सिक्कीम डायरीज् : भाग ४

प्रवास वर्ष: डिसेंबर २०१८

मे २०२५ मधील पेलिंगभेटीमुळे साहजिकच डिसेंबर २०१८ मध्ये नाताळच्या सुट्टीत सिक्किमची राजधानी – गंगटोकला केलेल्या भटकंतीच्या स्मृती जागृत झाल्या! हिवाळ्यात अनुभवलेले सिक्किम एका वेगळ्या आठवणींचा खजिना देऊन गेले होते! सिक्किमच्या प्रादेशिक रचनेमध्ये इतकी विविधता आहे की, सिक्किमच्या उत्तरेकडे गेल्यास, अगदी आपण टून्ड्रा प्रदेशासारख्या बर्फाळ प्रदेशात गेल्याचा अनुभव घेऊ शकतो. त्यावेळी सुद्धा नाताळाच्या सुट्टीत मला अगदी लॉटरी लागल्याप्रमाणे आठवडाभर पूर्वी शेवटच्या क्षणी क्लब महिंद्रचे गंगटोक रिसॉर्टचे तीन दिवसाचे बुकिंग मिळालेले होते. २३ डिसेंबर २०१८ रोजी मी सकाळच्या विमानाने मुंबईहून निघून साधारण ११:३० वाजता बागडोगरा विमानतळ गाठले. माझी सखी, ट्रॅवल पार्टनर दिल्लीहून येणार होती. परंतु दिल्लीला धुक्याने कवेत घेतल्यामुळे मा‍झ्या मैत्रिणीच्या विमानाचे आगमन प्रचंड विलंबाने झाले! माझा बागडोगरा विमानतळावर सकाळचा चहा, ब्रंच, दुपारचा चहा झाला. अगदी ‘हाय टी’ देखील झाला! बागडोगरा विमानतळावरील हा प्रतीक्षेचा कालावधी, माझी चहाचे कप रिते करण्याची परीक्षा घेणारा ठरला! सरतेशेवटी मैत्रीण संध्याकाळी ४ वाजता बागडोगरा विमानतळावर पोहोचली!

हिवाळा असल्याने पूर्वेकडे लवकरच अंधारून येते. आम्ही विमानतळावरून सिलीगुडी टॅक्सी स्टँडकडे निघालो. तिथून शेअर टॅक्सीने गंगटोकला जाण्याचे ठरविले. खरं तर मी खूपच कंटाळलेले होते. त्या शेअर टॅक्सीमधील अनोळखी प्रवाशांचा दाटी-वाटीने असलेला वावर अत्यंत अस्वस्थ करणारा होता. साडे आठ-नऊच्या सुमारास आमची जीप रात्रीच्या जेवणासाठी एका धाब्यावर थांबली. जेवणाची थाळी, पेला, पाण्याचे भांडे अगदी सर्व पितळी भांडी! पारंपरिक सिक्किम थाळी समोर आली! दिवसभराचा क्षीण इतका होता की, झटपट पोटपूजा करून पुन्हा आम्ही जीपमध्ये आसनस्थ झालो. वास्तविक साडे चार-पाच तासांचा प्रवास, पुन्हा दोन राज्यांमध्ये वाहने नेण्यास असलेले काही निर्बंध त्यामुळे प्रवासाचे नियोजन नसल्यास अश्या रात्रीच्या वेळी प्रवास अनुभव कंटाळवाणा ठरू शकतो! आणि दिवस प्रतीक्षेत गेल्यावर तर काही विचारूच नये!   आम्ही रात्री साडे दहाच्या सुमारास देवराली टॅक्सी स्टँडच्या प्रवेशद्वाराजवळ उतरलो. तेथून आम्हाला दुसरी टॅक्सी पकडून क्लब महिंद्रा रिसोर्टकडे जायचे होते. तेवढ्या रात्री एक रमेश नावाचा टॅक्सी चालक आम्हाला नशीबाने भेटला! रात्री ११:०० वाजता आम्ही गंगटोक क्लब महिंद्र रिसॉर्टवर पोचलो. दिवसभराचा शीण इतका होता की कधी एकदा अंतर संपते असे झाले. जमेची बाजू एकच रमेशला आम्ही आमच्या गंगटोक स्थळ दर्शनासाठी बांधिल करून निश्चिंत मनाने झोपी गेलो.

गंगटोक नाताळसाठी अगदी सुसज्ज झाले होते. रिसोर्टच्या स्वागत कक्षामध्ये खूप छान सजावट केलेली होती. सकाळी मनसोक्त नाष्टा उरकून आम्ही गंगटोक स्थळ दर्शनासाठी तयार झालो. रमेश गाडी घेऊन रिसोर्टच्या आवारात तयारच होता. क्लब महिंद्रचे रॉयल डेमाझोंग रिसॉर्ट  गंगटोक शहरापासून थोडे दूर होते. रिसॉर्ट परिसरातून अत्यंत सुंदर निसर्ग दृश्य दिसत होते.

गंगटोक

गंगटोक, सिक्किम राज्याची राजधानी व राज्यातील सर्वात मोठे शहर! पूर्व हिमालयाच्या शिवालिक पर्वतरांगेत समुद्र सपाटीपासून सुमारे ५,४१० फूट इतक्या उंचीवर वसलेले हे शहर येथील बौद्ध मठांमुळे, सुंदर निसर्गामुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करणारे हे एक निसर्गरम्य शहर आहे. इ.स. १८४० मध्ये येथे एक मोठा बौद्ध मठ बांधला गेला ज्यामुळे गंगटोकचे महत्त्व वाढू लागले. इ.स. १८९० मध्ये सिक्किम राज्यतंत्राची राजधानी गंगटोकला स्थलांतरित केली गेली. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ल्हासा ते कलकत्ता खुष्कीच्या मार्गावरील एक विसाव्याचे ठिकाण म्हणून गंगटोक नावारूपाला आले. सन १९७५ दरम्यान सिक्किमच्या भारतामध्ये विलीनि‍करणानंतर गंगटोक ही नव्या सिक्किम राज्याची राजधानी बनली. सिक्कीम राज्याला त्याचा असा प्राचीन इतिहास आहे.

हिमालयाच्या पर्वतरांगेत तीस्ता नदीच्या काठावर वसलेले गंगटोक खरं तर येथून दृष्टीस पडणाऱ्या कांचनजंगा पर्वत शिखरांच्या विहंगम दृश्यासाठी प्रसिद्ध आहे. ‘नाथू ला’ ही सिक्किमला तिबेटसोबत जोडणारी खिंड गंगटोक पासून ४० किमी अंतरावर आहे. अगदी प्राचीन काळापासून व्यापारासाठी तिबेट आणि पश्चिम बंगाल ह्या ठिकाणांना जोडणारा ‘सिल्क रूट’ हा एक महत्त्वाचा दुवा होता. पूर्वी ल्हासा आणि ताम्रलिप्त (आताचे तामलूक) बंदरादरम्यान रेशीम, चहा, मसाल्याचे पदार्थ ह्याच्या वाहतुकीसाठी ‘नथू ला’ खिंड आणि ‘झुलूक’ मार्गे हा व्यापारी मार्ग म्हणून प्रचलित होता. अगदी चीनने तिबेटवर आक्रमण करेपर्यंत आणि त्यानंतर १९६२ च्या सुमारास भारत-चीन सीमा बंद होईपर्यंत हा मार्ग सक्रिय होता. आता मात्र हा ऐतिहासिक मार्ग निसर्गरम्य सौन्दर्य, ट्रेकिंग आणि सुंदर ड्राइवसाठी प्रसिद्ध आहे. खास झुलूक आणि सिल्क रूट ह्यासाठी स्वतंत्र भटकंतीचे पॅकेज अनेक ट्रॅवल कंपन्या देत असतात. थोडक्यात सिक्कीमची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावरच आधारित आहे! पर्यटनासोबत शेती हा देखील येथील प्रमुख व्यवसाय आहे.

गंगटोक स्थल दर्शनासाठी येथील पर्यटन संस्थानी सात किंवा दहा पॉईंट्स समाविष्ट करून एक itinerary बनविलेली आहे. त्यानुसार पर्यटकांना स्थळ दर्शन करविले जाते. आम्ही खासगी गाडी निश्चित केल्याने त्या पॉईंट्स पैकी आमच्या आवडीनुसार आणि अगदी ‘must do’ पॉईंट्स निवडून आमची दोन दिवसाची स्थळ दर्शनाची यादी रमेशला हाती सोपवून आम्ही गंगटोकचा आनंद घेण्यास सज्ज झालो.  

रूमटेक मोनेस्ट्री   

गँगटोकच्या वास्तव्यातील पहिल्या दिवशी, आमची स्थल दर्शनाची सुरुवात रूमटेक मोनेस्ट्रीने झाली. सिक्किमच्या राजधानीमध्ये स्थित असलेला हा एक प्रसिद्ध बौद्ध विहार आहे. गंगटोक पासून साधारण २४ किलोमीटर अंतरावर गर्द हिरव्या पाइन वृक्षांच्या पार्श्वभूमीने सजलेल्या एका उंच टेकडीवर रूमटेक मोनेस्ट्री आहे. सिक्किम मधील सर्वात मोठा बौद्ध मठ असून तिबेट मधील मूळ त्सुरपू येथील कर्मा काग्यू पंथाच्या मोनास्ट्रीची हुबेहूब प्रतिकृती असल्याचे सांगीतले जाते. रूमटेक मठाला धर्मचक्र केंद्र असेही म्हटले जाते. तिबेटीयन वास्तु शैली मध्ये बांधलेला हा मठ चार मजली इमारतीच्या स्वरूपात असून त्यामध्ये भिक्षूंचे निवास स्थान,  प्रशिक्षण केंद्र आणि सुवर्ण स्तूप अशी रचना आहे. रूमटेक मठ हा १७ वे ग्यालवा कर्मापा – थाये दोरजे ह्यांचे निर्वासनातील मुख्य स्थान आहे. मठामध्ये दुर्मिळ बौद्ध धार्मिक कलाकृती जतन केलेल्या आहेत. सिक्किमचे राजे, चौथे चोग्याल ग्यूर्मेद नामग्याल ह्यांच्या आश्रयाखाली ९ व्या कर्मपा वांगचूक दोरजे हयानी मूळ रूमटेक मठाची स्थापना केली. रूमटेक मठ म्हणजे सिक्किममधील काग्यू परंपरेचे केंद्रस्थान आहे.

आम्ही वाहनतळापासून मठाच्या दिशेने चालत निघालो. मठाकडे जाताना लावलेल्या प्रार्थना चक्रांना न विसरता गती दिली आणि आमची प्रार्थना भगवंतापर्यंत पोहोचवावी अशी मनोमन कामना केली. मठाचा परिसर विस्तीर्ण आहे. मठामध्ये प्रवेश करताच निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे स्थळ आपल्या मनाचा ठाव घेते! मठाचे विस्तीर्ण प्रांगण आणि भोवतालची गॅलेरी सदृश सज्जा आपले लक्ष वेधून घेतो. तेथून अवघ्या गंगटोकचे दर्शन घडते.

मठाच्या प्रांगणात प्रवेश करताच मठाच्या परिसरात होणार होणारा घंटानाद आणि तेथील धुपाचा दरवळ त्या पर्वतीय हवेमध्ये मिसळून आपल्या जाणि‍वेचा ताबा घेतो. तेथील पवित्र आणि प्रसन्न वातावरण आपले मन शांत करते. लाकडाच्या अलंकारीक  जाळीने मढवलेला आणि तिबेटीयन पारंपरिक कलेने विविध चमकदार रंगामध्ये चितारलेल्या कलाकृतींनी सजलेला नेटका मुख्य मठाचा दर्शनी भाग आणि प्रांगण आपले लक्ष वेधून घेतात. प्रार्थना कक्षात बौद्ध गुरु, राक्षस, आणि डाकिनी यांच्या रंगीत भित्तिचित्रांसह रंगीत थांगका देखील प्रदर्शित केलेले आहेत. मुख्य मठाच्या मागील बाजूस कर्मा श्री नालंदा बुद्धिस्ट स्टडीज इंस्टीट्यूट आहे. रूमटेक मठातील सर्वात भव्य आणि व्यस्त असा हा इमारतीचा परिसर आहे. येथे बौद्ध भिक्षूंचे वसतिस्थान, त्यांच्या खान-पान व्यवस्था अश्या गोष्टीचे व्यवस्थापन केलेले आहे. भिक्षू येथे बौद्ध धर्माच्या सिद्धांतांचा अध्ययन करण्यात अनेक वर्षे व्यतीत करतात. बौद्ध धर्माच्या कर्मा काग्यू संप्रदायाचा हा प्रमुख मठ, रंगीबेरंगी प्रार्थना पताका, मंत्रोच्चार आणि ध्यानधारणा यामुळे एक वेगळंच आध्यात्मिक वातावरण मठाच्या परिसरात जाणवते. तिथल्या भिक्षूंच्या शांत मुद्रेवरील शांत स्मित आपल्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही.

बन झाखरी फॉल्स आणि एनर्जी पार्क

रूमटेक मोनेस्ट्रीच्या भेटीनंतर आम्ही बन झाखरी फॉल्स आणि एनर्जी पार्ककडे निघालो. बन झाखरी फॉल्स हा गंगटोक शहरापासून अर्ध्या तासांच्या अंतरावर असलेले एक पर्यटनस्थळ आहे, जिथे निसर्गसौंदर्य आणि स्थानिक लोककथांचा सुरेख संगम अनुभवता येतो. उत्तर सिक्कीमकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गंगटोकपासून अवघ्या ७ किमी अंतरावर असलेला घनदाट जंगलाने व्यापलेल्या परिसरात दोन एकर वन क्षेत्रात निर्माण केलेला बन झाखरी फॉल्स पार्क म्हणजे निसर्गाच्या कुशीत आधुनिकतेने पारंपारिकतेशी साधलेला मेळ आहे. प्रामुख्याने साधारण १०० फुट उंचीवरून कोसळणार्‍या नैसर्गिक धबधब्यामुळे हे पर्यटन स्थळ अधिक लोकप्रिय आहे.

सिक्किमच्या प्राचीन जाती-जमातींच्या पूर्वजांच्या स्मरणार्थ ह्या पार्कमध्ये त्यांच्या रहाणीमान, संस्कृतीविषयी पुतळे आणि शिल्पामधून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या प्राचीन उगमाशी जोडून राहण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. बन झाखरी ह्या नावाशीच ह्या परिसराची कथा निगडीत आहे. बन म्हणजे ‘वन’ आणि ‘झाखरी’ म्हणजे उपचार करणारा! स्थानिक लोकांची अशी मान्यता आहे की,  जंगलातील गुहेत राहणारी, आत्म्यांची पूजा करणारी ही जमात ‘शमनिक’ ह्या पारंपरिक पद्धतीने एखाद्यावर उपचार करत असे! सिक्किमच्या किरा‍ती समुदायाचे पूर्वज ल्याम लामे ह्यांचे तसेच विविध मंगपा, जाखरी, बोंगथिंग, फेडांगबा, बिजुवा ह्या शमन जमातींचे पुतळे, शिल्पे तिथे पाहावयास मिळतात. गवताने शाकारलेली कुटिरे, अतिशय नैसर्गिक साधन सामुग्रीचा उपयोग करून बनवलेली घरे ह्यांच्या प्रतिकृतींमधून ह्या जमातींचे रहाणीमान कसे असावे ह्याचे चित्र ह्या उद्यानामध्ये उभे केलेले आहे. उद्यानामध्ये छोटे लाकडी पूल, फरसबंदी पायवाटा, गॅझेबो उभारलेले आहेत.

अक्षय ऊर्जेच्या वापराबाबत आणि नूतनीकरणाबाबत तसेच पर्यावरणपूरक ऊर्जेच्या वापराबाबत उद्यानामध्ये काही गोष्टी संग्रहित केलेल्या आहेत. उद्यानामध्ये सौर उर्जेवर चालणारे दिवे आहेत.  उद्यानामध्ये मानवनिर्मित लेक देखील आहे. एकूणच उद्यानाचा फेरफटका मनाला तजेला देऊन गेला. सूर्यास्ताची वेळ झालेली होती. आम्ही उद्यानामधून बाहेर पडलो आणि लगतच असलेल्या एका छोट्या धाब्यावर गरमागरम चहा-पकोडासाठी थांबलो. आजूबाजूची हिरवीगार वनराई, आल्हाददायक हवा, अस्ताला जाणारा सूर्य, त्याच्या अभेने अवघ्या क्षितिजावर केलेली रंगांची उधळण ह्या सगळ्या अनुभवांनी मन अगदी उल्हसित झाले. आम्ही तेथून पुन्हा आमच्या रिसॉर्ट कडे निघालो. रिसॉर्टवर पोहोचताच नथूला पास येथे जाण्यासाठी परमीटची काही व्यवस्था होईल का ह्याची ट्रॅवल डेस्ककडे चौकशी केली पण काही योग नव्हता! आम्ही आमच्या खोलीमध्ये जाऊन विसावलो!

गंगटोक शहर दर्शन

गंगटोक वास्तव्याचा दूसरा दिवस आम्ही स्थानिक प्रेक्षणीय स्थळे पहाण्यासाठी राखीव ठेवला होता. आम्हाला सलग दुसर्‍या दिवशीसुद्धा ‘नथू ला’ पासला जाण्यासाठी लागणारी आवश्यक परवानगी बर्फ वृष्टीमुळे मिळू शकली नाही. त्यामुळे आम्ही गंगटोकच्या वज्र परिसरात असणाऱ्या टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटरवर गेलो. पण तिथेही काही हाती पडले नाही, मग त्या परिसरात एका स्थानिक ट्रॅवल एजेंट मार्फत नॉर्थ सिक्किमची दोन दिवसाची सहल निश्चित केली आणि गुरुडोंगमार लेक पहावयास मिळणार ह्या आनंदातच गंगटोक शहराच्या स्थलदर्शनासाठी बाहेर पडलो.

भक्तांग धबधबा

आजचे स्थल दर्शन भक्तांग धबधब्याने सुरू झाले! गजबजलेल्या गंगटोक शहरापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर लष्करी छावणी क्षेत्राजवळच्या ‘स्वस्तिक’ परिसरामध्ये उत्तर सिक्कीमला जोडणाऱ्या ३१अ राष्ट्रीय महामार्गावर भक्तांग धबधबा आहे. Ratey Chu नदीच्या प्रवाहातून उगम पावून अनेक जलधारांमध्ये हिरवळीने व्यापलेल्या खडकावरून भक्तांग धबधबा एका लहान तलाववजा कुंडामधे खाली कोसळतो. धबधब्याच्या पायथ्याशी एक छोटा पूल आहे, जिथून धबधब्याचा संपूर्ण नजारा टिपता येतो. ह्या धबधब्याजवळ सिक्किमी पोशाख परिधान करून फोटो काढण्याची सोय आहे. येथे स्थानिक महिला पारंपरिक सिक्किमी पोशाख भाड्याने देतात. धबधब्या जवळच्या कॅफेटेरियामध्ये गरमागरम ‘लेमन जिंजर टी’चे घुटके घेताना त्या हिरवळीवरून कोसळणार्‍या जलधारांचे मंजुळ संगीत ऐकत तेथील सुखद हवेचा स्पर्श अनुभवणे हाही एक आनंदी अनुभव आहे! गंगटोक शहराचे स्थळदर्शन करविणाऱ्या स्थानिक टॅक्सींमध्ये हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र म्हणून आवर्जून समाविष्ट केले जाते.

नेहरू बोटॅनिकल गार्डन

रूमटेक मोनास्ट्रीकडे जाणाऱ्या महामार्गावर जवाहरलाल नेहरू बोटॅनिकल गार्डन आहे.  १९८७ साली सिक्किम सरकारच्या वन विभागाने ह्या बागेची स्थापना केली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने ही बाग ओळखली जाते, ज्यांनी विज्ञान, पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले.

गँगटोकच्या डोंगर-टेकड्यांवर वसविलेला उद्यानाचा निसर्गरम्य परिसर म्हणजे निसर्गप्रेमी, पर्यावरण शास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि जैवविविधतेच्या अभ्यासकांसाठी एक जीवंत प्रयोगशाळा म्हणून आवर्जून पहावे असे ठिकाण! सिक्किम सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या ह्या उद्यानामध्ये पन्नासपेक्षा अधिक प्रकारचे वृक्ष, दुर्मिळ ऑर्किड्स, रंगीबेरंगी फुलझाडे आणि औषधी वनस्पती आढळून येतात. विविध रंग, आकार, आणि सुगंध असलेल्या ऑर्किड्स एक भव्य ग्रीन हाऊस या उद्यानात आहे, ज्यामध्ये फक्त सिक्किम मध्येच आढळणाऱ्या दुर्मिळ प्रजाती आहेत. पारंपरिक तिबेटीयन आणि हिमालयीन औषधशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या वनस्पती येथे जतन केलेल्या आहेत. रोडोडेंड्रॉन, मॅग्नोलिया, फर्न आणि बांबू यांचे विविध प्रकार येथे पहायला मिळतात. ह्या उद्यानामधील  वनस्पतीची विविधता म्हणजे हिमालयीन जैवविविधतेचे एक जिवंत प्रदर्शनच आहे.

ह्या उद्यानात फेरफटका मारताना, पायवाटेवरून चालताना पक्ष्यांचे आवाज, फुलांचे रंग, सुखद हिमालयीन वाऱ्याची झुळूक आणि हिमाच्छादित पर्वत शृंखलांचे विहंगम दृश्य  आपल्याला अगदीच सुखावून जाते. विविध टप्प्यांमध्ये विकसित केलेल्या ह्या उद्यानाचा फेरफटका मारताना थकल्यास खुशाल एखाद्या कोपर्‍यात झाडाखाली असलेल्या बाकड्यावर बसून निसर्गाच्या कुशीत पहुडल्याचा आनंद घेत काही क्षण निसर्ग संगीत ऐकत समोर दिसणार्‍या हिम पर्वतांशी हितगुज करीत बसावं! स्वच्छ वातावरणात दूरवर पसरलेली बर्फाच्छादित शिखरे स्पष्ट दिसत होती. बागेत फिरताना एखाद्या निसर्ग कवितेत हरवून गेल्यासारखे वाटले! ह्या बागेत फिरताना एका ठिकाणी “Advice From A Tree” च्या फलकाने माझे लक्ष वेधून घेतले!

गणेश टोक

नेहरू बोटॅनिकल गार्डनमधून आम्ही गणेश टोकवर गेलो. गंगटोकच्या उत्तरेकडील भागात मुख्य रस्त्यावर एका छोट्या टेकडीवर स्थित, एक लहान पण अत्यंत सुंदर श्री गणेशाला समर्पित असलेले मंदिर म्हणजे गणेश टोक! मंदिराच्या परिसरात पर्यटकांची अगदी रेलचेल असते. जवळच कॅफेटेरिया असल्याने थोडासा गजबजलेला परिसर वाटतो. मंदिराच्या परिसरात वर्तुळाकार ओपन डेक आहे. तेथून सिक्किम शहराचे विहंगम दृश्य दिसते. उंच पाईन वृक्ष, हिमाच्छादित पर्वत शिखरे, दऱ्या-खोऱ्यांमध्ये अलगद तरंगणारे धुके असा सुंदर नजारा तेथून पाहावयास मिळतो. जणू एखाद्या उत्तम चित्रकाराच्या कुंचल्यांमधून साकारलेला उत्तम निसर्ग देखावा! आम्ही मंदिरात दर्शन घेऊन गोलाकार डेकवरून एक परिक्रमा करून अगदी ३६० अंशाच्या कोनामधून त्या निसर्ग देखाव्याचा आनंद घेतला आणि काढता पाय घेतला. आमच्या स्थळ दर्शनाच्या यादीमधील काही ठिकाणे आम्हाला अंधारून येण्याआधी पहावयाची होती!

हिमालयीन झूलॉजीकल पार्क

गणेश टोकाजवळच हिमालयीन झूलॉजीकल पार्क आहे. गँगटोकच्या हिरव्यागार डोंगर टेकड्यांमध्ये निसर्गाच्या कुशीत वन्यजीवांचा अधिवास असलेले ठिकाण म्हणजे हिमालयीन झूलॉजीकल पार्क! बुलबुले भागात साधारण १९९१ च्या दरम्यान स्थापना झालेले हे प्राणिसंग्रहालय उत्तर-पूर्व भारतामधील समुद्र सपाटीपासून ५८६० ते ८००० उंचीवरचे २०५ हेक्टरच्या विस्तीर्ण परिसरामध्ये पसरलेले प्राणी आणि पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात ठेवणारे प्राणिसंग्रहालय आहे. प्रवेशद्वारातून आत चालत वनविहाराचा आनंद काही औरच! प्राणीसंग्रहालयात कॅफे, स्मरणिका दुकान, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि वॉच टॉवर यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. वॉच टॉवरवरून कांचनजंगा पर्वतश्रेणीचे विहंगम दृश्य पाहता येते.  सकाळी ९ ते संध्याकाळी ४ ह्या कालावधीमध्ये प्रत्येक गुरुवार वगळता हे पार्क पर्यटकांसाठी खुले असते. लाल पांडा, हिमालयीन काळे अस्वल, हिमबिबट्या, गोरल, हिमालयीन तितर, मोनल, आणि क्रिमसॉन-हॉर्नड् तितर सारख्या दुर्मिळ आणि लुप्त झालेल्या प्रजाती येथे पाहावयास मिळतात. आम्ही पार्कच्या परिसराचा फेरफटका करेपर्यंत पार्क बंद होण्याची वेळ झाली. पार्क मध्ये दोन लाल पांडा भावंडांचा आपसांमधील खेळ आणि वॉच टॉवर मधून दिसणारी दृश्ये मनात रेंगाळत राहिली!  

गंगटोक रोपे वे

गंगटोक शहराचे, आजूबाजूच्या परिसराचे आणि सभोवार पसरलेल्या हिमालयीन पर्वत रांगांच्या दृश्याचा आनंद घेण्यासाठी गंगटोक रोपे वे म्हणजे केबल राईडचा अनुभव घेतलाच पाहिजे! सुमारे एक किलोमीटर लांबीच्या ह्या केबल राईडमध्ये तीन प्रवेशाची ठिकाणे आहेत. अगदी खालच्या स्तरात देवरालीपासून सुरू होऊन शहराचा उंच भाग ताशीलिंग येथील सिक्कीम राज्य विधानसभा गृहापर्यंत ह्या केबल राईडचा आनंद घेता येतो. साधारण १५ ते २० मिनिटांच्या केबल राईड मध्ये गंगटोक बाजार, सभोवताल दिसणारी दरी-खोरी, आणि गंगटोक शहराचे विहंगम दृश्य दिसते. आम्हाला आमच्या  टॅक्सी चालकाने वज्र परिसराकडून रोपे वे सुरू होतो, त्या देवराली स्टँडवर आणून सोडले आणि सिक्किम राज्याच्या राज्य विधानसभा गृहापाशी जाऊन थांबला. आम्ही देवराली ते सिक्कीम राज्य विधानसभेपर्यंतचा केबल राईडचा आनंद घेऊन तेथून आमच्या गाडीने गंगटोक शहरातील फ्लॉवर एक्झिबिशन सेंटरकडे गेलो.   

फ्लॉवर एक्झिबिशन सेंटर

गंगटोक शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे फ्लॉवर एक्झिबिशन सेंटर आणि त्याच्या वरच्या भागात असलेले रिज पार्क ही ठिकाणे गँगटोकच्या स्थळ दर्शनात जरूर समाविष्ट करण्याजोगी आहेत. गंगटोकच्या एम जी मार्गावरून अगदी चालत जाण्यायोग्य अंतरावर व्हाइट मेमोरियल हॉल जवळ हे एक्झिबिशन सेंटर आहे. येथे वर्षभर फुलांचे प्रदर्शन सुरू असते परंतु एप्रिल-मे महिन्या मध्ये भरविले जाणारे ऑर्किड्सचे वार्षिक प्रदर्शन खास असते. रंगीबेरंगी विविध ऑर्किड्स, अँथुरियम्स, लिलियम्स यांसारख्या दुर्मिळ प्रजातींचा संग्रह हयाठिकाणी केलेला पहावयास मिळतो. ह्या पुष्प प्रदर्शनीमधील कृत्रिम तलाव आणि त्यावर बांधलेला छोटासा पूल, त्यामध्ये तयार केलेले कारंजे हे सर्व काही आपल्याला अगदी फोटोग्राफीसाठी मोहात टाकते! येथे फुलांच्या बिया आणि रोपे विक्रीस उपलब्ध असतात.

ह्या पुष्प प्रदर्शनीच्या आवारातूनच वरच्या दिशेला रिज पार्ककडे एक रस्ता जातो. रिज पार्क हे पर्यटकांसाठी विकसित केलेले एक आकर्षक पर्यटन स्थळ आहे आणि हा राजवाड्याच्या दरवाजाकडे जाणारा एका सरळ रस्त्याचा छोटा भाग आहे. हा मुख्य बाजारपेठेपासून साधारण पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे. रिजमध्ये व्हाइट हॉल आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान, ज्याला मिन्टोकगांग असे म्हणतात, म्हणजे फुलांच्या मुकुटाने सजलेली टेकडी! दुसऱ्या टोकाला पॅगोडा छत असलेले सुंदर डिझाइन केलेले राजवाड्याचे दरवाजे आहेत. व्हाइट हॉलच्या वरच्या भागामध्ये भारताचे माजी पंतप्रधान नेहरू यांचा पुतळा आहे. व्हाइट हॉल १९३२ मध्ये सिक्कीमच्या पहिल्या राजकीय अधिकाऱ्याच्या, क्लॉड व्हाईट यांच्या स्मृतीसाठी बांधला गेला होता. व्हाइट हॉल ही एक छोटी दोन मजली पारंपरिक ब्रिटिश वास्तुकलेचा प्रभाव असणारी इमारत आहे. रिजवरच एक सुंदर सिक्कीमी डिझाइन केलेले पर्यटकांसाठी विश्रांती थांबा देखील आहे. रिजच्या दोन्ही बाजूंनी सजावटीची झाडे आणि फुलझाडे लावली आहेत.

गंगटोकचे आकर्षण : महात्मा गांधी मार्ग

एव्हाना काळोख झाल्याने आम्ही आमच्या रिसॉर्टचा रस्ता पकडला! दिवसभर स्थळ  दर्शनाच्या पायपि‍टीच्या उतार्‍यासाठी संध्याकाळचा चहा तर हवाच! चहा घेऊन आम्ही परत गंगटोकच्या प्रसिद्ध एमजी मार्गावरून फेरफटका मारण्यासाठी सज्ज झालो. नाताळासाठी संपूर्ण एमजी मार्ग रोषणाईने झगमगत होता. अगदी नीटनेटका आणि स्वच्छ असा गंगटोक शहराचा मुख्य बाजारपेठेचा हा भाग मला उगाचच परदेशातल्या सिटी सेंटरची आठवण देऊन गेला. गंगटोक शहरात ‘सांता बाबा’च्या स्वागताची जय्यत तयारी केलेली होती. एमजी मार्गावर अनेक खाद्य पदार्थ, वस्तूंचे स्टॉल लागलेले होते. अतिशय उत्साहाचे वातावरण होते. हवेत गारवा वाढलेला होता. आम्ही लोकरी कपड्यांनी बंदिस्त होऊन सिक्कीमच्या हिवाळी मोसमाचा आनंद घेत होतो! आम्ही बराच वेळ तिथे रमलो, एका रेस्टोरंट मध्ये थुकपा आणि मोमोज् ह्यांचा आस्वाद घेऊन पुन्हा रिसॉर्टकडे  माघारी परतलो. दुसर्‍या दिवशी आमची उत्तर सिक्किमची सफर सुरू होणार होती!

क्रमशः


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑