एक अविस्मरणीय अनुभव- ओरिसा, पश्चिम बंगाल आणि नेपाळ सहल

काशी विश्वेश्वराच्या भेटीस

दि. १८/०५/२०००: सकाळी नाश्त्यानंतर आम्ही तयार होऊन निघालो, काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावर! काही दिवसांपूर्वीच विमान अपहरणामुळे प्रकाशझोतात आलेले हेच ते त्रिभुवन एअरपोर्ट! मी जेव्हा शाळेत शिकत असताना नेपाळ पाहीले होते, तेव्हा तर हया एअर पोर्टला विमान उतरण्याची जागा! इतकीच त्याची व्याख्या! आताही त्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने फार काही बदल जाणवलाच नाही. सन १९८४ नंतर आजचा म्हणजे सन २००० मधील एअरपोर्ट फक्त नवीन इमारती होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अश्या दोन विभागांमध्ये स्वतंत्र झाला होता. एअरपोर्टवर सर्व औपचारिकता पूर्ण करून आम्ही प्रत्येकाने आपापले सामान चेक-इन केले आणि हातात बोर्डींग पास घेऊन विमानापर्यंत घेऊन जाणा-या बसची वाट पहात राहीलो. काही वेळातच आम्ही सर्व केसरी मंडळी आमच्या विमानाकडे गेलो. नेपाळच्या डोमेस्टीक विमान सेवेने भैरहवा विमानतळावर जायचे आणि तिथून पुढे हद्द ओलांडून बसने वाराणसी पर्यंत प्रवास! असा आमचा कार्यक्रम होता! विमान अपहरणानंतर काठमांडू वाराणसी ही विमानसेवा बंद असल्याने हा द्रविडी प्राणायाम करावा लागला होता. विमानामध्ये नाजूक नेपाळी स्वागतिका (एअरहोस्टेस) सेवेस तत्पर होत्या. विमानाने आकाशात भरारी मारताच त्या विमान सेवेने एक स्पर्धा-  ‘लकी ड्रॉ’ जाहीर केला. आम्ही प्रत्येकाने आमचा सीट क्रमांक, नाव, पत्ता इत्यादि आवश्यक माहिती भरून फॉर्म्स एयर हॉस्टेसकडे दिले. चक्क त्या लकी ड्रॉ स्पर्धेत त्या विमान कंपनीचे एक प्रवासी तिकीट मला लाभले. मला खूप आनंद झाला. विमानातून उंच उड्डाण झाल्यावर ढगांमधून हिमशिखरे दिसत होती. हिमशिखरांवर चमचमते उन छान दिसत होते. जणू सोन्याच्या राशींची उधळण झालेली होती. तरळणारे ढग! सर्व दृश्यच मनमोहक होतं! पाऊण तासाच्या प्रवासानंतर आम्ही भैरहवा विमान तळावर पोचलो. एकाकी दूर गावात असलेले रेल्वे स्टेशन असावे, तसे होते भैरहवा विमानतळ! उतरताच आम्हाला उन्हाचा दाह जाणवू लागला. नशीबाने मिळालेले विमान तिकीट आमच्या सहल संचालकाला भेट दिले. कारण परतीच्या प्रवासानंतर त्या तिकिटाचा उपभेाग घेण्यासाठी मला पुन्हा नेपाळमध्येच प्रवास करावा लागला असता! भैरहवाला पोहचल्यावर तिथे आमची एका घर सदृश हॉटेलामध्ये दुपारच्या जेवणाची व काही वेळ विश्रांतीची सोय करण्यात आली होती. काही केसरी मंडळी मागच्या विमानाने येणार होती त्यामुळे सर्व जण आल्यावरच आम्ही काशीकडे आगेकूच करणार होतो.

दुपारी ऊन्हे वर चढतानाच आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि असह्य उकाडयातून आम्ही टांग्यांमध्ये व सायकल रिक्षांमध्ये सामान टाकून त्याच्यासह पायी चालत एका मागोमाग एक अशी नेपाळची सीमा पार करून भारताच्या सीमेवर थडकलो. हा प्रवास फारच अविस्मरणीय झाला. भारताच्या सीमेवर आमच्यासाठी केसरीच्या  एसी लक्झरी बसेस तत्परतेने उभ्या होत्या. तिथे पोचे पावेतो आणि तिथून वाराणसीकडे जाणा-या रस्त्यांवर काही अंतरावर जाईपर्यंत जो काही प्रकार निदर्शनास आला त्यावरून आपल्या देशात भ्रष्टाचार किती, कुठे आणि कश्या स्वरुपात होतो आहे हयाची अधिकच तीव्रतेने जाणीव झाली. दर मजल करीत बदललेल्या हवामानातील उकाडयाने त्रस्त झालेल्या जीवाने आम्ही रात्री साडेअकरा वाजता वाराणसीला ‘हॉटेल इंडीया’ येथे पोहचलो. सहल संचालकांनी जेवणाचा प्रबंध आधीच करून ठेवला होता. सर्व विधी उरकून झोपण्यास दोन वाजले. जेवताना सहल संचालकांनी सूचना दिली, उदया सकाळी लवकरच म्हणजे पहाटे साडेपाच वाजता ‘काशी विश्वेश्वरा’च्या दर्शनाला जायचे आहे आणि दुपारचे दोन वाजताच्या रेल्वेने मुंबईकडे प्रस्थान करायचे आहे. लवकरच झोपी गेलो.

काशी विश्वेश्वर’

सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन आम्ही सर्वजण ‘गंगामैय्या’ चे दर्शन घेण्यासाठी दशाश्वमेध घाटावर आलो. काशी हे अति प्राचीन शहर आहे. सकाळच्या प्रहरी देखील बऱ्यापैकी घाटावर गर्दी होती. आम्ही प्रथम श्री काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी गेलो. आम्हाला छोट्या अरुंद अश्या गल्ल्यांमधून मंदिरामध्ये नेले. ही काही मिनिटांची पायपीट आजूबाजूच्या बकाल दृश्यांमुळे कायमची मनात लक्षात राहिली. अगदी रस्त्यात मरून पडलेले उंदीर, गलिच्छ रस्ते ह्यामधून मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत नकोसे झाले होते.

उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यामध्ये स्थित बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले “श्री काशी विश्वेश्वराचे” स्वयंभू मंदिर शिवाला समर्पित आहे. ह्याची निर्मिती महाभारतकालीन असल्याचे सांगीतले जाते. ह्या काशी विश्वनाथाच्या मूळ मंदिराची भारतावर अनेकवेळा झालेल्या मुघल आक्रमणामध्ये नासधूस झालेली आहे. त्यानंतर अकबराच्या राज्यकालात राजा तोरडमल, नंतर अहिल्याबाई होळकर यांच्या हस्ते मंदिराचा जीर्णोद्वार केला गेला. काशी विश्वनाथाचे मंदिर हिंदूचे एक मोठे आस्था स्थान आहे. सोळाव्या शतकामध्ये येथेच संत एकनाथांनी “श्री एकनाथी भागवत” हा वारकरी संप्रदायाचा महान ग्रंथ लिहिला.

अंगाला भस्म फासून कैलासावर राहणार्‍या शंकरामुळे पार्वती मातेची सर्व टिंगल करीत असत.  त्यामुळे जिथे तिला कुणी चिडविणार नाही अश्या ठिकाणी नेण्याच्या तिच्या आर्जवावरून महादेवानी आपले वास्तव्य इथे केले अशी आख्यायिका सांगितली जाते.

काशी विश्वनाथाचे मंदिरात मुख्य पिंडी गाभार्‍याचे एका टोकाला आहे. त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात. ते काळ्या पाषाणाचे व सोन्या-चांदीने मढविले आहे. तेथे दर्शन घ्यावयाचे तर, तीन हार नेण्याची पद्धत आहे. एक हार शंकराला, दुसरा पार्वतीला तर तिसरा हार तेथील पुजारी त्या भक्ताचे गळ्यात घालतो. या शहरात सुमारे १६५४ मंदिरे आहेत. त्यामुळे यास मंदिराचे शहर असेही म्हणतात. त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे. विश्वनाथाचे दर्शन घेण्याआधी धुंडीराज किंवा ढुंढीराज विनायकाचे दर्शन घेण्याचा येथे प्रघात आहे. या मंदिराचे सभोवताल अष्ट दिशांचे अष्टविनायक आहेत. परिसरामध्ये अविमुक्तेश्वर मंदिर, श्री बिंदुमाधव मंदिर, काळभैरव मंदिर, कौदेवी मंदिर, मनकर्णिका मंदिर, पिशाच्च मोचनी मंदिर  अशी अनेक इतर मंदिरे आहेत.

आम्ही काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन दशाश्वमेध घाटावर आलो. गंगेच्या काठावरील मुख्य दशाश्वमेध घाट हा त्या शहराचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा आहे.  हिंदू पौराणिक कथांनुसार शंकराच्या स्वागतासाठी ब्रम्ह देवाने ह्याची निर्मिती केल्याचे सांगीतले जाते. दुसर्‍या कथेनुसार ब्रम्ह देवाने येथे  दशाश्वमेध यज्ञ केल्याने त्यामुळे ह्या घाटाचे दशाश्वमेध नाव प्रचलित झाले. थोडक्यात दशाश्वमेध घाटाची पार्श्वभूमी ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अशी मिश्र स्वरुपाची आहे.  

घाटावर प्रभात समयी होणार्‍या  दैनंदिन दिनचर्या, धार्मिक विधींनी घाट गजबजलेला होता. घाटावर काही नावाडी आम्हाला होडीमधून गंगेच्या पूजनासाठी घेऊन जाण्यास सज्ज होते. आम्ही गटा-गटाने होडीमधून  नदीच्या प्रवाहामध्ये जाऊन गंगेला पुष्प-दीप अर्पित केला आणि पुन्हा घाटावर परतलो. लगबगीने आमच्या हॉटेलवर येऊन सामान घेऊन परतीचा प्रवास सुरू केला दुपारच्या मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेने! काशी विश्वेश्वराच्या दर्शनाने आमच्या अठरा दिवसाच्या सहलीची सांगता झाली.  

प्रवास वर्ष: सन २००० लेखन संदर्भ: सन २०००


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

पृष्ठे: 1 2 3 4 5

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑