महाकवी कालिदासाने हिमालयाला देवतात्मा अशी उपमा दिली आहे. अश्या ह्या देवतात्मा हिमालयाच्या कुशीत वसलेले उत्तराखंड राज्य! हिमालयाच्या पांच खंडामधील एक केदारखंड! हेच केदारखंड आज उत्तराखंड राज्यामधील गढवाल मंडल म्हणून परिचित आहे. ह्याच गढवाल भूमीत सुमेरु, सतोपंथ, गौरीपर्वत, गंधमादन, स्वर्गारोहिणी, केदारकंठा, बंदरपुंछ, नीलकंठ, चौखम्बा आदि पर्वतश्रेण्या आणि अनादि काळापासून भारतीय संस्कृतीला वंदनीय-पूजनीय असणारे, अखंड भारतवर्षाला सुजलाम-सुफलाम करत निरंतर प्रवाही असणारे गंगा-यमुनेचे जलप्रवाह! अनेकानेक तीर्थस्थळे, मनमोहक निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असणाऱ्या ह्या हिमालयात प्रवेश करताच खरोखर देवभूमीतच आल्याचा आभास होतो. गढवाल हिमालयात होणारी चारधाम यात्रा ही आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याची आणि हृदयाजवळची गोष्ट!
जय बर्फानी बाबा की!
पंचतरणीचा आसमंत अगदी चैतन्यस्वरूप वाटत होता. हयाच पंचतरणीपाशी महादेवाने पंचमहाभूताना त्यागले, तो परिसर एकाच वेळी आप, तेज, वायु आणि आकाश ह्यांची अनुभूति करून देत होता. निरभ्र आकाशात बर्फाच्छादित शिखरांवर पडलेली कोवळी सूर्यकिरणे विलोभनीय होती. पंचतरणीचे जल स्त्रोत त्या किरणांमुळे चमचमत होते. शीतल वायुलहरी पंचतरणीच्या खोऱ्यामध्ये खुशाल रेंगाळत होत्या.