे मेार्चा वळविला. जेवण करून विश्रांती घेतली. संध्याकाळचा वेळ मोकळाच होता. संध्याकाळी पुनः एक छोटा पायी भटकंतीचा आनंद घेऊन हॉटेलवर परतलो. नंतर ग्रुप-गेम्स्, गाणी-गप्पा हयामध्ये मजेत वेळ गेला. संध्याकाळच्या जेवणाचे वेळी आम्हाला पुढील प्रस्थानाच्या सूचना मिळाल्या. पुढचा टप्पा होता…. मिरिक मार्गे नेपाळ! एकमेव चिमुकले हिंदू राष्ट्र!  

क्रमशः

प्रवास वर्ष: सन २००० लेखन संदर्भ: सन २०००


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

पृष्ठे: 1 2 3 4 5

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑