कितनी खूबसूरत ये तसवीर है, ये कशमीर है – दल लेक मधील वास्तव्य!

काश्मीर राज्याची ग्रीष्मकालीन राजधानी म्हणजे श्रीनगर! झेलम नदीच्या काठावर वसलेलं हे शहर ‘दल लेक’, ‘नगीन लेक’ अश्या अनेक सुंदर सरोवरांसाठी प्रसिध्द आहे आणि म्हणूनच हया शहराला पूर्वेकडचे ‘व्हेनिस’ म्हटले जाते. ऐतिहासिक, धार्मिक आणि पुरातन सांस्कृतिक वारसा आणि संपन्नता हयांचे दाखले आजही हे शहर लेवून आहे. सहा दिवस सतत स्फटिकासम सतत रंग बदल करीत राहणाऱ्या उंचीवरील अल्पाईन सरोवरांच्या सान्निध्यात राहीलो, पण आज श्रीनगरला ‘दल’ सरोवरामध्ये हाऊस बोटीमध्ये राहणार होतो. ट्रेक संपल्यानंतर दोन दिवस श्रीनगर मुक्कामी राहीलो. माझ्या ‘क्लब महिंद्रा’ मेंबरशीपच्या सौजन्याने शानदार लक्झरी हाऊस बोटमध्ये राहून अगदी ट्रेकचा शीण जाईपर्यंत श्रम परिहार झाला. ‘न्यू गोल्डन हिन्द’ हया हाऊस बोटीमध्ये आमची सोय करण्यात आलेली होती. हाऊस बोटीचे अगदी खास वैशिष्ट्य म्हणजे हाऊस बोटीचा मालक ‘हिलाल भाई’ अगदी खुद्द जातीने स्वत: हजर राहून पाहुण्यांची सरबराई करीत होता. चार बेडरुम, दिवाण खाना, जेवणाची खोली आणि पाण्यावरचा डेक (हाऊस बोटीतले पाण्याचे अंगण!!) असा ऐसपैस विस्तार असलेली अलिशान हाऊस बोट होती. प्रशस्त खोल्या आणि दिवाणखाना अगदी काश्मीरी रितीरिवाजाप्रमाणे व रुचीपूर्ण सजविलेले होते. मन प्रसन्न राहील अशी शांतता, स्वच्छता आणि अतिथ्य दिमतीला होतं! थकल्या पथिकाला अजून काय हवं!
आम्ही खोल्या ताब्यात घेऊन घाईने पुन्हा सिव्हील हॉस्पिटलकडे धाव घेतली. आमच्याच हाऊस बोटीवर वास्तव्य असलेल्या एका काश्मीरी डॉक्टर मुलीशी ओळख झाल्याने, तिने परतीच्या प्रवासासाठी आवश्यक आरटीपिसीआर टेस्ट करण्यासाठी खूपच मदत केली. दुपारची विश्रांती झाल्यावर संध्याकाळी शिकाऱ्यामधून केलेली दल लेकची सफर मात्र अगदी मनाला आनंद देऊन गेली. दल लेकमध्ये शिकारा सफर म्हणजे एक अनोखा अनुभव असतो. स्थानिक काश्मीरी जनजीवन संपूर्णतः पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे असं म्हटले तरी अतिशयोक्ति होणार नाही. स्थानिक काश्मीरी शिकारावाले आणि हाऊस बोट मालक देखील हयाला अपवाद नाहीत. प्रत्येक हाऊस बोट मालकाचे खास शिकारे निर्धारित केलेले असतात.
आम्हाला देखील दल लेकची सफर घडवून आणण्यासाठी हिलालभाईने अगदी एक बोलका शिकारावाला दिमतीला दिला. अगदी रंगीबेरंगी आणि अगदी आरामशीर बसता येईल अशी बैठक व्यवस्था असलेले छताची छोटी होडी म्हणजे शिकारा! शिकारावाला त्याच्या काश्मीरी ढंगामध्ये गोष्टी सांगत राहतो आणि आपलं मनोरंजन करतो. संध्याकाळच्यावेळी दल लेकच्या शांत पाण्यावरच्या शीतल वायुलहरी, पाण्यावर आणि आकाशात पसरलेली अवघी अस्मानी रंगाची निळाई, त्याच्या पार्श्वभूमीवर दूर करडे पर्वत आणि सूर्य अस्ताला जाताना क्षितिजावर फाकणारी अभा! हया पेक्षा सुंदर आणि मनमोहक काय असू शकतं! आपले डोळे मन तृप्त करीत राहतात आणि कान शिकारावाल्याने पाण्यात मारलेल्या वल्ह्यांमुळे होणारा नाद आणि त्यावर त्याने काश्मीरी भाषेत गुणगुणलेल्या लोकगीताच्या स्वरांचा वेध घेत राहतात.
यथावकाश सूर्य अस्ताला गेल्यावर शिकारा आपसूक ‘तरंगत्या बाजारा’कडे वळतो. दललेकच्या पाण्यावर रोषणाईने चमचमणाऱ्या हाऊस बोट काश्मीरी संस्कृतीचे वैभव आणि शान जपत दिमाखात सलगीने उभ्या राहिलेल्या दिसतात. शिकाऱ्यामधून ये-जा करताना आपल्या शिकाऱ्याला अगदी खेटून फूलवाले, केशर विकणारे, पारंपारिक अथवा इमिटेशन ज्वेलरी विकणारे आपल्याला वस्तू दाखवित राहतात. तरंगत्या बाजारामध्ये अश्याच बोटींमध्ये कपडे व इतर सर्व वस्तूंची दुकाने थाटलेली दिसतात. हया दुकानांचे मालक तुम्ही शिकाऱ्यातून जाताना तुम्हाला अगत्याने बोलावतात. पण आपला शिकारा मात्र विशिष्ट दुकानांजवळ थांबतो. त्या दुकानाच्या मालकाला आपण कोणत्या हाऊस बोटीमध्ये मुक्कामी थांबलो आहे हे आवर्जून सांगतो! आम्ही सुद्धा एका दुकानामध्ये थांबलो. काश्मीरी भरतकाम असणाऱ्या काही वस्तू, कपडे घेऊन पुन्हा आमच्या हाऊस बोटीवर परतलो.


रात्री हाऊस बोटीवर हिलालभाईने आमच्यासाठी पारंपारिक काश्मिरी पद्धतीच्या जेवणाचा बेत केला होता. काश्मीरी पारंपारिक जेवणाचा आस्वाद घेत ‘हक’ हा पालेभाजीचा पदार्थ आणि ‘रोगन जोश’ किंवा ‘घोश’ हा अगदी काश्मीरी पारंपारिक व्यंजनांपासून बनलेला पदार्थ खाताना समाधानाने तृप्तीची ढेकर दिली. हिलालभाई आणि कुटुंबियांनी केलेली ‘मेहमान नवाजी’ म्हणजे काश्मीरी आदरातिथ्याचा खराखुरा अनुभव होता!



श्रीनगरच्या दुसर्या दिवशीच्या मुक्कामामध्ये सहजच फेरफटका मारावा तसं परिमहल, चश्मेशाही मुघल गार्डन, हजरतबल दर्गा, नगीन लेक अशी भटकंती करून आलो. अनेक वर्षांपूर्वी काश्मीर सहलींमध्ये नजरभेटीस आलेलं हया पर्यटन स्थळांचं सौंदर्य आणि वैभव आज फार वेगळं वाटलं! शाही तरुण सौंदर्य वार्धक्याकडे झुकलं तरी त्याचं वैभव कमी होत नाही तसचं काहीसं! परंतू पर्यटकांच्या ओसंडलेल्या गर्दीमुळे तिथल्या वातावरणामध्ये, फुलझाडांमध्ये हिरवळीवर रमताना मर्यादा येतात. परंतु त्वरित मनात तुलना सुरु होते, ‘काश्मीर ग्रेट लेकस्’चे नैसर्गिक वैभव आणि अनुपम सौंदर्य हयाला तोड नाही! मग मानव निर्मित बगीच्यांचे काय घेऊन बसलात!!
ट्रेक नंतरचे श्रीनगर मधील लक्झरी हाऊस बोटीमधील दोन विश्रांतीचे दिवस खूपच श्रम परिहार करणारे ठरले. हाऊसबोटच्या डेकवर बसून दल लेकच्या पाण्याचे तरंग अनुभवत प्यायलेला गरमागरम ‘कावा’, श्रीनगरच्या खाऊ गल्ल्यांमधून फेरफटका मारत फस्त केलेले लज्जतदार ‘कबाब’ आणि फालूदा!
कोरोनामुळे दोन वर्षे बंदिस्त राहिल्यानंतर काश्मीर ग्रेट लेक्सच्या सहलीने खरोखर मन प्रफुल्लित झाले. परतीची वेळ येऊन ठेपली. दहा दिवस कसे सरले कळलेही नाही. अवतीभवती निसर्ग आणि फक्त निसर्ग! दल लेकच्या हाऊस बोटीमध्ये अगदी घरातच असल्यासारखे वाटले. अत्यंत जड मनाने सामान जमा करून बॅग भरली आणि विमानतळावर निघाले. श्रीनगर विमानतळावर अनेक टप्प्यांमध्ये सुरक्षा तपासणीस सामोरी जावे लागते, म्हणून जरा लवकरच हाऊस बोटीवरून निघाले. श्रीनगरचा निरोप घेताना पुन्हा एकदा शिकारा सफर झाली. शिकारावाल्याने मला दल लेक मधून मुख्य रस्त्यावर माझ्या टॅक्सीकडे आणून सोडले. विमानतळावरचे सोपस्कार उरकले आणि श्रीनगरहून मुंबईकडे विमानाने झेप घेतली.
बंद पापण्यांसमोर अनंत आकाशाची निळाई, हिरवेगार गालिचे पसरल्याप्रमाणे विस्तीर्ण खोऱ्यामध्ये सजलेली गवताळ कुरणे आणि त्यावर लाल, पिवळे, निळ्या, जांभळ्या फुलांचे ताटवे, फिरोजी आणि गडद हिरव्या-निळ्या रंगांचे आविष्कार दाखवणारे उंचीवरचे अल्पाईन तलाव रम्य सरोवरांच्या प्रदेशात आणि स्वर्गातील नंदनवनाची सैर करून आल्याचा अनुभव देत होती जणू!
*****
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.















Excellent description… Whole trek is reminded…
LikeLike