सिक्कीम डायरीज् : भाग – २  

आमचा आजचा दिवस योकसुम भेटीचा होता. अनेक दंतकथा, मिथक आणि निसर्गरम्य परिसर यांनी नटलेले सिक्किमचे कांचनजंगा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेले गाव म्हणजे योकसुम! कालचा दिवस भरगच्च पेलिंग दर्शनाने कसा निघून गेला ते कळलेच नाही! आज सकाळी खूप काही घाई गडबड नव्हती. परंतु डोंगर वळणाचा रस्ता पार करून जायचे म्हणजे राखीव वेळ हवाच! योकसुम भटकंती करून पुन्हा पेलिंगला माघारी येऊन बुद्धा पार्क आणि पेलिंग स्काय वॉकला देखील भेट द्यायची होती. पेलिंग स्थल दर्शनाच्या नियोजित यादी मध्ये असलेल्या सर्व ठिकाणांना भेट तर द्यायलाच पाहिजे!  

सकाळी कांचनजंगा शिखरे आज तरी दर्शन देतील (?) ह्या ओढीने लवकरच अंथरुण सोडले आणि रिसोर्टच्या सन डेकवर जाऊन थडकले. पाऊस थांबलेला होता. पक्षांच्या मंजुळ कुंजनाने आणि भोवतालच्या निसर्ग दृश्याने माझं मन अगदी प्रसन्न झाले. पेलिंगच्या टेकड्यांवर आणि रिसोर्टच्या पार्श्वभागी असलेल्या गर्द वनराजीवर ढगांचे पुंजके मनसोक्त विहार करत होते. समोर नीलामय आकाशामध्ये कधी शुभ्रवर्णी तर कुठे करड्या रंगांचे ढगांचे पुंजके हेकेखोरपणा केल्यासारखे कांचनजंगा शिखरांना अगदी घट्ट वेढा घालून बसले होते.

पण थोड्याच वेळात त्यांची हालचाल सुरू होताना दिसली आणि मी एकदम सरसावून बसले! दरम्यान माझी मैत्रिण सुद्धा सोबत चक्क गरमागरम चहाचा कप घेऊन खोली बाहेर आली! मग आनंद काय वर्णावा! चहाचे गरम घुटके घेताना समोर कांचनजंगा शिखरांसोबत ढगांचा खेळ पाहण्यात, त्या दंतूर पंक्तींचे फोटो काढण्यात वेळ कसा गेला कळलेच नाही! निवांतपणे मनमुराद कांचनजंगेच्या हिमशिखरांचा त्या ढगांसोबत चाललेला लपंडाव पाहून आम्ही आमच्या खोलीत परतलो आणि योकसुम स्थळ दर्शनासाठी तयार झालो.

कांचनजंगा फॉल्स 

पेलिंगहून आम्ही रिंबीमार्गे योकसुमच्या दिशेने निघालो. आज पावसाने विश्रांती घेतलेली होती. योकसुमच्या दिशेने पेलिंग पासून २४ किलोमीटर दूर डोंगर-वळणांच्या हिरव्या वनराजीमधून जाताना मुख्य रस्त्यावरच कांचनजंगा धबधबा दिसतो. एका तीव्र वळणावर आपली गाडी पूल पार करून थांबते. मुख्य रस्त्यावरून लगतच्या डोंगर कड्यात काही अंतर पायी चढून गेल्यावर आपला एक मोठ्या प्रचंड आवेगाने कोसळणार्‍या प्रपाताशी सामना होतो.

त्याच्या परिसरामध्ये प्रवेश करताच पाण्याचे तुषार आपल्या अंगावर वर्षाव करीत आपले स्वागत करतात. “धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे” या समर्थांच्या कवनाचे प्रत्यक्ष अनुभव देणारा कांचनजंगा धबधबा सुमारे १०० फूट उंचीवरून खाली कोसळत होता. हा बारमाही धबधबा जगातील उंचीच्या परिमाणानुसार तिसऱ्या क्रमांकाचे शिखर असलेल्या खुद्द कांचनजंगा पर्वताच्या हिमनद्यांमधून उगम पावत असल्याचे सांगीतले जाते. सिक्किममधे पर्यटनाने जोम धरल्यानंतर हया नैसर्गिक उगम पावणाऱ्या भव्य धबधब्याला पर्यटन स्थळाचे महत्त्व प्राप्त झाले आहे! परिणामी परिसरात धबधब्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर मॅगी, चहा व अन्य खाद्यपदार्थांची दुकाने थाटलेली दिसतात. आम्ही थोडा वेळ त्या धबाबा लोटणाऱ्या कांचनजंगा धारांचा आनंद घेऊन योकसुमकडे रवाना झालो.

योकसुम

योकसुमचा प्रवास हाही एक अनुभवच होता. पाऊस थांबल्याने डोंगरदऱ्यांवर आणि खोऱ्यामध्ये शुभ्र ढगांचे पुंजके लहरी स्वभाव असल्यासारखे इतस्तः विखुरलेले होते. परंतु त्यांच्या असण्याने त्या अस्मानी सौंदर्यात एक वेगळीच भर पडत होती. रस्त्याच्या कडेकडेने निळसर गुलाबी, जांभळ्या रंगाची हायड्रेंजियाची फुले जागोजाग बहरली होती. मला फार कुतूहल वाटले! कोणत्याही नर्सरीमध्ये पाचशे रुपयांपेक्षा कमी किमतीत न मिळणारी फुलझाडे अगदी जंगली झुडुपांसारखी उगवलेली होती. विमानप्रवासामुळे बरीच बंधने येतात, नाही तर एखादे रोपटे तर नक्कीच घेऊन आले असते!

आम्ही एका डोंगरकड्यावर वसलेल्या पेलिंग मधून दुसऱ्या डोंगरकड्यावर वसलेल्या वस्तीकडे प्रवास करीत होतो. पेलिंग पासून साधारण ३५ किलोमीटर अंतरावर कांचनजंगा राष्ट्रीय उद्यानाच्या घनदाट जंगलाच्या परिघामध्ये योकसुम वसलेले आहे. जसे योकसुम जवळ येऊ लागले, तसे डोंगरवळणाच्या रस्त्यांच्या कडेला रांगेत सफेद रंगाच्या प्रार्थना ध्वजपताका फडफडताना दिसू लागल्या. आमच्या गाडीने एका निवांत निसर्ग सौंदर्याने ओतप्रेत नटलेल्या एका गावामध्ये प्रवेश केला. पर्यटनामुळे योकसुम गावाने थोडे बदल स्वीकारलेले नजरेस पडत होते. होम स्टेचे फलक, स्थानिकांचे खाद्यपदार्थांची दुकाने आणि तुरळक पर्यटकांचा वावर जाणवत होता. मुख्य रस्त्यावरूनच आपल्याला “मणी हॉल’ मोनेस्ट्री दिसते. बाजारपेठेतून गावामध्ये वरच्या दिशेला आमची गाडी एका सोनेरी रंगाच्या गोम्पाला वळसा घालून पुढे नॉर्बुगांग पार्क जवळ येऊन थांबली.

योकसुमची उत्सुकता एका वेगळ्या कारणासाठी होती! काही वर्ष केवळ फक्त मनात घर करून राहिलेला एक ट्रेक म्हणजे ‘गोएचा ला’  ट्रेक! ह्या ट्रेकच्या पहिल्या पडावाचे ठिकाण म्हणजे योकसुम! कांचनजंगा पर्वत शिखरांचे प्रवेशद्वार म्हणजे योकसुम! अल्पाइन कुरणे, रोडोडेन्ड्रॉनची जंगले ह्यासाठी प्रसिद्ध असणारा झोंगरी-गोएचाला ट्रेक याच गावामधून सुरू होतो. आम्ही योकसुमला पोहोचताच गाडीमधून उतरताना प्रथम नजरेस पडला, तो ह्याच ट्रेकचा दिशादर्शक नकाशा!

योकसुमचे नैसर्गिक लावण्य अगदी अवर्णनीय आहे. योकसुम म्हणजे सुंदर निसर्गासोबत आध्यात्मिक आणि ऐतिहासिक ओळख असणारे अत्यंत शांत आणि विलक्षण नयनरम्य गाव! योकसुम म्हणजे निवांत जीवनशैलीचा अनुभव घेत, अस्मानाला गवसणी घालणाऱ्या गिरिशिखरांशी नजरेनेच गुजगोष्टी करत कांचनजंगा पर्वतांच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलांच्या दरवळामध्ये स्वत:ला हरवून जाणं! मला थोडं आपले नियोजन चुकले का? असे वाटू लागले, इथल्या वातावरणाचा खऱ्या अर्थी अनुभव घेण्यासाठी किमान एक रात्रीचा मुक्काम इथे करायला हवा होता का!! हा प्रश्न मनामध्ये उगीच डोकावून गेला.

योकसुममध्ये प्रवेश करताच गर्द वनराजीने नटलेले हे गाव परीकथेमधील गावासारखे भासू लागते. येथील शांत आणि प्रसन्न वातावरणामुळे मन सहजच हलकं होऊन जातं आणि त्या शांततेचा नाद जणू कानामध्ये उमटू लागतो!  त्या गावांमधील रंगीत घरे, परसदारातील शेती, त्यामध्ये वाऱ्यावर डुलणारी शेते हे सर्व काही आपल्या मनावर गारूड करू लागतं! कोणतीही वर्दळ नाही, शहरी जीवनाचा गोंगाट नाही. वस्तीतल्या घराशेजारी असलेल्या गोठ्यांमधून अधूनमधून येणारा पशुधनाचा हुंकार, पक्षांचा किलबिलाट, निळ्या आकाशामध्ये ढगांची लगबग, आणि योकसुमच्या खोऱ्यात मनमुराद उनाडणाऱ्या वाऱ्याचे गुणगुणणे! हे सर्व काही ज्याचं त्यानेच अनुभवावे आणि त्यातच रममाण होऊन जावे असे! आम्ही दोघी मैत्रिणी बराच वेळ नि:शब्द होऊन पर्वतीय शुद्ध हवा आणि तेथील अगम्य गूढ शांततेचे मनसोक्त रसपान करीत राहिलो! योकसुमच्या वातावरणाने आणि निसर्गाने जणू आमच्यावर मोहिनीच घातली!

पश्चिम सिक्कीमच्या गेझींग उपविभागात मोडणारे समुद्र सपाटीपासून ५८४०  फूट उंचीवर वसलेले, घनदाट जंगलांचे वरदान लाभलेले, कांचनजंगा पर्वत शिखरांच्या पायथ्याशी वसलेले योकसुम एक ऐतिहासिक गाव आहे. योकसुमच्या टेकड्यांमधील वनक्षेत्रात ओक, बर्च, मॅपल, चेस्टनट, मॅग्नोलिया, रोडोडेन्ड्रॉन, सिल्वर फर, आणि अश्या अनेक प्रजातींची वृक्षराजी आहे. योकसुमला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. येथे प्राचीन गोरखांचे छोटे गाव आहे. काळाच्या पडद्याआड झालेली ऐतिहासिक पार्श्वभूमी, अध्यात्मिक आणि सिक्कीमच्या बौद्ध संस्कृतीच्या बीजारोपणाच्या सर्व दंतकथा आणि मिथक याचा साक्षीदार बनून योकसुम आज आपल्यापुढे अनेक प्रसिद्ध प्राचीन बौद्ध मठ, स्तूप, आणि प्राचीन ऐतिहासिक स्मारके यांच्या प्रतिकात्मक स्वरूपात उभे ठाकते.

नोर्बुगांगचे सिंहासन

योकसुम नावाच्या व्युत्पत्तीच्या दंतकथेने हा प्रवास सुरू होतो. योकसुमचा शब्दशः अर्थ – तीन विद्वान भिक्षूंच्या भेटीचे ठिकाण! गुरु पद्मसंभवांच्या आशीर्वादाचे पाठबळ लाभलेल्या चार धार्मिक स्थळांपैकी एक! हया आशीर्वाद प्राप्त स्थळांना मानवी शरीराच्या चार कोषांची उपमा दिली जाते. त्या स्थळांपैकी योकसुमला प्रतिकात्मकरित्या ‘डोळ्या’ची उपमा दिली जाते. तिबेटमधून आलेल्या ल्हासून चेंपो यांच्या नेतृत्वाखाली तीन विद्वान भिक्षूनी भूतीया समाजाच्या “फुंत्सोंग नामग्याल” यांचा सिक्किमचा पहिला राजा म्हणून निवड केली आणि त्याला ‘चोग्याल’ ही पदवी बहाल केली. चोगयाल म्हणजे नीतिमत्तेने राज्य करणारा धार्मिक राजा!

सिक्किमच्या पहिला ‘चोग्याल’ला लौकिक अर्थाने राजा घोषित करण्यासाठी आणि धार्मिक प्रमुख होण्यासाठी या तीन तिबेटी लामांनी नोर्बुगांग येथे पाइन वृक्षांनी व्यापलेल्या टेकडीवर दगडांमध्ये बसवलेल्या एका सिंहासनावर ह्या चोग्याल राजाचा पवित्र कलशामधून पाणी शिंपडून राज्याभिषेक केला. ज्या दगडी सिंहासनावर चोग्याल राजाचा राज्याभिषेक झाला, ते ‘नोर्बुगांगचे सिंहासन’ म्हणून ओळखले जाते. भारतीय पुरातत्व खात्याने ह्या ठिकाणाला वारसा स्मारक म्हणून जतन केलेले आहे.

सन १६४२ मध्ये सिक्कीमच्या पहिले चोगयाल फुंटसोंग नामगयाल यांनी स्थापन केलेली सिक्कीमची पहिली राजधानी म्हणजे – योकसुम! सिक्किमवर तिबेटीयन राजवटीचे वर्चस्व कायम राखण्याच्या प्राथमिक उद्दिष्टाने झालेल्या या राज्याभिषेकानंतर सिक्किममधे बौद्ध धर्माचा प्रसार, विविध ठिकाणी बौद्ध मठ आणि स्तूप यांची उभारणी केली गेली. साधारण नामग्याल वंशाच्या बारा राजांची राजवट सन १६४२ ते १९७५ ह्या कालावधीपर्यंत राहिली. वज्रयान पंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिबेटी महायान बौद्ध धर्माने सिक्किमचा राजधर्म म्हणून ओळख निर्माण केली. फुंटसोंगने राजा झाल्यावर स्थानिक लेपचा जमातींचे बौद्ध धर्मात परिवर्तन केले.  योकसुम येथे सिक्किमची अधिकृत राजधानी प्रस्थापित केली. राज्याला बारा ‘झोंग’  म्हणजेच जिल्ह्यांमध्ये विभागले गेले. सन १६७० मध्ये फुंटसोंग नामग्याल नंतर त्याचा मुलगा तेनसुंग नामग्याल गादीवर बसल्यानंतर त्याने त्यांची राजधानी राबदेन्तसे येथे स्थलांतरित केली. आणि त्यानंतर योकसुम केवळ एक सिक्किमच्या राजेशाही इतिहासाचे आणि  दंतकथांच्या वारशाचा साक्षीदार बनून राहिले!

भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेले ‘नोर्बुगांगचे सिंहासन’ अत्यंत शांत आणि गर्द वनसंपदेने वेढलेल्या एका छोट्या टेकडीवर स्थित आहे. ह्या परिसराला ‘नोर्बुगांग पार्क’ असे नामकरण केलेले आहे. ह्या परिसरात प्रार्थना स्थळ, नोर्बुगांग स्तूप आणि मोठ्या क्रिप्टोमेरिया पाइनच्या छायेत स्थित असलेले कथित राज्याभिषेकाचे सिंहासन आहे. सिंहासनामागील पाइन वृक्षाचे झाड थेट राज्याभिषेक समारंभ प्रसंगापासून असल्याचे सांगितले जाते.

सिंहासनाजवळ एका संरक्षित चौकोनात दगडी पावलाचा ठसा आहे, जो की ल्हातसून चेम्पो यांचा असल्याचे सांगितले जाते. समोरील विशाल चोरटेन (स्तूप) मध्ये अवघ्या सिक्कीम प्रांतामधील माती आणि पाणी इथे ठेवले असल्याचे मानले जाते. जेव्हा फुंटसोंगचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्याला आलेल्या मौल्यवान भेटवस्तू इथे ह्या स्तूपाखाली पुरून ठेवलेल्या आहेत असे सांगितले जाते. नोर्बुगांग पार्क मध्येच एक मोनेस्ट्री सुद्धा आहे.

योकसुम तिबेट सीमेशी अगदीच सलगीने असल्यामुळे तिबेटीयन बौद्ध धर्माचा ठसा जागोजागी प्रतीत होत राहतो.  सन १७०१ मध्ये नामग्यालने  प्रस्थापित केलेला ‘दुबडी’ मठ सिक्किम मधील सर्वात प्राचीन मठ म्हणून ओळखला जातो. एका टेकडीच्या माथ्यावर हा मठ स्थित आहे. जंगलातील पायवाटेने तासाभरात ह्या टेकडीवरील मठात जाता येते. ‘ल्हातसून नामखा जिगमे’ यांच्या नावाने त्याला “Hermit cell”असेही संबोधले जाते.

आम्ही त्या शांत परिसरामध्ये काही वेळ रमलो. नोर्बुगांग पार्क शेजारीच असलेल्या एका मठामध्ये एक मोठा पुतळा उभारलेला दिसला. आम्ही कुतुहलाने त्या मठाच्या परिसरात गेलो. तेथील एका व्यक्तीने तो पुतळा तिबेटी ‘थांगटोंग ग्यालपो’चा असल्याबाबत सांगितले. थांगटोंग ग्यालपो हयाना चक्झांपा म्हणजे “लोखंडी पूल बनविणारा तज्ञ’ असेही ओळखले जाते. थांगटोंग हे अभियांत्रिकी विदयेत तज्ञ असल्याचे मानले जाते. भूतान आणि तिबेट मध्ये त्यांनी बांधलेले ५८ लोखंडी साखळीचे झुलते पूल आजही वापरात असल्याचे सांगितले जाते. थांगटोंग ग्यालपो हे एक उत्तम वास्तु विशारद, तज्ञ अभियंता, लोहार, वैद्य अश्या अनेक गुणांनी परिपूर्ण दूरदर्शी संत असल्याचे सांगितले जाते. मठाच्या जवळ ह्याबाबतच्या माहितीचा फलक लावलेला आहे. इथे ध्यानधारणा केंद्र सुद्धा आहे. एक दूरदर्शी आणि नवजागृती करणाऱ्या व्यक्तीचा कृतज्ञता म्हणून मोठा पुतळा साकारून त्याचा केलेला सन्मान फारच विशेष वाटला! मठाच्या गच्चीतून अवघ्या योकसुम गावाचे विहंगम दृश्य नजरेला पडते. तसेच समोरच्या टेकड्यांवरील पेलिंग आणि आसपास डोंगरदऱ्यांमध्ये वसलेली गावे नजरेस पडतात.

आम्ही नोर्बुगांग पार्कमधून बाहेर पडलो आणि रस्ता चुकलो. पण कधीकधी चुकलेली वाट देखील आनंद देणारी असू शकते नाही का! आम्ही थेट पर्वत रांगांच्या पायथ्याशी वसलेल्या वस्तीमधून एकाकी असणार्‍या स्थानिकांच्या घराबाहेर आणि त्यांच्या परसदारामध्ये बहरलेल्या शेतामध्ये पोहोचलो.

पर्वत शिखरानी वेढलेल्या घनदाट जंगलांचे वरदान लाभलेल्या योकसुमच्या वैविध्यपूर्ण हवामानामुळे येथील स्थानिकांच्या शेतात मका, बाजरी, बार्ली आणि गहू पिकवला जातो. योकसुमच्या परिसरात वेलची, आले, हळद, बकव्हीट अशा नगदी पिकांची सेंद्रिय शेती केली जाते. येथील स्थानिक लोकानी पर्यटन हा त्यांच्या रोजीरोटीचा व्यवसाय म्हणून मान्य केला असला तरी येथील स्थानिक राहिवाशांनी केवळ या प्रदेशातच नव्हे तर सिक्कीममधील इतर तत्सम क्षेत्रामध्येही ईको-टुरिजमला प्रोत्साहन दिले आहे. म्हणूनच योकसुम हे ईको-टुरिजमसाठी आदर्श गाव सुद्धा मानले जाते! योकसुमच्या अर्थव्यवस्थेचा ईको-टुरिजम हा उत्पन्नाचा प्राथमिक स्त्रोत आहे. दरवर्षी कांचनजंगा नॅशनल पार्कच्या परिघात अतिउंचीवरील खिंडींमध्ये होणाऱ्या पदभ्रमण मोहिमांच्या निमित्ताने अनेक देशी-परदेशी ट्रेकर्स आणि पर्यटक येथे येत असल्याने परकीय चलनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे समजते.

काथोक लेक

आम्ही नोरबुगांग पार्ककडून काथोक तलावाकडे जाण्यास निघालो. नॉर्बुगांगच्या आसपास रस्त्यालगत काथोक तलाव आहे.  सिक्कीमीज् लोकांसाठी हा तलाव पवित्र स्थळ मानले जाते. या तलावाला स्थानिक भाषेत ‘काथोक त्शो’ असेही म्हटले जाते.  सिक्किम मध्ये सन १६४२ च्या दरम्यान तिबेटी लामांपैकी बौद्ध धर्म प्रसारामध्ये अग्रणी असलेले ‘काथोक कुंटू झांगपो’ यांचा वास येथे असल्याबाबत समज रूढ  आहे. म्हणून या तलावाला ‘ल्हातसो’ किंवा ‘soul lake’असेही म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या वाणीसाठी या तलावाच्या पाण्याला पवित्र केले असे मानले जाते. आणि ह्या तलावाचे पावित्र्य राखण्यासाठी दरवर्षी लामा पाणी पवित्र करण्याचा विधी करतात असे सांगीतले जाते. तलावाच्या वरच्या दिशेला नव्याने स्थापना करण्यात आलेली ‘काथोक वोसेल लिंग’ मोनेस्ट्री आहे.

काथोक तलाव गर्द हिरव्या पर्वतराजीने वेढलेला आहे. तलावाच्या पाण्यामध्ये त्या पर्वतराजीचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते! तलावामध्ये छोटे नारिंगी रंगाचे मासे अगदी खुशाल पृष्ठभागी विहार करीत होते. त्यांच्या नाजुक हालचालींमुळे तलावाच्या पाण्यात हलकी वलये निर्माण होताना दिसत होती. काथोक तलावाजवळ आम्ही काही क्षण शांत बसलो. तेथील नीरव शांतता, विलक्षण निसर्ग सौंदर्याची पार्श्वभूमी, तेथील प्रार्थना ध्वज या वातावरणाने अगदी भारावून गेल्यासारखे झाले. मला कवी अनिल यांची ‘तळ्याकाठी’ ही कविता जिवंत अनुभवत असल्यासारखे वाटले!

आता मात्र त्या कांचनजंगा पर्वतशिखरांच्या पायथ्याशी घनदाट जंगलात निवांत वसलेल्या योकसुमचा निरोप घेण्याची वेळ आली होती! आम्ही योकसुमहून पुन्हा पेलिंगला माघारी निघालो.  योकसुमकडून परतताना मन मात्र मागे रेंगाळत होते. पर्वत शिखरांवर वर्षाव करणारी सूर्य किरणे, क्षितिजावर शोभून दिसणार्‍या पर्वतरांगा, थेट आकाशाला भेदणारी हिमशिखरे, सारं काही अगम्य आणि अद्भुत! निसर्गरम्य योकसुमच्या नीरव शांततेत काळ मंदावल्यासारखा वाटतो. आपलं मन अगदी त्या वातावरणात सुखावून जातं. आपल्या शरीराला स्पर्शून जाणाऱ्या त्या हवेत प्राचीन राजांच्या कथा, थेट भगवंताला साद घालणारी प्रार्थना ध्वजांची फडफड, आणि सभोवार पर्वतांचे शाश्वत नृत्य आपल्या कानामध्ये गुंजत राहते!

पेलिंग स्काय वॉकआणि चेनरेझिग स्मारक

योकसुम गाव सोडून डोंगर वळणाच्या रस्त्यावर येताच समोरच्या पर्वत टेकड्यांवर वसलेले पेलिंग स्पष्ट दिसू लागले.  आणि पेलिंगची ओळख असलेल्या स्काय वॉकजवळ सर्वात उंच चेनरेझिग पुतळ्याची आकृती निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर समोरील पर्वतरांगांवर दिसू लागली. तेव्हा लक्षात आले की, चुंबी रिसॉर्टच्या सन डेक वरून समोरच्या डोंगरावर दूर लुकलुकणारे दिवे योकुसमचे होते तर!

आम्ही योकसुमहून थेट पेलिंग स्कायवॉक पाहण्यासाठी गेलो. सूर्यास्ताची वेळ होत आलेली होती. स्कायवॉक आणि सर्वात उंच बोधिसत्व चेनरेझिगचा १३७ फूट उंचीचा पुतळा हे दोन्ही एकाच संकुलात आहे. पेलिंग मधील हा स्कायवॉक भारतातील पहिला काचेचा स्कायवॉक आहे. काचेचा स्काय वॉक समुद्र सपाटीपासून ७२०० फूट उंचीवर आहे. बोधीसत्व चेनरेझिगच्या १३७ फूट उंचीच्या पुतळ्यासमोरच हा स्कायवॉक आहे. सन २०१८ मध्ये या संकुलाचे उद्घाटन करून हे स्थळ पर्यटकांसाठी लोकार्पण करण्यात आलेले आहे. स्कायवॉक म्हणजे “रीळ” बनवण्याचे एक गजबजलेले पर्यटन स्थळ! कुतूहलापोटी स्काय वॉक वरून चालत आम्ही पुतळ्याकडे जाणाऱ्या पायऱ्या चढून वरच्या दिशेला गेलो. चेनरेझिगच्या उंच पुतळ्याकडे जाण्यासाठी काही पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्या चढून जाताना दुतर्फा सोनेरी प्रार्थना चक्र लावलेली आहेत. पुतळ्याजवळ हिरवळ निगुतीने राखलेली आहे. पुतळ्याजवळ अगदी पॅनोरमिक दृश्यांचा सामना होतो. हवामान स्वच्छ असल्यास सूर्यास्ताचे अतिशय सुंदर दृश्य दिसते. सूर्य परतत होता. आसमंतामध्ये संध्याकाळच्या हिमालयीन जादूचा शिरकाव झाला! निळ्या आकाशामध्ये सूर्यास्ताच्या विविध छटा फाकलेल्या होत्या. परंतु इतके ढग दाटून आलेले होते की जणू त्यांच्या गवाक्षातून कुठे तरी लपूनछपुन निळे अस्मानी कुसुंबी रंग डोकावीत होते! ह्या संकुलाच्या व्ह्यू गॅलरी मधून तिस्ता आणि रंगीत नद्यांचे विहंगम दृश्य नजरेस पडते. हे पर्यटन स्थळ पाच वाजता बंद होते. त्यामुळे आम्ही तेथून काढता पाय घेतला. आणि पुन्हा आमच्या चुंबी रिसॉर्टवर परतलो.

एकंदरीतच चुंबी रिसॉर्टचा परिसर, टुमदार निसर्गरम्य पेलिंग गाव आणि एकांतात वसलेले निसर्गरम्य योकसुम मनात रेंगाळत राहिले! आमची पेलिंग शहरातील शेवटची संध्याकाळ आम्ही चुंबी रिसॉर्टमधील संगीत रजनीने आणि रूचकर भोजनाने साजरी केली. योकसुम भेटीनंतर पेलिंगचा निरोप घेण्याची वेळ आली. उद्या पेलिंगचा निरोप घ्यायचा आणि परतीचा प्रवास सुरू करायचा ह्या विचाराने मन खिन्न झाले. पण सिक्किमच्या पूर्वीच्या सहलीमध्ये राहून गेलेले ‘रावंगलाचे बुद्धा पार्क’ आणि ‘टेमी टी गार्डन’ परतीच्या प्रवासात पाहून मगच जोरेथांग येथील क्लब महिन्द्र बैगुनी रिसॉर्टला आमच्या शेवटच्या मुक्कामी जायचे नक्की करून, आम्ही त्या उत्साहात झोपी गेलो.

क्रमशः


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑