सिक्कीम डायरीज् : भाग – ३

आज सकाळी कांचनजंगा शिखरांचे दर्शन घेऊन सकाळी लवकरच पेलिंगचा निरोप घेतला. तीन दिवसांच्या पेलिंग मुक्कामात निसर्गाचा सहवास आणि निवांतपणा यामुळे शरीराला आणि मनाला सुद्धा ऊर्जा मिळाली! आज परतीचा प्रवास सुरू होणार होता पण टप्प्या-टप्प्यात! आमच्या नियोजनाप्रमाणे जोरेथांग मुक्कामी जाताना रावंगला आणि नामची मार्गे बागडोगरा गाठणार होतो.

आम्ही डिसेंबर २०१८ च्या हिवाळी मोसमात केलेल्या सिक्किम सहली दरम्यान अति बर्फ वृष्टीमुळे वाहतूक कोलमडलेली होती. त्यामुळे आम्ही दक्षिण सिक्किमच्या नामचीमध्ये नव्याने निर्माण केलेला बुद्धा पार्क बघू शकलो नव्हतो. अगदी रावंगलाच्या अर्ध्या रस्त्यातून परतावे लागले होते! त्यामुळे आम्ही पेलिंगहून परतीच्या प्रवासात रावंगला आणि ‘टेमी टी’ गार्डनला भेट देऊन पुढे जोरेथांग मुक्कामी जाण्याचे ठरविले.

रावंगला – तथागत स्थल

पेलिंग शहराचा लवकरच निरोप घेऊन निघालो. पेलिंगकडून रावंगलाकडे जाणारे रस्ते मात्र सुस्थितीत होते. आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत, डोंगर वळणाच्या दोन तासांच्या प्रवासानंतर आम्ही पेलिंग पासून साधारण ४५ किलोमीटर दूर अंतरावर डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या रावंगला येथे दुपारी बारा वाजताच्या सुमारास पोहोचलो. लोचेनने आमची गाडी अगदी ‘तथागत स्थल’ या बुद्ध स्मारकाच्या प्रवेशद्वाराजवळ आणून उभी केली.

दक्षिण सिक्किमच्या प्रांतात ‘राबोंग’ किंवा ‘रावंगला’ शहरवजा गावांमध्ये हिरव्यागार वृक्षराजीने व्यापलेल्या आणि पाइन वृक्षांनी सजलेल्या टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर तथागत स्थल स्थित आहे. काही वर्षांपूर्वी सन २००६ ते २०१३ च्या दरम्यान गौतम बुद्धाच्या जन्माच्या २५५० व्या वर्धापन दिना निमित्त उभारण्यात आलेली १३० फूट उंच बुद्धाची मूर्ती हे रावंगला मधील मुख्य आकर्षण आहे! रावंगला हे मैनाम टेकडीच्या पायथ्याशी वसलेले एक छोटे शहर आहे. पश्चिम आणि दक्षिण सिक्किमच्या प्रवासा दरम्यानचा रावंगला हे गाव दुवा म्हटले तरी चालेल! तथागत स्थल हया बुद्धा पार्कमुळे पर्यटनाच्या नकाशावरचा रावंगला एक आकर्षण बिंदू आहे.  रावंगला येथे अनेक शतके जुनी रालोंग मोनास्ट्री आहे. बौद्ध धर्मियांसाठी ही मोनेस्ट्री म्हणजे एक तीर्थ स्थळ आहे.  त्याच मठाच्या संकुलात ६० टन तांबा धातुपासून बनवलेली बुद्धाची मूर्ती स्थापित केलेली आहे. तीर्थयात्रा आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी सिक्किम राज्य सरकार आणि जनतेच्या संयुक्त प्रयत्नामधून तथागत स्थळाचे निर्माण झालेले आहे.  २५ मार्च २०१३ मध्ये चौदाव्या दलाई लामा यांच्या हस्ते हया बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. रावंगला बुद्धा पार्क एका मोठ्या जंगलांनी वेढलेला विस्तीर्ण परिसर आहे. त्याच संकुलात ‘चो झो’ तलाव आहे. प्रशस्त फरसबंदी असलेले पादचारी रस्ते, अतिशय शिस्तीने राखलेले उद्यान आणि शांत वातावरणामुळे तथागत स्थळ पर्यटन स्थळापेक्षा धार्मिक तीर्थस्थळ अधिक भासते. बुद्ध पुतळ्याच्या चौथऱ्याच्या खालच्या भागात ध्यान धारणा केंद्र आणि वर्तुळाकार संग्रहालय आहे. एका दिशेने प्रवेश करून गोलाकार मार्गाने या संग्रहालयातील बुद्धाच्या जीवनाशी आणि बुद्धिस्ट तत्त्वज्ञानाशी निगडित भित्तिचित्रे उत्कृष्टरित्या साकारलेली आहेत. मात्र इथे फोटोग्राफी करण्यास मनाई आहे. तिबेटीयन बौद्ध धर्म परंपरा, संस्कृती, कला ह्या त्या चित्रांमधून सहज प्रतीत होत राहतात. बुद्धाच्या बारा कर्मांविषयी शिकवणूक चित्रांच्या माध्यमातून संग्रहालयात जतन केलेली आहे.

‘तथागत’ हे गौतम बुद्धासाठी प्रामुख्याने सिद्धार्थ गौतमसाठी एक संबोधन किंवा पदवी पैकी एक म्हटले तरी चालेल!  तथागत म्हणजे जो जसा प्रकट झाला, अवतरण झाला आणि त्याप्रमाणेच गेला. बौद्ध धर्माचा मूलभूत पाया असलेली कथात्मक मुल्ये सांगणाऱ्या शाक्यमुनी बुद्धाच्या जीवनामधील अवतरणापासून ते बोधी वृक्षाखाली ज्ञान सिद्धीच्या टप्प्यापर्यंतच्या बारा कर्माधिष्ठित चित्रकथा आपल्याला एका वेगळ्याच विचार चक्रामध्ये गुंतवून ठेवतात. बुद्धाची ही बारा कृत्ये महायान परंपरा म्हणून ओळखली जातात.  बुद्धाचे तूशीता स्वर्गातून पृथ्वीतलावरील अवतरण, राणी माया म्हणजेच आईच्या गर्भातील प्रवेश, लुंबिनीच्या बागेतील जन्म, अनेक शास्त्रांमध्ये पारंगत होणे, क्रीडा क्षेत्रात निपुण होणे, सांसारिक आणि प्रापंचिक सुखाचा राजकुमार म्हणून आनंद घेणे, साम्राज्याचा आणि राजेशाही जीवनाचा त्याग करणे, तपस्या करणे, बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्तीची साधना, राक्षसांना पराभूत करून नंतर धर्म चक्राचे चलन आणि महापरिनिर्वाण, धर्माची दीक्षा सामान्यांना देणे हया त्यांच्या ज्ञान प्राप्तीपर्यंतच्या आयुष्य चक्राची कथा चित्रांद्वारा पाहताना नकळत आपल्याला नकारात्मक गोष्टींपासून दूर जावे, जीवनाचे ध्येय आणि अंतिम सत्य यापासून आपले लक्ष कधीही ढळू देऊ नये याची प्रेरणा नक्कीच मिळते!

आम्ही संग्रहालयामधून बाहेर आलो. उद्यानातून फेरफटका मारला. ढगांनी झाकोळलेल्या आभाळामुळे उद्यानामधील भर दुपारचे हे स्थळ दर्शन अगदी सुसह्य झाले. उद्यानाच्या आवारात एका रांगेत विविध वस्तू खाद्यपदार्थांचे स्टॉल थाटलेले होते. एक दिवसीय सहलीचा परिसर म्हणून तथागत स्थळ प्रसिद्ध झालेले दिसत होते. जोरेथांग मुक्कामी संध्याकाळपर्यंत पोहोचायचे असल्याने आम्ही पुढे टेमी टी इस्टेटला जाऊन दुपारचे जेवण घेण्याचे ठरविले आणि रावंगलाचा निरोप घेतला.

टेमी टी गार्डन – नामची

आमची गाडी ‘टेमी टी’ इस्टेटच्या दिशेने धावू लागली. रावंगलापासून साधारण १७/१८ किलोमीटर अंतरावर दामथांगमार्गे टेमी टी इस्टेटला जाणारा रस्ता खूपच निसर्ग सुंदर आहे. आम्ही साधारण पाऊण तासात टेमी टी गार्डन जवळ पोहोचलो. डोंगर उतारांवर जेथवर नजर पोहोचेल तेथवर चहाचे मळे पसरलेले होते. मुख्य रस्त्यावरच टेमी टी इस्टेट होती. टी इस्टेटच्या प्रवेशापाशी रस्त्याच्या बाजूस एका नेपाळी कुटुंबाने हॉटेल थाटलेले होते. आमच्या गाडी चालकाने येथे ‘नेपाळी थाली’ चांगली मिळते अशी बातमी दिली. मग काय! बुद्धा पार्क भेटीनंतर पोटात कावळे ओरडतच होते! आम्ही तातडीने दोन शाकाहारी थाळी -भोजन मागवून अगदी तृप्तपणे ढेकर देतच ‘टेमी टी’ इस्टेट मध्ये प्रवेश केला!

टेमी टी इस्टेट मध्ये फेरफटका करण्यासाठी किरकोळ प्रवेश फी आहे. सिंगटम कडे जाणाऱ्या रस्त्यावर ‘दामथांग’ आणि ‘टेमी बाजार’ दरम्यान हे चहाचे मळे विस्तारलेले आहेत. टेमी येथील टी इस्टेट १९६९ मध्ये सिक्किम सरकार पुरस्कृत, शेवटचे तत्कालीन राजा पालदेन थोंडूप नामग्याल ह्यांच्या कारकीर्दीमध्ये ह्या चहाच्या मळ्यांची स्थापना केलेली आहे. चीन आक्रमणानंतर त्यांच्या भूमीला सोडून आश्रयाला आलेल्या तिबेटी निर्वासितांना रोजगार देण्यासाठी तत्कालीन सिक्किमच्या राजाने चहाची लागवड सुरू केली. दक्षिण सिक्किम मधील नामची जिल्ह्यात सौम्य डोंगर उतारांवर साधारण ४४० एकर परिसरात असलेला सिक्किम मधील हा एकमेव चहाचा मळा आहे. टेमी टी इस्टेटमधे उत्पादन होणार्‍या चहाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती आहे. हया सरकारी चहा प्रकल्पामध्ये दरवर्षी सुमारे एक लाख किलो चहाचे उत्पादन होते. येथील चहाच्या मळ्यामध्ये उत्पादन होणारा सेंद्रिय चहा अत्यंत प्रिमियम किमतीला विकला जातो.

सर्वोत्तम दर्जाचा किताब पटकविणारा टेमी चहा चवीसाठी जसा खास आहे अगदी तसाच मळ्याच्या नितांत सुंदर टेकड्यांसाठी देखील! टेमी टी इस्टेट मधील फेरफटका एक वेगळाच आनंद देऊन जातो. त्या चहाच्या मळ्यांमधून, त्या डोंगर उतारावरून धावत सुटावेसे वाटले! चहाच्या मळ्यामध्ये बऱ्यापैकी खुडणी झालेली दिसत होती.  टी इस्टेटच्या सुरुवातीलाच एक छोटा स्टॉल आहे, तिथे हया मळ्यांमध्ये उत्पादन होणारा चहा वेगवेगळ्या स्वरुपात विकला जातो. ज्याची जशी आवड त्या प्रकारचे उत्पादन! चहा पावडर, टी बॅग्स, ब्लॅक टी, ग्रीन टी, फ्लेवर्ड टी अश्या विविध प्रकारात चहा विकण्यासाठी ठेवलेला होता. तेथील सद्गृहस्थ त्याबाबत सर्वांना माहिती देऊन चहाचे उत्पादन विक्री करीत होता. आमच्यासारख्या ‘चहाबाज’ लोकांना चहा म्हणजे आहाहा! आम्ही सिक्किमची आठवण म्हणून घरी नेण्यासाठी चहा विकत घेतला आणि टी इस्टेटच्या बाहेर स्थानिक सिक्किमीज् कुटुंबाच्या चहाच्या दुकानात टेमी टीचा आस्वाद घेण्याच्या इच्छेने शिरलो. अनायसे चहाची वेळ झालेली होती. आम्ही ‘लेमन जिंजर टी’चा आस्वाद घेऊन नामचीच्या दिशेने निघालो.

नामचीची धावती भेट!

डिसेंबर २०१८ च्या हिवाळ्यामध्ये सिक्किमची पहिली सफर केलेली होती. त्यावेळी देखील परतीच्या प्रवासात नामचीमध्ये मुक्काम केला होता. तेव्हा नामची मधील सेंट्रल पार्क मनाला खूप भावलेले होते. शहराचा मध्यवर्ती भाग, मुख्य बाजार म्हणजे सेंट्रल पार्क. त्यामुळे नामचीची धावती भेट घेण्याचा मोह अनावर झाला. जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या!

आमच्या लोचेन ड्रायव्हरने गाडी सेंट्रल पार्कच्या रस्त्यावर घेण्याऐवजी ‘रोज गार्डन’च्या दिशेने वळवली. पण काय योगायोग होता, आमच्या सिक्कीमच्या पहिल्या भेटीवेळी आम्ही नामची मध्ये सोलोफोक भागात असलेल्या ‘डुंगमाळी रिसॉर्ट’ मध्ये राहिलो होतो. त्यावेळी आमच्या खोलीच्या टेरेस मधून नुकताच लागवड केलेली गुलाबाची रोपे आम्हाला खुणावत असत! पण आज त्या विरळ वाटिकेचे एका मोठ्या रोज गार्डन मध्ये रूपांतर झालेले होते. आम्हाला त्या विस्तीर्ण रोज गार्डनच्या परिसरांमधून दूर वर सफेद रंगाची ‘डुंगमाळी रिसॉर्ट’ इमारत दिसू लागली.  जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हा रिसॉर्ट मनात घर करून रहाण्याचे कारण म्हणजे तेथून दिसणारे  कांचनजंगा पर्वतरांगांचे सूर्योदयाचे वेळी दिसणारे विहंगम दृश्य!

लोचनने आमची गाडी रोज गार्डनच्या प्रवेशद्वारापाशी आणून उभी केली. आमच्या आश्चर्याला पारावर राहीला नाही. अंदाजे दोन हेक्टर जमिनीच्या क्षेत्रामध्ये फुलविलेले रोज गार्डन त्याच्या पूर्ण स्वरूपात आकाराला आलेले होते! सोलोफोकचे मुख्य आकर्षण म्हणजे ही गुलाबांची बाग! गुलाबांचे विविध प्रकार या बागेत पाहावयास मिळतात. इथे पन्नासाहून अधिक प्रजातींचे गुलाब आणि इतर फुलझाडांनी ही बाग बहरलेली आहे. गुलाबा व्यतिरिक्त मॅरीगोल्ड, डेलिया, ख्रिसॅंथस वगैरे जातीची फुले देखील मुबलक आहेत. मोठ्या क्षेत्रफळात विस्तारलेले अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित देखभाल केलेले हे एक छान उद्यान आहे.  बागेत एक कॅफे सुद्धा आहे. बगीच्यामध्येच पर्यटकांसाठी रोपे खरेदी करण्यासाठी एक नर्सरी देखील आहे. सोलोफोक मधील गुलाबांची बाग नामची मधल्या इतर पर्यटन स्थळांच्या जवळपास असल्या कारणास्तव हे गार्डन हाही एक पर्यटकांसाठीचा आकर्षण बिंदू आहे.  आम्ही त्या बागेत खूप वेळ रमलो.

परंतु आता संध्याकाळ होत आलेली होती. त्यामुळे आम्हाला आमचा पुढचा टप्पा गाठणं आवश्यक तर होतच पण आम्हाला जोरेथांगला सोडून लोचेनला पुन्हा पेलिंगला परतायचे होते. आम्ही नामची मधून काढता पाय घेत प्रवासाला सुरुवात केली. लोचेनने आम्हाला नामचीच्या हेलिपॅडवर नेऊन गाडीतूनच ३६० डिग्रीच्या कोनातून सभोवारच्या पर्वतरांगांची सुंदर निसर्ग दृश्यांची नजरभेट घडवली.

बैगुनी – जोरेथांग

जोरेथांगपासून तीन किलोमीटर अलीकडे रंगीत नदीच्या किनारी क्लब महिंद्र- बैगुनीचा रिसॉर्ट अगदी मुख्य रस्त्यावरच आहे. रिसॉर्ट पासून काही अंतर शिल्लक असताना लोचेनने आमची गाडी एका पुलापाशी त्याच्या ओळखीच्या गृहस्थाच्या लिचीच्या बगीच्या जवळ थांबवली. दुतर्फा लीचीची झाडे फळांनी लगडलेली होती. त्या माणसाने आम्हाला अगदी झाडावरून खुडून लीची खाण्यास दिली. साधारण संध्याकाळी पावणे सात वाजता आम्ही बैगुनी मुक्कामी पोहोचलो. एकंदरीत पेलिंग ते नामची हा प्रवास सुंदर निसर्गाच्या सानिध्यातून झाला. हवामान सुद्धा छान होते.  परंतु बैगुनीला पोहोचताच थोडा भ्रमनिरास झाला. कारण खोऱ्यामध्ये तुलनेने कमी उंचीवर वसलेल्या बैगुनीचे तपमान अस्वस्थ करणारे होते! पेलिंगला पंखे नव्हते तर बैगुनीला पंखे आणि एसी शिवाय बसणे शक्यच होत नव्हते. तेथील रिसॉर्ट मॅनेजर कडून समजले की, सिक्किम मधील सर्वात अधिक तपमान असणारे गाव म्हणजे जोरेथांग! आम्ही रिसॉर्टवर पोहोचेपर्यंत काळोख झालेला होता. दुर्दैवाने आम्हाला देण्यात आलेल्या खोलीचा एयर कंडीशनर नादुरुस्त झाल्याने चालत नव्हता. अक्षरशः खोलीमध्ये बसवत नव्हते इतके गरम हवामान होते! खूप हुज्जत घालून ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ याप्रमाणे दोन रात्रींसाठी तीन खोल्या बदलल्या! बऱ्याच हिकमतीने मिळविलेल्या खोलीच्या मोठ्या खिडकीच्या तावदानांमधून दूर डोंगरावर दार्जिलिंगचे लुकलुकणारे दिवे रात्री ढगांच्या आडून दिसत होते. आम्ही दिवसभरच्या प्रवासाने थकलो होतो. त्यामुळे जेवून झोपी गेलो.

दुसर्‍या दिवशी सकाळी रिसॉर्ट परिसर न्याहाळता आला. रिसॉर्टचा परिसर छान होता परंतु फार वर्दळ नव्हती. जवळच्या डोंगरावर हिरवीगार वनराजी आणि त्यावर अलगद तरंगणारे ढग त्या उष्म्यामध्ये नजरेला दिलासा देणारे वाटले. रिसॉर्टच्या मागील बाजूस नदी वाहत होती. नदीवर जाण्यासाठी रिसॉर्ट मधूनच एक वॉक वे तयार केलेला होता. आम्ही जोरेथांगचा फेरफटका झाल्यावर संध्याकाळी नदी किनारी जाण्याचा बेत ठरवला.

आम्ही नाश्ता उरकून जोरेथांग शहरापर्यंत तीन किलोमीटर पायी फेरफटका मारला.  जोरेथांग शहराच्या जवळ आल्यावर तीन रस्ते दिसू लागले. नयाबाजार -जोरेथांग नगर पंचायतच्या सौजन्याने मोठा दिशा दर्शक फलक अंतरासह उभारलेला होता. त्या जंक्शनकडून एक रस्ता दार्जिलिंग कडे तर दूसरा विरुद्ध बाजूला पेलिंगच्या दिशेने आणि काटकोनात तिसरा एका पूलावरून जोरेथांग शहराकडे जात होता!

जोरेथांग म्हणजे सिक्किमच्या नामची जिल्ह्यातील एक प्रमुख शहर. जोरेथांग रंगीत नदीच्या काठावर वसलेले आहे. रंगीत नदी तिस्ता नदीची उपनदी आहे. दार्जिलिंग, सिलिगुडी आणि कॅलिंगपोंग कडून पेलिंगला जाणाऱ्या मार्गावर जोरेथांग वसलेले आहे. जोरेथांग येथील दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांतीच्या सुमारास होणाऱ्या “माघे मेला” ह्या सांस्कृतिक महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. या महोत्सवात राज्यातून पारंपरिक नृत्य कला आणि हस्तकला ह्यांचे प्रदर्शन भरविले जाते. हा महोत्सव म्हणजे एक कृषी मेळा देखील असतो, ज्यामुळे महोत्सवाचे वेळी स्थानिक आणि पर्यटक हे सारख्या संख्येने आकर्षित होतात. पेलिंग मध्ये अनुभवलेली सुखद थंड हवा आणि जोरेथांगचे दमट हवामान याची मनामध्ये साहजिकच तुलना होऊ लागली. 

जोरेथांग शहरावर ब्रिटिश कालीन शहर नियोजनाचा छाप आहे. सर्वसाधारण सिक्किममध्ये मुख्य शहरांवर तो जाणवतो! आम्ही जोरेथांगच्या गांधी चौक, मुख्य बाजारपेठेत फेरफटका मारला. बाजारामध्ये एके ठिकाणी “चुरपी” म्हणजे अत्यंत कडक चीज विकण्यासाठी ठेवलेले होते. हिमालयीन प्रांतात पौष्टिक, प्रथिनेयुक्त दीर्घकाळ टिकणारे पारंपरिक पद्धतीने बनविलेले चीज – चुरपी मुबलक प्रमाणात सिक्कीमी लोकांच्या खाद्यसंस्कृतीमध्ये वापरले जाते.

जोरेथांग शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत फिरून पोटात कावळे ओरडू लागले! जोरेथांग कडून बैगुनीकडे जाणाऱ्या पुलाजवळच चौकात एक सिक्किमच्या पारंपरिक लंच थालीचा फलक दिसला. सर्व साधारणपणे नेपाळी खाद्य संस्कृतीचा पगडा सिक्किमच्या खाद्य पदार्थ अथवा पाककृतींवर जाणवतोच! ह्या थाळी मध्ये प्रामुख्याने भात, आंबवलेल्या पाले भाज्यांपासून बनवले जाणारे गुंद्रुक, तांदळापासून बनवली जाणारी कुरकुरीत वर्तुळाकार सेल रोटी, आंबवलेल्या सोयाबीन पासून बनवलेली किनीमा करी, चुरपी सॅलड, बांबूच्या कोंबाची करी, आलू दम, इत्यादि पदार्थ आवर्जून असतात. सिक्किम राज्याचा निरोप घेण्यापूर्वी पारंपरिक थाळीचा मनमुराद आस्वाद घेऊन आम्ही पुन्हा आमच्या रिसॉर्ट वर परतलो.

बैगुनी रिसॉर्टच्या मागील बाजूस रंगीत नदी वाहत होती. परंतु नदीचे पात्र आटलेले होते. सूर्यास्तापूर्वी रिसॉर्ट जवळील नदी पात्राला भेट दिली. नदीच्या दुसर्‍या तीराला असलेल्या गर्द वनराजीमध्ये आपापल्या घरट्यात परतणाऱ्या पक्षांची किलबिल ऐकू येत होती. नदी किनारी कातरवेळ आम्हालाही आता आपापल्या घरची ओढ जाणवून देऊ लागली. काही क्षण तिथेच दगडावर बसून आजूबाजूच्या वनराजीचा आणि शांत परिसराचा आनंद घेऊन आम्ही आमच्या खोलीकडे मोर्चा वळविला.  रिसॉर्टवर जाऊन सामानाची बांधाबांध केली. सुट्टी संपलेली होती!

दुसर्‍या दिवशी सुट्टीचा शेवटचा दिवस! अगदी घाई गडबडीने प्रवासाला निघायचे नसल्याने आम्ही सकाळी निवांत उठलो, आणि अगदी “laid back lifestyle” चा आनंद घेत बाल्कनीमध्ये बसून ‘plein air stone painting’ चा आनंद घेतला. आमचे ‘स्टोन पेंटिंग’ रिसॉर्ट मॅनेजरने अगत्याने ठेवून घेतले. साधारण दुपारी आम्ही बैगुनीचा निरोप घेऊन बागडोगराकडे प्रयाण केले. संध्याकाळी चहाच्या वेळेपर्यंत आम्ही बागडोगरा येथे पोहोचलो. विमानतळाजवळच एका होम स्टे मध्ये राहण्याची सोय केली आणि दुसर्‍या दिवशी लवकरच सकाळच्या विमानाने आपापली शहरे गाठली!   

आपल्या देशाचे भौगोलिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वैविध्य इतके सुरेख आहे की, ते पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी एक जन्म अपुरा पडावा! म्हणायला सिक्कीम अगदी छोटा प्रांत! पण त्याच्या चार दिशांचे भाग पहाण्यासाठी दोनदा सिक्कीम प्रांताला भेट द्यावी लागली! तरीही काही भाग बघण्याचा अद्यापही बाकी आहे. पेलिंग भेटीनंतर नॉर्थ सिक्कीमची पहिली हिवाळ्यातली भेट आठवली. काही प्रांतांचे भिन्न ऋतूंमधील वैविध्यपूर्ण सौंदर्य अनुभवण्याचा आनंद काही वेगळाच असतो! लवकरच भेटू पुन्हा थंडीच्या मोसमातील नॉर्थ सिक्कीममध्ये !

क्रमशः


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑