रम्य सरोवरांच्या प्रदेशात

‘‘गर फिरदौस बर रूये जमी अस्त, हमी अस्तो, हमी अस्तो हमी अस्त’’

-आमीर खुसरो

आमीर खुसरो ह्यांनी कश्मिरला दिलेली नंदनवनाची उपमा अगदी यथार्थ आहे. पृथ्वी तलावर कुठे स्वर्गातील नयनरम्य असे नंदनवन असेल तर ते कश्मीर मध्येच वसलेले आहे!  म्हणून तर कश्मिरला भारताचे नंदनवन संबोधले जाते. आणि हे नंदनवन जर अगदी खरोखर अनुभवायचे असेल तर कश्मिरच्या निसर्गरम्य दरी-खोऱ्यामध्ये भटकंती करायलाच हवी! हयाची प्रचीती कश्मीर खोऱ्यामध्ये विस्तीर्ण पसरलेल्या आणि अमर्याद निसर्ग सौंदर्याची उधळण झालेल्या हिमालयाच्या पर्वतरांगांमधून जाणारा “कश्मिर ग्रेट लेक”चा ट्रेक केल्यावर नक्कीच येते. पर्यटकांचा गाजावाजा नाही, मनुष्य वस्ती नाही, फक्त आणि फक्त प्रसन्न, शांत आणि निर्मळ निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त लाभलेल्या दरीखोऱ्या, असीम निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असणारी रम्य अल्पाइन सरोवरे, त्यांच्या स्फटिकासम असणाऱ्या पाण्यामध्ये उमटलेल्या अनेक रंगछटा आणि सुविशाल हिमालय पर्वतांची छबी! सर्व काही मंत्रमुग्ध करणारं !

     खरं तर भारताच्या हया नंदनवनाचा अनेक वर्षे ऱ्हास घडविण्याची प्रक्रिया आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय राजकारणाच्या माध्यमातून चालूच आहे. त्यामुळे पर्यटक देखील अत्यंत साशंक मनाने कश्मीर  सहलीला निघतात. कश्मीरची भटकंती एक नाही तर तीन वेळा केलेली होती, परंतु कश्मिरच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये पायी भटकंती करण्याची पहिलीच वेळ! पर्यटक म्हणून भ्रमंती करणं आणि ट्रेकिंगच्या निमित्ताने दुर्गम भागात दऱ्या खोरी पायी तुडवत भटकणं ह्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. काश्मीरच्या खोऱ्यावर सदैव असलेले दहशतीचे सावट, त्यामुळे ह्यासाठी खात्रीलायक आयोजक अगदी पहिजेच! सन २०१९ मध्ये ‘कश्मिर  ग्रेट लेक’ हया ट्रेकसाठी आम्ही नोंदणी केली होती. परंतू कलम ३७० च्या प्रकरणामुळे भारताचे हे नंदनवन बंदिस्त झालेले होते. त्यानंतर जगविख्यात ‘कोरोना विषाणू’ ने अवघ्या जगाला घरच्या घरीच बंदिस्त केले आणि धुमाकूळ घातला, त्यामूळे आमची २०१९ची मोहीम यूथ हॉस्टेलने रद्द न करण्याची विनंती करून सन २०२१ पर्यंत पुढे ढकलली. एकंदरीत कोरोना संसर्गाने इतके थैमान घातले की सन २०२१ मध्ये सुध्दा हा ट्रेक शक्य होईल का नाही? अशी संदिग्धता होती. परंतु अनेक गोष्टींच्या मर्यादा आणि सुरक्षेच्या सर्व आयुधांसमवेत यूथ हॉस्टेलने जुलै २०२१ मध्ये ‘कश्मिर ग्रेट लेकस्’ ची मोहीम ट्रेकर्स मंडळींसाठी सुरू केली. आम्ही मागील वर्षी नोंदणी केल्याने आम्हाला प्राधान्याने पहिल्या २५ जुलैच्या तुकडीमध्ये समाविष्ट केले गेले. परंतु दोन वर्षानी कोरोंनाच्या साखळदंडातून मोकळे झाल्यागत ह्या ट्रेकला भाऊगर्दी झाली! २५ जुलै तारखेच्या आधीही काही तुकड्यांचे आयोजन यूथ हॉस्टेलने केलेले होते आणि इतर तुकड्यांचे दिवस योजले होते. अगदी जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत आपण ट्रेकला जाऊ शकतो का? हयाबाबत निश्चिती नव्हती! कारण कोरोना संसर्गामुळे विविध राज्यांमध्ये लागू असलेले, सदैव बदलत राहणारे नियम! परंतू यूथ हॉस्टेलच्या ट्रेक संचालकांसोबत बोलणे करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रथम मनोनिग्रह केला! अभी नही तो कभी नही!! कारण माझे इतर सवंगड्यांनी त्यांचा ट्रेकचा मनसुबा पक्का केला होता. हया वेळी बेत रहीत केला असता तर कदाचित ‘ग्रेट लेकस्’ स्वप्नच राहीले असते. अगदी आठवड्यापूर्वीच विमानाचे तिकिट निश्चित करुन ट्रेकची तयारी सुरू केली.

       वैद्यकिय तपासणी, कोरोना चाचणी वगैरे वगैरे! आणि २५ जुलै २०२१ रोजी सकाळी पावणे आठ वाजताच्या विमानाने श्रीनगरकडे कूच केले. विमानतळावरील आणि विमान प्रवासामध्ये आवश्यक तेवढी खबरदारी पाळून विमान कंपन्यांनी प्रवाश्यांची ने-आण करण्यासाठी उड्डाणे सुरू केलेली होती. पण विमान प्रवासात आपला भारतीय गुणधर्म प्रवासी अगदी चोख पाळतातच! आम्हा भारतीयांना नियमांचे काटेकोर पालन अजिबात आवडत नाही. बिचारी हवाईसुंदरी प्रत्येकाला सांगून थकली! ‘‘तुमचा मास्क लावा’’, “तुमचे पीपीई कीट घाला”! पण आम्ही कसले! कोण तो कुठचा चायनिज कोरोना, आमचं काऽऽही वाकडं करत नाही! हीच परिस्थिती विमानातून उतरल्यावर सामान ताब्यात घेताना! त्या बॅगेज रिक्लेम पट्टयांवर आम्ही आपली केली झुंबड! कसले सोशल डिस्टंनसिंग नि काय! हम सब भारतीय है! क्या उखाडलेगा कोरोना? असो!

आमचे विमान अगदी काटेकोर वेळ पाळत सकाळी साडेदहा वाजता श्रीनगर विमानतळावर पोहोचले. मी मा‍झ्या परिचयाच्या ट्रॅवल अेजन्टमार्फत सोनामर्गला जाण्यासाठी इनोव्हा गाडी सांगून ठेवली होती. आमचा चौघांचा कंपू होता. विमानतळावर उतरल्यावर लगेचच ‘यावर’ ड्रायव्हरचा फोन आला,‘‘मॅडमजी वेलकम टु कश्मीर! मै एयरपोर्ट के पार्किंग मे गाडी लेके खडा हूं! आम्ही आमच्या बॅगा खेचत विमानतळाच्या ‘निकास’द्वारा पाशी जाऊ लागलो. पण तिथेही कोरोना नावाचे सावट झिम्मा खेळत होतं! खुर्च्या-टेबलं मांडून अनेक अधिकारी प्रवाशांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पडताळा करण्यासाठी आणि अगर अहवाल नसल्यास तातडीने चाचणी करण्यासाठी बसले होते. आम्ही विमान प्रवासापूर्वी ७२ तासांसाठी वैध असेल अशी चाचणी करून घेतल्याने आमची लगेच सुटका झाली. पण अत्यंत सौहार्दाने आणि आपुलकीने माहिती देत हे अधिकारी काम करत होते. पर्यटक हे काश्मीरचे अतिथी आहेत, हयाची जाणीव इथल्या स्थानिकांशी अथवा व्यापाऱ्यांशी संवाद साधताना, त्यांच्या वर्तणुकीतून प्रतीत होताना दिसते आणि आपल्या मनातील संशयाचे भूत पार पळून जाते!

‘यावर’ ड्रायव्हर खूपच बोलका होता. मुंबईहून मी, रमजानभाई, प्रविणा, बालसुब्रमण्यम असे चौघे एकत्र आलो होतो. आमच्या कंपूमधील दोघेजण पहाटे लवकरच्या विमानाने श्रीनगर गाठून सोनामर्गकडे रवाना झाले होते. आमची गाडी विमानतळावरुन सोनामर्गच्या दिशेने निघाली. श्रीनगरच्या वातावरणात उष्मा जाणवत होता. काही विशिष्ट चौक, ठिकाणे येथे लष्करी बंदोबस्त नजरेस पडत होता. दहशतीच्या सावटाने काश्मीरचे सौंदर्य कसे कोमेजले आहे, हे हया ठिकाणांच्या भकास आणि रुक्षपणावरुन सहजच दिसत होते. परंतु जनजीवन सुरळीत चालू होते. स्थानिकांनी काश्मीर खोऱ्यात  होणारे दहशती हल्ले, लष्करी प्रति हल्ले, दगडफेक हयांना आपल्या जीवनाचा भाग बनवला आहे.  त्यांची जगण्याची धडपड दिसून येत होती. रस्त्यांवर फळ-भाजी विक्रेते ह्या त्याच्या प्रतिकात्मक खुणा होत्या.

आम्ही श्रीनगर शहराच्या बाहेर आलो, तशी हिरवाई अधिक दिसू लागली. लघु हिमालयाच्या पीरपांजल पर्वत शृंखलांच्या कुशीत वसलेलं कश्मीरचे सौंदर्य आता नजरेत भरु लागले. हिरवीगार शेते आणि चहूबाजूंनी पर्वतराजी! टप्याटप्यामध्ये जम्मू- कश्मीर पोलीस तैनात होते. तसेच सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी सुध्दा यातायात सुरक्षा तपासणीअंतर्गत वाहनांची कसून तपासणी करीत होते. रविवार असल्याने पर्यटन स्थळांकडे गर्दीचा ओघ वाढू नये हयासाठी खबरदारी घेतली जात होती. पण त्याही पेक्षा सर्वात महत्त्वाचे म्हणजे २६ जुलै- ‘कारगील विजय’ दिवस! २६ जुलै १९९९ रोजी झालेल्या ‘ऑपरेशन विजय’ स्मरणार्थ कारगिल ‘विजय दिवस’ साजरा केला जातो. कारगिल द्रासकडे जाणारा रस्ता सोनामर्ग-जोझिला खिंडीतूनच जातो. त्यामुळे हया हमरस्त्यावर नेहमीच लष्करी ताफे ये-जा करीत असतात आणि २६ जुलै असल्याने खास सुरक्षेची तजवीज होती. आमच्या युथ हॉस्टेल पदभ्रमण मोहीमेचे नोंदणी फॉर्म पाहून व पडताळा करून आमची गाडी सोनामर्गच्या दिशेने जाण्यास परवानगी दिली. अन्यथा गैरवाजवी वाहतुकीस बंदी केली होती.

आम्ही दुपारच्या जेवणाच्या वेळेस ‘कंगन’ गावाजवळ नदीपात्राच्या शेजारीच असणाऱ्या ‘राजा’ धाब्यावर जेवलो. आम्ही काही क्षण “सिंध नाला” नदीच्या खळाळणाऱ्या पात्राशेजारी उभे राहून सिंध व्हॅलीच्या आल्हाददायक हवेचा आनंद घेतला आणि सोनामर्गचा मार्ग चोखाळला. साधारणतः दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आम्ही सोनामर्ग येथे पोहोचलो.

सिंधनाल्याच्या काठावर वसलेले सोनामर्ग म्हणजे ‘मिडोज ऑफ गोल्ड’! हॉटेल सोनामर्ग पॅलेसमध्ये आमचा यूथ हॉस्टेलचा बेस कॅम्प होता. आम्ही हॉटेलच्या आवारात उतरलो, गाडीमधून सामान काढले आणि युथ हॉस्टेलच्या नोंदणी कक्षाकडे गेलो. आमचे दोन साथीदार आधीच येऊन पोहोचल्याने आमची नोंदणी प्रक्रिया सुलभ झाली. आमची कागदपत्रे देऊन अॅडमिट कार्ड मिळेपर्यंत हॉटेलच्या आवारातून सभोवतालचा परिसर न्याहाळला. मा‍झ्या सन २०१५ साली केलेल्या अमरनाथ यात्रेच्या आठवणी ताज्या झाल्या. काही अंतरावर स्थित ‘ट्रान्कील रिट्रीट’ हया हॉटेलमध्ये चार दिवसीय  मुक्काम होता. त्यावेळचे सोनामर्ग आणि मा‍झ्या डोळ्यासमोरचे आजचे सोनामर्ग खूप फरक पडलेला होता. हॉटेल लॉजींग- बोर्डिंगची खूप बांधकामे आजूबाजूला झालेली होती. सिंध नाल्याच्या काठा काठाने अनेक नवी मोठी शानदार हॉटेल उभी राहलेली दिसत होती, तर रस्त्याच्या पलीकडे छान हिरव्यागार कुरणाच्या टेकाडांवर सुध्दा डोंगर कुशीत हया सिमेंट कॉन्क्रिटच्या जंगलांनी अतिक्रमण केले होते. परंतु ताजिवास ग्लेशियरसकडे जाणारा मार्ग आणि कुरणे संरक्षक कुंपणे घालून बंदिस्त केली होती. उशिरा का होईना पण शहाणपण सुचलेलं होतं! परिसरात स्वच्छता होती. त्यामुळे बेसकॅम्पच्या आवारातून अगदी समोरच हिमालयीन पर्वतांचं आणि त्याच्या कुशीत पायथ्याशी हिरवाईने बहरलेलं जंगल सौंदर्य विलक्षण मोहक आणि चित्तवेधी होतं! आम्ही समुद्रसपाटी पासून ८९६० फूटांवर स्थित जम्मू-काश्मीर मधील गंदेरबल जिल्हयामधील एका निर्सगरम्य हिल स्टेशनला येवून पोहोचले होतो! लेह-लडाख प्रांताला उर्वरीत भारताशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ ह्या “श्रीनगर-लेह महामार्गा” वरील प्राचीन आणि ऐतिहासिक भारताचा ‘सिल्क रोड’ म्हणून प्रसिध्द असलेल्या तिबेटशी  व्यापार संबंध जुळविणाऱ्या या प्रसिध्द राजमार्गावरील ‘सोनामर्ग’ गावात आम्ही आलो  होतो. सोनामर्ग हे श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावरचे अगदी मोक्याचे ठिकाण! कारगिलकडे जाणारी लष्कराच्या ताफ्यांची यातायात सोनामर्गच्या रस्त्यावर काही क्षण उभे राहीले तरी लक्षात येत होती. आम्हांला ट्रेकसाठी नोंदणी आणि कागद पत्रांचा पडताळा घेऊन रहाण्याची व्यवस्था केलेल्या खोल्यांमध्ये रवाना केले गेले. आम्ही देखील खोलीत सामान ठेवून सहभागी ट्रेकर्सची ओळख करुन घेतली आणि सोनामर्ग मार्केटचा फेरफटका करण्यास निघालो. काही जुजबी सामानाची खरेदी करुन आम्ही पुन्हा युथ हॉस्टेलच्या तळाकडे निघालो.

जम्मू-काश्मीर राज्याच्या गंदेरबल जिल्हयात मोडणारे ‘सोनामर्ग’ म्हणजे खरोखरच ‘मिडोज ऑफ गोल्ड’- सोन्याचे कुरण! हया छोटया हिल स्टेशनचे नाव, वसंत ऋतुमध्ये इथल्या दऱ्या खोऱ्या मधील कुरणामध्ये पिवळसर रंगाच्या रानटी फुलांमुळे पडले आहे. हया जंगली नाजूक फुलांची हिरवळीवर झालेली पिवळया रंगाची उधळण अगदी सोन्यासारखी दिसते म्हणून सोनामार्ग! तिबेटला जोडणाऱ्या प्राचीन व्यापार मार्गावरचे सोनामर्ग ‘अमरनाथ’ सिरबल आणि कोल्होई पर्वत शिखरांनी वेढलेलं आहे. हिरव्या पाचूच्या टेकाडांवर देवदार पाईनचे डौलदार असे रांगांमध्ये वाढणारे वृक्ष आणि त्यामागे हिमशिखरांच्या रांगा! सोनामर्ग मार्केटपासून पुन्हा हॉस्टेलवर परतेपर्यंत संध्याकाळ होत आली होती. आम्ही समोरच्या उंच टेकाडांवर असलेल्या मऊशार  हिरवळीवर बसण्याचे सुख घेण्यासाठी त्या हिरवळींच्या टेकाडांवर गेलो. तिथून संपूर्ण सोनामर्ग दृष्टीपथास पडत होते. आम्ही तिथे सुखावताच, एक स्थानिक विक्रेता आम्हांला काश्मिरी भरतकाम केलेले पंजाबी ड्रेस विकत घेण्याची गळ घालू लागला. आम्हांला त्यांच्या सेल्स्मनशिपचे कौतूक वाटले. त्याला कसे बसे टाळून आम्ही पुन्हा बेस कॅम्प वर परतलो संध्याकाळी होणाऱ्या कॅम्प फायरच्या तयारीसाठी! हयावेळी मी देखील गाणं सादर करुन कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. बेसकॅम्पवर असलेल्या सहभागी ट्रेकर्स, ट्रेक कोऑर्डीनेटर- गुलजारजी, स्वयंसेवक लक्ष्मी, शौर्यं हया सर्वांसोबत छान ओळख झाली. आम्ही समुद्रसपाटीवरच्या मुंबईहून सकाळी विमानाने प्रयाण करुन हया आठ हजार फूटांपेक्षा जास्त उंची असलेल्या ‘मिडोज ऑफ गोल्ड’ च्या प्रदेशात सहजच रमून गेलो!

क्रमश:


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 thoughts on “रम्य सरोवरांच्या प्रदेशात

Add yours

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑