सिक्कीम डायरीज् : भाग – १  

भारताच्या ईशान्येला पूर्व हिमालयाच्या कुशीत अगदी आपले वेगळेपण राखून असणारे आणि भारताच्या सर्वात लहान राज्यांमध्ये दुसरा क्रमांक असणारे राज्य म्हणजे सिक्कीम! ह्या राज्याची भौगोलिक परिस्थिती, वैविध्यपूर्ण संस्कृती, समृद्ध प्राचीन इतिहास आणि कांचनजंगा पर्वतांची पार्श्वभूमी सिक्कीमला पर्यटनाच्या पटलावर विशेष अधोरेखित करतात. हिमाच्छादित हिमालयीन पर्वत श्रेण्या, त्यांची उंच पर्वतशीखरे, विलोभनीय सृष्टी सौंदर्य, समृद्ध वनस्पती आणि वन्य जीवन, सरोवरे, गरम पाण्याचे झरे, खळाळते नदी प्रवाह आणि त्यावरील जल प्रपात, हिमालयीन पर्वत श्रेण्यांमधील अनेक पदभ्रमण मोहिमा अश्या अनेक गोष्टींसाठी सिक्किम पर्यटकांना खुणावत राहते.    

उत्तरेला आणि ईशान्येला तिबेटचा स्वायत्त प्रदेश, पूर्वेला भुतान, पश्चिमेला नेपाळचा कोशी प्रांत, आणि दक्षिणेला पश्चिम बंगाल अश्या सीमांनी वेढलेले हे चिमुकले राज्य म्हणजे पर्यटकांना एक पर्वणीच आहे! हिमालयीन पर्वतरांगांसह कांचनजंगा राष्ट्रीय उद्यानाच्या परीमंडलात मोडणारी घनदाट वृक्षराजी, उल्लेखनीय जैवविविधता, आणि येथील अल्पाइन आणि समशीतोष्ण हवामानामुळे जून ते सप्टेंबर हा पावसाचा मौसम वगळता वर्षभर कधीही सिक्किमची भटकंती करू शकतो.

मे २०२५ च्या उन्हाळी सुट्टीमध्ये शेवटच्या क्षणी ठरलेला सुट्टीचा बेत आणि सिक्कीम भेट हा एक योगायोगच! ह्या चिमुकल्या राज्याची सन २०१८ मध्ये भेट झाली खरी पण पश्चिमेकडील सिक्कीमचा भाग पहाण्याचे राहूनच गेले होते! खरी योगायोगाची गोष्ट अशी की, १६ मे १९७५ रोजी सिक्किमला भारतीय संविधानात स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला. १६ मे २०२५ रोजी ह्या गोष्टीला ५० वर्षे पूर्ण झाली! त्यामुळे सिक्कीममध्ये सर्वत्र आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण दृश्य स्वरुपात दिसत होते. किंबहुना ह्याच कारणास्तव आमच्या सिक्किम भेटीनंतर आम्हाला सिक्किम सरकार तर्फे आमच्या सिक्किम भेटीचे ई-प्रमाणपत्र दिले गेले!     

आम्ही सुट्टीचा पहिला मुक्काम मिरिक येथे केला होता. मिरिकहून दार्जिलिंगमार्गे पेलिंग येथे जाण्यास निघालो. मिरिक ते पेलिंग ह्या प्रवासाचे नियोजन फार जिकिरीचे होते! इथे अत्यंत त्रासदायक गोष्ट अशी की, परवान्याशिवाय पश्चिम बंगाल राज्यातील वाहन सिक्कीम राज्यात जाऊ शकत नाही आणि सिक्किमचे वाहन पश्चिम बंगाल मध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला पेलिंग येथे जाण्यासाठी पुन्हा गाडीचे नियोजन करावे लागले. अगदी आयत्यावेळी आमच्या होम स्टेच्या मालकीण बाईच्या परिचयातील एक टॅक्सी आम्हाला पेलिंगला जाण्यासाठी उपलब्ध झाली. आमची सवारी दार्जिलिंग-सुखियापोखरी – नया बाजार रस्त्याने पेलिंगकडे निघाली. आम्ही दार्जिलिंग शहरातून मार्गस्थ होताना “सपनों की रानी’ फेम टॉय ट्रेनचे दर्शन घडले. आपल्या मंजुळ शिट्टीने आपल्या मार्गातील अडसर दूर करत जाणारी ही “झुकझुक” आपण वयाने कितीही वाढलो तरी आपल्यामधील लहान मूल जागे करतेच!!

आम्ही दार्जिलिंग सोडून पुलबाजार पूलापाशी आलो आणि आमची गाडी पुलाजवळ थांबली! आमच्या आशिष ड्रायव्हरने आम्हाला सांगीतले, इथून पुढे पेलिंगला तुम्हाला दुसऱ्या टॅक्सीने जावे लागेल! आम्ही चिंतेत पडलो. त्याने आमचे चेहरे वाचले बहुधा! त्याने लगेच सांगीतले, आपको वापस पैसे नही देने है, मेरी गाडीका सिक्किम परमीट नही है, इसलीये पेलिंगकी गाडी मैने बुलायी है | आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.

रम्मामच्या सस्पेंशन पुलापाशी आशिषने आम्हाला सामानासह दुसर्‍या टॅक्सीत बसविले आणि गाडी चालकाशी परिचय करून दिला. स्वच्छ, टापटीप आणि सुस्थितीत ठेवलेले वाहन आणि बोलका तरुण चालक! गाडीत शिरताच प्रथम नजरेस पडली एक नावाची पाटी – “मि. लोचेन”! गाडीमध्ये गाडी-भाडे चुकते करण्यासाठी डॅशबोर्डवर आणि दरवाज्यांच्या मधील भागावर दोन्ही बाजूला त्याच्या नावाचा बारकोड लावलेला होता. सिक्किमच्या तरुणाईने वाढत्या पर्यटनानुसार आधुनिक अर्थव्यवस्थेला आपलेसे करून घेतलेले होते! आता यापुढे सिक्किमची सफर लोचेन घडवून आणणार होता! दुसरी टॅक्सी येईपर्यंत थोडा वेळ गेला. पण ‘देर आये दुरुस्त आये’ ह्या उक्तीचा प्रत्यय आला! पंचविशीच्या ह्या तरुण मुलाचा स्वभाव जितका खोडकर तितकाच आदबशीर! लोचेन आमचा गाईड सुद्धा बनला आणि मनोरंजनाचे साधनही!

आम्ही पेलिंगच्या दिशेने प्रस्थान केले. जोरेथांगच्या आसपास त्याने संध्याकाळच्या चहासाठी गाडी थांबवली. पेलिंगच्या पूर्व नियोजित मुक्कामी घेऊन जाईपर्यंत आम्ही त्याच्याशी सल्लामसलत करून आमच्या पेलिंगच्या तीन दिवसीय स्थल दर्शनासाठी त्याला वचन बद्ध करून ठेवले. लोचेनने निसर्गरम्य वळणदार घाट रस्त्यावरून अगदी सराईताप्रमाणे गाडी चालवत पेलिंगला आमच्या क्लब महिन्द्राच्या “चुंबी द माउंटेन रिट्रीट” मुक्कामी आणून उभी केली. दिवस मावळलेला होता. अंधाराचे साम्राज्य केव्हाच पसरलेले होते. फक्त जंगली रातकिड्यांचे आवाज कानी पडत होते. त्यावरून आजूबाजूला गर्द वनराजी असावी असा अंदाज बांधला. पेलिंग शहराच्या खालच्या दिशेला असणार्‍या नाकू चुबूंग गावांमध्ये क्लब महिंद्रचा हा रिसॉर्ट अगदी निसर्गाच्या सानिध्यात वसलेला आहे! पारंपारिक पद्धतीने सजविलेल्या ह्या रिसॉर्टचे उत्तम स्थान, शांत परिसर एका निवांत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अगदी योग्य असेच आहे.

आम्ही ‘चुंबी द माउंटन रिट्रीट’ रिसोर्टच्या प्रवेशद्वारापाशी गाडी थांबताच स्वागत कक्षामधून रिसोर्टची कर्मचारी अगदी अगत्याने स्वागत करण्यासाठी पुढे सरसावली. आम्ही पायऱ्या चढून स्वागत कक्षाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच पांढरा रेशमी स्कार्फ आमच्या गळ्यामध्ये घालून अभिवादन करीत आमचे स्वागत केले. ह्या अनोख्या स्वागतानेच सिक्किमच्या सांस्कृतिक परंपरेशी आमची तोंडओळख झाली. सिक्किममधे पांढरा रेशमी स्कार्फला ‘खादा’ असे म्हटले जाते. खादा म्हणजे पवित्रता, प्रामाणिकपणा तसेच चांगल्या हेतूचे प्रतिकात्मक स्वरूप! खादा अर्पण करणे म्हणजे एखाद्याला आशीर्वाद देणे आणि त्याचे स्वागत करणे. तिबेटीयन संस्कृतीशी घनिष्ठ संबंध सांगणार्‍या सिक्किममधे औपचारिक अभिवादनासाठी, पाहुण्यांचा, आदरणीय व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी शुभेच्छांचा प्रतीक म्हणून पांढरा रेशमी स्कार्फ अर्पण केला जातो.

प्रथम आम्हाला स्वागत कक्षामध्ये गरमागरम चहा पारंपारिक सिरॅमीकच्या कटोरी मधून देण्यात आला. त्यानंतर आमची ओळखपत्रे, बूकिंग ह्याची पडताळणी करून अगदी सुलभ आणि त्वरेने ‘चेक इन’ करून आम्हाला आमच्या खोलीपर्यंत नेण्यात आले. रिसॉर्टवर उपलब्ध सुविधांची माहिती पुरवण्यात आली आणि आवर्जून काही वेळातच सुरू होणार्‍या संगीत रजनीला लवकरच हजेरी लावावी अशी विनंती करून हॉटेलचा कर्मचारी निघून गेला. आम्ही फ्रेश होऊन संगीत सभेसाठी उपस्थित झालो. क्लब महिंद्र रिसॉर्टवर कार्यरत असलेले तरुण कर्मचारी वृंद आपल्या गायकीने पाहुण्यांचे मनोरंजन करीत होते! आम्ही निवांत संगीत संध्याकाळ अनुभवली, रुचकर जेवण घेतले आणि झोपी गेलो. दुसर्‍या दिवशीच्या पेलिंग स्थल दर्शनाची उत्सुकता होती!

बऱ्याच दिवसांनी मा‍झ्या शरीराचा अलार्म मोबाइलच्या अलार्मपूर्वी वाजला.  लवकरच जाग आली. बाहेर पाऊस रिमझिम करीत होता.  चहा घेतला आणि रिसॉर्ट परिसर सर्वेक्षणासाठी खोली बाहेर निघाले! आमच्या खोलीतून बाहेर पडताच उजव्या बाजूकडून वरच्या दिशेला रिसोर्टच्या ‘सन डेक’कडे जिना जात होता.  जिन्यावरून आम्ही सन डेकवर गेलो आणि रिसॉर्टचा संपूर्ण परिसर नजरेस पडला.  डोंगराच्या कुशीत गर्द  हिरव्या वनराजींच्या पार्श्वभूमीवर चुंबी रिसॉर्ट स्थित आहे.  डाव्या बाजूच्या टेकडीवर वसलेले पेलिंग आणि समोर साक्षात कांचनजंगा पर्वत शिखरांचे दर्शन होत होते आणि त्याच्या पायथ्याशी विस्तारलेल्या पर्वतरांगा आणि दरीखोरी! रिमझिमणाऱ्या पावसामुळे भवतालचा परिसर धुक्याची चादर ओढून रमणीय दिसत होता. विविध पक्षांचे मंजुळ आवाज, वृक्षराजी आणि डोंगर कड्यावरून चाललेली ढगांची लगबग पहात खऱ्या अर्थी शुभ सकाळ झाली! आमचा गाडी चालक ‘मिस्टर लोचेन’ हा स्थानिक म्हणजे पेलिंगचाच रहिवासी असल्याने सकाळी आमच्या आधीच रिसोर्टच्या वाहनतळामध्ये दत्त म्हणून हजर होता. आम्ही लवकरच रिसॉर्टमधून पेलिंग दर्शनासाठी बाहेर पडलो.

सिक्किम म्हणजे भारतातील सर्वात लहान आणि कमी लोकसंख्या असणारे दूसऱ्या क्रमांकाचे राज्य! सिक्किम नावाची व्युत्पत्ती सुद्धा रंजक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली! लिंबू भाषेतील शब्द संपदेच्या आधारे नामकरण झालेले सिक्किम! सू – म्हणजे नवीन, खीम-म्हणजे महाल किंवा रहिवासाची जागा- नवीन घर – सिक्किम! पण ह्या राज्याचे तिबेटी नाव आहे “ड्रेन जोंग” म्हणजे तांदळाची दरी!! कदाचित हे नाव साजेसे असावे, येथे तांदुळाचे उत्पन्न मुबलक प्रमाणात होते. येथील मूळ रहिवासी लेपचा, त्यानंतर नाओंग, चांग, मोन आणि कदाचित हिमालय पार करून काही इतर जमातीमधील लोक येथे येऊन वसले. १४ व्या शतकात तिबेटच्या खाम जिल्ह्यातून ‘भूतीया’ समाजाचे लोक येथे स्थलांतरित झाले. प्रमुख समुदाय म्हणजे लेपचा, भूतिया आणि नेपाळी. दीर्घ काळापासून एक सार्वभौम राजकीय अस्तित्व असलेले सिक्किम १९५० मध्ये भारताचे संरक्षित राज्य बनले आणि १९७५ मध्ये भारताचे २२ वे राज्य बनले.    

सिक्किम प्रांताचे पूर्वी प्रामुख्याने पूर्व- पश्चिम – उत्तर – दक्षिण असे विभाग ओळखले जात असत. कालांतराने त्याची सहा जिल्ह्यांमध्ये विभागणी झाली. गंगटोक, मंगन, नामची, ग्यालशिंग, आणि सोरेंग!  पश्चिम सिक्किम म्हणजेच आताचा ग्यालशिंग  जिल्हा! आणि ग्यालशिंग जिल्ह्यात अगदी निसर्गरम्य पार्श्वभूमीवर वसलेले पेलिंग धार्मिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले ठिकाण आहे. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले ग्यालशिंग निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण तर आहेच पण येथे प्राचीन आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या बौद्ध मठांचा वारसा आजही जतन केलेला आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कांचनजंगा पर्वतरांगांच्या अगदी पायथ्याशी वसलेली ही गावे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे वेळी जगातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात उंच असलेल्या कांचनजंगा शिखरांचे विलोभनीय दृश्यांची नजर भेट आपल्याला घडवून आणतात. साधारण समुद्र सपाटीपासून ७०५० फूट उंचीवर असलेल्या  ग्यालशिंग शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर एक लहान निसर्ग सौंदर्याने नखशिखांत नटलेले शहर वजा गाव म्हणजे पेलिंग! कांचनजंगेच्या थेट मनोरम दृष्टादृष्ट भेटीसाठी परिचित असलेले आणि सिक्किममधे होत असलेल्या अनेक पदभ्रमण मोहिमांचा पहिला टप्पा म्हणजे पेलिंग. पेलिंगमधून कोकतांग, कुंभकर्ण (जानू), राथोंग, काबरू, काबरू डोम, पांडीम आणि सिनीओल्चू शिखरांचा समावेश असलेल्या संपूर्ण कांचनजंगा पर्वतरांगांचे दर्शन घडते.

रिंबी धबधबा

आम्ही पेलिंग दर्शनाला बाहेर पडलो खऱ्या, परंतु पावसाची रिमझिम बरसात सुरू झालेली होती.  त्या पावसाळी मोसमाचा अनुभव देखील आगळा वेगळा होता. गर्द हिरवाईने नटलेल्या पर्वतराजीला घट्ट आलिंगन देण्यासाठी ढगांचे पुंजके सरसावून पुढे येत होते. अगदी दरीखोऱ्यांमध्ये सुद्धा विहार करत होते.

प्रथम लोचनने आमची गाडी रस्त्यातच असणार्‍या रिंबी धबधब्याजवळ थांबवली.  पेलिंग पासून अगदी दहा किलोमीटर अंतरावर योकसुम मार्गावर मुख्य रस्त्यावरच दारप गावाजवळ रिंबी धबधबा आहे. रिंबी धबधब्याचे मनमोहक दृश्य अगदी मुख्य रस्त्यावरून जाताना अगदी आपल्या गाडीतूनच नजरेस पडते. आम्ही फोटोग्राफी करण्यासाठी गाडीतून उतरलो आणि धबधब्याजवळ गेलो. धबधब्यातून कोसळणार्‍या पाण्याचे तुषार अंगावर घेण्याची मजा काही वेगळीच! रिंबी धबधबा म्हणजे रिंबी नदीच्या पाण्याचा स्त्रोत.  धबधब्याच्या जवळपास जुने हायड्रो पॉवर स्टेशन आहे. गेझिंग आणि आसपासच्या गावांच्या ऊर्जेचा पुरवठा तेथूनच होतो. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अगदी मुख्य रस्त्यावर असणार्‍या रिंबी धबधब्याच्या नजार्‍याने आमच्या स्थल दर्शनाची सुरुवात झाली.

रिंबी ऑरेंज गार्डन

रिंबी धबधब्याकडून पुढे काही अंतरावरच रस्त्याच्या उजव्या बाजूस ‘रिंबी ऑरेंज गार्डन’ आहे. मुख्य रस्त्यावरून खाली रिंबी नदीच्या दिशेने चालत जावे लागते. येथे किरकोळ प्रवेश फी आहे. ह्या बागेमध्ये विविध प्रकारच्या झाडांची लागवड केलेली आहे. मुख्यत: संत्र्याची लागवड केलेल्या बगीच्यामध्ये वेलची आणि इतर फळे, फुले झाडांची लागवड सुद्धा केलेली दिसते.  ह्या ठिकाणी एक leisurely walk घेण्याचा आनंद वेगळाच आहे. पण आमच्या गार्डन भेटीच्या वेळी नेमकी पावसाची रिपरिप चालू होती. मी अगदी खालच्या दिशेने चालत जाऊन नदी काठी असलेल्या दगडांवर काही क्षण बसले. परंतु पावसाचा वेग वाढल्यामुळे पुन्हा माघारी आले. पर्यटकांच्या वावरामुळे परिसरामध्ये ताडपत्री घालून बनवलेले स्थानिक लोकांचे चहा-नाष्ट्याचे स्टॉल तेथील गजबजाटामुळे नजरेतून सुटत नाहीत. मी मुख्य रस्त्यावर चढून येताना एका स्थानिक महिलेच्या स्टॉलवर आग्रहाने थांबले. घरगुती पद्धतीने संत्र्‍याचे, लिचीचे सरबत पिण्याचा तिने आग्रह केल्याने तिथे क्षणभर क्षुधाशांती केली आणि पुन्हा गाडीकडे निघाले.  

खेचीयोपालरी लेक

ऑरेंज गार्डनच्या भेटीनंतर आमची गाडी खेचीयोपालरी तलावाच्या दिशेने निघाली.  पावसाने त्याची रिमझिम बरसात सातत्याने चालूच ठेवलेली होती! लोचेनने आमची गाडी खेचीयोपालरी तलावाच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या वाहनतळामध्ये उभी केली. आसपास सगळीकडे पावसाने चिखल झालेला होता.

वाहन तळाजवळ गाडीतून उतरल्यावर आम्ही त्या छोटेखानी वस्ती असलेल्या खेचीयोपालरी प्रवेशद्वारामधून आत शिरलो.  तिथे असलेल्या एका फलकाने माझे लक्ष वेधले- “Borrow, Donate & exchange Books here”! एक छोटी लायब्ररी होती आणि बाहेर काऊंटरवर पुस्तके मांडलेली होती. त्याच्या समोरच किरकोळ प्रवेश फीचे तिकीट घेऊन डाव्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने निघालो. सुरुवातीलाच एक मोठे धातुचे प्रार्थना चक्र होते. तेथून पुढे काही अंतर चालून गेल्यावर आपण गर्द जंगलाने वेढलेल्या तळ्यापाशी येऊन पोहोचतो.

पेलिंग पासून २७ किलोमीटर अंतरावर असलेला हा तलाव हिंदू आणि बौद्ध धर्मियांसाठी पवित्र मानला जातो.  स्थानिक लोक ह्या तलावाला “खा-छोट-पालरी” असे म्हणतात, ज्याचा अर्थ “पद्मसंभवाचा स्वर्ग”! गुरु पद्मसंभवांचा आशीर्वाद लाभलेल्या ह्या तलावास इच्छापूर्ती तलाव देखील म्हटले जाते.  खेचीयोपालरी तलाव डेमाझोंग खोऱ्याचा अविभाज्य भाग असलेल्या टेकड्यांवर वसलेला आहे. चहुबाजूंनी गर्द हिरव्या वनराजीच्या समृद्ध टेकड्यानी वेढलेला परिसर अतिशय निसर्ग रम्य आणि शांत आहे. निसर्गाशी एकरूप होऊन ध्यान धारणेसाठी अत्यंत योग्य स्थळ! कदाचित म्हणूनच या ठिकाणाला स्थानिकांच्या मनात ‘पद्मसंभवांचा स्वर्ग’ म्हणून स्थान आहे. तलावाच्या समोर सुंदर प्रार्थना ध्वज वायुलहरींसोबत मंद गतीने जणू प्रार्थना करीत होते. तलावाच्या समोर प्रांगणात स्तूप आहे. आणि त्याच्या मागच्या बाजूने साधारण वीस-पंचवीस मिनिटे वरच्या दिशेने चढून गेल्यावर खेचीयोपालरी गोम्पा आहे.

आम्ही भर पावसात जंगलामधील पायवाटेने एक छोटा ट्रेक करून व्हयू  पॉइंटपाशी जाऊन थडकलो. रिमझिम पावसाने चिंब ओले करून टाकले होते. व्हयू पॉइंट वरून खालच्या दिशेला तलावाचे विहंगम दृश्य नजरेस पडले. तलाव चहुबाजूंनी गर्द जंगलांनी व्यापलेल्या टेकड्यांनी वेढलेला होता. तलावाच्या बाजूनेच रंगीत प्रार्थना ध्वज लावलेले होते. अवघा परिसर धुक्यात लुप्त झालेला होता. टेकड्यावरील वृक्षराजीच्या अंगा-खांद्यावर ढग अलगद विसावलेले होते. व्हयू पॉइंटच्या दुसर्‍या बाजूस ‘स्टोन होम स्टे’ दिसत होता. जंगलातून पायवाटेने चढून आल्याखेरीज या होम स्टेमध्ये जाण्याचा कोणताच पर्याय नव्हता.  चौफेर रंगीत प्रार्थना ध्वज आणि शांतता! ध्यानस्थ होऊन निराकाराशी संवाद साधण्यासाठी अगदीच पूरक वातावरण.  अशा रम्य आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या परिसराची धार्मिक महती तर असणारच! मग त्याबाबत दंतकथा ओघाने असणारच नाही का! लोककथांनुसार ‘खेचीयोपालरी’ हा दोन अक्षरांचा मेळ असलेला शब्द आहे.  खेचीयो  म्हणजे उडत्या योगिनी किंवा तारा अर्थातच अवलोकितेश्वराचे स्त्री रूपातील प्रकटीकरण आणि पालरी म्हणजे महाल किंवा रहाण्याची जागा-थोडक्यात पद्मसंभवांचा महाल!

दुसरी एक दंतकथा म्हणजे फार पूर्वी येथे कुरण होते. तिथे विपुल प्रमाणात बिच्छूबुटीची खूप झाडे होती. तेथील स्थानिक जमाती झाडांचे खोड वेगवेगळ्या कारणांसाठी वापरत असत. एके दिवशी एका लेपचा दांपत्याने ह्या झाडाच्या खोडाचे साल काढत असताना त्यांना एक शंखांची जोडी जमिनीवर पडताना दिसली. जसे ते शंख जमिनीवर पडले, तसे जमिनीला हादरा बसून त्यामधून पाण्याचा झरा निर्माण झाला आणि त्यामुळे ह्या तलावाची निर्मिती झाली असे सांगीतले जाते.

व्हयू पॉइंट वरून दिसणार्‍या तलावाच्या आकाराबाबत सुद्धा दंतकथा आहेत!  स्थानिकांच्या मान्यतेनुसार तलावाचा आकार हा तारा देवतेच्या पदचिन्हासारखा आहे. पौराणिक दंतकथांनुसार ह्या तळ्याकाठी पद्मसंभवाने चौसष्ठ योगिनींना उपदेश करून संबोधित केले. त्यामुळे ह्या तळ्याची आध्यात्मिक महती खूप आहे. बौद्ध धर्मियांच्या तीर्थयात्रेतले हे एक महत्त्वाचे स्थळ मानले जाते. असेही सांगीतले जाते की, ह्या तळ्याचे पावित्र्य राखून ठेवण्यासाठी, पक्षी तलावामध्ये झाडाचे एकही गळून पडलेले पान पाण्यावर तरंगू देत नाहीत. आम्ही त्या शांत आणि प्रसन्न तळ्याचा निरोप घेऊन माघारी निघालो.

पेमायांगस्ते मोनास्ट्री

पूर्वेकडे सूर्य लवकर मावळत असल्याने पर्यटन स्थळे लवकर बंद होतात. आमच्या आजच्या यादीमधील दोन स्थळे अद्याप शिल्लक होती. आम्ही पुन्हा पेलिंग शहराच्या दिशेने निघालो. पेलिंगपासून अगदी जवळच लामा ल्हात्सून खेमो यांनी वसवविलेली सिक्किममधील प्राचीन आणि प्रसिद्ध मोनेस्ट्री आहे. एका टेकडीच्या माथ्यावर असलेली ही मोनेस्ट्री पेलिंग पासून दोन किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्यावरच आहे. मुख्य रस्त्यावरून डोंगर वळणाच्या रस्त्यावरून आमची गाडी मोनेस्ट्रीच्या वाहनतळामध्ये येऊन थांबली.  लोचेनने आम्हाला मोनेस्ट्री दर्शनासाठी  मर्यादित वेळ आखून दिला. कारण आम्हाला अजून एका ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट द्यायची होती. आम्ही लगबगीने मोनेस्ट्रीच्या प्रवेशद्वारामधून तीन मजली इमारतीच्या परिसरात प्रवेश केला. धुक्याने सर्व परिसर व्यापलेला होता.  पावसामुळे वातावरण कुंद  झालेले होते. मोनेस्ट्री दोहोंबाजूंनी बर्फाच्छादित पर्वतांच्या निसर्ग रम्य पार्श्वभूमीवर वसवलेली आहे.

पेमायांगत्से मठाची सुरुवात ‘त्सांग खांग’ या लहान मठापासून झाली. साधारण १६५० ते १६५१ ह्या कालावधी दरम्यान ह्या मठाची स्थापना झाल्याचे सांगीतले जाते.  आज सिक्किम मधील प्रमुख मोनेस्ट्रींपैकी दुबडी मठानंतर  दुसरी सर्वात प्राचीन म्हणून पेमायांगत्से मोनेस्ट्री ओळखली जाते.  मोनेस्ट्रीच्या वेगवेगळ्या मजल्यांवर बौद्ध कलात्मकता आणि अध्यात्मिक प्रशिक्षणाच्या खुणा दिसून येतात. मुख्य प्रार्थना हॉलमध्ये प्रवेश करताच पारंपारिक तिबेटीयन नक्षीकाम असलेल्या सुंदर चित्रांनी सुशोभित केलेले दरवाजे, खिडक्या, भित्तिचित्रे आपले लक्ष वेधून घेतात. मठामध्ये अनेक प्राचीन ग्रंथ संग्रही ठेवलेले आहेत. पद्मसंभवांच्या वज्र वराही मूर्ती या मठामध्ये आहे. तसेच बौद्ध संत आणि रिनपोचे यांची शिल्पे देखील आहेत.  तिबेटीयन कॅलेंडर प्रमाणे फेब्रुवारी महिन्यामध्ये दरवर्षी प्रसिद्ध मुखवटा नृत्य – छम नृत्य महोत्सवाचे येथे आयोजन होते. ह्या मोनेस्ट्रीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिबेटीयन बौद्ध धर्माच्या न्यींग्मा पंथाचे अनुसरण करणारे अनुयायी येथे आहेत. फक्त शुद्ध वंशाचे ‘ता -त्शांग’ भिक्षू ह्या मठात स्वीकारले जातात. ह्या मोनास्ट्रीचा इतिहास राबदेन्तसे आणि चकदोर नामग्याल साम्राज्याच्या कारकि‍र्दीशी निगडित आहे. अतिशय धार्मिक असलेल्या चकदोर राजाने सिक्किममध्ये धर्म प्रसारासाठी पुढाकार घेतला आणि फतवा काढला की, सिक्किम मधील भुतिया समाजाच्या प्रत्येक कुटुंबातील तीन मुलांपैकी दुसर्‍या मुलास पेमायांगत्से मठाचा भिक्षू म्हणून नियुक्त केले जावे. या मठातील भिक्षूंना ‘ता-त्शांग’ ह्या उपाधीने ओळखले जाते. सिक्किम साम्राज्याच्या चोग्याल राजांना पवित्र पाण्याने अभिषेक करण्याचा विशेषाधिकार ह्या मठाच्या प्रमुख लामांना दिलेला होता. त्यामुळे ही मोनेस्ट्री म्हणजे सिक्किमच्या पूर्व इतिहासाचे एक स्मारकच आहे! तसेच प्राचीन तांत्रिक विद्येचे ज्ञानार्जन करणार्‍यांसाठी ही मोनेस्ट्री म्हणजे विद्येचे भांडार आहे. मिड्रोलिंग शुद्ध वंशाचे भिक्षू – ‘ता -त्शांग’  ह्यांच्यासाठी हा मठ जणू एका दीपस्तंभासारखा निसर्ग रम्य टेकडीवर स्थित आहे.  ह्या मोनास्ट्रीचे महत्त्व सिक्किमच्या समाज रचनेत अगदी खोलवर रुजलेले आहे. अध्यात्मिक आश्रयाच्या पलीकडे जाऊन पेमायांगत्से मठ हा स्थानिकांसाठी धार्मिक जीवनाचा आधार स्तंभ मानला जातो. मोनेस्ट्री पाहण्यात भराभर वेळ निघून गेला. आम्ही त्वरेने तेथून काढता पाय घेत सिक्किम साम्राज्याच्या भूतकाळाचे भग्न अवशेष पाहण्यासाठी रवाना झालो.

सिदकियोंग तुलका उद्यान आणि राबदेन्तसे भग्न अवशेष – सिक्कीमच्या पूर्व इतिहासाची कहाणी!

आम्ही ‘सिडकियोंग तुलकू’ उद्यान बंद होण्यास अगदी पंधरा मिनिटे असताना ऐनवेळी तेथे पोहोचलो. प्रवेशद्वारामधून उद्यानात शिरलो खऱ्या, परंतु राबदेन्तसे महालाकडे जाण्यासाठी तेथील कर्मचारी मज्जाव करू लागले. आम्ही उद्यान अद्याप बंद झालेले नाही, आम्ही स्मारक पाहून लवकरच परतू असे गयावया करून अखेरीस प्रवेश मिळविला! तेवढ्यात तेथेच कार्यरत असणार्‍या एका माणसाने आम्हाला राबदेन्तसेकडे घेऊन जातो आणि गाईड म्हणून माहिती देतो असे सांगीतले. आम्ही जरा आश्चर्य चकित झालो! पण त्या वेळी आम्हाला पक्षी उद्यानामध्ये वेळ न दवडता राबदेन्तसे अवशेष पाहून घ्यायचे होते ह्या बाबीचा त्या मनुष्याने चांगलाच फायदा घेऊन त्याच्या जाळ्यात अडकविले! संध्याकाळची वेळ, हाती असलेला कमी कालावधी आणि आखलेल्या दिवसाप्रमाणे स्थल दर्शन पूर्ण करण्याच्या नादात आम्ही त्या मनुष्याला आमच्या सोबत गाईड म्हणून येण्यास संमती दिली. आम्ही त्या पक्षी उद्यानाला अगदी घाईने फेरफटका मारला.

सिक्कीम राज्याचा दहावा चोग्याल राजा ‘सिडकियोंग तुलकू’ यांच्या नावाने हे पक्षी उद्यान निर्माण केलेले आहे. त्यांना आधुनिक वनीकरणाचे जनक मानले जाते.  पेलिंग आणि ग्यालशिंगच्या दरम्यान मुख्य रस्त्यावर साधारण दोन हेक्टर परिसरामध्ये ‘सिदकियोंग तुलकू’ पक्षी उद्यान विकसित केलेले आहे. उद्यानामध्ये तितर, मकाऊ, एमू, हंस, बदके अश्या अनेक विदेशी पक्षांच्या  प्रजाती आहेत. उद्यानामध्ये माहिती केंद्र, कॅफेटेरिया, सोविनियर शॉप, नेचर वॉक, सेल्फी पॉईंट्स, आणि इतर बऱ्याच सुविधा आहेत. उद्यानाचा परिसर विविध वन्य झाडे झुडुपे, वन्य औषधी वनस्पती आणि चेस्टनट झाडांच्या गर्द वनराजीने  व्यापलेला असल्याने एका नैसर्गिक लँडस्केपमध्ये मोकळ्या वातावरणामध्ये वन्य पक्षी विहार करताना दिसतात. उद्यानाचा प्रकल्प कौतुकास पात्र आहे.

राबदेन्तसे अवशेष पाहण्यासाठी ‘सिदकियोंग तुलकू ’ पक्षी उद्यानामधून जावे लागते. उद्यानामध्येच पक्षी उद्यानाकडे जाण्याआधी उजव्या बाजूस भग्न अवशेषांकडे जाणाऱ्या रस्त्याचा दिशादर्शक फलक आपल्याला दिसतो. आम्ही त्या जंगलातील पायवाटेवरून चालू लागलो. पायवाटेवरून जाताना आमच्या लक्षात आले की, वाटाड्याची गरज भासावी अशी बिलकुल परिस्थिती नव्हती! त्याने आम्हाला घोळात घेतले हे आमच्या लक्षात आले!! आमच्या पुढे -मागे अजूनही काही लोक त्या वाटेने येत होते आणि काही जण माघारी परतत होती. त्या सद्गृहस्थाने (!) आम्हाला महाल खूप दूर आहे, जंगलाचा रस्ता आहे असे काहीबाही सांगून आमच्या कडून बक्कळ गाईड फी घेऊन ठकवले म्हणण्यास हरकत नाही!

आम्ही त्या जंगल वाटेने राबदेन्तसे राजवाड्याच्या दिशेने निघालो. गर्द चेस्टनटच्या जंगलवाटेने आम्ही वीस-पंचवीस मिनिटांची पायपीट करून ह्या राबदेन्तसे स्मारकापाशी पोहोचलो. आम्ही पुढे गेल्यावर भारतीय पुरातत्व खात्याचा माहिती फलक दृष्टीस पडला. तिथून पुढे काही पायऱ्या चढून गेल्यानंतर या राजवाड्याचे भग्न अवशेष जतन केलेले दिसतात.  पेमायांगत्से मठाच्या नैऋत्येला गर्द जंगल वाटेतून गेल्यानंतर टेकडीवर अगदी मोक्याच्या जागी ही राजधानी वसवलेली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही! या परिसरामध्ये मध्ययुगीन दगडी बांधकामाचे अवशेष दृष्टीस पडतात.

राबदेन्तसे राजवाडा म्हणजे साधारण १६७० ते १८१४ या कालखंडामध्ये प्रस्थापित केलेली प्राचीन सिक्किम राज्याची दुसरी राजधानी! राबदेन्तसे अवशेषांना भारतीय पुरातत्व खात्याने ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित केलेले आहे. कांचनजंगा पर्वत शिखरांच्या पार्श्वभूमीवर राबदेन्तसे महाल आणि तेथील चोरटेन्स (स्तूप) सिक्किमच्या प्राचीन इतिहासाचे साक्षीदार आहेत! आज आपल्याला इथे फक्त इतिहासाचे भग्न अवशेषच पाहावयास मिळतात. हवामान स्वच्छ असल्यास ह्या प्राचीन राजधानीच्या परिसरातून कांचनजंगा पर्वतरांगांचे विहंगम दृश्य दिसते. तसेच दुसर्‍या बाजूला पर्वतरांगा आणि दरी-खोऱ्याचे दूर पर्यंतच्या टापूचे विहंगम दृश्य पाहावयास मिळते. राबदेन्तसे स्मारकाच्या प्रवेशद्वारामधून आत शिरताच डाव्या हाताला भग्न भिंतींचे अवशेष दिसतात. परिसरामधील फरसबंदी पायवाट आणि जतन केलेल्या हिरवळ आणि बगीच्यामुळे त्या परिसराचे प्राचीन शाही स्वरूप आपल्या मनामध्ये उमटू लागते. भग्न अवशेषांना दुभाजक भिंतीद्वारा दोन विभागांमध्ये विभागलेले आहे. उत्तरेकडील भाग म्हणजे राजवाडा जिथे कदाचित राजेशाही कुटुंब राहत असावेत आणि त्याला जोडलेले तीन चौक दाब लहांगांगचे अवशेष दिसतात. त्यालगतच तीन स्तूप दिसतात. ह्या ठिकाणी राजेशाही कुटुंब त्यांच्या प्रार्थना, पूजा-अर्चा, धार्मिक कार्ये करीत असावेत. दक्षिणेकडील बाजूचा परिसर सर्वसामान्य जनतेसाठी किंवा प्रजेसाठी खुला होता. तिथे एका उंच चबुतर्‍यावर सिंहासन आणि स्तूप आहे. ह्या ठिकाणी चोग्याल राजे आणि त्यांचे दरबारी राज्यकारभार करीत असावेत.  दगडी तटबंदीच्या पलीकडे पश्चिम दिशेला प्रजेचा रहिवास असावा!

सिक्किमचे चोग्याल राजवंशाचे दुसरे राजा ‘तेनसुंग नामग्याल’ यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत राज्याची राजधानी योकसुमहून राबदेन्तसे येथे स्थलांतरित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. चोग्याल राजांच्या राजवटीमध्ये सिक्किमचा राज्यकारभार शांततेत सुरू होता. नामग्याल राजाला तीन बायका होत्या. एक तिबेटीयन म्हणजे भूतिया, दुसरी भुतानी वंशाची आणि तिसरी लिंबू समाजाची!  भूतिया वंशाच्या पत्नीपासून झालेला मुलगा तिसरा चोग्याल राजा चकदोर  नामग्याल हा साधारण सन १७०० मध्ये गादीवर बसला. परंतु त्याच्या सावत्र बहि‍णीने चकदोरचा उत्तराधिकारी म्हणून स्वीकार केला नाही. ह्या भुतानी वंशाच्या पत्नीपासून झालेल्या पेंडीओंगमू मुलीने रागाने भुतानी लोकांच्या मदतीने त्याला सत्तेतून पायउतार केले. चकदोर तिबेटमधील ल्हासा येथे आश्रयास गेला. अनेक वर्षांच्या सत्ता संघर्षानंतर चकदोरला तिबेटीयन सैन्याने पाठिंबा देऊन पुन्हा सिक्किममधे राजा म्हणून प्रस्थापित केले.

चकदोर  दहा वर्षे निर्वासितासारखा तिबेटच्या आश्रयाला असताना त्याने बौद्ध धर्म, तिबेटीयन साहित्य ह्यामध्ये खूपच प्राविण्य मिळवले. १८ व्या शतकाच्या मध्यावर सिक्किमने नेपाळ आणि भूतान या देशांसोबत अनेक प्रांतिक हद्दीं वरून झालेली युद्धे सोसली आणि सत्ता संघर्ष अनुभवला. भुतानी आणि नेपाळी लोकांनी हल्ले करून राबदेन्तसे  राजधानी काबीज करून त्याची वाताहात केली आणि राजधानीचे शहर उध्वस्त केले.  दरम्यानचे काळात तिबेटमध्ये निर्वासिताप्रमाणे राहणारे सहावे चोग्याल राजा तेनसिंग नामग्याल यांचे ल्हासा येथे निधन झाले. त्यांचा मुलगा सातवा चोग्याल राजा त्सुगफुद नामग्याल पुन्हा राबदेन्तसे येथे परतला. परंतु नेपाळ आणि भूतान सीमेच्या निकटवर्ती प्रदेशात हा राबदेन्तसे राजवाडा असल्याने त्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने राजधानी, उत्तर सिक्किम मधील तुमलोंग येथे स्थलांतरित केली. सुमारे ३३० वर्षे नामग्याल राजांची सत्ता सिक्किमच्या प्रांतात राहिली. सतराव्या-अठराव्या शतकापर्यंत सिक्किमला नेपाळी गोरखा आणि भुतानी आक्रमणांना तोंड द्यावे लागले. त्यामध्ये सिक्किमला आपला काही प्रदेश गमवावा लागला.  परिणामी एकेकाळी भरभराटीला आलेला राबदेन्तसे येथील राजेशाही राजवाडा सोडून देण्यात आला. कालांतराने अनेक परकीय आक्रमणे आणि निसर्गाच्या प्रभावाखाली काळाच्या ओघात राबदेन्तसे आज आपल्यासमोर भग्न अवशेषांच्या स्वरुपात उभा आहे!

चोग्याल राजवंशाचा सातवा राजा त्सुगफूद नामग्यालच्या करकीर्दीमध्ये सिक्कीमी लोकांचा ब्रिटिशांशी संबंध आला. सिक्कीम आकाराने लहान असले तरीही अनेक आंतरराष्ट्रीय सीमेवरील त्याचे स्थान राजकीय आणि सामरीक दृष्ट्‍या खूप महत्त्वाचे होते. इंग्रजानी सिक्किमचे भारत, चीन-तिबेट आणि नेपाळ ह्याच्यातील सुरळीत व्यापार-उदीमासाठी अनन्यसाधारण महत्त्व ओळखले होते. १८ व्या शतकाच्या मध्यावर सिक्किमने नेपाळ आणि भूतान देशांसोबत अनेक प्रांतिक हद्दीवरून झालेली युद्धे पाहीली. कालांतराने नेपाळी लोकानी पश्चिम सिक्किमचा बहुतांशी भाग व्यापला. सन १८१६ मध्ये अँग्लो-नेपाळी युद्धामध्ये ब्रिटिशांना सहकार्य करण्याच्या बदल्यात बळकावलेला भूभाग पुन्हा सिक्किमला मिळवून देण्यात आला. पण त्यानंतर सिक्किम “de facto protectorate of Britain’ म्हणजे संरक्षित राज्य झाले! ब्रिटीशांच्या धूर्त आणि धोरणी विचाराने सिक्किमला इंग्रजांचे मांडलीकत्व पत्करावे लागले. सन १८१७ मध्ये सिक्किम ब्रिटीशांच्या अंमलाखाली आला. अँग्लो-नेपाळी युद्धामुळे नेपाळच्या गोरखा लोकांचा चिवट, शूर-निडर आणि कष्टाळू स्वभाव ओळखून इंग्रजानी ह्या लोकांना सिक्किममध्ये स्थलांतरास प्रोत्साहन देऊन हेतुपूर्वक वसवविले, जेणेकरून इंपिरीयल आर्मीमध्ये त्यांचा समावेश करता येईल!  त्यामुळे दुर्गम दरी-खोऱ्यामध्ये पशुपालन करून राहणारे लेपचा, भूतिया आणि स्थलांतरित शेतकरी आणि लढवय्या नेपाळी-गोरखा अश्या सरमिसळ असलेल्या वांशिक लोकसंख्येचा सिक्किम प्रांत आज आपल्याला दिसतो!

आम्ही राजवाडा पाहून सिक्किमच्या साम्राज्याचा इतिहास मनामध्ये साठवून सहा वाजता पुन्हा पेलिंग शहरात पोहोचलो. अप्पर पेलिंग मध्ये अगदी चौकात असलेल्या ‘बिग बाऊल’ या रेस्टॉरंटमध्ये थडकलो. हॉटेल मालकीणीने तिच्या प्रसन्न चेहर्‍याने केलेल्या स्वागतानेच आम्ही खूप खुष झालो. स्मित हास्य करून तिने मेनू कार्ड आमच्या हाती सोपवले.  आम्ही तिलाच त्या मेनू कार्डमधील ‘बेस्ट ऑप्शन’ सुचवण्याची गळ घातली. तिने आम्हाला शाकाहारी मोमो आणि ‘वैई वैई’  नूडल्स खाऊ घातले. त्या निवांत कॅफे मध्ये चटपटीत नाश्त्यानंतर ‘जिंजर लेमन टी’ तर हवाच! अगदी ‘रीफ्रेशिंग टी’ होता! आमच्या पेलिंगच्या मुक्कामात दररोज तिच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन आम्ही लेमन टी पिण्याचा सपाटा लावला! आमच्या जि‍भेवर तिच्या मेन्यू कार्डने जणू ताबा घेतला.

आम्ही समाधानाने आमच्या चुंबी माउंटन रिसॉर्टवर परतलो. आजचा दिवस पेलिंग शहर, आसपासचा निसर्गरम्य प्रदेश आणि सिक्किमच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारश्याची  तोंडओळख करून देणार्‍या स्थलदर्शनाने परिपूर्ण झाला. दुसऱ्या दिवशीच्या स्थलदर्शनामध्ये सिक्कीमच्या प्राचीन राजधानीच्या म्हणजेच ‘योकसुम’ भेटीची उत्सुकता वाढली!


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 thoughts on “सिक्कीम डायरीज् : भाग – १  

Add yours

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑