रम्य सरोवरांच्या प्रदेशात – अंतिम भाग

ट्रेकची सांगता

गंगाबल कॅम्पकडून आम्ही पायउतार होत नारनागला जाणार होतो. आजचा दिवस आमच्या ट्रेकचा शेवटचा दिवस! सकाळी लख्ख सूर्यप्रकाश नसला तरी हवामान स्वच्छ होते. किमान पाऊस नसल्याने सुटकेचा निश्वास सोडला. आतापर्यंत ट्रेकसाठी आणलेले मोजके दोन कपडयांचे जोड पावसाने अगदी ओले चिंब केल्याने रात्री झोपण्यासाठी राखीव कपड्यांवरच ट्रेकची सांगता करणारा टप्पा पार करावा लागणार होता. आम्ही अगदी नियमित दिनचर्येप्रमाणे तयार झालो. हरमुख पर्वत शिखराच्या दर्शनाची इच्छा मात्र अपुरी राहिली. हरमुखच्या माथ्यावर ढगांनी जे छत्र धरले होते ते काही सरून मागे जाण्याची संभावना नव्हती. हरमुख पर्वताची कैलाश सदृश दिसणारी प्रतिमा चित्रित करण्याच्या मनसुब्यावर ढगांनी पाणी फिरविले!

मन खट्टू न करता तेथील वास्तव्याच्या अनुभूति मनात साठवून आम्ही मार्गस्थ झालो. गंगाबलच्या एका तीरावरून पलीकडच्या काठावर जाऊन लगतच असलेल्या कुरणांच्या टेकाडांवरून उतरुन जायचे होते. परंतु गंगाबलच्या प्रवाही निर्झराला पार करण्यासाठी थरारक अनुभव घ्यावा लागला. दगडी रचून अगदी एक फूट जेमतेम रूंद असलेला लाकडी खांब दोन काठांवर तरंगता होता आणि खालून पाण्याचा प्रचंड प्रवाह! आम्हाला आमच्या गाईडने प्रत्येकाला दोन ते तीन जणांची साखळी करुन पार केले. परंतु आमच्या बालसुब्रमण्यमजीने पाण्याच्या भयापोटी चक्क त्या लाकडी खांबावर बसून सरकत सरकत स्वतःला पार केले.

हरमुख पर्वताला नमन करुन आम्ही आता हिरव्यागार डोंगर उतारावरून व्हॅलीच्या दिशेने चालू लागलो. अनेकदा मागे वळून पाहीले तरीही हरमुखच्या शिखरावर ढगांचे शिरस्त्राण होतेच! पुन्हा हिरवे डोंगर उतार पार करून गेल्यावर काही अंतरावर पुन्हा मिल्ट्री कॅम्प होता. तिथे पुन्हा आमच्या व्यक्तिगत कागदपत्रांची पडताळणी केली गेली. आमचे फोटो काढले गेले आणि आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो. सैन्याच्या छावणी परिसरात फोटो काढण्यास सक्त मनाई होती. सैन्य दलाच्या छावणीच्या परिसरामध्ये वृक्षराजी दिसू लागली. तिथून काही अंतरावर पुढे चालून आल्यावर निसर्ग चित्र पालटू लागले. ट्रेकच्या पहिल्या दिवशी भोज वृक्षांच्या जंगलातून चढाई केल्यानंतर आज पाच दिवसांनंतर पुन्हा देवदार आणि पाईनची वृक्षराजी नजरेस पडत होती.

आता परतीची ओढ होती! पाऊलं भराभर पळण्याचा प्रयत्न करीत होती तर इकडे मन मात्र अधिकाधिक त्या सुंदर आणि रम्य हिरव्या-निळ्या सरोवरांकाठी रेंगाळत होते. हलके चढ-उतार असे टप्पे पार करीत आम्ही आता जंगलामधून उतरणीला लागलो. आदल्या दिवशी होऊन गेलेल्या पावसामुळे जंगलांमध्ये पायवाटा अगदी दलदलीच्या आणि निसरड्या झाल्या होत्या. काही ठिकाणी वितळून आलेल्या महाकाय हिमाच्या ढिगांऱ्यांमुळे वृक्ष सुध्दा कोलमडून पडले होते. मळलेली पायवाट उध्वस्त झालेली होती. असे अनेक डोंगर उताराचे टप्पे पार करून आम्ही अगदी जंगलातून जाणाऱ्या रस्त्यापर्यंत येऊन ठेपलो. आमचा हा विश्रांतीचा थांबा होता. एक छोटेच घरगुती धाब्यासारखे झोपडेवजा टी स्टॉलवर आम्ही सर्वांनी मिळून आक्रमण केले. बिचारा चहावाला भांबावून गेला. पण प्रत्येकाच्या मागणीनुसार चहा-बिस्कीटे, मॅगी हयाचं आतिथ्य झालं.

हया विश्रांतीच्या थांब्यानंतर आम्ही जंगलामधून चालू लागला. आता मात्र उतार अगदी तीव्र होऊ लागले. वेग मंदावला. काही ठिकाणी माती खचून गेलेली होती. त्यामुळे मध्येच पाय घसरण्याची भीती चालण्यास खीळ घालू लागली. आमचे सहभागी ट्रेकर्स उतारावरून वेगाने खाली जाताना वळणा-वळणांवरुन दिसत होते. त्यामुळे आपण खूप मागे पडलो आहोत ही भावना सल बनून पाय अधिकच जड करीत होती. परंतु सद्दाम गाईडच्या संयमाला मी त्रिवार दाद देते! अखंड ट्रेकमध्ये सद्दामभाईने न कंटाळता मला साथ-सोबत केली. माझ्या सोबत बालसुब्रमण्यम देखील होते. आम्ही आमची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यामुळे आम्ही अगदी नारनागला खाली उतरून वस्तीच्या गाव-खेड्यामध्ये पोहोचेपर्यंत एकत्र होतो. आम्ही जंगलांमधील एका मागोमाग एक डोंगर पार करुन खालच्या दिशेने उतरुन जात होतो. मध्यान्ह होऊन गेलं तरीही अंतर काही कमी होताना दिसत नव्हते आणि पाय जुमानत नव्हते!

काही अंतर जंगलामधून चालल्यानंतर झाडांच्या बुंध्यांच्या झरोक्यातून दूरवर खाली पांढुरक्या रेषेसारखी वाहणारी नदी आणि काठा-काठाने वस्ती दिसू लागली. मनाची अवस्था तर, ‘‘मन अधीर अधीर झाले’’ अशी झाली होती. पण पाय अतिशय हट्टीपणा करीत होते. सद्दाम धीर देत होता, “मॅडमजी बस, अब थोडा ही रह गया है| आरामसे चलिये, बस चलते रहो! “चलते रहो” म्हणाला की, मी समजून जात असे की, ‘नारनाग’ अभी तो दूर है। त्याच्या ‘थोडा’ हया अंतराचे परिमाण काय होते ते मला अगदी नारनागला खाली पोहोचेपर्यंत उमगलं नाही! आता आम्ही त्या झाडांच्या बुंध्यांच्या झरोक्यातून दिसणाऱ्या सुंदर निसर्ग चित्राच्या अधिक जवळ पोहोचल्यासारखे भासत होते. नदीच्या पाण्याचा नाद कानी येऊ लागला. लाल छतांची घरे असलेली वस्ती सुस्पष्ट दिसू लागली. एका वळणावरून खालच्या दिशेने डाव्या बाजूला प्राचीन दगडी मंदिराचे भग्न अवशेष दिसू लागले आणि समोर नारनाग गांव! आणि अगदी काही अंतरावर रस्ता दिसू लागला. वंगथ नदीच्या किनारी वसलेलं नारनाग खोरे शेवटच्या टप्प्यामध्ये प्रत्येक वळणावर झाडांच्या झरोक्यातून आपल्या विहंगम दृश्याने उत्सुकता शि‍गेला पोहोचवित होते.

शेवटच्या टप्प्यामध्ये उतरताना डाव्या हाताला दिसणारे प्राचीन जीर्ण मंदिर अगदी जवळच होते. आठव्या शतकातील वास्तूकला व स्थापत्य शास्त्राचा नमुना असणारा हा प्राचीन मंदिरांचा समूह वंगथ खोऱ्यामध्ये नारनागच्या पवित्र झऱ्यांच्या आजूबाजूने पसरलेला आहे. कलहाना लिखित ‘रजतरंजनी’ हया काश्मीर संस्कृतीबाबतच्या संदर्भ ग्रंथामधील उल्लेखानुसार मौर्य राजा सम्राट अशोकने श्रीनगर शहराची स्थापना केली व त्याचा पुत्र जालुका हयाने भूतेश्वर, ज्येष्ठरुद्र आणि मुथास हया शैव मंदिरांची स्थापना केली. ही सर्व मंदिरे भगवान शंकराला समर्पित आहेत. श्रीनगरमधील शंकराचार्य मंदिर आणि हा प्राचीन मंदिरांचा समूह एकाच कालावधीमध्ये निर्माण केल्याचे सांगीतले जाते. काश्मीर खोऱ्यामधील वंगथ नदीच्या खोऱ्यामधील ह्या प्राचीन वास्तुकलेच्या वैभवाबद्दल अनभिज्ञ होते. साधारण परस्परांपासून २०० फूट अंतर राखून समोरासमोर असलेली मंदिरे करड्या रंगाच्या भल्या मोठ्या ग्रेनाइटच्या दगडांपासून बनविलेली आहेत. हे प्राचीन ऐतिहासिक आणि वास्तुकलेचं वैभव अनेक मिथक कथांचा आपल्या सोबत वारसा घेऊन भग्नावस्थेत असले तरी दिमाखात भारताच्या प्राचीन कला, इतिहास आणि संस्कृतीची साक्ष देत आज सुद्धा नारनाग येथे उभे आहे.

प्राचीन पुराण काळाशी  निगडीत आख्यायिका अशी सांगितली जाते की, पार्वती-ज्येष्ठा हिचे हया ठिकाणी राक्षसांपासून शंकराने रक्षण केले व नंतर विवाह करून ज्येष्ठरुद्र हे नाव धारण केले. वंगथ खोरे वशिष्ठ ऋषींच्या वास्तव्याने ओळखले जाते. असा समज प्रचलित आहे की, वशिष्ठ ऋषींच्या वास्तव्यामुळे हया प्रदेशास वशिष्ठ आश्रम म्हणून ओळखले जात होते. आणि येथील प्राचीन झऱ्याना “नारन नाग” असे संबोधले जाते. कथा अथवा संदर्भ कोणताही असो, नारनागच्या भूमीवर पाय ठेवताच अगदी विलक्षण आनंद झाला.

सकाळपासूनच्या अथक चालण्यामुळे जणू पाय आहेत अथवा नाही हया जाणि‍वेच्या पार पलीकडे गेल्यासारखे वाटत होते. पाय पुरते थकून गेलेले होते, फक्त आणि फक्त मनाने शरीराला खेचत आणले होते! अखेर आम्ही नारनाग गावाच्या सडकेपर्यंत येऊन पोहोचलो. आम्ही नारनागला पोहोचेपर्यंत संध्याकाळचे पाच वाजलेले होते. आमच्या ग्रुपमधील आधी पोहोचलेले ट्रेकर्स जीपने सोनमर्गच्या दिशेने रवाना झाले होते. हमरस्त्यापाशी पोहोचल्यावर हुश्श केले. चहाची जबरदस्त तलफ आलेली होती. आमच्यासाठी राखीव जीप उभीच होती. आम्ही चहा पिण्यासाठी एका टपरीजवळ थांबलो. परंतु आम्हाला उशीर झाल्याने लगेचच सोनामर्गकडे प्रस्थान केले.

नारनागचा परिसर, मंदिरांचा समूह आणि आमची जीप सोनामर्गकडे रवाना होताना त्या जुन्या ‘वंगथ खोऱ्याचे’ म्हणजेच नारनाग गावाचे मनोहारी दर्शन मात्र अत्यंत सुखदायी होतं! जसा जीपने वेग पकडला तसा स्मृतींचा जुडा सैल होऊन मागच्या आठ दिवसांच्या हया “काश्मीर ग्रेट लेक्स” ट्रेकच्या प्रत्येक टप्प्यात अनुभवलेल्या स्वर्गीय निसर्गाच्या आविष्कारांचा चित्रपट मनःपटलांवर उमटू लागला. अगदी निचनाई कॅम्पपासून ते गंगाबल कॅम्प आणि त्यानंतर नारनागकडे घेवून जाणारे डोंगर उतार! प्रत्येक दिवशी एक वेगळा कॅनव्हास! आणि त्या कॅनव्हासवर रेखाटलेले अनोखे देखावे! विश्वाच्या निर्मात्याच्या कुंचल्यातून निर्माण झालेल्या त्या भव्य-दिव्य निसर्गाच्या आविष्कारांनी मन भारावून गेले होते.

काश्मीर ग्रेट लेकचा ट्रेक हा एकमेव असा ट्रेक आहे की, ज्यामध्ये आपल्याला निचनाईपास, गडसर पास आणि झजपास ह्या तीन उंच खिंडी आव्हान देत उभ्या ठाकलेल्या असतात, तर ट्रेक रुटवर पाच नदयांच्या खोऱ्यांमधले  सात विलक्षण सुंदर अल्पाईन तलाव आणि त्याच्या परिसरामध्ये नंदनवनात असल्याचा भास देणारी रंगीबेरंगी जंगली फुले हिरव्या मिडोजवर पसरलेली असतात. हिरवीगार कुरणे असो अथवा खडबडीत पर्वत रांगा, त्यांच्या अंगा-खांदयांवरुन खुशाल विहार करणारे निर्झर किंवा निचनाई पास पार करून गेल्यावर गडसर पासकडे जाण्यापूर्वी आणि नंतर दिसणारी हिरवट निळ्या आणि फिरोजी रंगांचे अविष्कार दाखवणारी अल्पाईन सरोवरे असो! सर्वांत विलक्षण गोष्ट म्हणजे ह्या रम्य सरोवरांच्या प्रदेशातील ट्रेकची सांगता हरमुख पर्वताच्या पायथ्याशी वास्तव्य करून होते! गंगाबल तलावाशेजारी वसवलेल्या तंबूत पहुडलेले असताना त्या जुळ्या सरोवरांच्या प्रवाही पाण्याचा नाद कानात गुंजत राहतो. सकाळच्या वेळी हिरव्यागार कुरणानी सजलेल्या त्या पहाडांवर घोडे, पशुधन चरताना, बागडताना अगदी चित्रवत नजारा दृष्टीस पडतो! दररोज निसर्गाच्या असीम, भव्य आणि विलक्षण सुंदर ऐश्वर्याचा सामना करताना डोळ्याचे अगदी पारणे फिटते. ट्रेकचा प्रत्येक दिवस खरोखरच पोस्टकार्डवरील चित्राप्रमाणे परिपूर्ण असतो. काश्मीरला पृथ्वी वरील स्वर्ग का म्हणतात हयाचा प्रत्यक्ष प्रत्यय देणारा ट्रेक म्हणजे ‘काश्मीर ग्रेट लेकस्’ ट्रेक!

काश्मीर ग्रेट लेक्स् ट्रेक रुटवरील हया खोऱ्यामध्ये मन आपसूकच हरवून जातं! आपण निसर्गात रममाण होत असतानाच तीव्र चढ-उतार, बोल्डर हॉपिंग, रिव्हर क्रॉसिंग हयांचा थरार सुध्दा हया ट्रेकचा एक खास पैलू आहे. मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कस लावणारा असा हा ग्रेट लेकचा ट्रेक आहे. दररोज निसर्गाचे स्वर्गीय आविष्कार अनुभवण्यासाठी आपलं शरीर मात्र निश्चितच तंदुरुस्त पाहिजे. आरोग्य आणि शरीर संपदा हीच आयुष्यातील आनंदाची खरी गुरूकिल्ली आहे. अगदीच नवशिक्या ट्रेकर्ससाठी हा ट्रेक कदाचित अवघड वाटू शकतो पण पूर्व तयारीनी आल्यास येथील निसर्गाचे वैभव पाहाताच ‘‘श्रम ही निमाले’’ अशी स्थिती होते.

खर सांगायचं झाले तर, एकदा तुम्ही त्या हिमालयाला शरण गेलात ना की, तोच तुम्हाला अगदी कुशीत घेतो! पर्वत, नदया, डोंगर उतार, वनराजी सर्व काही ओळखीचे असल्यागत भासू लागते. मनाचा ठाव घेणारी प्रगाढ शांतता विलक्षण अनुभव देऊन जाते. आपल्या स्वत:ची आपल्याशीच पुन्हा नव्याने ओळख करून देते. हिमालयातील ह्या भटकंतीमुळे पुन्हा एकदा मनाला उभारी मिळाली! “मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची पर्वा बी कुणाची ! मनात गीत गुणगुणत, अलगद पुन्हा त्या खोऱ्यामध्ये मनमुराद विहार करून आले! माझ्या विचार चक्राला अचानक ब्रेक मिळाला. तेवढ्या तासभरातच आम्ही पुन्हा जीपने आमच्या ‘सोनामर्ग पॅलेस’ हया युथ हॉस्टेलच्या कॅम्पवर पोहोचलो. आमचे काही सहभागी ट्रेकर्स परतीच्या प्रवासासाठी घाईगर्दीने श्रीनगरकडे निघालेले होते. आम्ही मात्र सोनामर्गलाच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीनगरकडे कूच केले.


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

पृष्ठे: 1 2

One thought on “रम्य सरोवरांच्या प्रदेशात – अंतिम भाग

Add yours

Leave a reply to Ramzan उत्तर रद्द करा.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑