मे २०२५ च्या उन्हाळी सुट्टीचे नियोजन कोर्टाच्या लांबलेल्या कामकाजामुळे होऊ शकले नाही. त्यातच एप्रिल महिन्यामध्ये पहलगाममधील बैसारन खोऱ्यामध्ये पर्यटकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याने देश हादरला होता. युद्ध सदृश परिस्थिती उद्भवल्याने सुट्टीचा बेत आखावा किंवा नाही अश्या द्विधा मनस्थितीत असतानाच योगायोगाने मला माझ्या क्लब महिन्द्रा मेंबरशिपमुळे सिक्किमच्या दोन रिसॉर्टचे बूकिंग मिळाले! सन २०१८ मध्ये सिक्किमचा उत्तर, पूर्व आणि दक्षिणेकडील प्रांत बघून झालेला होता. सिक्कीममधील पेलिंग आणि जोरेथांग ह्या ठिकाणी रिसॉर्ट बूकिंग मिळाल्याने आमचा सिक्किमचा उर्वरित पश्चिम भाग बघण्याचा मनोदय पूर्ण होणार होता. त्यामुळे माझे आणि माझ्या मैत्रिणीचे एकमत झाले आणि प्रवासाची तजवीज सुद्धा!
भारताच्या ईशान्येकडील प्रांताला किंवा अगदी भूतान सारख्या लहान देशाला भेट देण्यासाठी हवाई मार्गाने बागडोगरा पर्यंत जावे लागते. देशाच्या अनेक शहरातून ‘न्यू जलपाई गुडी’ येथे रेल्वे सुद्धा येते. आम्ही प्रथम विमानाचे तिकीट निश्चित केले आणि मग स्थल दर्शनाचा बेत! बागडोगरा येथे संध्याकाळी पोहोचणार असल्याने आम्ही पहिला मुक्काम “मिरीक” येथे करण्याचे ठरविले. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही प्रवासाला निघालो! आम्ही दोघी मैत्रिणी थेट बागडोगरा विमानतळावरच भेटलो! संध्याकाळचे सात वाजले होते. पूर्वेकडे सूर्यास्त जरा लवकरच होतो! एव्हाना काळोखाचे साम्राज्य पसरलेले होते. विमानतळावरून मिरीककडे जाण्यासाठी गाडीचे नियोजन आधीच करून ठेवले होते, त्यामुळे आमचा गाडी चालक ‘रतन’ आमच्या प्रतीक्षेत विमानतळाबाहेर उभा होता. आम्ही विमानतळाबाहेर येताच त्याने आमचे सामान गाडीत ठेवले आणि गाडी मिरीकच्या दिशेने हाकली.
बागडोगरापासून साधारण ४५ किलोमीटर अंतरावर मिरीक शहर आहे. रतनने सिलिगुडी शहरापासून काही अंतर पुढे गेल्यावर चहासाठी गाडी थांबवली. हवेतील सुखद बदल मनाला आनंद देऊन गेला. बागडोगरा ते मिरीक हा बऱ्यापैकी घाटवळणाचा रस्ता आहे. रात्रीच्या अंधारात दूरवर लुकलुकणारे दिव्यांचे ठिपके डोंगर रांगांवर वसलेल्या शहरांची ओळख करून देत होते. आम्ही हवेतला सुखद गारवा आणि शुद्ध हवा अनुभवत रतनची मुलाखत घेण्याचा कार्यक्रम सुरू केला! मिरीक स्थलदर्शन, मिरिकहून पुढे पेलिंग येथे जाताना काय बघता येईल वगैरे वगैरे! रतन सुद्धा आनंदाने आम्हाला माहिती पुरवित होता! आमच्या गप्पा इतक्या रंगल्या की, आम्ही मिरिकला आमच्या होम स्टेवर कधी येऊन पोहोचलो ते कळले सुद्धा नाही! आम्हाला आमच्या मिरीकच्या तात्पुरत्या “निवास स्थानी’-मिरिक होम स्टेला पोहोचण्यास अंदाजे दीड तास लागला.
आमची गाडी मिरिक होम स्टेच्या आवारात उभी राहताच अगत्याने तेथील सहाय्यक रुपकने त्वरित आमचे सामान आमच्या खोलीमध्ये पोचते केले. प्रवासाचा शीण आणि भूक ह्यामुळे आम्ही लगबगीने डायनिंग एरियामध्ये गेलो. होम स्टे खरोखरच घरगुती होता! गरजेनुसार वाढीव बांधकाम केलेल्या गच्ची सदृश भागात टेबल-खुर्च्या मांडून होम स्टे मधील पाहुण्यांना खानपान करता येईल अशी व्यवस्था केलेली होती. दोन एकमजली इमारतींमध्ये पाहुण्यांची निवासाची सोय होती. एखाद्या मूलभूत सोयी-सुविधाने सज्ज हॉटेलप्रमाणेच होम स्टेची खोली होती. होम स्टेच्या अगदी तरुण आणि हसतमुख मालकीण बाई – सुषमा आणि तिचा सहाय्यक रुपक अत्यंत अगत्याने आदरातिथ्य करताना दिसत होते. आम्ही होम स्टेवरील सर्वात शेवटचे आणि उशिराने आलेले पाहुणे होतो! रतनने आम्हाला दुसर्या दिवशीचा स्थल दर्शन कार्यक्रम सांगून तो एव्हाना झोपी गेलेला होता. घरगुती जेवणाने समाधान पावलो आणि निद्रा देवीच्या अधीन झालो.
पश्चिम बंगालमधील लोकांसाठी दार्जिलिंग जिल्ह्यातील अगदी हिमालयाच्या पायथ्याशी असलेले जवळचे थंड हवेचे, खूप कोलाहल नसलेले एक नयनरम्य पर्यटन स्थळ म्हणजे – मिरिक! आपल्यासारख्या देशाच्या इतर भागातून येणार्या पर्यटकांसाठी ट्रान्झिट स्टॉप किंवा पहिला पडाव म्हणून मिरिकची निवड अगदी योग्य ठरेल! कारण समुद्र सपाटीपासून १७६७ मीटर उंचीवर असलेल्या निसर्गरम्य मिरिकमध्ये वर्षभर आल्हाददायक हवामान असते. साधारण दोन तासाच्या अवधीमध्ये बागडोगरा किंवा सिलीगुडी पासून पोहोचता येत असल्यामुळे ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे.
मिरिक शहराची दुसरी ओळख म्हणजे त्याच्या आसपास असलेले जागतिक दर्जाचे आणि प्रसिद्ध दार्जिलिंग चहाचे उत्पादन करणारे चहाचे मळे! संत्र्याची लागवड ही देखील मिरिकच्या लोकांचा एक मोठा आर्थिक स्रोत आहे. मिरिकच्या आसपास बऱ्याच संत्र्याच्या बागा आहेत. एकंदरीतच आल्हाददायक हवा, दूरवर नजरेस पडणाऱ्या शुभ्र हिमालयीन पर्वतरांगा, उंच टेकाडांवर पसरलेले चहाचे मळे आणि शांत वातावरणामुळे मिरिक हे एक निवांत सुट्टीचे ठिकाण आहे!
मिरिक शहराच्या नावाबाबत असे सांगीतले जाते की, हे नाव लेप्चा शब्द ‘मिर-योक’ वरून आले आहे ज्याचा अर्थ “आगीने जळून गेलेले ठिकाण” असा होतो. मला मात्र मिरिक अगदी परिकथेतील छोटेखानी निसर्गरम्य शहर भासले. त्यामुळे स्थलदर्शन देखील अगदी मर्यादित! फक्त त्या निसर्गरम्य वातावरणात रममाण होऊन सुट्टीचा निवांत आनंद घ्यावा, असेच काहीसे मिरीकचे वर्णन योग्य होईल!


दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर होम स्टेच्या परिसराचा खरा अंदाज आला! होम स्टेच्या संपूर्ण परिसरामध्ये विविध रंगाची फुले आणि विविध प्रकारचे कॅक्टस कुंड्यांमधून निगुतीने वाढविलेले दिसत होते. स्वत: सुषमा ज्या भागात राहत होती त्या घराच्या गच्चीमध्ये लटकणाऱ्या छोट्या कुंड्यांमधून विविध प्रकारची फुलझाडे लावलेली होती. हायड्रेंजिया प्रजातीची विविध रंगाची फुले बहरलेली दिसत होती. होम स्टेच्या लगतच समोर ‘प्रधान होम स्टे’ दिसत होता. तो होम स्टे त्यांच्या कोण्या नातेवाईकांचा असल्याची माहिती रुपकने दिली. आजूबाजूला इतरांची रहिवासी घरे दिसत होती. एकंदरीत सर्व निवासी परिसर वाटत होता. होम स्टेच्या गच्चीमधून मिरीक तलावाचा शेवटचा भाग आणि समोरच्या डोंगरावर मोनेस्ट्री दिसत होती. समोर दूरवर दिसणार्या डोंगरांवर हिरवीगार वृक्षराजी डवरलेली होती आणि त्यावर धुक्याच्या झूली लडिवाळपणे सलगी करत होत्या. अहाहा काय प्रसन्न सकाळ होती!

पशुपती फाटक – पायी सीमापार
सकाळी नाश्ता करून आम्ही दार्जिलिंगकडे जाणाऱ्या रेशीरोड मार्गे भारत-नेपाळ सीमेला भेट देण्यासाठी निघालो. मिरिक पासून अंदाजे १५ किलोमीटर अंतरावर पशुपती फाटक म्हणजे भारत-नेपाळ सीमा आहे. येथे पोहोचेपर्यंत अनेकवेळा आपले मोबाइल नेटवर्क दोन देशाच्या सरहद्दीमध्ये हुतूतू खेळत राहते! रस्त्याच्या डाव्या बाजूस नेपाळची वस्ती तर उजव्या बाजूस भारतातील पश्चिम बंगाल! काही वेळातच सुंदर निसर्ग, पाइन आणि इतर वृक्षांनी नटलेला परिसर आणि चहाचे मळे ह्यांच्या डोळ्यांना सुखावणाऱ्या निसर्ग दृश्यांचा आनंद घेत रस्त्याच्या एका वळणावर आपली गाडी येऊन थांबते! अगदी अरूंद पण पर्यटकांच्या लगबगीने गजबजलेले पशुपती फाटक! भारताच्या सीमेवर थाटलेली काही दुकाने, कस्टम आणि पोलीस चेक पोस्ट ह्या गोष्टी गाडीतूनच नजरेस पडतात.
आम्ही पशुपती फाटकाजवळ पोहोचल्यावर रतनने आम्हाला सांगीतले की, भारत-नेपाळ सीमेवर असणार्या पोलीस चेक पोस्टवर प्रवेश नोंदणी करून सीमापार जाऊन नेपाळमधील गाडीने पुढील प्रदेश पहाता येईल. भारतातील वाहनाने जायचे असल्यास योग्य परवानगी घेऊन दर दिवशीचे परमीट काढावे लागते. आमच्या गाडी चालकाकडे परमीट नसल्याने आम्हाला नेपाळी वाहनाने प्रवास करणे क्रमप्राप्त होते.

आम्ही चेक पोस्टजवळ गाडीतून उतरलो. चक्क दोन लाकडी बांबू म्हणजे ‘पशुपती फाटक’ दोन देशाच्या सीमा विभागत होते! फाटकाच्या एका बाजूला पश्चिम बंगालच्या सुखिया पोखरी पोलीस स्टेशन हद्दीत येणारा भारतीय चेक पोस्ट आणि कस्टम ऑफिस होते तर फाटक ओलांडताच नेपाळ मधील पोलीस चेक पोस्ट! इथे पर्यटकांना फोटो ओळखपत्र दाखवून तेथील रजिस्टरमध्ये भारतामधून नेपाळमध्ये आपण प्रवेश केल्याचा वेळ, नाव, दूरध्वनी क्रमांक इत्यादि तपशील रीतसर नोंद करून मगच पुढे जाण्याची परवानगी असते. फक्त भारतीय आणि नेपाळी नागरिकच ह्या पशुपती फाटकामधून ये-जा करू शकतात. परदेशी नागरिकांना सीमा पार करण्याची परवानगी नाही. इथे फोटोग्राफी करण्यास मनाई आहे. पण फाटकापासून काही पावले पुढे चालून नेपाळच्या प्रवेशद्वाराजवळ आपण फोटोग्राफी करू शकतो! आम्ही आमचा आवश्यक तपशील, प्रवेशाची वेळ नोंद केली आणि चक्क पायी आपल्या देशाची सीमा पार करून नेपाळ मध्ये – परदेशात प्रवेश केला! फारच मजेशीर अनुभव! काय योगायोग असावा माहीत नाही, पण मला २५ वर्षांपूर्वी केसरी टुर्स मार्फत मिरिक दर्शन करून काकरबिट्टा मार्गे केलेल्या नेपाळ सहलीची आठवण ताजी झाली! आज पुन्हा २५ वर्षानी नेपाळच्या हद्दीत प्रवेश केला होता!

पशुपती फाटक ओलांडताच रस्त्याच्या दुतर्फा गजबजलेले पशुपती मार्केट नजरेत भरते. ह्या मार्केटमध्ये विशेषतः थायलंड मधून आयात केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, जॅकेट, पर्फ्यूमस्, सौन्दर्य प्रसाधने, छत्री, लोकरीच्या वस्तु, हँडीक्राफ्टस् वगैरे वस्तूंची दुकाने थाटलेली दिसत होती. आम्ही रतनच्या सल्ल्याप्रमाणे सीमा पार करून ‘कन्यम’ स्थल दर्शनासाठी गाडीची चौकशी करू लागलो. रस्त्याच्या एका बाजूला मारुती कार उभ्या होत्या. तिथे आपल्या ग्राहकांना शोधत उभ्या असलेल्या गाडी चालकाने आम्हाला सराईतपणे हिन्दी मध्ये विचारले, कुठे जाणार?? त्याने आम्हाला तिथेच एका फलकावर वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट दिल्यावर किती भाडे होईल याचा लेखाजोखा लिखित स्वरुपात दाखवला! त्यामुळे आम्ही कन्यमपर्यंत समाविष्ट असलेल्या स्थळांचे पॅकेज घेऊन त्याच्या गाडीमध्ये बसलो. अतिशय सराईत ड्रायव्हर होता! आमची गाडी कन्यमच्या दिशेने धावू लागली.
नेपाळमधील चहाच्या मळ्याने वेढलेले निसर्गरम्य कन्यम!

बाजाराचा भाग संपताच नेपाळी लोकांची टुमदार हिरव्या-निळ्या अश्या वेगवेगळ्या रंगामधील घरे नजरेस पडू लागली. गाव संपताच वळणा-वळणाचा रस्ता सुरू झाला. दूर निळ्या-करड्या रंगांच्या पर्वतरांगा आणि त्यावर अलगद ढगांचे पुंजके विहार करीत होते, नजरेच्या टप्प्यापर्यंत अखंड रस्त्यावर उंच उंच टेकड्या चहाच्या हिरव्यागार मळयांनी व्यापलेल्या होत्या. खूपच निसर्गरम्य प्रदेश होता. साधारण एक तासामध्ये आम्ही कन्यमच्या व्यू पॉइंट जवळ पोचलो. बहुदा शनिवार असल्याने पर्यटकांची खूप गर्दी होती. सभोवार नजर फिरवताच अत्यंत विहंगम दृश्य नजरेस पडले.

पूर्व नेपाळच्या कोशी प्रांतात इलाम जिल्ह्यामध्ये हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेले, थंड-समशीतोष्ण हवामान असलेले नयनरम्य कन्यम हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. कन्यम समुद्रसपाटीपासून ६००० फुट उंचीवर असल्याने या प्रदेशाला वर्षभर थंड आणि आल्हाददायक हवेचा वरदहस्त लाभलेला आहे. इलाम जिल्ह्याची ओळख म्हणजे डोंगराळ प्रदेश, जंगले आणि डोंगर उतारावर बहरलेले विस्तीर्ण चहाचे मळे आणि दूरच्या पर्वतरांगांची विहंगम दृश्ये! इथले शांत वातावरण आणि सुंदर परिसर निसर्ग प्रेमींना भूल पाडेल असाच आहे! कन्यम टेकड्यांची रचना, चहाचे मळे इतके जादुई आहे की जणू एखाद्या चित्रकाराने त्याच्या कुंचल्यातून सुंदर मंत्रमुग्ध करणारे निसर्ग दृश्य चितारले आहे! कन्यममधून आजूबाजूच्या निसर्गाचे मनमोहक दृश्य दिसते. स्वच्छ हवामान असल्यास कांचनजंगा आणि पूर्व हिमालय पर्वतरांगांच्या भव्य शिखरांचे दर्शन घडते. दुर्दैवाने वातावरण ढगाळ आणि पावसाळी झाल्याने आम्हाला पर्वत शिखरांच्या दर्शनाचा योग आला नाही.

कन्यम व्यू पॉइंट, स्काय वॉक, चहाचे मळयांमध्ये पारंपरिक नेपाळी वेशभूषा आणि फोटो शूट, रील ह्या सर्व गोष्टींनी कन्यम एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असावे याबाबत शंका उरली नाही! एकंदरीतच कन्यम इलाम जिल्ह्यातील स्थानिक नेपाळी जनतेचे सर्वाधिक पसंतीचे ‘वीकएंड’ पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला आलेले दिसत होते. त्यामुळे आजूबाजूच्या फिक्कल, हारकते आणि कुतिडाडा ह्या शहरांमध्ये लॉजेस, होटल्स, होम स्टे असे विविध पर्याय उपलब्ध असल्याचे आमच्या नेपाळी गाडी चालकाने सांगीतले.
आल्हाददायक हवा आणि पिकनिकला आलेल्या पर्यटकांचा आनंद ओसंडून वहात होता. पर्यटकानी कन्यमच्या फलकाजवळ फोटो काढण्यासाठी आणि ‘रील’ करण्यासाठी गर्दी केलेली होती. कन्यम व्यू पॉइंट पासून रस्त्याच्या कडेला रांगेत नेपाळी पारंपरिक वेशभूषेचे अनेक स्टॉल होते. “cultural dress” अश्या पाट्या लावून पर्यटकांना भाड्याने हे कपडे उपलब्ध केले जात होते. स्टॉल मधील नेपाळी बायका आणि मुली पर्यटकांना फोटो आणि रीलसाठी अगदी प्रेमाने सजवून तयार करीत होत्या! फोटोग्राफर्सची धावपळ पहाण्यासारखी होती! पर्यटक नेपाळी, गुरूंग, तमंग, राय,शेर्पा, लिंबू, नेवारी, थारू, खास अश्या वेगवेगळ्या समाजाचे पारंपरिक वेष परिधान करून फोटो काढून त्याची त्वरित फ्रेम बनवून घेण्यात गर्क होते! एक तरुण नेपाळी मुलगी एका फिरत्या वर्तुळाकार तबकडीवर बाजूने मोबाईलचा सेल्फी स्टँड लावून पर्यटकांचे नेपाळी गाण्यावर नाचताना किरकोळ रक्कम आकारून विडियो बनवून देत होती. तिथे स्थानिक नेपाळी नागरिक सुद्धा सहलीसाठी आलेले दिसत होते. एकंदरीत ‘वन डे’ पिकनिक स्पॉट असावा असा अंदाज बांधला! त्या पिकनिक वातावरणाने आम्हाला सुद्धा मोहिनी घातली! मग काय, आम्ही सुद्धा नेपाळी गाण्यावर ‘रील’ बनविण्याचा आनंद घेतला, पारंपरिक वेष परिधान करून चहाच्या मळ्यात मुक्त बागडत फोटो शूट करण्याचा आनंद लूटला!
कन्यमच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊन आम्ही परतीच्या वाटेवर फिक्कल येथे ‘सोनाम रेस्टॉरंट’मध्ये नेपाळी थाळीचा आनंद घेत पोटपूजा केली. नेपाळी थाळी म्हणजे पारंपरिक नेपाळी जेवण! पितळी धातुच्या गोल ताटामध्ये मध्यभागी भात आणि त्याच्या आजूबाजूला गोलाकार इतर पदार्थ वाढलेले असतात. सोबत हिरव्या पालेभाज्या, चटणी, इतर हंगामी भाज्या, सॅलड, आंबवण केलेल्या भाज्यांचे लोणचे, पापड, दही आणि पौष्टिक ‘दाल’ ह्याची साथ-सोबत! हे सर्व पाहूनच आपली रसना जागृत होते! अतिशय साधी आणि सात्विक अन्न घटकांनी परिपूर्ण असलेली शाकाहारी थाळी अतिशय रूचकर होती. नेपाळी खाद्य संस्कृतीमध्ये थाळीला विशेष महत्त्व आहे. पारंपरिक नेपाळी थाळीमध्ये सहा वेगवेगळ्या स्वादाचे परिपूर्ण संतुलन असते. थाळीमध्ये आवर्जून खारट, गोड, आंबट, कडू, मसालेदार आणि तुरट अश्या चवीचे पदार्थ समाविष्ट केलेले असतात. किंबहुना अनेक व्यंजनांनी परिपूर्ण असलेली जेवणाची थाळी ही नेपाळी पाहुणचार आणि आदरातिथ्याचे प्रतीक असावी!

आम्ही जेवणानंतर परतीच्या प्रवासाला लागलो. कन्यमपासून काही अंतरावर रस्त्यामध्येच नव्याने तयार होत असलेल्या बुद्धा पार्कजवळ गाडी थांबली! एका छोट्या टेकडीवर बुद्धाचा पुतळा अनावरणाच्या प्रतीक्षेत होता. पुतळ्याजवळ एका सस्पेंशन ब्रिजने पलीकडील चहाचे मळे असलेल्या टेकडीला जोडले होते. पुन्हा त्याच रस्त्यावरून परतताना संध्याकाळ होत आलेली होती. आजूबाजूच्या निसर्गाने परतीच्या सूर्य किरणांमध्ये वेगळेच रूप धारण केले होते. आम्ही तेथे फोटोग्राफी करून मार्गस्थ झालो.

बुद्धा पार्ककडून आमची गाडी थेट पशुपती मार्केटच्या दिशेने निघाली. तिथेच पशुपती मंदिर म्हणजे शंकराचे मंदिर होते. गाडी चालकाने तिथे गाडी थांबवली. आम्ही दर्शन करून पुन्हा नेपाळ-भारत सीमेपाशी आलो. एव्हाना संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. आम्ही नेपाळची सीमा पार करून पुन्हा भारतामध्ये प्रवेश केल्याची नोंद केली. पशुपती फाटकाच्या सीमेपलीकडे रतन आमच्या प्रतीक्षेत गाडी घेऊन तयारच होता.

आम्ही पुन्हा मिरीकच्या दिशेने प्रवास सुरू केला. संध्याकाळची कातरवेळ, धुक्यात हरवलेल्या चहाच्या टेकड्या आणि आम्हाला आलेली चहाची तलफ! आमची गाडी ‘गोपालधरा टी इस्टेट’ समोर थांबली. आम्ही चहाच्या मळ्यामध्ये जाऊन चहाचे नमुने चाखायच्या उद्देशाने थांबलो. पण संध्याकाळ झाल्याने मळ्यामधील स्टॉल बंद झालेले होते. मग रस्त्याच्या कडेलाच गोलपहार व्यू पॉइंट फास्ट फूडचा स्टॉल होता, तिथे गरमागरम मोमो आणि रीफ्रेशिंग ‘जिंजर -लेमन टी’चा आस्वाद घेऊन आमच्या “मिरीक होम स्टेवर परतलो.
सुमेंदू लेक
आम्हाला दुसर्या दिवशी पश्चिम सिक्किम मधील पेलिंग गाठायचे होते. दुसर्या दिवशी सकाळी पेलिंगच्या दिशेने निघाल्यावर मिरिक मधील प्रसिद्ध सुमेंदू तलावाला भेट दिली. मिरिक शहराच्या मध्यभागी असलेल्या ह्या तळ्याला येथील स्थानिक लोक “मिरिक झील’ म्हणून ओळखतात. शांत पाण्याच्या ह्या तलावाला कांचनजंगा पर्वत शिखरांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. सुमेंदू तलाव ओक आणि चेस्टनटच्या जंगलांनी वेढलेले आहे. तलावाच्या एका बाजूला बाग आणि दुसर्या बाजूला डेरेदार पाइन वृक्ष रांगेत उभे असलेले दिसतात. मिरिक तलावावर असलेल्या इन्द्रेणी पुलाने तलावामुळे विभागलेले मिरिक शहराचे दोन भाग जोडलेले आहेत.

बोकर मोनेस्ट्री
मिरीक होम स्टेच्या समोरील डोंगरावर बोकर मोनेस्ट्री वसवलेली आहे. बोकर मठाला भेट दिल्यावर तिबेटीयन बौद्ध संस्कृती आणि तिथे अभ्यासक भिक्षूंच्या दैनंदिनीची झलक दिसते. ही मोनेस्ट्री म्हणजे शाक्यमुनी बुद्धाच्या शिकवणीचा अभ्यास आणि प्रसार करणाऱ्या ५०० हून अधिक भिक्षूंचे निवास स्थान आहे. भिक्षूंना तिबेटी भाषा, व्याकरण, आणि हस्तलेखनासह अध्यात्माचे विविध पैलू शिकविले जातात. बौद्ध धर्माचे पारंपरिक धार्मिक विधी आणि प्रार्थना देखील शिकवल्या जातात.


अतिशय शांत परिसर आहे. हिरव्यागार टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर उभारलेली मठाची वास्तु तिबेटीयन वास्तुकलेने प्रेरित आहे. येथून मिरिक शहराचे आणि सुमेंदू तलावाचे विहंगम दृश्य दिसते. स्वच्छ हवामान असल्यास समोर कांचनजंगा पर्वत शिखरे नजरेस पडतात. वातावरण ढगाळ असल्याने दृश्यमानता फार कमी होती!

काही वर्षांपूर्वी धावती भेट दिलेल्या मिरिकचा दोन दिवस पाहुणचार स्वीकारून, ह्या परिकथेमधील छोटेखानी निसर्गरम्य शहराचा निरोप घेण्याची वेळ आली! मोनेस्ट्री भेटीनंतर आम्ही आमच्या पुढच्या पडावाकडे सिक्किमच्या दिशेने प्रवासाला निघालो! भेटू या परत सिक्किममध्ये!
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा