एक अविस्मरणीय अनुभव- ओरिसा, पश्चिम बंगाल आणि नेपाळ सहल

चिमुकले हिंदू राष्ट्र-नेपाळ!

मिरीक स्थल दर्शनानंतर दुपारचे जेवण घेऊन आता ख-या अर्थाने आम्ही सीमा पार जाण्यासाठी प्रयाण केले. मिरीक पासून दोन-अडीच तासांनी खाली उतरून आपल्या पश्चिम बंगालमधील सिलीगुडीच्या दिशेने नेपाळच्या सीमेकडे आमचा प्रवास सुरू झाला. हवेत आमूलाग्र बदल झाला. गारवा पार नष्ट होऊन उष्मा हैराण करू लागला. दुधिया गाव पार केल्यावर तर हवेत असह्य उकाडा जाणवू लागला. परंतु मनात खूप उत्सुकता होती, सोळा वर्षापूर्वी पाहीलेले निसर्गरम्य नेपाळ नजरेसमोर तरळू लागले. आणि आता पुन्हा एकदा नेपाळ भेट होणार होती!

एव्हाना आम्ही आपली भारताची सीमा ‘पाणीटंकी’ येथे पोचलो होतो. इथे सर्व कस्टमचे औपचारिक तपासणी वगैरे पार पाडून आम्ही कूच केले सीमा पार! अगदी काही मिनिटांच्या अंतरावरच सुरू झाले आपले शेजारी मित्र राष्ट्र ‘नेपाळ’! संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास आम्ही चहासाठी थांबलो ते थेट नेपाळचे प्रवेशद्वार ‘काकडबिट्टा’ येथे! जेथून नेपाळची हद्द सुरू होते. काकडबिट्टा, इटाबिट्टा, लक्ष्मीपूर, दुर्गापूर, चारपाने इत्यादी गावे ओलांडत रात्रभर प्रवास केला. प्रवासात हवेतील उष्मा असह्य होत होता.

निसर्गरम्य पोखरा

सकाळी पोखरा काही अंतरावर असतानाच जाग आली. दऱ्या-वळणांचे रस्ते, नद्या, भात-शेती, समृद्धीचे प्रतीक असलेला निसर्गाचा हरित रंग अन् डोंगर कपारीत वसलेली नेपाळी लोकांची लहान गावे नजरेस पडत होती. परंतु सर्वसाधारणपणे ग्रामीण भागात आर्थिक दुर्बलता दिसून येत होती. आपल्या भारतात गुरख्याची नोकरी करणारे बहादूर नेपाळी जन नजरेसमोर आले.

पोख-याला पोहोचल्यावर आनंदास पारावारच उरला नाही. ज्या ठिकाणी आमचं वास्तव्य होतं- ‘हॉटेल न्यू क्रिस्टल’ त्याची पार्श्वभूमीच काहीशी मंत्रमुग्ध करणारी होती. अन्नपूर्णा रेजेंस् डोळ्याचे पारणे फेडीत होत्या अन् त्यातच सुंदर छानसं हे हॉटेल! ज्याला हिरवीगार हिरवळ आहे, मोठा परिसर आहे, जिथून सर्व हिमाच्छादित शिखरांचा अगदी मनमुराद आनंद लुटता येत होता. आम्ही प्रत्येकांनी आप-आपल्या आरामदायी अद्ययावत सोयींनी परिपूर्ण अश्या रूमस् ताब्यात घेतल्या. चहा आला. चहा घेताना रूमच्या उंचच उंच अश्या काचेच्या तावदानातून दिसणारे निसर्गाचे मनोरम दृश्य वेड लावीत होते. आकाशाकडे नजर उंचावताच ढगांशी लपाछपी करणाऱ्या अन्नपूर्णा पर्वतरांगा दिसत होत्या तर खाली नजर वळवल्यावर रंगीबेरंगी फुलांचा पेहराव ओढून हिरव्यागार वस्त्रांचे अलंकार लेवून धरणीमाता नव्या युवतींसारखी शृंगार करून प्रसन्न चित्ताने उभी होती. प्रवासाचा शीण कुठे नाहीसा झाला कळलेच नाही. स्वच्छ ताजेतवाने होऊन  फेरफटका मारण्यास गळ्यात कॅमेरा लटकवून रूमबाहेर पडले.

नेपाळचे प्रामुख्याने तीन भाग पडतात. हिमालयीन प्रदेश, माउंटन (पर्वतीय) प्रदेश आणि तराई प्रदेश! हिमालयीन प्रदेशात हिमाच्छादित पर्वत रांगा आहेत. जगातील अत्युच्य चौदा शिखरांपैकी आठ नेपाळमध्ये आहेत. त्यात एव्हरेस्ट/ सागर माथा हे पहिल्या क्रमांकाचे ८८४८ मीटर उंचीचे शिखर आहे. पोख-याला मिनी स्वित्झर्लंड आणि लेक सिटी सुध्दा म्हटले जाते. हा नेपाळमधील अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे. हिमाच्छादित शिखरांनी आणि हिमनद्या वितळून तयार झालेल्या तळ्यांनी इथल्या सौंदर्यात विशेषच भर टाकली आहे. हॉटेल मधून परिसराचे अवलोकन करत असतानाच लक्षात आले की, हॉटेल शेजारीच पोख-याचे डोमेस्टीक विमानतळाची धावपट्टी आहे. सतत विमानांची ये-जा चालू होती. हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायऱ्या लगतच रस्ता आणि त्यापलीकडे विमानतळ! रस्त्यांवरून सुंदर गाड्यांची ये-जा चालू होती. टोयाटो, कोरसा, जुनी मर्सिडीज हया गाड्या इथे टुरिस्ट टॅक्सी म्हणून वापरल्या जातात. पायी पायी दोन-एक किलोमीटर भटकंती केल्यावर पोख-याचे स्वरूप लक्षात येतं. हे एक गाववजा शहर आहे. फेवा लेकच्याकडे जाणा-या रस्त्यांवर बहुतेक हॉटेल्स-मोटेलसची रेलचेल जाणवते. न्यू क्रिस्टल हॉटेल कडून वरच्या दिशेने पोख-यातील बाजारपेठ आहे. आणि खालच्या अंगाला फेवा लेककडे जाणारा रस्ता! आमच्या हॉटेल लगतच एअर पोर्ट आणि त्याच्या समोरील सर्व हिमाच्छादित शिखरांचा भाग असे पोख-याचे दृश्य!

दुपारी जेवण आणि वामकुक्षी झाल्यावर खूप प्रसन्न वाटले. हवा एकदम स्वच्छ झाली होती. सूर्याची मावळती किरणे समोरील हिमाच्छादित पर्वत शिखरांवर सुवर्ण केसरी रंगाचा वर्षाव करीत होती. हिमालयाची हिमालचुली, धवलगिरी, माछा पुछरे (फिश टेल)पर्वत हया सोनेरी किरणांमध्ये मुग्ध होऊन सूर्य देवतेला निरोप देत होते.

संध्याकाळी खास आम्हा केसरी ट्रॅवलच्या पाहुण्यांसाठी नेपाळी लोकनृत्याचे आयोजन केलेले होते. स्थानिक लोकांच्या समूहाने आमच्या हॉटेलच्या आवारात लोकनृत्याचे, लोकसंगीताचे विविध प्रकार सादर केले. नेपाळी स्त्रियांचा आनंदोत्सव, समूह नृत्य, जन्मोत्सव अशी प्रासंगिक मगर जातीमध्ये होणारी विविध नृत्ये करून प्रेक्षकांनाही आपल्या नृत्यात सहभागी करून घेतले. विशेष म्हणजे ही नृत्ये सादर करणारे कलाकार दुसरे-तिसरे कोणी नसून हॉटेल क्रिस्टलमधे कार्यरत असणारे स्थानिक कर्मचारीच होते. जे समूहाने लोक कलांचे सादरीकरण करत असत.

पोखरा- स्थल दर्शन

सकाळी नाश्त्यानंतर आम्ही ‘‘फेवा लेक’’ आणि त्यामध्ये बेटांवर असलेले ‘बराही मंदिर’ पाहण्यासाठी गेलो. फेवा म्हणजे स्वच्छ! स्वच्छ हया अर्थाने की, हयामध्ये सभोवारच्या हिमाच्छादित शिखरांची पाण्यात प्रतिबिंब पाहावयास मिळतात. परंतु दुर्देवाने पर्यटकांच्या अनास्थेमुळे फेवा लेकचे पाणी अधिकाधिक दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तळ्याच्या मध्यभागी बराही मातेचे मंदिर आहे. हया मंदिरातील देवी बारा महीने नवसाला पावणारी म्हणून तिचे नाव ‘बराही’ असे समजले. तळ्याच्या काठांवरून पर्यटकांना आकर्षण असलेली लॉज, रेस्टॉरंट ,चांदीचे, धातूचे, खडया- मण्यांचे दागिने विकणार्‍या तिबेटीयन स्त्रीया नजरेस पडतात. हया फेवा लेक मधला बोटींगचा अनुभव अनोखा आहे. हया फेवा लेकच्या बेटावरून दिसणारे दृश्य फार मनोहरी वाटते. चौफेर विस्तीर्ण पाणी, झाडी, दूर वर हिम शिखरे अन् लेकच्या पाण्यात पडलेली त्या हिमशिखरांची सुस्पष्ट प्रतिबिंबे, थंडगार वारा, झाडांची सळसळ आणि उडणारे पक्षांचे थवे! असा धुंद आसमंत !

फेवा लेक वरून आम्ही भेट दिली ‘‘तिबेटीयन रिफ्युजी कॅम्पला’’! तिबेटीयन निर्वासितांच्या खास विकासासाठी असलेले हॅन्डीक्राफ्ट सेंटर! इथे हातमागावर तयार केलेले गालीचे, पर्स, शाली इत्यादि वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. बाहेरच विविध खडे, मणी, लाकूडाची, दगडांची कारागिरी केलेल्या वस्तू विकणार्‍या तिबेटीयन स्त्रीया आपापल्या परीने ग्राहकांना खरेदी करण्यासाठी आमंत्रित करतात.

गुप्तेश्वर महादेव गुंफा-

श्वेती नदीच्या काठावर साधारणतः शंभर पाय-या उतरून खाली जावे लागते. गुहेमध्ये शंभू महादेवाचे मंदिर आहे. आम्ही गेलो तेव्हा गुहेमध्ये डागडुजीचे काम चालू होते. दगडांमधून पाणी झिरपत होते. गुहेत निरव शांतता आणि प्रसन्न वातावरण वाटले. तिथून नंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे ‘‘देवीज् फॉल्स’’- स्थानिक भाषेत हयाला ‘‘पानाल छांगो’’ असे म्हटले जाते. हया धबधब्याचे एक वैशिष्ट्य असे की, फेवा लेकचे पाणी जमिनीखालून इथे येते. कुठून येते? कसे येते ? ते काहीच कळत नाही पण अचानक धबधब्याच्या रुपात दृश्य मान होते आणि टेकडीवरून खाली कोसळते. हया धबधब्यासंबंधी तिथे एक कथा लिखित आहे ती अशी; सुमारे पन्नास वर्षांपूर्वी एक प्रेमी युगुल इथे आले होते. त्यामधील ‘देव्हीन’ नावाची तरूणी जेमतेम पोहता येत असल्याने अचानक फेवा लेककडून पूराचा जोरदार प्रवाह आल्याने त्यात वाहून गेली. तिची आठवण म्हणून या धबधब्याला ‘‘डेव्हीज फॉल्स’’ असे नाव दिले आहे. हया धबधब्याचे उगम आणि निर्गम लक्षात आला नाही तरी, धबधब्यांच्या चिरतरूण तुषारांवर तयार झालेले सप्त रंगांचे मनोहरी इंद्रधनुष्य मात्र निश्चितच कॅमेरामध्ये टिपण्यासारखे होते.

विंध्यवासिनी मंदीर –

एक उंच टेकडीवर विंध्यवासिनी मातेचे मंदिर आहे. हिंदूस्तानातील विंध्यपर्वतावर स्थित हया देवी मातेची पूजा अर्चा, तपश्चर्या करून साधू-ऋषिनी  तिला आव्हान केले व हया तपस्वींनी राक्षसांच्या उपद्रवापासून अभय मागीतले. तेव्हा देवी मातेने हया ठिकाणी तपस्वीना अभय देऊन दर्शन दिले असे सांगीतले जाते. उजव्या बाजूला गणेश, लक्ष्मी, शंकर हयांची सुध्दा मंदिरे आहेत. हया ठिकाणी मंगळवार – शुक्रवार हया दिवशी देवीला बकरी किंवा कोंबडीचे बळी दिले जातात. इथून परतताना अन्नपूर्णा शिखरावरून वाहत येणारी हिमनदी ‘‘ श्वेती’’ नदीचे नाम धारण करून वाहताना दिसते. पांढ-या शुभ्र रंगाचा जोरदार खळाळणारा प्रवाह वाहताना पाहावयास मिळतो. महेंद्र पुलाजवळ हे दृश्य पहायला मिळते. हिमालयात उगम पावणारी ही नदी किंबहुना चुनखडीच्या साठ्यांमधून प्रवाही असावी म्हणून ही दुधाळ रंगाची सफेद, नेपाळी सेती (श्वेती) नदी!

पोख-यामध्ये हया गोष्टीव्यतिरिक्त दुसरे स्थल दर्शनार्थ काही नसले तरी निसर्ग नक्कीच अनुभवण्यासारखा आहे. पोख-यामध्ये कुठूनही दृश्यमान होणारी चमचमती अन्नपूर्णा, धौलगिरी, फिशटेल हिमशिखरे! गिरीभ्रमण, पदभ्रमण प्रेमींना साद घालणारी पर्वतशिखरे हेच इथलं खरं वैभव आहे. अन्नपूर्णा शिखरांनी वेढलेल्या नद्या, तळ्यांच्या नैसर्गिक सहवासातले ते पोखरा व्हॅलीतले काही दिवस पाखरांसारखे उडून गेले, पण मनचक्षुंसमोर त्यांचे विविध रंग, सोनेरी- चंदेरी रंगाची उधळण हयाची स्मृती मागे ठेवूनच! ख-या अर्थाने मन शांत आणि प्रसन्न झाले.

अन्नपूर्णा हिमशिखरांवर अद्याप कोणीही यशस्वी चढाई केलेली नाही. फिशटेल- माछापुछारे हया पर्वतांना येथील लोक देवाप्रमाणे मानतात. येथे गिर्यारोहणास कोणीही जात नाही. अर्थातच निसर्गाने आपल्यावर अंकुश ठेवलेला आहे. आपण त्याच्या अधीनच आहोत. अन् हयातच हया निसर्गाशी तादात्म्य पावण्याचा आनंद आहे.

काठमांडू-

सकाळीच नाश्त्यानंतर लवकरच आम्ही काठमांडूकडे जाण्यास निघालो. बंद पापण्यांमधे इथले निसर्गरम्य वातावरण, फेवा लेक, चमचमणारे माछापुछारे शिखर, हिरवाईने नटलेला निसर्ग, रंगीबेरंगी फुले, शीतल सुखद हवा यांची रोमहर्षक जाणीव घेऊन निघालो-नेपाळच्या राजधानीकडे ‘‘काठमांडूला’’! अतिशय कठीण अश्या वळणदार घाट रस्त्यांचा मार्ग आपल्याला प्रवासात दर्शन घडवून आणतो त्रिशूली आणि मर्सिंदी नदीचा संगम! काठमांडू जवळ येत असताना हिरवे आणि काळसर पाणी एकत्र होऊन पुढे ‘नारायणी’ नदीच्या रूपाने वाहू लागते. हयाच नदीच्या पाण्यावर पोखरा-काठमांडू रस्त्यावर काठमांडू जवळ जपानने हायड्रो-इलेक्ट्रिक प्रोजेक्ट उभारलेला दिसून येतो. थोड्याच अंतरावर (रोप वे) सेवा दिसून येते. संध्याकाळी चार ते पाच वाजताच्या दरम्यान काठमांडू येथील ‘हराती’ हया आमच्या मुक्कामी हॉटेलावर पोहचलो.

नेपाळ हे आपले शेजारी हिंदू राष्ट्र- गौतम बुध्दाच्या जन्मस्थळामुळे- लुंबिनी साठी प्रसिध्द असणारे हे नेपाळ! जगाच्या नकाशावर उत्तरेला तिबेटची सीमा, पूर्वेकडे सिक्किम, पश्चिमेकडे बंगाल व उत्तर प्रदेश तर दक्षिणेला बिहार राज्य अश्या रेखाटनातून तयार झालेले हे नेपाळ राष्ट्र! नेपाळ म्हणजे पर्वत शिखरांचा प्रदेश! नेपाळचा स्वत:चा असा एक इतिहास आहे. गोपाळ, किरा‍त, अभोर लोक हे नेपाळचे मूळ रहिवासी! नंतर ठाकुर व मल्ल राजे होऊन गेले. आता इथे राजा विक्रम सिंह यांचे लोकशाही राज्य आहे. या चिमुरड्या राष्ट्राने आता बरीच प्रगती केली आहे. येथील बहुसंख्य महत्त्वाची शहरे विमान सेवेने जोडलेली आहेत. विराट नगर, जनकपूर ही शहरे रामायण- महाभारताशी अर्थातच भारतीय पौराणिक वाङमयाशी संबंधित आहे. नेपाळ मधून जगातील सर्वोच्च पर्वत शिखरांचे – एव्हरेस्ट, कंचनजंगा, अन्नपूर्णा, धौलगिरी, मनालू हया उत्तुंग गिरी शिखरांचे दर्शन होते. नेपाळ म्हणजे हिंदू- बौद्ध संस्कृतींचा मिलाफ आहे. पुरुषोत्तम रामाची सीता-जानकी ही नेपाळ कन्याच!

नेपाळ हा ‘ट्रेकर्स पॅरेडाईज’ म्हणून ओळखला जातो. इथे हिमाच्छादित पर्वत शिखरे, हिरवाईने नटलेली विस्तीर्ण कुरणे, अल्पाइन फुलांचे ताटवे, जंगले, खेडी, छोट्या टेकड्या पक्षी वन्य प्राणी निरीक्षण,स्तूप, बौध्दमठ मंदिरे हयांपैकी जे काही आवडीचे वाटेल ते पाहात भ्रमंती करता येते. चितवन व्हॅलीत रिव्हर राफ्टिंगचा आनंद लुटता येतो. थरारक चितवन जंगल सफारी देखील अनुभवता येते. नेपाळी लोक हे अत्यंत उत्सव प्रिय आहेत. प्रत्येक उत्सवाचे वेळी लोकनृत्यांमध्ये लोक गीतांमध्ये रमणारे हे पारंपारिक ब्राम्हण, ठाकुर ,गुरूंग, मगर, सुनुवार, राजवंशी अश्या विविध जातीचे हे लोक इथे एकोप्याने नांदत आहेत. कुमारी माता हे एक नेपाळचे वैशिष्ट्य आहे. दरवर्षी बौद्ध जमातीमधील एका कुमारी देवीची निवड होते. तिची पूजा करून रथातून मिरवणूक काढतात. सामान्य जनतेपासून राजापर्यंत सर्वांना ती पूजनीय वंदनीय असते. तिची पूजा -निवड झाल्यावर तिने आपले नात-गोत घर सोडून कुमारी मंदिरात रहावयाचे असते. हे लाकडी कोरीव कामाने नक्षीदार असे सुंदर मंदिर आहे. ही कुमारी देवी माता वयात आली की दुसर्‍या कुमारी मातेची निवड होते. थोडक्यात देवदासींच्या प्रथेशी मिळता-जुळता अनुभव!  काठमांडू व्हॅलीमधे काठमांडू, पाटण (ललितपुर) आणि भक्तपूरचा समावेश आहे. ही तीनही इतिहास प्रसिध्द नगरे आहेत. येथील दरबार चौक, मंदिरे, बाजारपेठा यांची रचना सारखीच आहे. काठमांडूमधे जुन्या व नव्या संस्कृतीचा संगम आढळतो.

काठमांडूला पोहोचल्यावर संध्याकाळी प्रसिध्द कॅसिनेामध्ये गेलो. उच्चभ्रू, प्रतिष्ठित लोकांचे जुगार खेळण्याचे ठिकाण! जागोजागी कॅसिनो आढळतात. आणि कॅसिनोत प्रवेश केल्यावर बॉलीवुडच्या सिनेमामध्ये दिसणारे अंडरवर्ल्ड काय असेल याची कल्पना येते! आम्ही देखील अनेक प्रकारचे विडीओ गेम,विनोद खन्नांच्या जाहिरातीमधील चक्राकार गॅम्बलींग ह्या सर्व गोष्टींचा अनुभव म्हणून मजा घेतली.  संगीताचा आस्वाद घेतला. अगदी मजेशीर अनुभव घेतला. पण जुगारापायी नादी लागलेली मोठ्या घरची बच्चे मंडळी मात्र नजरेतून सुटली नाहीत. आणि खरोखरच नेपाळ म्हणजे ‘डॉन’ लोकांची सुरक्षित गुंफा असावी असे वाटले.

भक्तपूर

दि. १६/०५/२०००: सकाळी नाश्त्यानंतर काठमांडू शहरातील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ‘ नारायण हिती’ रॉयल पॅलेस – शाही निवास, सार्क परिषदेचा हॉल, स्टेडियम, विविध प्रकारचे अद्ययावत मॉलस्, कॅसिनो हयांचे गाडीतूनच दर्शन घेत भक्तपूरकडे प्रस्थान केले. रात्रीच्या किरकोळ वादळ पावसाने काठमांडू शहराच्या बाहेरची केबल बसची वाहतूक विस्कळीत केली होती. काठमांडूपासून चौदा किलोमीटर दूर मध्ययुगीन वास्तु कलेसाठी प्रसिध्द असलेले हे भक्तपूर किंवा भडगांव आहे. हे जुने नेपाळ! भक्तांचे शहर म्हणून हयाला भक्तपूर म्हणतात.

शंखाच्या आकाराचं हे शहर राजा आनंद मल्ल याने बाराव्या शतकात वसवविले होते. हे भक्तपूर मध्ययुगीन कलेचं ख-या अर्थाने माहेर घर आहे. शिल्प कला, विणकाम, हस्तकला हयांच्यासाठी खास प्रसिध्द असलेले हे शहर! अर्थातच भक्तपूरमध्ये प्रवेश करतानाच प्राचीनतेचा स्पर्श होतो. येथील दरबार चौक प्रसिध्द आहे. अद्भूत, प्राचीन आणि वैभव संपन्न मंदिरासाठी! एका इंग्रजी लेखकाने इ. अे. पॉवेलने हयाचे यथार्थ वर्णन केले आहे, “Were there nothing else in Nepal, save the Durbar square of Bhatgaon(Bhaktapur), it would still be amply worth making a journey halfway round he globe to see”.  

भक्तपूरमध्ये प्रवेश करताच दरबार चौकात पाहावयास मिळतो, जगप्रसिध्द् ४४ खिडक्यांचा महाल, सुवर्णव्दार, अगदी कोरीव काम असलेले गोल्डन गेट आकर्षक आहे. प्रवेश करतानाच डाव्या हाताला भैरव शिल्पं, थोडे पुढे गेल्यावर चित्रकलाभुवन आणि त्याचे प्रवेशद्वारावरील दगडी सिंह दिसतात. चौकाच्या उजव्या हाताकडून समोरील बाजूस अनेक मंदिरे दिसतात. बत्सला देवी मंदीर, बेल ऑफ बार्कींग डॉगस्, मोठी घंटा, सिद्धी लक्ष्मी मंदिर, यक्षेश्वर मंदिर नजरेस पडतात. टेरा कोटा मंदिर, सर्व काही अद्भूत वाटते. दरबार स्क्वेअर मधून पुढे जाताना चतुःब्रम्ह विहार हा कोपरा लागतो. तेथील बाजूच्या गल्लीतून आपण येतो तौमाधी स्कवेर मध्ये! जिथे आहे सर्वात उंच पॅगोडा मंदिर- न्यातपोला मंदिर! हयांच्या प्रवेश द्वारावरच्या पाय-यांवर दोन पैलवान, दोन हत्ती, दोन सिंह, दोन वाघिणी कोरलेल्या आहेत. हया तौमाधी चौकातल्या दगडी मंचावर उभे राहीले की, एका बाजूला पाच पॅगोडा सिद्धी लक्ष्मी मंदिर, भैरवनाथ मंदिर दिसते. छांगु- नारायणाचे मंदिर ही प्राचीन व कोरीव आहे. हे सर्व पाहताना आपण अचानकच काही काळ मागे जातो. सर्वच प्राचीन आणि अद्भूत असे वाटते. इथे चित्रकला, शिल्प कला, कोरीव काम इत्यादी विविध वस्तूंच्या रूपाने पहायला मिळते.

पशुपतिनाथ

भारतीय लोकांचे नेपाळ मधील मुख्य धार्मिक आकर्षण म्हणजे पशुपतिनाथ! काठमांडू शहरापासून पाच किलोमीटर दूर असलेले हे शिव मंदिर भक्तपूरहून परतताना पाहीले. पशुपतिनाथाचे दर्शन दुस-यांदा होत होते. बागमती नदीच्या काठावर पॅगोडा पध्द्तीचे हे लाकडी कोरीव काम असलेले मंदिर आहे. मंदिराचे कळस, सोनेरी छप्पर सोन्याचे व दरवाजे चांदीच्या कलाकुसरीचे आहेत. प्रवेशद्वारातच मोठा पितळी नंदी आहे. मुख्य मंदिर भव्य व कलात्मक आहे. परंतु आपण देवस्थानांबाबत नेहमीच उदासीन! स्वच्छतेचा कुठेही मागमूस नव्हता. दारिद्र्य, बडवेगिरी अगदी परंपरागत जपलेली आहे! मंदिरात फोटोग्राफी करण्यास मनाई आहे. गाभा-यात फक्त हिंदूंनाच प्रवेश आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा असते. मंदिराच्या चौफेर दरवाजे आहेत. प्रत्येक दरवाजाच्या दोन्ही बाजूस अप्सरा, अष्टभैरव व इतर देवतांच्या कोरीव मूर्ती आहेत. इथले शिवलिंग पूर्णतः वेगळे आहे. त्याच्यावर चारी बाजूंनी शिवाचे चेहरे कोरलेले आहेत. हे चेहरे तातपुरूष, अघोर, सध्यादेत आणि वामदेव म्हणून ओळखले जातात. हयांना हिंदूंचे पवित्र ऋग्वेद, यजुर्वेद व अथर्ववेद असे मानतात.

मुख्य मंदिराच्या परिसरात छोटी अनेक मंदिरे आहेत. पर्यटनाचा हंगाम असल्यामुळे मंदिरात खूपच गर्दी होती. केसरीच्या सहल नियोजनात आपल्या पर्यटकांना प्राधान्याने गर्दीच्या, अति महत्त्वाच्या ठिकाणी देखील स्थल दर्शन मनाप्रमाणे घडवून आणण्याचा सहल संचालकांचा मोठाच हातखंडा असतो! आम्हाला आमच्या ग्रुप लीडरने त्या गर्दीमध्येही दर्शन घडविले! अधिक माहिती काढली असता असे समजून आले की, महाशिवरात्री व्यतिरिक्त एकादशी, संक्रांत, तीज, अक्षयतृतीया, रक्षाबंधन, पौर्णिमा, ग्रहण ह्या  दिवसांना देखील इथे गर्दी असते.

पशुपतिनाथ मंदिराच्या बाहेर प्रेशीयस, सेमी प्रेशीयस स्टोन्स्, मोती, पोवळे, अमेरिकन डायमंड, रूद्राक्ष माळा हयांचे विक्रेते लगोलग दुकाने थाटून आहेत. प्रत्येक दुकानाजवळ अगदी झुंबड उडालेली होती. पर्यटक आणि खरेदी हे व्यापारांचे एकमेव हुकमी शस्त्र! आम्ही सुध्दा पोवळे, इटालीयन खडे, सेमी कल्चर्ड मोती अशी खरेदी केली. आपल्याकडे बाहेरून फिरून आल्यावर म्हणजे परप्रांतात गेल्यावर भेटवस्तू देण्याचा संकेत असतो, त्यासाठी हा खरेदीचा खटाटोप! भक्तपूर – पशुपतिनाथाची भेट घेऊन आम्ही बौध्दनाथ स्तूप पाहाण्यास गेलो.

बौध्दनाथ स्तूप

हा जगातील सर्वात मोठ्या स्तूपांपैकी आहे. पाचव्या शतकात लिच्छवी राजाने- राजा मानदेवाने हा बांधला होता असे सांगीतले जाते. हया स्तूपाचे वैशिष्ट्य म्हणजे या स्तूपाच्या चारही बाजूंनी बुद्धाच्या डोळ्यांचे चित्र काढलेले आहेत. मायेची पाखर घालणारे हे करूणामय बुध्दाचे नेत्र जणू जगाला विश्वशांतीचा संदेश देत असताना भासतात. स्तूपाच्या प्रवेशद्वारापासून सुरू होणार्‍या अनेक प्रार्थना चक्रांनी हा स्तूप वेढलेला आहे. हया व्यतिरिक्त तिथे एक मोठे प्रार्थना चक्र आहे, ज्यावर प्रार्थना चक्र फिरवताना करावयाचे नाम स्मरण कोरलेले आहे. स्तूपाच्या पाय-या चढून वरील भागात जाता येते. आजूबाजूच्या परिसराचे दर्शन होते. स्तूपाला चक्राकार वेढा घातला आहे अनेक छोट्या-मोठ्या दुकानांनी! जिथे तिबेटीयन, नेपाळी स्त्रीया हस्तकला निर्मित‍ वस्तू, चित्रे, पेंटिंगस्, मण्यांचे, खड्यांचे, लाकडी कोरीव काम असलेल्या, ब्रॉन्झ वगैरे आणि अनेक काही वस्तू विक्रीस घेऊन बसलेल्या असतात. स्तूपाचे दर्शन करताना आपल्याला बौध्द भिक्षू निश्चितच दृष्टीस पडतात. त्यांची मुद्रा अत्यंत धीरगंभीर, करारी आणि निश्चयी वाटते. अगदी लहान वयातील भिक्षूंपासून तरूण वयातील भिक्षू सुध्दा आढळतात. त्यांचे धार्मिक ज्ञानाविषयीचा अभ्यास थक्क करणारा असतो.

बौध्दनाथ स्तूप पहिल्यानंतर सर्वांची इतके अद्भूत स्थल दर्शन करताना हरपलेली तहानभूक जागी झाली आणि आम्ही हॉटेल हरातीवर पोहचलो. दुपारचे जेवण घेतले अन् थोडीशी विश्रांती! संध्याकाळी चहा घेऊन काठमांडूच्या सूपर मार्केटला भेट दिली. काठमांडूच्या जुन्या रस्त्यांवरून चालताना, दरबार स्केवरमधून जाताना नेपाळी कलेची, संस्कृतीची अशी विशेष ओळख होते. सामान्य जनजीवन लक्षात आल्यावाचून राहात नाही. नेपाळ हे गाड्यांच्या शौकीनांसाठी  एक विशेष ठिकाण होऊ शकते. कारण येथे अनेक विदेशी गाड्यांची रेलचेल आहे. पब्लिक टॅक्सी म्हणून येथे टोयोटा कंपनीची कार वापरली जाते. आम्ही तीही हौस पुरवून घेतली.

संध्याकाळचा पूर्ण वेळ सूपर मार्केटमध्ये घालविला. काठमांडू हे शॉपिंगसाठी अगदी उत्तम! इथल्या बाजारपेठा अनेकविध विदेशी वस्तूंनी खचाखच भरलेल्या आहेत. इलेक्ट्रानिक्स वस्तू, कॅमेरे, फोन, खेळणी, अलंकार आणि सौंदर्य प्रसाधने हया सर्वांवरून आपली नजर भिरभिरीत राहते. हो! पण इथे वस्तूंचे भाव ज्या व्यक्तिला करण्यास जमेल त्यानेच खरेदी करावी. अर्थातच बार्गेन डील!

विशेष गोष्ट म्हणजे इथे आम्हाला shirting व suiting शिलाई सकट खूपच स्वस्त वाटले. आम्ही बिझनेस सूट व ड्रेसचे कापड खरेदी करून लगेचच शिलाई करण्यास दिले. दुसऱ्या दिवशी नवीन ड्रेस घालून त्याचा आनंदही घेतला! नातेवाईकांना देण्यासाठी भेट वस्तू घेतल्या. एकंदरीतच खरेदीला पुष्कळ वाव आहे. तुमच्या खिशात भरपूर नाण्यांची खणखण असली म्हणजे झालं! संध्याकाळी जेवून लवकरच झोपी गेलो .

दि. १७/०५/२०००: आज पूर्ण दिवस मोकळा होता. पुन्हा सर्व मार्केटमध्ये भटकंती केली. गप्पा-विनोद करत दुपारचे जेवण उरकले अन् संध्याकाळच्या ‘केसरी’ आयोजित स्नेह-संमेलनाचे वेध लागले. तरूण व लहान मुले हयांनी कोणते नाच-गाणे करायचे हयावर चर्चा सुरू झाल्या. प्रत्येकाचा स्वत:चा कार्यक्रम ठरवून संध्याकाळी बगीच्यामध्ये सर्व छान नटुन थटून आले. गोष्टी, विनोद, भक्तिगीतापासून डिस्को गीतापर्यत धमाल चाललेली होती. स्नेहमेळाव्याला एकेक कार्यक्रमाबरोबर रंग चढत होता. Housie सारखे खेळ लहानांपासून थेारांनाही दंग करीत होते. अगदी काव्य वाचन, बासरी वादन सर्व काही होतं! अन् खरच लक्षात आल की अठरा दिवसांच्या सहवासाने एक मोठं ‘केसरी कुटुंब’ तयार झालं होतं! कोण कोणाचे घट्ट मित्रमैत्रिणी झाले तर कोणी काका-काकी! तर दादा अन् दिदी! हा माणसं जोडण्याचा केसरीचा विशेष गुण मनाला भावला! पण मन भारावलं आणि हळूच एक हुरहूर जाणवली! अरेच्या! उदया आपण आपला परतीचा प्रवास सुरू करणार! वाराणसीमार्गे आपला प्रवास मुंबईकडे सुरू होणार! सर्व जण खूपच हळवे झाल्यासारखे वाटले. कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण सहलीवर झालेल्या स्पर्धेची बक्षि‍से वाटली गेली. अन् आभाराचा कार्यक्रम मीच हाती घेतला. मनापासून आभार मानावेसे वाटले ते त्या केसरी परिवाराचे अन् त्यांच्या तालमीत तयार झालेल्या त्या सहल संचालकांचे! अठरा दिवस घराच्या बाहेर राहूनही घराची उब मिळाली. तेच घरगुती आपुलकीचे, प्रेमाचे वातावरण आणि हृदयाच्या स्नेह बंधनात गुंफलेली नातीही मिळाली! लक्षात आलं की पर्यटनासारखा व्यवसाय देशाची एकात्मता वाढविण्यास ख-या अर्थाने पूरक आहे. अन् एकाच वेळी अनेक प्रवृत्तींच्या सहवासात अचल रहाण्यास शिकवणारा गुरूही!

क्रमशः

प्रवास वर्ष: सन २०००

लेखन संदर्भ: सन २०००


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

पृष्ठे: 1 2 3 4 5

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑