नको फिरूस माघारी, आव्हान आहे तुला
अखंड जीवनाची, वाटचाल करायची जिला..
जरी वाट गूढ तरी, करायची आहे धडपड
सहनशीलतेच्या देणगीचे, सखे, तुला ग अभिवचन..
तुझं अंतरंग एक कोडे स्वतः, म्हणू नको जीवनाला दुःखांतिका
हेच ते जीवन खळाळणारे आहे, संधीच्या दिशेने वळणारंही आहे..
जीवनाचे सुर छेडताना, ह्रदयी खेळतं मधूर संगीतही
तार तुटतां तेच संगीत, म्हणते विलापही मीच मी..
होऊ नको मुळी उदास, हा असे गुढ खेळ एक
अमोघ प्रेमाच्या शक्तीचा, असशी तूच परिपाक..
ध्येय तुझं प्रेम आहे, जीवन एक आव्हान आहे
ध्येय तुझं प्रेम आहे, जीवन एक आव्हान आहे ..
बरसात करू नको अव्यक्त आसवांची,
परिसीमा तूच त्या अथांग कर्तव्याची.
कविता मनातल्या: मार्च १९९५
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा